Thursday 22 March 2018

Olympic Distance Triathlon at Balewadi

माझी पहीली ऑलिम्पिक ट्रायथलॉन 


"ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रायथलॉन"
दि. ११ मार्च, २०१८
स्थळ: बालेवाडी स्टेडीयम
आयोजक: रिक्रीएशनल ट्रायथलीट ग्रुप (अनिरबन मुखर्जी आणि सर्व व्हाटसअप ग्रुप मेंबर्स)
प्रवेश: आमंत्रितांसाठी मर्यादीत

पार्श्वभुमी आणि स्वरुप:
पुण्यामध्ये ट्रायथलॉन म्हटले की लोकांच्या काळजात धडकी भरते, का ते विचारु नका. अगदीच सांगायचे झाले तर त्यात भाग घेतलेल्या मित्रांनी तसे अनुभव कथन केलेले मी ऐकले आहेत. माझ्या सुदैवाने मी त्या इंटरनॅशनल ट्रायथलॉनमध्ये सहभागी झालेलो नव्हतो. माझी ट्रायथलॉनची सुरुवात करताना मी योग्य व्यक्तीकडुन प्रेरणा घेतली हे माझे सुदैव. ११ मार्चला बालेवाडी स्टेडीयम येथे अनिरबन मुखर्जी आणि सर्व आरटी (रिक्रीएशनल ट्रायथलीट) ग्रुपने मिळुन ऑलिम्पिक ट्रायथलॉन  आयोजित केली होती. खुप दिवसांनी आपल्याच पुण्यामध्ये ट्रायथलॉन करावयास मिळणार असल्यामुळे कधी एकदा याच्यात भाग घेतोय असे झाले होते. या ट्रायथलॉनविषयी बोलायचे झाले तर शब्दसुद्धा कमी पडतील. एक छोटीशी संकल्पना समोर आल्यानंतर सर्वांनी मिळुन हातभार लावला तर बघता बघता तिचा वटवृक्ष कसा होतो हे मी प्रत्यक्ष अनुभवलेले आहे.  आमच्या रिक्रीएशनल ट्रायथलीट व्हाटसअप ग्रुपमध्ये याविषयी येणारे सर्व मेसेज वाचले तर याची लगेच कल्पना येईल. अनिरबन मुखर्जी आणि विशी उपाध्याय यांनी मांडलेली संकल्पना अतिशय भव्यदिव्य स्वरुपात साकारली गेली आणि त्यासाठी ग्रुपमधील सर्व सभासादांनी यथाशक्ती मदत केली हेही तेवढेच खरे आहे. काहीजण प्रायोजक झाले, कोणी आयर्नमॅन झालेल्यांची तसेच फुल ट्रायथलॉन पुर्ण केलेल्यांची फि स्पॉन्सर केली, कोणी एनर्जी बार दिले, कोणी अल्पोपहार दिला, कोणी हे दिले तर कोणी ते दिले आणि जे वोलंटियर झाले त्यांनी त्यांचा मौल्यवान वेळ या ट्रायथलॉनसाठी दिला. या ट्रायथलॉनसाठी सर्वांनी मनापासुन हातभार लावला यात काहीच शंका नाही. आणि या सर्वांचा उत्साह पाहुन असे जाणवले की आगामी काळात पुण्यामध्ये ट्रायथलॉनला नक्कीच चांगले दिवस येणार आहेत. 
ही माझी तिसरी आणि ऑलिम्पिक अंतराची पहीलीच ट्रायथलॉन. याअगोदर मी हाफ ट्रायथलॉन कोल्हापुरमध्ये आणि फुल ट्रायथलॉन चेन्नईमध्ये केलेली आहे. आणि आता आपल्याच पुण्यामध्ये ऑलिम्पिक अंतराची ट्रायथलॉन करायला मिळणार असल्यामुळे मी खुप आनंदात होतो. साधारणपणे ट्रायथलॉनचा प्रवास हा ऑलिम्पिक कडुन फुलकडे जाणारा असतो पण माझा प्रवास हा हाफ नंतर फुल आणि फुल ट्रायथलॉनकडुन ऑलिम्पिक ट्रायथलॉनकडे झालेला आहे. अपना ऐसाच रहता है. 
ट्रायथलॉनचे प्रकार माहीत होण्यासाठी ईथे प्रकारांची माहीती देत आहे. (गुगलकडुन साभार).

type
Swim
Bike
Run
Sprint
0.5 mi (750m)
12.4mi (20km)
3.1mi (5km)
Olympic/5150
0.93mi (1.5km)
24.8mi (40km)
6.2mi (10km)
ITU Long
1.86mi (3km)
49.6mi (80km)
12.4mi (20km)
Half/70.3
1.2mi (1.9km)
56mi (90km)
13.1mi (21km)
Full/140.6
2.4 mi (3.8km)
112mi (180km)
26.2mi (42km)

