Friday 20 May 2016

रातराणी २०० किमी

रातराणी २०० किमी





Medal Fee: 550

          १४ मे, शनिवार सकाळच्या शिफ्टमध्ये जाण्याचे श्रम पडु नयेत म्हणुन मी सुट्टी घेतली. शरीराला आराम मिळुन रात्री सायकल चालवताना ताजेतवाने वाटावे हा त्यामागचा उद्देश होता. दुपारी चिकनरस्सा आणि भात खाल्ल्यामुळे गुंगी यावी तशी गाढ झोप लागली होती. ६ वाजता जाग आल्यावर वाघमारे सरांचा फोन आला. किती वाजता निघायचे वगैरे ठरवुन आवरायला घेतले. खरं सांगायचं तर मला ही बीआरएम खुप सोपी वाटत होती. याच मार्गावर दिवसा झालेली ब्रेवेट मी ९ तास ४७ मिनिटांमध्ये पुर्ण केलेली होती. त्यामुळे यावेळेत काही सुधारणा करता येईल का याच उद्देशाने मी याकडे पाहत होतो. टायर, ट्युब आणि चाकेसुद्धा नविन असल्यामुळे पंक्चरची भिती वाटत नव्हती. सावधानता म्हणुन एकच ट्युब बरोबर घेत होतो पण निघताना सौ. म्हणाली तुमच्या सायकलच्या पंक्चरचे काही खरे नसते, घरात ज्यादा ट्युब्स असताना फक्त एकच का घेऊन जाताय? २ ट्युब बरोबर घेऊन जा. सौ. च्या आग्रहाखातर मी २ ट्युब बरोबर घेतल्या. संध्याकाळी ८ वाजता घर सोडले. वाघमारे सर धायरीफाट्यावर माझी वाट पाहत थांबलेलेच होते. आम्ही दोघांनी पुणे विद्यापीठाकडे कुच केली. 

       ७३ जणांनी रजिस्टर केलेले होते त्यामुळे जेव्हा आम्ही पुणे विद्यापीठाच्या दारात पोहोचलो तेव्हा तिथे तुडुंब गर्दी झालेली होती. सायकलस्वारांची गर्दी असुनही बाईकचेक आणि ब्रेवेट कार्डवर शिक्का लगेच मिळाला. प्रचंड गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा होऊ लागल्याने वाहतुक पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि तिथुन सायकल्स हलवायला लावल्या. बाईकचेक झालेले आणि ब्रेवेट कार्ड मिळालेले सायकलस्वार पाषाण रोडवर हलवण्यात आले. तिथे संजय करंदीकरसुद्धा त्यांच्या सायकलसह तयारीत थांबलेले होते. त्यांच्याकडुन खुप काही शिकण्यासारखे आहे म्हणुन मी त्यांना नेहमी गुरुदेव मानुन प्रथम नमस्कार करतो. यादरम्यान माझा ब्लॉग वाचलेले बरेच वाचक मला प्रत्यक्ष भेटले. माझ्या लेखनाचे त्यांनी खुप कौतुक केले. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया माझ्या लेखनाचा उत्साह नक्कीच वाढवतील. 

