Tuesday 25 February 2014

बोराटयाची नाळ (Boratyachi Naal)

बोराटयाची नाळ (Boratyachi Naal)

       लिंगाणा माझ्यासाठी नेहमीच एक आकर्षण आहे. विशेषत: जेव्हापासुन शिखर फाऊंडेशनबरोबर तो मी सर केलाय. लिंगाणाच्या माथ्यावरुन मोहरीचे पठार जेव्हा पाहीले तेव्हापासुनच तिथे जाण्याची तीव्र ईच्छा मनामध्ये होती पण जाण्याचा मार्ग नाहीत नव्हता. मढेघाटला जाताना वाचलेल्या पाटीच्या आणि दिशेच्या आधारे ही तीच मोहरी असावी अशी माझी पक्की खात्री झाली होती. गुगल मॅप्सवर शोधाशोध केल्यानंतर तिकडे जाण्यासाठी हाच मार्ग दाखवलेला होता. मागच्या वर्षी याच दिवसामध्ये तिथे जाऊन आलो. पण तेव्हासुद्धा बोराटयाच्या नाळेत उतरायचे राहुन गेले होते. बोराटयाच्या नाळेविषयी खुप ऐकलेले होते. ऐकलेली बोराटयाची नाळ तेव्हा नुसती बघुन ठेवली होती. अर्थात मी पुन्हा ईकडे येणार होतोच तिला जवळुन पाहायला. या जानेवारीतले तीन रविवार मी क्रिकेट खेळ्ण्यात वाया घालवले, उत्कृष्ट फलंदाज वगैरे ट्रॉफी मिळाली पण ट्रेकींग करण्याचे तीन रविवार गेल्याचं दु:ख जरा जास्त होतं. खरंतर बोराटयाची नाळ जानेवारी २०१४ मध्येच "Target Locked" करुन ठेवली होती. जानेवारीत क्रिकेटचा अडथळा आला नसता तर फेब्रुवारीत रायलिंग पठारावर उन्हाचे चटके खावे लागले नसते. फेब्रुवारीच्या अखेरीस मुहुर्त मिळाला. ट्रेकला जाऊन आलं आणि फोटो फेसबुकवर टाकले की ब-याच मित्रांचा ठरलेला डायलॉग असतो, काय भाऊ? मला का नाही बोलला? आलो असतो की राव मी पण... वगैरे वगैरे. म्हणुन ब-याच मित्रांना माझ्या आगामी ट्रेकची आगाऊ कल्पना देऊन ठेवली होती. पण सगळेच कामात अडकलेले. आता मला हा डायलॉग तरी ऐकावा लागणार नाही की मला का नाही बोलला? 
     उणादुणा एकच मित्र बरोबर होता. आम्ही रसद आणि दोघांना पुरेल एवढे पाणी बरोबर घेऊन रात्री ११ वाजता सिंहगड रोडने निघालो. पासळीला ०१:३० वाजता पोचलो. पासळीत गाडी लावुन एका व्हरांडयात कॅरी मॅट टाकली आणि आडवे झालो.

पासळीच्या पुढे मढेघाटाकडे जाताना लागणारी हिच ती पाटी मोहरी १० कि.मी.
     सकाळी पक्षांच्या किलबिलाटाने जाग आली. लगोलग आवरा आवरी करून मढे घाटाचा रस्ता धरायचा होता. अजुन तांबडं फुटायचं होतं. छोटासा घाट संपल्या संपल्याच उजवीकडचा चढ चढुन झाल्यावर सुर्योदयाचा आनंद घेण्यासाठी गाडी उभी केली. 
सुर्योदय रविवार, २३ फेब्रुवारी, २०१४ वेळ ०७:०७ मि.  
    सुर्यनारायणाचे दर्शन झाले. त्याची कोवळी किरणे राजगड आणि तोरण्यावर पसरली. सोनेरी किरणांमध्ये भिजलेला तोरणा अफाट सौंदर्याचे प्रदर्शन करत होता. फोटो काढले नाहीत तर नवलच. 

सुर्योदयाची कोवळी किरणे तोरणा आणि राजगडवर
    जास्त वेळ न घालवता पुढे निघालो. कुसारपेठच्या पुढील रस्त्यावर मोठी खडी पसरवलेली होती काम चालु होते. 

मोहरी रस्त्याचे काम सुरु आहे.

"पुढे खडी टाकलीये रोडवर गाडी घेऊन जाऊ नका? त्या खडीवरुन चाकं टिकायची न्हाय" 
एका मावशीनं सबुरीचा सल्ला दिला. खडीकडं बघुन ते अगदी खरंही वाटलं. त्याच ठिकाणी गाडी वळवुन पार्क केली. दमुन आल्यावर गाडी वळवण्याचा त्रास नको म्हणुन अगोदरच केलेली तजवीज. तेथुन मोहरी पाच की.मी. होती. एकुण आमची पायपीट 10 कि.मी. ने वाढणार होती. थोडे पुढे गेल्यावर जाणवलं की ही खडी जास्त लांबपर्यंत नाहीये. थोडीशी शक्कल वापरायचं ठरवलं. गाडीत मी एकटाच बसलो आणि माझ्या बाजुकडचे चाक रस्त्याकडेच्या मातीवरुन घेतले. काम फत्ते. खडीची कटकट संपल्यावर निवांत गाडीला बाजुला लावुन हुश्श करून घेतलं. 

