Wednesday 31 August 2022

केदारनाथ धाम

 केदारनाथ धाम 

केदारनाथ मंदिर

    केदारनाथ येथे भगवान शंकराचे पांडवांनी बांधलेले मंदिर आहे. हे मंदिर भारताच्या उत्तराखंड राज्यात मंदाकिनी नदीच्या काठावर आहे. केदारनाथ धाम हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक आहे. ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी तसेच पंचकेदार व छोटा चार धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केलेली असून आद्य शंकराचार्यांनी बर्फाने आच्छादलेले हे मंदिर त्यांच्या अनुयायांसह शोधून काढले. आद्य शंकराचार्यांनी देहत्याग करण्यासाठी हेच ठिकाण निवडले. केदारनाथ हे सर्वाधिक उंचीवर स्थित असलेले ज्योतिर्लिंग आहे. काशी-केदार महात्म्य सांगते कि याठिकाणी "मुक्तीचे पीक" उगवते. जन्म मृत्युचा फेरा चुकवायचा असेल तर हे दर्शन अनिवार्य आहे. येथे भेट देण्यासाठी खडतर प्रवास तसेच येथील लहरी हवामानाचा सामना करावा लागतो. येथील थंडी आणि भयकंपित करणारा पाऊस श्रद्धाळुंच्या मनात धडकी भरवतात. गौरीकुंड ते केदारनाथ हा १८ किलोमीटरचा खडतर प्रवास आहे. ऑगस्टमध्ये गेलो तेव्हा गारमीनमध्ये हे अंतर दाखवले. प्रलयामध्ये जुना मार्ग नष्ट झाल्यामुळे नविन मार्ग बनवलेला आहे. या मार्गाने १८ किमी अंतर दर्शवले. वाटेत चहा, पाणी, बिस्किटे आणि मॅगी स्टॉल मध्ये उपलब्ध होतात. तसेच शौचालयाची व्यवस्था देखील आहे. लोकांनी जेवढे घाबरवले होते तेवढे भीतीदायक नक्कीच नाही. काही घाबरट लोक विनाकारण इतरांना घाबरवतात.

