Sunday 24 April 2016

Strawberry Fields (300 किमी सायकलिंग)

SR ची Brevet

         श्वाल्बे टायर प्रसन्न झाल्यामुळे आणि माझ्या अचानक उफाळून येणाऱ्या मुर्खपणामुळे ३०० च्या ब्रेवेटला मोठ्ठा DNF मिळालेला होता. त्यामुळे या कॅलेंडर वर्षात २००, ४०० आणि ६०० चे ब्रेवेटस यशस्वीरीत्या पुर्ण करुनही मी सुपर रॅंदोनिअर झालो नव्हतो. ६०० ला अपयश येऊन SR झालो नसतो तर समजण्यासारखे होते पण ३००च्या अपयाशामुळे SR होता आले नाही ही नक्कीच दुख वाटण्यासारखी बाब होती. आणि मी दुःखी होतो. १२ मार्चला ३०० चे ब्रेवेट पुर्ण करून या दुखावर मला फुंकर घालायची होती. त्यामुळे  चातक पक्ष्याप्रमाणे मी १२ मार्चची वाट पाहत होतो. रेकॉर्ड बनवणारे सायकलपटु संतोष होली यांनी मला फोन करून माझ्याबरोबर ३०० ची ब्रेवेट करण्याची इच्छा व्यक्त केली तेही त्यांच्या मारीचवर (गियर नसलेली सायकल). अशा प्रकारे रँदोनियर्सची संख्या वाढत असेल  तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. या कॅलेंडर वर्षात माझ्या मित्र परीवारातील पुणे रँदोनियर्सचे सभासदत्व घेऊन ब्रेवेट पुर्ण करणारे संतोष होली हे ४ थे सायकलपटु. याअगोदर युवराज सोनार यांनी २०० ची ब्रेवेट पुर्ण केली तर आशुतोष वाघमारे आणि धनंजय कोंढाळकर यांनी पहील्याच वर्षात सुपर रँदोनियर्सचा किताब मिळवला. माझ्यासारख्या न्युनतम व्यक्तीचे निमित्त होऊन रँदोनियर्सची संख्या अशीच वाढत राहो ही सदिच्छा. 

        मार्च महीना सुरू झाल्यापासुन ऊन्हाची तीव्रता वाढत चालली होती. ऊन्हामध्ये सायकल चालवण्याचा सराव व्हावा म्हणून मी भर दुपारी एक शिरवळची राईड करून आलो होतो. ४०० ची ब्रेवेट करताना मांड्याना क्रॅम्प आले होते त्यामुळे टॉयलेटला बसायचेसुद्धा वांदे झाले होते. त्यानंतर ६०० ला जाताना मी आवश्यक पुर्वतयारी करूनच गेलो होतो.६०० ची ब्रेवेट पुर्ण केल्यानंतर शारीरीक क्षमतेमध्ये (सायकल चालवणे) वाढ झाल्याचे जाणवत होते. आणि १०००ची ब्रेवेट होऊन गेल्यावर असे वाटले की केली असती तर बरे झाले असते. १००० चा विषय डोक्यात घुसलाय हे वेगळे सांगायला नकोच. एवढ्या ब्रेवेट्स केल्यानंतर आता बीरआरएम मध्ये काय काय करावे याची थोडीफार अक्कल आली आहे. 

       १२ मार्चला पहाटे साडेचारचा अलार्म लावलेला होता पण साडेतीनला मला अचानकपणे जाग आली, पहील्या मजल्यावरील माझ्या फ्लॅटमध्ये रस्त्यावरील दिव्याचा लख्ख उजेड पसरलेला होता. तेवढा उजेड पाहुन मला ६ वाजुन गेल्यासारखे वाटले. ते पाहुन माझ्या काळजात धडकीच भरली. बाप रे आता ब्रेवेटचे काय होणार? असे म्हणत मी पळतच गॅलरीमध्ये गेलो आणि आजुबाजुला सर्वत्र अंधार पाहुन खुप खुप समाधान वाटले. पुन्हा आतमध्ये जाऊन घड्याळात पाहीले तर साडेतीन वाजलेले होते. एकदा जाग आल्यानंतर मी पुन्हा झोपण्याचा विचार मी सोडुन दिला. थंड पाण्याने आंघोळ केली. सर्व आवश्यक सामग्री, खाण्याच्या वस्तु आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पंक्चरवरचे सर्व उपाय बरोबर घेऊन मी पुणे विद्यापीठला पोहोचलो. ब्रेवेटमध्ये सायकलींग करताना मला प्रेरणा देणारे वाक्य मी सुरुवातीला म्हणतो आणि मगच सायकलला टांग मारतो "बचेंगे तो और भी लढेंगे". आता लढाया वगैरे करण्याचे दिवस नाहीत पण सायकल चालवण्याचा पराक्रम दाखवता येतो.
स्टार्टींग पॉईंट
रेकॉर्डब्रेकर संतोष होली सोबत 
       याचदिवशी ६०० ची ब्रेवेटसुद्धा असल्यामुळे स्टार्टींग पॉईंटवरचे काम वाढुन फ्लॅग ऑफला उशिर झाला. ६०० वाल्यांना आमच्या अगोदर सोडण्यात आले. हा उशिर पसरनी घाटात खुप त्रासदायक ठरणार होता. सुर्य तापायच्या आत जास्तीत जास्त अंतर पार करायचे असे मी ठरवले होते. त्यामुळे कात्रज घाटात नेहमीपेक्षा जास्त जोर लावला. कुठेही न थांबता कापुरहोळ पार करुन शिरवळ गाठले. रँदोनियर्सचे हाल बघवले नाहीत म्हणुन फरहदने शिरवळजवळ केळीची व्यवस्था केली होती पण मी केळी घेण्यासाठी सुद्धा थांबलो नाही. पसरनी घाटात हाच एकेक मिनीट खुप महत्वाचा ठरणार होता. खंबाटकी पार करायला फारसे कष्ट लागले नाहीत. यावर्षात खंबाटकी पार करण्याची ही चौथी वेळ असल्यामुळे त्याची सर्व वळणे जवळजवळ तोंडपाठ झालेली आहेत. कमल तिलानी आणि मी आम्ही दोघांनी मिळुन बरोबरच खंबाटकी पार केला. अगदी वाईपर्यंत उन्हाचा कसलाच त्रास जाणवला नाही. पण ईथुन पुढे काही खरे नव्हते. उन्हाचा जोर वाढण्याच्या आत पसरनी घाट पार करून जाणे शक्य होईल असे मला वाटत नव्हते.