तोच समोरून पाण्याचे हांडे घेऊन येणा-यांचा ग्रुप दिसला. कुसारपेठचे होते ते. पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हांडे घेऊन रोज 2 की.मी. अंतर कापतात बिचारे. विशेष म्हणजे पाणी वाहणा-यांमध्ये पुरुष सुद्धा होते. कुसारपेठ येथे पाणी मागायची माझी तरी आता हिंमत होणार नाही. 

पाण्यासाठी रोज २ कि.मी पायपीट


     खडीचा अडथळा दूर झाल्यावर मी वेगात अंतर कापले. अधून मधून दिसणारे काही नजारे ब्रेक दाबायाला भाग पाडत होते. दुर्ग दुर्गेश्वर रायगड सकाळच्या कोवळ्या उन्हात झळाळुन निघालेला दिसत होता. या ठिकाणावरुन रायगडाचं वेगळं रूप पाहायला मिळतं. जगदीश्वराचं मंदिर आणि महाराजांचा दरबार तेवढ्या दुरुनही लक्ष वेधुन घेत होते. 

कोवळया उन्हात न्हाऊन निघालेला दुर्ग दुर्गेश्वर रायगड 

आजुबाजुचे नजारे कैमे-यात कैद करत होतो आणि अधून मधून माझ्यावरही कैमेरा घेत होतो.



रायगड आणि लिंगाणा एकत्रित (रायलिंग)




मातीचा रस्ता 

पोकलॅंड रस्त्यासाठी खडक फोडतोय
     काही अंतर पुढे गेल्यावर एक पोकलँड आणि बुलडोजर उकरा उकरी करत असल्याचे आढळुन आले. नजीकच्या काळात चांगला रस्ता मिळेल अशी आशा उरी बाळगायला हरकत नाही. मी तर वाट बघतोय कधी हा रस्ता डांबरी होतोय म्हणजे पावसाळ्यात इथला स्वर्ग पाहायला येता येईल. 
 इथेच गाडी लावावी लागणार होती. मागच्या वेळेस इथेच लावली होती. 
मोहरी गावातून पुढे पायपीट चालु ठेवली. रायलिंगकडे जाण्याच्या दिशेला ठिकठिकाणी दगडांवर पांढरे बाण दाखवलेले आहेत. त्या बाणांचा पाठलाग केला तरी चालेल. फक्त एक लक्षात ठेवायचे की पुढे गेल्यानंतर उजव्या बाजुला वळायचं नाही. उजव्या बाजुला काळ नदीचा उगम आहे. मग ठरवा जायचं की नाही. अनेक कातळ कड्यांवरुन उड्या घेणारं पाणी एकत्र जमलं की त्याची काळ नदी होते जी साक्षात एक काळाचे रूप आहे. तिची सुरुवातच एका अजस्त्र धबधब्याने होते. 

काळ नदीच्या उगमाकडील बाजु रायलिंगकडे जाताना उजवीकडे
    पण काही उपयोग नाही पावसाळ्यात इथे येता येणे तेवढे सोपे नाही आणि उन्हाळ्यात तो धबधबा सुरु असणं अवघड आहे. रस्ता जेव्हा डांबरी होईल तेव्हाच पावसाळ्यातला आनंद घेण्यासाठी इथे येता येईल. वाट पाहतोय.
                   थोडी दाट झाडी ओलांडुन झाल्यावर हळु हळु लिंगाणा समोर दिसायला लागतो. 

रायलिंगकडे जाताना डाव्या बाजुचे दृश्य

समुद्रातील शार्कसारखा दिसणारा सह्याद्रीवरील लिंगाणा 
       लिंगाण्याच्या सुळक्याने जमिनीतुन हळुच टोक वर काढल्यासारखं दिसतं. आणि त्याचं ते टोक समुद्रात वावरणा-या शार्क माशाची आठवण करुन देते. शार्क मासा समुद्रात वावरताना एक कल्ला पाण्याबाहेर काढुन पोहतो, पाण्याच्या बाहेर आलेलं शार्कचं ते टोक दिसलं की भल्याभल्यांची तंतरते. लिंगाणा म्हणजे सह्याद्रीवरचा शार्कच जणु. याला बघितल्यावर सुद्धा भल्याभल्यांची तंतरते. त्यात मी पण आहे, जरी सर केलेला असला तरीही. 

SN= सिंगापुर नाळ, RP= रायलिंग पठार
      रायलिंगच्या अलीकडे सिंगापुर नाळ बाण करून दाखवलेली आहे. तिकडे जाऊन जरा सिंगापुर नाळेचे मुखदर्शन करून आलो. खरंतर माझ्यासाठी सिंगापुर नाळ कोणती आणि बोराट्याची नाळ कोणती ओळखता येणं निव्वळ अशक्य होतं. मी कधीच माहितगार व्यक्तीबरोबर तिथे गेलेलो नाही. दुस-यांदा या पठारावर आलोय स्वबळावर. बोराट्याची नाळ मी स्वत: शोधणार होतो. बोराटयाच्या नाळेचे वेगवेगळया कोनातुन काढलेले फोटो ईथे देत आहे. हा सुरुवातीचा...