    महाभारतातील कुरुक्षेत्र युद्धात पांडवांनी विजय मिळवला हे आपण जाणतोच. त्यात त्यांच्या चुलत भावांचा (कौरवांचा) त्यांना वध करावा लागला. युद्धादरम्यान त्यांना भ्रातृहत्या (गोत्रहत्या) आणि ब्रम्हहत्या केल्याचे पाप लागले. या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी त्यांना भगवान शिवांचे दर्शन घेणे आवश्यक होते. भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवरील अवतार कार्य संपवुन स्वधामास परतलेले होते आणि त्याच क्षणापासून कलियुगास प्रारंभ झालेला होता. सम्राट युधिष्ठीर यांनी अभिमन्यू पुत्र परीक्षितास राज्याभिषेक करून राज्यकारभार त्याच्याकडे सोपवला आणि आपल्या बंधू, माता आणि द्रौपदीसह काशीकडे रवाना झाले. त्यांचा सखा भगवान श्रीकृष्ण सोबतीला नसल्याने त्यांना केवळ भगवान शिव मार्गदर्शन करू शकणार होते. भगवान शंकरांच्या कृपेशिवाय ईश्वरप्राप्ती देखील शक्य होत नाही.
भवानीशंकरौ वन्दे श्रद्धाविश्वासरूपिणौ।
याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धाः स्वान्तःस्थमीश्वरम।।
    ज्यांच्याशिवाय सिद्धजन अंतःकरणात असलेल्या ईश्वराला पाहु शकत नाहीत, अशा श्रद्धा व विश्वासरूप असलेल्या पार्वती व शंकर यांना मी वंदन करतो. (श्रीरामचरीतमानस, बालकांड, श्लोक ३)
    भगवान शिवाच्या शोधात आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी युधिष्ठीर महाराज निघाले. प्रथम ते वाराणसी (काशी) या पवित्र तीर्थक्षेत्री गेले, काशी हे शिवाचे आवडते निवासस्थान मानले जाते जे काशी विश्वनाथ म्हणून आपणा सर्वास माहित आहे. परंतु, भगवान शिव पांडवांना भेटण्यास ईच्छुक नव्हते. ते कुरुक्षेत्र युद्धातील अप्रामाणिकपणा आणि अधर्माचा वापर केल्यामुळे पांडवांवर खूप संतापलेले होते. भगवान शिव कधीही अधर्माची बाजू घेत नाहीत. अधर्मामुळेच त्यांनी रावणाची मदत केली नाही हे आपण जाणतोच. त्यामुळे पांडवांच्या कोणत्याही प्रार्थनेला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. एवढेच नाही तर पांडव काशीमध्ये आलेले पाहुन ते काशी सोडुन निघुन गेले. गुप्त राहण्यासाठी त्यांनी बैलाचे (नंदी) रूप धारण केले आणि गढवाल प्रदेशात (आता जिथे पंचकेदार आहेत) तिथे लपुन राहीले. म्हणून याठिकाणी गुप्त काशी नावाचे तीर्थक्षेत्र आहे.
    वाराणसीत शिव न सापडल्याने पांडव त्यांना जागोजागी शोधु लागले. भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त असलेले पांडव भगवान शंकरांना शोधत शोधत गढवाल हिमालयात गेले. भीम पर्वतांवर (शिखरावर) उभा राहून सर्वदूर नजर टाकत असे. शिवांचा शोध घेण्यासाठी पांडवांनी दिवसरात्र एक केला. पर्वताच्या शिखरावरून शोध घेत असताना एके दिवशी भीमाने गुप्तकाशी जवळ एक बैल चरताना पाहिला. भीमाने तो बैल म्हणजे भगवान शिव असल्याचे लगेच ओळखले. आपल्या बंधुंना याची माहीती देऊन भीमाने बैलाच्या रूपातील शिवांचा पाठलाग केला. त्याने त्यांना शेपटीने आणि मागच्या पायांनी पकडले. पण बैलाच्या रूपात असलेल्या भगवान शिवांनी स्वतःला जमिनीत अदृश्य केले आणि बरेच दिवस दिसले नाहीत. यादरम्यान पांडवांनी त्यांची स्तुती करणे थांबवले नाही. त्यानंतर पांडवांची दया येऊन त्यांनी काही भागांमध्ये स्वतःला पुन्हा प्रकट केले. त्यांच्या शरीराचे काही भाग जमिनीतून वर डोकावू लागले. केदारनाथमध्ये वशिंड उंचावत, तुंगनाथमध्ये हात दाखवत, रुद्रनाथमध्ये मुखदर्शन, मध्यमहेश्वरमध्ये नाभी तर कल्पेश्वरमध्ये जटा दाखवत पांडवांना शिव दिसू लागले. भगवान शिव पाच वेगवेगळ्या रूपात पुन्हा प्रकट झाल्यामुळे पाच पांडव अतिशय आनंदित झाले. त्यांनी शिवांची पूजा करण्यासाठी जिथे जिथे त्यांच्या शरीराचे भाग दिसू लागले होते त्या त्या ठिकाणी एकाच रात्रीत एकसारखी दिसणारी पाच मंदिरे बांधली. याच ठिकाणांना पंच केदार मंदिरे असेही म्हटले जाते. पांडवांच्या भक्तिभावाने आशुतोष भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी पाच पांडवांना पुढील मार्ग दाखवला.
    भगवान शिव यांच्या निर्देशानुसार पांडवांनी मोक्षासाठी केदारनाथ येथे ध्यान केले, यज्ञ (अग्नी यज्ञ) केला आणि नंतर स्वर्गरोहिणी या स्वर्गीय मार्गाने स्वर्ग किंवा मोक्ष प्राप्त केला. म्हणून केदारनाथ मंदिरास स्वर्गरोहिणी मंदिर असेही म्हणतात. केदारनाथ मंदिरामध्ये नकुल, सहदेव, अर्जुन, माता कुंती, सम्राज्ञी द्रौपदी आणि सम्राट युधिष्ठिर यांच्या मूर्ती आहेत. तसेच लक्ष्मीनारायण देखील विराजमान आहेत. मंदिराच्या बाहेर नंदी आणि शिवपुत्र गणेश आहेत. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला वर पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण बसून बासरी वाजवत बसलेले आहेत असे शिल्प आहे. या शिल्पाचा दगड इतर मूर्तींपेक्षा वेगळा आहे हे लगेच जाणवते. मंदिराला दोन द्वारपाल देखील आहेत परंतु ते कोण आहेत हे सांगता येत नाही.
    पंच केदारपैकी केदारनाथ, तुंगनाथ आणि मध्यमहेश्वर मंदिरे आजही पहावयास मिळतात. केदारनाथ तीर्थ येथील भगवान शिवांचे पुरोहित हे या प्रदेशातील प्राचीन ब्राह्मण आहेत. त्यांचे पूर्वज फार पूर्वीपासून लिंगाची पूजा करत आलेले आहेत. पांडवांचा नातू आणि सम्राट परीक्षिताचा पुत्र सम्राट जनमेजय याने त्यांना या मंदिराची पूजा करण्याचा अधिकार दिलेला आहे. तेव्हापासून ते केदारनाथची पूजा करत आहेत.
    हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा ह्या कालावधीमध्येच खुले असते. जेव्हा सर्व देव झोपी गेलेले असतात तेव्हा महादेव सर्व जबाबदारी सांभाळतात. देव उठले कि महादेव रजा घेतात. चातुर्मास संपेपर्यंत हे मंदिर खुले असते. देवशयनी तसेच देवउठणी एकादशी करूनच केदारबाबा द्वार बंद करतात. पुढील यात्रा हि पंच केदार आणि बद्रीनाथ असेल यात काहीच शंका नाही. भगवान शंकराच्या कृपेने या ऑगस्ट महीन्यात सपत्निक केदारनाथ दर्शन घेण्याचा योग आला. जय केदारबाबा!
    पंचकेदार यात्रा आणि त्यानंतर भगवान विष्णूचे बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेणे हा एक हिंदू धर्मियांचा अलिखित धार्मिक नियम आहे.
भगवद्गीता, भागवतम आणि महाभारत यांच्या सतत वाचनामुळे मी हि माहीती लिहु शकलो.
जय केदारनाथ
- विजय वसवे
(माझ्या नावासहीत हि पोस्ट शेअर करण्यास माझी काहीही हरकत नाही)
९८५०९०४५२६






















































कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...