Friday 22 May 2015

दहावीच्या सुट्टीतील पेपरबॉय

दहावीच्या सुट्टीतील पेपरबॉय

हा फोटो माझा नाही, आंतरजालातून साभार . 

          दहावीची परीक्षा संपली. स्वकष्टावर पैसे मिळ्वण्यासाठी काहीतरी काम करायचे मी ठरवले होते. सकाळी तासभर पेपर वाटले की दिवसभर बाकीचे उद्योग करायला मी मोकळा. त्यामुळे दहावीच्या सुट्टीत मी पेपरबॉय व्हायचे ठरवले. सुनिल पवार हे आमच्या भागातील सर्वात जुने वृत्तपत्र व्यवसायिक. आमच्याकडे त्यांचाच पेपर यायचा. पेपर म्हणजे न्युजपेपर (वृत्तपत्र) असा अर्थ घ्यावा. अजुनही सगळे पेपर असेच म्हणतात. एका सकाळी मी सुनिल पवारांना विचारले, "तुमच्याकडे पेपर टाकायचे काम मिळेल का?" सुनिलभाऊने एकही दिवस वाया जाऊ न देता मला दुसऱ्या दिवसापासुन रूजु करून घेतले. धायरीफाटा, नऱ्हे, धायरी, नांदेड या सर्व भागात सुनिलभाऊचेच पेपर असायचे. तिघे भाऊ मिळुन पेपर टाकत होते. माझी अपेक्षा होती की मी जिथे राहतो त्याच भागातील पेपर टाकायचे काम मला मिळेल. पण तसे काही झाले नाही. मला नांदेडच्या लाईनवर टाकले. धायरीफाटा, लगडमळा, दळवीनगर आणि नांदेडगाव अशा लांब पल्ल्याच्या लाईनवर माझी रवानगी झाली. नंतर मला कळले की या लाईनवर पेपर टाकायला जाण्यावरुन वाद व्हायचे, खुप त्रासाची लाईन असल्यामुळे या लाईनवर जाण्यासाठी कोणीही तयार होत नसे. आणि मी झालो बळीचा बकरा. सगळे पेपर वाटण्याचे काम पुर्ण होईपर्यंत मी मेटाकुटीला आलेलो असायचो. एक जुनीच घेतलेली एटलस गोल्डलाईन सायकल आमच्याकडे होती. सायकलपेक्षा रणगाडा म्हणायला काहीच हरकत नव्हती. आता २०१५ साली माझ्याकडे ज्या प्रकारच्या सायकल्स आहेत तशा प्रकारच्या जर १९९१ साली माझ्याकडे असत्या तर अख्ख्या सिंह्गड रोडचे पेपर मी एकटयानेच टाकले असते.

२२ मे १९९१

            त्यादिवशी सकाळी सायकल घेऊन पेपर टाकण्यासाठी निघायला थोडा उशिरच झाला होता. एव्हाना सुनिल पवार पेपरचा गठ्ठा लावुन माझी वाट पाहत बसलेला असणार. पेपर बांधायची सुतळी घेतली आणि गोकुळनगरच्या उतारावरून सायकलला टांग मारून सुसाट निघालो. कोपऱ्यावरचे कुलकर्णीकाका राजीव गांधींबद्दल काहीतरी बोलत होते हे सुसाट असुनदेखील माझ्या कानावर पडले होते. मला त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. पण मला एक जाणवलं की रोज मला या काकांची पुसटशी जाणीवही होत नाही, ते आपले पाणी तापवणे, झाडांना पाणी घालणे या कामांमध्ये मग्न असत. परंतु आज ते विस्मयकारकपणे कसलीतरी चर्चा करत होते. माझी सुसाटलेली सायकल धायरीफाटयावरील चव्हाणांच्या चाळीसमोर सुनिल पवार शेजारी येऊन थांबली. १५० पेपर माझी वाटच पाहत होते. त्यात ११८ सकाळ असायचे. लोकसत्ता, प्रभात, केसरी, Herald, Indian express त्यामानाने नगण्य, सर्व मिळुन ३२ होते. रोज १५० पेपर टाकण्याचे मला महीन्याला १५० रूपये मिळणार होते. पेपरचा गठ्ठा सायकलच्या हँडलला  बांधायला १० सेकंद पुरेसे होते. पेपर बांधल्या बांधल्या मुख्य बातमीवर माझी नजर गेली. रोजच्या ठळक बातम्यांपेक्षाही ही बातमी दुपटीने मोठी छापलेली होती.

