Tuesday, 25 February 2014

बोराटयाची नाळ (Boratyachi Naal)

बोराटयाची नाळ (Boratyachi Naal)

       लिंगाणा माझ्यासाठी नेहमीच एक आकर्षण आहे. विशेषत: जेव्हापासुन शिखर फाऊंडेशनबरोबर तो मी सर केलाय. लिंगाणाच्या माथ्यावरुन मोहरीचे पठार जेव्हा पाहीले तेव्हापासुनच तिथे जाण्याची तीव्र ईच्छा मनामध्ये होती पण जाण्याचा मार्ग नाहीत नव्हता. मढेघाटला जाताना वाचलेल्या पाटीच्या आणि दिशेच्या आधारे ही तीच मोहरी असावी अशी माझी पक्की खात्री झाली होती. गुगल मॅप्सवर शोधाशोध केल्यानंतर तिकडे जाण्यासाठी हाच मार्ग दाखवलेला होता. मागच्या वर्षी याच दिवसामध्ये तिथे जाऊन आलो. पण तेव्हासुद्धा बोराटयाच्या नाळेत उतरायचे राहुन गेले होते. बोराटयाच्या नाळेविषयी खुप ऐकलेले होते. ऐकलेली बोराटयाची नाळ तेव्हा नुसती बघुन ठेवली होती. अर्थात मी पुन्हा ईकडे येणार होतोच तिला जवळुन पाहायला. या जानेवारीतले तीन रविवार मी क्रिकेट खेळ्ण्यात वाया घालवले, उत्कृष्ट फलंदाज वगैरे ट्रॉफी मिळाली पण ट्रेकींग करण्याचे तीन रविवार गेल्याचं दु:ख जरा जास्त होतं. खरंतर बोराटयाची नाळ जानेवारी २०१४ मध्येच "Target Locked" करुन ठेवली होती. जानेवारीत क्रिकेटचा अडथळा आला नसता तर फेब्रुवारीत रायलिंग पठारावर उन्हाचे चटके खावे लागले नसते. फेब्रुवारीच्या अखेरीस मुहुर्त मिळाला. ट्रेकला जाऊन आलं आणि फोटो फेसबुकवर टाकले की ब-याच मित्रांचा ठरलेला डायलॉग असतो, काय भाऊ? मला का नाही बोलला? आलो असतो की राव मी पण... वगैरे वगैरे. म्हणुन ब-याच मित्रांना माझ्या आगामी ट्रेकची आगाऊ कल्पना देऊन ठेवली होती. पण सगळेच कामात अडकलेले. आता मला हा डायलॉग तरी ऐकावा लागणार नाही की मला का नाही बोलला? 
     उणादुणा एकच मित्र बरोबर होता. आम्ही रसद आणि दोघांना पुरेल एवढे पाणी बरोबर घेऊन रात्री ११ वाजता सिंहगड रोडने निघालो. पासळीला ०१:३० वाजता पोचलो. पासळीत गाडी लावुन एका व्हरांडयात कॅरी मॅट टाकली आणि आडवे झालो.

पासळीच्या पुढे मढेघाटाकडे जाताना लागणारी हिच ती पाटी मोहरी १० कि.मी.
     सकाळी पक्षांच्या किलबिलाटाने जाग आली. लगोलग आवरा आवरी करून मढे घाटाचा रस्ता धरायचा होता. अजुन तांबडं फुटायचं होतं. छोटासा घाट संपल्या संपल्याच उजवीकडचा चढ चढुन झाल्यावर सुर्योदयाचा आनंद घेण्यासाठी गाडी उभी केली. 
सुर्योदय रविवार, २३ फेब्रुवारी, २०१४ वेळ ०७:०७ मि.  
    सुर्यनारायणाचे दर्शन झाले. त्याची कोवळी किरणे राजगड आणि तोरण्यावर पसरली. सोनेरी किरणांमध्ये भिजलेला तोरणा अफाट सौंदर्याचे प्रदर्शन करत होता. फोटो काढले नाहीत तर नवलच. 

सुर्योदयाची कोवळी किरणे तोरणा आणि राजगडवर
    जास्त वेळ न घालवता पुढे निघालो. कुसारपेठच्या पुढील रस्त्यावर मोठी खडी पसरवलेली होती काम चालु होते. 