याविषयी अधिक माहीती हवी असल्यास गुगलवर मिळेल

सोशल मिडीयाचा सदुपयोग कसा होऊ शकतो हे मी या ट्रायथलॉनवरुन शिकलो. अनिरबन मुखर्जी यांनी अतिशय अभ्यासपुर्वक या स्पर्धेचे नियम आणि आराखडा बनवलेला होता. 1.5 किमी पोहणे (सर्कल स्विम) बालेवाडी पुलमध्ये होणार होते, 40km सायकलिंगचा मार्ग हा पुर्णपणे एनएच4 वर होता (मुंबई-पुणे बाह्यवळण मार्ग) तर 10 किमी धावण्यासाठी बालेवाडी स्टेडीयमचा अंतर्गत परीसर निवडण्यात आलेला होता. नाव नोंदवलेल्या प्रत्येकाला 1.5km स्विमिंगसाठी किती वेळ लागेल हे विचारण्यात आले होते आणि त्या-त्या वेळेनुसार ग्रुप बनवण्यात आले होते. पोहण्यासाठी मी अंदाजे ४५ मिनिटे लागतील असे सांगितले होते. मी चेन्नईची फुल आयर्न ट्रायथलॉन पुर्ण केलेली असल्यामुळे मला प्रवेश फी भरावी लागली नाही कारण फुल ट्रायथलॉन पुर्ण करणारांची प्रवेश फि व्हाटसअप ग्रुपमधील कोणीतरी प्रायोजित केली होती. 

पुर्वतयारी:
विशेष म्हणावा असा काहीही सराव केला नाही, मोजुन फक्त ३ वेळा पोहण्याचा सराव करावयास गेलो होतो. पहीला दिवस तर तोंडाने हवा घेण्याचा आणि तीच हवा नाकाने पाण्यात सोडण्याचा सराव करण्यातच गेला. तसेच पाण्यात लाथा मारण्याचाही थोडा सराव केला ज्यामध्ये मी अजुनही नवशिका आहे. दुसर्या दिवशी 60 मी अंतराच्या ४ इंटरवल्स केल्या आणि तिसर्या दिवशी न थांबता 1200 मी अंतर पोहलो. एवढ्यावर ऑलिम्पिक ट्रायथलॉनसाठी पोहण्याचा सराव संपवला. आनंदनगर, सिंहगड रोड येथील रमेश वांजळे जलतरण तलाव आच्छादीत असल्यामुळे तेथील पाण्याचे तापमान बाहेरील वातावरणापेक्षा खुपच कमी असते. अशा थंड पाण्यात पोहल्यामुळे शुक्रवार आणि शनिवार शिंका आणि सर्दीमय वातावरणात गेला. रविवारची ट्रायथलॉन धोक्यात येते की काय अशी परीस्थिती निर्माण झाली होती. एवढी सर्दी झाली की कधीही सुट्टी न घेणारा मी शनिवारी दांडी मारुन घरी राहीलो. चक्क...! कामाला जाऊ शकलो असतो पण दुसर्या दिवशी ट्रायथलॉनमध्ये भाग घेता आला नसता. सुट्टी घेऊन घरी राहील्यामुळे नाकाला चांगला आराम मिळाला, शनिवारी अंथरुणावरुन न ऊठता सर्दीवरील सर्व उपचार घेतले आणि रविवारी ट्रायथलॉनसाठी तयार झालो.. संध्याकाळच्या वेळेस सायकलवर कात्रज बोगद्यापर्यंत जाऊन आलो आणि घराशेजारील चढावर थोड्या स्प्रिंट (रनिंग) मारल्या. यावरुन अंदाज आला की मला ही ट्रायथलॉन करता येऊ शकते आणि मी खुप आनंदी झालो. 