       ही बीआरएम अगदी काट्यावर काटा म्हणजे ९ वाजताच सुरु झाली. या ब्रेवेटची वेळ ८ वाजता होती पण डुक्करखिंडीत रुंदीकरणाचे काम चालु असल्यामुळे ८ च्या दरम्यान तिथे खुप वाहतुक कोंडी होते. ब्रेवेटची बदललेली वेळ पथ्यावर पडली कारण ९ नंतर आम्ही तिथुन जाताना तिथे काहीच ट्रॅफीक नव्हते. पाषाण रोडवरुन चांदणी चौकात येईपर्यंतच उकाड्याने नको नको केले. घामाच्या धारा वाहायला लागल्या. चांदणी चौक ते वडगांव बुद्रुक पर्यंत वाहतुकीची कोंडी नसली तरी वाहनांची संख्या खुप होती. वेडेवाकडे वळणारे, मधेच डावीकडे वळणारे आणि अचानक रस्त्याच्या मधे येण्याचा प्रयत्न करणारे वाहनस्वार आणि चारचाकीवाल्यांची दादागीरी चालली होती. नविन कात्रज बोगद्याकडे वळल्यानंतर रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी झाली पण वातावरणातील उकाड्यामधे प्रचंड वाढ झाली. जांभुळवाडी तलावाच्या शेजारुन जातानासुद्धा थंड हवेची झुळूक मिळाली नाही. दरीपुल येईपर्यंत मी घामाने डबडबलो आणि भयंकर उकाड्यामुळे नको नको व्हायला लागले. रात्रीच्या वेळी असणारी थंड हवा कुठे गायब झाली होती कोणास ठाऊक? अगदी वाळवंटातही रात्रीच्या वेळी थंडी पडते पण पुणे-सातारा रोडवर थंड हवेचा लवलेशही नव्हता. १ किमी लांबीचा नविन कात्रज बोगदा म्हणजे नुकताच शेगडीवरुन उतरवलेला प्रेशर कुकर वाटला. कधी एकदा त्या बोगद्यातुन बाहेर पडतोय असे झाले होते. पुण्याचे हवामान एवढे निष्ठुर कसे काय होऊ शकते? बोगद्यापासुन कापुरहोळला जाताना उतारावरील वेगामुळे जी हवा मिळाली तेवढीच त्यातही थंडपणा नव्हता. खंबाटकी ते सातारा रस्त्यातील फ्लायओव्हर्सची कामे मार्गी लागल्यानंतर आता कात्रज बोगदा ते शिरवळ या पट्ट्यातील गावांमध्ये फ्लायओव्हर्सची कामे सुरू झालेली आहेत. कोंढणपुर फाटा, गराडे फाटा, वरवे, नसरापुरफाटा, कामथडी आणि भोरफाटा अशा ६ ठिकाणी फ्लायओव्हर्स होणार आहेत आणि हे सर्व पुढच्या कॅलेंडर वर्षात आपणा सर्वांच्या मांड्यांना जाणवणार आहेत.        
     १० वाजुन ४६ मिनिटांनी कापुरहोळला पोहोचलो. बऱ्याच ब्रेवेटमध्ये सोबत असणारा प्रशांत जोग आज प्रथमच होलिंटीयरच्या रूपात पहायला मिळणार होता. पण तोलनाक्यावरील ट्रॅफिकमुळे त्याला कापुरहोळला पोचायला उशिर झाला. कापुरहोळ चेकपॉईंटवर शिक्का घ्यायचा की सेल्फी यात उगाच २० मिनिटे अशीच वाया गेली. बाजुलाच वाईन्सचे दुकान होते. वाईन्सच्या दुकानातुन थंड पाण्याची बाटली (फक्त) घेतली. सेल्फी घेतली आणि ऊमेश धोटेबरोबर रस्ता ओलांडुन सायकलला टांग मारणारच होतो तेवढ्यात प्रशांत आला. आता शिक्का घेऊनच जाऊ असे म्हणत ब्रेवेट कार्डवर शिक्का घेतला. यात पुन्हा थोडासा वेळ गेला. काही रायडर्सना कापुरहोळ चेकपॉईंट कळलाच नाही, ते तसेच पुढे जात राहीले. कापुरहोळकडे जाताना NH4 वर डाव्या बाजुला दोन दारूची दुकाने लागतात पहीले सोनल वाईन्स आणि दुसरे आनंद वाईन्स. चेकपॉईंटला आनंद वाईन्स नाव दिले असते तर कोणी चुकले असते असे मला तरी वाटत नाही कारण दारूच्या दुकानांचा करीष्माच तसा आहे. वास्तुशास्त्रात सर्व दोषांसहीत सामावणारे आणि कोणत्याही अनोळखी प्रदेशात चटकन माहीती मिळु शकणारे कोणते दुकान असेल तर ते म्हणजे दारूचे दुकान. दारूच्या दुकानाची महती मी काय वर्णावी? आंधळ्या, मुक्या व्यक्तींना विचारले तरी तेसुद्धा सांगतील.

