Monday 29 October 2018

माझी पहीली सब-टु हाफ मॅरेथॉन

माझी पहीली सब-टु

वर्ष 2017 चा अपयशी प्रयत्न 

      मागच्या वर्षी माझा सब-टुचा फसलेला प्रयत्न मला चांगला आठवतोय. विसरुच शकत नाही मी तो. ती होती मगरपट्ट्यातील फिकी फ्लो मॅरेथॉन 2017. माझ्या ईच्छीत ध्येयापासुन मी फक्त 24 सेकंद दुर राहीलो होतो. 21.097 किमी अंतर पळायला मला 2 तास 23 सेकंद लागले होते की जे मी 1 तास 59 मिनिटे आणि 59 सेकंदाच्या आत पळणे अपेक्षित होते. या मॅरेथॉनसाठी मी खुप सराव केला होता पण मला यश आले नाही. माझे अपयश मी नेहमी माझ्या मेंदुवर आणि मनावर कोरुन ठेवत असतो. त्याचा उपयोग असा होतो की ते मला कायम डिवचत राहते. तुला नाही जमले, तुला नाहीच जमणार असे म्हणत राहते. त्याचे डिवचणे असह्य झाले की मी दोन्ही हाताच्या बाह्या मागे सारुन पुढे सरसावतो आणि छाती ठोकपणे त्याला सांगतो "थांब, आता तुला दाखवतोच..."


      पांडुरंगाने मला एवढे श्रीमंत केले नाही की मला रनिंग आणि ट्रायथलॉनसाठी कोच घेता येईल किंवा ट्रायथलॉनला लागणारे महागडे साहीत्य सहजपणे विकत घेता येईल पण एवढा नशिबवान नक्कीच बनवले की आयर्नमॅन अंजली भालिंगे सारखी धावण्याच्या शर्यतीत कायम विजेतेपद मिळवणारी आणि एक उत्कृष्ट सायकलपटू मला मार्गदर्शक आणि एक कौटुंबीक मित्र म्हणुन लाभली. अंजलीने माझी धावण्याची गती वाढावी म्हणुन मला बरेच मार्गदर्शन केले आणि माझी सब-टु हाफ मॅरेथॉन व्हावी यासाठी खुप मदतही केली. 


     आयुष्यातील पहीली हाफ मॅरेथॉन मी दोन तास चौदा मिनिटांत पळालो होतो ही एक माझ्यासाठी जमेची बाजु होती. यावरून अंजली म्हणत असे कि तू याहुन जोरात पळू शकतोस पण मला ते खरे वाटत नसे. २ तास १४ मिनिटांवरून २ तासाच्या आत हाफ मॅरेथॉन पळणे माझ्यासाठी स्वप्नवत होते. अंजलीने मला काही वर्कआऊट दिले होते. ज्यामध्ये इंटरवल्स, वार्मअप, कुलडाऊन, सलग पाच, सलग दहा आणि सलग पंधरा किमी धावणे याचा समावेश होता. या संकल्पना आयुष्यात मी पहील्यांदाच ऐकल्या आणि अनुभवल्या. त्या खरंच उपयुक्तही आहेत याचा प्रत्ययही आला. मागच्या वर्षी मी सर्व तयारी करून फ्लो हाफ मॅरेथॉन मध्ये उतरलो. शेवटी काय झाले माहीतीये...? मी 21 किमी बरोबर दोन तासांच्या आत पळालो पण ते वरचे .097 मीटर असतात ना त्या 97 मीटरने माझा घात केला. मी या अंतराचा कधी विचारच केला नव्हता. हाफ मॅरेथॉन म्हणजे 21.097 मीटर अंतर असते. २ तास २३ सेकंद वेळ लागला. त्या वरच्या 97 मीटरमुळे माझी सब-टु हुकली असे मला मनोमन वाटत राहीले. मी नेहमी हाफ मॅरेथॉन म्हणजे 21 किमीचा विचार करत असे. हे वरचे 97 मीटर एवढे तापदायक ठरतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. हे 97 मीटर मी माझ्या आयुष्यात विसरु शकेन असे मला तरी आता बिलकुल वाटत नाही. मागच्या वर्षीचा हा फसलेला प्रयत्न. या अपयशाने वर्षभर माझा पिच्छा पुरवला. यानंतर ट्रायथलॉनवर लक्ष केंद्रित करावयाचे असल्यामुळे हे सब-टु प्रकरण थोडे मागे पडले.

