Tuesday 3 November 2020

व्यायामाला सुरूवात करताना...


व्यायामाचा श्रीगणेशा

कोरोना महामारीच्या निमित्ताने का होईना आपल्या लोकांना व्यायामाचे महत्व कळायला लागलेले आहे. प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतोच. या जीवाच्या भितीने का होईना लोक व्यायामाच्या मागे लागले. हे ही नसे थोडके. तर असा हा प्रिय जीव तेव्हाच चांगला राहील जेव्हा शरीर तंदुरुस्त राहील. बरोबर ना? आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी काय करावे लागते हे सर्वांना माहीतच आहे. ते म्हणजे व्यायाम. शारीरीक हालचाली करणे म्हणजे व्यायाम. आमच्यासारखे काही हुषार प्राणी या व्यायामाच्या मागे हात धुवुन लागलेले आहेत कारण या व्यायामापासुन फायदाच फायदा आहे. व्यायामाच्या या मार्गावर काहीजण अग्रेसर झालेले आहेत आणि काहींनी नुकतीच सुरुवात केलेली आहे. काहीजणांचे अजुनही आज करु ऊद्या करु चालु आहे. हेच ते ज्यांना व्यायाम सुरु करण्याची ईच्छा जागृत झालेली आहे परंतु प्रत्यक्षात कृती मात्र अजुनही शून्य आहे. अजुन एकही पाऊल उचलले गेलेले नाही. करु करु म्हणत असेच दिवस निघुन चालले आहेत. तर हा ब्लॉग आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या अशा मित्रांसाठी....

मनाची तयारी 

उदयापासुन किंवा पुढच्या आठवडयापासुन मी व्यायामाला (वॉकींग, सायकलिंग, रनिंग) नक्की सुरुवात करणार आहे. मग लगेच बुधवार येतो आणि बुधवार आला कि आता हा आठवडा जवळजवळ गेल्यात जमा आहे, त्यामुळे येत्या सोमवारपासुन नक्की. माझी खात्री आहे की अशी वाक्ये तुम्ही अनेकदा ऐकलेली असतील. पण प्रत्यक्षात मात्र तो उदया किंवा पुढचा आठवडा कधीही येत नाही. कैक महीन्यांचा कालावधी गेला तरीही येत नाही.
व्यायाम सुरु करणे नक्कीच कठीण आहे यात वादच नाही. शरीरापेक्षा मनाला ज्या सवयी लागलेल्या असतात त्या सवयींमधुन मनाला बाहेर काढणे खुप कठीण असते. मन संकल्पही करते आणि त्यात विकल्प शोधुन पळवाट सुद्धा काढते. मनाने एकदा निर्धार केला कि शरीर त्याच्या मागे-मागे जातेच. त्यामुळे सर्वप्रथम मनाची तयारी करणे गरजेचे असते. मन जर म्हणाले कि एवढा आरामदायी आणि मऊ बेड आपल्या घरामध्ये असताना त्यावर साखरझोप घ्यायची सोडुन भल्या पहाटे व्यायामाला बाहेर जाण्याची हि दुर्बुद्धी तुला का बरे सुचत आहे? आणि तुम्ही जर मनाच्या अशा प्रेमळ आणि मधुर संभाषणाच्या पाशात अडकलात तर आयुष्यभर तुमच्या व्यायामाला सुरुवात होणार नाही. त्यामुळे मनामध्ये जे येईल किंवा मन जे म्हणेल त्याच्या अगदी उलट करा. ते नक्कीच तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरणारे असेल.   

सर्वप्रथम व्यायामापासुन मिळणारे फायदे विचारात घ्यावेत...

