Wednesday 25 April 2018

Race to Machhi at Baroda ( Épreuve de Force)

"Épreuve de Force"

      यावेळेस एका शहरातुन दुसर्या शहरात जात असताना बसमध्ये सायकल घेऊन जाण्याची एक नविन संकल्पना माहीत झाली. रोडबाईक जशी आहे अशी उचलुन प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या डिकीमध्ये ठेवुन घेऊन गेलो होतो. मित्रांचे अनुभव असे कामाला येतात. त्यामुळे जेव्हा मी बडोद्याजवळील गोल्डन चोकडी येथे बसमधुन उतरलो तेव्हा मला सायकलला टांग मारुन लगेच बडोद्याकडे रवाना होता आले. रिक्षा करण्याची वेळ आली नाही. गुगल मॅप आणि ओयो रुम्स यांच्या सहाय्याने एका अनोळखी शहरात कोणत्याही व्यक्तीची मदत न घेता मी एका वातानुकुलित रुमपर्यंत पोचलो. गुगल मॅपच्या सहाय्याने शर्यतीचे ठिकाण तर ओयो रुम्सच्या मदतीने खिशाला परवडणारे हॉटेल शोधले. रुम शोधेपर्यंत दुपार झाली होती आणि बडोद्यातील दुपारचे ऊन एवढे भयंकर होते की पुण्यात परत आल्यावर मला थंड हवेच्या ठिकाणी आल्यासारखे वाटायला लागले होते. काठीयावाडी अनलिमिटेड थाळीचा मनसोक्त आस्वाद घेऊन त्यादिवशी दुपारनंतर मस्त ताणुन दिली.

      मी खिडकीच्या काचेतुन बाहेर नजर टाकली, बर्यापैकी ऊजेड आल्यासारखे वाटत होते. पटकन पांघरुन झटकले आणि हातातील घड्याळाकडे पाहीले. 6 वाजुन 45 मिनिटे झालेली होती. एव्हाना रेस सुरु झालेली असणार आणि मी हॉटेल रुमवर झोपुन राहीलेलो होतो. माझ्या अंथरुणाखालची जमिन सरकली, हादरलोच होतो मी. या अशा भयंकर स्वप्नामुळे झोपेतही माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. या धडधडीमुळे मला जाग आली तेव्हा रात्रीचे अडीच वाजलेले होते. कोपर्यातला मुद्दाम चालु ठेवलेला एक दिवा एकटाच मिणमिण करत होता. बेडच्या बाजुला माझी रोडबाईक स्तब्ध ऊभी होती आणि माझे हृदय या धक्क्यामुळे रेल्वे इंजिनसारखे धावायला लागले होते. काहीच्या काही स्वप्ने पडतात. बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी सुद्धा मला अशीच स्वप्ने पडत असत. परीक्षेला गेलो पण माझा पेनच घरी राहीला, मला पोचायला खुप ऊशिर होतोय, पेनातील शाई संपली आणि मला बस मिळाली नाही वगैरे वगैरे. धडधड शांत झाल्यावर पुन्हा डोळे झाकले.