रायलिंगच्या जवळ असणारी हीच बोराटयाची नाळ असावी असे गृहीत धरुन आत घुसलो










मोठा दगड एका छोटया दगडामुळे अडकला


येथुन वाट असावी अशी अपेक्षा होती










लिंगाणा बेसकडे जाणारी वाट रूळलेली असावी आणि त्यामुळे ती चटकन दिसेल अशी माझी अपेक्षा होती.  आणि त्या वाटेने कडयाच्या कडेने लिंगाणा बेसला जाऊन येता येईल या माझ्या मनोकल्पना किती बालीश होत्या हे मला तिथे गेल्यावरच कळले. लिंगाणाबेसला जायची वाट सापडली नाही पण बोराटयाची नाळ बरीच वर-खाली करुन झाली. छोटे-मोटे दगड पायाच्या धक्क्याने घरंगळत सुटतात. त्यामुळे पुढे उतरत असणा-या ट्रेकरला ईजा होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे प्रत्येक ट्रेकरने ईथुन जाताना काळजी घेण्याची गरज आहे. काही पॅचेस अवघड आहेत पण चढता येण्याजोगे. वाट शोधुन सापडली नाही मग नाद सोडुन दिला. रायलिंगवरुन लिंगाणा पाहुन निघायचे ठरवले.

रायलिंगवरुन लिंगाणा आणि मागे रायगड

लिंगाणा शिखर



मोहरी गावातील विहीर

गाडीवर मातीचा लेप
घरी जात असताना वेल्ह्याच्या गुंजवणीमध्ये पोहलो. ट्रेकनंतर पोहले की शरीर मोकळे होते. मस्त पोह्ल्यानंतर घराकडे मोर्चा वळवला. कारभारणीने फोन वाजवला, घरी निघालोय सांगितले.

गुंजवणी नदीत पोहणे


पायांची अवस्था


अशा प्रकारे बोराटयाच्या नाळेतुन लिंगाणाबेसला कसे पोचायचे नाही याचा एक मार्ग मला माहीत आहे. तुम्हाला हवा आहे का?

Wednesday 19 February 2014

रतनगड (Ratangad trek with FONA)

    आम्हाला पुण्यातुन निघुन तळेगावातुन सुटणारी FONA ची बस रात्री ११:३० वाजता नाशिक फाटयावर पकडायची होती. निगडीला येण्यापेक्षा नाशिक फाटयावरच कुठेतरी गाडी पार्क करा, तुम्ही म्हणाल तिथुन तुम्हाला पिक करतो हे मनोज राणेंचं वाक्य मनाला खुप धीर देऊन गेलं होतं. नाशिक फाटयापेक्षा मी भोसरीत राजेशच्या घराजवळच गाडी लावण्याचे ठरवले, तो पार्कींगमध्येच लाव म्हणत होता पण मी मुद्दामच बाहेर लावली कारण परत येण्याची वेळ निश्चित नव्हती उगाच रात्री-अपरात्री आलो तर बिचा-याची माझ्यामुळे झोपमोड व्हायची. गाडी गेटच्या आत लावण्यासाठी त्याने खुप गळ घातली पण मी नाही ऐकलो. गाडी लावायला जागा मिळणे हेच माझ्यासाठी खुप होतं. राजेशने मनभरुन पाहुणचार केला आणि आमच्याबरोबर बस स्टॉपवरसुद्धा आला.
    ११:४० च्या दरम्यान बस आली. बसमध्ये कुठे जागा मिळेल याचा विचार मनात घोळत होता, मी एकटा असल्यावर बसण्याच्या जागेची मुळीच चिंता करत नाही पण यावेळेस सहकुटुंब असल्यामुळे तो विचार मनात होता. बस थांबल्याबरोबर मुलांना आणि सौ. ला अगोदर चढुन दिले आणि मी त्यांच्या मागोमाग वर गेलो, बघतोय तर काय चक्क एक तीन सीटांची रांग आमच्यासाठी मोकळी ठेवलेली होती, माझ्यासाठी एक सुखद धक्का होता तो. FONA ची माणसं ट्रेकर्सची एवढी काळजी घेतात. तिघांना तिथे बसवुन मी आपली बाल्कनी पकडली. शेवटचा स्टॉपवर बसला प्रवासाचा नारळ भरवला जातो. बसला नारळ फोडुन ट्रेकला आलेल्या सर्वांचा फोटो काढला की अधिकृतरीत्या ट्रेक सुरु होतो. फोटो काढुन झाल्यावर सगळे बसमध्ये बसले आणि आम्ही मार्गस्थ झालो.
     बसचालक नक्कीच सह्याद्रीचे वारे पिणारा असावा कारण आमची बस सुसाट सुटली होती. डुलक्या घेत घेत असंख्य हेलकावे खात खात प्रवास चालु होता मला मधेच जाग यायची पुन्हा मी डोळे मिटायचो.
एकदाचे रतनवाडीला पोहोचलो तेव्हा पहाटेचे ५ वाजलेले होते. अमृतेश्वराच्या समोरच आमची बस उभी होती. बसमधुन खाली पाय ठेवल्या ठेवल्या हाडं गोठवणा-या थंडीने आमचे स्वागत केले. वळकुटया घेऊन आम्ही मारुतीच्या मंदीरात शिरलो आणि बोच-या थंडीची पर्वा न करता बिनधास्त ताणुन दिली. लवकर उठलेल्या मंडळींच्या गोंगाटामुळे मला जाग आली.


