Friday 28 October 2022

केदारनाथ यात्रा


केदारनाथ यात्रा

    "हम भी एक दिन केदारनाथ आयेंगे महादेव, सुना है वहां स्वर्ग से हवा आती है" 2018 साली आलेल्या केदारनाथ या सिनेमातील या संवादाने मनाला खुप भुरळ घातलेली होती. त्यामुळे कधी एकदा केदारनाथ बाबाचे दर्शन घ्यायला जातोय असे झालेले होते. मी नेमका त्यावेळी आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारीत व्यस्त होतो. व्यस्त म्हणजे असा व्यस्त कि ज्याचे नाव तेच, "नो हिलिंग नो डुलिंग". अशा परीस्थितीमुळे फिरण्यासाठी किंवा तिर्थयात्रेसाठी बाहेर पडण्याचा विचारच करू शकत नव्हतो. आयर्नमॅनचा किताब मिळवण्यात दोन-तीन वर्ष गेली आणि त्यानंतर लगेच कोविड-19 ची महामारी आली. या महामारीमुळे उत्तराखंड सरकारने सलग दोन वर्षे कोणालाच केदारबाबाच्या दर्शनासाठी सोडले नाही. माझ्या व्यस्तपणामुळे सौ.ला सोबत घेऊन शेवटचे कुठे फिरायला गेलो होतो ते आठवतही नव्हते. कूठेच फिरायला जाता आलेले नव्हते. त्यामूळे "नवरा फिरायला नेत नाही" या जागतिक समस्येने मला ग्रासले होते. आणि हि समस्या लवकरात लवकर सोडवली नाही तर तिचे विस्फोटात रूपांतर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. माझी बायको यशोदा टूर्सकडुन माझ्यापेक्षाही जास्त ठिकाणे फिरून आलेली आहे परंतु सोबत जाण्याची मजा काही औरच असते.  


    फिरायला कुठे जायचे? या विषयावर बराच उहापोह झाला. मनुष्यनिर्मित कृत्रिम सौंदर्य पहायला मला अजिबात आवडत नाही. निसर्गसौंदर्य आवडते पण गर्दी गोंगाट नसेल तरच. फिरायला न्या पण कुठे फिरायला न्यायचे? हे पण तुम्हीच ठरवा. मग असे ठरले कि आपण धार्मिक स्थळांना भेटी देणे योग्य ठरेल. भगवंतांच्या कृपेने आपण जे काही आहोत त्याचा सदुपयोग व्हावा. बाकीचे लोक परदेशात फिरायला जावोत नाहीतर कुठेही जावोत आपल्याला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. मोर नाचला म्हणुन लांडोर नाचवायची नाही. एकेक करून आपण भगवान शंकरांची बारा ज्योतिर्लिंगे पाहु असे ठरले. सर्वप्रथम उज्जैनला जाऊन महाकाल दर्शन घेऊन आलो. रेल्वेप्रवास करून अगदी सहजगत्या दर्शन करता येणारे ज्योतिर्लिंग म्हणजे उज्जैनचे महाकाल. तिथे भोलेबाबाची अशी कृपा झाली कि एक पैसाही न देता थेट लिंगावर माथा टेकवुन दर्शन घेता आले. जवळच असणारे ओंकारेश्वर आणि इंदोरही उरकुन घेतले. इंदोरच्या खाऊगल्लीचा आवर्जुन आस्वाद घेतला. त्यानंतर आम्ही थेट वैष्णोदेवी यात्रा करून आलो. आणि केदारनाथ दर्शनासाठी ऑगस्टमध्ये जाण्याचे ठरले. जागतिक समस्येवर मात करण्याचे हे प्रयत्न.


