BRM200 कापुरहोळ - लोणावळा
BRM200 Kapurhol Lonavla ऑक्टोबर महीन्यात नविन सायकल घेतल्यापासुन मला बीआरएम मध्ये सहभागी होण्याची उत्सुकता लागली होती. कधी एकदा बीआरएम मध्ये उतरतोय असे वाटत होते. ऑडॅक्स क्लबचे नविन कॅलेंडर नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होते. नोव्हेंबर ते ऑक्टोबर असे एक वर्ष पकडले जाते आणि यासाठी वार्षिक सभासद फि ₹५०० असते. हे सभासदत्व घेतल्यानंतर भारतामध्ये जिथे जिथे बीआरएम आयोजित केल्या जातात तिथे जाऊन बीआरएम मध्ये सहभागी होता येते अर्थातच जी निर्धारित प्रवेश फि असेल ती भरावी लागते. पुणे रँदोनिअर्स क्लबची पहीली बीआरएम २२ नोव्हेंबरला होती, २०० कि. मी. अंतर १३.५ तासाच्या वेळेत पुर्ण करावयाचे होते. या १३.५ तासांमध्ये नाष्टा, जेवण, पंक्चर, ब्रेकडाउन, विश्रांती इ. साठी वेगळा वेळ दिला जात नाही. या सर्व गोष्टी सांभाळून २०० कि. मी. अंतर मनुष्यबळावर चालणाऱ्या वाहनाने १३.५ तासांच्या आत पुर्ण करावयाचे असते. बीआरएम म्हणजे शर्यत नव्हे. निर्धारित वेळेत २०० कि. मी. अंतर सायकल चालवणाऱ्या सर्वांना सारखेच मेडल दिले जाते. पहीला किंवा दुसरा येणाऱ्यास कोणतेही विशेष पारितोषिक दिले जात नाही. तरीसुद्धा कमीत कमी वेळेत हे ...