     अमृतेश्वराचे मंदीर सकाळच्या प्रसन्न वातावरणात खुप सुंदर दिसत होते. पण ट्रेकर्सचे दोन ग्रुप दोन बस भरुन आलेले असल्यामुळे गोंगाटही बराच होता. ऊठल्याबरोबर वळकुटया आणि पांघरायच्या चादरी बसमध्ये ठेवुन दिल्या.
   "आवरा लवकर, चहा-नाष्टा करुन घ्या पटापट, लवकर निघायचंय आपल्याला,"
   "लवकर निघुन लवकर परत येऊ म्हणजे आपल्याला लवकर निघता येईल." 
   "फोटो काढण्यात आता बिल्कुल वेळ वाया घालवु नका, मंदिराचे फोटो संध्याकाळी काढता येतील."
फोटो संध्याकाळी निवांत काढता येतील ही कल्पना छान वाटली, निवांतपणे अगदी बारीक-सारीक नक्षीकामसुद्धा टिपता येईल अशा विचाराने फोटोमध्ये वेळ न घालवण्याचा सल्ला मी शिरसावंद्य घेतला. पण प्रत्यक्षात जेव्हा किल्ला उतरुन खाली आलो तेव्हा कॅमे-याच्या बॅटरीमध्ये बाबाजी का ठुल्लु राहीलेला होता. कसेबसे दोन-चार फोटो आले. सल्ला ऐकणे परवडले नाही.
     किल्ले चढाईला जाताना वजन वाढवणा-या अनावश्यक वस्तु ठेवण्यासाठी जर पायथ्याला बस उपलब्ध असेल तर त्याहुन मोठे सुख नाही. अर्थात आम्हालाही हे सुख लाभलेले होते. मग आम्ही फक्त जेवणाचे डबे आणि पाण्याच्या बाटल्या एवढेच बरोबर घेतले. ज्या टपरीवर आमची चहा-नाष्टयाची सोय केलेली होती ती विष्णुतिर्थाच्या (पुष्करीणी) जवळच होती. एवढी जवळ की नाष्टा करता करता आम्ही त्यावरील कोरीव नक्षीकाम निरखुन पाहु शकत होतो. 


        मध्यभागी खोल ठिकाणी पाण्याचं टाकं, त्याच्या चारी बाजुने चढत गेलेल्या पाय-या, पाय-या संपल्यानंतर चारी बाजुला थोडीशी वावरायला जागा, पुन्हा चारी बाजुने चढत गेलेल्या पाय-या, आणि त्यानंतर पुरुषभर उंचीची भिंत, आणि ही भिंत जमिनीच्या पातळीपासुन अर्धा फुट उंच विवीध नक्षीकाम केलेल्या मुर्त्यांनी आणि दगडांनी सजलेली. विशेष म्हणजे सर्व मुर्त्या दगडाच्या कोरीव देव्हा-यामध्ये बसवलेल्या होत्या. देव्हा-यांचा कळस जमिनीच्या पातळीपासुन दोन ते तीन फुट उंच होता. असं वाटत होतं जसं काही त्या दगडाच्या भिंतीला कोरीव देव्हा-यांची आरास केलेली आहे. छोटीशीच पण खुप सुंदर पुष्करीणी पहायला मिळाली. पुष्करीणीचा कट्टा म्हणुन उपयोग करायला काहीच हरकत नव्हती, आम्ही तेच करत होतो. कडाक्याच्या थंडीत शेकोटीचा आनंद घेण्याची मजा काही औरच. काही उत्साही सभासद शेकोटी पेटवुन मस्त शेकोटीचा आनंद घेत होते.


