Thursday 17 November 2016

Krishna Confluence 200 Brevet

Krishna Confluence 200
सुसाट २०० किमी.
१३ नोव्हेंबर २०१६, पुणे रँदोनियर्सची २०० किमी ची ब्रेवेट. मे महिन्यातील नाईट बीआरएम नंतर मी एकही ब्रेवेट केलेली नव्हती. जवळजवळ ६ महीन्याच्या प्रदीर्घ विलंबानंतर मी २०० किमी सायकल चालवणार होतो.
नविन कँलेंडर वर्षात जाताना मी सायकलसाठी नविन टायर ट्युब खरेदी केले. दिवाळीची अनावश्यक खरेदी टाळुन ते पैसे टायरमध्ये गुंतवले. मला हवे ते टायर्स मिळवुन देण्यासाठी रावेत येथील पेडल टाऊन सायकलिंगचे अभिजीत लोंढे यांनी खुप मदत केली. टायरची समस्या सोडवल्यानंतर मी वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी आहारात नियमितपणा आणुन ७ किलो चरबी उतरवली परत कोणी म्हणायला नको लई चरबी आलीये का? हाहाहा... नियमित सायकल चालवत राहिल्यामुळे वजन कमी होण्यास खुपच मदत झाली. आणि अनुभवी सायकलपटुंकडुन ज्या टिप्स मिळत गेल्या त्यांची व्यवस्थितपणे अंमलबजावणी करत राहीलो. या सर्व गोष्टींमुळे माझ्या सायकल चालवण्याच्या वेगामध्ये चांगलीच सुधारणा झाली.
१३ नोव्हेंबरला ब्रेवेटच्या दिवशी भल्या पहाटे उठलो. यादीप्रमाणे सर्व साहीत्य बरोबर घेतले आणि वेळेत पुणे विद्यापीठ गाठले. योगेश शिंदे, संजय जोशी, संजय करंदीकर आणि फरहद हे ब्रेवेटचा स्टार्ट पॉइंट कौशल्यपुर्वक हाताळत होते. त्यांचे कौशल्य आणि अनुभवामुळे सायकलची तपासणी होऊन शून्य मिनिटात ब्रेवेट कार्ड हातात पडले. सर्व रँदोनियर्स मित्रांच्या गाठीभेटी झाल्या. गप्पाटप्पा आणि विनोद करत आम्ही फ्लॅग ऑफची वाट पाहत थांबलो. पिंकॅथॉनमुळे पाषाणमार्गे न जाता नळस्टॉप, पौडफाटा आणि चांदणी चौकात येऊन एनएच४ वर जाण्याच्या सूचना फरहदने सर्वांना दिल्या. या ब्रेवेट मध्ये प्रशांत तिडके सुध्दा सहभागी होते. त्यांचे स्ट्रावा सेगमेंटचे टायमिंग पाहुन मी त्यांना बुलेट ट्रेन म्हणतो. त्यांच्या सायकलला रामाच्या बाणाचा वेग आहे. तसेच महीला विजेत्या अंजली भालिंगे सुद्धा या ब्रेवेटमध्ये सहभागी झाल्या होत्या. हे सायकलपटु असे आहेत की जे फक्त स्टार्टींग पॉइंटलाच दिसतात, त्यानंतर गगनात लुप्त होणाऱ्या हंसांप्रमाणे ब्रेवेटमध्ये कुठे लुप्त होऊन जातात ते कळतही नाही आणि नंतर कोणाला ते दिसतही नाहीत.