"माजी पंतप्रधान राजीव गांधी बॉम्बस्फोटात मृत्युमुखी"

        राजकारणाशी काही देणं घेणं नसलं तरी राजीव गांधी मला फार आवडायचे. त्यांचं "हमें ये देखना है की.." हे प्रत्येक भाषणातील आत्मविश्वासपुर्ण वाक्य मला फार आवडत असे. कधी कधी मी त्या वाक्याची नक्कल सुद्धा करुन दाखवत असे. आज माहीती तंत्रज्ञान क्षेत्र आणि दुरसंचार क्षेत्राने घेतलेली झेप पाहीली की त्यांच्या विशाल दृष्टिकोनाची जाणीव होते. ती बातमी वाचुन मी खुप हळहळलो. पण नुसती हळहळ करुन काही उपयोग नव्हता. १५० पेपर माझी वाट पाहत होते. सायकलला शक्य तितक्या जोर देऊन टांग मारली आणि मी धायरीफाटयाच्या चौकातुन त्रिमुर्ती हॉस्पिटल कडे झेपावलो.

       आम्रपाली अपार्टमेंटमधुन मी पेपर टाकायला सुरुवात करत असे. आम्रपाली अपार्टमेंट म्हणजे वडगांव बुद्रूकच्या हद्दीतील धायरी फाटा परीसरातील पहीली फ्लॅट संस्कृती. आम्रपालीमध्ये दोन सकाळ होते. तळमजल्याचे बुलेटवाले तांबोळी आणि तिसऱ्या मजल्यावरचे येशाल. येशालांची कन्या आठवीपर्यंत माझ्याच वर्गात होती पण पेपर टाकायला गेल्यावर ती कधीही मला दिसली नाही. वेगात घेतलेली सायकल कच्चकन ब्रेक दाबुन थांबवायचो,  डावा पाय टेकवायचा आणि उजवा पाय खाली आणताना स्टँडच्या बोकांडी ठेवुनच खाली आणायचा आणि सायकल सोडुन दयायची. सायकल स्टँडवर उभी राहणारच हा आत्मविश्वास असायचा. हॅंडलवरचे हात सोडुन गठ्ठयातले दोन सकाळ ओढायचो आणि पायऱ्यांकडे पळत सुटायचो. ही कृती मी दिवसातुन १०० वेळा करायचो त्यामुळे एवढा हातखंडा झाला होता की मी झोपेतसुद्धा सहजपणे ही कृती करू शकेल असं मला वाटत होत. 