मोहरी रस्त्याचे काम सुरु आहे.

"पुढे खडी टाकलीये रोडवर गाडी घेऊन जाऊ नका? त्या खडीवरुन चाकं टिकायची न्हाय" 
एका मावशीनं सबुरीचा सल्ला दिला. खडीकडं बघुन ते अगदी खरंही वाटलं. त्याच ठिकाणी गाडी वळवुन पार्क केली. दमुन आल्यावर गाडी वळवण्याचा त्रास नको म्हणुन अगोदरच केलेली तजवीज. तेथुन मोहरी पाच की.मी. होती. एकुण आमची पायपीट 10 कि.मी. ने वाढणार होती. थोडे पुढे गेल्यावर जाणवलं की ही खडी जास्त लांबपर्यंत नाहीये. थोडीशी शक्कल वापरायचं ठरवलं. गाडीत मी एकटाच बसलो आणि माझ्या बाजुकडचे चाक रस्त्याकडेच्या मातीवरुन घेतले. काम फत्ते. खडीची कटकट संपल्यावर निवांत गाडीला बाजुला लावुन हुश्श करून घेतलं. 

तोच समोरून पाण्याचे हांडे घेऊन येणा-यांचा ग्रुप दिसला. कुसारपेठचे होते ते. पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हांडे घेऊन रोज 2 की.मी. अंतर कापतात बिचारे. विशेष म्हणजे पाणी वाहणा-यांमध्ये पुरुष सुद्धा होते. कुसारपेठ येथे पाणी मागायची माझी तरी आता हिंमत होणार नाही. 

पाण्यासाठी रोज २ कि.मी पायपीट


     खडीचा अडथळा दूर झाल्यावर मी वेगात अंतर कापले. अधून मधून दिसणारे काही नजारे ब्रेक दाबायाला भाग पाडत होते. दुर्ग दुर्गेश्वर रायगड सकाळच्या कोवळ्या उन्हात झळाळुन निघालेला दिसत होता. या ठिकाणावरुन रायगडाचं वेगळं रूप पाहायला मिळतं. जगदीश्वराचं मंदिर आणि महाराजांचा दरबार तेवढ्या दुरुनही लक्ष वेधुन घेत होते. 

कोवळया उन्हात न्हाऊन निघालेला दुर्ग दुर्गेश्वर रायगड 

आजुबाजुचे नजारे कैमे-यात कैद करत होतो आणि अधून मधून माझ्यावरही कैमेरा घेत होतो.



रायगड आणि लिंगाणा एकत्रित (रायलिंग)




मातीचा रस्ता 

पोकलॅंड रस्त्यासाठी खडक फोडतोय
     काही अंतर पुढे गेल्यावर एक पोकलँड आणि बुलडोजर उकरा उकरी करत असल्याचे आढळुन आले. नजीकच्या काळात चांगला रस्ता मिळेल अशी आशा उरी बाळगायला हरकत नाही. मी तर वाट बघतोय कधी हा रस्ता डांबरी होतोय म्हणजे पावसाळ्यात इथला स्वर्ग पाहायला येता येईल. 
 इथेच गाडी लावावी लागणार होती. मागच्या वेळेस इथेच लावली होती. 
मोहरी गावातून पुढे पायपीट चालु ठेवली. रायलिंगकडे जाण्याच्या दिशेला ठिकठिकाणी दगडांवर पांढरे बाण दाखवलेले आहेत. त्या बाणांचा पाठलाग केला तरी चालेल. फक्त एक लक्षात ठेवायचे की पुढे गेल्यानंतर उजव्या बाजुला वळायचं नाही. उजव्या बाजुला काळ नदीचा उगम आहे. मग ठरवा जायचं की नाही. अनेक कातळ कड्यांवरुन उड्या घेणारं पाणी एकत्र जमलं की त्याची काळ नदी होते जी साक्षात एक काळाचे रूप आहे. तिची सुरुवातच एका अजस्त्र धबधब्याने होते. 