वर्ष 2018 -

      यावर्षी फिकी फ्लो मॅरेथॉनची नावनोंदणी सुरु झाल्या झाल्या मी नाव नोंदवुन ठेवले. मागच्या वर्षीचा हिशोब यावर्षी चुकता करायचाच असे मी ठरवुनच ठेवले होते. मी यावर्षी पुन्हा जोमाने सरावाला लागलो. मागच्या वर्षी सब-टु हाफ मॅरेथॉन करण्यात जरी अपयश आलेले असले तरी कोल्हापुरमध्ये हाफ आयर्न डिस्टन्स ट्रायथलॉन, बालेवाडीत सब-फाईव फुल मॅरेथॉन (पहीलीच होती) आणि चेन्नईत फुल आयर्न डिस्टन्स ट्रायथलॉन करण्यात मी यशस्वी झालो होतो. यावर्षी काहीही झाले तरी सब-टु हाफ मॅरेथॉन करणारच असे अंजलीला सांगुन ठेवले. माझा सराव आणि रनिंगमधील प्रगती पाहुन नक्कीच तु करशील असे त्यांनी आवर्जुन सांगितले पण केली नाहीस तर तुझे काही खरे नाही असा दमही  भरला होता. कठोर शिक्षकांचे विद्यार्थी नेहमीच चांगली प्रगती करतात. छडी लागे छमछम!!


      ट्रायथलॉनची तयारी करण्यासाठी मी यावर्षी गारमिनचे महागडे घड्याळ विकत घेतले जे मॅरेथॉनच्या सरावासाठी सुद्धा खुप उपयुक्त ठरले. ऊशिरा घेतले पण जे घेतले ते एकदम चांगलेच घेतले आणि तेही भारत सरकारला नियमानुसार आयात कर वगैरे भरून. "The Best or Nothing" हे ब्रिटीश लोकांचे ब्रीदवाक्य मला आमचे क्रिकेटचे गुरु मिलिंद गुंजाळ सरांनी समजावुन सांगितलेले होते. ते मी पक्के लक्षात ठेवले होते. जे चांगले त्याचे अनुकरण करावे मग ते ब्रिटीशांचे का असेना. स्वस्तातल्या वस्तु विकत घेऊन मनस्ताप करुन घेण्यापेक्षा उतम वस्तु (महागडया का असेना) विकत घेतलेल्या केव्हाही चांगले. हा माझ्या आयुष्यातुन मला मिळालेला मोलाचा धडा आहे. या महागडया अशा गारमीनचा सब-टुची तयारी करताना  मस्त उपयोग झाला. (Garmin Forerunner 935)  


      सब टू हाफ मॅरेथॉन करायची असेल तर ५ किमी अंतर २६ ते २७ मिनिटांत आणि १० किमी अंतर ५५ मिनिटांच्या आत पळता येणे आवश्यक आहे. हा सराव अंजलीने माझ्याकडुन करून घेतला होता तसेच पळताना मी काय चुका करतोय त्याही माझ्या निदर्शनास आणुन दिल्या आणि त्यावर उपायही सुचवले होते. त्या सर्व सुचनांचे मी काटेकोरपणे पालन केले. इंटर्वलस, सिंहगड चढणे, ५ किमी सलग, १० किमी सलग, १५ किमी सलग असा पळण्याचा सराव चालु ठेवुन पळता पळता एकदा स्वतःची स्वतःच सब-टू हाफ मॅरेथॉन पळालो. या सरावामुळे माझा आत्मविश्वास वाढला पण ती पळताना खुप दमछाक झाली होती हेही तेवढेच खरे. सब-टुची तयारी करताना मी ५ किमी आणि १० किमीचे अंतर अनुक्रमे २४:३९ आणि ५१:४६ या माझ्या पर्सनल बेस्टमध्ये पळालो. सरावादरम्यान येणारी हि आकडेवारी पाहुन सबटू होण्याची आशा वाटु लागली. आणि हि तयारी खरंच जोरदार होती. 