 विष्णुतिर्थाच्या बाजुला असलेली गव्हाची शेती खुप सुंदर दिसत होती. डोळयांना काहीतरी नविन पहायला मिळत होतं. गव्हावर सकाळी सकाळी पडलेले दवबिंदु गव्हाला घट्ट मिठी मारुन बसले होते, चिकटुन बसल्यावर थंडी कमी होते हे त्यांना माहीत असावं बहुतेक. आणि एकदम स्तब्ध कसलीही हालचाल नव्हती. 
    आणि आम्ही सगळया हालचाली जलद करण्याचा प्रयत्न करत होतो. कांदा पोहे आणि चहा (दोन वेळा) मटकावुन झाले होते. झालो सज्ज....! सगळ्यांनी चहा नाष्टा व्यवस्थित घेतला आहे याची खात्री करुन घेतल्यानंतर मंदारने सर्वांना किल्ला चढताना घ्यावयाची काळजी, पाळावयाच्या सुचना, वेळेचे नियोजन, सर्वात पुढे कोण असेल, सर्वात मागे कोण असेल याची पद्धतशीर माहीती दिली. आणि महाराजांचा जयघोष करुन आम्ही रतनगडाकडे कुच केली. 
     जवळ-जवळ एक वर्षाच्या कालावधीनंतर सौ. आणि मुले किल्ला चढणार होती. मागच्या वर्षी डयुक्स नोजला जाऊन आल्यानंतर आम्ही कुठेही सहकुटुंब गेलेलो नव्हतो, अर्थात अशा ठिकाणी जिथे शारीरीक दमछाक होते. त्यामुळे मी सौ.कडे सॅकचे ओझे द्यायचे नाही असे ठरवले. सगळे जेवणाचे डबे आणि पाण्याच्या बाटल्या माझ्याकडील सॅकमध्ये घेतल्या. पायवाटेने जायला लागल्यावर मातीचा हलकासा थर बुटाबरोबर घूटमळायला लागला सकाळचे दव आणि आदल्या रात्रीचा हलका पाऊस यामूळे ओली झालेली माती चालताना बुटाला चिकटत होती. नंतर जसजसे ऊन वाढत गेले तसा मातीचा तो ओलावा नाहीसा झाला.
       गडावर पोहचण्यासाठी दोन वाटा आहेत एक शिडीची वाट आणि दुसरी खुंटीची वाट. रतनवाडीतुन गडाकडे निघाल्यावर डाव्या बाजुने जाणा-या वाटेने गेले की किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी शिडीचा आधार घेणे अपरीहार्य आहे म्हणुन या वाटेला शिडीची वाट म्हणतात. शिडीशिवाय किल्ल्यात जायचे असेल तर केवळ प्रस्तरारोहण करुनच जाता येऊ शकते. खडकात खोदलेल्या काही उभ्या पाय-या दिसत होत्या पण शिडी असल्यावर कोण त्यांच्या भानगडीत पडेल? आणि उजव्या बाजुने किल्ल्यावर जाणा-या वाटेला खुंटीची वाट म्हणतात. ज्यांनी जुन्या मातींच्या घरांमधील भिंतीत बसवलेली खुंटी पाहीलेली आहे त्यांच्या लगेच लक्षात येईल की या वाटेला खुंटीची वाट का म्हणतात. कारण या वाटेने किल्ल्यावर जाताना खुंटीसारखा दिसणारा एक सुळका लागतो. याचा खुंटीचा आकार एवढा हुबेहुब आहे की कितीही लांबुन आणि कोणत्याही कोनातुन पाहीले तरी हा खुंटीसारखाच दिसतो त्यामुळे त्याचे खुंटी हे नाव एकदम चपखल आहे.  

       आम्ही सर्व FONA चे ट्रेकर्स शिडीच्या वाटेने गडाकडे निघालो. ओढयाच्या कडेने आम्ही चालत होतो. वाट तसी सोपी आहे. काही अंतर चालुन आल्यावर एक लोखंडी पाटी दिसली. तिच्यापुढे दोन वाटा दोन दिशेला गेलेल्या होत्या. मनोज राणे आमच्या बरोबरच होते त्यामुळे पाटीवर काय लिहलंय हे आम्हाला वाचायची गरज पडली नाही, डाव्या बाजुने जाणारी वाट हरिश्चंद्रगडाकडे जाते आणि तेथे पोचण्यासाठी सात ते आठ तास लागतात त्यांनी लगेच ही माहीती दिली. आम्हाला त्या वाटेने जायचे नव्हते, आम्हाला उजव्या बाजुने रतनगडकडे जायचे होते. उजव्या बाजुने आम्ही आमची वाटचाल चालु ठेवली.





साधारण दोन वेळा भरपुर विश्रांती खाल्ल्यानंतर आम्ही शिडीच्या ठिकाणी पोहोचलो होतो.

  शिडीजवळ ट्रॅफिक जाम झाले होते. मेरा नंबर कब आयेगा? रांगेत उभे राहील्यावर हमखास तोंडात येणारा डायलॉग. गर्दी कमी होईपर्यंत फोटोग्राफीची मजा घेऊ असं ठरवुन पाठीमागील दृश्यावर नजर टाकली.




      भंडारद-याचा दुरवर पसरलेला जलसंचय चटकन नजरेत भरत होता. रतनवाडीत उभी असलेली FONA ची बससुद्धा दिसत होती. डोंगरांच्या कडेला आलेली घनदाट हिरवी छटा तर खुप सुंदर दिसत होती. आकाशातील काही मोकळया ढगांमुळे एकीकडे हलकीशी गडद छटा पडलेली होती आणि दुसरीकडे स्वच्छ सुर्यप्रकाश या दोन्हींच्या मिलापातुन एक मनोहर दृश्य डोळयांसमोर तरंगत होते. आणि हळु-हळु माझी नजर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर स्थिरावली. अरे हेच का ते? मंदारने दुजोरा दिला हो तेच ते कळसुबाई शिखर. त्याचा उंचपणा डोळयांना लगेच जाणवत होता. ऊंचीने समान असणा-या डोंगर शिखरांमधुन कळसुबाईने हळुच मान वर काढलेली आहे एवढाच तो फरक. महाराष्ट्रातील ऊंच शिखर म्हणजे कातळ कडे असलेला ऊंचच ऊंच सुळका वगैरे असावा अशा माझ्या मनोकल्पनांना पुर्णविराम बसला होता. पण ऊंची ती ऊंचीच बाकी काहीही असो. 

