Wednesday 30 December 2015

सायकलप्रवास दोन वर्षांचा झाला..

सायकलप्रवास दोन वर्षांचा झाला... 

३१ डिसेंबरला केलेले संकल्प टिकत नाहीत असे म्हणतात. नव्याचे नऊ दिवस या म्हणीलासुद्धा मागे टाकणारे हे संकल्प नऊ दिवससुद्धा टिकत नाहीत. आणि ते अगदी खरेही आहे. तरीही मी या दिवशी बरोबर दोन वर्षापुर्वी सायकल चालवण्याचा संकल्प केला होता आणि आश्चर्य म्हणजे तो अजुनही टिकुन आहे. 

माझ्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये एक गियर असलेली सायकल बरेच दिवस पडुन असलेली मी जाता येता पाहायचो. चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या शिवाची सायकल होती ती. एकदा त्याची परवानगी घेऊन त्या सायकलवर मी पुणे कँटोन्मेंटची राईड करून आलो. आयुष्यात पहील्यांदाच गियरची सायकल चालवली. मला गियर कसे बदलायचे हे राहुल कोंढाळकरने शिकवले आणि त्या राईडमध्ये सायकलची पडलेली चेनही त्यानेच बसवून दिली होती. राहुल कोंढाळकर सोबत केलेली ती छोटीशी राईड माझ्यातील उत्सुकता, आवड आणि तृष्णा जागृत करून गेली होती. स्नेल कंपनीच्या त्या सायकलवर सुरू झालेला प्रवास अजुनही अविरत चालुच आहे. 

२ ते ३ महीन्याच्या कालावधीनंतर मला स्वतःची सायकल असावी असे वाटु लागले. गियरच्या सायकलबद्दल मला शुन्य ज्ञान होते. तरीही ३१ डिसेंबर २०१३ यादिवशी मी गियरची सायकल विकत घ्यायला गेलो. सर्वात स्वस्त १८ गियरची हिरो डर्ट बाईक ₹६५०० ला होती. तेव्हा मला ₹६५०० सुद्धा खुप जास्त वाटले होते. एवढी महाग सायकल असते का कुठे?  सायकलसाठी कशाला एवढे पैसे घालवायचे? असे विचार माझ्या मनात येऊ लागले. पण गियरची सायकल त्याहुन स्वस्त नव्हतीच. त्यामुळे ती डर्ट बाईक घेण्याचे मी ठरवले. आरती सायकल्स हिंगणे खुर्द येथुन सायकल विकत घेतली आणि लगेच त्या सायकलवर टांग मारून मी थेट कात्रज घाटातील दरीपुल गाठला. आज कुछ तुफानी करते है या आवेशात. तेव्हा कात्रज बोगद्यापर्यंत सायकल चालवत जाणे म्हणजे जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट असल्यासारखे मला जाणवले. कारण दरीपुल येईपर्यंत माझा कार्यक्रम उरकला होता. डर के आगे कात्रज दरीपुल होता. खुप दम लागल्यामुळे मी माघारी फिरलो आणि घरी येऊन आराम केला. ३१ डिसेंबरला पार्ट्यांमध्ये रमण्याऐवजी मी सायकलमध्ये रमलो होतो. १२ वर्षे सिजन बॉल क्रिकेट खेळल्यानंतर मी क्रिकेट खेळणे सोडुन दिले. त्यानंतर सह्याद्रीमध्ये ट्रेक करण्याचा छंदही जडला होता. क्रिकेट आणि ट्रेकींग नंतर माझ्या छंदांमध्ये साईकलिंगची भर पडली.  

अधुन मधुन मी माझी डर्ट बाईक घेऊन राईडला जायचो. या सायकलवर १० किमी अंतरावरील डोणजेफाट्याला जायलासुद्धा माझा भाता फुलुन जायचा आणि दोन ते तीन ठिकाणी दम घेण्यासाठी थांबावे लागायचे. एकदा पानशेतच्या पुढे दापेसर पर्यंत (६५ किमी) ही सायकल घेऊन गेलो तेव्हा कळले की आपण घेतलेली सायकल ही तांत्रिकदृष्ट्या पुर्णपणे चुकीची आहे. लांब पल्ल्याची राईड करायची असेल तर ही सायकल स्वाहा करून योग्य सायकल विकत घेणे आवश्यक होते. हिरो डर्ट बाईकवर संध्याकाळची भाजी आणायला मंडईत जाणे उत्तम. या सायकलवर लांब पल्ल्याची राईड करणे म्हणजे कबुतराच्या पंखांकडुन गरूड भरारीची अपेक्षा ठेवण्यासारखे होते. त्यामुळे मी सायकल बदलण्याचा निर्णय घेतला. 

मार्च महीन्यात कन्येच्या वाढदिवसाची शॉपींग करायला पुण्यात गेलो होतो. वाढदिवसाची शॉपींग झाल्यावर तसाच फडके हौदाजवळील सिंग सायकलमध्ये गेलो. तारीख होती ४ मार्च २०१४ यादिवशी प्रोव्हीलची एमटीबी सायकल ₹१४५०० ला घेतली. सिंग सायकलने माझी सायकल रिक्षामध्ये घालुन माझ्या घरी आणुन दिली. सायकल बदलल्यावर सायकल चालवण्याचा माझा उत्साह वाढला. आठवड्यातून एकदा सायकल चालवणारा मी त्यानंतर दररोज १० किमी सायकल चालवु लागलो. दर रविवारी लाईफ सायकलवाले ₹१०० वर्गणी घेऊन ६० किमीची राईड करत असत. दमछाक झाली किंवा सायकलला काही प्रोब्लेम झाला तर सोबत असलेल्या टेंपोमध्ये सायकल टाकुन आणण्याची सोय होती. बॅकअप टेंपोचा आधार असल्यामुळे मी खारावडे राईडला जायचे ठरवले. लाईफ सायकलबरोबर केलेल्या खारावडे राईडने माझी दमछाक केली पण त्यानंतर माझा दम वाढत गेला. खारावडे राईडला गेल्यामुळे वेगवेगळ्या सायकल्स पाहायला मिळाल्या आणि इतर सायकलपटुंची ओळखही झाली. त्यानंतर दम वाढवण्यासाठी मी रोज २० किमी सायकल चालवायला सुरूवात केली. साईकलिंगचे हे अंतर मोजण्यासाठी रनकिपर आणि स्ट्रावा या दोन अॅपची चांगलीच मदत झाली. विशेषकरून वेगवेगळ्या ठिकाणचे स्ट्रावाचे सेगमेंट मला भुरळ घालायचे. या सेगमेंटमध्ये माझे नाव पहील्या दहामध्ये असावे असे मला वाटु लागले आणि मी त्या अनुषंगाने सायकल जोरात पळवण्याचा प्रयत्न करू लागलो. पण काही मोजक्याच सेगमेंटमध्ये मी पहील्या दहामध्ये आहे. माझी सायकल चालवण्याची आवड वाढवण्यात स्ट्रावा सेगमेंटचा वाटा खुप मोठा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. एकदा मी स्ट्रावाचे ग्रँड फोंडो चॅलेंज पुर्ण करण्यासाठी १३० किमी सायकल चालवण्याचा निर्णय घेतला. जुन महिन्यात १३० किमी सायकल चालवली खरी पण ती चालवताना माझे अतोनात हाल झाले. दुसरा ग्रँड फोंडो करायला पहिल्याच्या तुलनेत कमी हाल झाले पण इथुन माझा स्टॅमिना वाढत गेला. त्यामुळे माझे लांब पल्ल्याचे सायकलिंग सुरू होण्यालासुद्धा स्ट्रावाच जबाबदार आहे असे मी म्हणेन. १३० किमी ची राईड झाल्यानंतर मी पुण्याभोवतालचे घाट आणि गडकिल्ले सायकलने पार करायला सुरूवात केली. सिंहगड, पुरंदर, रायगड, लवासा, खंबाटकी घाट, ताम्हिणी घाट, पाबे खिंड, मरीआई घाट, पानशेत, लोणावळा, कापुरहोळ या सर्व ठिकाणी सायकलवर जाऊन आलो. दर रविवारी कुठे ना कुठे तरी सायकलिंगचा बेत व्हायचाच. महेश निम्हणबरोबर केलेली रायगड राज्याभिषेक सोहळ्याची सायकल राईड केवळ अविस्मरणीय. तसेच योगेश कानडे बरोबर केलेली लवासा राईडसुद्धा अविस्मरणीयच. या राईडला मी पहाटे अंधार असताना घराबाहेर पडलेलो संध्याकाळी अंधार पडल्यावरच घरी परतलो होतो. योगेश कानडे बरोबर एकदा खंबाटकी राईड करताना दिवसभर झालेली उपासमार आणि त्यानंतर शिवापुरमध्ये मटण भाकरीचा घेतलेला आस्वाद निव्वळ अप्रतिम आणि कधीही न विसरता येण्यासारखा आहे.