    ऑगस्ट महीना निवडल्यामुळे खुप लोकांनी खुप टिका केली आणि तुम्हाला खुप त्रास होईल अशी फुकटची भविष्यवाणी पण केली. मी आवश्यक अभ्यास करून म्हणजे पावसाचे प्रमाण, पावसाचे नक्षत्र, तापमान आलेख, भाविकांची गर्दी ई. गोष्टी आणि आपले सणसुद विचारात घेऊन 20 ऑगस्ट हि निघण्याची तारीख ठरवली. माझ्यासोबत माझे दोन मित्र यायला तयार झाले. गणेश परदेशी आणि दिनेश बोडके तेही सहकुटुंब (मुलांसहीत). केदारनाथ ट्रेक एकट्याने करणे हेच एक खुप मोठे आव्हान असते. सहकुटुंब मुलांना सोबत घेऊन करणे म्हणजे आव्हान महाकठीण करून घेणे. महाकठीण आव्हान म्हणजे गदाधारी भीमाला गदायुद्धाचे आव्हान दिल्यासारखे होते. साध्या सोप्या गोष्टी करायला आम्हाला आवडतच नाही अशा अविर्भावात आम्ही रेल्वे बुकींग केले. जे जाऊन आले आहेत त्यांच्याकडुन आम्ही माहीती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आम्हाला भिती घालण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही. लोकांनी घातलेल्या भितीला वैतागुन माझे दोन्ही मित्र दर्शनासाठी हेलिकॉप्टरनेच जायचे या मुद्द्यावर ठाम झाले आणि मी पायीच जाणार या मुद्द्यावर ठाम होतो. हेलिकॉप्टरने केदारनाथ दर्शन आरक्षित करण्याच्या संकेतस्थळाला दहा ते पंधरा वेळा भेट देऊन झालेले होते. हेलिकॉप्टरने जाण्यायेण्याच्या खर्चाचा विचार केला तर ते पांढर्या हत्तीला कुरवाळण्यासारखे असुन त्यामुळे सर्वांच्या खर्चाचे अंदाजपत्रक कोलमडणार हे स्पष्ट दिसत होते. हळुहळू मी दोघांचेही मनपरीवर्तन करून पायी चालत जाणे कसे शक्य आहे हे त्यांना समजावुन सांगितले. दोघांचे प्रत्येकी 20000 (वीस हजार) वाचणार असल्यामुळे दोघेही खुश झाले पण त्यांनी पैसे खर्च करण्याची तयारीसुद्धा ठेवलेली होती. आम्ही जोरदार तयारीला लागलो. ट्रेकसाठी उपयुक्त असणारे व्यायाम करायला सुरुवात केली आणि जेवणात पौष्टिक अन्नपदार्थांचा समावेश केला. ट्रेकसाठी लागणारे आवश्यक साहीत्य ज्यांच्याकडे नव्हते त्यांना ते त्यांना खरेदी करायला लावले. पावासापासुन संरक्षण होण्यासाठी मित्र गणेशने पोंचोची सामुहीक खरेदी केली. एकुण दहा पोंचो लागणार होते. 


    पुणे ते दादर, दादर ते बांद्रा टर्मिनस (लोकल रेल्वे) आणि बांद्रा टर्मिनस ते हरीद्वार या रेल्वे प्रवासासाठी आम्हाला तब्बल 40 (चाळीस) तास लागले. शनिवारी सायंकाळी पाच वाजता घर सोडले होते आणि आम्ही सोमवारी सकाळी नऊ वाजता हरीद्वारला पोचलो. मित्र दिनेशने इंटरनेटवरून आमच्यासाठी 14 (चौदा) आसनी बस आरक्षित करुन ठेवलेली होती. त्या बसचा ड्रायव्हर रेल्वेस्टेशनबाहेर आमची वाट पाहत थांबलेला होता. आम्ही रेल्वेतुन उतरलो आणि चहा पिऊन लगेच बसमध्ये बसुन सोनप्रयागकडे रवाना झालो. रस्त्यातील एटीममधुन प्रवासाठी आवश्यक असणारी रोख रक्कम काढुन घेतली. शिवपुरी येथे दुपारी फुलके, राजमा आमटी आणि भात असे स्वस्तात अमर्यादित जेवण मिळाले. मजलदरमजल करत आम्ही संध्याकाळी सोनप्रयागच्या अलीकडे सीतापुरमध्ये मुक्काम केला. ईथे पण एक स्वस्तात मस्त हॉटेल मिळाले. केदारनाथ दर्शनाला जाण्यासाठी पहाटे अडीचचा अलार्म लावुन आम्ही झोपी गेलो. 