बरोबर ६ वाजता फ्लॅग ऑफ झाला. इतर कसलाही विचार न करता पॅडलवर जोर देऊन मी गणेशखिंड रोडच्या दिशेने निघालो. चतुश्रृंगीचे सायकलवरूनच दर्शन घेतले. एक हात कपाळाकडे नेऊन पुन्हा हृदयाकडे नेला आणि ओठांनी त्याच हाताचे चुंबन घेतले. सिम्बायोसिसचा क्लाइंब उगीच भाव खाऊन गेला. त्यानंतर नळस्टॉपकडे जाताना मस्त उतारावरून सायकल सोडुन दिली. पौडफाट्याच्या पुलावरून चांदणी चौकाकडे वळालो. तेव्हा प्रशांत सर आणि ड्वेन परेरा यांनी मला मागे टाकले. पौड फाट्याहुन चांदणी चौकाकडे जायचे खुप जीवावर आले होते पण इलाज नव्हता. खरंतर कर्वे रोडने सरळ वारजे चौकात जाऊन हायवेवर जायला मिळाले असते तर मज्जा आली असती. चांदणी चौकात जाऊन युटर्न घेतल्यावर खुप बरे वाटले. तिथुन पुढे सायकल प्रवास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर सुरू झाला. परीक्षेत अभ्यासक्रमा बाहेरील प्रश्न आल्यावर विद्यार्थी जसे हवालदील होतात तसा या अचानक बदललेल्या मार्गामुळे मीही हवालदील झालो होतो. चांदणी चौकापासून सूरू झालेल्या उताराने चांगलीच हवा दिली. उतारावर मिळणार्‍या वेगामुळे थंडीचा बोचरेपणा चांगलाच जाणवायला लागला होता. सूर्याची किरणे लाजत लाजत, येऊ की नको करत करत हळुहळु रस्त्यावरील डांबराचा काळोख दुर करू लागली होती. मी नेहमीपेक्षा सुसाट होतो. वारजे चौक मागे टाकुन वडगाव पुलाकडे निघालो. मुठा नदीने हवेत निर्माण केलेला गारवा चांगलाच झोंबला. आणि तो लांबलचक वडगावचा पुल सायकलवर जाताना कधी एकदा संपतोय असे वाटत होते. नवले ब्रीजवरून नविन कात्रज बोगद्याकडे वळालो. जांभुळवाडी तलाव अजुनही झोपेतच असल्यासारखा वाटत होता. दरीपुलाच्या पुढे गेल्यावर मी एका एमटीबीला ओव्हरटेक केली. त्याने माझा ८७ नंबर पाहीला आणि विजय म्हणून आवाज दिला. माझे नाव ऐकल्यावर मी आश्चर्याने मागे पाहीले आणि सायकल हळु केली. निरखुन पाहीले तर चेहरा ओळखीचा वाटत नव्हता. मग तोच म्हणाला तुम्ही मला ओळखत नाही पण मी तुमचे ब्लॉग वाचतो, छान लिहता तुम्ही. मी खुप खुप धन्यवाद म्हणालो. असा अभिप्राय मिळाला ना लिहल्याचे समाधान मिळते. त्याने दिलेल्या ब्रेवेटसाठीच्या शुभेच्छा घेऊन मी त्याचा निरोप घेतला. यादरम्यान ब्रेवेटमधलाच एक रायडर माझ्या बरोबरीने सायकल चालवत होता आणि सतत माझ्या पुढे राहण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी मला बोगद्यात त्याने ओव्हरटेक केलीच. बोगद्यातले वातावरण अतिशय दमट होते एवढे दमट की कोकणातल्या एखाद्या बीचवर सायकल चालवतोय की काय असे वाटत होते. बोगद्यातुन बाहेर पडल्यावर थंड हवेचा सुखद स्पर्श मिळाल्यावर खुप बरे वाटले. कोकणातून घाटमाथ्यावर आल्यावर जसे वाटते अगदी तसे वाटले.