   ११ वाजुन १५ मिनिटांनी मी कापुरहोळ सोडले. रात्र असुनही भयंकर उकाडा जाणवत होता. हे ब्रेवेट जेवढे सहज समजलो होतो तेवढे सहज वाटेना. एकेका किलोमीटर नंतर घाम फुटु लागला. एनएच-४ वर रात्रीचा असर जाणवायला लागला होता. नेहमीच्या वाहनांची संख्या कमी झालेली होती तसेच उलट्या दिशेने येणा-या स्थानिक वाहनांची लुडबुड तर औषधालाही नव्हती. यामुळे सायकलस्वारांची चंगळ होती. उकाडा सोडला तर सायकल चालवणे सुसह्य होते. रात्रीची वेळ असल्यामुळे जवळचे पाणी संपले तर बाटली विकत घ्यायला एकही दुकान उघडे मिळणार नव्हते त्यामुळे माझ्याजवळचे पाणी मी खुप जपुन वापरत होतो. या गर्मीमध्ये शिंदेवाडीचा पिंटुकला चढही भाव खाऊन गेला. नेहमीप्रमाणे कात्रज उतारावरील रम्बलरने नकोनकोसे केले. त्यावरुन जाताना १० रिश्टर स्केलचा भुकंप झाल्यासारखे तीव्र झटके हॅंडल धरलेल्या हाताला जाणवतात. 

    चांदणी चौकाच्या चढाने खुप घाम दिल्यानंतर मी विश्रांतीसाठी थांबलो. चांदणी चौकातल्या बसस्टॉपमध्ये बसुन सोबत आणलेला भात आणि बटाटा फस्त केला. त्या बसस्टॉपवर ना बस होती ना प्रवासी. रात्रीच्या निरव शांतातेत मी एकटाच निशाचर सायकलस्वार त्या बसथांब्यावर थांबलो होतो. पोटात भर पडल्यावर बावधानच्या उतारावर मी सायकल सोडुन दिली. पाषाण तळ्याजवळुन जातानासुद्धा थंड हवेची झुळुक आली नाही. काय म्हणावे या उकाड्याला? पाण्याचा वापर मी खुप जपुन करत होतो. डांगे चौक मागे टाकला, आणि हळुहळु मार्गक्रमण चालु होते. एका ठिकाणी डाव्या बाजुला मोठा खड्डा उकरलेला होता आणि त्याची माती रस्त्यावर आलेली होती. मी रस्त्याच्या खुप कडेने सायकल चालवतो त्यामुळे तिथेच काहीतरी गोची झाली. चालता चालता मागची रिम डांबरावर घासण्याचा आवाज येऊ लागला. काय झाले पाहण्यासाठी सायकल थांबवली तर मागचे चाक पंक्चर झाले होते. क्षणाचाही विलंब न करता १२ मिनिटांत दुसरी ट्युब बसवुन चाक तयार केले. सगळी आवराआवरी करुन सायकलवर टांग मारली तेच पुढच्या चाकाचीही तीच अवस्था झाल्याचे निदर्शनास आले. आता मात्र माझे अवसान गळाले. छोट्या पंपाने १२० पीएसआय हवा भरुनच जीव निघतो. एका चाकात कशीबशी हवा भरुन झाली होती आता दुस-या चाकात हवा भरण्याच्या कल्पनेनेच अंगावर काटा आला. दलदलीत टाकलेले प्रत्येक पाऊल जसे खोलात ओढत नेते तसे पहीली पंक्चर काढुन पँडल मारायला सुरूवात करताच दुसरी पंक्चर पाहुन मला जाणवले. दुसरेही चाक पंक्चर झाले होते. मी पंक्चरच्या दलदलीत अडकलो होतो. दलदलीत सुरक्षित राहण्यासाठी स्तब्ध राहीलेले चांगले असते. मी सायकल बाजुला लावली आणि मांडी घातली, हाताच्या पंजांवर हनुवट टेकवली आणि तसाच स्तब्ध बसुन राहीलो, काय चुकले असावे? याचे खुप चिंतन केले. सौ चे कसे आभार मानावे तेच कळत नव्हते. एकच ट्युब बरोबर घेऊन निघालेलो मी, सौ ने बळेच दुसरी ट्यूब बरोबर दिली, तुमच्या पंक्चरचे काही खरे नसते म्हणालेली. जे होते ते चांगल्यासाठीच. मला एकावर एक फ्री पंक्चर मिळाली होती. दुसरी पंक्चर निवांत काढली. पाठीमागुन येणा-या मित्रांबरोबर गप्पा मारत मारत निवांत देहुरोडला पोचलो.