    रात्री अडीच वाजता सर्वजण ऊठले. सर्व आवराआवरी करून आम्ही बसने सोनप्रयागला गेलो. तिथे चिटपाखरूही नव्हते. एका टपरीवजा हॉटेलमध्ये ताजा चहा मिळाला. थोडया अंतरावर बोलेरोमध्ये झोपलेल्या एका ड्रायव्हरला ऊठवले. त्या बोलेरोने आम्हाला सोनप्रयाग वाहनतळापासुन गौरीकुंडापर्यंत पोचवले. पहाटे तीन वाजुन पन्नास मिनिटांनी आम्ही केदारनाथच्या पहील्या पायरीवर पाय ठेवला. चालताना आधार मिळावा म्हणुन गौरीकुंड येथे सर्वांसाठी बांबुच्या काठ्या विकत घेतल्या. तिथे प्रवासासाठी लागणारे सर्व साहीत्य विकत मिळते. पहीले सहा किलोमीटर अंतर आम्ही अंधारातच पार केले. उजेड आल्यावर आम्हाला आजुबाजुचे धबधबे दिसायला लागले. काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते. पायातील बूट पाण्यापासुन वाचवण्याचा खुप प्रयत्न केला परंतु काहीही उपयोग झाला नाही. सर्वात लहान ट्रेकर आयुष सोडला तर प्रत्येकाकडे सॅक होती. सॅकचे ओझे घेऊन चढावर चढणे अवघड जात होते आणि तो चढ संपण्याचे नाव घेत नव्हता. नदी ओलांडुन उजवीकडे गेल्यावर तर चढाची तीव्रता आणखीणच वाढली. वाटेत चहा, मॅगी याचे असंख्य टपरीवजा हॉटेल्स आहेत. पाण्याच्या बाटल्याही विकत मिळतात. त्यामुळे या गोष्टींचे आनावश्यक ओझे वागवण्याची गरज नाही. रस्त्यावरील घोडयांची लीद साफ करण्यासाठी सफाई कामगार ठेवलेले आहेत. त्यामुळे रस्ता स्वच्छ राहण्यास मदत होते. वाटसरूंना मार्गावर चालताना घोडेस्वार आणि पालखी या दोहोंचाही अडथळा जाणवतो हे मात्र खरे. ठिकठिकाणी शौचालये उभारलेली आहेत. एकुण अठरा किलोमीटर अंतर पार करायला आम्हाला दहा तास लागले. मंदिर येईपर्यंत शरीर पुर्णपणे थकुन गेले होते. माझ्या अनुभवाचा वापर करून मी सर्वांना सावकाश गतीने वर घेऊन आलो होतो. मंदिराचे अदभुत आणि स्वर्गिय सौंदर्य पाहुन थकवा क्षणार्धात नाहीसा झाला हेही तेवढेच खरे. स्वर्गाची हवा मिळवणे सोपे थोडीच असते. मंदिर परीसरात तुरळक गर्दी होती. त्यामुळे दर्शनासाठी आम्हाला थेट मंदिरात जाता आले. शून्य मिनिटात आम्ही केदारबाबाचे माथा टेकवुन दर्शन घेतले. एकदम निवांत दर्शन मिळाले. सर्वजण म्हटले कि असे दर्शन मिळण्यास भाग्य लागते. नंतर आम्ही फोटो आणि व्हिडीओचा तुफान वर्षाव सुरु केला.


    आम्ही हीटरची (पाणी गरम करणारा) सुविधा असलेले हॉटेल शोधले. हे हॉटेल मंदिराच्या उजव्या बाजुला होते. आम्ही संध्याकाळी पुन्हा मंदिराकडे गेलो. संध्याआरतीच्या वेळी मंदिरावर विद्युत रोषणाई सोडलेली होती. त्या विद्युत रोषणाईने मंदिराचे सौंदर्य आणखीनच खुलले होते. मंदिराच्या मागे दिसणारे भव्य बर्फाचे डोंगर ते मंदिर स्वर्गिय असल्याची जाणीव करून देत होते. संध्याआरती नंतर सर्वजणांनी पोटोबा केला. माझी एकादशी होती. एका परमपुज्य स्वामीजींमुळे मला एकादशीचा फराळ मिळाला. संध्याकाळी गारठा चांगलाच जाणवत होता. दुसर्या दिवशी लवकर ऊठुन आम्ही गारठ्यात आंघोळ्या करून दर्शन रांगेत थांबलो अर्थात गरम पाण्याने. तेव्हा पाऊस सुरु झाला होता. तिथे पाऊस आला कि प्रचंड गारठा पसरतो. ओल्या फरशीवर अनवाणी चालल्याने पायाची बोटे सुन्न झाली होती. चाळीस मिनिटे रांगेत थांबल्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा मनसोक्त दर्शन मिळाले. दर्शन घेतल्यानंतर आम्ही पावसातच खाली उतरायला सुरुवात केली. सर्वांनी पोंचो घातला आणि छ्त्रीही डोक्यावर धरली होती. एका ठिकाणी थांबुन सर्वांनी नाष्टा केला. उतरताना सुद्धा हे अंतर संपता संपत नाही. तीन ते चार किलोमीटर अंतर पार केल्यावर पाऊस थांबला. आम्ही मजल दरमजल करत सात तास पंधरा मिनिटांनी गौरीकुंडला पोचलो. आमची प्रचंड दमछाक झालेली होती. कोणालाही कसलाही त्रास न होता आम्ही दहाच्या दहा जण सहीसलामत केदारबाबाचे दर्शन घेऊन खाली उतरलो या विचारानेच आमचा थकवा कुठल्या कुठे पळुन गेला होता. थोडेफार पाय दुखण्याव्यतिरीक्त कसलाही त्रास नाही. वाहनचालक प्रताप आमची वाट पाहत थांबलेला होता. भ्रमणध्वनीवरून त्याचा ठावठिकाणा घेऊन आम्ही बसमध्ये बसलो. अनावश्यक सामान आम्ही बसमध्ये तसेच बॅगांमध्ये ठेवलेले होते. गणेशने उरापोटावर उचलुन पुण्यापासुन पोतेभरून पाण्याच्या बाटल्या आणलेल्या होत्या आणि केदारनाथला जाताना ते पोते तसेच बसमध्ये ठेवले होते. आम्ही केदारनाथाचे दर्शन घेऊन येईपर्यंत दोन दिवसात आमचा वाहनचालक प्रताप याने त्या सर्व बाटल्या फस्त केलेल्या होत्या. त्याने त्याचा चांगलाच प्रताप दाखवला. हे पाहुन माझे टाळके सटकले होते पण मी खुप संयम ठेवला. वेलकम सिनेमातील नाना पाटेकर स्वत:ला "कंट्रोल उदय..." म्हणतो तसा मी स्वत:ला "कंट्रोल विजय" म्हणत होतो.