याच दरम्यान एका सकाळ पुरवणीमध्ये बीआरएमच्या पारितोषिक वितरण समारंभाविषयी सुनंदन लेलेंचा एक लेख छापुन आला होता. त्या समारंभाला जे सायकलवर येतील त्यांनाच प्रवेश होता म्हणे. त्या लेखातले बीआरएम आणि रँदोनिअर हे शब्द माझ्या डोक्यावरून विमानात बसुन निघुन गेले होते पण विषय सायकलिंगचा असल्यामुळे माझे मन त्या बातमीभोवती घुटमळले. महेश निम्हण माझ्या सायकलिंगविषयीच्या बऱ्याचशा शंका दुर करत असे. त्याने अगोदर एक बीआरएम केलेली होती. त्याच्याकडुनच मला दिव्या ताटे आणि पुणे रँदोनिअर्सविषयी माहीती मिळाली. बीरआरएमविषयी माहीती मिळाल्यानंतर २०० किमी च्या बीआरएम मध्ये भाग घेऊन मेडल मिळवण्याची लालसा निर्माण झाली. १३.५ तासात २०० किमी अंतर पार होईल की नाही याबद्दल मलाच खात्री वाटत नव्हती. मी सराव वाढवण्याचे ठरवले. बीआरएमच्या लांब पल्ल्याचा सराव होण्यासाठी मी कामाला सायकलवर जाण्याचा निर्णय घेतला. घरापासुन टाटा मोटर्सचे अंतर ३२ किमी आहे, दोन्ही बाजुचे अंतर मोजले तर जाऊन येऊन ६४ किमी साईकलिंग एकाच दिवसात होणार होते. कामावर जाण्यासाठी कंपनी बसची सुखसुविधा असताना ३२ किमी सायकल चालवत जाणे म्हणजे सुखामध्ये दुःखाला कवटाळण्यासारखे होते. पण मी ज्या समुद्राकडे निघालो होतो त्यासाठी मला माझ्या डबक्यातुन बाहेर पडावेच लागणार होते. डबकं सोडल्याशिवाय समुद्र दिसणे शक्य नव्हते. मी माझी झेप वाढवली. डबक्यातुन बाहेर उडी घेतल्यावर बरेचजण आश्चर्यचकीत व्हायला लागले. काहींनी माझा उत्साह वाढवला तर काहींनी खो घालण्याचासुद्धा प्रयत्न केला पण मी डगमगलो नाही.

मला सायकलच्या शर्यतीपेक्षा बीआरएम मध्ये सायकल चालवणे जास्त आवडते. माझी पहिली बीआरएम पुणे पाचगणी पुणे २०० किमी (सप्टें २०१४) मी ११.५ तासात पुर्ण केली. पहील्याच प्रयत्नात यश मिळाल्यामुळे माझा उत्साह द्विगुणित झाला. त्यानंतर अलीबागची कोकण क्लाईंब ३००बीआरएम (ऑक्टो २०१४) १९ तासात पुर्ण केली. तेव्हा खोपोली घाटात माझी चांगलीच वाट लागली होती. नोव्हेंबर २०१४ नंतरच्या सर्व  बीआरएम गोव्यात आयोजित केल्यामुळे मी निराश झालो. कामावर सुट्ट्या टाकुन गोव्यात जाऊन बीआरएम मध्ये सायकलिंग करणे खिशाला परवडणारे नव्हते. यानंतर मी बीआरएमचा विचार सोडुन दिला. नोव्हेंबर २०१४ ते ऑक्टोबर २०१५ दरम्यान मी एकही बीआरएम केली नाही परंतु वार्षिक सभासदत्व घेऊन रायडर नंबर ८७ मिळवला होता.

३०० किमी ची कोकण क्लाईंब बीआरएम केल्यानंतर मला जाणवले की लांब पल्ल्याचे अंतर एमटीबी सायकलवर पार करणे खुप कष्टप्रद आहे. ३०० पेक्षा जास्त अंतर चालवण्याच्या दृष्टीने मी स्नेल कंपनीची साधी रोडबाईक घेऊन तिला QUANDO कंपनीचे हब बसवले, बॉटम ब्रॅकेट बिअरींगचा लावला आणि इम्पोर्टेड टायर्स टाकल्यानंतर ती सायकल २६ चा सुपरफास्ट सरासरी वेग देऊ लागली होती. ₹१४००० ची सायकल घेऊन तिच्यावर ₹६००० जास्त खर्च केले होते. दुर्दैवाने कोणत्याही बीआरएम मध्ये भाग घेण्याअगोदर माझी ही असेंबल केलेली सायकल चोरीला गेली.

हायवेवर, रात्री अपरात्री कुठेही सायकल चालवताना मला कधीही अपघाताची भीती वाटली नाही. पण काही भित्र्या स्वभावाचे मित्र जे स्वतः हायवेवर सायकल चालवायला घाबरतात मला अपघाताविषयी सांगुन घाबरवण्याचा प्रयत्न करायचे. सायकल चालवताना माझा एकमेव अपघात झाला आहे तोसुद्धा एका भटक्या कुत्र्यामुळे. डाव्या हाताचा अंगठा आणि उजव्या पायाचा गुडघा चांगलेच सोलटले होते. एक ब्रेक निकामी झालेला ट्रक भरधाव वेगात माझ्या जवळुन गेला होता. तसाच पुढे जाऊन त्याने तीन अवजड वाहने चेंबवली होती. एक फुटाच्या अंतरामुळे त्या ट्रकपासुन मी वाचलो होतो. सायकल चालवताना एकदा हायवेवर ₹५०० ची नोटही सापडली होती. सातारा राईडच्यावेळी भारतभर सायकलभ्रमण करणाऱ्या दोन परदेशी सायकलपटुंची गाठ पडली. त्यांच्याकडुन बरेच काही शिकायला मिळाले. आणि रिचर्ड हॅकेट कडुन एक भेटवस्तुही मिळाली. 