     शिडीवरचं ट्रॅफिक ब-यापैकी कमी झालेलं होतं. पाठीमागे राहीलेले सगळेजण फोटो काढता यावेत म्हणुन मुद्दाम उशिर करणारे होते त्यातलाच मी पण एक. माझ्यापुढे सुपर्णा होती. शिडीच्या रस्त्यावर एक माकड दबा धरुन बसलेले दिसत होते. पहील्या शिडीवर थोडे अंतर चालुन गेल्यावर पुढे जाताना शिडीवर तुम्ही फक्त स्वत:ला सांभाळण्यासाठीच हातांचा उपयोग करू शकता. त्या अधांतरी शिडीवर बॅग वगैरे साभाळणे या गोष्टी नक्कीच गौण होत्या, नेमका याचाच फायदा घेऊन त्या माकडाने सुपर्णाच्या बॅगवर धाड टाकली. बॅगचा एक कप्पा उघडुन त्याने त्यातली आवळा कॅंडी घेतली आणि धुम पळत जवळ्च्या छोटया कडयावर बसुन कॅंडीचा आस्वाद घेत बसला. ओसाड जंगलात उपासमार होत असलेली माकडे पोटासाठी धाडसुद्धा टाकु शकतात यावर माझा विश्वास बसत नव्हता. पण हे माझ्या डोळयासमोर दहा फुटांच्या अंतरावर घडले होते.  माणुस असो वा प्राणी प्रश्न पोटाचा असेल तर कोणत्याही थराला जाऊ शकतो. आणि पाश्चिमात्यांच्या संशोधनानुसार माकडे तर आपली पुर्वज मग ते कसे मागे पडतील.


      पुढच्यास ठेस मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आमच्या पाठीमागुन येणा-या हुशार ट्रेकर्सनी एका पिशवीमध्ये खाऊ भरुन  ती पिशवी शिडीपासुन लांब फेकुन दिली. दबा धरुन बसलेली सर्व माकडे त्या पिशवीकडे पळाली आणि यांचा रस्ता मोकळा झाला. शिडीविना किल्ल्यात जाणे खरंच खुप महाकठीण काम होऊ शकते. त्यामुळे ज्यांनी कूणी या शिडया बसवल्या आहेत त्यांचे मंडळातर्फे हार्दीक आभार. एकुण चार लोखंडी शिडया चढुन गेलं की आपण किल्ल्यात पोहोचतो. 










चारी शिडयांचे फोटो ईथे देत आहे. नुसता फोटो पाहुन देखील त्यावर चढण्याच्या थराराची आपण कल्पना करु शकतो.  
       किल्ल्यात पोहोचल्यावर उजव्या बाजुला लगेच गणपतीचे मंदिर आहे. मंदिर म्हणजे कोरलेल्या गुहेत गणपती बप्पाची मुर्ती कोरलेली आहे.

        तिथुन पुढे गेल्यावर मोठी गुहा लागते, या मोठया गुहेत डाव्या बाजुच्या कोप-यात अजुन एक छोटीशी उपगुहा आहे. सध्याच्या भाषेत सांगायचे झाले तर हॉल आणि किचनसारखी. चोर दरवाजातुन आल्यावर डाव्या बाजुला जाताना गडाचा मुख्य दरवाजा लागतो. या मुख्य दरवाजावर हनुमानाचे, रिद्धी-सिद्धींबरोबर गजानन आणि मत्स अवताराशी साधर्म्य असलेले अशी तीन शिल्पे आढळली. 

  




        मुख्य दरवाजातुन पुढे गेल्यावर उजव्याच बाजुला टेहळणी बुरुज मोडकळीस आलेल्या अवस्थेत दिसतो. 

     डाव्या बाजुला थोडासा उतार आहे तो ओलांडतानाच कात्राबाईच्या कडयाचे उग्र स्वरुप अनुभवता येऊ शकते. एक अवाढव्य रांगडा कातळ कडा असेच वर्णन त्याला शोभुन दिसेल.







 सह्यकडयाचे विलोभनीय दृश्य काय असु शकते याचा अनुभव घ्यायचा असेल तर या कडयासमोर उभे राहुन पहावे.





     कात्राबाईच्या कडयाला बिलगुन उभा असलेला एक छोटा सुळका दृष्टीस पडतो तो अग्निबाण सुळका. कात्राबाईचे दृश्य अनुभवण्यासाठी तिथे एक दगडातले कोरीव रेलिंग आहे, त्यात उतरुन संपुर्ण सुरक्षितपणे आपण समोरील दृश्याची मजा घेऊ शकतो. पुर्वीच्या काळी ती पाणी साठवण्याची जागा असावी पण सध्या तिचा दगडी रेलिंग म्हणुन छान उपयोग होत आहे. या रेलिंगमध्ये उभे राहुन सर्वांनी मनसोक्त फोटोग्राफी केली. FONA चा बॅनर घेऊन फोटो काढण्यासाठी आम्ही हिच जागा निवडली.  टेहळणी बुरुजातुनसुद्धा हा कडा खुप सुंदर दिसतो.
 फोटो काढुन झाल्यावर आम्ही पुन्हा मोठया गुहेकडे निघालो. पोटातले कावळे मेंदुला काम करु देत नव्हते. 


