Friday, 19 December 2014

कोकणदिवा ट्रेक

कोकणदिवा

                    कोकणदिव्याची माहीती घेत असताना वाचण्यात आलं की अलीकडेच हा उजेडात आला आहे. हे वाचल्या वाचल्या मला पडलेला प्रश्न म्हणजे दिवा अंधारात कसा काय राहु शकतो? तो उजेडातच होता पण तो दिसण्याची दृष्टी आपल्याकडे नव्हती असे  म्हणल्यास वावगे वाटु नये. कोकणदिवा बघण्याची तीव्र ईच्छा मनात जागृत झालेली होती आणि ती प्रत्यक्षात उतरवणे अत्यंत गरजेचे वाटु लागले होते. नुसती ईच्छा मनात येऊन उपयोग नसतो, अशा कैक इच्छा समुद्रावर ज्याप्रमाणे एका सेकंदात असंख्य लाटा तयार होत असतात तशा माझ्या मनात येत असतात. त्यातल्या बऱ्याच काही किनाऱ्याला पोचल्यावर लुप्त होऊन जातात. पण त्यातली एखादी तरी त्सुनामीसारखी असते, तांडव घातल्याशिवाय ती जात नाही. कोकणदिवा बघण्याची तीव्र ईच्छा हि त्यातलीच एक. ज्या भागात कोकणदिवा आहे तो अतिशय दुर्गम आहे. घोल पर्यंत एसटी सेवा उपलब्ध आहे. 

       ट्रेकिंग हे काही एकटया दुकटयाचे काम नव्हे. त्यामुळे जोडीला मित्र असणे अपरीहार्य आहे. मित्रसुद्धा असे असायला हवेत की त्यांना स्वताहुन आवड असायला हवी. ढकलगाडी करत एखादयाला बळेच ट्रेकला घेऊन गेलात तर त्या ट्रेकचा फज्जा ऊडु शकतो. मित्रांसमोर कोकणदिव्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर दोघेजण तयार झाले. दोन मित्रांना येण्याची खुप ईच्छा असुनही येता आले नाही.
१३ डिसेंबर, शनिवारी रात्री ९ वाजता धायरी येथुन निघुन आम्ही पानशेतमार्गे घोल येथे रात्री १ वाजता पोहोचलो. दापसरेची खिंड काळयाकुट्ट अंधारातही आकर्षक वाटत होती. दोन्ही बाजुला रस्ता खोदुन तयार झालेले कडे चित्ताकर्षक वाटत होते. पटकन कॅमेरा काढुन समोरचे दृश्य टिपुन घ्यावेसे वाटत होते पण गाडीचा हेडलाईट बंद केल्यावर जी काही आमची तंतरली त्यामुळे गाडीच्या बाहेर उतरण्याची ईच्छाच झाली नाही. येताना ईथले फोटो काढु असे म्हणुन आम्ही पुढे सटकलो.
रस्ता संपला तिथुन घोल गाव सुरु झाले होते. तिथेच बाजुला मुक्कामी एसटी  (पुणे ते घोल) उभी केलेली होती. झोपण्यासाठी आम्ही गावातील मंदिरात जाणार होतो. पण तिथेच शाळा दिसली, शाळेचा व्हरांडा पत्र्याने झाकलेला होता. १० लोक आडवे झोपु शकतील एवढा व्हरांडा होता. पत्र्याचे आच्छादन असल्यामुळे दव पांघरुणावर येणार नव्हते. आम्ही त्या व्हरांडयावर कॅरी मॅट पसरवले आणि आडवे झालो. अधुन मधुन जाग यायची ती एकमेकांच्या घोरण्याच्या आवाजामुळे. आम्ही तिघेही घोरत होतो हे सकाळच्या चर्चेतुन कळले. मुक्कामी एसटी सुर्यकिरण यायच्या आतच जागी झाली आणि धुम पळत सुटली. मला त्याच आवाजाने जाग आली. तोपर्यंत बाजुचे पोळेकर सुद्धा जागे झाले होते. त्यांनी जवळ येऊन आमची चौकशी केली. विधीला जाण्याची जागा आम्ही त्यांनाच विचारली. अशा दुर्गम खेडेगावात सार्वजनिक शौचालयाची अपेक्षा करणेसुद्धा चुकीचे आहे. नुकतेच स्वच्छ भारत वगैरेचे फॅड आलेले आहे त्याने हुरळुन जाऊ नका, खेडेगावात हे असंच होतं आणि तसंच राहील.
सर्व विधी उरकुन बॅगा भरुन आम्ही तयार झालो. पोळेकरांनी आम्हाला आवर्जुन चहा घेण्यासाठी बोलावले (पाहुण्यांना बोलावतात तसे). सौ. पोळेकरांनी खुप आपुलकीने तो आम्हाला आणुन दिला. गवती चहा टाकलेला स्टीलच्या कपबशीतला चहा एकदम फक्कड झाला होता. पैशांसाठी त्यांनी आम्हाला चहा नक्कीच दिलेला नव्हता. पण आम्ही चहाचे पैसे चुकते केले. पैसे दिले तेही नको नको कशाला म्हणत होते. मराठी माणुस व्यवसायिक होऊच शकत नाही. आपुलकी आणि प्रेमापोटी असे फुकट चहा आणि पोहे वाटत सुटतात. याच जागी ईतर समाजाचा माणुस असता तर आम्हाला चहा, पोहे आणि पाण्याच्या बाटल्या विकुन मोकळा झाला असता. त्यांची अजुन आपुलकी म्हणजे, वाट सापडंल का? का येऊ दाखवायला म्हणाले. आणि त्यातही पैशाचे काही बोलले नाहीत. खरंतर आम्हाला गाईड नामक कुबडया नको होत्या. म्हणुन आम्ही त्यांना सापडेल म्हणालो. गाजराईवाडी पर्यंत पोचण्याची माहीती घेऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला.

