Friday 7 December 2018

गीता जयंती

गीता जयंती

          लोकांचे गीतेबद्दलचे अज्ञान खरंच वाखाणण्याजोगे आहे. काहींच्या मेंदुत ते शिरत नाही तर काहींना वाटते हे आपल्यासाठीच नाहीच आहे, आपल्याला काय करायचे आहे? याच्याशी आपले काहीही देणेघेणे नाही. गीता तर फार लांब राहीली पण ज्ञानेश्वरीपासुनसुद्धा खुप लोक वंचित आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवदगीतेतील श्लोकांवर रचलेल्या काव्यमय ओव्या. गीतेचे काव्यमय मराठी रुपांतर म्हणजे ज्ञानेश्वरी होय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील सर्व ओव्या या गीतेतील श्लोकांवर आधारीत आहेत. महाराष्ट्रात राहुन कमीत कमी हे तरी आपणास माहीत असायलाच हवे, नाही का? पण या अज्ञानरुपी अंधकारमय जगात भगवदगीतेतील ज्ञानाचा प्रकाश मिळणे वाटते तितकेसे सोपे नाही. 

      स्वत: भगवान श्रीकृष्ण म्हणतात “मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिद्धये” (७, ३) सहस्त्रावधी मनुष्यांपैकी एखादाच या अंधकारातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तत्व जाणण्याचा प्रयत्न करतो आणि अशा हजारांमधुन एखादाच ते जाणण्यात यशस्वी होतो. म्हणजे यश मिळण्याचे प्रमाण फक्त ०.१% आहे. यावरुनच अंदाज येईल की हे भगवदगीता जाणुन घेणे हे साधेसुधे काम नव्हे. म्हणुनच की काय गीतेतील संभाषणाची सुरुवात एका अंध व्यक्तीच्या वाक्याने झालेली आहे. जर चुकुनमाकुन कधी गीता उघडलीच तर पहील्या अध्यायातील पहीलेच वाक्य आहे “धृतराष्ट्र उवाच”. भगवान श्रीकृष्ण नाही, धनुर्धर अर्जुन नाही तर थेट धृतराष्ट्राच्या वाक्याने सुरुवात आहे. गीतेच्या सुरुवातीलाच हा आंधळा धृतराष्ट्र काय करतोय? त्या कुरुक्षेत्रासारख्या पवित्र युद्धभुमीवर स्वत: भगवान श्रीकृष्ण, सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन, पितामह भीष्म, धर्मराज युधिष्ठीर आणि अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर स्थित रामभक्त हनुमान देखिल उपस्थित असताना गीतेची सुरुवात धॄतराष्ट्रासारख्या एका अंध व्यक्तीच्या संवादाने का व्हावी?. भगवान श्रीकृष्णांना हेच तर सांगावयाचे नसेल ना की जोपर्यंत तुम्ही गीतेचे ज्ञान घेत नाही तोपर्यंत तुम्ही डोळे असुनही अंध आहात आणि ईतर कितीही विषयांच्या कितीही पदव्या मिळवल्या तरीही अज्ञानीच आहात. हे सत्यही आहेच म्हणा.

           आपली अवस्था गीतेतील या अंध धृतराष्ट्रासारखीच आहे. गीतेते काय सांगितले आहे? मी या जगात का आलो? कुठुन आलो? कुठे जाणार? मनुष्यजन्माचा उद्देश्य काय आहे? आपल्याला काय करायला सांगितले आहे? या विषयांचा आपल्याला कसलाही गंध नाही. जेव्हा आपण एखादी वस्तु, उपकरण अथवा वाहन विकत घेतो तेव्हा तिच्याबरोबर एक माहीतीपुस्तक दिले जाते ज्यामध्ये ती वस्तु कशी वापरायची? कोणती काळजी घ्यायची? काय करावे? काय करु नये? काय केल्याने काय होईल याची ईत्यंभुत माहीती दिलेली असते. अगदी याचप्रमाणे मनुष्यजन्म मिळाल्यानंतर या जन्मात काय करावे? मनुष्यजन्माचा सदुपयोग कसा करुन घ्यावा? मनुष्यजन्माचा उद्देश्य काय आहे आणि तो उद्देश कसा साध्य करावा? याची सविस्तर माहीती श्रीमदभगवदगीतेत दिलेली आहे आणि सरतेशेवटी या दिलेल्या माहीतीच्या आधारावर एक प्रात्यक्षिक परीक्षा पण घेतली जाते. “अन्तकालेच मामेव स्मरेण्मुक्त्वा कलेवरम” अंतकाळी जो माझे स्मरण करतो तो या जन्ममृत्युच्या बंधनातुन तात्काळ मुक्त होतो. “याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा” संत तुकाराम महाराज हे जे काही म्हणतात ते याच परीक्षेविषयी, अट्टहास म्हणतात तो हाच. या परीक्षेच्या तयारीतच त्यांनी आयुष्य वेचले. एवढा अट्टहास केला की प्रत्यक्ष भगवंत हात जोडुन त्यांच्यासमोर ऊभे राहीले, सर्वांची परीक्षा घेणार्या त्या परीक्षकलाही त्या प्रामाणिक विद्यार्थ्याचे कौतुक करावेसे वाटले.



