औरंगाबादमध्ये ३०० किमी सायकलिंग
पुर्वतयारी;
पुण्याबाहेर ब्रेवे करण्याची इच्छा खुप दिवसापासुन मनात तग धरून होती. मुंबई, नाशिक आणि औरंगाबाद ही पुण्याच्या जवळ असणारी शहरे. औरंगाबादमध्ये माझा मेव्हणा (सौ. चा सख्खा मोठा भाऊ) बदली होऊन गेल्याने मला तिकडे जाऊन ब्रेवे करणे सोपे होते. औरंगाबाद जवळची प्रेक्षणीय स्थळेसुद्धा सौ.च्या नजरेखालुन काढायची होती. ब्रेवेबरोबर देवगिरी, वेरूळचे कैलास मंदिर, घृष्णेश्वर, बीबी का मकबरा, पणचक्की इ. ठिकाणे पाहण्याचा बेत आखुन मी ३०० च्या ब्रेवेला नाव नोंदवले. सौ.ला माझा बेत सांगितल्यावर तिने नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. ६ जानेवारीला भल्या पहाटे आम्ही पुणे सोडले. पहाटेची वेळ असल्यामुळे कणभरही ट्रॅफिकचा त्रास जाणवला नाही. औरंगाबादमध्ये पोचल्यावर त्याचदिवशी भरपुर भटकंती उरकुन घेतली. देवगिरी, वेरूळचे कैलास मंदिर आणि घृष्णेश्वर एकाच दिवसात उरकले. शनिवारी सकाळी औरंगाबादमध्ये ब्रेवेच्या रुटवर ५६ किमी राईड करुन रस्त्याचा अंदाज घेतला. औरंगाबाद ते जालना रोड मस्तच होता. शनिवारी दुपारी गाढ झोप घेऊन थकवा आणि प्रवासाने आलेला क्षीण कमी करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी संध्याकाळी पुन्हा औरंगाबाद शहरात भटकंती करुन आलो. त्यानंतर सायकलचे चेकअप उरकुन घेतले. पहाटे ४:३० ला ब्रेवे सुरु होण्याची वेळ हा माझ्यासाठी एक नविन अनुभव होता.
औरंगाबादमधील भटकंतीचे काही फोटो येथे देत आहे.
|
अभेद्य देवगिरी आणि मी |
|
दौलताबाद |
|
जगातील सर्वात मोठे कोरीव शिल्प वेरूळचे कैलास मंदिर |
|
बीबी का मकबरा |
ब्रेवे ३०० किमी सुरुवात (बाबा पेट्रोल पंप ०० किमी);
पहीला चेकपॉइंट (औरंगाबाद ते कायगांव ४२ किमी);
सकाळच्या थंड वातावरणात शक्य तेवढे अंतर उरकुन घ्यावे म्हणुन मी सुरुवातीपासुन सुसाट निघालो होतो. सुसाट गेल्यामुळे मी एकटाच सर्वांच्या खुप पुढे गेलो. एवढा पुढे गेलो की अनोळखी रस्त्यावर अंधारात सायकल चालवताना मला रस्ता चुकण्याची भिती वाटायला लागली. अधुन मधुन अहमदनगरचे अंतर दाखवणारे मैलाचे दगड किंवा पाट्या दिसल्या की माझा जीव भांड्यात पडत असे. सही जा रहे हो.. असे मी स्वतःशीच पुटपुटायचो आणि पँडलवर पाय फिरवत रहायचो. त्या रस्त्याची अवस्था न वर्णिलेली बरी. या रोडवरील स्पीड ब्रेकरच्या जगावेगळ्या डिझाइनने सिपर बॉटल दोनदा सायकलवरुन ऊडुन खाली पाडली. मोठमोठे रम्बलरसारखे सलग तीन स्पीड ब्रेकर आले की ते सायकलच्या चाकाचा जीव घेतील असे वाटायचे. मी एकच स्पीड ब्रेकर समजुन सायकल चालवायला जायचो आणि ते सलग तीन निघायचे. एकदा तर पडता पडता वाचलो. कायगांव जवळ यायला लागले तसे थंडीचा ठणका वाढायला लागला आणि तो हातांच्या बोटांना जास्त प्रमाणात जाणवायला लागला होता. एका ठिकाणी मला पाहुन दोन कुत्रे ताडकन ऊभे राहीले पण भुंकले नाहीत. याला वाटलं असेल तो भुंकेल आणि त्याला वाटलं असेल तो