पोळेकरांनी गाजराईवाडीचा रस्ता दाखवला आणि आंमचा निरोप घेतला. कधी गेलात घोलला तर यांना लक्षात ठेवा. शाळेशेजारीच यांचे घर आहे.
दापसरे खिंडीतुन घोलमधे घुसखोरी करु पाहणारे धुके.

घोल ते गाजराईवाडी पर्यंतचा रस्ता कच्चा आहे, या रस्त्यावरुन कारसुद्धा आली असती पण रिस्क नको म्हणुन पुढे नेली नाही. या रस्त्यावरुन दुचाकी आरामात जाऊ शकते. घोल ते गाजराईवाडी अंतर अंदाजे ५ कि.मी. असावं कारण सपाटीने चालत जायला आम्हाला जवळजवळ १ तास लागला. दुचाकीने गाजराईवाडीत पोचल्यास हा ट्रेक आणखीनच सोपा होऊ शकतो. घोलमधुन जाणारा शॉर्टकट आम्ही घेतला नाही त्यामुळेसुद्धा आम्हाला वेळ लागला असेल.


अरे संसार संसार...डोक्यावर चिरलेले बांबुंचे ओझे आणि त्यात थोडक्या मोडक्या चपलेत काटा रुतला. चपलेतुन काटा काढण्याची पोज मी टिपली. मी एवढया जवळ असताना माझी मदत घेण्याची तसदी त्यांनी घेतली नाही.


     


कोकणदिव्याचे प्रथम दर्शन

गाजराईवाडीतुन कोकणदिव्याकडे जाताना लागणारी छोटीशी खिंड

Three Idiots in jungle

कोकणदिव्याकडे जायचे असेल तर एक छोटी खिंड ओलांडुन गर्द झाडीच्या वाटेने जावे लागते, ती वाट सरळ गडाच्या दिशेने जाते. गाजराईवाडी सोडल्यावर आम्ही डावीकडे वळण्याऐवजी सरळ जात राहिलो. ती वाट बहुतेक कावळया घाटाकडे जात असावी. जो छोटा डोंगर ओलांडायचा होता तो आम्ही आडव्या वाटेने मागे टाकणार होतो. च्यायला चुकलो बहुतेक.... त्यात माझे सहकारी अतिउत्साही. “चला ईकडुन” एवढया आत्मविश्वासाने म्हणायचे की यांनी जवळजवळ २०० ट्रेक वाटाडयाची मदत न घेता स्वत:च्या हिंमतीवर केलेले आहेत असं ऐकणा-याला वाटावे. तिथुन माघारी फिरलो. जिथुन दोन वाटा फुटल्या होत्या त्यातली दुसरी वाट निवडली, गाजराईवाडीतुन पुढे गेल्यावर डावीकडे वर खिंडीकडे जाणारी वाट. तीच वाट त्या खिंडीतुन आणि गर्द झाडीतुन कोकणदिव्याच्या पायथ्याशी असलेल्या छोटया पठारावर घेऊन जाते. त्या छोटया खिंडीच्या माथ्यावर मोबाईलला रेंज मिळते. 