       अशी परीक्षा ज्यामध्ये तुम्ही उत्तम गुण मिळवुन उत्तीर्ण व्हावे असे परीक्षा घेणार्यलाच मनापासुन वाटत असते म्हणुन हा अभ्यासक्रम सोप्यात सोप्या पद्धतीत समजावुन सांगण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. आपण त्याच्याकडे एक पाऊल टाकले तर तो आपल्याकडे दहा पावले टाकतो. आपण दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा देतो तेव्हा कोणत्याही शिक्षकाला असे वाटत नसते की आपण नापास व्हावे. शक्यच नाही याउलट आपण जर उत्तम गुण मिळवले तर वर्षभर मेहनत घेणार्या शिक्षकांनाच जास्त आनंद होतो. पण हेच शिक्षक जेव्हा परीक्षा चालु असते त्या तीन तासांमध्ये आपल्याला कसलीही मदत करत नाहीत. तेव्हा आपण म्हणतो का की हे शिक्षका, एवढी अवघड प्रश्नपत्रिका आलेली असताना तु मला काहीच कशी मदत करत नाहीयेस? कुठे आहेस तु? माझ्या मदतीला का येत नाहीयेस? आप्तस्वकीय, कुटुंबीय तसेच गुरुजण या सर्वांना सुद्धा हेच वाटत असते की आपण उत्तम गुण मिळवावेत परंतु त्या तीन तासांच्या कालावधीमध्ये ते तुम्हाला कसलीही मदत करीत नाहीत आणि त्यांना ईच्छा असुनदेखिल ते करुच शकत नाही. परीक्षेचे नियमच तसे बनवलेले असतात. तुम्हाला कितपत, काय काय येतेय आणि तुम्ही किती मेहनत घेतली आहे हेच पहावयाचे असते. निकाल लागल्यानंतर तुमचे कौतुक करायला सर्वजण येतीलच पण परीक्षा ही तुमची तुम्हालाच द्यावयाची असते.

         हा मनुष्यजन्मही त्या परीक्षेच्या तीन तासांच्या कालावधीसारखा आहे. जे काही करायचे आहे ते करणारे आपणच असतो. आपण आपल्या मर्जीचे मालक असतो. ही परीक्षा असल्यामुळे तो भगवंतसुद्धा मदतीला येत नाही. त्यामुळे मला श्रीमंत का नाही केले? तु आहेस की नाही? आहेस तर मग माझ्या मदतीला का येत नाहीस असे आपण कितीही बेंबीच्या देठापासुन ओरडलो तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. आणि परमेश्वर भगवंत समोर येत नसल्याने माझा देवावर विश्वास नाहीये, मी देवाला मानत नाही असले विचारसुद्धा तुम्ही बाळगु शकता, तुमच्यावर कसलेही बंधन नाही. या परीक्षेमध्ये तुम्हाला पुर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे.

          तो अंध धृतराष्ट्र म्हणजे गीतेविषयी अज्ञान असणारे सर्व व्यक्ती असे मला वारंवार वाटते. एक असा अंध व्यक्ती ज्याने स्वत:च्या बुद्धीने कितीही प्रयत्न करुन पाहीले असते तरी त्याला युद्धभुमीवर काय चालले आहे याचे ज्ञान कधीही मिळाले नसते. युद्धभुमीवरील परीस्थितीचे ज्ञान मिळवण्यासाठी त्याला संजयवर अवलंबुन रहावे लागले ज्याच्याकडे दिव्यदृष्टी होती. अज्ञानाचा अंधकार दुर करण्यासाठी प्रत्येकाने असा एक तरी संजय शोधुन ठेवावा. गीतेचे ज्ञान हे स्वत: समजुन घेण्यापेक्षा दुसर्याकडुन समजावुन घेतल्यास जास्त उमजते. तुम्ही म्हणाल हे कसे काय ब्वा? पण हे एक अदभुत सत्य आहे. भगवदगीता समजावुन घ्यायची असेल तर “तद्विद्धि प्रणिपातेन परीप्रश्नेन सेवया, उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन:” (४, ३४) ज्यांनी हे तत्व जाणलेले आहे ते ज्ञानीच तुम्हाला हे तत्व समजावुन सांगु शकतात, त्यासाठी त्यांना नम्रपणे प्रणाम करुनच प्रश्न विचारावेत, त्यांची सेवा करावी. 