    उत्तराखंडमध्ये वाहतुकीचे काही नियम आहेत आणि ते सर्वांना पाळावेच लागतात कारण ते आपल्या सुरक्षेसाठीच आहेत. संध्याकाळी आठ ते पहाटे चार या वेळेत रस्त्यावर वाहन चालवण्यास बंदी आहे. जिथे आठ वाजतील तिथे वाहन थांबवुन मुक्काम करावा लागतो. तेथील भौगोलिक परीस्थिती अशी आहे कि कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी दरड कोसळू शकते. रात्री अपरात्री बचाव कार्यास खुप अडथळे येतात. चार वाजता सर्वजण बसमध्ये बसलो. प्रवासासाठी आमच्याकडे चार तास शिल्लक होते. त्या वेळेत आम्ही हरीद्वारला पोचणे शक्य नव्हते. पण जिथपर्यंत जाता येईल तिथे जाऊन मुक्काम करू असे एकमताने ठरवुन आम्ही निघालो. संध्याकाळ होईपर्यंत शंभर किमीपेक्षा जास्त अंतर पार झालेले होते आणि अचानक तुफान पाऊस सुरु झाला. दरड कोसळायला सुरुवात झाली होती. आम्ही कसेबसे तिथुन निसटलो आणि एक छानसे हॉटेल शोधुन मुक्काम केला. ते ठिकाणही छान आणि एकदम किफायतशीर होते.


    सोनप्रयाग ते हरीद्वार प्रवासाचे निम्मे अंतर पार करून ठेवल्यामुळे दुसर्या दिवशी आम्हाला निवांत वेळ मिळाला. रस्त्यात देवप्रयाग लागल्यावर आम्ही घाट उतरून खाली गेलो. जिथे दोन नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणाला प्रयाग म्हणतात. जसे पंचकेदार तसे पंचप्रयाग सुद्धा आहेत. देवप्रयाग म्हणजे अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्यांचा संगम. येथुनच गंगेचा चित्तथरारक प्रवास सुरु होतो. दोन वेगवेगळ्या रंगाचे पाण्याचे प्रवाह एकत्र येतात आणि या दोन नद्या एकत्र आल्यावरच ती गंगा बनते. देवप्रयाग या अतिशय पवित्र ठिकाणी स्नान करण्याचे भाग्य मिळाले. मी याठिकाणी आईसाठी तर्पण केले. देवप्रयाग याठिकाणी रघुनाथ मंदिर आहे. प्रभु श्रीरामचंद्रांनी येथे तपस्या केलेली आहे. ज्या दगडी आसनावर त्यांनी यपस्या केली ते तिथे अजुनही जसेच्या तसे आहे. त्याचे मनोभावे दर्शन घेतले. प्रभु श्रीरामचंद्रांनी ब्रम्हहत्या पापाचे प्रायश्चित म्हणुन येथे स्नान आणि तपस्या केलेली आहे. भक्तशिरोमणी हनुमान त्यांना याठिकाणी घेऊन आला होता. 