           माझ्या आयुष्यातील पहीली २०० ब्रेवेट मी पसरनी घाटातुन पुणे-पाचगणी-पुणे मार्गावर केलेली आहे. त्यामुळे पसरनीचा अनुभव पाठीशी होता. या अनुभवाच्या जोरावर महाबळेश्वर चेकपॉइंट पर्यंत पोचण्यासाठी मी एक योजना आखली होती. पुणे विद्यापीठापासुन सुरू केल्यानंतर नाष्ट्यासाठी कुठेही थांबायचे नाही, फ्राईड राईस आणि बटाटा एका पाऊचमध्ये घेतलेले होते जिथे भुक लागेल तिथे थांबुन तोच नाष्टा करायचा आणि लगेच हॅंडल धरुन पॅंडल मारायला सुरूवात करायची. खाण्यापिण्यात फालतु वेळ वाया घालवायचा नाही हीच ती योजना होती. ब्रेवेटमधील सायकलिंगला मांड्यांच्या ताकदीबरोबर मेंदुची जोडही असावी म्हणजे प्रवास सुखकर होतो. सकाळच्या नाष्ट्यापेक्षा पसरनी घाट पार करून कट ऑफ टाईमच्या आत महाबळेश्वर चेकपॉइंटला पोचण्यास मी प्राधान्य दिले होते. अशा योजना आखताना मी माझी लायकी अवश्य विचारात घेतो. सकाळी घरातुन निघताना १०० ग्रॅम गाईचे तुप गरम करुन घेतलेले होते. सायकलिंग करताना काय खावे म्हणजे भरपुर शक्ती मिळेल याची शोधाशोध करत असताना मला लागलेला हा शोध. गाईचे तुप हे माझ्यासाठी अफलातुन शक्दातीदायक आहे (१०० ग्रॅमला ६५०kcal पेक्षाही जास्त). तुपामुळे दुपारी १२:३० पर्यंत पोटात कसलीही कमतरता जाणवली नाही.
पसरनी घाट सकाळी ११:३० वाजता 
या गॉगलमुळे डोळ्यांना कडक उन्हाऎवजी शांत आणि शितल वातावरण दिसत होते
११ वाजुन ३७ मिनीटे
१२ वाजुन १ मिनीट
      पसरनीची मनात पसरलेली भीती खरी ठरु लागली. उन्हाच्या तीव्रतेने मला पसरनीतच गाठले. काहीजणांनी तर उन्हाची तीव्रता आणि पसरनीच्या पसा-यासमोर शरणागती पत्करल्याचे ऐकण्यात आले. हे ऐकल्यावर बचेंगे तो और भी लढेंगे म्हणतच मी कासव मोडमध्ये गेलो. कासव मोड म्हणजे शरीरातील कमीतकमी शक्ती खर्च करुन जो वेग मिळेल त्या वेगाने न थांबता अंतर कापत राहायचे आणि पुढील प्रवासासाठी उर्जा शिल्लक ठेवायची. पाचगणी मार्केटच्या आसपास पोचल्यावर पोटातील कावळे कोकलायला लागले. प्रशांत तिडकेंचा सल्ला मी मनापासुन पाळतो तो हा "Drink before thirsty and Eat before hungry". मी लगेच सायकल बाजुला घेतली आणि छानश्या सावलीमध्ये बसुन भात आणि बटाटा फस्त केला. पोटात भर पडल्यावर थोडे बरे वाटले. उन्हाच्या त्रासातुन वाचण्यासाठी मी अजुन एक लढवलेली शक्कल म्हणजे माझा निळा निळा गॉगल. या निळ्याशार गॉगलमुळे वातवरणातील तीव्र ऊन डोळ्यांना जाणवायचे नाही त्यामुळे बाहेरील वातावरणात तीव्र ऊन याची माहीती मेंदुपर्यंत पोचत नव्हती. माझ्या मेंदुला मी मुर्खात काढले होते. "...All is Well...Allis Well..". ज्या रंगाचा चष्मा असेल त्या रंगाची दुनिया दिसते असे म्हणतात. मी माझ्या डोळ्यांना शांत शितल दुनिया दाखवली आणि त्यांनी तीच मेंदुपर्यंत पोचवली. 
१२ वाजुन ५० मिनीटांनी भात+बटाटा
       दिव्या ताटेंनी या ब्रेवेटला स्ट्रॉबेरी फिल्डस नाव का दिले असावे ते ईथे गेल्यावर कळले. रसरशीत लालसर स्ट्रॉबेरीचे स्टॉल्स सगळीकडे लागलेले होते. रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी स्ट्रॉबेरीचे मळेसुद्धा दिसत होते. मला फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. स्ट्रॉबेरी खाण्याचा मोह तात्पुरता आवरला. आणि मार्गक्रमण चालु ठेवले.
दिव्या ताटेंनी या ब्रेवेटला स्ट्रॉबेरी फिल्डस नाव का दिले असावे ते ईथे गेल्यावर कळले.
स्ट्रॉबेरी स्टॉल्स १ वाजुन ३३ मिनीटे
स्ट्रॉबेरी स्टॉल्स १ वाजुन ३३ मिनीटे
        घामावाटे वाहुन गेलेले शरीरातील घटक भरुन येण्यासाठी सोबत आणलेली पावडर पाण्यामध्ये मिसळुन सायकलला अडकवली आणि थोडी पोटामध्ये ढकलली. ईथुन पुढे सायकल चालवणे असह्य होऊ लागले होते. थोडा जरी चढ आला तरी तो नकोसा वाटत होता. काही चढांवर तर मी खाली उतरुन सायकल ढकलत घेऊन गेलो. संतोष होली माझ्या मागोमाग येतच होता आणि कमल तिलानी माझ्या पुढे होता. कमलने रस्त्याच्या कडेला सायकलचे खाली डोके वर पाय करुन ठेवले होते. त्याचा अपघात होता होता वाचला आणि त्याचवेळेस सायकलला काहीतरी बिघाड झाला असे त्याने सांगितले. इच्छा असुनही माझ्या अज्ञानामुळे मी त्याला मदत करू शकलो नाही. मी त्याचा निरोप घेऊन सायकलला टांग मारली.
रेकॉर्ड होल्डर संतोष होलीबरोबर महाबळेश्वर चेकपॉईंटला पोचलो.(२ वाजुन १८ मिनिटे)
       तिथुन पुढे चढ येणे हळुहळु कमी झाले. वेण्णा लेकपर्यंत उताराचा रस्ता मिळाला. पण उताराचे सुख थोडयाच वेळात नाहीसे झाले. वेण्णा लेकपासुन सुरू झालेल्या चढाने शारीरीक क्षमतेचा अंत पाहीला. तो चढ पार केला की महाबळेश्वर चेकपॉइंट येणार एवढ्या एकाच सुखद विचाराने त्या सर्व वेदना सहन केल्या.
महाबळेश्वर चेकपॉईंटवर फरहदने दिलेल्या स्ट्रॉबेरी (२ वाजुन ४४ मिनिटे)
      अपेक्षेपेक्षा थोडे अंतर अलीकडेच चेकपॉइंट दिसला. फरहदला पाहुन माझा हर्ष आणि उल्हास दोन्ही गगनात मावत नव्हते. २ वाजुन १८ मिनिटांनी महाबळेश्वर चेकपॉइंटवर झेंडा रोवला.

