Tuesday 14 December 2021

Umbarkhind trek

ट्रेक उंबरखिंड


विजयस्तंभ



    मुघल सम्राट औरंगजेबाचा मामा शाइस्ताखान, शाहिस्तेखान, शाइस्तेखान हा दख्खनचा सुभेदार असताना छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर स्वारी करून पुण्यात आला होता. पुण्यात आल्यावर शाहिस्तेखान जनतेवर प्रचंड प्रमाणात अन्याय, अत्याचार व लुटालूट करत होता. मुघल सैन्याबरोबर समोरासमोर युद्ध करण्याएवढे सैन्यबळ नसल्यामुळे महाराजांचा नाईलाज होता. 

    जून १६६० ला त्याच्या बलाढ्य फौजेने ५६ दिवस लढून चाकणचा किल्ला घेतला होता. त्यानंतर १६६१ च्या सुरुवातीला शाइस्ताखानाने उझबेग सरदार कारतलब खानास छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकण भागातील चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल, नागोठणे ही ठिकाणे हस्तगत करण्याच्या धाडसी योजनेवर रवाना केले. कारतलब खानासोबत सावित्रीबाई उर्फ रायबाघण तसेच मुघलांचे अनेक सरदार ह्या मोहिमेत सहभागी झालेले होते. फौजफाटा जवळजवळ ३० हजारांवर होता. 

    २ फेब्रुवारी इ.स.१६६१ ला कारतलब खानाच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य पुण्याहून निघून लोहगडच्या बाजूने भोर घाटाकडे न जाता घाटमाथ्यावरुन कुरवंडे घाटातुन उंबरखिंडीच्या दिशेने उतरु लागले. लोहगड आणि विसापुर सारख्या किल्ल्यांवरून तीस हजार मुघल सैन्याला प्रतिकार होणे शक्यच नव्हते. कुरवंडेची घाटवाट ड्युक्स नोजच्या डाव्या बाजुने खाली कोकणात उतरते. त्यावेळेस ती वाट नळीसारखी  होती आता तिथे खोदकाम करून रस्ता बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि तो तसाच अर्धवट सोडून देखील दिलेला आहे. त्यामुळे कुरवंडे घाटाचे खरेखुरे रूप पाहावयास मिळणे आता शक्य नाही. खरेखुरे म्हणजे युद्धप्रसंगाच्या वेळी जसे होते तसे. नळीसारख्या बारिक वाटेने सह्याद्रीचा अवघड घाट उतरुन मुघल सैन्य पुढे उंबरखिंडीत आले. कुरवंडे घाट उतरताना समोर कितीही मोठे सैन्य लपलेले असले तरीही ते घाटावरून उतरणाऱ्या व्यक्तीला दिसणे शक्य नाही अशी तेथील भौगोलिक रचना आहे. या ट्रेकच्या निमित्ताने मी याचा अनुभव घेतला आणि यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अचाट बुद्धिकौशल्याची प्रचिती आली. "शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ" या म्हणीचे यापेक्षा समर्पक दुसरे कोणतेही उदाहरण नसावे. हा घाट उतरताना विशेषकरून छावणी गाव तर दिसतच नाही. आणि याच ठिकाणी महाराज आणि मराठा सैन्य छावणी करून मुघल सैन्याची वाट पाहत दबा धरून बसलेले होते. उंबरखिंडीत मुघल सैन्य आल्यानंतर सर्व शूर मराठा सरदार आणि त्यांचे सैन्य महाराजांच्या इशाऱ्याची वाट पाहत होते. जशी इशारत झाली तशी घनदाट अरण्यात लपून बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने मुघलांवर बाणांच्या वर्षावाने व तोफांच्या गोळ्यांनी हल्ला सुरू केला. तो हल्ला एवढा अकस्मात आणि भयानक होता कि मुघल सैन्याला प्रतिकार करण्यासाठी शस्त्र सुद्धा उचलता आले नाही. त्यादिवशी आंबा नदीतुन रक्ताचे पाट वाहिले. शाईस्ताखानाने पुण्यात आल्यापासुन जनतेवर जे काही अत्याचार केले होते, स्वराज्यात जी काही लूट केली होती त्याचा सूड उगवण्याची नामी संधी मराठा सैन्याला मिळाली होती आणि या संधीचे त्यांनी सोने केले.  

