Wednesday 29 March 2017

२०० चा नवा रुट

२०० चा नवा रुट


    मथळा वाचुन २०० रुपयाला एखादा रुट विकत घेतला की काय असे वाटले ना? छे..छे.. तसं काही नाहीये. २०० च्या बीआरएमसाठी म्हणजे आपल्या भाषेत सायकलिंगसाठी हा नविन मार्ग निर्धारीत करण्यात आला होता. २०० किमीच्या ब्रेवेसाठी. आता ब्रेवेट न म्हणता फक्त ब्रेवे म्हणायचे. फ्रेंच लोकांना ’ट’ म्हणता येत नाही म्हणुन आपणही ’ट’ म्हणायचे नाही. आपण रेस्टॉरंट म्हणतो पण त्यालाच फ्रेंच व्यक्ती रेस्तरॉं म्हणतो. नविन कहीतरी शिकायला मिळतंय. नवनविन काय मिळेल ते शिकत रहावे. तर हा नविन रूट १९ मार्चला पुणे रॅंदोनियर्समध्ये समाविष्ट करण्यात आला. चांदणी चौकातुन सुरुवात, मग पौड फाटा, कर्वे रोड, म्हात्रे पुल पार करुन टिळक रोडने स्वारगेट, पुलगेट, हडपसर, यवत, केडगांव चौफुला, उजवीकडे वळून निरा, मग लोणंद, पुन्हा उजवीकडे वळून खंडाळा (खंबाटकी घाटाजवळ), पुन्हा उजवीकडे वळून एनेच४ वरुन सरळ चांदणी चौकात पोचले की झाली आपली ब्रेवे. पुण्याच्या पुर्वेला जाऊन एक गोल फेरी मारुन आल्यासारखे वाटते. पुणे रॅंदोनिअर्सचा हा रींग रुटच म्हणता येईल. फक्त बाहेरगावावरुन येणा-यांसाठी मात्र हा रुट डोकेदुखी ठरू शकतो. पुणे दर्शन करत करत हडपसर पर्यंत पोचणे म्हणजे एके दिव्यच. जीपीएक्सच्या मदतीने सायकल चालवल्यास उत्तम.

    १३ मार्चपासुनच मी प्लॅंकचा तसेच पायांचा व्यायाम करायला पुन्हा सुरुवात केली. मार्चच्या पहील्या आठवड्यात एकदा सिंहगड चढायला जाऊन आलो. सायकलिंगसाठी सिंहगड चढाई फार उपयुक्त आहे. तयारीमध्ये कुठेही कमी पडता कामा नये. यावर्षाच्या परफॉर्मन्सवरुन सौ. म्हणाली २०० किमी तुम्ही तर चालता बोलता करुन याल. माझा उत्साह वाढवण्यासाठी तिने असे म्हटले असेल कदाचित नाहीतर तिला बोलायला काय जातंय. व्यायामाव्यतिरीक्त मग मी सायकलच्या समस्यांवर विचार करु लागलो. सहाशेची ब्रेवे करताना मागच्या चाकाचा स्पोक तुटला होता. ड्युटीच्या चक्रात अडकल्यामुळे तो बदलायला वेळ मिळत नव्हता आणि स्पोक बदलण्यासाठी सुट्टी काढणे मनाला पटत नव्हते. धनंजय कोंढाळकरने माझी ही समस्या सोडवण्यास खुपच मदत केली. त्याने मेकॅनिक बोलवुन तुटलेला स्पोक बसवुन घेतला. त्यानंतर पंक्चर ही मलाच काय तर सर्व रॅंदोनिअर्सना भेडसावणारी महाभयानक समस्या. या पंक्चरवर एखादी लस निघाली तर किती बरे होईल ना म्हणजे सकाळी निघताना दोन चमचे टायरवर शिंपडले की दिवसभर पंक्चरची भिती नाही असं काहीतरी. पोलिओमुक्त भारत झालाय तसा आपला भारत पंक्चरमुक्त व्हावा असे वाटत नाही का कोणाला? खुप आशिर्वाद लाभतील हो आणि पैसासुद्धा मिळेल ते सांगायला नकोच. यावर नक्की विचार करा कोणीतरी. पंक्चरचा सामना करण्यासाठी मी ७००x२३ च्या चार ट्युब्ज बरोबर घ्यायचे ठरवले. यातील एकही नविन नाही सर्व जखमी झालेल्या आहेत. सहाशेच्या ब्रेवेमध्ये सायकलला लावलेला मिनी पंप कुठे हरवला कोणास ठाऊक? त्यामुळे मी यावेळेस थोरले महाराज बरोबर घ्यायचे ठरवले म्हणजे मोठा पंप. मोठ्या पंपासाठी सॅकही मोठी घ्यावी लागली. एकंदरीत मोठा लवाजमा झाला. या लवाजम्यामुळे वा-यामध्ये सायकल चालवताना काय हाल झाले ते विचारुच नका. एवढे हाल झाले की ब्रेवे संपल्यावर मी लगेच मिनी पंप विकत घेतला.