बालेवाडी स्टेडीयम:
पुण्यातल्या पुण्यातच ट्रायथलॉन असल्यामुळे यावेळेस हॉटेल रुमवर वगैरे राहण्याचा प्रश्नच नव्हता. सौ. ने पहाटे ४ वाजता मला झोपेतुन जागे केले आणि आंघोळीचे काय विचारले? आता ट्रायथलॉनमध्ये जाऊन पोहायचेच असल्यामुळे मला आंघोळ करण्याचा त्रास सहन करुन घेण्याची बिलकुल ईच्छा नव्हती. बालेवाडीसाठी मी घरातुनच सायकल घेऊन निघालो. सायकल कारला लावुन घेऊन गेलो असतो पण मित्र म्हणाले असते बघा १८ किमी अंतरासाठी आयर्नमॅन कार घेऊन आला. जरी मी अजुन आयर्नमॅन पुर्ण केलेले नसले तरी सर्व मित्र मला आतापासुनच आयर्नमॅन म्हणतात, तुझ्यासाठी काहीही अवघड नाही रे, ते तु पुर्ण करणारच आहेस असा त्यांचा गाढ विश्वास माझ्यावर आहे. माझा माझ्यावर जेवढा विश्वास नाही तेवढा माझ्या मित्रांचा माझ्यावर आहे. हे मित्रप्रेमच दुसरे काय! अलीएक्सप्रेसवरुन मागवलेल्या टॉर्चच्या लख्ख उजेडात मी बालेवाडी स्टेडीयमला पहाटे साडेपाच वाजता पोचलो. मला वेळेचे बंधन पाळायला खुप आवडते. खुप आवडते म्हणण्यापेक्षा वेळ पाळण्याची खुजली आहे असे म्हटले तरी चालेल. भारतात राहुन वेळेचे बंधन पाळणार्या दुर्मिळ प्राण्यांमधील मी एक. वेळ न पाळणार्या निर्ढावलेल्या पशूंच्या या जगात वेळ पाळण्याचा निष्पापीपणा मी जोपासतो. पावणेसहाला रीपोर्टींग करायला सांगितलेले होते, मी साडेपाचला तिथे हजर झालो आणि बघतोय तर काय सगळे वोलिंटीयर्स माझ्या अगोदरपासुन तिथे हजर होते आणि आपापल्या कामालाही लागलेले होते. हा एक सुखद धक्का होता. वेळ पाळण्यामध्ये आपल्यापेक्षाही कोणीतरी सरस आहे हे पाहुन खुप बरे वाटले. अनिरबन मुखर्जी आणि शारदा हेरवाडकर-कुलकर्णी त्यात अग्रणी होते. अनिरबन सरांनी छोटासा लाऊडस्पीकर आणलेला होता आणि त्यावर त्यांचे सुचना देण्याचे काम अविरत सुरु होते. त्या सुचनाही खुप अभ्यासपुर्वक तयार करण्यात आलेल्या होत्या. मला सुचनांचे पालन करायला खुप आवडते. सुचनांमध्ये प्रामुख्याने सायकलमार्गावरील सुरक्षाविषयी सुचनांचा जास्त समावेश होता. माझा बिब नंबर १९ मी माझ्या दोन्ही दंडांवर वोलिंटीयर्सकडुन कोरुन घेतला. डॅरील, नंदु आणि नेहा फोटोग्राफीची जबाबदारी सांभाळणार होते आणि अनुज करकरेने तर व्हिडीओ शुट करण्यासाठी द्रोन आणलेला होता. म्हणजे आज आमची मज्जा होती. या ट्रायथलॉनमधील सायकल पार्कींगची व्यवस्था अलिशान होती. ट्रायथलॉनचे साहीत्य ठेवायला दिलेला बॉकस उत्तम दर्जाचा होता. पिवळ्या रंगाच्या बॉक्सवर प्रत्येकाचा बिब नंबरदेखील चिटकवलेला होता. पायाखाली लाल कार्पेट होते. पुलमधुन पळत आल्यावर पायाला ईजा होऊ नये म्हणुन याचा खुप उपयोग होतो. बाईक अडकवण्यासाठी आडवा लोखंडी पाईप मजबुतरीत्या बांधलेला होता. वोलिंटीयर्सनी दिलेली बिब नंबर १९ ची छापील प्रत मी सायकलला बांधली. ट्रायथलॉनमध्ये लागणार्या सर्व वस्तुंचा क्रम व्यवस्थित लावुन घेतला. मागच्या ट्रायथलॉनमध्ये काय काय चूका केल्या त्या स्मरुन या वेळेस योग्य ती खबरदारी घेतली. त्यानंतर पिनट बटरचा एक सॅचेट आणि एक मीठाची गोळी घशाखाली उतरवली. पिनट बटर म्हणजे माझे जीवन आहे. पिनट बटरमधुन जी ऊर्जा मला मिळते ती मला ईतर कशातुनही मिळत नाही. 

