Tuesday 1 November 2022

वाजवा कि हॉर्न (मलेशिया)

"Horn Please"
मलेशियामध्ये बुधवारी सकाळी सायकलचा सराव करण्यासाठी बाहेर पडलो. नवखे रस्ते, नवखा परीसर आणि सारे लोकही नवखे होते. आयर्नमॅन स्पर्धेसाठी आलेले या नजरेतुनच आमच्याकडे सर्वजण पाहत होते. प्रसाद, नंदकुमार, पुष्कराज आणि मी आयर्नमॅनच्या रूटवर सायकल चालवायला निघालो. वाहतुक फारशी नव्हती. लोकांची गर्दीही जाणवत नव्हती. गाड्या चालवणारे काटेकोरपणे वाहतुकीचे नियम पाळत होते. दाबादाबी नाही की पुढे जाण्याची कोणाला घाई नाही. सर्व काही शिस्तीत चालु होते. प्रत्येकजण समोरच्याला अगोदर जाण्यास प्राधान्य देत होता. पहले आप.. पहले आप सारखे. पावसाचे थेंब यायला लागल्यामुळे मोबाईल हॉटेल रूमवरच ठेवुन दिला त्यामुळे सायकल रूटचे फोटो आणि व्हिडिओ काढता आले नाहीत.
रस्त्यावर गर्दी नाही, राँग साईडने येणारे कोणी नाही हे पाहुन मला खुप चुकल्या चुकल्या सारखे वाटायला लागले होते.  साधा हॉर्न वाजवणारे सुद्धा कोणी नव्हते. हॉर्नचा आवाज ऐकण्यासाठी माझे कान आतुर व्हायला लागले होते. काय करावे मला सुचत नव्हते. कम्बख्त कोई तो हॉर्न बजाओ रे... असं मी म्हटलं सुद्धा पण माझी भाषा काही त्यांना कळाली नाही.
शेवटी मी ठरवलं काहीही होवो आज हॉर्नचा आवाज ऐकुनच हॉटेल रूमवर जायचं. असे ठरवल्यानंतर मी रस्त्याच्या मधोमध सायकल चालवायला लागलो. आतातरी नक्कीच हॉर्न ऐकायला मिळेल पण नाही.. एक बहाद्दर माझ्या मागे मागे माझ्याच वेगात कार चालवु लागला पण त्याने हॉर्न काही वाजवला नाही. शेवटी मीच कंटाळलो आणि एका बाजुला झालो मग तो त्याच्या वेगात निघुन गेला. आता मात्र मी आशा सोडुन दिल्या होत्या. मलेशियन लोक हॉर्न वाजवतील असे काही वाटत नव्हते. मी पुन्हा नेटाने सायकल चालवु लागलो. एक छोटासा चढ आला. त्या चढावर मी रस्त्याच्या मधोमध सायकल चालवु लागलो. नंदकुमार आणि मी सोबत सायकल चालवत होतो. बराच वेळ तशी सायकल चालवल्यानंतर एका कारवाल्याचा संयम सुटला आणि त्याने फक्त एकदाच हॉर्न वाजवला... अहाहा... कानांना काय बरे वाटले म्हणुन सांगु. मी हॉर्न ऐकला.. मी हॉर्न ऐकला..
पुर्ण दिवसभर त्या हॉर्नच्या लहरी कानावर तरंगत राहील्या. माझ्या कानांना हॉर्नफोबिया झाल्याचे नुकतेच माझ्या निदर्शनास आले आहे. आता कधी एकदा सिंहगड रोड वर हॉर्न ऐकायला जातोय असे झाले आहे.
😆
23/10/2019

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...