सायकलिंगसाठी लागणार्‍या सर्व प्रकारच्या वस्तु मी खरेदी करत गेलो. कुठेही कसलीही कसर ठेवली नाही. सिपर बॉटल्स, शॉर्टस, टी शर्टस, सायकलिंग जर्सी (बेलकीन), विंड चिटर, पुलओव्हर, जर्कीन्स, ग्लोव्हज, हेल्मेट, रिफ्लेक्टीव वेस्ट आणि बेल्ट, सीट पोस्ट बॅग, हँडलबार बॅग, हायड्रा पॅक, वेगळे पॅडल्स, ग्रीप्स, टो क्लीप्स, टॉर्च, टेल लँप, कॅरीअर, मोठा आणि छोटा हवेचा पंप, पंक्चर किट इ. यातल्या काही वस्तु दोन ते तीन प्रकारच्या सुद्धा आहेत. तसेच सायकलची काळजी घेण्यासाठी लागणारे सर्व टुल्स माझ्याकडे आहेत. माझी सायकल मी स्वतःच सर्व्हिसींग करतो. फक्त मला फाईन ट्युनिंग करता येत नाही. सायकलला लागणारे साहीत्य मी डेकॅथलॉन वाघोली, सुराना सायकल्स आणि लाईफ साईकल्स टिळक रोड येथुन घेतो.

खरंतर सायकल चालवणे ही कालबाह्य होत चाललेली संकल्पना. दुचाकीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सायकल हळूहळू पडद्याआड गेली. हल्ली तर अलिशान महागड्या कार चालवण्यातच लोक धन्यता मानतात. पण सध्या अत्याधुनिक कार एवढ्या झाल्या आहेत की त्या बघुन बघुन लोकांना कंटाळा आला आहे. पुर्वी एखादी मर्सिडीज कार दिसली तरी सगळे लोक तिच्याकडे पाहत राहायचे. हल्ली त्या महागड्या गाड्या कचऱ्यासारख्या झाल्या आहेत, प्रत्येक गल्लीत एकतरी आढळतेच. या महागड्या गाड्यांचे आता कोणालाही कौतुक राहीलेले नाही. पण तो जुन्या काळातला मर्सिडीजवाला फिल सध्या महागड्या सायकलला आला आहे. महागडी इम्पोर्टेड सायकल दिसली की लोक तिच्याकडे आणि ती चालवणाऱ्याकडे पाहातच राहतात. काहींना सायकल चालवणारे परग्रहावरून आल्यासारखे वाटतात तर काहीजण सायकल चालवणाऱ्यावर अपरिहार्य जिज्ञासेतुन त्यांच्या मनात तयार झालेल्या प्रश्नांची सरबत्ती करतात. केवढ्याची सायकल?  इंम्पोर्टेड आहे का? कुठे मिळते? किती पळते? आणि किंमत ऐकल्यानंतर त्यांचे ते अचंबित होणे. तसेच सायकल आणि ती चालवणारा पाहीला की काही लोकांना त्यांच्यामधील काळाच्या पडद्याआड गेलेला सायकलपटु आठवतो. कधीतरी त्यांनी कुठेतरी सायकल चालवलेली असते त्याचे कौतुक सांगत बसतात आणि मला ते नाईलाजास्तव ऐकुन घ्यावे लागते. म्हणजे त्यांना सांगायचे असते की मी सुद्धा सायकल चालवलेली आहे.

लांब पल्ल्याची सायकलिंग करण्यासाठी १ ऑक्टोबर, २०१५ ला मी ट्रेक ७.२ हायब्रीड सायकल ₹३५००० ला विकत घेतली. तिच्यावर ४०० किमीचा टप्पाही पार झाला आहे. आता माझा डोळा ६०० वर आहे. २००,३००,४०० आणि ६०० च्या बीआरएम एकाच कॅलेंडर वर्षात करून मी सुपर रँदोनिअर होण्याचा प्रयत्न करणार आहे. 

तर हा आहे माझा दोन वर्षांचा सायकल प्रवास...  

आता फक्त सुपर रँदोनिअरचे लक्ष्य समोर आहे.

Thursday 24 December 2015

माझी पहीली ४०० किमी ब्रेवेट

माझी पहीली ४०० किमी ब्रेवेट

या कॅलेंडर वर्षात सुपर रँदोनिअर होण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे, मी कितपत यशस्वी होईल हे सांगता येणार नाही परंतु प्रामाणिक प्रयत्न करत राहणे माझ्या हातात नक्कीच आहे. नव्या मोसमाची सुरूवात तर छान झाली होती. २०० ची बीआरएम १० तासांच्या आत आरामात पुर्ण झाली. ३०० च्या बीआरएमवर शनिची वक्रदृष्टी पडुन दोन पंक्चर तसेच ट्युबचे दोन तुकडे होण्यापर्यंत मजल जाऊन मोठ्ठा DNF मिळाला. आणि मी आता ४०० च्या बीआरएम मध्ये भाग घ्यायचे ठरवले आहे. काय होणार आहे कोणास ठाऊक? पण मी लढायचे ठरवले आहे जे होईल ते होईल. पंक्चरमुळे ३०० किमीला आलेले अपयश पचवायला जड गेले. पण स्वतःचाच मुर्खपणा भोवला असल्यामुळे इतर कोणावर खापर फोडता आले नाही हे दुःख वेगळेच (हाहाहा). ३०० मध्ये झालेल्या चुका ४०० मध्ये होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी लागणार होती. पंक्चर या समस्येचा गांभीर्याने विचार करावा लागणार होता. 