    त्यानंतर आम्ही नाष्ट्यासाठी थांबलो. ईकडे स्थानिक पदार्थच उपलब्ध आहेत, दाक्षिणात्य पदार्थ औषधालाही मिळत नाहीत. कोणताही पदार्थ बनवायचा असो ईकडे फोडणी देताना जिरा आणि धन्याचा मारा करतात. जिरा आणि धन्याची फोडणी दिलेली मसाला मॅगी मी फक्त एक घास खाऊन टाकुन दिली. खाऊच शकलो नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये प्रवेश करताच जिरा आणि धने नको असे निक्षुन सांगितलेले केव्हाही उत्तम. ईकडे राजमा थाळी खुप स्वस्त आहे. आम्ही नव्वद रुपयांमध्ये अमर्यादित जेवण केले. 


    हृषिकेशला आम्ही गाईड (शंभर रुपये) घेतला. लक्ष्मण झुलाचे नुतनीकरणाचे काम सुरु झालेले असुन त्याचा वापर सध्या बंद आहे. काचेचा पृष्ठभाग आणि दोन्ही बाजुला केदारनाथ मंदिराच्या आकाराची प्रवेशद्वारे हि नविन लक्ष्मण झुलाची वैशिष्ट्ये असणार आहेत. नुतन लक्ष्मण झुला जुलै 2023 पासुन वापरात येईल असे कंत्राटदाराचे म्हणणे आहे. हृषीकेशमध्ये भुतनाथ (महादेव) मंदिर आहे परंतु वेळेअभावी आम्हाला दर्शन घेता आले नाही. तिथे आम्ही गीता भवन, भगवान शंकराची गंगेच्या प्रवाहातील मुर्ती आणि गंगाकाठचे वेगवेगळे घाट पाहीले. गीताप्रेसच्या भव्य दुकानातुन अनेक महत्वपुर्ण ग्रंथ खरेदी केले. हृषीकेशमध्ये चोटीवाला हॉटेलच्या व्हरांड्यात मेकअप करून अलिशान खुर्चीवर एक माणुस बसलेला असतो. हा माणुस पर्यटकांचे आकर्षण ठरतो. आपल्याला असे वाटते कि ती मुर्ती आहे परंतु त्याने हालचाल केल्यावर आपण आश्चर्यचकीत होतो. 


    हृषीकेश उरकुन आम्ही हरीद्वारच्या दिशेने निघालो. संध्यासमयी हर कि पौडी येथे होणार्या गंगा आरतीला आम्हाला हजेरी लावायची होती. हर कि पौडीच्या जवळ असणारे हॉटेल्स प्रचंड महाग होते. म्हणुन आम्ही तिथुन एक किमी लांब अंतरावर ओयोच्या सहाय्याने स्वस्तात हॉटेल बुक केले. हर कि पौडी येथे संध्यासमयी गंगास्नान आणि गंगापुजन केले. त्यानंतर सामुहिक गंगाआरती केली. त्यादिवशीच्या गंगाआरतीला गायिका अनुराधा पौडवाल स्वत: हजर होत्या. दररोज तिथे त्यांच्या आवाजातील आरती ध्वनीक्षेपकावर वाजवली जाते परंतु आज त्या स्वत: तिथे हजर होत्या हा एक विलक्षण योग अनुभवण्यास मिळाला. गंगाआरती झाल्यानंतर आमचा प्रवास पुर्ण झाला आणि मी टूर संपल्याची घोषणा केली. जे जे ठरवले होते ते ते सर्व व्यवस्थित पार पडले. त्यानंतर ज्याला जे जे वाटेल त्याने ते ते केले. दुसर्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी एक वाजता आम्ही ट्रेनमध्ये बसुन मुंबईकडे रवाना झालो आणि रविवारी पहाटे चार वाजता पुणे येथे पोचलो. आमचे मुख्य आकर्षण केदारनाथ हेच होते. परंतु त्यासोबत आम्हाला देवप्रयाग, हृषीकेश आणि हरीद्वार देखिल करता आल्यामुळे आम्ही सर्वजण जाम खुश होतो. 


    अशी हि स्वनियोजित केदारनाथ ट्रिप आणि ट्रेक अतिशय कमी खर्चात भरघोस आनंद देऊन गेली. 




जय केदारनाथ!





कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...