मुख्य दरवाजातुन गुहेकडे जेवणासाठी प्रस्थान.


मोठया गुहेत दुस-या एका ग्रुपने मुक्काम ठोकलेला होता तरीसुद्धा आम्ही सर्वजण जेवणासाठी तिथे बसु शकलो. जेवणाचा मेनु खाली देत आहे. जेवण करताना समोर दिसणारे दृश्यसुद्धा खुप छान दिसत होते.

   
टेहळणी बुरुजाच्या सरळ पुढे गेल्यावर अखंड खडक फोडुन खोदलेली तीन ते चार टाकी आढळतात. सर्वात वरच्या टाक्यातले पाणी पिण्यास योग्य आहे.


यानंतर आम्ही मुख्य आकर्षणाकडे वळलो.. नेढे. 

नेढयाकडे जायला वळल्यावर सहज पाठीमागे वळुन पाहीले तर हे अतिशय सुंदर  दृश्य समोर दिसत होते  (टेहळणी बुरुज आणि कात्राबाईचे एकत्रित).



आडव्या वाटेने सरळ पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजुला उभी चढण दिसते. ती उभी चढण चढुन जायचं आणि मग नेढयातुन शिखराच्या एका बाजुकडुन दुस-या बाजुला. निसर्गनिर्मित नेढे, सुईला दोरा ओवण्यासाठी असणा-या छिद्रासारखे दिसणारे. ईथे निसर्गनिर्मित एकच नेढे आहे, नेढे शब्दावरुन ते अनेकवचन असल्यासारखे वाटु शकते. नेढयातुन दोन-तीन वेळा अलिकडे पलीकडे करुन बघितले. नेढयाच्या मधोमध उभा राहीलो, नेढयाला पेलल्यासारखी अ‍ॅक्शन करुन फोटोसुद्धा काढला आणि दोन्ही बाजुचे नजारे निरखुन घेतले.




      मग मनोज राणेंच्या मागोमाग नेढयाच्या माथ्यावर गेलो. नेढयाच्या माथ्यावर आल्यावर क्षणभर लिंगाणाच्या माथ्यावर आल्यासारखा भास झाला. स्वरुपाने लिंगाणापेक्षा खुप लहान पण तो फिल नक्कीच येत होता. उभे राहण्यासाठी छोटीशी अरुंद जागा आणि उरलेल्या तिन्ही बाजुंनी छोटासा तीव्र उतार असलेले कडे, लिंगाण्यापेक्षा कैकपटीने छोटा पण तिथे उभे राहिल्यावर लिंगाण्याची आठवण येत होती. नेढयाच्या  चहुबाजुंचे नजारे एवढे सुंदर दिसत होते की तृप्त होणे म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव डोळयांना येत होता.


 उत्तरेला कुलंग आणि मदनगड दिसत होते. अलंग बहुतेक त्या दोघांमुळे झाकोळला गेला होता. उजवीकडे कळसुबाई मान वर काढुन डोकावत होती. गर्दीत डोकावताना आपण टाचा वर उचलुन मान वर करुन काय दिसतंय का? ते बघण्याचा प्रयत्न करतो अगदी तसं. अलंग, मदन आणि कुलंग यांचं गर्दी जमवुन काहीतरी चाललंय आणि त्यांचं नक्की काय चाललंय हे बघण्यासाठी कळसुबाईने मान उंचावलेली आहे. आणि मान ऊंच केल्यामुळेच कळसुबाई सर्वात ऊंच झाली. मदन-कुलंगवरून दृष्टी थोडी अलिकडे सरकवली की नजरेत भरते ती सांधण व्हॅली.

जमिनीलगत कडयांसदृश एक नैसर्गीक फट दाट हिरव्या झाडीचा विळखा घेऊन मनुष्यवस्तीकडे सरकलेली दिसत होती. मनोज राणेंनी दिलेली माहीती अशी की सांधण व्हॅली प्रथम 2008 मध्ये जगासमोर आणली गेली,
ज्या व्यक्तीने हे महान काम केलंय ते नावही त्यांनी सांगितलं होतं पण मी ते विसरुन गेलो. मंदबुद्धीचा परीणाम. दोन्ही बाजुला २०० फुट ऊंच कडा आणि दोन्हींच्या मधुन चालण्यासाठी जेमतेम दहा फुटांची वाट त्या दृश्याची कल्पना करुनच मला रोमांचित झाल्यासारखं वाटतंय. सांधण व्हॅलीची माहीती ऐकल्यापासुन कधी एकदा तिथे जातोय असं झालंय मला. माझं पुढचं लक्ष्य अर्थातच सांधण व्हॅली असणार हे वेगळं सांगायला नकोच.

     सांधण व्हॅलीच्या डाव्या बाजुला खोल दरीच्या अलीकडे दृष्टीस पडतो तो रामाचा बाण. याचा आकार आपण दिवाळीत आकाशात जे बाण सोडतो अगदी तसाच आहे. रामाचा बाण एकदम समर्पक.
नेढयावर उभं राहील्यावर थोडंसं उजव्या बाजुला रतनगडाची खुंटी उठुन दिसत होती.