        आम्रपालीचे दोन सकाळ टाकुन मला पुन्हा सिंहगड रोडवर यावे लागत असे. पेपर टाकण्याच्या कामात निवांतपणा हा प्रकार औषधालाही नसतो. मी पॅडलवर उभा राहुन झपाटयाने अंतर कापण्याचा प्रयत्न करत होतो. "ये.. एक पेपर दे रे..." माझ्या रोखानेच येणाऱ्या माणसाने दोन रुपयांची नोट नाचवत मला खुणावले. एखादा पेपर रोखीने विकला गेला की त्या दिवशीचा चहा आणि क्रिमरोलची सोय व्हायची. त्यामुळे आनंदाच्या भरात मीही ब्रेक दाबला. डाव्या हाताने दोनची नोट घेतली आणि उजव्या हाताने सायकलला लावलेल्या गठ्ठ्यातील एक सकाळ उपसुन दिला. पेपर हातात पडल्या पडल्या तो माणुस पेपरात असा काही घुसला की त्याला वरचे पन्नास पैसे परत घेण्याची शुद्ध राहीली नाही. पेपरचे दोन रूपये देऊन गेला. माझी चांदीच झाली. पॅडलवर जोर देऊन निघालोच होतो तेवढयात अजुन दोघांनी पेपर विकत घेण्यासाठी मला थांबवले. माझ्याकडे दोन ते तीनच पेपर जास्तीचे असायचे. बस्स! ज्यादाचे विकुन झाले होते. आता सायकलला जेवढे पेपर उरलेले होते ते सर्व रोजच्या ठरलेल्या ग्राहकांचे होते. आता मी एक जरी पेपर विकला असता तर एखादया ग्राहकाचा नक्कीच खाडा होणार होता. आता उरलेल्या पेपरमधील एकही पेपर विकायचा नाही असे मी ठरवले.

        तरीपण एक जण जबरदस्तीने पेपर घेण्यासाठी आलाच, हे पेपर विकण्यासाठी नाहीयेत म्हटल्यावर, पेपर दिल्याशिवाय सायकल सोडणार नाही म्हणून सायकलच्या पुढेच येऊन थांबला. मला काय करावे सुचेना. ढगांनी वेढलेल्या काळोखात लख्ख उजेड देणारी वीज चमकुन जावी तशी एक नामी युक्ती मला सुचली. मी त्याला म्हणालो आजचा पेपर पाच रूपयांना आहे. माझ्यासाठी पाच रुपयांची किंमत खुप होती. पाच रूपये किंमत ऐकुन तो पेपर घेणार नाही याची मला खात्री होती कारण चार आणे आठ आणेसाठी घासाघीस करणारी मंडळी मला रोज भेटायची हे माझ्यासाठी नित्याचंच होतं. त्याने खिशातुन पाचचा ठोकळा काढुन माझ्या हातावर ठेवला आणि स्वताच सायकलचा पेपर ओढुन घेतला. माझ्या नामी युक्तीच्या चिंधडया उडाल्या होत्या. मागितलेली किंमत चुकती केल्यावर त्याला नाही म्हणणे मला शक्य झाले नाही. मी पुरता गोंधळुन गेलो होतो. त्या माणसाला पेपर विकल्यामुळे माझा एक पेपर कमी झालेला होता आणि त्यामुळे मी त्या दिवशी कोणालातरी एकाला पेपर देऊ शकणार नवह्तो. आज कोणाचा पेपर चुकवावा या विचारचक्रात मी अडकलो होतो. पेपर चुकवल्त्यायावर काय होईल याची कल्पना मी करु लागलो. त्या खडुस आजोबांना तर पहीला पेपर लागतो, त्यांचा खाडा केला तर दुसऱ्या दिवशी माझी खैर नाही, तो टेम्पोवाला तर माझ्या सायकलची वाटत पाहत बसलेला असतो पारावर, त्या कोपऱ्यावरच्या आज्जींना बिलाचे पैसे ऊशिरा देण्यासाठी निमित्तच लागते. आणि आज तर विशेष बातमी असलेला पेपर, आज मी ज्याचा पेपर चुकवणार तो मला उदया कच्चा खाल्ल्याशिवाय सोडणार नाही. 

