Wednesday 23 July 2014

माझी सायकल

"माझी सायकल"

साधारण एक वर्षापुर्वी राहुल सारखा म्हणायचा आपण सायकल चालवायला जात जाऊ. मी बोपदेव घाटात जाऊन आलो एकटा, कँपात गेलो होतो मागच्या रविवारी. त्याचे सायकल चालवणे हळु-हळु मला प्रेरीत करत होते. अखेर १० ऑगस्ट २०१३ ला त्याच्याबरोबर पहील्यांदा सायकल चालवली. माझ्याच बिल्डींगमध्ये राहत असलेल्या एका मुलाची (शिवा) सायकल घेऊन मी माझ्या सायकलींगचा श्रीगणेशा केला. आयुष्यात पहील्यांदा गिअरची सायकल चालवली. घरची परीस्थिती बघता माझ्या लहानपणी एवढी भारी आणि महागडी सायकल मिळ्णं शक्यच नव्हतं. ज्या काही सायकली मी लहानपणी चालवल्या त्या म्हणजे चाक घासत घासत फिरणारी, पॅडल भयंकर जड जाणारी, हवा कमी, चाकाला गेटर (फुगा) आलेली, सिटाची बोंब, चेन पडापडी, कारकुर आवाज काढणारी.. ई.ई. अशा सायकल्स चालवल्या ज्या चालवताना दम लागण्यापेक्षा वैताग जास्त यायचा. तशी सायकल घेऊन एकदा संजुतात्याबरोबर (संजय वसवे) धायरी फाटा ते वसवेवाडी हे २२ कि.मी. चे अंतर पार केले होते. लहानपणी कधीही नविन सायकल चालवण्याची संधी मिळाली नाही, मित्रांच्या नविन सायकल्स पाहुन हेवा वाटायचा. कळायला लागले तसे सायकल चालवणे सोडुन दिले. सायकल चालवणारा गरीब समजला जातो ज्याच्याकडे टु-व्हीलर तोच लई भारी असला काहीतरी फालतु समज त्या वयामध्ये करुन घेतला होता. तिथपासुन ते ईथपर्यंत सायकलचा कधीही संबंध आला नव्हता.
एकदा सायकल चालवुन झाल्यानंतर पुन्हा पुन्हा जावेसे वाटत होते. पण स्वतःची सायकल नव्हती. नविन सायकल पाहुन आलो. मित्रांकडे ज्या प्रकारच्या सायकल्स होत्या तशातली. सगळ्या १२ ते १५ हजार किंमतीतल्या होत्या. माझे मन फार संकुचित विचार करत होते. १५ हजार सायकलवर खर्च करण्यासाठी मन तयार होत नव्हते. एवढी महागडी सायकल असते? काहीच्या काही...खरं सांगायचं तर याबाबतीत मी डबक्यातला बेडुक निघालो निव्वळ कुपमंडुक. सायकलच्या समुद्ररूपी जगाचा मला अंदाज घेता आला नाही. त्यानंतर ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान मी सायकलला हातसुद्धा लावला नाही पण त्या एकदा सायकल चालवण्याचे फोटो टॅग करून फेसबुकवर सगळीकडे सोडले. ज्यांच्याकडे अगोदरपासुनच सायकल्स होत्या, ज्या वापर होत नसल्यामुळे गंजुन चाललेल्या होत्या त्यांना ते फोटो पाहुन सायकल चालवायचा जोश चढला. त्या जोशमध्येच सायकल चालवत चालवत सगळे एकत्र जमु लागले. मग राहुलने पुढाकार घेऊन सायकलचा क्लब तयार केला. परफेक्ट सायकल क्लब.
३१ डिसेंबर २०१३ ला पहीली गियरची सायकल विकत घेतली. गियर प्रकारातली सर्वात स्वस्त सायकल ६५०० ला होती. तीच द्या म्हणालो. सायकलला काय असावं? काय असु नये? याची पुसटशी कल्पनासुद्धा नसताना फ्रेमला स्प्रिंग असणारी, सस्पेंशन असणारी १८ गियरची सायकल मी विकत घेतली. साडेसहा हजारात गियरची सायकल येते मग १५००० हजार कशाला घालवायचे उगाच? बरोबर ना? सायकल घेतल्या घेतल्या गियर मोजु लागलो. मागच्या चाकाला ६ आणि पँडलजवळ ३ होते, दोन्ही मिळुन ९ झाले बाकीचे ९ गियर कुठे गेले? दुकानदाराला बाकीच्या ९ गियरविषयी विचारले. तो म्हणाला १८ गियर आहेत की, दाखव म्हणालो. तो म्हणाला मागे ६ आणि पुढे ३ झाले अठरा. मागचा एक गियर पुढच्या तिन्ही गियरवर वापरता येतो म्हणजे असे ६ गियर १८ प्रकारे वापरता येतात. अशा प्रकारे गियरची संकल्पना पुर्णपणे समजली.
गियर शिफ्टिंग हँडलच्या ग्रिपमध्ये होते. डाव्या बाजुच्या ग्रिपने पँडलचे गियर वरखाली होत होते आणि उजव्या बाजुच्या ग्रिपमध्ये मागच्या चाकाचे. सायकल घेतली त्याच दिवशी नविन कात्रज बोगद्यापर्यंत जाऊन आलो.