१.५ किमी पोहणे:
आता पोहण्याच्या तलावाकडे जाण्याची वेळ झालेली होती. बालेवाडी स्टेडीयममधील कृत्रिम तलावामध्ये मी प्रथमच प्रवेश करणार होतो. आयुष्यात या तलावात याची देही याची हातापायाने पोहायला मिळेल असे कधीही वाटलेले नव्हते. आयुष्य कसे बदलेल याचा काही नेम नाही. माझे आयुष्य बदलले ते या ट्रायलाईफमुळे म्हणजे ट्रायथलॉनमुळे. पोहण्याच्या अगोदर शरीराला पाण्याचा स्पर्श व्हावा म्हणुन पाण्यामध्ये स्वैर ढुंबुन घेतले आणि हातापायांची हालचाल करुन सर्व स्नायु मोकळे करुन घेतले. पाण्यातुन बाहेर आल्यावर थंडी वाजायला लागली त्यामुळे पुन्हा पाण्यातल्या ऊबेमध्ये जाऊन बुडालो. पोहण्याचा गॉगल डोळ्यांवर लावण्या अगोदर आतल्या काचेवर मस्त थुंकी लावली. हो, थुंकीच, काचेला आतल्या बाजुने थुंकीचा स्पर्श दिल्यावर धुके जमा होत नाही आणि पोहताना आपल्या दृष्टीला अडथळा येत नाही. साडेसहा वाजत आलेले होते. मी कौस्तुभ राडकर सरांना पाहील्यावर त्यांच्याशी हस्तांदोलन करुन आलो. कानात प्लग लावल्यामुळे राष्ट्रगीत चालु झालेले मला कळलेच नाही. सर्वजण राष्ट्रगीतासाठी स्तब्ध ऊभे राहीले होते आणि ते संपताच सर्वजण जय्यत तयारीत ऊभे राहीले. अनुजचा द्रोन सर्व तलावाभोवती घिरट्या घालुन सर्वांना कॅमेर्यामध्ये कैद करत होता. बरोबर साडेसहा वाजता पाण्यातील धुमश्चक्रीला सुरुवात झाली. कौस्तुभ राडकर सरांनी सर्वप्रथम पाण्यात उडी घेतली आणि आम्ही निम्मे अंतर पार करेपर्यंत ते पलीकडे जाऊन परतत असताना आम्हाला भेटले. हा काय वेग म्हणायचा का काय? त्यांनी १५०० मीटर अंतर २० मिनिटांत पार केले. ५० मी च्या ३० फेर्या मारायच्या होत्या. लेन नं ६ मधुन सर्वप्रथम मी पाण्यात झेपावलो होतो. पहीले १००मी अंतर वेगात पार केले (माझ्यादृष्टीने) आणि त्यानंतर जे हृदयाचे ठोके वाढण्यास सुरुवात झाली ते संपुर्ण १५०० मीटर अंतर पुर्ण होईपर्यंत काही कमी झाले नाहीत. ईथुन पुढे पोहण्याचा सराव करताना मला हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष केंद्रीत करावे लागणार एवढे मात्र नक्की. म्हणायला फ्रि-स्टाईलने पोहतोय पण व्हिडीओमध्ये मी सापासारखा पोहतोय असे दिसत होते. स्विमिंग हा माझा पिंड नसल्यामुळे कशीतरी वेळ मारुन नेणे आणि पाण्यातुन सहीसलामत बाहेर येणे हा माझा एकमेव उद्देश असतो. काहीच न येण्यापेक्षा काहीतरी येतंय हेही नसे थोडके. पाण्यातुन सहीसलामत बाहेर पडलो की पोहण्याचा विषय संपणार होता. चिंचवडमधील सुशिल मोरे ट्रायथलॉन पाहण्यासाठी आलेले होते त्यांनी आमचे पोहताना फोटो तसेच व्हिडीओ शुटींग काढले. त्या व्हिडीओमुळे मी स्वत:ला पोहताना पाहु शकलो. आमच्या लेनमधुन वैभव ठोंबरे सर्वप्रथम बाहेर पडला आणि त्याच्यामागोमाग मी बाहेर पडलो. पुलच्या बाहेर झेप घेत मी लाल रंगाच्या गालिच्यावरुन वेगात पळत सुटलो. अनिरबन सरांनी स्पीकरवर खास उल्लेख करुन सांगितले की, "विजय जरा हळु...". त्या गडबडीतही मी घड्याळात पाहायला विसरलो नाही. सात वाजुन बारा मिनिटे झालेली होती म्हणजे १५०० मीटर पोहण्यासाठी मी ४२ मिनिटांचा वेळ घेतलेला होता जो माझ्या दृष्टीने अतिशय उत्तम होता. गार्मिन वॉच नसले तरी आपले साधे स्टॉपवॉचसुद्धा तेच काम करते. मी पोहण्याचा अधिक सराव करीत नसल्यामुळे पोहताना माझ्या हृदयाचे ठोके नेहमीच टॉप गियरवर गेलेले असतात. ओल्या ट्रायसुटवरुन टॉवेल वरखाली करुन अंगावरचे पाणी कमी करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस ट्रायसुट असल्यामुळे कपडे बदलण्याची तसदी घ्यावी लागणार नव्हती. खुप वेगात हालचाली व्हाव्यात असे वाटत होते परंतु मी नुकताच जलचरचा भुचर झाल्यामुळे तसे करणे शक्य होत नव्हते. स्विमिंगचे साहीत्य बॉक्समध्ये फेकुन दिले आणि सायकलिंगचा क्लिटशुज पायामध्ये चढवला. पीनट बटर तोंडात बसेल तेवढे बसवले आणि सायकल हातात धरुन पळत सुटलो. एवढ्या घाईतही मी हेल्मेटचा स्ट्रॅप लावायला विसरलो नव्हतो.

