Saturday 17 January 2015

किल्ले तोरणा

किल्ले तोरणा

किल्ले तोरणा (प्रचंडगड)

समुद्रसपाटीपासुन उंची- १४०३ मी. (४६०४ फुट)
ठिकाण-                        वेल्हे (पुणे शहरापासुन ५० कि.मी.)
श्रेणी-                            अवघड
पहावयाची ठिकणे- कोठी दरवाजा, बिनी दरवाजा, झुंजार माची, बुधला माची, तोरणा ते राजगड ट्रेकचा मार्ग,
                             मेंगाई मंदिर, हनुमान बुरुज, कोकण दरवाजा, रडतोंडी बुरुज, चित्ता दरवाजा व शिल्प,                                    घोडेजिन टोक, विशाळटोक बुरुज, हत्तीमाळ बुरुज, चिणला दरवाजा,
                             किल्ल्यावरुन दिसणारे गुंजवणी धरण आणि वेल्हे गावातील महाराजांचा पुतळा.
ईतर व्यवस्था-       वेल्हे गावात मढेघाट फाटयावर हॉटेल साई आहे. सकाळी चहा नाष्टयाची उत्तम व्यवस्था
                             तेथे उपलब्ध आहे. चहा, क्रिमरोल, कांदा-पोहे, मिसळपाव ई.
                             गडावरुन परतताना वेल्ह्यातील हॉटेल स्वप्निल मधे मटण भाकरी खाणे हा एक
                             अवर्णनीय अनुभव आहे. (समस्त शाकाहारी व्यक्तींची क्षमा मागुन)
         
          या व्यतिरीक्त गडावरुन दिसणारे सह्याद्रीचे नयनमनोहर दृश्य निव्वळ अप्रतिम. रायगड, राजगड, लिंगाणा आणि सिंहगड हे किल्ले असे दिसतात जसे काही आपण दिवाळीमध्ये बनवलेल्या किल्ल्यांचे प्रदर्शन पाहत आहोत की काय असाच भास होतो.
         
        पुण्यातुन तोरणा किल्ल्याकडे जायला दोन वाटा आहेत. एक नसरापुर मार्गे दुसरी पाबे खिंडीतुन. NH-4 ने शिवापुर तोलनाक्यावर ७५ रुपये तोल भरुन (कार असेल तर) नसरापुरपर्यंत आल्यावर तेथुन उजवीकडे वेल्ह्याला रोड जातो. नसरापुर ते वेल्हे रोड बेताचाच आहे. दुसरा मार्ग सिंहगड रोडने सरळ पुढे पानशेत रोडला जात राहील्यावर खानापुरच्या गांधी विद्यालयापासुन डावीकडे पाबे खिंडीकडे जाणारा रोड आहे, तिथे रितसर पाटी लावलेली असल्यामुळे चुकण्याची शक्यताच नाही. हा रोडसुद्धा बेताचाच आहे. या रोडने गेल्यास तोल भरावा लागत नाही. पाबे खिंड अनुभवता येणे हे या मार्गाचे वैशिष्टय म्हणावे लागेल. पाबे खिंडीत रस्त्याच्या बाजुच्या टेकडावर एकदम ऊंच ठिकाणी चढुन गेल्यावर तेथुन तिन्ही किल्ल्यांचे नयनमनोहर दृश्य एकाच ठिकाणावरुन एकच वेळेस अनुभवता येते (सिंहगड, राजगड आणि तोरणा). आणि जर तुम्ही सह्याद्रीचे शौकीन असाल तर पाबे खिंडीतुन दिसणारा सुर्योदय अवश्य अनुभवा. जर सुर्योदयाच्या अगोदर थोडासा अंधार असताना पाबे खिंडीत आलात तर त्या शांत वातावरणात तुम्हाला विवीध पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळतील. अगदी मोरापासुन ते कोकीळेपर्यंत निसर्गातील सर्व संगीतकार येथे पहाटेच्या वेळेस आलाप करतात.

        प्रत्येक दिवशी पाबे खिंडीतील सुर्योदयाचे वातावरण वेगळे असते. तुम्ही रोज एकाच ठिकाणावरुन सुर्योदय अनुभवुन पहा, तुम्हाला रोज वेगवेगळा अनुभव आल्यावाचुन राहणार नाही. दृश्य बदलतात, छटा बदलतात, कधी गडद रंग, कधी मंद प्रकाश, कधी सोनेरी, कधी लालसर, वर्णन करता येणार नाहीत एवढया निसर्गाच्या छटा सुर्योदयाच्या वेळी आपणास अनुभवता येतात. सुर्यदेव वर येता येता हळुच आपली कोवळी किरणे राजगड आणि तोरणावर उधळतो, कोवळया सोनेरी किरणांचा त्या दोन्ही गडांना अभिषेक चालु होतो. झुंजुमुंजु होत असताना अंधुक वाटणारे गड एकदम झळाळुन निघायला लागतात. आणि हे दृश्य पाहत असताना केवळ मंत्रमुग्ध होणे एवढेच आपण करु शकतो. सुर्य वर आल्यावर तेथील दृश्य पुर्णपणे बदलुन जाते. एखाद्या चित्रकाराने कुंचला फिरवुन चित्राचे संपुर्ण रुप बदलवुन टाकावे अगदी तसे. राजगड आणि तोरणा बघताना सिंहगड पहायला विसरु नका. सिंहगड पाहण्यासाठी फक्त पाठीमागे वळुन पहावे लागते. तोच अनुभव , जे समोर दिसले तेच पाठीमागे चालु असते. सुर्योदयाचा व्हिडीओसुद्धा येथे टाकलेला आहे. मजा करा..








        तोरणा किल्ला पुण्यामधील सर्वात उंच किल्ला आहे. पुण्यातल्या पुण्यात सह्याद्रीची उंची आणि त्याचे रांगडे रुप अनुभवायचे असेल तर तोरणासारखा दुसरा गड नाही.































कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...