कोकणदिवा ट्रेक
कोकणदिवा कोकणदिव्याची माहीती घेत असताना वाचण्यात आलं की अलीकडेच हा उजेडात आला आहे. हे वाचल्या वाचल्या मला पडलेला प्रश्न म्हणजे दिवा अंधारात कसा काय राहु शकतो? तो उजेडातच होता पण तो दिसण्याची दृष्टी आपल्याकडे नव्हती असे म्हणल्यास वावगे वाटु नये. कोकणदिवा बघण्याची तीव्र ईच्छा मनात जागृत झालेली होती आणि ती प्रत्यक्षात उतरवणे अत्यंत गरजेचे वाटु लागले होते. नुसती ईच्छा मनात येऊन उपयोग नसतो, अशा कैक इच्छा समुद्रावर ज्याप्रमाणे एका सेकंदात असंख्य लाटा तयार होत असतात तशा माझ्या मनात येत असतात. त्यातल्या बऱ्याच काही किनाऱ्याला पोचल्यावर लुप्त होऊन जातात. पण त्यातली एखादी तरी त्सुनामीसारखी असते, तांडव घातल्याशिवाय ती जात नाही. कोकणदिवा बघण्याची तीव्र ईच्छा हि त्यातलीच एक. ज्या भागात कोकणदिवा आहे तो अतिशय दुर्गम आहे. घोल पर्यंत एसटी सेवा उपलब्ध आहे. ट्रेकिंग हे काही एकटया दुकटयाचे काम नव्हे. त्यामुळे जोडीला मित्र असणे अपरीहार्य आहे. मित्रसुद्धा असे असायला हवेत की त्यांना...