        एव्हाना रेडीओवरील बातम्या ऐकल्यानंतर लोक पेपरवाल्याला शोधत रस्त्यावर आले होते. प्रत्येकाला पेपर हवाच होता. पाच रूपये देऊन सगळेजण पेपर विकत घेत होते. काहींनी गर्दीचा फायदा घेऊन पैसे न देताच पेपर घेऊन पसार झाले. पेपर घेण्यासाठी एवढी झुंबड उडाली होती की कोणी पैसे दिले? आणि कोणी पेपर घेतला? मला काहीच कळत नव्हते. प्रामाणिक लोकांनी पाच रुपये दिल्यानंतरच माझ्याकडुन पेपर घेतला होता. क्षणार्धात माझ्या सायकलच्या हँडलला लावलेले सगळे पेपर संपले होते आणि माझे दोन्ही खिसे पैशाने भरले होते. एवढे पैसे खिशात असण्याची मला बिल्कुल सवय नव्हती. एक वेगळाच अनुभव मी अनुभवत होतो. रोज फक्त एक चहा आणि एकच क्रिमरोल खाणारा मी त्यादिवशी नो लिमीटमध्ये गेलो होतो, पोटभर नाष्टा केला. रोज दिड तास सायकल पिदडल्यानंतर उरकणारे माझे काम आज अवघ्या दहा मिनीटात संपले होते. त्या दिवशी नंतर सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवुन राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला होता. माझ्यासाठी आजचा दिवस मार्गी लागला होता. पण उदयाचे काय? ज्या ग्राहकांना मी आज पेपर दिले नाहीत त्यांना मला उदया जाब दयावा लागणार होता. 

          मी कधीतरी पुण्यातील प्रेसवर सुनिलभाऊबरोबर पेपर आणायला जात असे. त्यावेळी कोणीही पेपर विकत घेऊन पेपर विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकत असे, आजच्या सारखी वृत्तपत्रविक्रेता युनियनची परवानगी वगैरे काढण्याचे सोपस्कर करावे लागत नसत. खरंतर वृत्तपत्रविक्रेता संघटना तेव्हा अस्तित्वातच नव्हती. पेपरच्या घाऊक खरेदीला निघताना पहाटे चार वाजता घर सोडावे लागत असे तेही सायकलवर. पहाटेच्या त्यावेळेस रस्त्यावर फक्त तरकारीवाले आणि पेपरवालेच दिसायचे आणि अजुनही दिसतात. शनिवारवाडयाच्या मागच्या बाजुस असलेल्या सकाळ प्रेसपासुन आम्ही सुरूवात करायचो. तिथे पेपर विकत घेताना ते चारच्या पटीत घ्यावे लागत असत. ४०...४४...४८...याप्रमाणे. पेपर मोजुन देणाऱ्याचा पेपर मोजुन देण्याचा स्पीड एवढा जबरदस्त होता की मी ते पाहुन अवाक व्हायचो. पैसे जमा झाले कि कॅशियर मोठयाने आकडा सांगत असे, कॅशियरकडुन आकडा ऐकण्याचा अवकाश की क्षणार्धात तेवढे पेपर काढुन मोकळा व्हायचा. चार-चार च्या ग्रूपमध्ये पेपर तिरके नोटांसारखे दुमडुन मोजणी व्हायची. ८० मागितले की चारचारचे २० मोजुन मोकळा. सगळेच घाईत असायचे. पेपरवाल्यांना रिकाम्या गप्पा मारताना मी कधीही पाहीले नाही विशेषकरुन जेव्हा पेपर खरेदी चालु असायची. त्यावेळेस प्रत्येक पेपर घेण्यासाठी त्या त्या प्रेसमध्ये जावे लागत असे. केसरीवाड्यातुन केसरी घेतल्यानंतर मुंबईहुन गाडीने येणारे लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस घेण्यासाठी आम्ही अब चौकात थांबायचो. मुंबईवरून येणाऱ्या  गाडीला जर उशिर झालाच तर आम्हालाही पुढील कामे आटोपण्यास तेवढाच उशिर व्हायचा. एका बोळातील वाड्यातील दुकानात साप्ताहिके आणि पाक्षिके मिळायची. साप्ताहिकांमध्येही सकाळचीच जास्त चलती होती. सध्या पेपर घेण्यासाठी कोणत्याही प्रेसवर जावे लागत नाही, विक्रेत्यांना त्या त्या विभागामध्ये प्रेसमार्फतच पेपर पुरवले जातात. हि पहाटेची  पेपर खरेदी उरकुन आम्हाला धायरी फाटयावर यायला साडे सहा व्हायचे. घडयाळ नव्हतेच माझ्याकडे, "किती वाजले ओ?" असं कोणालातरी विचारलं की झालं. जेव्हा आपल्याकडे घडयाळ नसते तेव्हा साऱ्या दुनियेतील घडयाळे आपल्यासाठीच असतात. 