      ४ वाजता अलार्मच्या कर्कश आवाजाने ऊठलो, रेसची सर्व तयारी केली. परमुलुखात असल्यामुळे सौ. ची उणिव तीव्रतेने जाणवली, तयारी करताना ती नेहमीच मला हातभार लावते. निघण्यापुर्वी हवा चेक करावी म्हणुन छोटा पंप काढला. चाकामध्ये 120 हवा होतीच परंतु मला फक्त खात्री करायची होती की नक्की 120 च आहे का?. पंप जोडुन हवा भरण्यासाठी जोर लावला आणि जोरात फाट आवाज होऊन पंप निकामी झाला आणि निकामी होताना त्याने चाकातील सर्व हवा काढुन घेतली. टायर सपाट होऊन फरशीवर टेकला. पंप निकामी झाला आता चाकात हवा भरायची कशी? आणि विनाहवेची सायकल शर्यतीच्या ठिकाणा पर्यंत घेऊन जायचे कसे? हे दोन यक्षप्रश्न माझ्यासमोर ऊभे राहीले. पंप मिळण्याची खात्री असलेल्या व्यक्तीला फोन करुन पंप आणायला सांगितला आणि सायकल हातात धरुन कसेबसे शर्यतीच्या ठिकाणी पोचायचे असे मी ठरवले. सायकल हातात धरुन रस्त्यावर चालायला लागलो जेमतेम 100 मीटर अंतर चालल्यावर माझ्या लक्षात आले की सायकल हातात धरुन चालण्याचे प्रकरण जेवढे वाटले तेवढे सोपे नाही. रस्त्याने जाणारा एक दुचाकीस्वार माझ्या सायकलिंगच्या पेहरावाकडे आणि हातातील सायकलकडे एकटक पाहत चालला होता. पांडुरंगाने माझ्या मदतीसाठी पाठवलेला देवदुतच जणु. निम्मे काम तर नजरेतुनच झालेले होते. विनंती केल्यावर त्याने मला अमितनगर सर्कलपर्यंत आनंदाने सोडले. शर्यतीच्या ठिकाणी हवा भरण्याचे भरपुर पर्याय उपलब्ध होते.  हवा भरुन झाल्यावर बाजुच्या टपरीवर एक मस्त गरमागरम चहा घेतला. बिब नंबर 160 सांगुन मी माझी हजेरी लावली आणि शर्यतीसाठी सज्ज झालो. संयोजक मोठ्या आवाजात आवश्यक सुचना देत होते. सपोर्ट व्हेइकल, एरो बार या गोष्टी वापरण्यास मनाई करण्यात आलेली होती. स्पर्धा पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक सर्वांचा उत्साह वाढवत होते. अमितनगर सर्कलजवळ सर्व सायकल स्पर्धक एकत्र जमल्यानंतर मुख्य फ़्लॅग ऑफसाठी आम्ही गोल्डन चोकडीकडे जाणार होतो. हे सर्व अगदी एखाद्या फ्रान्समधील सायकल परंपरेला शोभेल असेच होते. फक्त तिथल्यासारखे उत्साह वाढवणारे प्रेक्षक ईथे नव्हते. रस्त्यावरील ईतर वाहनचालकांना आम्ही सायकलवाले म्हणजे वाहतुकीसाठी अडचण वाटत होती त्यामुळे ते आम्हाला चिअरींग करतील अशी अपेक्षाच नव्हती. पुरेसा उजेड आल्यानंतर खुल्या गटातील पुरुषांच्या सायकल शर्यतीने स्पर्धेला सुरुवात झाली. त्यांनंतर ४० च्या वरचे पुरुष, खुल्या गटातील महीला आणि ४०च्या वरील महीलांची शर्यत सुरु होणार होती.