    चांदणी चौकात पोचायला मला जरा ऊशिरच झाला. मी पोचायच्या अगोदरच फ्लॅग ऑफ झाला होता. सर्वजण निघुन गेल्यानंतर मी ५ ते १० मिनिटांनी निघालो. योगेश शिंदे, संजय जोशी आणि जयंत वोलिंटियरचे काम पाहत होते. (अजुन एकजण सहकुटुंब होते त्यांचे नाव मी विसरलो, क्षमस्व). पौडफाट्यावर पोचलो तरीही अंधारच होता. रस्त्यावर महानगरपालिकेचे दिवे उजेड दाखवत होते. सेवन लव्ज चौकाच्या पुलावर एक रॅंदोनियर एमटीबीवर चालला होता. त्याला पाहुन मला माझ्या एमटीबीवर केलेल्या ब्रेवे आठवल्या. वो भी क्या दिन थे...! गुडमॉर्निंग करुन मी तसाच पुढे निघालो. आकाशवाणीजवळ डॉ. चंद्रकांत हरपळे माझी वाट पाहत थांबले होते. त्यांना पाहुन मी सायकल बाजुला घेऊन थांबणरच होतो तेवढ्यात ते म्हणाले, "तुम्ही कशाला थांबताय?" मग मी सायकलवर आणि ते दुचाकीवर चालता चालताच आम्ही गपा मारल्या, आता ईथुन पुढे उतरता रस्ता आहे असे त्यांनी आवर्जुन मला सांगितले.  त्यांना हायफाईव दिले आणि त्यांच्या शुभेच्छा घेऊन मी सोलापुर हायवेवरुन सुसाट निघालो. हो सुसाटच... हायवेला आल्यावरच मी ख-या अर्थाने वेग घ्यायला सुरुवात केली. कॉलेजमधले बरेच मित्र सोलापुर रोडला आहेत. कवडीपाट, लोणी, थेऊरफाटा आणि कुंजीरवाडी वगैरे. कॉलेजला सुट्टी असली की आम्ही सगळे ईकडेच पडीक असायचो. तिथुन जाताना ते सगळे मित्र आणि त्या सर्व जुन्या आठवणी डोळ्यांसमोर तरंगत होत्या. माझ्या वेगामुळे ऊरळीकांचन केव्हा आले ते कळलेच नाही. तरीही हा वेग पुर्ण ताकद लावुन आलेला नव्हता. ब्रेवेमध्ये मी नेहमी हातचा राखुन सायकल चालवतो म्हणजे शेवटपर्यंत सायकल चालवण्यासाठी अंगात त्राण शिल्लक राहणे खुप महत्वाचे असते. १०० किमी पर्यंत जीव ताणुन सायकल चालवली की त्यापुढच्या १०० किमीला जीव बाहेर यायला लागतो. मग ती अवस्था फार वाईट होते म्हणुन प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार थोडे त्राण शिल्लक ठेवुनच सायकल चालवावी शक्यतो जे पहिल्यांदाच ब्रेवे करत असतील त्यांनी हे कटाक्षाने पाळावे. माझ्या वेळेच्या आणि वेगाच्या अभ्यासानुसार सव्वाआठ वाजता मी पहील्या चेकपॉइंटला पोचायला काहीच हरकत नव्हती. पण मी स्टार्टपॉइंटलाच उशिरा पोचल्यामुळे जेवढा वेळ वाया घालवला तेवढा वेळ उशिरा पोचलो. आठ वाजुन २३ मिनिटे झालेली होती तेव्हा मी केडगाव चौफुला गाठलेला होता. जयंत नितसुरे (Jayant Nitsure) सहकुटुंब सही शिक्का द्यायला आलेले होते. आमच्या प्रचंड वेगामुळे त्यांना नाष्टा करायलाही कुठे थांबता आले नाही असे ते म्हणाले, सर्वकाही बाजुला ठेवुन म्हणजे नाष्टा वगैरे त्यांनी पहीली चेक्पॉइंट्वर हजेरी लावली आणि वेगवान रॅंदोनियर्सला शिक्का आणि सही देण्यास प्राधान्य दिले. सिद्धार्थ, नितिन आणि ओझगुर (तुर्कस्तान) हे तिघे नुकतेच आमच्या पुढे गेलेले होते.