आत्मा की शरीर?

        जेव्हा मनुष्य मी शरीर नसुन आत्मा आहे या विचारसरणीवर येतो तेव्हाच तो भगवदगीतेचे ज्ञान मिळवण्यासाठी पात्र होतो “अहं ब्रम्हास्मि”. त्याला गीतारुपी ज्ञानाचा प्रकाश मिळायला तेव्हाच सुरुवात होऊ शकते. ज्याच्याकडे आत्मा आणि परमात्म्याचे ज्ञान नाही तो शिंगे आणि शेपुट नसलेला पशुच होय. “आहार निद्रा भय मैथुनं च, सामान्यमेतत पशुभिर्नराणाम” , “धर्मो हि तेषामधिको विशेष:, धर्मेण हीना: पशुभि: समाना:” खाणे, झोपणे, स्वत:चा बचाव करणे आणि संभोग करणे या क्रिया किड्यामुंगीपासुन ते आवाढव्य प्राण्यांपर्यंत सर्वांमध्ये समान आहेत. मनुष्यामध्येही त्या आहेतच परंतु याशिवायही मनुष्याला अजुन एक विशेष गोष्ट देण्यात आलेली आहे ती म्हणजे तो स्वत:ला जन्ममृत्युच्या चक्रामधुन मुक्त करवुन घेऊ शकतो. तर हे जन्ममृत्युचे फेरे काय प्रकरण आहे हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. मेल्यानंतर कुणी पाहीलंय? हा प्रश्नसुद्धा रास्तच आहे. आपण मातेच्या गर्भातही ९ महीने असतोच पण हे आपणाला आठवत नाही, पहा आठवतंय का? नाही ना, पण याचा अर्थ असा होत नाही की आपण मातेच्या गर्भात नव्हतो. आपल्या स्वत:च्या बुद्धीने एखादा अतिहुषार व्यक्ती याचा शोध लावायला गेला तर तो म्हणेल मला आठवत नाही याचा अर्थ मी नसेलच मातेच्या गर्भात. मानवाची बुद्धी ही अशी कुचकामी आहे. याबाबतीत सर्वजण त्याला वेड्यात काढतील एवढे मात्र नक्की. या कुचकामी बुद्धीवर विश्वास न ठेवता ज्यांनी तत्त्व जाणलेले आहे त्यांच्याकडुन ज्ञान प्राप्त करुन घ्यावे असे भगवंत सांगतात. 
     आत्मा आणि शरीर यांचा भेद कसा करावा? हा माझा हात आहे, हे माझे डोके आहे, हा माझा कान आहे असेच आपण नेहमी म्हणतो. बरोबर ना? परंतु मी कान आहे, मी हात आहे, मी डोके आहे असे आपण म्हणत नाही याचा अर्थ त्यांच्यापासुन आपण वेगळे आहोत. हे सर्व अवयव ज्याचे आहेत तो आत्मा शरीराच्या आत हृदयामध्ये स्थित असतो. सर्व शरीराला तिथुनच चैतन्य मिळत असते. आत्मा आणि शरीर दोन्ही वेगवेगळे आहेत. ज्याप्रमाणे कार आणि ती चालवणारा ड्रायव्हर हे एकमेकांपासुन वेगवेगळे असतात त्याचप्रमाणे शरीर आणि त्याला चालवणारा आत्मा हे एकमेकांपासुन वेगळे आहेत. कार पेट्रोलवर चालते तर ड्रायव्हरला अन्न लागते. शरीराचे खाद्य वेगळे (भात, भाजी-भाकरी) आणि भजन, किर्तन, ध्यान आणि नामस्मरण हे आत्म्याचे खाद्य होय. शांत, अध्यात्मिक ठिकाणी किंवा एखाद्या भव्य मंदिरामध्ये गेल्यानंतर जी आत्मशांती मिळते त्याचे कारण म्हणजे आपण आत्म्याला त्याचे खाद्य पुरवलेले असते. तो संतुष्ट होतो त्यामुळे आपणाला प्रसन्न वाटते.