कात्रज बोगदा सोडल्यावर निरा नदीपर्यंत मस्त उताराचा रस्ता आहे. उतार फार नाही परंतु सायकल चांगला वेग पकडते. आता मी सुसाट निघणार होतो. मी टॉप गियर्सच्या सहाय्याने स्पीड वाढवायला सुरूवात केली. तेवढ्यात रस्त्यालगत फुस्सस्स असा आवाज आला. गवतात फुरशा साप वगैरे आला की काय? असे मला वाटले. थोडेच अंतर गेल्यावर रिम रस्त्यावर घासण्याचा आवाज यायला लागला, मी कचकन ब्रेक दाबुन थांबलो. बघतोय तर काय मागच्या चाकात एक स्क्रू आरपार घुसला होता. आपण भिंतीमध्ये ड्रील पाडुन जसा स्क्रू बसवतो अगदी तसा बरोबर टायरच्या मधोमध आरपार घुसला होता. माझ्या पायाखालची जमिनच सरकली. मी अवाक होऊन त्या स्क्रूकडे पाहत होतो. काय करावे काहीच सुचत नव्हते. पण यातुन मार्ग तर काढावाच लागणार होता. विजय नाव असले की प्रत्येक पथ हा अग्नीपथ बनुनच समोर येतो की काय अशी शंका मला यायला लागली. पंक्चर झालेली सायकल घेऊन मी जुन्या रस्त्यावर गेलो. तिथे पंक्चरचे दुकान होते. ते अजुन उघडलेले नव्हते. त्याठिकाणी चाक खोलले. पंक्चरच्या दुकानासमोरच पंक्चर काढण्याचा माहौल तयार केला. अतिशय जड अंतःकरणाने मागचे चाक उघडले. तो स्क्रू ट्युबमधुनसुदधा आरपार गेला होता. त्यामुळे ट्युबला दोन छिद्रे पडली. आणि टायरला ३ मिमी चे भोक पडले. ती अवस्था पाहुन मला माझा गाशा गुंडाळावा लागणार असे वाटायला लागले. पंक्चरमुळे पुन्हा एकदा मोठ्ठा DNF (did not finish) मिळण्याची शक्यता बळावली. पण सहज हार मानेल तो विजय कसला. बचेंगे तो और भी लढेंगे. मी तो स्क्रू काढण्याचा प्रयत्न करू लागलो. स्क्रू निघायचे तर लांब तो जागचा हलायला सुद्धा तयार नव्हता. मल्टीटुलमधील स्क्रू ड्रायव्हरने उलटा फिरवुन काढण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा हलेना. टायरला वेल्डींग केल्यासारखा तो घट्ट चिकटला होता. काय करावे काही सुचत नव्हते. शेवटी तो स्क्रू दातांमध्ये घट्ट पकडुन दोन्ही हाताने टायर ताकदीने जोरात ढकलला तेव्हा कुठे त्याची मगरमिठी निसटली. टायरला पडलेल्या भोकातुन मी सूर्यनारायणाचे दर्शन घेतले एवढे मोठे भोक पडले होते. स्क्रू काढण्यातच २० मिनिटे गेली. हा टायर पुढील प्रवासात साथ देईल की नाही याबाबत मी साशंक होतो. माझ्याकडे दोन ट्युब्ज होत्या एक जुनी एक नवी. पंक्चर होणारच म्हणून मी त्या टायरमध्ये जुनीच ट्युब बसवली. नविन ट्यूब शाबूत रहावी हा उद्देश. त्या मोठ्या छिद्रावर पंक्चरचे स्टीकर आतुन चिकटवले. १३०पीएसआय हवा भरली आणि सामानाची आवराआवर करायला लागलो. तेवढ्यात प्रशांत जोगने मला पाहीलेच. विजय आणि पंक्चर हे न सुटणारं समीकरण आहे. पंक्चर झाली म्हटल्यावर दोघेही मनसोक्त हसलो. चल पुढे आलोच त्याला म्हणालो. सर्व साहीत्य पुन्हा बॅगेत भरले आणि एनएच४ वर सायकल घेऊन आलो. आता पंक्चर झाली तर मिळेल त्या ट्रकमध्ये सायकल टाकुन घरचा रस्ता धरायचा असे ठरवुनच मी सायकलला टांग मारली.