खिंडीतुन उतरल्यावर दिसणारा कोकणदिवा
                 गर्द झाडीतुन आपण रस्ता न चुकता चाललो आहोत याची खात्री करायची असेल तर वाटेत एक कमरेच्या उंचीवर ६ ईंच व्यासाचे एक झाड संपुर्णपणे आडवे वाढलेले आहे, पोलिस रस्त्यात बंदोबस्ताचा बॅरीअर लावतात अगदी तसे. त्या झाडाच्याच पुढे गेल्यावर डावीकडे एक दगडी मंदिर आहे.


हेच ते आडवे वाढलेले झाड, आपण योग्य दिशेला चाललो आहोत


फोटोबाजी


डावीकडे असलेले हेच दगडाचे मंदिर
याच्याच पुढे थोडे अंतर चालत गेल्यावर थोडा उतार आणि थोढा चढ पार केला की आपण एका छोटया पठारावर पोचतो. तिथे पेटलेल्या चुलींचे अवशेष पाहायला मिळतात. त्या पठारावरुन सरळ पुढे गेलात तर पुढे कडा आहे. (या कडयाजवळ मोबाईलला रेंज मिळते). गडावर जाणारी वाट डावीकडे वर गेलेली आहे. 
मी.
ईथुन पुढे आम्ही वाट चुकलो आणि जंगलात भरकटलो. पुढील तीन फोटो दाटजंगलात भटकताना काढलेले आहेत. त्या भरकटीचे वर्णन ईथे देत नाही, उगाच ते वाचुन वाचणा-याला भरकटावेसे वाटेल.

हे काय असावे याचा खुप विचार केला, पण डोक्याचा भुगा झाला तरी उमगले नाही. तुम्हाला सांगता येईल का?
    (वरील फोटोमध्ये ते काय म्हणुन विचारले होते? ते वाचुन धनंजय कोंढाळकरांनी मला फोन केला आणि याची सविस्तर माहीती दिली. तो रानडुकराला पकडण्याचा फास आहे. रानडुक्कर आत घुसले की फास लावलेल्या लाकडाला त्याचा धक्का लागतो आणि धक्का लागला की ते सगळे मोठमोठाले दगड रानडुकराच्या अंगावर पडुन त्याचा खात्मा होतो. "Freeze" अवस्थेतील रानडुक्कर नंतर चुलीवर शिजण्यासाठी जाते. कातडी जाड असल्यामुळे प्रसंगी बंदुकीची गोळी लागुनही रानडुक्कर वाचु शकेल पण फासातुन वाचणे निव्वळ अशक्य. ही तर मानवी मेंदुने रानडुकरावर केलेली कुरघोडीच आहे.)

मंदिराच्या अलीकडुन आम्ही थोडी जंगलात भटकंती केली, सुर्याची फक्त दोनच किरणे जमिनीपर्यंत पोचु शकली होती.


मुंग्यांची वारुळे

या पठारावर आलो म्हणजे ९० टक्के वाट शोधण्याचे काम संपले असे समजावे. कडयाच्या जवळ मोबाईलला रेंज मिळाली म्हणुन बरे झाले, धनंजय कोंढाळकरने मस्त मार्गदर्शन केले. वाट आमच्या मागेच होती पण आम्ही भरकटलेलो असल्यामुळे आणि वाढलेल्या गवतामुळे ती आम्हाला कळत नव्हती. 

या पठारवर पोचलो म्हणजे किल्ल्याची वाट सापडली. 


गवताच्या शेवटी कडा आहे.

एकदाची वाट सापडली आणि गड चढाईला सुरुवात झाली. अगदी सुरुवातीपासुनच उभी चढण आणी वाट खुप घसरडी आहे. कठीण सोल असलेले शुज या वाटेवर नक्कीच घसरणार म्हणुन शुज जेवढे साधे तेवढे ते या  घसरण्याची शक्यता कमी असे माझे वैयक्तीक मत आहे. साधा कॅनव्हास अतिउत्तम. 
वाट सुरु झाल्या झाल्या उभी चढण सुरु होते.
वाटेचा उभा फोटो. फोटोमधुन वाटेचा अंदाज येत नाही. तरीपण प्रयत्न म्हणुन दाखवण्याचा प्रयत्न.