     ब्रेवे कार्ड व्यवस्थित सायकलच्या बॅगेत ठेवले आणि मी जयंतचा निरोप घेतला. आता लक्ष्य होते निरा. निरा विक्री केंद्रांमध्ये येणारी निरा ही निरा गावामधुनच येतेय की काय ते पाहण्याची मला फार उत्सुकता होती. निराकडे जाणारा रस्ता सायकल चालवण्यासाठी खुप छान होता पण वारा काही वेग घेऊ देत नव्हता. "असा बेभान हा वारा.. ऊन्हाचा पुर आलेला... कशी मी सायकल चालवु..कशी मी सायकल चालवु..??" ऊन मात्र चांगलेच वाढायला लागले होते. ऊन आणि वा-याच्या अनोख्या युतीतुन त्यांची चांगलीच प्रिती जुळली आणि त्याचा आल्हाददायक अनुभव सायकल चालवणा-यांना येत होता. अंगातुन घाम फार कमी म्हणजे निघत नव्हता असे म्हटले तरी काही हरकत नसावी. पण सायकलला वेगही घेता येत नव्हता. सुपा चढ सुरु झाल्यावर वेग घेण्यासाठी मी मांडीचा जोर पॅडलवर दिला आणि तेवढ्यात तो स्पोक तुटण्याचा आवाज झाला. हो .. स्पोक तुटण्याचाच. मला आता हा आवाज पाठ झाला आहे. चढ संपल्यावर बघु म्हणुन मी तशीच सायकल दामटली. साधारण 75 ते 80 किमी अंतर पार झालेले होते. चढ संपल्यावर परीस्थितीचा आढावा घेतला. स्पोक तुटल्याने चाक थोडेसे डग मारत होते. याचा वेगावर नक्कीच परीणाम होणार होता. आणि पाठीवर लावलेला पंपही वारा पित असल्यामुळे त्याच्यामुळेही वेगावर परीणाम होत होता. वा-यापुढे मी शरणागती पत्करली आणि 25 चा सरासरी वेग सोडुन देण्याचा निर्णय घेतला. शरीरावर अतिरीक्त ताण येऊ न देता जो काही वेग मिळवणे शक्य होईल तो वेग घेऊन मी अविरत पॅडलवर पाय फिरवत होतो. अधुन मधुन सौ. ने दिलेले बटाटे आणि चिकनचा आस्वाद घेणे चालुच होते. छोटा भीमचे लड्डु खाणे आता मी बंद केले आहे. प्रोटीन आणि कार्ब्स भरपुर प्रमाणात घेतल्यामुळे संपुर्ण सायकल प्रवासात कुठेही भुक लागल्यासारखे वाटले नाही किंवा नाष्टा-जेवण करण्यासाठी थांबावेसे वाटले नाही. अवनमध्ये भाजुन घेतलेला बटाटा उत्तम असे मला एका नामवंत रेसरने सांगितले होते. तो पर्याय अजुन मी वापरुन पाहीलेला नाही. पण पहावा लागेल. ज्या सिनियर सायकलपटुंनी मला सायकलविषयक टिप्स आणि महत्वपुर्ण माहीती दिलेली आहे त्यांचा मी शतश: आभारी आहे, याविषयी एक ब्लॉग लिहणार आहे.