व्यायामापासुन आपल्या शरीराला असंख्य फायदे मिळतात. जिथे फायदा असतो तिथे लोकांची झुंबड उडते हे आपण सर्रास पाहतो. परंतु व्यायाम हि जगातील एकमेव अशी गोष्ट आहे ज्यात प्रचंड फायदा असुनही  मनुष्यप्राणी त्यापासुन स्वत:ला दूर ठेवतो (काही अपवाद वगळता). सर्रास पाहण्यात आलेली गोष्ट म्हणजे बर्याच लोकांना व्यायामाची प्रेरणा हि डॉक्टरांच्या अंतिम ईशार्यातुन मिळालेली असते. हा अंतिम ईशारा बहुसंख्य लोकांना व्यायामासाठी प्रवृत्त करणार्यांमध्ये अग्रस्थानी आहे. "आता जर तुम्ही हातपाय हलवले नाही तर मलासुद्धा काही करता येणार नाही" असे डॉक्टरांनी निक्षुन सांगितल्यावरच आपले लोक खडबडुन जागे होतात आणि व्यायामाला सुरूवात करतात. दुर्दैवाने भारतात अशा लोकांचीच संख्या जास्त आहे. मृत्युच्या भितीने व्यायामाला लागलेले लोक पाठीमागुन आग लागलेल्या रॉकेटसारखे करतात. हे करु का ते करु...देवा आता मी काय करू? 
मी असे म्हणेन कि डॉक्टरांच्या अंतिम ईशार्याची वाट बघत बसु नका. अजुनही वेळ गेलेली नाही. लगेच व्यायामाला सुरुवात करा. मान्य आहे कि व्यायामाची सुरूवात करणे ही सोपी गोष्ट नाही. सर्वप्रथम तुमच्या दिनचर्येमध्ये व्यायामाला वेळ देणे खुप कठीण असते कारण तुम्ही खुप व्यस्त आहात. प्रथम तुमची हि दिनचर्या बदलणे अपरीहार्य ठरते. कसेबसे करुन व्यायामाला वेळ दिला तर व्यायाम करताना येणारा घाम आणि होणारी दमछाक नकोसी वाटते. दमछाक हि व्यायाम सुरू करण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करु शकते. त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष करा. सुरुवातीला अंग दुखेल, पाय दुखतील परंतु हेच पाय नंतर ताकदवान होणार आहेत हे ध्यानात घ्या. ऊत्साहात व्यायाम सुरु केल्यानंतर दोन दिवसांनी काहीजण दिसेनासे होतात ते व्यायाम सुरु केल्यानंतर होणार्या वेदनांमुळे. मी जर सकाळीच दमलो/दमले  तर मग दिवसभर इतर कामे कशी करणार? असा विचार करणारी मंडळीही आपल्याकडे आहेत. मी म्हणेन कि अशा पळवाटा शोधण्यापेक्षा व्यायामापासुन मिळणार्या फायद्यांकडे लक्ष द्या. व्यायामापासुन शरीराला मिळणारे फायदे हे आपले एकमेव ध्येय असायला हवे. हे मुख्य ध्येय एकदा डोळ्यांसमोर ठेवले कि दमछाक नजरअंदाज करणे सोपे होईल. मग तुम्ही मऊ आणि आरामदायी बेडच्या मोहात न पडता रोज पहाटे ऊठुन व्यायामाला बाहेर पडणार एवढे मात्र नक्की. आपण जे करतोय त्याचा आपल्या शरीरावर होणारा दिर्घकालीन परीणाम हा फार उत्तम असणार आहे हे कायम लक्षात ठेवा. निरोगी शरीर हिच खरी संपत्ती आहे. व्यायाम करुन सुडौल शरीर बनवणे हि फक्त आता नटनटयांची मक्तेदारी राहीलेली नाही. आपल्यासारखे सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा त्यांच्याहुन श्रेष्ठ कामगिरी करून दाखवु शकतात आणि काहींनी करुन दाखवलेली आहे. आपल्या आजुबाजुला व्यायाम करुन ईच्छीत ध्येय प्राप्त केलेले असंख्य लोक आहेत. त्यात आपला मित्र किंवा मैत्रिण असेल तर त्यांच्याकडुन अवश्य प्रेरणा घ्यावी. व्यायामामुळे शरीर आणि मन दोन्हीचे आरोग्य सुधारते. या दोहोंच्या आरोग्यामध्ये झालेली सुधारणा दैनंदिन जीवनामध्ये प्रचंड आनंद आणि ऊर्जा देत राहते. सतत व्यायाम करत राहील्यानंतर तुमच्या शरीरामध्ये हळुहळू बदल व्हायला सुरुवात होईल आणि या बदलांमुळे तुमचे व्यक्तीमत्व अजुन खुलुन दिसायला लागेल. फक्त संतुर साबण लावण्याने वय लपणार नाही.  
वैधानिक इशारा - व्यायामामध्ये सातत्य ठेवल्यास वजन कमी होऊन कपडे सैल होतात आणि त्यामुळे सर्व कपडे नव्याने खरेदी करण्याची वेळ येऊ शकते. 

