Friday 18 June 2021

ग्रीन जर्सीचा सम्राट पीटर सागान.

ग्रीन जर्सीचा सम्राट!
पीटर सागान.

 
टूर द फ्रान्स म्हणजे सायकलिंग विश्वातील पंढरी. जसा पंढरीत गेल्याशिवाय मोक्ष मिळत नाही तसा टूर द फ्रान्समध्ये सायकल चालवल्याशिवाय कोणत्याही सायकलपटूचा जन्म सार्थकी लागत नाही. यावर्षी तर काही सायकलपटूंनी ऑलिम्पिक ऐवजी या ग्रँड टूरला प्रथम पसंती दिली आहे यावरून तुमच्या लक्षात येईल हे काय प्रकरण आहे ते. टूर द फ्रान्स पाहुन माझे जीवश्च कंठश्च म्हणतात, भावा, तु कधी जाणार टूर दि फ्रान्सला? मला माहीतीये माझी लायकी काय आहे ते, पण माझ्या मित्रांच्या निरागस प्रेमाला या जगात तोड नाही. मित्रप्रेम म्हणतात ते हेच.

तर त्या टूर द फ्रान्समध्ये वेगवेगळ्या रंगांच्या जर्सी जिंकावयाच्या असतात. त्यातलीच एक बहुप्रतिष्ठीत ग्रीन जर्सी. मी जेव्हापासुन सायकल चालवायला सुरूवात केली तेव्हापासुन टूर द फ्रान्स न चूकता बघत आहे. आणि दरवर्षी हा पठ्ठ्या पीटर सागान ती ग्रीन जर्सी जिंकत आलेला आहे. सात वेळा ग्रीन जर्सी जिंकण्याचे जागतिक रेकॉर्ड याच्याच नावावर आहे. न भूतो न भविष्यति! पीटर सागान...नाम तो सुना ही होगा..

आपल्या क्रिकेटमध्ये जैसा सचिन तेंडुलकर तैसा सायकलिंगमध्ये पीटर सागान! दोघेही आपापल्या खेळांचे देव. एक गॉड ऑफ क्रिकेट तर दुसरा गॉड ऑफ सायकलिंग..
येथे कर माझे जुळती! 🙏🏼

सचिनला मध्ये घेण्याचे कारण म्हणजे आपल्या लोकांना क्रिकेटची भाषा चटकन कळते.  क्रिकेटमध्ये सचिनला जे स्थान आहे तसेच किंबहुना त्याहूनही श्रेष्ठ स्थान पीटर सागानला सायकलिंगमध्ये आहे. जसे सचिन तेंडुलकरने केलेले शतक त्याच्या कैक चाहत्यांना आत्मिक समाधान देऊन जायचे तसेच पीटरने सागानने जिंकलेली रेस त्याच्या जगभर पसरलेल्या चाहत्यांना एक आत्मतृप्ती प्रदान करते. पीटरने रेस जिंकावी म्हणून माझ्यासारखे कैक चाहते देव पाण्यात टाकुन बसलेले असतात. रेसमध्ये पीटर सायकल चालवताना दिसावा यासाठी कैक लोक रेसच्या मार्गावर डोळे लावुन बसलेले असतात. कॅमेरामन पण पीटर दिसला कि त्याच्यावरच कॅमेरा रोखुन धरतात कारण टिरआरपी कसा वाढवायचा हे त्यांना चांगलेच माहीत आहे. रेसमध्ये पीटर दिसावा तो दिसताच क्षणी सर्वांनी जल्लोष करावा आणि त्या जल्लोषात त्याला व्हिली करण्याची मागणी व्हावी आणि त्या मागणीपुढे पीटर नेहमीच नतमस्तक होतो. प्रेक्षक देवो भव! मग काय, सायकलचे पुढचे चाक अलगद हवेत जाते, सायकल एका चाकावर चालताना दिसायला लागते आणि त्या एक चाक उचललेल्या अवस्थेतही तो उजवा हात वर करून प्रेक्षकांना अभिवादन करत असतो तेही चढावर. शुद्ध वेडेपणा. याचे अनुकरण करण्याचा जे रायडर्स प्रयत्न करतात ते आपला पार्श्वभाग शेकवुन घेतात 😁. त्यामुळे अनुकरण करण्याचा मोह टाळलेला बरा. चढावर एक चाक उचलुन एका हाताने सायकल चालवणारा हा अवलिया.. कोण प्रेमात पडणार नाही याच्या... पीटर म्हणजे कमाल आहे..सायकलिंग जगताला पडलेले एक स्वप्न आहे.