३०० च्या बीआरएम मध्ये झालेल्या चुका सुधारण्याचा एक भाग म्हणून मी सर्वप्रथम सायकलचे टायर्स बदलण्याचा निर्णय घेतला आणि टायरच्या आतमध्ये अँटी पंक्चर टेपही बसवायचे ठरवले. पण माझ्या बजेटमध्ये बसणारे व्हिट्टोरीया टायर्स पुण्यात कुठेही मिळेनात. मग व्हिट्टोरियाच्या वेबसाईटवर जाऊन भारतातील त्यांच्या डिलर्सची यादी शोधुन काढली. तिथे मुंबईतील व्हिट्टोरीयाचा डिलर लाँगशाईनचा फोन नंबर मिळाला. मी लगेच तो नंबर डायल करून टायर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मला पुण्यात रिटेलर असल्याचे सांगुन त्याचे नाव आणि फोन नंबर दिला. पुण्यातील त्या रिटेलरने व्हिट्टोरीयाचे टायर ठेवणे बंद केलेले आहे हे मला त्या नंबरवर फोन केल्यावर कळले. आता बहुतेक व्हिट्टोरीयाचे टायर मिळणार नाहीत असेच मला वाटायला लागले. शेवटचा प्रयत्न म्हणून मी पुन्हा एकदा मुंबईच्या लाँगशाईनचा नंबर फिरवला आणि त्यांना पुण्यात टायर मिळत नसल्याची माहिती दिली. मग माझ्याशी फोनवर बोलणार्‍या व्यक्तीने मला सायक्लोक्राफ्टच्या रॉबिनचा नंबर दिला आणि सांगितले की तो कुरीअरचे ₹१०० जास्त घेऊन टायर पुण्याला पाठवून देऊ शकतो. दुसऱ्या दिवशी मी रॉबिनला फोन केला तर तो नेमका त्यावेळी दुकानात नव्हता, म्हणुन त्याने मला वैभव भटकरचा नंबर दिला. वैभवशी व्हाट्सअपवर बोलणे झाले. एका टायरची किंमत ₹८९० (७००x२८)+प्रत्येक टायरचे कुरिअरसाठी ₹१०० असे दोन टायरचे मिळुन ₹१९८० इंटरनेट बँकींगद्वारे सायक्लोक्राफ्टच्या खात्यावर मुंबईला हस्तांतरीत केले. सायंकाळी पाच वाजता त्याच्या खात्यावर मी पाठवलेले पैसे उमटले. वैभवने लगेच कुरीअरवाला बोलवुन नाव पत्त्यासहीत पार्सल त्याच्याकडे सुपुर्द केले. 

तिसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजता टायर माझ्या घरी पोहोचले. टायरचे कुरिअर येणार म्हणून मी सुट्टी घेतलेली होती. टायर मिळाल्यावर मी लगेच अँटी पंक्चर टेप घेण्यासाठी डिकॅथलॉन वाघोली गाठले. तिथे अँटी पंक्चर टेपवर ऑफर होती ₹१३९९ चा टेप ₹८९९ ला होता. जी वस्तु विकत घ्यायचे ठरवले होते तिच्यावर ऑफर मिळणे हे सुदैवच म्हणावे लागेल. तो टेप ₹१५०० असला असता तरीही मी विकत घेतलाच असता. माझ्या सायकलच्या चाकाला बसेल असा टेप मी विकत घेतला (७००x२८). घरी आल्यावर अँटी पंक्चर टेप मी स्वतःच टायरमध्ये बसवला, त्याच्या पॅकींगवर आकृतीसहीत सर्व मार्गदर्शन केलेले होते त्यामुळे फारसा त्रास झाला नाही. बीआरएम मध्ये सायकलचे चाक पंक्चर झाल्यानंतर पंक्चर काढण्यात वेळ आणि शक्ती खर्च करण्यापेक्षा ते कसे पंक्चर होणार नाही यासाठी खबरदारी घेतलेली केव्हाही चांगली. 

शुक्रवारी म्हणजे बीआरएमच्या आदल्या दिवशी सकाळपासूनच मी उंट व्हायला सुरूवात केली म्हणजे चीज, ड्रायफ्रूटस आणि इतर पौष्टीक पदार्थ थोड्या थोड्या वेळाने पोटात भरत होतो. जेणेकरून शनिवारी सकाळी सायकल चालवायला सुरूवात केल्यानंतर अशक्तपणा जाणवायला नको. बीआरएमच्या आदल्या दिवशीसुद्धा पौष्टीक आहार घेत राहणे केव्हाही चांगले. शुक्रवारी सायंकाळी ऑफिसवरून नियोजित वेळेत घरी पोचल्यानंतर फक्त आणि फक्त बीआरएमचीच तयारी चालु होती. काय काय करायचे तसेच सोबत न्यावयाच्या वस्तुंची यादीच सौ. ला तयार करून दिलेली असल्यामुळे तिचे काम सोपे झाले होते. तिने यादीप्रमाणे सर्व वस्तु व्यवस्थित पॅक करून ठेवल्या होत्या. मी भला मोठा बिटविनचा गेज असलेला पंप सायकलला बांधुन घेऊन जाणार होतो. हँडलबारला एक बॅग आणि सीटच्यामागे एक बॅग आणि तो पंप असे मिळुन माझ्या सायकलचे वजन दीडपट वाढले. काहीही झाले तरी पंप न्यायचाच असे ठरवलेलेच होते. आणि पंपाशिवाय गत्यंतर नव्हतेच. १२० पीएसआय कोणत्याही टायरवाल्याकडे मिळणे केवळ अशक्य आणि जर व्हिट्टोरीया टायरला १०० पेक्षा कमी पीएसआयवर चालवला तर टायरची वाट लागलीच म्हणून समजा. पंप आणि पंक्चर किट दोन्हीही सोबत घेतल्यामुळे पंक्चरची भितीच उरलेली नव्हती. पण या सर्व भानगडीत सायकलचे वजन भलतेच वाढले होते. 

प्रत्येक बीआरएमच्या अगोदर आम्ही एक छोटीशी मिटींग घेतो. साधीसुधी व्यूहरचना म्हणजे विद्यापीठापर्यंत कसे जायचे? नाष्ट्याला कुठे थांबायचं, जेवणासाठी कोणते हॉटेल चांगले आहे, बरोबर काय काय घ्यायचे? यासाठी धनंजय कोंढाळकर आणि वाघमारे सर घरी आले होते. बीआरएमच्या दिवशी सिंहगड रोडच्या फ्लायओव्हरखाली सकाळी ५ः१५ ला भेटायचे ठरवुन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. मी रात्री १० वाजता डोळे मिटुन झोपी गेलो. 

सुदैवाने बीआरएमच्या दिवशी मी पुर्णपणे ठणठणीत आणि तंदुरुस्त होतो. ४०० किमी सायकल चालवण्यासाठी लागणारा फिटनेस माझ्या अंगात आहे असा आत्मविश्वास माझ्यात आला होता. पुणे विद्यापीठाकडे जाण्यासाठी मी सिंहगड रोडवर सायकल घेऊन आलो तोच योगेशची गाडी मला वेगात मागे टाकत पुढे निघुन गेली. योगेशची गाडी म्हणजे बीआरएममध्ये आमच्या सोबत जी गाडी राहणार होती ती सिमॉरची गाडी. आणि योगेश शिंदेही आमच्या सोबत २७ तास राहणारच होता. पाच मिनिटांच्या आत धनंजय आणि वाघमारे सर आले आणि आम्ही विद्यापीठाकडे कुच केली. त्यादिवशी सकाळी सायकल चालवताना चांगलाच गारठा जाणवत होता. स्टार्टींग पॉइंटला पोचल्यावर सायकल इंस्पेक्शन करून ब्रेवेट कार्ड लगेच मिळाले पण रँदोनिअर्सची संख्या जास्त असल्यामुळे फ्लॅग ऑफला ६ः१५ झाले. 