२३ मे १९९१.

         आज माझी अग्नीपरीक्षा होती. काल माजी पंतप्रधान बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडल्याची बातमी वाचायला न मिळालेल्या प्रक्षुब्ध ग्राहकांचा आज मला सामना करायचा होता. नेहमीप्रमाणे दिडशे पेपरला गाठ मारून आम्रपालीच्या दिशेने निघालो. आम्रपाली, धायरीफाटा आणि लगडमळा उरकला, आज पेपर घेण्यासाठी कोणीही आडवे आले नाही. आता मी दळवीनगरकडे जाणार होतो. पण त्याआधी एका आजोबांचा सकाळ मला टाकायचा होता. लगडमळ्याच्या पुढे उजव्या हाताला आत त्यांचं घर होतं. पेपरची घडी चुकलेली असेल तरी मला त्यांचा ओरडा खायला लागायचा. काल तर चक्क त्यांचा पेपर बुडवला होता मी. त्या घराकडे जातानाच मला खात्री व्हायला लागली की आज काहीतरी पंगा होणार आहे. २०-३० मीटर अलिकडेच मी सायकल थांबवली, आणि दबक्या पावलांनी जाऊन कंपाऊंडच्या आत अलगद पेपर सोडला आणि माघारी फिरलो. तेवढयातही आजोबांनी कानोसा घेतला आणि माझ्यावर ओरडतच आले, "ये पेपरवाल्या, थांब पळतोस कुठे?" तुझ्या सायकलची मी वाट पाहत बसलोय, तुझी सायकल कुठे आहे? म्हणजे हे माझ्या पाळतीवरच बसले होते हे नक्कीच. सायकलचा आवाज येऊ नये म्हणुन तर मी सायकल लांब लावुन आलो होतो. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आजोबा माझ्यावर फणफणायला लागले. "काल मला पेपर का दिला नाही?" "हे तुमचे नेहमीचेच आहे, जेव्हा गरज असेल तेव्हा कधीच पेपर देत नाही तुम्ही लोक" काय बोलावे मला काही सुचत नव्हते. शेवटी घडलेला प्रकार सांगुन टाकावा असं मी ठरवले. मी काल सायकलला पेपर बांधुन निघालोच होतो पेपर वाटायला परंतु रस्त्यात असंख्य लोक जमा झाले होते. त्यांनी मला अडवले आणि पेपर मागु लागले, मी नाही म्हणत होतो तरीसुद्धा त्यांच्या हाताला लागलेले सगळे पेपर घेऊन ते पसार झाले. कसाबसा त्यांच्या तावडीतुन मी वाचलो, आजसुद्धा पेपर घेऊन यायला मला भिती वाटत होती. पाच रूपयांना पेपर विकला हे मी त्यांच्यापासुन जाणीवपुर्वक लपवले. नाहीतर माझी खैर नव्हती. मी बाईज्जत बरी झालो. पुढे सगळ्यांना हेच कारण सांगितले, कोणीही काहीही कुरकुर केली नाही. 


       पेपरबॉय असताना बरीच कौशल्ये मी आत्मसात केली होती. बॉक्स फोल्ड करुन दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत सायकलवरून न उतरता पेपर फेकणे. हा माझा आवडता उद्योग पण संधी फार कमी मिळायची, एकाच ठिकाणी असा पेपर टाकायला मिळायचा. नंतर यातले बरेच बारकावे शिकलो. अकरावी चालु झाल्यावर मात्र मला यातुन रजा घ्यावी लागली. दुर्दैवाने त्यावेळेसचे एकही छायाचित्र माझ्याकडे नाही.

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...