      देहुरोड वळणावर दिव्या ताटेंनी सिक्रेट चेकपॉईंट बनवला होता. तिथे त्यांनी सर्वांसाठी पाणी, सँडविच आणि स्वतःच्या हाताने बनवलेला बर्फ-चहा ठेवला होता. एवढी रात्र असुनदेखील दिव्या ताटेंचा उत्साह कौतुकास्पद होता. आणि विशेष म्हणजे सर्व सायकलस्वारांवर त्या बारीक लक्ष ठेवुन होत्या. टॉर्च चालु आहेत का? नंबर प्लेट बांधली आहे का?  रिफ्लेक्टीव जर्सी घातली आहे का? या गोष्टींवर त्यांचे बारीक लक्ष होते. उम्या टॉर्च बंद ठेवुन सायकल चालवत होता त्याला त्यांनी फटकारले. Where is ur torch? असा प्रश्नही केला. चेकपॉईंटवरील सर्व गोष्टींचा खरपुस समाचार घेतल्यानंतर मी, ऊमेश आणि वाघमारे सर लोणावळ्याच्या दिशेने निघालो. कामशेतच्याजवळ ३ कुत्रे आमच्या अंगावर भुंकत आले. ऊमेशच्या हेडटॉर्चचा उजेड एवढा प्रखर होता की तो उजेड कुत्र्यांच्या डोळ्यांवर मारल्यावर त्यांनी भुंकायचे सोडुन इकडे तिकडे पळायला लागले. अंधारात कुत्र्यांना पळवुन लावण्याची एक युक्ती माहीत झाली. आम्ही कुत्र्यांपासुन पळण्याऐवजी कुत्रे आमच्यापासुन दुर पळुन गेले. कामशेतच्या जवळ कोंबड्याने दिलेली बांग ऐकु आली. कोंबडा आरवला. पहाटे ४ वाजता बरोबर कोंबडा आरवतो हे ऐकले होते म्हणुन मनगटातल्या घड्याळात तपासुन पाहीले तर खरंच ४ वाजुन २ मिनिटे झालेली होती. केवढी ही अचुकता म्हणायची. ऊमेश आणि मी मजल दरमजल करत ४ वाजुन ४५ मिनिटांनी लोणावळा चेकपॉईंटला पोचलो. नेहमीप्रमाणे शिक्का घेऊन लगेच उधळलो नाही. मनिष भावे आणि ऊमेश धोटे बरोबर गप्पा मारत बसलो. चेकपॉईंटवरील काही बिस्कीटे घशाखाली उतरवली. साधारण अर्धा तास आराम करून ५ वाजुन १५ मिनिटांनी आम्ही लोणावळा सोडला. वाघमारे सर, ऊमेश, मी आणि इतर सर्वांनी पुण्याच्या दिशेने पँडल मारायला सुरूवात केली. 