    निरा येईपर्यंत भरपुर टी-रस्ते दिसतात त्यामुळे गोंधळल्यासारखे होते. मी बरोबर निराकडेच चाललोय की रस्ता भरकटलोय याची खात्री करण्यासाठी दोन-चार वेळा थांबुन स्थानिक रहीवाशांचा सल्ला घेऊनच मी पुढच्या मार्गाला लागायचो. एकदा मला सिद्धार्थने रस्ता सांगितला. सरळ जा सरळ जा असे तो म्हणाला. निरा ते लोणंद हा सात किमीचा रस्ता खुपच बोगस निघाला. उरले सुरले अ‍ॅवरेज स्पीडसुद्धा त्याने खाऊन टाकले. त्यात चाकाचा स्पोक तुटलेला असल्यामुळे मला जास्तच धास्ती वाटायला लागली होती. लोणंदमध्ये आल्यावर उजवीकडे दोन रस्ते जातात एक शिरवळकडे आणि दुसरा खंडाळ्याकडे. मी खंडाळा विचारल्यावर पुढे जाऊन उजवीकडे वळा असे एकाने सांगितले. मी पहील्या वळणावरुन वळालो पण मनात शंका आली, पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी थांबुन एकाला विचारले तर तो म्हणाला हा रस्ता शिरवळकडे जातो. दचकलोच मी.. जर पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी थांबलो नसतो तर आज माझा कार्यक्रमच उरकला असता. लगेच मागे वळालो आणि त्या चौकात आलो. पुढच्या चौकातुन उजवीकडे वळालो खरा पण मन अजुनही साशंकच होते. त्यामुळे चार ते पाच जणांना विचारुन चांगली खात्री झाल्यावरच सायकलला खंडाळ्याकडे घेऊन निघालो.

    आता वारा जास्तच बेभान झालेला होता. तो वारा सायकलला वेग घेण्याचा विचारही मनात येऊ देत नव्हता. कसेबसे अंतर कापुन खंडाळा गाठायचा असे मी ठरवले. या पट्ट्यात भरपुर शेती पहायला मिळाली. सावलीसाठी चांगले वृक्षही आहेत पण मी कोणत्याही झाडाखाली सावली घेण्यासाठी थांबलो नाही. रस्ता म्हणाल तर सायकलिंगसाठी उत्तम आहे. पण वारा काही सायकलिंग सुचुन देत नाही आणि त्यात माझ्या चाकाचा एक स्पोक तुटलेला त्यामुळे माझी हालत तर जास्तच खराब होती. चाक आता चांगलेच डुगडुग करायला लागले होते. मी एनएच4 येण्याची आतुरतेने वाट पाहत होतो. तो एकदा आला की चाकाची चिंता थोडी कमी होईल म्हणजे खड्ड्याखुड्ड्यातुन तरी जावे लागणार नाही ही भाबडी आशा. खंडाळ्यात पोचलो पण तिथुन हायवे काही केल्या दिसेना. खंडाळा आला की हायवे येईल हे मनात धरुन मी ऊन्हातान्हात सायकल चालवत होतो. सायकल चालवताना खंडाळा 19 किमी ते खंडाळा 1 किमी पर्यंतच्या सर्व दगडांवर माझे बारीक लक्ष होते. खंडाळा आला पण हायवे काही दिसेना. खंडाळा आला म्हटल्यावर मग हायवे यायला नको का? हे असं काही झालं ना की चिटींग झाल्यासारखी वाटते. एका आजोबांनी सांगितले की डावीकडुन गेल्यावर हायवे येईल. अशी चिटींग झाल्यामुळे पॅडलवर पाय फिरवण्याचा मुडच राहीला नव्हता. हायवेच्या पुलाखालुन उजवीकडे वळालो आणि योगेश शिंदेंची गाडी दिसली. क्षणाचाही विलंब न करता ब्रेवे कार्डवर सही-शिक्का घेतला, तेव्हा 11 वाजुन 47 मिनिटे झालेली होती. आता ऊन मी म्हणायला लागले होते. चेकपॉइंटवर केळी, पाणी आणि इलेक्ट्राल घेतले. मस्त दोन-चार फो्टो काढले (सोशल मिडीयासाठी) आणि जास्त वेळ न दवडता योगेश सरांचा निरोप घेऊन लगेच सायकलला टांग मारली.