४० किमी सायकलिंग:
पाण्यातुन बाहेर येऊन सायकलवर बसेपर्यंत ४ मिनिटांचा वेळ गेलेला होता. बाईक सुरु (Bike Start) असे जिथे लिहलेले असेल तिथे गेल्यावरच सायकलवर बसुन सायकल चालवायला सुरुवात करायची असते, त्या रेषेच्या अगोदर सायकलवर बसल्यास पंच तुम्हाला दंड करु शकतात. दंड म्हणजे ५ ते १० मिनिटांचा दंड वगैरे. जसे क्रिकेटमध्ये चेंडु टाकताना रेषेच्या अलीकडे पाय असावा लागतो तसे ट्रायथलॉनमध्ये रेषेच्या पलीकडे जाऊन सायकलवर बसावयाचे असते. शारदा कुलकर्णी यांनी ७ वाजुन १६ मिनिटांची वेळ नोंदवली आणि मी बाईकवरुन स्वार होऊन सुसाट निघालो. हृदयाचे ठोके १६० च्या वर गेलेले होते. बालेवाडी स्टेडीयममधील महाराजांच्या पुतळ्याजवळुन जाताना राजास्नी मुजरा करायला माझे हात विसरले नाहीत. "मुजरा...राजं...मुजरा..." म्हणतच या देहाने पुढे मार्गक्रमण केले. राजांचा अश्वारुढ पुतळा नजरेस पडताच एक चैतन्याची लहर अंगाखांद्यातुन सळसळत पायापर्यंत गेली. जणुकाही मी राजांची आज्ञा घेऊन खानाच्या फौजेवर चालुन निघालोय असेच मला वाटायला लागले होते. फरक एवढाच होता की मी घोडयाऐवजी सायकलवर चाललो होतो. 
पोहताना वाढलेले हृदयाचे ठोके अजुनही १६०च्या वरच दिसत होते. क्षणाचाही विलंब न करता मी सर्विस रोड पार करुन माझ्या आवडत्या महामार्गावर आलो. माझ्या ओळखीचा महामार्ग, तोच महामार्ग ज्याच्या अंगाखांद्यावर बागडत मी सायकलिंगचे धडे गिरवले. तोच नेहमीचा रस्ता, तीच नदी, तेच उड्डानपुल, प्रवासी भरण्यासाठी महामार्गावर गर्दी करणार्या त्याच नेहमीच्या बस, अवजड वाहनांची मंदगती आणि बेंबीच्या देठापासुन निघणारा त्यांचा तोच गोंगाट, फास्ट लेनमधुन तुफान वेगात जाणार्या त्याच महागडया कार्स, तोच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग, तेच देहुरोड जंक्शन, तोच तोलनाका आणि तीच सोमाटण्याची खिंड. या मार्गावर अनेकानेक राईड केलेल्या असल्यामुळे येथील प्रत्येक चढ आणि उताराशी मी चांगलाच परीचित होतो. यात वेगळेपणा एकच होता तो म्हणजे ठिकठिकाणी मदतीसाठी थांबलेले वोलिंटीयर्स. चारझलने सायकलमार्गाची पुर्ण जबाबदारी स्विकारलेली होती. चंद्रकांत पाटील वाकड चौकात, प्रशांत जोग पुणे-मुंबई एक्सप्रेस महामार्गाजवळ, निरज विश्वकर्मा सोमाटणे खिंडीत तर मेजर किरीट कोकजे यु-टर्नजवळ सज्ज होऊन थांबलेले होते. आणि अजुनही बरेच वोलिंटीयर्स होते ज्यांची मला नावे माहीत नाहीत. सायकल चालवणारे ट्रायथलीट जवळ आले की हे सर्व वोलिंटीयर्स ईतर वाहनांना एकतर अडवुन धरत किंवा बाजुला होण्याचा ईशारा करुन सायकल चालवणार्यांसाठी रस्ता मोकळा करुन देत होते. या मित्रांमुळे सायकल चालवताना इतर वाहनांचा कसलाही अडथळा जाणवला नाही. 
सायकल चालवताना माझी नजर फक्त समोर दिसणार्या डांबरी रस्त्यावर, डाव्या बाजुला असलेल्या पांढर्या पट्टीवर आणि हॅंडलबारला अडकवलेल्या जीपीएसमधील आकडयांवर होती. जीपीएसमध्ये बदलणार्या आकड्यांनुसार मी माझ्या पायांचा जोर कमी जास्त करत होतो. सरासरी वेग ३५ किमी/तास येण्यासाठी सायकलचा वेग सतत ३५च्या वर कसा राहील यासाठी मी यथाशक्ती प्रयत्न करत होतो. सायकल किती वेगाने पळत आहे आणि हृदय किती वेगाने धडधडतंय हे मला जीपीएसमध्ये दिसत होते. हृदयाचे ठोके सतत १६५च्या वर होते. चढावर कमी झालेल्या वेगाची भरपाई करण्यासाठी मी उतारावर मिळणार्या वेगाचा भरपुर उपयोग करुन घेत होतो. चढावर मला अजुनही २५चा सरासरी वेग ठेवता येत नाही त्यामुळे एकुण सरासरी वेग नियंत्रणात आणण्यासाठी उतारावरसुद्धा मला खुप मेहनत घ्यावी लागत होती तेव्हा कुठे अपेक्षित असलेला सरासरी वेग मिळत होता. १ तास १६ मिनिटांच्या अथक परीश्रमांनंतर ८ वाजुन ३२ मिनिटांनी मी बालेवाडी स्टेडीयममध्ये पोचलो. माझी सायकल हायब्रीड प्रकारची आहे, हायब्रीडच ती...पळुन पळुन किती पळणार बिचारी, तरीसुद्धा ३२ चा सरासरी वेग आलेला होता. सायकलिंग संपल्यावर ’सुटले एकदाची’ म्हणत माझ्या सायकलने सुटकेचा निश्वास टाकला. सायकल समाप्त (Bike End) लिहलेल्या ठिकाणी पोचल्यानंतर सायकलवरुन उतरलो आणि सायकल पार्कींग पर्यंतचे अंतर सायकलला हाताने ढकलत पळत पळत पार केले. बाईक एन्ड लिहलेल्या ठिकाणाच्या अलीकडे सायकलवरुन न उतरल्यास वेळेचा दंड होऊ शकतो. ज्यांना आयर्नमॅनमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी हे नियम आत्मसात करणे गरजेचे आहे. सायकल बारला अडकवली आणि क्लिटचा शुज काढुन धावण्यासाठी नायकेचा शुज चढवला. हेल्मेटऐवजी ऊन्हाची टोपी डोक्यावर घेतली आणि तिसर्या आणि शेवटच्या प्रकारासाठी सज्ज झालो. धावायला सुरुवात केली तेव्हा ८ वाजुन ३६ मिनिटांची वेळ झालेली होती. 