विद्यापीठ, पाषाण, चांदणी चौक, वारजेनंतर मी नविन कात्रज बोगदा मागे टाकला, कात्रज बोगदा म्हणजे एक महत्वाचा टप्पा पार केल्यानंतर "जय भवानी, जय शिवाजी" जयघोष करत धनंजय माझ्या मागुन येतच होता. नसरापुर तसेच कापुरहोळ मागे टाकत आम्ही ८ः३० वाजता सातारा जिल्ह्याच्या हद्दीत शिरलो. निरा नदी ओलांडल्यानंतर लगेच डाव्या हाताला असलेल्या हॉटेल वेगासमध्ये आम्ही नाष्टा करायचे ठरवलेले होते. हॉटेल वेगासमध्ये नाष्टा करताना दोन नविन मित्रांची ओळख झाली प्रशांत जोग आणि सुरेश निकम. १०० रूपयांच्या अमर्यादित नाष्ट्यामध्ये मनसोक्त चहा, कॉफी, उत्तप्पा, पोहे, इडली, उडीदवडा, बटाटेवडा, सांबार व चटणी यावर आम्ही मनसोक्त ताव मारला. त्यानंतर आम्ही खंबाटकीच्या दिशेने निघालो. त्यावेळी सकाळचे नऊ वाजुन ५ मिनीटे झालेली होती. त्यानंतर शिरवळ कधी मागे गेले ते कळलेसुद्धा नाही. मध्यमगतीने खंबाटकी पार करून हळुहळु भुइंजपर्यंत मजल मारली. आता उन्हाचा जोर वाढायला लागला होता. तोलनाका ओलांडल्यानंतर मी विश्रांतीसाठी काही वेळ थांबलो. एक संत्रे आणि दोन चीज क्युब फस्त करेपर्यंत धनंजयसुद्धा तोलनाका ओलांडुन पुढे आलेला होता. मग मीसुद्धा त्याच्या मागोमाग निघालो. वाघमारे सरांनी मला मागे टाकुन ते धनंजयच्या मागे मागे जाऊ लागले. त्यानंतर एकच चढ ओलांडुन गेल्यानंतर योगेशने सिक्रेट चेक पॉइंट उभारलेला होता. ११ः५० वेळ झालेली होती. ब्रेवेट कार्डवर सही, शिक्का व वेळेची नोंद घेतली. चेक पॉइंटवरील केळी आणि इलेक्र्टॉल घेऊन मी निघेपर्यंत वाघमारे सर व धनंजय कोंढाळकर पुढे निघुन गेले होते. सातारा चौकातील स्वीट होममध्ये चीज क्युब शोधण्याचा खुप प्रयत्न केला पण तो व्यर्थ गेला. या शोधाशोधीत उगाच १० ते १५ मिनिटे वाया गेली. 

पोटात मस्तपैकी भर पडलेली असल्याने आता थेट साई इंटरनॅशनल गाठायचे मी ठरवले. अधुनमधुन सोबत आणलेले ड्रायफ्रुट्स चघळत होतो. सातारा ते उंम्ब्रज दरम्यानची फ्लायओव्हरची कटकट संपता संपेना. सायकलच्या वेगाच्या विरूद्ध दिशेने येणारा वारा ती कटकट अजुन वाढवत होता.  वाऱ्यामुळे सायकल वेग पकडत नव्हती. ३०० च्या बीआरएमचा यु टर्न मागे टाकत वराडे तोलनाका पार केला. कराडचा फ्लायओव्हर चढत असताना एक भंगार गोळा करणारा सायकलवाला मला ओव्हरटेक करून जोरात पुढे गेला आणि साधी एटलस सायकल असूनदेखील तुझ्या इम्पोर्टेड सायकलला कशी ओव्हरटेक केली अशा दिमाखात माझ्याकडे पाहत होता. नंतर त्याला माझ्याशी बोलण्याची हुक्की आली, थोडासा वेग हळु करून हसत हसत मला विचारतो, "कितने हजार का है?" मी म्हणालो, "सात हजार का है" 

आश्चर्यकारक स्वरात "इतना सस्ता कैसे?"

"मैंने इसको भंगारसे उठाकर कलर करवाया है"

मग हसुन म्हणतो "तभी तो भाग नहीं रहा है, लेकीन कलर अच्छा करवाया आपने" 

आता याला काय सांगु १५० किमी सायकल चालवून माझी काय वाट लागलीये ते. सायकल पळवण्याएवढा जोर माझ्या मांड्यांमध्ये शिल्लक नव्हता. पण बीआरएमला आवश्यक असणारी गती कायम राखणे मला शक्य होते. रस्त्यात ज्यांनी ज्यांनी सायकलविषयी विचारले त्यांना मी जुनी सायकल घेऊन रंग लावुन घेतलाय असेच सांगितले. मला आता फक्त साई हॉटेलचे वेध लागले होते. ऊन्हाचा जोर ओसरला होता. इच्छा असुनही वाऱ्यामुळे वेग वाढवता येत नव्हता. माझी सायकल उतारावरसुद्धा वेग घेत नव्हती. का कोणास ठाऊक? दोनदा सायकल थांबवुन हवा चेक केली, कदाचित हवा कमी झाली असेल म्हणुन. पण तसेही काही नव्हते. कदाचित सायकलच्या वजनामुळे वेगावर परीणाम झाला असावा. दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हाचा जोर असल्यामुळे सायकल चालवणे खुप जिकरीचे काम आहे. या वेळेतला एखादा तास हॉटेलमध्ये जेवणासाठी घालवल्यास उत्तम. म्हणजे उन्हात सायकल चालवण्याचा तापही वाचतो आणि पोटात भरही पडते. 

मजल दरमजल करत एकदाचे साई हॉटेल आले. ५ः२० ला साधारण मी तिथे पोहोचलो. साई हॉटेलने माझा एकदम पचका वडा केला. चिकन तंदुर सोडा तिथे साध्या पंजाबी डिशसुद्धा मिळत नव्हत्या. होता होईस्तोवर मी पनीर पकोडे कसेबसे घशाखाली उतरवले त्यासाठी पण मला थम्सअपची गरज लागली. आणि यासाठी मी १ तास वाया घालवला. साई हॉटेलपासुन निघतानाच अंधार पडत चाललेला होता. सायकलच्या दोन्ही टॉर्च मी चालु केल्या आणि परतीच्या प्रवासाला सुरूवात केली. 

आता मला सॉलीड भुक लागलेली होती. कराडच्या अलिकडे फ्लायओव्हर सुरू होण्याअगोदर उजव्या हाताला एक हॉटेल दिसले. पार्किंगसाठी व्यवस्थित जागा आणि गाड्यांवर लक्ष ठेवायला वॉचमनसुद्धा होता. क्षणाचाही विलंब न करता मी सायकल घेऊन रस्त्याच्या पलीकडे गेलो. सायकल पार्किंगमध्ये लावुन सायकलला लावलेल्या बॅग माझ्याबरोबर घेतल्या आणि वॉचमनला सायकलवर व्यवस्थित लक्ष ठेवायला सांगुन हॉटेलमध्ये प्रविष्ट झालो. दाल फ्राय आणि जिरा राईसवर ताव मारला आणि तंदुरी चिकन पार्सल घेऊन तिथुन निघालो. रात्री सायकल चालवताना भुक लागली तर ही तंदुरी कामाला येणार होती. कराडमध्ये आल्यावर चिकन लॉलीपॉपसुद्धा पार्सल घेतले. शिल्लक राहीले तरी चालेल पण उपासमार होता कामा नये या उद्देशाने मी भरपुर रसद बरोबर घेतली. कारण मध्यरात्रीनंतर काही खायला मिळेल याची काही शाश्वती नव्हती. रात्री सगळे हॉटेल्स बंद होतात. 