महाबळेश्वर चेकपॉईंट वेळेनुसार:(पुणे विद्यापीठापासुन ६ वाजुन २५ मिनिटांनी सुरुवात)
१. परेरा ड्वेन  ( १२ वाजुन २ मिनिटे)
२. प्रथमेश सुर्यवंशी ( १ वाजता)
३. कुशल क्षीरसागर ( १ वाजुन ५ मिनिटे)
४. संतोष होली ( २ वाजुन १६ मिनिटे)
५. विजय वसवे ( २ वाजुन १८ मिनिटे)
६. हर्षद पवार ( २ वाजुन १८ मिनिटे)
(माझ्यानंतर आलेल्या रॅंदोनियर्सचा डेटा माझ्याकडे नाही)
बरेच रॅंदोनियर्स एकावेळी एकाच चेकपॉईंटवर (२ वाजुन ४५ मिनिटे)
         ब्रेवेटमधला दुखाचा डोंगर ओलांडून झाला होता आता सुखाची हिरवळ पहायची होती. दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरात जवळजवळ बरेच रँदोनियर्स महाबळेश्वर चेकपॉइंटवर आले. यात बरेच जण काठावर पास झाले. एकाच चेकपॉइंटवर एकाच वेळी एवढे रँदोनियर्स मी कधीच पाहीले नव्हते. ब्रेवेट कार्डवर सही शिक्का घेतला. फरहदने सर्वांना स्ट्रॉबेरीज खायला दिल्या. ब्रेवेटचे नावच स्ट्रॉबेरी फिल्ड असल्याने स्ट्रॉबेरीज खाणे ओघाने आलेच. चेकपॉईंटवरील पाणी, केळी आणि ईलेक्ट्रालचा खरपुस समाचार घेतल्यानंतर साधारण २ वाजुन ५० मिनिटांनी मेढा घाटाच्या दिशेने निघालो.

      ब्रेक तपासुन घेतले आणि मगच मी तीव्र उतारावर सायकल सोडली आणि त्यानंतर मागे वळुन पाहीले नाही. मेढा घाट पुर्ण झाडीने व्यापलेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा भरपुर झाडे आहेत. उतारावर काहीही न करता पळणारी सायकल आणि वृक्षांची शितल छाया माझ्या मनास आणि शरीरास खुप प्रसन्न करत होती. दिव्या ताटेंनी सांगितल्याप्रमाणे तीव्र उतारावरून जाताना जागच्या जागी वळण आल्यावर खुप खबरदारी घेतली. मेढा घाटाचा हा तीव्र उतार मी अघाशासारखा संपवला. 
साता-याकडे जाताना मेढा घाट (३ वाजुन १३ मिनिटे)
मेढा घाटात सेल्फी (३ वाजुन १३ मिनिटे)
         उतार संपल्यानंतर उन्हाची ताप पुन्हा जाणवायला लागली. एकंदरीत हा प्रवास सुखकर नव्हताच. तापोळा वगैरे नाव पाट्यांमध्ये वाचले. महाबळेश्वर ते सातारा या मार्गातील जमेची बाजु म्हणजे या मार्गावर शितल छाया देणारे अनेक वृक्ष आहेत. उन्हाच्या झळा असह्य झाल्या की एखाद्या वृक्षाची सावली आसरा देत असे. थोडे फार ताजेतवाने वाटले की पुन्हा धर हॅंडल मार पॅंडल सुरु व्हायचे. 
शितल छाया देणारा एक वटवृक्ष
साता-याकडे (३ वाजुन ५४ मिनिटे)
       मजल दरमजल करत सातारा चेकपॉईंट गाठला. साता-याच्या अलिकडेच हा चेकपॉईंट लावलेला होता. ५ वाजले होते पण वातावरणातील गर्मी कमी होण्याचे नाव घेत नव्हती. सकाळी चेकपॉईंटला भेटलेला योगेश पुन्हा भेटला. योगेश शिंदे म्हणजे सर्व रॅंदोनियर्सला हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्व, बीआरएमच्या नियमात बसणारी कोणत्याही प्रकारची मदत करण्यास तो सदैव तत्पर असतो आणि एवढे सगळे करुनही सतत हसतमुख राहणारा. चेकपॉईंटवर गेल्यावर त्याने आम्हाला डिशभरुन कलिंगड खायला दिले.
डावीकडुन तिसरा योगेश शिंदे (५ वाजुन ५ मिनिटे)
       चेकपॉईंट सोडताना योगेशने सांगितले की सातारा मुख्य चौकात जाऊन पुण्याकडे वळायचे आहे. त्याप्रमाणे मी सातारा चौकाकडे निघालो. आता मला खुप भुक लागलेली होती. तेवढ्यात सर्व व्यवस्था असलेले एक हॉटेल दिसले. पुढचा मागचा विचार न करता सायकल घेऊन त्या हॉटेलमध्ये शिरलो. सायकल लावायला सुरक्षित जागासुद्धा मिळाली.
सातारा मुख्य चौक ५ वाजुन ४६ मिनिटे
      बाथरुमला जाण्याअगोदर ऑर्डर देण्यासाठी वेटरला बोलावले. दाल तडका, जिरा राईस, थम्स अप आणि एक लस्सी ची ऑर्डर दिली. तो वेटर चतुर होता. त्याने माझी गरज ओळखली आणि म्हणाला, 
"साहेब, त्यापेक्षा खिचडी भात चालेल का?" 
"क्या बात है, चालेल नाही पळेल, ये घेऊन लवकर तोपर्यंत मी जाऊन येतो"
            परत येईपर्यंत टेबलावर सर्व तयार होते. सतत सायकल चालवत राहील्यानंतर तोंडामधे एक प्रकारचा कडवटपणा आलेला असतो त्यामुळे भुक लागलेली असुनदेखील घशाखाली अन्नपदार्थ घ्यायला गेले की उलटी झाल्यासारखे होते अशावेळी थम्सअप कामास येतो. एवढा खिचडी भात खाल्ल्यानंतर एक लस्सीसुद्धा फस्त केली. सात वाजत आले होते. सुर्यास्त होऊन गेला होता तरीही थोडासा उजेड जाणवत होता. पोटात भर पडल्यामुळे आणि आता उन्हाचा त्रास जाणवणार नसल्यामुळे सायकल चालवणे सुखकर होणार होते.  हॉटेलबाहेरच्या टपरीतुन दोन बिस्कीटचे पुडे घेऊन हॅंडलबार बॅगमध्ये ठेवुन दिले. भुक लागल्यासारखे वाटले तर बिस्कीटे नेहमीच कामी येतात. 
खिचडी भात ६ वाजुन १० मिनिटे
         सातारा सोडल्यानंतर खंबाटकी बोगदा येईपर्यंत कुठेही थांबायचे नाही असे मी ठरवले होते. हा साधारण ४० किमीचा पट्टा आहे. या पट्ट्यातील ब-याच उड्त्या पुलांची कामे आता पुर्ण झालेली आहेत त्यामुळे आता सर्व्हीस रोडवर उतरण्याची गरज नाही. ज्याठिकाणी माझी सायकल पंक्चर झाली होती ते ठिकाण मी कधीच विसरू शकत नाही. त्याठिकाणावरुन जाताना दुख-या आठवणी जाग्या होतात. तिथुन जाताना थोडी भिती वाटत होती (पंक्चरची). केवढी ही धास्ती !