    चाकाचा स्पोक तुटल्यामुळे मला नेहमीसारखा वेग घेण्याची भिती वाटत होती. अंगात त्राण शिल्लक असुनही मी त्या तुटक्या स्पोकच्या भितीने सायकलला गती देत नव्हतो. एनएच4 वर खडाळा ते शिरवळ हे निव्वळ उताराचे अंतर असुन्सुद्धा मला ते अंतर लवकर पार करता आले नाही. वारासुद्धा वाहत होता आणि मी मी म्हणत होता. या ब्रेवेमध्ये सर्व दिशांनी वाहणा-या वा-याचा अनुभव घेतला. मागुन, पुढुन, डावीकडुन, उजवीकडुन, आडवा आणि ऊभा सुद्धा. जे काही वा-याचे प्रकार सायकलिंगमध्ये अस्तित्वात असतील ते सर्वच्या सर्व या मार्गावर अनुभवायला मिळाले. यावेळेस मी फक्त शॉर्ट आणि जर्सी घातली होती. नेहमीचे हातापायांना झाकणारे ऐवज यावेळेस मी घरीच ठेवले होते. ऊन्हामुळे हातावर आणि पायावर उमटणारी छ्टा मला हवी होती. जर्सीमधला हाताचा भाग पांढरा आणि जर्सीबाहेरचा हात काळाकुट्ट असे काहीतरी मला करावयाचे होते. सोशल मिडीयावरचे जेवढे सायकलिंग करणारे मित्र आहेत त्या सगळ्यांचा असा एकतरी फोटो आहेच. आणि मलाही तसा फो्टो काढायची जाम ईच्छा होती. आता असे करण्यामागे कोणाची प्रेरणा असावी हे वेगळे सांगायला नकोच.

    नेहमीप्रमाणे निरा नदी ओलांडुन पुणे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केल्यावर तो नेहमीचा फिल घेतला. आपल्या हद्दीत आल्यावर खुप बरे वाटते. निरा नदीच्या पुलावरील रोडवर उगीचच ते मोठमोठे ओरखडे मारुन ठेवलेत. माझ्या सायकलचा टायर 23सेंमी आणि त्या एका ओरखड्याची रुंदी 24सेंमी त्यामुळे त्या असंख्य ओरखड्यांवरुन सायकल नेताना उगीचच घोड्याच्या पाठीवर बसुन सायकलप्रवास केल्याचा अनुभव येतो. नोव्हेंबर महीन्यापासुन हे ओरखडे आहे तसेच आहेत. वारा वाहत असल्यामुळे घामाच्या धारा म्हणाव्या तेवढ्या वाहत नव्हत्या आणि ऊन्हाच्या झळासुद्धा बसत नव्हत्या परंतु सायकल चालवणे सुसह्य होते असे म्हणणे जरा धाडसाचे होईल. पाठीवरील पाणीसाठ्याचा नित्य आस्वाद घेणे चालुच होते. चांदणी चौकापर्यंत पाण्यासाठी कुठेही थांबावे लागणार नाही याची खबरदारी घेतलेली होती. पुढे मला नितिन घोरपडे भेटले, या ब्रेवेमध्ये औरंगाबादहुन सहभागी झाले होते. सायकल चालवता चालवता त्यांच्याबरोबर भरपुर गप्पा मारल्या. त्यांच्याबरोबर निरा पिण्याचे भाग्य लाभले. आणि गंमत म्हणजे निरा पिऊन झाल्यावर मी पैसे द्यायला लागलो तर तो निरावाला म्हणाला तुमचा मित्र पैसे देऊन गेला आहे. आणि खरंच नितिन पैसे देऊन पुढे निघुन गेला होता. नंतर आमची गाठभेट झाली ती शेवटी चांदणी चौकातच.