इथुन मला सातारा चेकपॉइंट गाठायचा होता.आता हळूहळू हवेतील गारठा वाढत चालला होता. मी कान आणि हेल्मेटखालचा भाग मस्त झाकुन घेतलेला होता. पाण्याच्या बाटल्यांतील पाणी थंड हवेमुळे फ्रीजमध्ये ठेवल्यासारखे झाले होते. ते पिल्यावर मला सर्दी खोकला होणार हे माहीत असुनही ते पिण्यावाचुन मला गत्यंतर नव्हते. रात्री १२ वाजुन ५० मिनीटांनी मी हॉटेल राजवर पोहोचलो. साताऱ्यात हॉटेल राजच्या चेकपॉइंटवर सगळ्यात शेवटी येणारा रँदोनिअर मी होतो. जेमतेम वेळेत पोचल्यामुळे मी विश्रांती घेण्याचा विचार डोक्यातुन काढुन टाकला. इकडे विश्रांती घेत बसलो असतो तर चांदणी चौकात सकाळी वेळेत पोचायचे वांदे झाले असते. चेकपॉइंटवरील केळी, पाणी आणि इलेक्ट्रॉल घेऊन मी सातारा सोडला. सातारा चौकातुन मी थेट कॉलेज जवळचा चढ पार केल्यानंतर कडेला सायकल लावली आणि लॉलीपॉपची बॅग उघडुन पोटात भर टाकत बसलो. तिथुन निघताना दोन्ही टॉर्चचे सेल बदलले. कान व नाक पुर्णपणे झाकुन घेतले आणि पुढच्या प्रवासाला निघालो. भुइंजपर्यंत सहज पोचल्यासारखे वाटले. भुइंज ते खंबाटकी बोगदा येईपर्यंत जीव नकोसा झाला होता. छोटे छोटे चढसुद्धा जीवघेणे वाटत होते. वाई फाट्यावर चहा बिस्कीट खाल्ले. वाई फाटा आणि खंबाटकीच्या अलीकडील काही टपऱ्यासदृष हॉटेल्स रात्रभर चालु असतात. चहा, बिस्कीटे, पाव, अंडाबुर्जी वगैरे या हॉटेल्समध्ये मिळु शकते. ७० किमी अंतर आणि ५ तास वेळ शिल्लक होता आता माझे काउंटडाऊन सुरू झाले होते. 

खंबाटकी बोगद्याच्या उतारावर सायकल सोडल्यानंतर जीव भांड्यात पडला. त्या उतारावर तीन चार ठिकाणी रम्बलर बनवलेले आहेत. एका रम्बलरमधुन जाताना सायकलचे चाक एका मोठ्या खड्ड्यात आदळल्यासारखे वाटले, पांढर्‍या रंगामधील तो खड्डा बॅटरीच्या उजेडात डोळ्यांना दिसला नाही. पण सुदैवाने सायकलच्या चाकाला काहीही हाणी झाली नाही. शिरवळ जवळ येता येता तांबडे फुटायला सुरूवात झाली होती. निरा नदी ओलांडल्यावर कापुरहोळ कडे तशीच वाटचाल सुरू ठेवली. आता सगळीकडे लख्ख सूर्यप्रकाश पसरलेला होता. नसरापुर जवळ यायला लागल्यावर माझा उत्साह वाढु लागला. तोलनाका, शिवापुर आणि शिंदेवाडी पार करून मी कात्रज बोगद्यात शिरलो. नविन कात्रज घाटाच्या उतारावरून सायकलने प्रचंड वेग घेतला. त्या वेगात सायकलला झोकुन देत मी वारजे चौकात पोहोचलो. चांदणी चौकाकडे जाताना मी सपासप पॅडल मारत गेलो. आता मला थकवा जाणवत नव्हता, जाणवत होता तो आनंद. अपरिमित आनंद. अपार कष्ट घेऊन ४०० किमी सायकलिंग २६ तासात पुर्ण केल्याचे समाधान. मंझील को पानेवाले तकलीफोंके बारेमें सोचा नहीं करते. चांदणी चौकाच्या सीसीडीमध्ये प्रवेश करताना माझा आनंद गगनात मावत नव्हता. सीसीडीमध्ये एक सोडुन दोन फोटो काढले आणि बीआरएमच्या व्हाट्सअप ग्रूपवर टाकले. ८ः२० ला ccd चांदणी चौकात पोचल्यावर धनंजय कोंढाळकर मला कारमध्ये घ्यायला आला. धनंजय माझ्याअगोदर १ तासापुर्वीच बीआरएम पुर्ण करून घरी गेलेला होता. तरीसुद्धा पुन्हा मला घ्यायला चांदणी चौकात आला. मी कारमध्ये बसलो आणि योगेश कानडेने माझी सायकल चांदणी चौकापासून घरापर्यंत चालवत आणली.

आणि अशा रितीने पहील्याच प्रयत्नात माझी ४०० ची ब्रेवेट संपन्न झाली. 

जय हिंद! 

(बीआरएम तयारीचे आणि दरम्यानचे फोटो इथे दिलेले आहेत) 

स्ट्रावावर रेकॉर्ड केलेली अॅक्टीवीटी

Check out my 405.9 km Ride on Strava: https://www.strava.com/activities/453060408

On 19th Dec, 2015 Pune Randonneurs organised 400 brevet

http://www.audaxindia.org/event-e-526

#brm #randonneurs #pune #AIR #ACP



Wednesday 23 December 2015

एक टायर फुटका...

शनिवारी ५ डिसेंबरला ३००ची बीआरएम होती आणि मंगळवारी सकाळी झोपेतून उठतानाच मी तापाने फणफणलो होतो. अंगात कोणतेही त्राण जाणवेना. साध्या साध्या हालचाली करायलासुद्धा प्रचंड कष्ट घ्यावे लागत होते. तापामुळे अशक्तपणा आलेला होता. अशा अवस्थेमुळे मी बीआरएमचा विचार डोक्यातुन काढुन टाकला. ताबडतोब पुर्ण बरा होणे अशक्य होते आणि बरा झालो तरी लगेच ३०० कि.मी. सायकल चालवणे शक्य होईल की नाही याबाबत मलाच खात्री नव्हती. सौ. ने माझे मनोबल उंचावण्यासाठी चांगलाच हातभार लावला. रोज तापावरची औषधे चालुच होती. बीआरएम च्या आदल्या रात्री तापाची गोळी खाऊन झोपलो आणि असे ठरवले की उद्या पहाटे उठल्यावर थोडा जरी अंगात ताप असला किंवा थोडी जरी कसकस जाणवली तर बीआरएमला जायचे नाही. मला रात्रभर म्हणावा असा डोळ्याला डोळा लागला नाही. दर तासाला मला जाग यायची आणि मी मोबाईलमध्ये वेळ पहायचो. कधी एकदाचे ४ वाजतील असे झाले होते. मोबाईलचा अलार्म वाजण्या अगोदरच धनंजयचा फोन आला आणि मी जागा झालो. अंगात ताप बिलकुल नव्हता, अंगसुद्धा दुखत नव्हते पण तोंडात कडवटपणा जाणवत होता. मी सौ. बरोबर थोडी चर्चा केली. सायकल चालवण्यास मला काहीही त्रास होणार नाही याची तिला खात्री दिल्यावरच तिने परवानगी दिली. आणि मग मी सज्ज झालो. या गडबडीत थोडा उशिर झाल्यामुळे मी निर्धारित वेळेत घरातुन बाहेर पडु शकलो नाही.