सायकल चालवता चालवता व्हाटसअप ग्रुपमध्ये अपडेट देणे चालुच होते. खंबाटकी बोगद्याजवळ थोडी विश्रांती घेतली. तिथुन थेट कापुरहोळ गाठले. अधुनमधुन बिस्कीटांवर ताव मारत होतो. अंधार असल्यामुळे फोटोग्राफीला काहीच वाव नव्हता. कापुरहोळमध्ये तिघा जणांचा ग्रुप माझ्यापुढे निघुन गेला. जाताना त्यांनी काही प्रोब्लेम आहे का? ते आवर्जुन विचारले. रॅंदोनिअर्सचा एकमेकांना मदत करण्याचा स्वभाव नजर लागण्यासारखा आहे. 

            आता शेवटचा टप्पा शेष होता. कापुरहोळ ते औंध साधारण ३५ किमीचा शेवटचा टप्पा. कापुरहोळ सोडल्यानंतर मी मागे वळुन पाहिलेच नाही. जे तिघेजण माझ्या पुढे गेले होते ते मला वरवेजवळ भेटले. ३ लेनचा रोड जिथे २ लेनमध्ये छोटा झालाय तिथे त्यांच्यातला एकजण पडता पडता वाचला म्हणुन ते थांबले. अपघात होता होता वाचला बाकी काहीही झाले नाही. शिंदेवाडीच्या चढावर एक रॅंदोनियर खुपच हळु सायकल चालवत होता त्यामुळे मी त्याच्या पुढे जाऊ शकलो. संपुर्ण प्रवासात कुठेही कोणाशीही कसलीही तक्रार झाली नाही. कात्रजच्या बोगद्यात सायकल सोडल्यावर मी थोडा रीलॅक्स झालो. कात्रज घाटाच्या उतारावरील रम्बलर सायकलस्वारांसांठी खुप धोकादायक आहेत. उतारावरुन मिळालेला वेग एवढा तीव्र असतो की तेवढ्या वेगात रम्बलरवर सायकल गेली तर एखादा तरी कोलमडुन पडु शकतो. 

     कात्रजचा उतार संपल्यानंतर संतोष होली सायकलचा हॅंडल सरळ करत थांबले होते. मला वाटले की तो त्या रम्बलरचा प्रताप असावा. पुढे गेल्यावर वडगाव चौकात खुप मोठी वाहतुक कोंडी झालेली होती. पीएमपीएलची एक बस त्या पुलावर बंद पडली होती. सर्व बीआरएम चांदणी चौकात संपतात त्यामुळे तिथे पोचल्यावर तिथुन पुढे जायला मन तयार होत नव्हते. चांदणी चौक ते औंध अंतर कापत असताना संतोष होली पुन्हा माझ्या बरोबर आले. 

       औंधला रोडला आल्यावर शेवट कुठे होणार हे आम्ही शोधायला लागलो तेवढ्यात संजय करंदीकरांनी आम्हाला आवाज दिला. रात्रीची वेळ असुनही संजय करंदीकर सहकुटुंब येऊन Volunteer ची भुमिका पार पाडत होते. रात्री १ वाजुन २० मिनिटांनी माझे ब्रेवेट कार्ड मी त्यांच्याकडे सुपुर्द केले. मला जोग कुटुबियांचे खुप कौतुक वाटले ते एवढ्या रात्री प्रशांतचे अभिनंदन करण्यासाठी एन्ड पॉईंटवर हजर होते. त्यांच्यासोबत उमेशसुद्धा आला होता. 

       माझे सुपर रॅंदोनियर होण्याचे स्वप्न पुर्ण झाले. जे ठरवले ते पुर्ण करण्याचा आनंद काही औरच....आता दरवर्षी सुपर रॅंदोनियर होता यावे ही सदिच्छा!
जय हिंद !

३०० किमी बीआरएम पुर्ण करणारे (मी पुर्ण करेपर्यंत)
(पुणे विद्यापीठापासुन ६ वाजुन २५ मिनिटांनी सुरुवात)
१. कुशल क्षीरसागर ( ९ वाजुन ४७ मिनिटे)
२. प्रथमेश सुर्यवंशी ( ११ वाजुन ५७ मिनिटे)
३. हर्षद पवार ( १ वाजुन १८ मिनिटे)
४. विजय वसवे ( १ वाजुन २० मिनिटे)
४. संतोष होली ( १ वाजुन २० मिनिटे)
एका वर्षात सहा वेळ सुपर रॅंदोनियर होण्याचा भीम पराक्रम करणारे संजय करंदीकर यांच्याकडे ब्रेवेट कार्ड सुपुर्द करताना
३०० बीआरएम शीट





PS:
या बीआरएमशी संबंधीत लिंक्स;
१. सहभागी सायकलपटु (रॅंदोनियर्स)
http://www.audaxindia.org/event-e-534

२. बीआरएमचा मार्ग


http://www.audaxindia.org/route-card.php

३. अंतर आणि वेळमर्यादा
वेळ = २० तास
अंतर = ३०० किमी.
प्रवेश फी = ६५० रुपये.

४. राईडचे नियम;
बीआरएम मध्ये सायकल चालवण्याअगोदर हे नियम वाचणे आवश्यक आहे.
बीआरएम राईडचे नियम (संपुर्ण जगामध्ये लागु असलेले नियम)
भारतासाठी बीआरएमचे नियम (भारतासाठी लागु असलेले नियम)

५. फेसबुकवरील लिंक्स (Facebook Album Link)
फेसबुकवरील फोटोज

Thursday 21 April 2016

सांदन व्हॅली


सांदन व्हॅली
           एकाच दिवशी अनेक कार्यक्रम आले की मी नेहमी संभ्रमात पडतो की आता नक्की काय करायचे? माझ्या आयुष्यात असे प्रसंग खुप वेळा आलेले आहेत की सायकलिंग, ट्रेकींग, क्रिकेट सामना किंवा एखाद्या मित्राच्या फार्म हाउसवर पार्टी या सर्वांचा दिवस एकच आलेला असतो. आणि या सर्वांमधून मला एकच पर्याय निवडुन बाकीच्या पर्यायांवर पाणी सोडावे लागते. १९ मार्च शनिवार हा त्यापैकीच एक दिवस. शिखर फाउंडेशनने सांदन व्हॅली ट्रेक १९ आणि २० मार्चला आयोजित केलेला होता. शनिवारी सकाळची शिफ्ट दुपारी ३ वाजता सुटली की तसेच सांदन व्हॅलीकडे प्रस्थान करावयाचे होते. व्हाटसअ‍ॅप ग्रुपमध्ये याची सविस्तर माहीती आलेली होती. चहा, नाष्टा व दोन वेळा जेवणाच्या सोयी सहीत रात्रीची झोप तंबुच्या कॉलनीत घेता येणार होती. आपण फक्त पाण्याच्या बाटल्या आणि पांघरुण घेऊन जायचे की सांदन व्हॅली ट्रेक मार्गी लागणार होता. 