"देखना है जोर कितना बाजुयें कातिलमें है..." हे गाणं गुणगुणत होतो. बाजुयें कातिलमें पेक्षा टायरे कातिलमें म्हणलेलं जास्त शोभलं असतं. गाणं गुणगुणत असताना मी सायकलचा वेग सुसाट केला होता. वेळू-शिवापुर पर्यंत सर्व उताराचा रस्ता आहे. तिथे पुलाचे काम सुरू असल्यामुळे भिकारड्या सर्व्हिस रोडवरून जावे लागले. तोलनाक्याच्या पुढच्या रोडची अवस्थाही दयनीय झालेली आहे. एकतर माझ्या टायरची अवस्था काचेच्या भांड्यासारखी झालेली होती आणि त्यात तो दळभद्री सर्व्हीस रोड मला दगडाच्या खाणीसारखा भासत होता. आता यातुन काचेचे भांडे कसे वाचणार? चाचपडत कसाबसा हळूहळू त्या भिकारड्या पॅचमधुन सायकल चालवत गेलो. शिवापुर, शिवरे, वरवे, नसरापुर, कामथडी याठिकाणी उडत्या पुलाची कामे सुरू आहेत. कापुरहोळचा पुल तेवढा मार्गी लागलेला आहे. केंजळगांव मागे टाकत मी निरा नदी ओलांडली. चांगला रस्ता आला की माझा उत्साह द्विगुणित होत असे. टायरच्या सुरक्षेसाठी रामनामाचा जप सतत सुरूच होता. शिरवळच्या पुढे आल्यावर मला एक ब्रेवेट कार्ड रस्त्यात पडलेले दिसले. आपल्याच कोणाचे तरी असेल म्हणून मी थांबलो आणि उचलुन घेतले तर त्यावर भार्गव आर्य नाव होते आणि तोदेखील हेच ब्रेवेट करत होता. जर्सीच्या मागच्या खिशात त्याचे कार्ड ठेवून मी पुन्हा सुसाट निघालो. पारगाव खंडाळ्याच्या पुलावर मला भार्गव दिसला. त्याच्या नेमप्लेटवरून मी त्याला ओळखले. त्याचे ब्रेवेट कार्ड त्याच्या स्वाधीन केले तेव्हा तो खुप थँक्यु थँक्यु म्हणाला. त्याने ब्रेवेट पुर्ण केली की नाही ते मला कळु शकले नाही.
हळूहळू खंबाटकी घाट जवळ येत चालला होता. मला आता खंबाटकी घाटाचे भय वाटत नाही. ब्रेवेट करताना एवढ्या वेळा याच्या अंगाखांद्यावर खेळलोय की त्याचे प्रत्येक वळण आणि त्याच्या छोट्या-मोठ्या चढांची तीव्रता तोंडपाठ झालेली आहे. आणि बरेचसे काम पुर्ण झालेले असल्यामुळे घाटात गर्दी जाणवली नाही. खंबाटकी लिलया पार केल्यानंतर कुठे थांबण्याचा प्रश्नच नव्हता. सुसाट वेग कायम ठेवत मी साताऱ्याच्या दिशेने आगेकूच करत राहीलो. भुईंज तसेच पाचवड याठिकाणच्या पुलांच्या कामाची प्रगती अजुनही मंदगतीने सुरू आहे. एनएच४ वरील सर्व पुलांची कामे पुर्ण होऊन जेव्हा सायकल घेऊन सर्व्हीस रोडवर जावे लागणार नाही तो दिवस सर्व रँदोनियर्ससाठी अहोभाग्याचा दिवस ठरेल. कधी तो दिवस उगवेल कोण जाणे? साताऱ्याच्या अलीकडील तोलनाक्याच्या जवळ जात असताना मला एका रोडबाईकने ओव्हरटेक केली. पुढे चढ दिसत होता. इथेच कुठेतरी योगेश शिंदेंनी चेकपॉइंट मांडला असावा असे वाटत होते. आणि तेवढ्यात सिमॉरची गाडी दिसली. चेकपॉइंटची जागा मस्त निवडली होती. १०ः४५ ला रिपोर्ट केला तेव्हा खुप उशिर झाल्यासारखे वाटले. पंक्चर झाली नसती तर मी १०ः१५ ला नक्कीच पोचलो असतो. मागच्या वर्षी याच चेकपॉइंटला मी ११ः५० ला आलो होतो (पंक्चर नसताना) त्यामानाने प्रगती चांगलीच म्हणावी लागेल. पाणी, केळी आणि बिस्कीटांचा आस्वाद घेतला. हृदयाचे ठोके संथ झाल्यावर मी लगेच माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. साधारण ११ वाजता मी चेकपॉइंट सोडला असेल.