पुणे विद्यापीठापर्यंतचे अंतर ११ कि. मी. आहे. हायवेच्या फ्लायओव्हर खाली माझी वाट पाहत थांबलेल्या धनंजय आणि वाघमारे सरांना मी पुढे जायला सांगितले. मी विद्यापीठला पोहोचलो तेव्हा सिमॉरचा योगेश नुकताच आलेला होता. सायकलचे इंस्पेक्शन करून मी माझे ब्रेवेट कार्ड घेतले. बीआरएम मध्ये सर्वात महत्वाचे काय असेल तर ब्रेवेट कार्ड. प्रत्येक चेक पॉईंटला या कार्डवरच पोहोचलेल्या वेळेसहीत शिक्का आणि सही घ्यायची असते. हेच कार्ड नंतर फ्रान्समध्ये ऑडॅक्स क्लबकडे पाठवले जाते. आता मी सज्ज होऊन फ्लॅग ऑफची वाट पाहु लागलो. शरीर जरी साथ देत नसले तर मनाने मी खंबीर होतो. थोडा जडपणा जाणवत होता. ३०० च्या ब्रेवेटला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे फ्लॅग ऑफला १५ मिनीटे उशिर झाला. रँदोनिअर्सची संख्या ४० च्या वर होती. फ्लॅग ऑफ झाल्या झाल्या सगळे रोडबाईकवाले रँदोनिअर्स झपाझप अंतर कापु लागले. मी वेगाचा विचार डोक्यातून काढुन टाकला होता. आवश्यक सरासरी वेग ठेऊन मी सायकल चालवत होतो. २० तास सायकल चालवण्यासाठी शरीरात उर्जा शिल्लक ठेवणे आवश्यक होते. कात्रज बोगदा पार केला तेव्हा माझा सरासरी वेग १८ कि मी होता. कात्रज बोगदा ते निरा नदीपर्यंत मी झपझप अंतर कापले. शिरवळ मागे टाकत खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी पोहोचलो. थोडी विश्रांती घेऊन मी लगेच सायकलवर टांग मारली. आजारातुन बाहेर आलेले शरीर हवा तसा प्रतिसाद देत नव्हते. खंबाटकी घाट पार करताना ३ वेळा विश्रांती घ्यावी लागली. त्यामुळे अतोनात होणारी दमछाक वाचली. पण इथुन माझे डोके गरगर करायला लागले होते. खंबाटकी घाट पार केल्यावर जीवात जीव आला. तोपर्यंत धनंजय कोंढाळकर आणि वाघमारे सर पाठीमागुन आले. मग आम्ही एकत्र सायकल चालवली.
माझे शरीर मला साथ देत नव्हते. मला विश्रांतीची खुप आवश्यकता होती. म्हणून मी एका टपरीसदृष हॉटेलवर नाष्ट्यासाठी थांबलो. वडापाव आणि चहा घेतला. वडापावची चवच कळाली नाही. तापामुळे जीभेवर कडवटपणा आलेला होता. मग वडा बाजुला सारून मी चहा मागवला आणि चहाबरोबर दोन पाव खाल्ले. पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन सायकलवरील बाटल्यांमध्ये भरले आणि पुढच्या प्रवासाला निघालो. हळूहळू सातारा जवळ येत होता. ड्राय फ्रूट खायला गेलो की मळमळ होत असल्यामुळे उलटी झाल्यासारखे व्हायला लागले. म्हणून थोडी आवळा सुपारी चावली. एका ठिकाणी १५ मिनीटे सावलीखाली विश्रांती घेतली. मग थोडे ताजेतवाने वाटायला लागले. सायकल चालवायला सोपी असल्यामुळे आजारपणातुन बाहेर आल्या आल्या मी एवढे अंतर सायकल चालवु शकत होतो. शरीर साथ देत नसताना साईकलिंग करणे खुपच अवघड हे मला जाणवायला लागले. एमटीबी सायकल असती तर माझी वाटच लागली असती एवढे नक्की.

सातारा चौक मागे टाकत मी खिंडवाडी पर्यंत पोहोचलो. खिंडीच्या उतारावर मनसोक्त सायकल पळवली. उतार संपल्या संपल्या डाव्या साईडला हिलसाईड रिसोर्ट नावाचे हॉटेल दिसले. पोटात कावळे कोकलतच होते. जेवण करूच या उद्देशाने हॉटेलात शिरलो. जिरा राईस, दाल फ्राय आणि हाफ चिकन तंदुरी मागवली. पण एकही घास घशाखाली उतरेना. मग स्पाईटची बॉटल घेऊन प्रत्येक घासाबरोबर एकेक घोट स्प्राईटचा घेतल्यावर कसेबसे अन्न पोटात गेले. जेवण उरकुन उम्ब्रजकडे निघालो. सातारा ते उम्ब्रज या पट्ट्यामध्ये असंख्य गावे आहेत आणि प्रत्येक गावात फ्लायओव्हर केलेला आहे. ठिकठिकाणी केलेले फ्लायओव्हर सायकल चालवणाऱ्यांचे रक्त शोषतात. फ्लायओव्हर चढला की लगेच उतार, उतार संपला की लगेच चढ. चढ उतार, उतार चढ असे करत करत एकदाचे उम्ब्रज आले. उम्ब्रज पासुन ५ किमी अंतरावर वराडे गावापर्यंत जायचे होते. तोलनाक्याजवळच ३०० किमीचा चेकपॉइंट होता. मी निर्धारित वेळेत पोहोचलो होतो. चेकपॉइंटवर केळी, इलेक्ट्रॉल आणि पाण्याचा आस्वाद घेतला. फर्स्ट एडमधील पॅरासिटामोलची एक गोळी खाल्ली. योगेशबरोबर गप्पा मारत मारत थोडी विश्रांती घेतली. आणि मी यु टर्न घेतला.