१० किमी रनिंग:
दोन्ही ट्रान्झीशनची वेळ जवळजवळ सारखीच म्हणजे ४-४ मिनिटे आलेली होती आणि आतापर्यंत २ तास ६ मिनिटांमध्ये १५०० मीटर पोहणे आणि ४० किमी सायकलिंग उरकलेले होते. अनिरबन सरांनी नाव नोंदवतानाच अपेक्षित वेळा विचारलेल्या होत्या त्यात मी पोहण्यासाठी ४५ मिनिटे, सायकलसाठी ९० मिनिटे आणि धावण्यासाठी ७० मिनिटांचा वेळ लागेल असे अंदाजे सांगितलेले होते. त्यापैकी पोहण्यासाठी ४२ मिनिटे आणि सायकलिंगसाठी ७६ मिनिटे लागलेली होती. आता १० किमी अंतर ७० मिनिटांच्या आत उरकण्याचे आव्हान माझ्यासमोर ऊभे ठाकले होते. आतापर्यंतचा अनुभव असा होता की सायकलिंगनंतर लगेच धावायला सुरुवात केली की माझ्या पायांकडुन फारसा प्रतिसाद मिळत नसे आणि पहीले २ किमी अंतर पळण्यासाठी प्रचंड त्रास होत असे. यावेळेस मात्र पहील्या किमी साठी मला सात मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला. ही माझ्यासाठी खुप समाधानाची बाब म्हणावी लागेल. काहीतरी सुधारणा होत चालली आहे हे काही कमी नाही. अनिरबन सर धावण्याच्या ट्रॅकच्या मध्यभागी थांबुन सर्वांचे व्हिडीओ आणि फोटो काढत होते तसेच सर्व ट्रायथलीटसला मोठ्या आवाजात प्रोत्साहनही देत होते. यु-टर्न घेऊन पुन्हा त्याच मार्गावरुन माघारी आलो. अडीच किलोमीटर अंतर पुर्ण झाले होते आणि त्यासाठी सोळा मिनिटांचा वेळ लागलेला होता. थोडावेळ थांबलो, पाणी पिलो, संत्र्याच्या फोडीला मीठामध्ये बुचकळुन पोटात ढकलले आणि दुसर्या फेरीला सुरुवात केली. शारदा आणि त्यांच्या वोलिंटीयर्स टिमने तेथील चेकपॉइंट उत्तमरीत्या सांभाळलेला होता. त्यांनी कोणालाही कसलीही कमतरतेची जाणीव होऊ दिली नाही. अनुज करकरेंचा द्रोन सर्व ट्रॅकवर घिरट्या घालुन सर्वांचे व्हिडीओ घेण्यात मग्न होता. डॅरील सरसुद्धा सर्वांचे फोटो घेत होते. यु-टर्नवरील चेकपॉइंटवर हेच काम नेहा गोरे करत होत्या. सर्वांची फोटोग्राफी उत्तमरीत्या चाललेली होती. नंदुसरांनी सोमाटणे खिंडीत सर्वांना कॅमेर्यामध्ये कैद केलेले होते. 
दुसरी फेरी चालु केली तेव्हा जवळजवळ सर्व स्पर्धक धावण्याच्या मार्गावर अग्रेसर झालेले होते म्हणजे सर्वांचे सायकलिंग संपलेले होते. त्यामधील काहीजणांशी माझी तुरळक ओळख होती तर काही एकदम जीवाचे जीवलग होते. सायकलींग, रनिंग आणि ट्रायथलॉन करता करता यांच्याबरोबर झालेली ही मैत्री खरंच दुर्लभ म्हणावी लागेल, या मैत्रीतील जिव्हाळा, ती आपुलकी आणि