व्यायामाच्या प्रेमात पडा...

जो काही व्यायाम करणार आहात तो अगदी मनापासुन करा. रनिंगला एकटे वाटत असेल तर एखादा रनिंगचा ग्रुप शोधा किंवा स्वत: एखादा ग्रुप तयार करा. सायकल चालवत असाल तर जवळच्या आवडत्या ठिकाणांना भेट द्या. सध्या सोशल मिडीयावर असंख्य ग्रुप तयार झालेले आहेत. तुम्ही एकटे आहात असे तुम्हाला कधीही वाटणार नाही. रनिंग आणि सायकलिंगचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना कळु द्या कि तुम्ही व्यायामाला सुरुवात केलेली आहे. सोशल मिडीयावर मिळालेले लाईक्स आणि कॉमेंट तुमचा ऊत्साह नक्कीच वाढवु शकतात. फोटोमध्ये पुढे येणारी ढेरी लपवु नका, व्यायामामुळे परीवर्तन झाल्यानंतरच्या फोटोंमध्ये मी अगोदर कसा होतो आणि आता कसा झालो हे दाखवणे तुम्हाला सोपे जाईल. ज्या व्यायामातुन आनंद मिळतो असा व्यायाम प्रथम निवडा किंवा व्यायामात आनंद शोधा. व्यायामाच्या प्रेमात पडा. सकाळी किंवा संध्याकाळी व्यायामाचा नित्य रतिब चालु करा. जसे आपण भविष्यात भरघोस परतावा मिळणार आहे हे लक्षात घेऊन वेगवेगळ्या योजनांमध्ये नित्यनेमाने हप्ते भरत असतो त्याचप्रमाणे दररोज करावा लागणारा व्यायाम हा एक प्रकारचा हप्ता (ईएमआय) समजुन नित्यनेमाने तो करत रहावा. तुम्हाला भरघोस परतावा मिळेल याची मी खात्री देतो. 

नो पेन नो गेन !

व्यायाम करताना पाय दुखतील, अंग दुखेल किंवा कधीकधी प्रचंड त्रास होईल परंतु हार मानु नका. "नो पेन नो गेन" हे कायम लक्षात ठेवा. गंजलेल्या लोखंडाला वापरात आणण्यासाठी ज्याप्रमाणे अग्नीबरोबर तप्त होऊन घणाचे घाव सोसावे लागतात त्याप्रमाणेच आपल्या गंजलेल्या या शरीराला व्यायामाच्या वेदना दिल्याशिवाय ते तंदुरूस्त आणि निरोगी होणार नाही. शरीराला गंज चढलेला असल्यामुळे सुरुवातीला त्रास हा होणारच. शरीर गंजण्यापेक्षा व्यायामाने झिजलेले केव्हाही चांगले.

व्यायामाचे साहीत्य

व्यायामाचे साहीत्य असे असावे कि जे घालुन व्यायामाला जाण्याचा ऊत्साह द्विगुणित व्हावा. सायकल जुनीपानी किंवा अवजड असेल तर सायकल चालवायला बिलकुल मजा येणार नाही. पैसे असतील तर मस्त सायकल खरेदी करा आणि ती चालवा. तिच्या प्रेमात पडा. रनिंग करत असाल तर एखादा भन्नाट शुज विकत घ्या, जुनेपाने शुज वापरले तर पायाला दुखापत होण्याची शक्यता असते आणि दुखापत हि व्यायाम बंद पडण्यासाठी चांगले निमित्त ठरू शकते. रनिंग आणि सायकलिंगचे कपडे घालुन काढलेला फोटो फारच छान येतो. असे कपडे आणि साहीत्य खरेदी करा कि जे तुम्ही आवडीने घालाल आणि ते तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रीणींना दाखवायला सुद्धा आवडेल. खरंच सांगतो या जगात यासारखी उत्तम गोष्ट नाही.