काळ नदीच्या उगमाकडील बाजु रायलिंगकडे जाताना उजवीकडे
    पण काही उपयोग नाही पावसाळ्यात इथे येता येणे तेवढे सोपे नाही आणि उन्हाळ्यात तो धबधबा सुरु असणं अवघड आहे. रस्ता जेव्हा डांबरी होईल तेव्हाच पावसाळ्यातला आनंद घेण्यासाठी इथे येता येईल. वाट पाहतोय.
                   थोडी दाट झाडी ओलांडुन झाल्यावर हळु हळु लिंगाणा समोर दिसायला लागतो. 

रायलिंगकडे जाताना डाव्या बाजुचे दृश्य

समुद्रातील शार्कसारखा दिसणारा सह्याद्रीवरील लिंगाणा 
       लिंगाण्याच्या सुळक्याने जमिनीतुन हळुच टोक वर काढल्यासारखं दिसतं. आणि त्याचं ते टोक समुद्रात वावरणा-या शार्क माशाची आठवण करुन देते. शार्क मासा समुद्रात वावरताना एक कल्ला पाण्याबाहेर काढुन पोहतो, पाण्याच्या बाहेर आलेलं शार्कचं ते टोक दिसलं की भल्याभल्यांची तंतरते. लिंगाणा म्हणजे सह्याद्रीवरचा शार्कच जणु. याला बघितल्यावर सुद्धा भल्याभल्यांची तंतरते. त्यात मी पण आहे, जरी सर केलेला असला तरीही. 

SN= सिंगापुर नाळ, RP= रायलिंग पठार
      रायलिंगच्या अलीकडे सिंगापुर नाळ बाण करून दाखवलेली आहे. तिकडे जाऊन जरा सिंगापुर नाळेचे मुखदर्शन करून आलो. खरंतर माझ्यासाठी सिंगापुर नाळ कोणती आणि बोराट्याची नाळ कोणती ओळखता येणं निव्वळ अशक्य होतं. मी कधीच माहितगार व्यक्तीबरोबर तिथे गेलेलो नाही. दुस-यांदा या पठारावर आलोय स्वबळावर. बोराट्याची नाळ मी स्वत: शोधणार होतो. बोराटयाच्या नाळेचे वेगवेगळया कोनातुन काढलेले फोटो ईथे देत आहे. हा सुरुवातीचा...

रायलिंगच्या जवळ असणारी हीच बोराटयाची नाळ असावी असे गृहीत धरुन आत घुसलो










मोठा दगड एका छोटया दगडामुळे अडकला


येथुन वाट असावी अशी अपेक्षा होती










लिंगाणा बेसकडे जाणारी वाट रूळलेली असावी आणि त्यामुळे ती चटकन दिसेल अशी माझी अपेक्षा होती.  आणि त्या वाटेने कडयाच्या कडेने लिंगाणा बेसला जाऊन येता येईल या माझ्या मनोकल्पना किती बालीश होत्या हे मला तिथे गेल्यावरच कळले. लिंगाणाबेसला जायची वाट सापडली नाही पण बोराटयाची नाळ बरीच वर-खाली करुन झाली. छोटे-मोटे दगड पायाच्या धक्क्याने घरंगळत सुटतात. त्यामुळे पुढे उतरत असणा-या ट्रेकरला ईजा होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे प्रत्येक ट्रेकरने ईथुन जाताना काळजी घेण्याची गरज आहे. काही पॅचेस अवघड आहेत पण चढता येण्याजोगे. वाट शोधुन सापडली नाही मग नाद सोडुन दिला. रायलिंगवरुन लिंगाणा पाहुन निघायचे ठरवले.

रायलिंगवरुन लिंगाणा आणि मागे रायगड

लिंगाणा शिखर



मोहरी गावातील विहीर

गाडीवर मातीचा लेप
घरी जात असताना वेल्ह्याच्या गुंजवणीमध्ये पोहलो. ट्रेकनंतर पोहले की शरीर मोकळे होते. मस्त पोह्ल्यानंतर घराकडे मोर्चा वळवला. कारभारणीने फोन वाजवला, घरी निघालोय सांगितले.

गुंजवणी नदीत पोहणे


पायांची अवस्था


अशा प्रकारे बोराटयाच्या नाळेतुन लिंगाणाबेसला कसे पोचायचे नाही याचा एक मार्ग मला माहीत आहे. तुम्हाला हवा आहे का?

1 comment:

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...