परतीच्या प्रवासात माझी सुसाटता मी अजुन तीव्र केली. अधुन मधुन पाण्याचे घोट घशाखाली उतरवणे चालुच होते. पोटात थोडी जरी रिकामी जागा झाल्यासारखे वाटले तर मी लगेच ड्रायफ्रूटचा लाडु खायचो. मग पुन्हा ताजेतवाने वाटायचे. संपुर्ण प्रवासात मी ६ लाडु खाल्ले. माझ्या पुढे गेलेल्या सायकलपटुंना एकेक करून मी मागे टाकत होतो. खंबाटकी केव्हा आला कळलेच नाही. खंबाटकीच्या उताराने अलगद शिरवळमध्ये आणुन सोडले. शिरवळ आणि त्यापुढची निरा नदी ओलांडली आणि पुणे जिल्हा सुरू झाला. एक मानसिक आधार येतो की आपल्या पुण्यात आलो बाबा. कापुरहोळ, नसरापुर मागे टाकल्यावर ब्रेवेट संपत आल्यासारखे वाटायला लागले. कारण या रस्त्यावर मी बराच सराव केलेला आहे. तोलनाका आला तेव्हा प्रचंड तहान लागली होती. सिपरमधले पाणीसुद्धा संपले होते. साध्या बाटलीतले पाणी सिपरमध्ये घेण्यासाठी १ मिनिट वाया घालवला. सॅकमधला हायड्रापॅकसुद्धा रिकामा झाला होता. शिवापुरमध्ये पुलाच्या कामाने खुप तमाशा करून ठेवला आहे. सर्व्हीस रोडवरून जाताना दुचाकी तसेच चारचाकीसुद्धा राँग साईडने येतात आणि अशा रूबाबात येतात की जणुकाही आपणच राँग साईडने चाललोय असं आपल्याला वाटायला लागतं. तिथुन पुढे आता ससेवाडीचा चढ हा एकमेव अडसर शिल्लक राहीलेला होता. नविन कात्रज बोगदा, दरीपुल, नऱ्हे, वडगांव आणि वारजे चौक मागे टाकत चांदणी चौकाकडे मी आतुरतेने निघालो. डुक्कर खिंडीच्या चढावर मला मुंबईचा दिप उदेशी भेटला. तो कारमधुन मुंबईला चालला होता. त्याने माझा उत्साह वाढवला. आणि उरला सुरला चांदणी चौकाचा चढ संपवुन मी सीसीडीमध्ये शिरलो.
प्रशांत तिडके, अंजली भालिंगे, संजय जोशी आणि संजय करंदीकर सीसीडीमध्ये एका टेबलावर बसले होते. ड्वेन परेरा सुद्धा तिथेच होता. २ वाजुन ४० मिनिटांनी माझे ब्रेवेट कार्ड संजय सरांकडे दिले. सहजच माझ्या अगोदर कोण कोण आलेत? हे विचारले. ब्रेवेट म्हणजे शर्यत नव्हे, यात पहीला दुसरा असला प्रकार नसतो. वेळेत पुर्ण करणारे सर्व सारखेच रँदोनियर्स असतात. तरीपण एक उत्सुकता म्हणून विचारलेच... तर मी चौथा आलो होतो. हे ऐकुन असं वाटलं की मी जरा जास्तच जोरात सायकल चालवलेली दिसते. २०० किमी चे ब्रेवेट ८ तास ४० मिनिटांत हा माझा वैयक्तिक विक्रम आहे. ब्रेवेट कार्ड जमा केल्यावर सर्व वेदना कुठल्या कुठे पळुन गेल्या. स्मृतींचा ठेवा म्हणून सर्वांबरोबर २ फोटो घेतले. प्रशांत तिडकेंनी केलेल्या कौतुकाने मी भारावुन गेलो. आणि तिथे असणार्‍या सर्वांनीच माझे कौतुक केले. संजय जोशी सरांनी माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या मोबाईलमध्ये फोटो काढुन दिले त्याबद्दल मंडळ त्यांचे आभारी आहे.
पुन्हा भेटु पुढच्या ब्रेवेटला...!
डावीकडून संजय करंदीकर, अंजली भालिंगे, प्रशांत तिडके आणि मी विजय वसवे. 

हाच तो स्क्रू 

Start point , Satara Checkpoint and CCD Chandni chowk 

Energy source

Rider no. 87

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...