 पहीले पाऊल 

व्यायामाला सुरुवात करताना पहीले पाऊल खुप महत्वाचे असते. कधी कधी फार कंटाळा येतो. जिमला, रनिंगला, सायकल चालवायला किंवा बाहेर चालायला जायचासुद्धा कंटाळा येतो. अशा वेळेस अगदी थोडेफार काहीतरी करा. १ किमी चालुन या, चार-पाच किमी सायकल चालवा, दहा-बारा सुर्यनमस्कार घाला किंवा नुसता एक सुर्यनमस्कार घातला तरीही चालेल पण दिवस वाया घालवु नका. घराबाहेर पाऊल पडणे फार महत्वाचे असते. तुम्ही एकदा घराबाहेर पडलात की निम्मे काम झालेले असते, बाहेरचा निसर्ग, त्यातील सकारात्मक ऊर्जा या सर्व गोष्टी तुमचा ऊत्साह वाढवण्यास मदत करतात. व्यायाम करणार्या ईतर व्यक्ती पाहुनही तुम्हाला हुरुप येऊ शकतो आणि नकळत तुमच्याकडुन जास्त व्यायाम होईल. हे अवश्य करुन पहा!

तुम्ही तयार आहात! 

एकदा निर्धार पक्का झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये बदल घडवायला तुम्ही सज्ज आहात. आता सायकल घेऊन बाहेर पडायचे, पायात शुज घालुन पळत सुटायचे किंवा काहीच जमणार नसेल तर बाहेर चालायला तरी जायचे. गती-वेग काय असेल याची पर्वा करायची नाही. किती चाललो, किती पळालो किंवा किती सायकल चालवली याचे रेकॉर्ड ठेवलेले केव्हाही चांगले. यासाठी स्ट्रावा, रनकिपर हे जीपीएस द्वारे चालणारे अ‍ॅप वापरावेत. हे वर्कआऊट सोशल मिडीयावर तसेच मित्रांसोबत शेअर करा. सलग एक किंवा दोन आठवडे तुम्ही व्यायामासाठी बाहेर पडलात कि यात खंड पडु द्यायचा नाही. पहीले पाच किमी, पहीले दहा किमी धावलेले अंतर तसेच पहीली पन्नास किमीची राईड, पहीली शतकीय राईड या सर्व आठवणी जपुन ठेवा. तुम्ही प्राप्त केलेले यश भविष्यात तुम्हाला नक्कीच प्रेरणा देत राहील.

मित्रांची निवड  

आपण रनिंग किंवा सायकलिंगला सुरुवात केली कि बर्याचदा आपल्याला असे वाटते कि जे आपले जीवश्च कंठश्च आहेत त्यांनी सुद्धा आपल्याप्रमाणे सुरुवात करावी. आपल्या मैत्रीखातर तेसुद्धा काही दिवस करतात परंतु नव्याचे नऊ दिवस संपले कि सर्व बंद पडते. नंतर हेच आपले मित्र आपल्या व्यायामामध्ये अडथळा निर्माण करतात. तेही करत नाहीत आणि तुम्हालाही करु देत नाहीत. "सायकल चालवुन कोणाचं भलं झालंय?" यासारखे डायलॉग ऐकायला मिळाले तर त्यात आश्चर्य वाटु देऊ नका. यासाठी ज्यांना सायकलिंगची आवड आहे आणि जे तुमच्या अगोदरपासुन सायकल चालवत आहेत अशा नविन लोकांशी मैत्री करा. छंद सारखे असतील तर चटकन मैत्री होते. त्यामुळे असे मित्र निवडा जे तुमचा ऊत्साह वाढवतील आणि प्रेरणा देतील. 
मंझिल तो मिल ही जायेगी भटकते ही सही।
गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं।। 

तुलना 

जे लोक खुप वर्षांपासुन व्यायाम करत आहेत त्यांच्याशी लगेच बरोबरी करायला जाऊ नका. अतिऊत्साहात असे होऊ शकते. काही मदत लागल्यास या क्षेत्रात जे अनुभवी लोक आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करा तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल. वजन कमी होणे, शरीर पिळदार होणे या गोष्टींना खुप कालावधी लागतो त्यामुळे धीर धरा. तुप खाल्ले कि लगेच रुप येत नाही. व्यायामामध्ये सातत्य ठेवा. घेतला वसा टाकु नका. 
तुम्हाला खुप खुप शुभेच्छा!
- आयर्नमॅन विजय वसवे. 

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...