भुंकेल. पण त्यांचा भुंकण्याचा निर्णय होईपर्यंत मी तेथुन धुम ठोकली होती. नक्की चेकपॉइंट कुठे आहे ते माहीत नसल्यामुळे मी हळू सायकल चालवायला लागलो. माझ्या पाठीमागुन दोन रोडबाईक्सवाले आले मग मी त्यांच्या पाठीमागुन गेलो. एकदाचा चेकपॉइंट यावा असे सतत वाटत होते आणि तो एकदाचा आला. ६ वाजुन २६ मिनिटांची वेळ नोंदवुन ब्रेवे कार्डवर सही आणि शिक्का घेतला. ४३ किमी अंतर पार करायला १ तास ३६ मिनिटे लागली. चेकपॉइंटवर गरम गरम कांदा-पोहे आमची वाटच पाहत होते. कांदा-पोहेंची व्यवस्था प्रवेश फि मधुनच करण्यात आलेली असल्यामुळे सर्वांनी पोह्यांचा आस्वाद घेतला. पोह्यांमधील हिरवी मिरची पाहुन पोहे खाण्याची जरा धास्ती वाटत होती पण तरीसुद्धा मी ते खाल्लेच कारण पोह्यांचे पैसे द्यावे लागणार नव्हते. त्यानंतर गरम चहाने घसा गरम करुन घेतला आणि पुन्हा औरंगाबादकडे निघालो. जाताना डॉ हादींचा निरोप घेतला.
|
डॉ. विजय कायगाव चेकपॉइंट येथे |
दुसरा चेकपॉइंट (कायगांव ते जालना १०३ किमी);
डॉ. हादीला भेटुन मी पहीला चेकपॉइंट सोडला. फुल ग्लोव्हज घातलेले असुनही हाताच्या बोटांना प्रचंड गारठा जाणवत होता. आणि दुसरे म्हणजे मला चाकाच्या गोलाकार गतीमध्ये काहीतरी बिघाड झाल्यासारखे वाटायला लागले. थांबुन चाक फिरवुन पाहील्यावर मला कळले की त्या मोठमोठ्या स्पीडब्रेकरने चाकाचे बारा वाजवले आहेत. सायकलच्या चाकाचा आऊट काढायला शिकल्यापासुन मी स्पोक आवळण्याची की बरोबरच ठेवतो. त्याचा खऱ्या अर्थाने आज फायदा झाला. फक्त एकाच बाजुचे स्पोक हलवुन चाकाचा आऊट काढायला १० मिनिटे गेली. पण तेवढ्यात ४ ते ५ रँदोनियर्सनी थांबुन माझी आणि सायकलची चौकशी केली, काय झाले? "एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ" मला त्यांच्या मदतीची आवश्यकता पडली नाही पण त्यांनी थांबुन केलेल्या चौकशीने माझा उत्साह नक्कीच वाढवला. आता सूर्याची कोवळी किरणे सर्वदुर पसरायला लागली होती. दहा मिनिटांच्या ब्रेकमुळे हाताच्या बोटांची थंडी थोडी कमी झाली होती.
सायकलचे चाक पुर्ववत झाल्यावर मी पुन्हा गतिमान झालो. दोन दिवस कार चालवण्याचा आणि प्रवासाचा क्षीण तसेच भल्या पहाटे ३ वाजता ऊठायला लागल्यामुळे मला नेहमीप्रमाणे ताजेतवाने वाटत नव्हते. तरीसुद्धा २४ ते २५ चा सरासरी वेग ठेऊन मी चाललो होतो. पुन्हा औरंगाबादमध्ये आलो तेव्हा पावणे नऊ वाजले होते. औरंगाबाद शहरातील चार उड्डाणपूल मागे टाकल्यावर ट्रॅफिक हळुहळु कमी व्हायला लागले. शेंद्रा एमआयडीसी मागे टाकल्यावर रस्ता तर फारच मोकळा झाला. १०० किमी अंतर पार झाले तरीही मांड्यांचा कस पाहणारा एकही चढ लागला नाही. ईकडे आमच्या पुण्यात एनएच४ वर ब्रेवे म्हणजे कात्रज आणि खंबाटकी हे दोन घाट पहील्या १०० किमीच्या अंतरामध्येच येतात. पण चढ नाही तर उतारही मिळत नव्हता. चढ जरी दुःख देणारे असले तरी त्यानंतरचे उतार हे सुखकारक असतात. या पूर्णतः सपाट रस्त्यावर मला एनएच४ वरील