कोकणदिवा चढायचा म्हणजे काठीची मदत घ्यावीच. विनाकाठी चढणेसुद्धा शक्य आहे. पण ईथे येऊन गेलेल्या ट्रेकर्सने परत जाताना वाटेत ज्या काठया सोडुन दिलेल्या असतात त्या उचलण्याचा मोह आवरत नाही.
निम्मी चढण पुर्ण


कोकणदिवा चढताना एक निवांत क्षण
उभी चढण पार करत करत अखेर गुहेचे दर्शन झाले. कोकणदिव्याची गुहा अतिशय सुंदर आहे. फोटोमध्ये दिसणारी गुहा.


गुहा
गुहेच्या बाजुलाच पाण्याचे टाके आहे. पाणी पिण्यायोग्य नाही. फिल्टर करुन आणि पाणी शुद्ध करणारे औषध टाकुन पिण्यायोग्य करता येऊ शकते. 

पाण्याचे टाके
फोटोग्राफी करण्यासाठी अतिशय सुंदर ठिकाण. गुहेतुन खुप सारे फोटो काढता येण्यासारखे आहेत. गुहेजवळ पोचल्यावर आम्ही थोडी विश्रांती घेतली. एनर्जी ड्रिंक्स घेतले. गुहा अतिशय सुंदर आहे.

तीन वेडे



गुहेची विवीध रुपे



जश्न मनाओ


गुहेजवळचा क्लिक


गुहेला हातभार
गुहेजवळील निसर्गसौंदर्याचा आनंद घेतल्यानंतर आम्ही गडमाथ्याकडे निघालो. सह्याद्रीचे हे सुंदर रुप डोळयासमोरुन जाऊच नये असे वाटत होते. 

गुहेच्या बाजुला क्लिक

कोकणदिव्याच्या उजव्या बाजुला हे छोटे छोटे डोंगर आहेत. माथ्यावरुन बघताना असं वाटते की ती डायनासॉरची पिलावल आहे की काय? 


कोकणदिव्यावर जाताना दिसणारी डायनॉसॉरची पिल्ले.

आणि मोहीम फत्ते ! जंगलात वाट चुकल्यानंतर गड सर होईल की नाही याबाबत मनात शंकेची पाल चुकचुकली होती, पण मित्रांच्या मदतीने आम्हाला गडाची वाट सापडली आणि आम्ही माथ्यावर पोचलो.

मोहीम फत्ते
फोटोत मागच्या बाजुला एक छोटा सुळका वर आलेला दिसत आहे तोच लिंगाणा. 
पाठीमागे उंच सुळका दिसतोय तो लिंगाणा

कोकणदिवा शिखर
आन बान आणि शान तिरंगा. या मोहीमेपासुन माथ्यावर फडवण्यासाठी तिरंगा वापरण्यात येईल. राजांचा भगवा तर असेलच पण आजकाल तोही राजकीय पक्षाचे आणि संघाचे प्रतिनीधीत्व करतो. मग भारतीय झालेले काय वाईट आहे का? सर्वप्रथम मी भारतीय आहे. 

विजयी विश्व तिरंगा प्यारा.... झेंडा उंचा रहे हमारा...!!

मोहीम पुर्ती
कोकणदिव्याची माहीती घेत असताना ईथे येऊन गेलेल्या एकाने लिहलेला लेख वाचला होता. लेखातले वर्णन आणि प्रत्यक्ष किल्ला यात प्रचंड तफावत आहे. अशा फॅन्सी लोकांनी गडप्रवासाचे वर्णन न केलेलेच बरे. म्हणे एका बाजुला दरी आणि एका बाजुला वाट, पाय घसरला की डायरेक्ट कोकणात.. अशा भेकड लोकांनी ट्रेक करु नयेत आणि केलेत तर अशी भुक्कड वर्णने लिहुन ठेवु नयेत. ते भुक्कड वर्णन वाचुन माझे सहकारी मित्र संतोष झेंडे चिंतातुर झालेले होते, त्याला म्हणालो असं काही नाहीये, तु चल बिनधास्त. आता ट्रेकला जाऊन आल्यावर त्याची प्रतिक्रिया,"ते लिहुन ठेवणारा गाढव आहे, या किल्ल्यावर असे काहीही नाही" 


Be strong

आमच्या तिघांची मोहीम फत्ते झाली.