    पण नेहमीप्रमाणे माझ्यासाठी १९ मार्चला त्रिधा मनस्थिती झालेली होती. १९ मार्चला भारत वि. पाकीस्तान हा टी-२० वर्ल्ड कप मधला सामना कलकत्त्यात रात्री ८ वाजता सुरु होणार होता आणि त्याचदिवशी आमलकी एकादशीचा उपवाससुद्धा होता. एकादशीचा उपवास माझ्यासाठी जीव की प्राण आहे. सांदन व्हॅली खुप दिवसापासुन मनात आणि मेंदुत वळवळ करत होती. या दोन गोष्टींपुढे क्रिकेट सामना बघण्याचा विचार मी सोडुन दिला. क्रिकेट सामना रेकॉर्ड करुन ट्रेकवरुन परत आल्यानंतर पुन्हा पाहता येईल पण सांदन व्हॅली ट्रेक शिखरच्या मित्रांबरोबर पुन्हा करण्याची संधी लवकर मिळणार नाही हे मात्र नक्की होते. आता उरला प्रश्न फक्त एकादशी उपवासाचा. उपवासाची खिचडी बरोबर घ्यायचे ठरवले. आणि उपवासाची माहीती शिवाजी आंधळेंना दिल्यावर त्याने त्वरीत तुकाराम बांडेंना फोन करुन दोन-तीन व्यक्तींसाठी खिचडी बनवण्याची व्यवस्था केली. "वो ही सही होय जो राम रचि राखा" अशा रितीने एकादशी उपवासाचा प्रश्नसुद्धा मार्गी लागला. आणि आता कुठलाच विषय शिल्लक न राहील्यामुळे सांदन व्हॅलीला न जाण्याचा विषयच नव्हता.

           ड्रायव्हींगचा त्रास न घेता ट्रेकला जायला मिळणे हे एक सौभग्यच. ३२ सीटर बस केलेली होती. बसमध्ये एकाने स्वयंचित्रखेचकदंडुका आणला होता. त्याच्यासहाय्याने आम्ही बसमध्येच चार ते पाच ग्रूप सेल्फी काढल्या. साधारण ५ तास प्रवास केल्यानंतर आम्ही साम्रद गावात पोचणार होतो. कुशल ट्रेकर्सबरोबर ट्रेकला जाण्याचा फायदा म्हणजे आपल्या मेंदुला कसलाही त्रास द्यावा लागत नाही. फक्त ज्या सुचना येतील त्या व्यवस्थित पाळल्या की काम फत्ते. एका मेंदुपेक्षा १० मेंदु केव्हाही श्रेष्ठच. कोणता मार्ग निवडायचा यावर बरीच चर्चा होऊन जो सोपा आणि जवळचा होता तो निवडुन आम्ही रात्री ९:३० वाजता साम्रद गावात पोहोचलो. शिखर टिममध्ये एकापेक्षा एक अनुभवी ट्रेकर्स आहेत. त्या अनुभवाचा फायदा नव्याने येणा-या ट्रेकर्ससाठी एक पर्वणीच असते.

     साम्रद गावात पोचल्यावर आम्ही कुठे टिव्ही चालु दिसतोय का ते पाहु लागलो पण कुठेही भारत-पाक सामना पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता किंवा गर्दी आढळ्ली नाही. याचा अर्थ या अतिशय दुर्गम भागातील लोकांना क्रिकेट सामना पाहण्याव्यतिरीक्त ईतरही बरीच महत्वाची कामे होती. आम्हीच तेवढे कर्मदरिद्री निघालो. बस पार्कींगसाठी जागा शोधुन तंबु कॉलनी तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले. ३२ जणांना झोपायला जागा पुरेल एवढे तंबु एका रेषेत उभारुन एक छान कॉलनी तयार झाली होती. झोपायची व्यवस्था झाल्यानंतर आम्ही पोटाच्या व्यवस्थेकडे वळालो. आमचा मोर्चा तुकाराम बांडेंच्या घराकडे वळला. सर्वांची जेवणाची व्यवस्था अंगणातच केलेली होती. संतोष झेंडे आणि मला एकादशीचा उपवास असल्यामुळे आम्ही खिचडी खाण्यासाठी घरामध्ये बसण्याचे ठरवले. घरात प्रवेश करतोय तर काय समोर १८ ईंची टिव्हीवर भारत -पाक सामना सुरु होता. पाकीस्तानची फलंदाजी उरकलेली होती. भारताला विजयासाठी ११८ धावांचे लक्ष्य १८ षटकांमध्ये गाठायचे होते. पावसामुळे हा सामना १८ षटकांचा करण्यात आलेला होता. विराट कोहलीने शानदार अर्धशतक ठोकुन भारताला हा सामना एकहाती जिंकुन दिला. भारताचा संपुर्ण डाव पाहायला मिळाला. मॅच पाहण्यासाठी ट्रेकला कलटी दिली नाही तेही बरेच झाले म्हणायचे. काच-या बटाटा आणि गावरान तिखट हिरवी मिरची टाकुन केलेली साबुदाण्याची खिचडी अप्रतिम झालेली होती. ते आठवले की अजुनही ती चव जिभेवर रेंगाळते. खिचडीवर खरपुस समाचार घेतल्यानंतर उपवासामुळे येणारी ग्लानी बिल्कुल जाणवली नाही. भारत-पाक सामना पाहायला मिळाला त्याचबरोबर उपवासाची खिचडी सुद्धा मनासारखी मिळाली. अजुन काय हवंय मग? आता झोप हवी होती. बांडेंच्या घरापासुन मोर्चा तंबुच्या कॉलनीकडे वळवला. राजेश चिंचवडे, भास्कर मोरे, संतोष झेंडे आणि मी असे आम्ही चौघेजण एका तंबुत झोपलो. झोपण्याअगोदर राजेशने दिलेल्या सर्व सुचना मी पाळल्या. तंबुच्या बाहेर ठेवलेले बुट उघड्यावर ठेवल्यास रात्री कुत्री पळवुन नेतात त्यामुळे बुट तंबुच्या कापडाखाली ठेवावेत ही राजेशने दिलेली सुचना मी तंतोतंत पाळली. कोणी घोरतंय का? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न गॅस प्रकरण करणारे कोणी नाही ना? या दोन्ही गोष्टी तंबुत झोपण्यासाठी खुप बाधक आहेत. आमच्या तंबुत हे असे काही झाले नसावे कारण पहाटे ऊठल्यावर कोणीही याबद्दल तक्रार केली नाही. 