चढ-उतारांची सारखी आठवण येत होती. सकाळचा गारठा एवढा अंगात शिरलेला होता की वाढायला लागलेले ऊनसुद्धा अंगाला गोडच वाटत होते. जालनाकडे जाता जाता मी एका प्रोटीन बारचा फडशा पाडला. बाकी नेहमीप्रमाणे दुचाकीवाल्यांनी प्रश्नांचा भडीमार करून बेजार केले. औरंगाबाद ते जालना रस्ता खुपच सुखकारक वाटला. त्यामुळे जालना आले तरीही माझे लक्ष नव्हते. सफारीचा दरवाजा उघडून त्यात बसलेल्या कफील सरांनी आवाज दिला तेव्हा चेकपॉइंट आल्याचे लक्षात येऊन मी कचकन ब्रेक दाबला. आवाज दिला नसता तर मी तसाच वाटुरफाट्यापर्यंत गेलो असतो. कफीलसरांच्या दोन्ही चिरंजीवांनी पाण्याच्या बाटल्या भरण्यापासुन ते कार्डवर सही व शिक्का देऊन, र्इलेक्ट्राल व केळी हातात आणुन देण्यापर्यंत सर्व कामे न सांगता पटापट केली. त्यांच्या मोठ्या चिरंजीवाने २०० ची ब्रेवे केलेली ऐकुन तर मला फारच कौतुक वाटले. ११ वाजुन ४ मिनिटांनी या चेकपॉइंटला पोचलो. १५ मिनिटांनी कफीलसरांचा निरोप घेतला आणि वाटुरफाट्याकडे निघालो. ईथपर्यंत १४५ किमी अंतर पूर्ण झाले होते.
तिसरा चेकपॉइंट (जालना ते वाटुर फाटा ५५ किमी);
जालना चेकपॉइंट सोडल्यावर उजवीकडे कुठे वळायचे ते मला कळले नाही. थोडे अंतर पुढे गेल्यावर स्ट्रावावर लोड केलेला मॅप काढला आणि नक्की कुठे वळायचे होते त्याची खात्री करून घेतली. स्ट्रावावर मॅप लोड केलेला असल्यामुळे रस्ता चुकण्याचा प्रश्नच नव्हता. थोडे अंतर मागे येऊन बायपासकडे वळावे लागले. बायपासच्या रस्त्याचे काम चालु होते. त्यावर खडीचा भुगा (कच) अशा प्रकारे पसरवला होता की त्यावरून सायकलचे चाक नेताना मी जीव मुठीत धरला. अजिबात जास्त टॉर्क न देता सावकाश गतीने घाबरत घाबरत कसातरी तो खडीचा सडा पार केला. जालना जिंतुर रोडने चाललेलो असलो तरीही दोन जणांना वाटुरफाट्याकडे जाणारा हाच रोड का? असे विचारून खात्री करून घेतली. कपाशीची शेती मी पहील्यांदाच पाहत होतो. जालनाजवळ एक फोटोजन्य कपाशीचे शेत पाहुन मस्त सेल्फी फोटो काढुन घेतला. अर्धचंद्राकृती बायपासचा रोड संपल्यावर उजवीकडे वळालो. तिरूपती बालाजी तसेच हैद्राबाद कडे जाणाऱ्या पाट्या जरी रस्त्यावर दिसत असल्या तरी आम्हाला फक्त वाटुर फाट्यापर्यंतच जायचे होते. जालना जिंतुर रोडवर सायकलप्रवास तसाच चालु ठेवला. या रस्त्याच्या कडेला सर्रास कापुस पडलेला दिसत होता. नेहमी रस्त्याच्या कडेला दारूच्या बाटल्या बघण्याची सवय असल्याने कापुस दिसल्यावर थोडेसे विस्मयकारक वाटत होते. हा परीसर खुप शांत आणि हिरवाईने नटलेला दिसत होता. ताठ ऊभी असलेली हिरवीगार ज्वारीची कणसे खुपच सुंदर दिसत होती. आश्चर्य म्हणजे या भागात ऊसाची शेती नसतानाही काही ठिकाणी रसवंतीगृहे आढळली. कोल्हापुरात प्रचंड ऊसाची शेती आहे परंतु रस पिण्यासाठी रसवंतीगृह लवकर सापडत नाही हे तेवढेच खरे. बऱ्याच ठिकाणी शेतीच्या बाजुला माळरानात पोरांनी क्रिकेटचे डाव मांडलेले दिसत होते आणि आपल्या देशात क्रिकेटचे किती वेड आहे हे वेगळे सांगायला नकोच. विराट कोहलीसारखी दाढी वाढवता येत नाही म्हणुन बरेचजण दुःखी होते बिचारे. या पोरांना लगेच एवढी मोठी दाढी कुठुन येणार म्हणा? आजुबाजुचा परीसर न्याहाळत माझा सायकलप्रवास चालुच होता. रस्त्याकडेची शेती पाहुन मी उपकार सिनेमातील.."