तिघांची मोहीम

संतोष झेंडे

या फोटोत लिंगाणा स्पष्ट दिसत आहे.
मित्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार खुद्द शिवराय कोकणदिव्यावर येऊन गेले आहेत. कोकणदिव्यावरुन दिसणारा रायगड बघण्यासाठी महाराज ईथे येऊन गेलेले आहेत. खरंच रायगड तेथुन खुप सुंदर दिसतो. एखाद्या प्रोजेक्टचे डेमो मॉडेल जसे दिसते तसा तिथुन रायगड दिसतो. जगदीश्वराचे मंदिर आणि राजदरबार एकदम ऊठुन दिसतात. भवानी टोक तर अप्रतिमच दिसते. मोडकळीस आलेल्या अवस्थेतही जर रायगड ईथुन एवढा सुंदर दिसत असेल तर पुर्ण भरात असलेला रायगड केवढा सुंदर दिसला असेल? एवढा सुंदर कि खुद्द राजालाही तो कोकणदिव्यावरुन पाहण्याचा मोह व्हावा. 


कोकणदिव्यावरुन दिसणारा रायगड

रायगडाचे ते सुंदर रुप डोळयात साठवुन घेतले. समोरच काळ नदी दिसत होती. काळ नदीचे नाव ऐकले रे ऐकले की काळजात धस्स होते. रायगड दिसतोय त्या फोटोमध्ये पाणी चमकताना दिसत आहे तीच काळ नदी. 
असंख्य स्मृतींचा ठेवा जवळ घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

परतीचा प्रवास सुरु
वरील फोटोमध्ये कावळया घाट स्पष्ट दिसत आहे. 


परतीची वाट
गुहेजवळील हेच ते झाड


माघारी



नयनमनोहर दृश्य



सह्याद्रीचे लोभसवाणे रांगडे रुप 



घसरगुंडी करत करत उतरावे लागले
तीव्र उतार आहे खरा पण बाजुला दरी वगैरे काही नाही. त्यामुळे घसरगुंडी करत करत उतरलेले केव्हाही चांगले. 


गडाची वाट पठाराला येऊन मिळते



पठारावरुन गडावर घेऊन जाणारी वाट



पोटोबा
खरेतर आम्ही गुहेमध्ये जेवण करणार होतो, पण संतोष म्हणाला जेवण केल्यावर उभी चढण उतरायला त्रास होईल त्यापेक्षा आपण खाली पठारावर जाऊन जेवण करु. मग आम्ही पठारावर आल्यावर पोटोबा केला. 


सह्याद्री

गाजराईवाडी

गाजराईवाडी



पाणवठा

गाजराईवाडीतील पाण्याची विहीर. पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था. ईथे येईपर्यंत आमच्या जवळील सगळा पाण्याचा स्टॉक संपला होता. येथुन पाचही पाण्याच्या बाटल्या पाण्याने भरुन घेतल्या. किल्ल्याकडे जातानासुद्धा येथुन पाणी भरुन घेता येऊ शकते. पोहण्यासाठीसुद्धा उत्तम आहे, परंतु टॉवेल वगैरे काहीच आणलेले नसल्यामुळे पोहता आले नाही. 

पोळेकर
घोलमध्ये परत आल्यावर पोळेकर आम्हाला पुन्हा भेटले. व्यवस्थित वाट सापडली का? वगैरे विचारपुस त्यांनी केली. 
सगळे आलबेल. यशस्वीपणे ट्रेक पुर्ण करुन आम्ही चारचाकीमध्ये बसलो. 

दापसरे खिंड
रात्री अपुर्ण राहीलेले काम परतीच्या प्रवासात पुर्ण केले. दापसरे खिंड कॅमेराबद्ध केली.


दापसरे खिंड


"V" for विजय आणि भारताच्या नकाशातील खालचा भागसुद्धा म्हणता येईल.


जय गडकोट
जय शिवराय !
-विजय वसवे
Vijay Vasve

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...