      एवढ्या निसर्गमय ठिकाणी सुर्योदयाअगोदर जाग आली तर सोने पे सुहागा असतो. सर्वात अगोदर राजेशला जाग आली आणि एकामागोमाग एक आम्ही सर्वजण ऊठलो. निसर्गाच्या सानिध्यात सर्व नैसर्गीक क्रिया उरकल्यानंतर तंबुची कॉलनी गुंडाळुन बसमध्ये ठेवली. चारी बाजुंनी ऊंच डोंगर असल्यामुळे सुर्योदयाचा नजारा पहावयास मिळणे तसे कठीणच होते. सुर्याचा लाल गोळा अलगद क्षितीजावर उमटताना पाहावयास मिळाला नाही. आम्ही झोपण्याचे साहीत्य बसमध्येच ठेवले. मी आणि संतोष झेंडेने दोघात एकच सॅक घ्यायचे ठरवुन प्रत्येकाने ती निम्मा वेळ बाळगायची असे एका कराराद्वारे मान्य केले. पाण्याच्या बाटल्या, कॅमेरा, मोबाईल, वॉकींग स्टिक, पोहण्याचे साहीत्य, शक्तीवर्धक खाद्य आणि बॅटरी बॅंक क्वेचॉच्या सॅकमध्ये  भरले. पहीली तु घेतो का मी घेऊ? असे संतोषला विचारल्यावर तो म्हणाला अगोदर तु घे.

                 तुकाराम बांडेंनी सकाळी सहाच्या ठोक्याला ४० जणांना पुरतील एवढे कांदा-पोहे तयार ठेवले होते. मी सूर्यनारायणाची वाट पाहत होतो. एकादशीचा उपवास बारशीचा सुर्य उगवल्यावर सोडायचा असतो. सुर्यनारायणाला वंदन केले आणि वासुदेव श्रीकृष्णाचे स्मरण करून मी पोहे खायला सुरूवात केली. आमलकी एकादशी व्रताचा संकल्प कोणत्याही अडथळ्याविना मार्गी लागला होता. आता आम्ही सांदन दरीचा मार्ग धरणार होतो. सर्व ट्रेकर्स पोहे घशाखाली उतरवुन दरीकडे निघण्याच्या तयारीत होते. सांदन दरीकडे जात असताना पाठमोऱ्या नजाऱ्याकडे लक्ष गेले. सूर्योदयाच्या कोवळ्या किरणांनी अलंग, मदन आणि कुलंग या त्रिकुटाला सोनेरी मुलामा चढवला होता. जणुकाही ते सोनेरी पाण्यात स्नान करुन नुकतेच बाहेर आलेत असे वाटत होते. फोटो काढले का? किंवा इतर कोणताही प्रश्न जर कोणी विचारला तर "तो विषयच नाय ना" हा जितेंद्र जोशीचा डायलॉग(पोश्टर गर्ल सिनेमा मधला) प्रत्येकजण फार उत्साहाने म्हणत असे....तो विषयच नाय ना...या डायलॉगने संपुर्ण ट्रेकमध्ये चांगलीच करमणुक झाली. अलंग, मदन आणि कुलंगचे कोवळ्या सुर्यकिरणांनी सुवर्णलेपित झालेले रूप फार विलोभनीय दिसत होते. कळसुबाई शिखर मान वर करून सांदन दरीत कोणकोण चाललंय यावर लक्ष ठेवुन होते. काही ट्रेकर्स फोटो काढण्यात एकदम गुंग होते तर काहींना फोटो काढण्यात काहीही स्वारस्य दिसत नव्हते. काहीजण नेमुन दिलेली जबाबदारी पार पाडत होते. ट्रेकची सुरूवात सपाटीवर होऊन दरीतील पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने खाली उतरत जावुन तिथे युटर्न घेऊन तीव्र चढण चढुन पुन्हा साम्रदमध्ये आलो की ट्रेकची सांगता होणार होती. एका चिमुकल्यासह आम्हा ३२ ट्रेकर्सचा लोंढा दरीच्या तोंडावर एकट्या गाईडने थोपवुन धरला. सांदन दरीतला बाजीप्रभूच जणु तो. त्याच्या सुरक्षेविषयीच्या सुचना ऐकल्याशिवाय कोणालाही दरीत प्रवेश मिळणार नव्हता. विवेक तापकीर आणि प्रविण पवार यांनीसुद्धा सर्व ट्रेकर्सना आवश्यक मार्गदर्शन केले. 

    बांध तोडल्यानंतर पाणी जसे लगेच गतीमान होऊन खळखळत पुढे सरसावत निघुन जाते तसे गाईडने ईशारा दिल्यावर काही द्रुतगती ट्रेकर्स त्या सांदन दरीमध्ये दिसेनासे झाले. मला कसलीही घाई नव्हती. मी कॅमेरा मुठीत आवळुनच पुढे सरसावलो. आज सांदन दरी माझ्या सायबरशॉट सोनी कॅमे-यामध्ये कैद होणार होती. आशियातील नंबर २ ची व्हॅली मी कैद केल्याविना थोडीच सोडणार होतो. या व्हॅलीत काही दिवसांपुर्वी एयरटेल ४जी ची जाहीरात शुट केली गेली आहे. जाहीरातीचा उद्देश काही का असेना पण त्यानिमित्ताने सांदन दरी संपुर्ण भारताला माहीत झाली. दरीत प्रवेश केल्यावर अरुंद कडयांची वाट पाहावी लागत नाही. ते आपल्या सोबतच दरीत उतरतात. सकाळची वेळ असुनही दरीच्या अरूंद भागात भरपुर सुर्यप्रकाश (किरणे नव्हेत) पसरलेला होता. सांदन दरीचे ते सौंदर्य मी डोळ्यात आणि अधुन मधुन कॅमे-यातही साठवत होतो. त्या ऊंच आणि अरूंद कडयांवर नजर थांबत नव्ह्ती. निसर्गाची किमया मी डोळे विस्फारुन आणि अचंबित होऊन पाहत होतो. त्या ऊंच आणि अरुंद कड्यांचे अस्तित्व थोड्याच अंतरापर्यंत आहे पण ते त्यांच्या अस्तित्वाची चांगलीच जाणीव करून देतात. त्या दोन्ही कडयांच्या मधुन चालण्याचा अनुभव काही औरच.