दम लागला पण माघार घेतली नाही. सायकल एकटा चालवायचो तोपर्यंत काही वाटलं नाही. सायकलची खरी लायकी कळली जेव्हा ग्रूपमध्ये सायकल चालवायला गेलो. ७ गियरच्या MTB बाईकबरोबर माझी डर्ट बाईक काही टिकली नाही. पळवुन पळवुन किती पळवणार? फ्रेमला सस्पेंशन, पुढच्या फोर्कला सस्पेंशन यामुळे कितीही ताकत लावली तरी ती वाया जात होती, ताकदीने पॅडल मारला की त्या ताकदीने सस्पेंशन वरखाली व्हायचे आणि खड्ड्याखुड्ड्यातुन सायकल गेली की फ्रेमची स्प्रिंग दाबली जायची. तेव्हा अक्कल यायला लागली की सायकल कशी असायला पाहीजे होती. हे कळण्यासाठी साडेसहा मोजावे लागले. दापेसरला जाऊन आल्यावर कळलं की एवढे मोठे अंतर पार करण्याची आपल्या सायकलची लायकीच नाही. फॉर्म्युला वनच्या रेसमध्ये रणगाडा पळवण्याचा प्रकार. जेव्हा जो गियर पाहीजे तो पडणारच नाही, चढ सुरू झाल्यावर गियर चेंज करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी चेंज होणे अशक्य, आणि गियर चेंज होत नसताना चेंज करायची बळजबरी केल्यास हमखास चेन पडणार. अशी होती स्वस्तातली गियरची सायकल. स्वस्तातली ही सायकल चालवत बसलो असतो तर कदाचित मी एवढी सायकल चालवलीच नसती. फेब्रूवारीपर्यंतचा वेळ ट्रेकिंगमध्ये गेला. ती सायकल चालवण्याची ईच्छाच होत नव्हती. असाच एकदा सौ. बरोबर शॉपींगला गेलो होतो, शॉपींग उरकल्यावर घरी जायला निघणार तोच मनामध्ये सायकलच्या विचाराने चलबिचल व्हायला लागली. नविन सायकल घेण्याची ईच्छा प्रबळ व्हायला लागली होती. ईच्छेला पुरेसे पाठबळ असल्यामुळे लगेच फडके हौद गाठला. ब-याच मित्रांच्या तोंडुन सरदार सायकल्सचे नाव ऐकले होते म्हणुन सरदार सायकल्स मध्येच गेलो. पुण्यामधील ईतर सायकलची दुकाने पाहुन झाल्यानंतर सरदार सायकल्स मध्ये गेल्याचं दुःख कधीच झालं नाही. माझ्या सायकलसारखे फिचर्स असणारी सायकल चकचकीत मॉल्समध्ये कमीतकमी २५००० रूपयांना होती. माझ्या सायकलचं खास आवडलेलं फिचर म्हणजे ८ गियर (२४ गियर). काडीची अक्कल नसताना ८ गियरची सायकल १६५०० मिळणे म्हणजे नशिबाचीच गोष्ट तेही Shimano Altus गियर सिस्टमची. तिथला सेल्समैन साला हुषार माणुस होता, बायको बरोबर असलेली पाहुन म्हणतो, यात एक रूपयाही कमी होणार नाही, मीही म्हणालो नको करू. पण मला हेल्मेट आणि लॉक सायकल बरोबर द्यायला पाहीजेत. हो, नाही करत करत अखेर आमची डिल झाली. PROWHEEL AVENGER 1.0, 24 GEARS, FRONT DISC BRAKE, REAR V BRAKE... ईत्यादी फिचर असलेली सायकल ४ मार्च, २०१४ ला विकत घेतली. सरदार सायकल्सची अत्युत्कृष्ट सेवा म्हणजे नविन सायकल ग्राहकाच्या घरी ते रिक्षाने पोचवतात. सायकलच्या मालकाला पहील्याच दिवशी त्रास होऊ नये म्हणुन त्यांनी घेतलेली खबरदारी वाखाणण्याजोगी आहे.
"मागच्या चाकाला डिस्क ब्रेक दिसत नाही",
"एकच डिस्क ब्रेक घेतला का?" दुस-या दिवशी ज्यांनी ज्यांनी सायकल पाहीली त्यांचा हा प्रश्न पहीला असायचा. संध्याकाळी लगेच सरदार सायकल्स गाठले. मला मागच्या चाकाला डिस्क ब्रेक बसवुन पाहीजे म्हणालो. बसवता येईल म्हणाला, पण माझं ऐकणार असाल तर सांगतो डिस्क ब्रेकपेक्षा हा व्ही ब्रेक भारी आहे, तुम्ही वापरून बघा काही फरक वाटला तर पुढच्या वेळी नक्की बदलुन देतो. त्याच दुकानात उभे असलेले तीन-चार जण सायकलचे जाणकार पण तेच म्हणाले. सगळे म्हणतायेत म्हणल्यावर मी पण डिस्क ब्रेक बसवण्याचा विचार सोडुन दिला.
ईथुन सायकलचा प्रवास सुरू झाला...

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...