    मुघल सरदार मित्रसेन व अमरसिंह यांनीही मराठा सैन्याचा बाणांचा हल्ला करुन प्रतिकार करण्यास सुरुवात केली. जंगलात व डोंगरावरुन गनिमी कावा पद्धतीने युद्ध करणार्‍या मराठा सैन्याला घाबरुन मुघल सैनिक मार्ग मिळेल तिकडे पळत होते. त्यांना पळता भुई थोडी झालेली होती पण सर्व मार्ग शिवाजी राजांच्या सैन्याने अडवून धरलेले असल्यामुळे ते आयते तोफेच्या समोर येत होते, त्यातुन वाचले तर झाडाझुडुपांतून कुठूनही बाण सुं सुं करत छातीचा वेध घेत असे, याच्यातुन वाचला तर भाल्याचे पाते आणि या सर्वातूनही एखादा वाचलाच तर त्याच्यावर तलवार चालवली जात असे. कत्तल म्हणतात ती अशीच असावी बहुतेक. मुघल सैन्याची मराठा सैन्याकडून कत्तल होत असताना, सपशेल पराभव समोर दिसत असताना अन्य कोणताही पर्याय न उरल्यामुळे रायबाघण यांच्या सल्लावरुन कारतलब खानाने तह करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडे दूत पाठवला. एका स्त्रीच्या पाठीमागे लपुन कारतलब खानाने आपला जीव वाचवला. 

    पाठीवर बाणांचे भाते, एका हातात धनुष्य व दुसर्‍या हातात भाला, कमरेला तलवार, मस्तकावर शिरस्त्राण, शरीरावर चिलखत व ढाल ह्या युद्धसज्ज वेशात छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले होते.

    कारतलब खानाचा दूत छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला व "कारतलब खान पूर्ण शरणागती पत्करतो आहे व ह्या प्रदेशातून बाहेर पडण्यासाठी परवानगी मागत आहे." हा संदेश दुताने छत्रपती शिवाजी महाराजांना दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी विनंती मान्य करुन, कारतलब खानाला मुघल सैन्यासह निघून जाण्यास सांगितले. हा संदेश दूताने कारतलब खानाकडे पोहोचवला. तेव्हा कारतलब खान, मित्रसेन व इतर मुघल सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना खंडणी पाठवली. त्यांच्याकडील सर्व शस्त्र आणि खजिना जप्त करून स्वराज्याच्या खजिन्यात जमा करण्यात आला. उंबरखिंडीत वेगवेगळ्या भागात लढत असलेल्या मराठा सैन्याला युद्धबंदीचा इशारा देण्यात आला व मुघल सैन्याला आल्या वाटेने परत पाठवण्यात आले. या नामुष्कीनंतर शाईस्तेखानाला चांगलीच चपराख बसली आणि यांनतर त्याने कोणतीही जोखीम पत्करली नाही. तो पुण्यातच तळ ठोकुन राहीला. 
    ह्या युद्धात शिवाजी महाराज स्वतः हजर होते, म्हणून हे युद्ध मराठा इतिहासात महत्त्वाचे मानले जाते. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर वास्तव्यास असत. अनेकदा मृत्यूवर आपली भवानी तलवार उगारून महाराज झेपावलेत ते राजगडावरूनच. या युद्धाचा विजयोत्सव दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. लोणावळा येथील 'शिवदुर्ग मित्र' ह्या संस्थेने २००१ साली उंबरखिंडीत अंबा नदीच्या पात्राशेजारी "ध्वजस्तंभ" उभारुन हा विजयोत्सव सुरु केला. त्यानंतर दरवर्षी हा उत्सव साजरा करण्यात येतो.