   आणि तो दिवस जवळ येऊ लागला ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. रेसच्या आदल्यादिवशी आराम करणे किती महत्वाचे असते याचे महत्व मला अंजलीने अगोदरच सांगुन ठेवलेले होते. त्यामुळे मी कामाला सुट्टी घेऊन आदल्या दिवशी फक्त आरामच केला. बिब आणायला गेलो तेवढाच बाहेर पडलो नाहीतर आराम म्हणजे आरामच केला. रेसमध्ये कशा प्रकारे पळणार याचा सर्व आराखडा तयार करून ठेवला. सुरुवातीला काय खायचे, रेसमध्ये किती किलोमीटरनंतर काय खायचे, पाणी केव्हा प्यायचे इ. तसेच विजारीच्या मागच्या खिशातुन पळता पळता चेन उघडुन खायचा पदार्थ घेऊन झाला कि पुन्हा चेन व्यवस्थित लावता येते का? याचाही व्यवस्थित सराव करून घेतला होता. नाहीतर ऐन रेसमध्ये पंचाईत व्हायला नको. खाण्याच्या गोष्टी एका वेळेस किती प्रमाणात तोंडात टाकायच्या याचेही एक प्रमाण ठरवुन ठेवले होते. रेसमध्ये जेव्हा वेळेशी स्पर्धा करावयाची असते तेव्हा या सर्व बारीकसारीक गोष्टींचा विचार करावा लागतो. सर्व तयारी करून रात्री १० वाजता झोपी गेलो. आदल्या दिवशी भरपुर आराम मिळाल्यामुळे किंवा एवढया आरामाची माझ्या शरीराला सवय नसल्यामुळे मला पहाटे ३ वाजताच जाग आली आणि त्यावेळेस मला खुप ताजेतवाने वाटत होते हे विशेष. शरीरावर कसलाही ताण जाणवत नव्हता. आता एवढा वेळ काय करायचे म्हणुन थंड पाण्याने स्नान करत बसलो याचा फायदा असा झाला कि त्वचेच्या वरच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया खुपच छान झाली. यामुळे रेसमध्ये पळताना मला खुप उत्साह जाणवत होता.  

   ५ वाजुन ४५ मिनिटांनी मॅरेथॉन सुरु होणार होती. त्याअगोदर झुंबानृत्यवाल्यांनी सर्वांची शाळा घेतली. मी आपल्या माझ्या पद्धतीने हातापायांच्या हालचाली करून घेतल्या. आणि चुकीच्या स्टार्ट लाईनला जाऊन थांबलो. हो चुकीच्याच. मला वाटले मी एकट्यानेच सरदारगिरी केली की काय? पण तिथे बरेच जण आलेले होते. हाहाहा .. ३, ५ आणि १० किमी साठी वेगळी आणि २१ किमी साठी वेगळ्या स्टार्ट लाईनची व्यवस्था करण्यात आलेली होती. तिथुन २१ किमी च्या स्टार्ट लाईनला जाणे भाग होते, तिथे पोचण्यासाठी मी ४ मिनिटे घेतली. तिथे गेल्यावर कळले कि मॅरेथॉन सुरु झालेली आहे आणि मला ४ मिनिटे उशिर झालेला आहे. मनात म्हटले आता बोंबला ... यांनी जर हा ४ मिनिटांचा वेळ हाफ मॅरेथॉनमध्ये गृहीत धरला तर माझी सब-टु बोंबललीच म्हणूंन समजा. अशा परिस्थितीत जर आता मला सब-टु करायची असेल तर ही हाफ मॅरेथॉन १ तास ५६ मिनिटांच्या आत पळावी लागणार होती. आणि या विचारांनीच माझ्या अंगावर काटा आला होता. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जे होईल ते होईल असे म्हणत पांडुरंगाचे नामस्मरण करून मी पळायला सुरुवात केली. स्टार्ट लाईनला न विसरता गारमीन चालु केले आणि वेळेच्या धास्तीने पहिल्या किमीचे अंतर ४ मिनिट ५७ सेकंदात पुर्ण केले. दुसरा आणि तिसरा किमी शांतीपुर्वक अनुक्रमे ५;१७ आणि ५;२२ मध्ये पुर्ण केले. प्रत्येक १०० मीटरला मी गारमीनमध्ये डोकावत होतो. आवश्यकतेपेक्षा पेस जास्त असेल तर थोडा कमी करत होतो आणि कमी पडत असेल तर लगेच पायांची हालचाल वाढवत होतो. ५ किमी अंतर २५ मिनिटे ५६ सेकंदात पूर्ण करून रेसमधील माझे पहिले लक्ष्य गाठले. गारमीनच्या आकडेवारीनुसार एका मिनिटाला सरासरी माझी १६२ पावले पडत होती. यामध्ये सुधारणा करायला अजुन वाव आहे. 