मेरे देश की धरती सोना उगले.." हे गाणे सारखे गुणगुणत होतो. गाणी ऐकण्यापेक्षा स्वतः गुणगुणल्याने खरा थकवा दूर होतो. वाटुरफाटा आता जवळ येत चालला होता. हा रोड असाच पुढे परभणी आणि नांदेडला जातो. त्या नगरला जाणार्या रोडपेक्षा हा रोड कैकपटीने भारी होता. नगर रोडला न जाता नांदेड मार्गावरच जाऊन येऊन ३०० किमी अंतर ठेवले असते तर मज्जा आली असती असे मला वाटले. वाटुरफाट्याच्या अलीकडेच डाव्या बाजुला एका हॉटेलमधुन नितीन सरांच्या मुलाने मला आवाज देऊन थांबवले. मी हॉटेलमध्ये पोचल्यावर लगेच त्याने ब्रेवे कार्डवर सही शिक्का दिला आणि माझीही सही घेतली. मी १ वाजुन ५२ मिनिटांनी पोचलो. त्या ढाब्यावर जेवण्यासाठी बाज मांडलेल्या होत्या. नेहमीच्या टेबलखुर्चीवरील जेवणापेक्षा आज वेगळा अनुभव येणार होता. हॉटेलमधील सेवकाला जेवणाची ऑर्डर देतच होतो तेवढ्यात तो चिमुरडा म्हणतो कसा, "काका, पप्पांनी जेवणाची ऑर्डर सांगुन ठेवलेली आहे" मग माझे काम तर आणखीनच सोपे झाले. पायातले बूट काढुन बाजवर मस्त मांडी घालुन जेवायला बसलो. डाळ फ्राय आणि भट्टीवरच्या चपातीची चव केवळ अवर्णनीयच होती. बोलता बोलता मी २ चपात्या फस्त केल्यावर राईस येऊ द्या म्हणालो तर काय आश्चर्य हॉटेलसेवक म्हणाला इथे राईस मिळत नाही. आँ.. काय? राईस मिळत नाही? ब्रेवेमध्ये पहील्यांदाच हॉटेलमध्ये जेवण करताना राईस खायला मिळणार नव्हता. मग मी अजुन एक चपाती मागवली आणि भात समजुन खाल्ली. सुख हे मानण्यात आहे. जेवण उरकल्यावर मी अजिबात वेळ वाया घालवला नाही. नितीन सरांचा निरोप घेऊन मी औरंगाबादच्या दिशेने सायकल वळवली.
शेवटचा चेकपॉइंट (वाटुरफाटा ते औरंगाबाद विमानतळ रोड १०३ किमी);
हॉटेल सोडल्यावर वाटुरफाट्याला वळसा घालुन औरंगाबादकडे वळालो. वाटुर फाटा ते जालना रस्त्याची गुणवत्ता उत्तम असल्यामुळे सायकलला काहीही त्रास होत नव्हता. पुन्हा त्याच मार्गावरुन सायकल चालवायची होती. डाळफ्राय आणि भट्टीच्या चपात्यांनी चांगलेच बळ वाढले होते. रस्त्यात प्रश्नांची सरबत्ती करणारे दुचाकी चालक नकोसे वाटत होते. एकजण म्हणाला,"तुमचा मेसेज काय आहे?" मी म्हणालो,"कोणता व्हाटसअपचा की फेसबुकचा?", "तो नाय ओ, तुमच्या सायकलचा", "माझी सायकल कोणाला मेसेज पाठवत नाही" हे माझे उत्तर ऐकुन खुप हसला बिचारा. एकजण म्हणाला "एवढी सायकल चालवल्यावर तुम्हाला काय मिळते?" मी म्हणालो "घंटा"... हे ऐकुन तो तर थांबलाच नाही माझ्याजवळ. एकतर सायकल चालवुन जीव नकोसा झालेला असतो आणि यांच्या रीकामटेकड्या चौकशांना उत्तरे पण द्यायची, कोणी सांगितलाय हा उद्योग? जाता जाता एक फळांचे दुकान दिसले.