त्याची सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे त्याची काळजाचे ठोके चुकवणारी स्प्रिंट! खरंच त्याची स्प्रिंट हृदयाचे ठोके चुकवुन जाते. रेसमध्ये शेवटच्या दोनशे-तीनशे मीटरमध्ये पीटरने लावलेली हि स्प्रिंट डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. पीटरने सॅडलवरून उठुन स्प्रिंट चालू केली की मी फक्त अवाक होऊन टिव्हीकडे पाहत बसतो. आणि तो जिंकला कि आनंद गगनात मावत नाही हेही तेवढंच खरं. मेंदूने सांगावं पीटर जिंकावा, हृदयानेही सांगावं पीटर जिंकावा आणि पीटरनेही स्प्रिंट मारून ती रेस जिंकावी यासारखी दिव्य आनंद देणारी दुसरी कोणतीही गोष्ट या जगात नाही. पीटरच्या स्प्रिंटच्या प्रेमात पडल्यामुळे माझ्या मित्रांनी त्यांची बरीचशी कामे सागानच्या स्प्रिंटची शप्पथ देऊन माझ्याकडुन करवुन घेतलेली आहेत.. कसम सागान के स्प्रिंट की.. 😍😍

तर असा हा सागान आहे. ग्रीन जर्सी जिंकण्याचे जागतिक रेकॉर्ड जरी त्याच्या नावावर असले तरी 2020 साली ग्रीन जर्सी जिंकण्यात त्याला अपयश आले होते. अहो आश्चर्यम! त्यामुळे ते अपयश धुवुन काढण्याचा प्रयत्न तो यावर्षी नक्कीच करणार यात मला तिळमात्रही शंका वाटत नाही. जे लढवय्ये असतात त्यांच्यासाठी "आपेश मरणाहुनि ओखटे" (अपयश मृत्युपेक्षाही भयंकर) असते. तर 2020 साली ग्रीन जर्सी कोणी जिंकली हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर ती जिंकली सॅम बिनीट नावाच्या भूताने. हो भूतानेच! त्याने सांगितले होते कि पीटरला हरवता येऊ शकते मी ग्रीन जर्सी जिंकणार आणि त्याने ती जिंकली. मागच्या टूरमध्ये पीटरच्या पाठीमागे भुतासारखा लागला होता हा सॅम बिनिट... 😁 पीटरची पाठच सोडत नव्हता, पीटरच्या चाकामागे चाक लावुन त्याने पीटरला नामोहरम करून सोडले होते. त्यात तो काही स्टेजही जिंकला त्यामुळे त्याचे पॉइंटस पीटरपेक्षा जास्त झाले आणि तो मागच्या वर्षी ग्रीन जर्सी घेऊन गेला. मी पहिल्यांदा पीटरला हतबल झालेले पाहीले. वाघाची शिकार अलगद कोणीतरी पळवुन न्यावी तसा सॅम बिनिट पीटर सागानची ग्रीन जर्सी घेऊन गेला. यामुळेच यावर्षीचे टूर द फ्रान्स पहायला मजा येणार आहे...
यावर्षीच्या जिरो दि इटालियामध्ये पीटरने सिक्लामिनो जर्सी जिंकलेली आहे (ग्रीन जर्सीच्या तोडीची) आणि भयाण चढ असणाऱ्या सर्व स्टेजही पुर्ण केलेल्या आहेत. तो फॉर्मात आहे त्यामुळे यावर्षी टूर दि फ्रान्स बघताना सर्व चाहत्यांना एकच प्रश्न पडलेला असेल तो म्हणजे,
"यावर्षी पीटर सागान ग्रीन जर्सी जिंकणार का?"
- आयर्नमॅन विजय वसवे.

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...