     हा गड खरंच एक रत्न आहे म्हणुनच याचं रतनगड (रत्नगड) हे नाव अतिशय योग्य आहे असं मला खरोखर जाणवलं. नेढे बघुन झाल्यावर गडावरील बघण्याची ठिकाणे संपली असं मी गृहीत धरलं. आता परतीचा प्रवास चालु करायचा होता. पण रतनगडावरील बघण्याची ठिकाणे संपली तर नवलच. खरा थरार तर पुढेच होता....
"त्र्यंबक दरवाजा"

त्र्यंबक दरवाजा बघितल्या बघितल्या जाणीव झाली ती ही की हा किल्ला अति पुरातन आहे आणि तो असावा  त्याबद्दल माझ्या मनात काडीमात्र शंका राहीली नव्हती. याचे वैशिष्ट म्हणजे हा संपुर्ण दरवाजा आणि याच्या पाय-या कडयाचा अखंड खडक तासल्यानंतर कोरीव काम करुन बनवलेल्या आहेत.


बांधकामाचा कुठेही लवलेश नाही. आतापर्यंत तुम्ही पाहीलेले बुरुज आणि दरवाजे हे "By adding material" या तत्वाने बनवलेले असतील, पण त्र्यंबक दरवाजा, त्याचा बुरुज आणि त्या दरवाजातुन बाहेर जाणा-या पाय-या "By removing material" या तत्त्वाने बनवलेल्या आहेत. खडक फोडण्यासाठी मारलेल्या घावाचा "Depth of Cut" तीन ईंचापर्यंत आहे हे स्पष्ट जाणवत होतं. कोणी फोडला असेल हा अवाढव्य कातळ कडा? आणि त्यातुन हे सुंदर शिल्प कोणी घडवले असेल? कुणीही हा दरवाजा पाहील्यावर अवाक झाल्यावाचुन राहणार नाही.
      त्र्यंबकेश्वराच्या दिशेला आहे म्हणुन त्र्यंबक दरवाजा किंवा प्राचीन काळात त्र्यंबकेश्वराकडे जाताना या दरवाजाचा वापर करत असावेत म्हणुन याला त्र्यंबक दरवाजा म्हणत असतील कदाचित, हा माझा वैयक्तिक तर्क आहे.

"त्र्यंबक दरवाजातुन AMK चे सुंदर दृश्य"



    अखंड खडकातील कोरीव कामाचे कौतुक करत करत तीव्र उतारावर बनवलेल्या मोठ-मोठया पाय-या उतरायला आम्ही सुरुवात केली. या पाय-या उतरणे हासुद्धा एक थरारच आहे. कारण समोर खोल दरी आहे. पावसाचे पाणी याच पाय-यांवरुन वाहत जाते. त्यामुळे या पाय-या अखंड राहीलेल्या नाहीत. पण पाय ठेवुन उतरण्याएवढी जागा नक्कीच आहे. निष्णात ट्रेकर्सची मदत घेऊन आम्ही सर्वजण त्या दरवाजातुन बाहेर आलो. तेथुन काही अंतर आडवे चालत गेल्यावर आम्ही खुंटीच्या जवळ पोहोचलो.


खुंटीच्या जवळुन पुन्हा दोन फाटे फुटतात डावीकडे जाणारा रस्ता बहुतेक सांधण व्हॅलीकडे जात असावा.


    आम्ही उजव्या बाजुने रतनवाडीकडे निघालो. किल्ल्याची चढण संपल्यावर रतनवाडीच्या अलीकडे ओढयात विश्रांतीला बसलो. ओढ्याच्या पाण्यात हात-पाय धुण्याची मजा काही औरच.


   काहींनी फक्त हात-पाय धुण्यावर समाधान न मानता चक्क त्या ढोहात उडया टाकल्या. मजा घ्यावी ती अशी. आनंद लुटताना कंजुषी करण्यात काय अर्थ आहे. बोध घेण्यासारखे आहे. शेवटी मंदारने आवाज दिल्यावर ते ढोहातुन बाहेर आले.

                                                              किल्ला उतरताना दिसलेले फुल.


किल्ल्याच्या पायथ्यापासुन दिसणारे नेढे, सुर्यप्रकाशसुद्धा आरपार दिसत होता.


      कधी संपतंय? कधी बस येणार? किती राहीलंय अजुन? असं करत करत आम्ही पुन्हा त्याच ठिकाणी आलो जिथुन सकाळी निघालो होतो. याचाच अर्थ रतनगड फत्ते झाला होता.
      पुन्हा एकदा चहाचे झुरके घेतले. उरल्या-सुरल्या कॅमे-याच्या बॅटरीत कसे-बसे दोन-चार फोटो काढले.


       अमृतेश्वराचे मनसोक्त दर्शन घेतले. आणि परतीच्या प्रवासासाठी बसमध्ये बसलो.
        आठवणींच्या पाऊलखुणांचा भला मोठा खजिना घेऊन.
    ईति रतनगड ट्रेक सकळ संपन्न.


कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...