त्या फळांच्या दुकानावर संत्रे घेण्यासाठी थांबलो. नेहमीप्रमाणे एकही पैशाची घासाघीस केली नाही. हॅंडल धरुन धरुन हाताची बोटे संत्रे सोलायला लवकर वळत नव्हती. त्या ताईंना विनंती करताच लगेच त्यांनी सर्व संत्रे सोलुन त्याच्या फोडी करुन एका पिशवीत भरुन दिल्या. त्यामुळे मी ती पिशवी सायकलच्या हॅंडलला अडकवुन सायकल चालवता चालवता संत्र्याच्या फोडी खाऊ शकलो. त्यांचे खुप खुप धन्यवाद. सायकल चालवणारे मला दिसले की मी नेहमी त्यांना थम्सअप दाखवुनच पुढे जातो आणि जर एखाद्या सायकलवाल्याने स्वत:हुन अभिवादन केले तर माझा उत्साह अजुनच वाढतो. पलीकडुन हाय आवाज आल्यावर मीसुद्धा हात उंचावुन अभिवादन दिले आणि माझा सायकलप्रवास चालु ठेवला. जालनातील मोती तलावाजवळ आलो तेव्हा सुर्य अस्ताच्या जवळ चालला होता. जालनापर्यंत काहीही कुरबुर जाणवली नाही. शेवटचे ५५ किमी राहीले असताना थोडी विश्रांती घेऊन चहा घेतला. एखादे गाव आले तरच रॉंग साईडने येणारे भेटत होते, हायवेला लागुन गाव असले की ते येतातच मग मी सावधगिरीने सायकल चालवतो. शेवटचे ३० किमी राहीले होते तेव्हा कधी एकदा हे हे ब्रेवे संपतेय असे वाटायला लागले होते. शेंद्रा एमआयडीसी दिसल्यावर खुप बरे वाटले. चिकलठाण आले आणि त्यापाठोपाठ औरंगाबादचे मॅक्डोनाल्डही आले. तिथे कफीलसर आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव वाट पाहत थांबलेलेच होते. संध्याकाळी ७ वाजुन ३५ मिनिटांनी माझे ब्रेवे संपले. एकुण १४ तास ४५ मिनिटांचा वेळ लागला. कफीलसरांच्या चिरंजीवाकडे ब्रेवेकार्ड देताना एक फोटो काढला, थोड्या गप्पा मारल्या आणि औरंगाबाद शहराकडे निघालो. अशा रीतीने नितिनसर आणि कफीलसरांनी उत्कृष्टरीत्या आयोजन केलेले माझे औरंगाबादमधील पहीले ब्रेवे उरकले. खुप छान अनुभव मिळाला आणि सायकलिंगमधील नविन मित्रही मिळाले.
मेव्हण्यांच्या घरी जाऊन मस्त आंघोळ केली, पोटभर जेवण केले आणि रात्री १०:३० वाजता सायकल कारमध्ये टाकुन पुण्याच्या दिशेने निघालो. सलग ३०० किमी सायकल चालवल्यानंतर २३० किमी कार चालवत पहाटे ३:३० वाजता सुखरुप घरी पोचलो.
Thanks & Regards
Vijay Vasve
9850904526
Pune
|
देवगिरी |
|
देवगिरी |
|
at the top of Devgiri |
|
कपाशी |
|
Add caption |
|
तिरुपती १०५७ किमी |
|
परभणी १०८ |
|
रस्त्याच्या कडेला पडलेला कापुस |
|
हैद्राबादा ४३८ |
|
लोणार सरोवर ५३ |
|
डाळ फ्राय |
|
पुणे ३४५ |
|
कपाशी |
|
मेरे देश की धरती |
|
ग्राहक देवो भव: |
|
अजिंठा १२८ |
|
मस्त रस्ता |
|
चल बेटा सेल्फी ले ले रे |
|
जालना शहर आणि रेल्वेमार्ग |
|
मोती तलाव, जालना |
|
सुर्यास्त |
|
सुर्यास्त |
|
ब्रेवे कार्ड |
|
ब्रेवे कार्ड देताना |
|
मिडीया कवरेज |
|
Horrible puncture |
|
मिडीया कवरेज |
|
मिडीया कवरेज |
|
मिडीया कवरेज |
|
मिडीया कवरेज |
असे लेख ई-मेलवर (ईनबॉक्स) हवे असल्यास आपला ईमेल 9850904526 या नंबरवर व्हाटसअप मेसेज करावा.
धन्यवाद !
Link for event details;