परतीच्या प्रवासात माझ्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे मला जाणवु लागले. उन्हाचा जोर कमी झाल्यामुळे सायकल चालवणे सुसह्य वाटु लागले. उम्ब्रज मागे टाकत साताऱ्याच्या दिशेने पॅडल मारत मी सुसाट निघालो होतो. हँडलबारच्या बॅगेत ठेवलेले ड्राय फ्रूट अधूनमधून मी चघळत होतो. शरीरात कुठेही जडपणा जाणवत नव्हता. सायकल चालवायचा माझा उत्साह वाढु लागला. सुर्य मावळतीला असताना मी अतिशय संथगतीने सातारा खिंड चढत होतो. सातारा चौक मागे टाकल्यावर काही अंतरापर्यंत चढच आहे. तो चढ एकदाचा मागे टाकल्यावर भुइंजपर्यंत पोचायला फारसे कष्ट पडणार नव्हते. स्ट्राव्हामध्ये २१५ किमी झालेले होते. एका ठिकाणी फ्लायओव्हरचे काम सुरू असल्यामुळे सर्व्हिस रोडवर सायकल घालावी लागली. अंधारात एक स्पीड ब्रेकर मला व्यवस्थित दिसला नाही. मला ब्रेक दाबायला उशिर झाला होतो. त्या ओबडधोबड स्पीड ब्रेकरवर सायकलचे चाक वेगात आदळले होते. संशयाची पाल माझ्या मनात चुकचुकली. मुख्य रस्त्यावर वळालो आणि पुढचे चाक दबल्या दबल्यासारखे वाटु लागले. चाकात हवा नसल्याची जाणीव झाली म्हणून थांबुन पुढचे चाक हाताने दाबुन पाहीले तर ते पुर्ण चपटे झालेले होते. साताऱ्यापासुन १६ किमी अंतरावर सायकलचे पुढचे चाक पंक्चर झालेले होते. क्षणाचाही विलंब न करता मी सायकलला शिर्षासनात उभी केली. पुढचे चाक मोकळे करून पंक्चर झालेली ट्युब बाहेर काढली आणि माझ्याजवळची नविन कोरी ट्युब चाकात बसवली. छोट्याशा हातपंपाने जेवढी हवा भरता येणे शक्य होते तेवढी हवा भरून मी निघालो. चाकामध्ये आवश्यक तेवढी हवा (पीएसआय) भरली गेलेली नव्हती हे मला सायकल चालवताना जाणवत होते. भुइंजच्या जवळपास एका गावातुन जाताना एका कॉर्नरवर मला पंक्चरचे दुकान दिसले. टायरचे दुकान दिसल्यावर चाकात आवश्यक तेवढी हवा भरून घ्यावी आणि पंक्चर झालेल्या ट्युबचा पंक्चर काढुन घेण्याचा विचार मनात आला.

अज्ञान किती विघातक असु शकते याचा जिवंतपणी मी अनुभव घेतला. ७००x२८ ची सायकलची ट्युब त्या ट्रकचे पंक्चर काढणाऱ्या इसमाला खेळण्यातली ट्युब वाटली. पंक्चर बघण्यासाठी त्या ट्युबमध्ये हवा भरायला सुरूवात केली. मी जिथे हात लावलेला होता तिथुनच हवा बाहेर यायला लागली, पंक्चर सापडली त्या येड्याला मी हवा भरण्याचे बंद करण्यासाठी थांब थांब म्हणायला लागलो पण तो काही हवा भरायचे थांबला नाही. माझ्या डोळ्यांसमोर फुग्यासारखी फुगलेली ट्युब फटाक असा जोरात आवाज करून फुटली. माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी जाम भडकलो होतो. पण माझ्या क्रोधाग्निवर मी आतल्या आतच आगीचा बंब फिरवला. वाद घालुन किंवा भांडण करून काहीही साध्य होणार नव्हते. काही क्षण शांत राहील्यावर मी त्याला कमी हवा असलेल्या पुढच्या चाकात हवा भरायला सांगितली. प्रेस्टा व्हाल्व्हमुळे हवेचे प्रेशर चेक करता आले नाही. त्याने तिथेही घोळ करून ठेवला. त्याने आवश्यकतेपेक्षा जास्त हवा त्या चाकात भरली असावी असा दाट संशय मला आला पण क्रोध आणि चिंता या दोन्हीमुळे हाताने हवा सोडुन देण्याची सुबुद्धी मला सुचली नाही. माझ्यासाठी तो टायरवाला शनिदेव बनुन आला होता. त्या चाकातही त्याने जास्त हवा भरली. 

आता माझ्याजवळ एकही ट्युब शिल्लक नव्हती आणि मी सोबत पंक्चर किटही आणलेले नव्हते. इथुन पुढे एक जरी पंक्चर झाली तर माझी बीआरएम तिथेच रसाताळाला जाणार होती आणि झालेही तसेच. ५ ते ६ किमी अंतर कापुन गेल्यावर पुन्हा पुढचे चाक चपटे झाले. जिथे पंक्चर झाली तिथे काळोख होता. आजुबाजुला पंक्चरचे दुकान असण्याची तिळमात्रही शक्यता नव्हती. तोपर्यंत सगळे रँदोनिअर्स पुढे निघुन गेलेले होते. मी भुइंज ते खंबाटकी बोगद्याच्या मध्ये कुठेतरी होतो. कोणताही पर्याय समोर दिसत नसल्यामुळे चाक पंक्चर असलेल्या स्थितीतही मी सायकल चालवायला सुरूवात केली. पंक्चर चाकासहीत मी १० ते १२ किमी अंतर पार करून कसाबसा वाई फाट्यावर आलो. तिथे मला जाणवले की अशा स्थितीत अजुन ७० किमी अंतर पार करणे खुप अवघड आहे. विशेषतः पंक्चर चाकामुळे उतारावर मिळणाऱ्या वेगाचा फायदा घेता येणार नव्हता आणि सायकलच्या रिमची वाटही लागली असती म्हणुन मी बीआरएम सोडण्याचा कठोर निर्णय घेतला. मोबाईल काढला आणि व्हाटसअपवर जाऊन ३०० बीआरएम च्या ग्रूपमध्ये बीआरएम सोडत असल्याचा मेसेज पोस्ट केला.

माझ्या पाठीमागुन आलेल्या संजय जोशींनी त्यांच्या जवळ असलेली पावडरवेष्टीत ट्युब मला देऊ केली पण नेमकी ती माझ्या चाकाच्या साईजची नव्हती. आज शनिदेव हात धुऊनच माझ्या मागे लागलेले होते. आज सर्वकाही माझ्यासाठी नकारात्मक घडत होते. पुन्हा मन घट्ट करून योगेशच्या गाडीची वाट पाहत थांबलो. तोपर्यंत दोन चहा घशाखाली उतरवले होते. योगेशला माझा ठिकाणा सापडला नाही त्याला पुढे जाऊन पुन्हा पाठीमागे यावे लागले. योगेशने सायकल गाडीमध्ये बांधली आणि मी गाडीमध्ये मागच्या सिटवर बसुन मोबाईलवर बोटे फिरवु लागलो. जिवलग मित्रांना याची माहीती मिळताच सगळ्यांनी हळहळ करायला सुरूवात केली. शिरवळच्या आसपास अरूण ठिपसेंच्या सायकलची गियर केबल तुटल्यामुळे त्यांनीसुद्धा बीआरएम सोडुन दिली आणि माझ्याबरोबर गाडीत येऊन बसले. त्यांच्याबरोबर बऱ्याच गप्पा झाल्या.

सपोर्ट व्हेईकलमधुन घरी यायला उशीर होईल म्हणून जिवलग मित्र राहुल कोंढाळकर त्याची पजेरो घेऊन तोलानाक्यावर मला घ्यायला आला. पजेरोमध्ये सायकल टाकुन आम्ही रात्री १ वाजता घरी पोहोचलो. बीआरएम अर्धवट सोडावी लागल्याचे दु:ख पचवायला जड गेले. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. एक शल्य आयुष्यभर बोचत राहणार यात काहीच शंका नव्हती. 
पहाटे पहाटे झोपी गेलो ते ४०० ची बीआरएम पुर्ण करण्याच्या निर्धारानेच.
जय हिंद

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...