    २ फेब्रुवारी २००७ रोजी छावणी ग्रामस्थ (ता. खालापूर, जि. रायगड) आणि या संस्थेने मिळुन येथे एक "युद्ध विजयस्तंभ" उभारलेला आहे, या विजयस्तंभाचे उद्घाटन बाबासाहेब पुरंदरे व उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. उंबरखिंड युद्ध विजयस्तंभाची उंची १२.५० मीटर असून, स्तंभाच्या समोरील बाजूस शिवाजी महाराजांचे शस्त्रसज्ज वेशातील शिल्प आहे. मागील बाजूस उद्घाटनाची कोनशिला असून, डावीकडे आज्ञापत्रातील वृक्षांविषयीची माहिती व उजवीकडील बाजूस उंबरखिंडच्या लढाईचा थोडक्यात इतिहास कोरलेला आहे. दगडी स्तंभाच्या वर ढाल, तलवार, भाला, धनुष्य, ध्वजस्तंभ ह्याच्या मोठ्या प्रतिकृती करुन ठेवल्या आहेत.

    या युद्धप्रसंगावरून "खिंडीत पकडणे" हा वाक्प्रचार मराठी भाषेत रूढ झालेला आहे. शाइस्तेखानाच्या पुणे स्वारीनंतर मराठी भाषेत एक म्हण सुद्धा तयार झाली ती म्हणजे "जीवावर आले पण बोटांवर निभावले" आणि या बोटे कापण्याच्या प्रसंगावरून "कात्रजचा घाट दाखवणे" हा अजून एक वाक्प्रचारही आलेला आहे.  

    जगातील अनेक युद्धविषयक अभ्यासक्रमात या लढाईचा आवर्जून अभ्यास केला जातो. इस्राएल  आणि व्हिएतनाम सारख्या देशांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा अनेक युद्धनीती प्रत्यक्षात  वापरुन अनेक विजय मिळवलेले आहेत. उंबरखिंडचे युद्ध इतिहासातील इतर कोणत्याही युद्धापेक्षा तसूभरही कमी नाही. उंबरखिंड हि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची विजयगाथा आहे. आपणास मराठा म्हणवणाऱ्या वाघरांनी या खिंडीचे दर्शन घ्यायलाच हवे. 
    तर अशा या उंबरखिंडीला भेट देण्याची आणि तो प्रदेश स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याचा योग जुळून आला. कुरवंडे घाट आणि उंबरखिंड पाहण्याची तीव्र इच्छा खूप दिवसांपासुन मनामध्ये होती. सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशनने हा ट्रेक आयोजित केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हि खिंड नुसती पाहिलीच नाही तर चावणी गावातुन कुरवन्डे घाटमार्गाने ड्युक्स नोजपर्यन्त चालत आलो. सध्या या मार्गावर तोडफोड करून रस्ता बनवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट जाणवते. त्यामुळे कारतलब खान आणि त्याच्या सैन्याने जी घाटवाट अनुभवली ती अनुभवयास मिळाली नाही. बसने आम्हाला चावणी गावाजवळ सोडले आणि खंडाळा तलावाजवळ आम्हाला घेण्यासाठी येऊन थांबली. एसटीएफने अतिशय सुंदर व्यवस्था केली होती. बस अगदी सांगितलेल्या वेळेतच म्हणजे भल्या पहाटे ०४:२० ला सांगितलेल्या थांब्यावर आली होती. सर्व व्यवस्था चोख होती आणि अतिशय सुरळीतपणे हा ट्रेक पुर्ण झाला. 

टीप: मी इतिहासकार वगैरे कोणीही नसून इंटरनेट वरून तसेच वाचनात आलेल्या पुस्तकांतुन हि माहिती गोळा केलेली आहे. 













गणेश परदेशी 

































कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...