          सांदनविषयी जे जे वाचलेले होते  ते ते डोळ्यांसमोर तरळु लागले. पहीली नजर टाकल्या टाकल्या मला ती दरी म्हणजे एखाद्या खोल कि-वे सारखी वाटली. टेक्नीकल क्षेत्रात आणि तेही मशिनिस्ट असल्याने या दरीला मी सहज दिलेली उपमा. एका भल्या मोठया लोखंडी प्लेटवर १ मिमी जाडीच्या साईड अ‍ॅंड फेस कटरने खुप खोलवर कि-वे ऑपरेशन करुन ती तयार केलेली असावी असे मला वाटले. पावसाच्या पाण्याने कोकणात उतरण्यासाठी सह्याद्रीच्या कणखर खडकांशी झुंज देत सह्याद्रीच्या कडयांना भेदुन अलगद तयार केलेली वाट म्हणजे सांदन दरी. लाथ मारीन तिथे पाणी काढीन या म्हणीच्या उलट पाण्याने लाथ मारुन खडकांतुन काढलेली वाट म्हणजे सांदन दरी.

     सांदन दरी म्हणजे इंद्राने त्याच्या वज्रप्रहाराने  सह्याद्रीच्या छाताडावर खोलवर ओढलेली रेष आहे की काय असे वाटायला लागले कारण सह्याद्रीच्या कातळ, राकट आणि कणखर कडयांचे दगड भेदुन एवढी खोल वाट तयार करणे सोपे काम नाही. आणि अलगद खळखळणारे पावसाचे पाणी राकट रांगड्या सह्याद्रीच्या खडकांमध्ये एवढी मोठी भेग पाडु शकेल असे स्वप्नातही वाटत नाही. सांदन दरीच्या सौंदर्याचा आस्वाद घेत घेत आम्ही हळुहळु पुढे सरकत होतो. आता कमरेएवढया पाण्यातुन चालत जाण्याची उत्सुकता वाढत चालली होती. त्या पाण्यातुन जाताना क्वेचॉची सॅक, मोबाईल, कॅमेरा आणि बॅटरी बॅंक कशी सांभाळावी याची चिंता होती. पण जेव्हा आम्ही प्रत्यक्ष त्याठिकाणी पोचलो तेव्हा तिथे लाकडी फाटयांना खिळे ठोकुन सेंटरींगच्या ढाच्यासारखा एक छोटासा पुल बनवलेला होता. हा पुल एकतर सांदन दरीवर पैसे कमावणा-या गावक-यांनी बांधला असावा किंवा ट्रेकींगद्वारे पैसे कमावणा-या एखाद्या संस्थेने बांधला असण्याची शक्यता वाटत होती. या पुलामुळे पाण्याच्या थेंबालाही स्पर्श झाला नाही. पाण्यात जावे लागले नाही म्हणुन मला बरे वाटले की पाण्यात जायला मिळाले नाही म्हणुन मी दुखी झालो तेच कळत नव्हते. 

        जसजसे आम्ही अंतर कापत पुढे जाऊ लागलो तसतशी ती दोन कडयांमधील अरुंद फट रूंद होऊ लागली. सांदन दरी हळुहळु अक्राळविक्राळ रूप धारण करू लागली. सांदनच्या विलक्षण सौंदर्याची भुरळ पडुन तिच्या प्रेमात पडलेल्यांना ती नकोशी वाटावी एवढी ती भयानक रुप दाखवु लागली. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेले मोठमोठे दगड, मोठमोठे खडक, कड्यांचे निखळुन पडलेले अवशेष आणि या सर्वांच्या संयोगातुन तयार झालेला दमछाक करणारा दुर्दम्य मार्ग. तोही आपला आपण शोधायचा. तेथील खडकांच्या आकाराचा अंदाज घ्यायचा असेल तर तो फोटोमध्ये असलेल्या मानवी आकृतींवरून घेता येईल. जिथे पायाची ढेंग पोचेल आणि तो व्यवस्थित ठेवता येईल तिथे ठेऊन तोल जाऊ न देता मार्गक्रमण करत करत रॅपलींग करावे लागते त्यठिकाणी पोहोचलो. तिथे अपेक्षेप्रमाणे ट्रॅफिक तुंबलेले होते. अमुक ठिकाणी किती वाजता पोहोचलो? हे मला लक्षात ठेवावे लागत नाही फोटोच्या प्रॉपर्टीजमध्ये तारीख आणि वेळेची नोंद झालेली असते. त्यावरून लगेच कळते. या सांदन दरीकडे पाहुन असे वाटले की प्रत्यक्ष यमसुद्धा पावसाळ्यात या दरीमध्ये येण्याचे धाडस करणार नाही. 

        शिखर टीमने अजिबात वेळ न दवडता पटापट एकेका ट्रेकरला दोराने खाली सोडायला सुरूवात केली. संजय बाठे कमरेला दोर गुंडाळून नवशिक्यांसाठी बिलेयर झालेला होता. नेहमीच्या सरावातले क्लायंबर्स आल्यावर त्याने बिले द्यायचे बंद केले. रॅपलिंग करून खाली उतरल्यानंतरही कठीण मार्ग संपायचे नाव घेत नव्हता. दोन प्रचंड खडकांचा एकमेकांशी झालेल्या गुंत्यात एक अनोखा मार्ग तयार झालेला आहे. त्यामध्ये खाली वाकुन थोडे सरपटत पुढे सरकावे लागते. एक फुट ऊंचीच्या फटीतुन साधारण १० फुट अंतर सरपटत जावे लागते.

     एकदा अक्राळ-विक्राळ रूप धारण केल्यानंतर अगदी शेवटपर्यंत सांदन दरी कुठेही सुखकर झाल्यासारखे वाटत नाही. प्रवाहातील खडकांचा आणि दगडांचा आकार कुठेही कमी झालाय असेही वाटत नाही. सांदन दरीचा प्रवास संपल्यानंतर डोहामध्ये पोहण्याची उत्सुकता लागली होती. फोटो काढण्यात कुठेही कंजुषपणा केला नाही. एकदम दिल खोल के फोटोची हौसमौज करुन घेतली. डोहाजवळ पोचलो तेव्हा जीवात जीव आला. आता त्या डोहामध्ये आम्ही मनसोक्त पोहणार होतो. डोहामध्ये स्वैर ढुंबण्याचा आनंद काही औरच..पाण्याच्या स्पर्शाने कसल्याही दुष्कर प्रवासाचा क्षीण दुर होऊ शकतो. तो अनुभव मी घेतला. पाण्याच्या स्पर्शामध्ये जादु असते म्हणतात ते काही खोटं नाही. डोहातील पाण्यात पोहल्यावर खुप ताजेतवाने वाटायला लागले. सर्व ट्रेकर्स डोहामध्ये मनसोक्त पोहले. पोहण्याच्या कार्यक्रमानंतर भेळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुधीर गायकवाड आणि राजेश चिंचवडे यांनी चटकदार भेळ बनवली. त्या चटकदार भेळीचा खरपुस समाचार घेतल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सूरुवात केली.