     पुण्याच्या दिशेने निघाल्यावर ऊमेश एकदम झिंगाट होऊन बुंगाट निघाला होता. नवोदीत खेळाडु जसे चौकार आणि षटकार मारून सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न करतात तसा ऊमेश स्प्रिंट मारून ब्रेवेट संपवण्याचा प्रयत्न करू लागला. लोणावळ्याच्या बाहेर अरूणोदय हॉटेलजवळ आल्यावर अरूणोदय होण्याची चिन्हे दिसु लागली. थंड झुळुक वगैरे म्हणतात ती संपुर्ण प्रवासात औषधालासुद्धा नव्हती. समुद्राच्या कडेने सायकल चालवताना जाणवणारा उकाडा जाणवत होता. पहाटे ४ नंतर थंड हवा वगैरे असते या सगळ्या परीकथा ठरल्या. संपुर्ण प्रवासात फक्त घाम आणि उकाड्याशिवाय दुसरे काहीही नव्हते. डिसेंबरची हाडे गोठवणारी थंडीही नको, ग्रीष्मातील चटके देणारे ऊनही नको, आजकाल निशाही शितलता देत नाही, तरीपण मला असे वाटते की थंडीच्या दिवसातील सायकलिंग उत्तम. खरं सांगायचं तर नोव्हेंबर ते फेब्रूवारी दरम्यान सायकल चालवण्यातच सुख आहे. 

   पुण्याजवळ राहणाऱ्या लोकांना आता सायकलस्वार म्हणजे परग्रहावरून आलेले परग्रहवासी वाटत नाहीत. बरेचजण शनिवार रविवार सायकल चालवतात त्यामुळे लोकांना आता आमचे अवतार बघण्याची सवय झालेली आहे. देहुरोडपर्यंत कसलीही किरकिर झाली नाही. रात्री दोन पंक्चर झाल्यानंतर पुढच्या प्रवासात एक जरी पंक्चर झाली असती तर माझे राम नाम सत्य झाले असते. रस्त्याने जाणारे काहीजण खुप ऊत्साह वाढवतात आणि हातवारे करून प्रेरणासुद्धा देतात, रात्रभर सायकल चालवली आहे म्हटल्यावर एक आदरयुक्त कटाक्षसुद्धा मिळतो. 

   रावेतफाट्यावर मुंबईचे दोघेजण थांबले होते. ईथुनच वळायचे का? या संभ्रमात पडले होते. मी त्यांच्या मागोमाग आलो आणि न थांबता हाताने माझ्यामागुन येण्याची खुण केली. त्यातला एक वरूणकुमार होता. माझ्या पाठीमागे येऊन त्याने मला लगेच गाठले.  त्याच्याकडे जवळजवळ २ लाख किंमत असलेली लिपायरची रोडबाईक होती. पुर्ण क्षमतेने चालवल्यास ३४ ते ३५ चा सरासरी वेग मिळतो असे त्याने सांगितले. औंध चौकापर्यंत आम्ही सायकलिंगच्या गप्पा मारत सोबत सायकल चालवली. त्याच्याशी गप्पा मारताना मला एमआर विषयी माहीती मिळाली. एका कॅलेंडर वर्षाात ५००० किमी ब्रेवेट अंतर पार केल्यास मास्टर रँदोनियर(एमआर) होता येते. त्यामुळे आता एसआर (सुपर रँदोनियर) खुप किरकोळ वाटायला लागले आहे. 

       माझ्या सायकलच्या मागच्या चाकाला काहीतरी बाधा झाली होती. ते ब्रेकपॅडला घासत होते आणि अगदी थोडा वेग घेण्यासाठीसुद्धा मला खुप परीश्रम करावे लागत होते. रावेतकडे वळाल्यापासुन ही समस्या उद्भवली होती. तेव्हा मला आठवले की एका पाईपसाठी उकरलेल्या खड्ड्यातुन जाताना मी ब्रेक दाबायचे टाळले होते. ब्रेक दाबायचे टाळल्यामुळे माझ्या पुढच्या प्रवासाच्या गतीला ब्रेक लागला होता. ब्रेकपॅड घासत असल्यामुळे उतारावर सुध्दा सायकल वेग घेत नव्हती. उताराचा फायदा सर्वांना मिळतो पण मला मात्र  उताराचा फायदा मिळाला नाही. रावेतचा बीआरटी मार्ग आणि त्या रस्त्यावरचे उड्डाणपूल उच्च दर्जाचे आहेत. मुंबईच्या रायडर्सनी पुण्याच्या रस्त्यांचे खुप कौतुक केले. 