    रेसमधील दुसरे लक्ष्य होते ५३ मिनिटात १० किमीचे अंतर पार करणे. रेसमधील २६ मिनिटे पहिल्या ५ किमीसाठी गेली आणि पुढच्या ५ किमी अंतरासाठी माझ्याकडे २७ मिनिटे उपलब्ध होती. ते पुढचे ५ किमी अंतर २६ मिनिटे आणि २२ सेकंदात पुर्ण केल्यामुळे १० किमी अंतरासाठी मला ५२ मिनिटे १८ सेकंद वेळ लागला. हे माझे दुसरे लक्ष्यही मी अर्जुनाने बरोबर पोपटाचा डोळा भेदावा तसे भेदले होते. १० किमीची हि वेळ पाहुन माझी सब-टु आज होणार याची मला खात्री वाटायला लागली. पण त्या ४ मिनिटांची टांगती तलवार अजुनही माझ्या मानेवर लटकत होती. उरलेले अंतर ४ मिनिटे बाकी ठेवुनच पार करायचे असे ठरवून मी जिद्दीने पळत होतो. मला पुन्हा अपयश नको होते. सब-टु झाल्या झाल्या मला फोन करा असे सौ. ने आवर्जुन सांगितलेले होते तेही मोठया अपेक्षेने. मला तिचा अपेक्षाभंग  होऊ द्यायचा नव्हता आणि सब-टु झाली नसती तर कोचला सामोरे जाण्याचे धाडसही झाले नसते. अपयशाचे ओझे वागवणे अत्यंत कठीण असते हे मला या एका वर्षाने शिकवले. शेवटच्या ५ किमी मध्ये काहीही गडबड होऊ शकते. त्यामुळे मी वेळेचा अंदाज घेऊन जास्त जोर लावत नव्हतो, ५:२० चा पेस आरामात येत होता मग कशाला आफत ओढवुन घ्यायची. शेवटी शेवटी क्रॅम्प वगैरे यायला नको म्हणुन मी पुर्ण खबरदारी घेत होतो. मी एवढया जोरात सहजपणे पळु शकेन असे मला कधीही वाटले नव्हते. पण सरावातील सातत्य, जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वकाही शक्य आहे. "Anything is possible" म्हणतात ते काही उगाच नाही. 


   रेसमधील तिसरे लक्ष्य होते १५ किमी अंतर ८० मिनिटांच्या आत पार करणे. ८० मिनिटांना काही सेकंद बाकी असताना मी तेही गाठले. पांडुरंगाच्या कृपेने जे जे करायचे ठरवले होते ते सर्व सुरळीत पार पडत होते. कुठेही दुखले नाही खुपले नाही, ना तहान लागली ना भुक जाणवली. कसलाही त्रास जाणवला नाही. वेळेचे आणि खाण्यापिण्याचे व्यवस्थित नियोजन केल्याचा फायदा झाला. सोळाव्या किलोमीटरची लॅप पुर्ण झाल्यावर गारमिनने मनगटात व्हायब्रेटरचे तरंग सोडले आणि काय वेळ आली हे पाहण्यासाठी उत्सुकतेने मी माझी नजर तिकडे वळली, ५:१५ चा पेस आला होता. हा पेस पाहुन मला माझेच आश्चर्य वाटले. सोळाव्या किलोमीटरचा हा पेस पाहुन मीच माझे कौतुक करून घेतले. "Well done Vijay, great going..." म्हणत मी माझी पाठ थोपटुन घेतली. मी आणि माझ्यामधील हा संवाद कोणालाही कळणे शक्य नव्हते फक्त त्या पांडुरंगाशिवाय. पळताना माझ्या आजुबाजुला बरेच पळणारे मित्रही दिसत होते. पण मी कोणाबरोबरही ब्र काढत नव्हतो म्हणजे बोलत वगैरे नव्हतो. मी, माझे गारमिन, पेसचे वरखाली होणारे आकडे, कमी कमी होणारे अंतर आणि ज्यांच्यावर सब-टु करण्याची पुर्ण जबाबदारी सोपवलेली होती ते माझे पाय त्यावेळेस हेच माझे विश्व होते आणि मी या विश्वात रमलो होतो. मला जगाचा विसर पडला होता. सब-टु...सब-टु...सब-टु बस्स एवढेच ऐकायला येत होते. शेवटच्या टप्प्यातील फ्लायओव्हरच्या चढाने माझा वेग थोडा मंदावला खरा परंतु तोपर्यंत मी धोक्याची रेषा ओलांडुन सुरक्षित टप्प्यात आलो होतो. त्या चढाचा माझ्या वेळेवर काहीही परीणाम झाला नाही. एव्हाना मी त्या ४ मिनिटांची टांगती तलवारही माझ्या मानेवरून दुर केली होती. आता मॅरेथॉनमध्ये ते ४ मिनिटे मोजली तरीही माझी सब-टु होणारच होती. तरीही फ्लॅग ऑफ टाईम पकडणार कि चिप टाईम? हा प्रश्न मला पडलेलाच होता. 