एकेमेकांना प्रोत्साहन देण्याची धडपड अवर्णनीय होती. एवढ्या आपुलकीने तुम्ही उत्साह वाढवणार असाल तर मी नुसता धावतच राहील रे मित्रांनो. अनिरबन सर तर प्रत्येकाचे नाव मोठ्याने उच्चारुन जोरात पळण्यासाठी सर्वांना उत्तेजित करत होते आणि त्याचबरोबर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ घेणेही चालुच होते. आमचे पळताना काढलेले व्हिडीओ त्यांनी फेसबुकवर लाईव पाठवले. पहील्या फेरीनंतर ऊन्हाचा तडाखा जाणावायला सुरुवात झाली होती. सुर्यनारायण त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन द्यायला लागले होते विशेषत: पळत असताना. ट्रायथलॉनमध्ये प्रथमच भाग घेणार्यांचा उत्साह ओसंडुन वाहत होता. सायकलिंग आणि रनिंगमधील बरेच मित्र उत्साह वाढवण्यासाठी आलेले होते. 
याअगोदर मी भाग घेतलेल्या ट्रायथलॉन्समध्ये सायकलिंग संपल्यानंतर लगेच धावायला सुरुवात केली की मला प्रचंड त्रास होण्याचा अनुभव आलेला आहे. त्रास म्हणजे पायाचे स्नायु पळायला लवकर तयार होत नाहीत. सायकलिंगच्या अवस्थेतुन पळण्याच्या अवस्थेत जाताना ते मला प्रचंड वेदना द्यायचे. पण यावेळेस तसे काही झाले नाही. काहीही कुरबुर न करता पायांचे स्नायु पळायला मदत करत होते. म्हणजे आता कुठे मी ट्रायथलॉनच्या नर्सरीत आलोय असे मला वाटायला लागले आहे. मजल दरमजल करत १० किमी अंतर पुर्ण होत आलेले होते. कमीतकमी सव्वातीन तासांच्या आत संपवण्याचा प्रयत्न म्हणुन मी शेवटचे ५०० मी अंतर खुप जोरात पळालो. निरज विश्वकर्माने माझ्याबरोबर शेवटचे १००मी अंतर धावुन मला छान साथ दिली. मजा आली. धन्यवाद निरज.
आणि अशा रीतीने ही अतिशय सुंदररीत्या आयोजित केलेली ऑलिम्पिक ट्रायथलॉन मी ३ तास १४ मिनिटांमध्ये पुर्ण केली. सुधारणेला भरपुर वाव आहे. पुढच्या वेळेस ही ट्रायथलॉन ३ तासांच्या आत उरकण्याचा माझा प्रयत्न असेल. पोहण्यावर खुप काम करावे लागणार आहे. पाण्यात लाथा मारण्यात मी अजुन कच्चा लिंबु आहे. पाण्यात लाथा मारण्याचे कसब आता मला शिकावे लागणार याविषयी माझेही दुमत राहीलेले नाही. सायकलिंगला रोडबाईक असेल तर तिथे मी ५ ते १० मिनिटे नक्कीच कमी करु शकतो, धावण्यामध्ये अजुन ५ मिनिटे कमी करायला हवीत (धावण्याचा सराव करण्याची गरज आहे) आणि पोहण्यामध्ये ३ ते ४ मिनिटांची सुधारणा करता आली तर मी यापुढील ऑलिम्पिक ट्रायथलॉन तीन तासांमध्ये पुर्ण करु शकतो असा मला विश्वास वाटत आहे. 
फिंगर्स क्रॉस्ड !!