            सांदन दरीतुन बाहेर पडुन डोहामध्ये पोहलो की ट्रेक संपला अशा अविर्भावात आम्ही निघालो. पाण्याच्या कुंडाजवळुन निघताना क्वेचॉची सॅक मी संतोष झेंडे कडे दिली. दोघांचे साहीत्य एकाच सॅकमध्ये घेऊन एकेकाने निम्मा ट्रेक संपेपर्यंत सॅक सांभाळायची असे आमचे ठरलेलेच होते. त्यामुळे इथुन पुढच्या प्रवासात माझ्याकडे कसलेही ओझे नसणार होते. आता सुर्य बरोबर डोक्यावर आलेला होता. ऊन्हाचे चटके काय असतात ते चांगलेच जाणवु लागले. थोडे अंतर पुढे आल्यावर आम्हाला एक अतिशय लाजिरवाणे दृश्य दिसले. एखाद्या उर्मटाने मुद्दाम ती अंतर्वस्त्रे तिथे फेकली असतील किंवा त्याठिकाणी एखादी अघटीत घटनाही घडलेली असेल. ज्यठिकाणी ट्रेकसाठी लहान मुले, मुली तसेच सर्व कुटुंब एकत्र येत असेल तिथे अशी दृश्ये दिसावीत हे लांच्छनास्पद आहे. सर्व ट्रेकर्स मित्रांना विनंती आहे की अशा गोष्टींना आळा घालणे जरी आपल्या हातात नसले तरी त्या दिसताच आपण त्यांचा नायनाट करावा. 

       आम्ही उजवीकडे जाणाऱ्या पायवाटेकडे वळालो. करवंदाच्या जाळीवरची काळी मैना अजुनही हिरव्या रंगात होती. करवंदाच्या त्या जाळीला वळसा घातल्यावर मिनी कोकणकडयाचे दर्शन झाले. वरपर्यंत नजर टाकल्यावर पुढे काय वाढून ठेवले आहे याची पुर्ण कल्पना आली. कडक ऊन्हात ती ऊभी चढण पार करुन जायचे होते. सूर्यनारायण पूर्ण क्षमतेने त्यांच्या झळा सोडत होते. दहीहंडीमध्ये गोविंदाना वरच्या थरावर जाता येऊ नये म्हणून पाण्याचे फवारे मारतात तसे आम्हाला हि चढण चढता येऊ नये म्हणून सुर्यदेव आमच्यावर ऊन्हाच्या झळा फेकत होते. पण मी जराही डगमगलो नाही. कोणत्याही परिस्थितीत ही चढण पार करायचीच आणि तेही न थांबता असे मी ठरवलेलेच होते. पाण्याची बाटली संतोषजवळील सॅकमध्ये होती. संतोष माझ्या बरोबरीने चालेल अशी अपेक्षा होती परंतु तो खुप मागे पडल्यावर मी त्याचा नाद सोडुन दिला. आता माझ्याजवळ पाणीही नव्हते. मी सर्वात पुढे निघालो होतो. माझ्याबरोबर चालणारे ट्रेकर्स हळुहळु मागे पडायला लागले होते. त्या कडक उन्हातही मी न थांबता चालत होतो.

          अशा दुर्गम भागात आणि रणरणत्या ऊन्हात सह्याद्रीच्या तीव्र चढावर सुंदर ललनांचे अचानक दर्शन व्हावे हा एक अलभ्य लाभच. मुंबईतील कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींचा ग्रुप होता. त्यांनासुद्धा साम्रद गावात जायचे होते. त्यांच्या जवळचे पाणी संपलेले होते आणि अवसानही. त्यांनी गोड आवाजात चोकशी केली की चढायला किती वेळ लागेल वगैरे. मला तरी कुठे माहीत होते किती वेळ लागेल? पण त्यांची अवस्था पाहुन तुम्हाला ३ तास लागतील असे ठोकुन दिले. त्या मंजुळ आवाजाच्या मोहात न पडता मी तिथुन लवकरात लवकर पळ काढला आणि माझे मार्गक्रमण चालु ठेवले.  माझ्यासाठी १ तास पुरेसा होता. आणि १ तासामध्ये ती चढण पार करुन पठारावर एका झुडुपाच्या सावलीखाली मी आराम केला. आता पोटात भुकेचा ढोंब उसळलेला होता. शिवाजी आंधळे आल्यावर मी तुकाराम बांडेंच्या घराकडे दुपारच्या जेवणासाठी निघालो. एकदम साधे जेवण असुनसुद्धा त्या जेवणाचा खरपुस समाचार घेतला. थकवा येईपर्यंत मी जेवण करत होतो. भरपुर कार्बोहाड्रेट्स शरीरात भरल्यानंतर मी जेवणाला पुर्णविराम दिला. बाकीच्या ट्रेकर्सला वर यायला खुप वेळ लागला. आमच्यातल्या काहीजणांनी त्या मुलींना सढळ हाताने मदत केल्याची माहीती मिळाली. मंजुळ आवाज असण्याचा असा फायदा होतो. 

  सगळ्यांची जेवणे उरकल्यावर आम्ही साम्रद गावाचा निरोप घेतला आणि पुण्याच्या दिशेने निघालो.

ट्रेक आयोजक: शिखर फाऊंडेशन 
ट्रेक खर्च:८५० रुपये

लेखक- विजय वसवे


ईथेच लावली होती तंबुची कॉलनी 

तुकाराम बांडेंचे घर आणि आंगण

३२ जणांसाठी कांदा पोहे

सांदन दरीकडे प्रस्थान

पाठमोरे अलंग, मदन आणि कुलंग

कोवळ्या सुर्यकिरणांनी दिलेली सोनेरी छटा

सांदन दरी प्रवेश

दोन्ही बाजुस ऊंचच ऊंच कडे






या पुलामुळे पाण्यातुन चालत जाण्याची संधी हुकली.


















ईथुन पुढे सांदन दरी अक्राळ विक्राळ रुप धरते






रॅपलींगचे ठिकाण

फोटोत दिसणा-या मनुष्याकृतीवरुन त्या खडकांच्या साईजचा अंदाज येईल

ये चल शेल्फी घेऊ


रॅपलींगच्या तयारीत, चेह-यावर थोडेसे टेन्शन









अवघड मार्ग ईथुन पुढे संपतो






डोहामधले स्वैर ढुंबणे



चटकदार भेळ


लाजिरवाणे कृत्य


कराराप्रमाणे संतोषने सॅकचे ओझे सांभाळले.


उजवीकडे वळा

सांदनच्या प्रवाहात शेवटची शेल्फी

काळी मैना

काळी मैना

मिनी कोकणकडा


मिनी कोकणकडा

कडक उन्हात जीवघेणी चढण सुरु


न थांबता एकटाच सर्वात पुढे आलो






वर चढुन आल्यावर दिसणारा रतनगड

कात्राबाईचा कडा

साम्रद गावाकडे

जेवणाची पंगत

साधे जेवण असुनही भरपुर प्रमाणात जेवण केले.

सावंतांना सांदन व्हॅली दाखवणारे यशवंत बांडे

साम्रद गावातुन


पुणे कडे प्रस्थान

अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी



कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...