      पहीले दहा किमी मी शक्य असेल तेवढा वेग घेऊन सायकल पळवत होतो. ४० च्या वरील गटातील आम्ही ५ स्पर्धक पुढे एकत्र चाललो होतो. माझा सरासरी वेग ३४ ते ३६ होता. रोडबाईकवर आतापर्यंत मिळवलेल्या सर्वोत्तम वेगाने मी सायकल चालवत होतो. रस्ता एकदम सपाट आणि गुळगुळीत होता. वारा वाहत असल्यामुळे सायकल पळवणे सुसह्य वाटत होते. थोडासा वारा यायला लागल्यावर माझा वेग थोडासा मंदावला. जरीवालाने उजवीकडुन ब्रेक घेत गती वाढवली आणि बाकीच्या तिघांनी त्याचे अनुकरन करत तेसुद्धा त्याच्या मागोमाग गेले. कोणामध्ये किती दम आहे हे आजमावण्यासाठी काही वेळेस असा पवित्रा घ्यावा लागत असावा असे मला वाटले. त्यांची गती ४० च्या वर गेल्यावर मला त्यांना गाठता येईना. मीसुद्धा प्रयत्न करणे सोडुन दिले. मी माझ्या गतीने सायकल चालवत राहीलो. पुढे गेलेल्या बंचमध्ये आणि माझ्यामध्ये जवळजवळ शंभर मीटरचे अंतर पडले होते. जरीवाला सोडला तर कोणीही आक्रमण करुन बंचचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत नव्हते. हे पाहुन जरीवाला सुद्धा थंड राहीला. उगाच शक्ती खर्च करण्यात काय अर्थ आहे? ईतर स्पर्धक आक्रमण करत नसल्यामुळे बंचचा वेग मंदावला आणि मी पुन्हा बंचच्या पुढे आलो. बंचमध्ये सायकल चालवण्याचा सराव नसल्यामुळे चाकामागे चाक लावुन सायकल चालवण्याची मला भिती वाटत होती. तोंडावर पडुन दात पाडुन घेण्यापेक्षा पुढे राहुन वार्याचा सामना केलेला केव्हाही चांगला असे मला वाटले. नंतर नंतर तर आमच्या बंचचा वेग तीसपेक्षाही खाली गेलेला होता. सर्वजण माझ्या वेगाने सायकल चालवत होते. शेवटच्या जीवघेण्या चढासाठी शक्ती वाचवुन ठेवणे हीच सर्वांची रणनिती होती हे मला स्पर्धा संपल्यावर कळाले. मी नवशिक्या असल्यामुळे ते सर्वजण मलाच पुढे करत होते. आयुष्यात पहील्यांदाच मी रोडमार्शलच्या मागोमाग सायकल चालवत होतो. दोन रस्ते आले की माझा गोंधळ उडत असे. डावीकडे वळु की उजवीकडे वळु मला कळत नसे. खरंतर वेगात येणारे स्पर्धक दिसले की वोलिंटीयर्सनी हातातील झेंड्याने दिशा दाखवली पाहीजे. आपल्याकडे एवढे सुज्ञ वोलिंटीयर्स मिळणे अवघडच आहे म्हणा, सुज्ञ तर सोडा आपल्याकडे नुसते ऊभे राहण्यासाठी वोलिंटीयर्स मिळाले तरीही खुप झाले असे मी म्हणेन. स्पर्धकाने नुसती नजर टाकताच त्याला दिशा कळायला हवी किंवा चेन्नई ट्रायथलॉन सारखे दिशा दर्शक बाण लावले तर ते सर्वात उत्तम.

      जीपीएसमध्ये पन्नास किमी अंतर होत आले होते तरी चढ सुरु होण्याची चिन्हे दिसत नव्हती. अनोळखी रस्ता असल्यामुळे मीसुद्धा बुचकळ्यात पडलो होतो. लांबपर्यंत नजर टाकली तरी चढ दिसत नव्हता. पण पावागढ तर अगदी डाव्या हाताजवळ दिसत होता. ईथेच कुठेतरी चढ असायला हवा असा विचार करत असतानाच डावीकडे काटकोनातील वळण आले. तिथुनच वेगात सायकल चालवत सर्वजण त्या चढावर तुटुन पडले. हा प्रकार माझ्या लक्षात येईपर्यंत खुप ऊशिर झालेला होता. चढाच्या अगोदर स्प्रिंट न मारल्यामुळे मी सर्वात मागे राहीलो. सर्वात मागे म्हणजे पाचवा.

      शेवटचे ४ किमी अंतर हे निव्वल चढाचे होते. चढ कसा होता काय सांगु? तुम्ही लवासाला सायकलवर गेले असाल तर तिथे हेअरपिन सारख्या वळणावर एक चढ आहे, एकदम ऊभा चढ आहे तो. अगदी तसाच चढ होता आणि तोही थोडा ना थिडका ४ किमी अंतरापर्यंत तसाच चढ. १ किमी पर्यंत मी १२ च्या वर वेग ठेवु शकलो परंतु नंतर जोर लावणे शक्य होत नव्हते. पुढे सर्वात छोटा आणि मागे सर्वात मोठा गियर लावुनही एकेक मीटर अंतर कापण्यासाठी महत्प्रयास करावे लागत होते. पॅडलवर मी ऊभा राहीलो तरी सायकल हालत नव्हती. माझी अवस्था दयनीय झाली होती. माझ्या आयुष्यात मी कधीही एवढी तीव्र चढण असलेला चढ सायकलवर पार केलेला नव्हता. सिंहगडचा चढ सुद्धा यापुढे फिका पडावा अशी याची महीमा वाटत होती. माझ्या पुढे असलेल्या स्पर्धकाला ६० ते ७० मीटरचे अंतर कमी करुन मी गाठले परंतु त्याला ओव्हरटेक करुन पुढे जायच्या वेळेस नेमका डाव्या पायाच्या पोटरीमध्ये क्रँप आला आणि मला नाईलाजास्तव थांबावे लागले. फक्त ४०० मीटर अंतर राहीलेले होते. क्रँप घालवण्यासाठी मला ३० सेकंदाचा ब्रेक घ्यावा लागला. 1 तास 55 मिनिटे आणि ७ सेकंदांनी मी रेस पुर्ण केली आणि माझ्या वयोगटात पाचवा आलो.