माझी वेळ:
पोहणे:         अंतर १५०० मी
        ४२ मिनिटे (सापासारखी फ्रि स्टाईल)
टि-१ : ४ मिनिटे
सायकलिंग: अंतर ४० किमी
        १ तास १६ मिनिटे (३२ किमी/तास)
टि-२ : ४ मिनिटे
धावणे: अंतर १० किमी
        ६८ मिनिटे
                  ३ तास १४ मिनिटे

या स्पर्धेतील पहीले १० ट्रायथलीट:
1. निल डिसुझा २.२५
2. अंकुश गुप्ता २.३१
3. मनिश नंबियार २.३३
4. निहाल बेग २.३४
5. वैभव रामतिर्थे २.३६
6. रोहीत २.४८
7. स्वप्निल भोसले २.४९
8. पियुष २.५०
9. अनुपम खंडुजा २.५१
10. नितिन घोरपडे २.५३
बक्षिस समारंभ:
स्पर्धा संपल्या संपल्या लगेचच बक्षिस समारंभाचे आयोजन करण्यात आले. अनिरबन सरांनी छोटेखानी पण अतिशय सुंदररीत्या बक्षिस समारंभाचे सुत्रसंचालन केले. बोलता बोलता छोटे छोटे विनोद करुन प्रेक्षकांच्या मुखावर हास्य आणण्याचे कौशल्य त्यांना चांगलेच अवगत आहे. सर्व विजेत्यांचे यथोचित कौतुक करण्यात आले. विजेत्यांना बक्षिस म्हणुन रोख रक्कम आणि काही व्हावचर सुद्धा देण्यात आली. तसेच सर्व प्रायोजकांचे आभार मानण्यात आले आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले.

फोटोग्राफी (साभार):
डॅरील ग्रीन, नंदु, नेहा गोरे आणि अनुज करकरे
अल्पोपहार:
सॅंडविच, कलिंगड ज्युस
वेळेशी संबंधित आकडेवारी:
शारदा हेरवाडकर-कुलकर्णी
मुख्य संकल्पना आणि आयोजन:
अनिरबन मुखर्जी 
विशेष सहकार्य:
विशी उपाध्याय, वैभव ठोंबरे (बालेवाडी स्विमिंग पुल)
प्रमुख पाहुणे:
कौस्तुभ राडकर (२० वेळा आयर्नमॅन)



Drone Video By Anuj Karkare

Photo Link by Nandu

Clicks by Darryl Green
Facebook Group

Clicks by Neha Gore
Facebook post


Photos:

बाईक लावुन पोहायला जाण्यासाठी तयार

सर्वजण वेळेअगोदर हजर होते

वोलिंटीयर्स टिम

पोहण्याअगोदर सराव करताना

राष्ट्रगीत संपल्यानंतर पाण्यात उडी घेण्यास सज्ज





सोमाटणे खिंड (फोटो - नंदु )

आला एकदाचा यु-टर्न 




यु-टर्न घेताना (क्लिक - डॅरील ग्रीन)


यु-टर्न घेताना (क्लिक डॅरील ग्रीन )
 (फोटो - नंदु )
सोमाटणे टॉप  (फोटो - नंदु )
 (फोटो - नंदु )
 (क्लिक डॅरील ग्रीन )
Swim, Bike, Run


द्रोनला एक पंच देताना (क्लिक डॅरील ग्रीन )
अनुजच्या अ‍ॅक्शन कॅमेर्यासमोर मस्ती करताना (क्लिक डॅरील ग्रीन )
चेन्नई ट्रायथलॉनमधील जोडीदार नितीन घोरपडे यांच्यासोबत ट्रायथलॉन पुर्ण केल्यावर गप्पा मारताना
Vaibhav Raamtirthe 02:36

Nihal Beg 02:34
Manesh Nambiar 02:33
Ankush Gupta 02:31


Neil Dsouza 02:25



Top 10






















































कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...