    ३ किमी, ५ किमी आणि १० किमी अंतर पळणाऱ्या धावपटुंनी मॅरेथॉन संपताना खुप अडचण केली. हे धावपटु म्हणजे असुन अडचण आणि नसुन खोळंबा. यांच्या गडबडीमुळे २१ किमी वाल्यांची फिनिश वेगळ्या ठिकाणी आहे हे बऱ्याच जणांना कळलेच नाही. जिकडे जास्त धावपटु फिनिश करत होते तिकडेच बहुतांशी धावपटु गेले. जिथे २१ किमीचे वळण घ्यायचे होते तिथे सांगायलाही कोणी नव्हते. माझे नशिब चांगले की मी तो बाण पाहिला नाहीतर माझ्या पूर्ण मेहनतीवर पाणी गेले असते. असे वेगवेगळे स्टार्ट आणि फिनिश पॉईंट ठेवणार असतील तर संयोजकांनी हाफ मॅरेथॉन पळणाऱ्या सर्व धावपटुंना पूर्वसूचना द्यायला हवी. वेगवेगळे स्टार्ट आणि फिनिश मी पहिल्यांदाच अनुभवले. गुडी बॅगमध्ये जाहिरातींच्या ब्रोशरचा भरमसाठ मारा तर असतोच त्याबरोबर धावपटूंसाठी उपयुक्त सूचना आणि माहिती पुरवल्यास आम्ही संयोजकांचे आभारी होऊ किंवा त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की आम्ही उपकृत होऊ. हा या रेसमधील सर्वात मोठा खेळखंडोबा होता. किमान इ-मेल मध्ये तरी हि माहिती पुरवणे अपेक्षित होते. आणि स्टेजवरील माणसाने माइकमध्ये ओरडून सांगितले असते तरीही चालले असते.


    शेवटचे २०० मीटर कधी एकदा संपताहेत असे झाले होते. कधी एकदा सब-टुचा आनंद साजरा करतोय, संपवा रे एकदाचे हे अंतर, किती पळायला लावताय अजून? असे म्हणत म्हणत मी ते शेवटचे अंतर पार केले आणि त्या सबटूच्या आनंदात आकंठ बुडालो. दुधात साखर म्हणजे अंजलीनेही तिची हाफ मॅरेथॉन नुकतीच संपवलेली होती त्यामुळे माझे कौतुक तिथेच म्हणजे फिनिश लाईन ओलांडल्या ओलांडल्याच झाले. एवढया लगेच कोचची शाबासकीची थाप मिळेल असे मला वाटलेच नव्हते. सौ. ला फोन करून पहिली हि आनंदाची बातमी दिली. सर्व खुश झाले. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे !

एक स्वप्न उराशी बाळगावे, ते पूर्ण करण्यासाठी मनापासून धडपड करावी आणि ते पूर्ण झाल्यावर त्या आनंदात आकंठ बुडावे आयुष्यात यासारखी मजा नाही.  माझी हाफ मॅरेथॉन वेळ - 01:52:28 (१ तास, ५२ मिनिटे आणि २८ सेकंद) स्पर्धेचे एकूण अंतर - 21.26 किमी 


(click here for results)



With my coach and family friend Anjali Bhalinge


Awesome view!










Recreational Triathelete gang




from left Vishal, Gaurav, Myself, Roopak, Nilesh and his friend
route map




















































   

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...