      जमेची बाजु म्हणजे पुण्याच्या अंजली भालिंगे यांनी त्यांच्या वयोगटात निर्विवादपणे विजय मिळवला. खुल्या गटातील विजेता मेहेरजाद ईराणी याने तो शेवटचा जीवघेणा चढ अवघ्या तेरा मिनिटांमध्ये पार केला हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य. नाष्टा, चहा झाल्यानंतर सातकमान या जगप्रसिद्ध ठिकाणी बक्षिस समारंभ घेण्यात आला.

            स्पर्धा संपल्यानंतर सर्व स्पर्धकांच्या सायकल्स टेम्पोमध्ये टाकुन आणि सर्व स्पर्धकांना वातानुकुलित बसमध्ये बसवुन अमितनगर सर्कलपर्यंत म्हणजे सकाळी जिथुन शर्यत सुरु झाली त्याठिकाणी आणण्यात आले. संयोजकांची ही व्यवस्था मला खुपच आवडली.  


Click here for online race results:
Race Results

स्पर्धेतील विजेते:
पुरुष खुला गट -
1) मेहेरजाद ईराणी - 1:32:49
2) पार्थ जरीवाला - 1:33:48
3) कुणाल महावीर - 1:33:49

महीला खुला गट -
1) अर्पिता पांडया - 1:54:53
2) मैत्री प्रधान - 1:55:19
3) जरुल वोरा -  2:00:21

पुरुष (४०+)
1) तेजस जरीवाला - 1:52:12
2) मितेश बाळु - 1:52:35
3) महेंद्र अहीर - 1:52:41
4) राघवेंद्रसिंह झाला - 1:54:36
5) विजय वसवे - 1:55:07 (Strava Activity)

महीला (४०+)
1) अंजली भालिंगे - 1:55:44
2) जागृतीकुमारी राठोड - 2:07:27
3) सुशिला सिंग - 2:07:29








बडोद्याच्या अलिकडे चहा-नाष्टा ब्रेक

बडोदा विमानतळ

बडोदा भटकंती

बडोदा भटकंती

बडोदा भटकंती, महाराजा सयाजीराव बडोदा विद्यापीठ

हॉटेल कल्याण, फतेहगंज

हॉटेल कल्याण, फतेहगंज

हॉटेल कल्याण, फतेहगंज

काठीयावाडी थाळी, अनलिमिटेड ६० रुपये

काठीयावाडी थाळी, अनलिमिटेड ६० रुपये

काठीयावाडी थाळी, अनलिमिटेड ६० रुपये


ईस्कॉन टेम्पल, बडोदा

बिब कलेक्शन 

बिब कलेक्शन, पार्थ एन्टरप्रायजेस 

रेससाठी तयार

रेस संपल्यानंतर पहीले काम कोणते केले असेल तर ते म्हणजे सेल्फी काढली

रेस संपल्यानंतर पहीले काम कोणते केले असेल तर ते म्हणजे सेल्फी काढली


बिब नंबरच्या बदल्यात मेडल मिळाले.

At start line above 40

Go..Go..Go..




Start line women




Near finish line

finished




He was matching speed of roadbike using MTB









मी, माझी मेरीडा आणि फिनिशरचा बोर्ड 

मी, माझी मेरीडा आणि फिनिशरचा बोर्ड 

जेष्ठ महीलांमध्ये पुण्याच्या अंजली भालिंगे विजयी

स्पर्धेतील सर्व विजेते


Add caption








विजेता मेहेरजाद ईराणीच्या सायकलचे चाक

स्पर्धकांच्या सायकल्स पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी घेऊन जाणारा टेम्पो

स्पर्धकांना रेसच्या सुरुवातीच्या ठिकाणी घेऊन जाणारी वातानुकुलित बस 

Epruve de Costa Finisher Medal

बडोद्यातील शेवटची काळी विदाऊट साखर


x

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...