       संपुर्ण भगवदगीतेते भगवंतांनी त्यांना कुठे पहावे? कसे शोधावे? त्यांना काय आवडते? आपण त्यांना कसे प्रिय होऊ? आणि जन्ममृत्युच्या चक्रातुन स्वत:ला कसे मुक्त करुन घ्यावे याविषयी सविस्तर माहीती दिलेली आहे. आणि खुप साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे. या जगाचे वर्णन करताना ते म्हणतात हे “दु:खालयम अश्वाश्वतम” आहे. म्हणजे दु:खाचे स्थान आहे आणि येथील प्रत्येक गोष्ट अश्वाश्वत म्हणजे नाशवंत आहे. हा मनुष्यदेह सुद्धा नाशवंत आहे. आणि आपण मात्र याच्या अगदी उलट वागण्याचा प्रयत्न करतो म्हणजे सुख शोधण्याचा प्रयत्न करतो आणि मला काहीही होणार नाही या भ्रमात राहतो. आपल्याकडील सर्व गोष्टी कायमस्वरुपी टिकाव्यात असेही आपल्याला वाटते. परंतु या जगातील सर्वकाही क्षणभंगुर आहे. जन्म, मृत्यु, जरा आणि व्याधी कोणालाही चुकलेले नाही.



     माझ्या निदर्शनास आलेली अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंतांनी या जगाची रचना पैसा व धनसंपत्तिच्या आधारावर बिल्कुल केलेली नाही. मृत्युरुपी संसारसागरातुन मुक्त होण्यासाठी तुम्हाला कुठेही धनाची आवश्यकता पडणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. सत्य बोलण्यासाठी पैसे लागत नाहीत याउलट खोटे बोलले तर अनेक ठिकाणी पैसे वाटावे लागु शकतात, चारीत्र्य जपण्यासाठी पैसे लागत नाहीत याउलट व्यभिचारासाठी धनाची आवश्यकता पडते. निर्धनातील निर्धन व्यक्तीही अहिंसेचे पालन करु शकतो याउलट हिंसा करण्यासाठी तुम्हाला शस्त्र विकत घ्यावे लागेल. एकादशी उपवास करण्यासाठी कसलाही खर्च येत नाही याउलट जेवढे जास्त उपाशी राहू तेवढे जास्त पुण्य मिळते. शाकाहारी आणि निर्व्यसनी राहण्यासाठी काहीही खर्च नाही याउलट व्यसने करायला प्रचंड धनाची आवश्यकता भासते. यागोष्टी तुम्ही पडताळुन पहा तुमच्या लगेच लक्षात येईल. त्यामुळे माझ्याकडे धन नव्हते म्हणुन मी आत्मसाक्षात्काराचा मार्ग स्विकारु शकलो नाही अशी सबब तुम्ही देऊ शकत नाही. आणि भगवंतांची भक्ती करायला सुद्धा काहीच खर्च नाही, भगवंत म्हणतात, “पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति“ (९, २६) मला पान, फुल, फळ आणि नुसते पाणी दिले तरीही मी त्याचा स्विकार करतो फक्त त्यात भक्तीभाव असावा. अगदीच सोन्याचे मुकुट आणि रत्नांचे हार देण्याची आवश्यकता नसते. 

कर्मबंधन
      या जगात सर्व गोष्टी समसमान आहेत. जेवढा अंधकार आहे तेवढा प्रकाशही आहे, जेवढे विष आहे तेवढेच अमृतही आहे, जेवढ्या समस्या आहेत तेवढे उपायही आहेत, जेवढा चांगुलपणा आहे तेवढा वाईटपणाही आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक कृतीला तेवढ्याच बलाची प्रतिकृतीही आहे. कर्मयोगानुसार आपण जी काही कर्मे करतो त्यांच्या बंधनात अडकत राहतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात कर्म करणे तुझा अधिकार आहे आणि प्रत्येक कर्माचे फळही तुला निश्चितच मिळणार आहे परंतु ते फळ कशा स्वरुपात मिळेल यावर तुझे काहीही नियंत्रण नाही. “देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर” या गाण्याच्या स्वरुपातील अभंगाच्या ओळी सर्वकाही सांगुन जातात. जन्म-मृत्युच्या फेर्यांतुन मुक्त होण्याऐवजी काही विवेकहीन मनुष्य स्वर्गप्राप्तीलाच परम प्राप्य गोष्ट समजतात. परंतु ज्याप्रमाणे एखादा मोठा जलाशय प्राप्त झाल्यानंतर छोटया जलाशयाचे जेवढे महत्व उरते तेवढेच महत्व या स्वर्गप्राप्तीला आहे.
भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पार्थ, मी आता तुला कर्माच्या बंधनातुन कसे मुक्त व्हायचे ते सांगतो...
क्रमश:


कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...