    ब्रेवेटचा शेवट जवळ आल्यावर माझा उत्साह वाढतो आणि वेगही पण चाकाच्या समस्येमुळे मला सिम्बायोसिसच्या उतारावरही वेग घेण्याची भिती वाटत होती. नोव्हेंबरमध्ये झालेल्या २०० च्या ब्रेवेट मध्ये मी शेवटी शेवटी ५ जणांना मागे टाकले होते. यावेळेस मला ५ जणांनी मागे टाकले. हिसाब बराबर हुआ... कसाबसा रांगत रांगत मी हॉटेल रूपालीवर पोचलो. रूपालीला जत्रेचे स्वरूप आलेले होते. एवढ्या जत्रेत सायकल लावायला अलगद जागा मिळावी हे माझं भाग्य. मी पहीले माझे ब्रेवेट कार्ड चंद्रकांतकडे सुपुर्द केले आणि सायकल चालवण्याच्या त्रासातुन मुक्त झालो तेव्हा ७ वाजुन ५८ मिनिटे झालेली होती. याचा अर्थ मला या २०० किमीच्या  ब्रेवेटसाठी ११ तास लागले. 

    हॉटेल रूपालीवर सायकलिंगमुळे मिळालेले अरूण  ठिपसे, संजय जोशी आणि प्रशांत तिडके हे मित्र भेटले. ते सर्व त्यांची संडे राईड करून त्यांच्या रूपाली कट्ट्यावर बसले होते. त्यांच्याशी गप्पा मारताना माझा सर्व क्षीण नाहीसा झाला. त्यांच्याबरोबर एक छानसा फोटो काढला. सायकलिंगमुळे असे मौल्यवान मित्र भेटले. प्रशांत तिडकेंचे सायकलिंग तर सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे. त्यांची गगनभरारी पाहुन मलाही एखादी गिरकी घ्यावीशी वाटते. नविन सायकल घेताना मला त्यांचे खुप मोलाचे मार्गदर्शन लाभले. मित्रांबरोबर थोड्या गप्पाटप्पा आणि हसीमजाक झाला. थोड्यावेळाने शरीर स्थिरस्थावर झाल्यावर मी गाशा गुंडाळला आणि वाघमारे सरांबरोबर सिंहगड रोडच्या दिशेने निघालो... पुढच्या बीआरएमच्या प्रतिक्षेत....

बीआरएममध्ये क्लिक केलेली काही क्षणचित्रे.. 

पहीलाी पंक्चर

एकाच ठिकाणी दोन्ही चाके पंक्चर

देहुरोड चेकपॉईंटवरील सँडविच खाताना

रात्री ३ वाजता सायकलस्वारांसाठी बर्फ-चहा बनवण्याचा उत्साह पहा... 

एक फोटो तो बनता है दिव्या

लोणावळा चेकलिस्ट

लोणावळा चेकपॉईंटवरील सिमॉरची गाडी

उकाड्याने त्रस्त झालेले सायकलस्वार

हिरवी हिरवी गार चाके

दहा दिशांच्या हृदयामधुनी अरूणोदय झाला

तळेगावजवळील सुर्योदय

रम्य सकाळ

आली लाजत आज सकाळ
मेहंदीभरल्या चरणी बांधुन
सोनफुलांचे चाळ

वॉटरप्रूफ हँडलबार बॅग, या पावसाळ्यात कळेल खरेच आहे का वॉटरप्रूफ 

जल्लोष यशाचा

मी घेतली शेल्फी (११ तास लागले) 

डावीकडुन प्रशांत तिडके, संजय जोशी, मी, अरूण ठिपसे

हॉटेल रूपाली चेकपॉईंटवरील स्वयंसेवक

रूपाली हॉटेलवरील चेकलिस्ट

रात्रभर पुढेमागे करत करत रूपालीवर पोचलो. 

बॅक टु पॅव्हीलियन

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...