    त्या तळपत्या ऊन्हात शिंदेवाडीचा चढ आणि तो बोगद्याच्या अलिकडचा फ्लायओवर यांनी भयानक त्रास दिला आणि ते नेहमी त्रास देतातच. भर दुपारच्या ऊन्हामध्ये तर तो त्रास चांगलाच जाणवतो. बोगद्यात प्रवेश करताना तो नेहमीचा फिल आला की आता ब्रेवे संपली. पुढे वारजेपर्यंत फक्त उतार आणि त्यापुढचा चांदणी चौक चढला की काम फत्ते. त्या ऊन्हात चांदणी चौकाचा चढसुद्धा नकोसा वाटत होता. पण एवढ्या चढावर पॅडल मारले की ब्रेवे संपली केवळ या काल्पनिक सुखाने मी चांदणी चौक गाठला. प्रशांत जोगने जंगी स्वागत केले. 2 वाजुन 55 मिनिटे झालेली होती. ओझगुरने 2 वाजुन 40 मिनिटांनी ब्रेवे संपवली आणि त्यापाठोपाठ ब्रेवे संपवणारा मी दुसरा. खरंतर मला ही ब्रेवे 8 तासात संपवायची होती पण मागच्या चाकाचा स्पोक तुटल्यामुळे मला स्पीड आवरता घ्यावा लागला आणि वाराही होता. त्यामुळे आता ईथुन पुढे 200च्या ब्रेवेमध्ये 8 तासांचे लक्ष्य गाठणे हे एकमेव उद्देश असणार. हे काम सोपे नाही याची मला पुर्ण कल्पना आहे परंतु प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रयत्नाने वाळूचे कण रगडीता तेलही गळे.  


एकुण नविन रुट भन्नाट आहे...मस्त हवेशीर..दमछाक न करणारा..


Distance - 200 kms
Time limit - 13.5 hrs
Start point - Hotel Viva, Chandani Chowk, Pune
Finish Point - CCD, Chandani Chowk, Pune
Checkpoints - Kedgaon choufula, Khandala (NH-4)
Entry Fee - Rs. 500/-
Medal fee - Rs 550/-
Volunteers - Yogesh Shinde, Sanjay Joshi, Jayant Nitsure, Prashant Jog
Event Link - 200 BRM on 19-Mar-2017

Participants with their respective AIR rider numbers:
1 prashant jog 2039 
2 Vijay Vasve 0087 
3 Ganesh Karche 2595 
4 Kaustubh Dandekar 3079 
5 Rohit Dandekar 5090 
6 RAHUL MEHER 2232 
7 Kuenzang Sherub 1198 
8 Rabindra Behera 5102 
9 Rajeev Phadtare 2211 
10 Advait Khatavkar 1145 
11 Ozgur Dindar 3208 
12 Mahesh Nambiar 3530 
13 Koken Uzuntas 3828 
14 Ram Shinde 5131T 
15 Sanjay Joshi 0064 
16 Samir Ganu 5155 
17 Vikram Bhosle 3646 
18 Ameya Mudgal 3520 
19 Sameer Salian 4936 
20 Sheik Syed 4787 
21 Swanand Joshi 4743 
22 Nilesh Hejib 5179 
23 Sujeet Sabale 5187 
24 pavan chandak 5146 
25 vivek agarwal 0108 
26 Siddarth Bhamre 1717 
27 Divya Tate 0001 
28 Sunny Khandale 3062 
29 satish sharma 0968 
30 NITIN GHORPADE 2909 



At the Start point
Somewhere between Choufula and Nira

Supa Climb


Supa

Khandala Checkpoint



ever smiling volunteer Prashant Jog



कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...