Saturday 14 December 2019

सिंहगड राजगड तोरणा अल्ट्रा मॅरेथॉन 53 km

सिंहगड राजगड तोरणा अल्ट्रा मॅरेथॉन 

स्फूर्ति आणि  प्रेरणा 

सिंहगड राजगड तोरणा (SRT Ultra marathon 53km)



सिंहगड राजगड तोरणा (SRT Ultra marathon 53km)

भाग १

 जेव्हा या मॅरेथॉनचे नाव ऐकले होते तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो आणि मनातल्या मनात पक्के ठरवले होते की आयुष्यात एकदातरी हि तीन गडांना जोडणारी मॅरेथॉन करायचीच. सिंहगड, राजगड आणि तोरणा हे तिन्ही किल्ले मला मनापासुन आवडतात, त्यात राजगड म्हणजे माझा जीव की प्राण आणि सर्वात जास्त जवळीक कोणाशी असेल तर ती म्हणजे सिंहगडाशी. जवळीक म्हणजे मला कळायला लागल्या लागल्या सर्वप्रथम ज्ञात झालेली कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे सिंहगड. चोहोबाजुंनी कातळ कडयांनी वेढलेला अभेद्य सिंहगड. आमच्या घराच्या अंगणात ऊभे राहीले की संपुर्ण पुर्व दिशा झाकाळुन टाकणारा सिंहगड समोर दिसतो. आणि राजगडाबद्दल काय बोलावे.. छ्त्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीतील २५ वर्षे राजगडावर घालवली. अनेकदा मृत्युवर भवानी तलवार उगारुन महाराज झेपावलेत ते याच गडावरुन. आणि तोरणा म्हणजे तर स्वराज्याचे पहीले तोरण आणि गरुडाचं घरटं. एका दिवसात एक गड चढुन उतरायचे म्हटले तरी सामान्य माणसाच्या नाकी नऊ येतात. हे तिन्ही गड एका दिवसात चढुन उतरायचे म्हणजे एक प्रकारची अग्निपरीक्षाच होती आणि हि अग्निपरीक्षा द्यायचे मी ठरवले कारण हल्ली साध्यासुध्या गोष्टी करुन समाधानच मिळत नाही.

 तयारी म्हणाल तर सिंहगडाची पायवाट मी खुप वेळा चढलेलो आहे, गुंजवणीमार्गे राजगडला अनेकदा गेलेलो आहे, राजगड ते तोरणा ट्रेकसुद्धा केलेला आहे आणि तोरण्याची अवघड पायवाट सुद्धा माझ्या नजरेखालुन गेलेली आहे. फक्त कल्याण दरवाजा ते विंझर हा मार्ग माझ्यासाठी अपरीचित होता. एकदा विकीला सोबत घेऊन हा मार्ग पाहुन आलो. आम्ही या मार्गावर गेलो तेव्हा तिथे प्रचंड गवत आणि कुसळांचा धुमाकुळ होता. ते पाहुन रेस पुर्ण करणे महाकठीण काम आहे असे वाटले होते परंतु रेसच्या अगोदर आयोजकांनी रेसच्या मार्गातील अनावश्यक गवत हटवले आणि अवघड उतरणीच्या ठिकाणी दोर बांधुन ठेवले होते. यामुळे रेसमध्ये धावणे (माफ करा चालणे) सुसह्य झाले. स्पर्धेची तयारी म्हणुन फक्त तीन वेळा सिंहगड वर खाली केला आणि नेहमी करतो तसा धावण्याचा सराव केला. मलेशियात नुकतीच आयर्नमॅन स्पर्धा पुर्ण केलेली असल्यामुळे दहा तासांपेक्षा जास्त कालावधीच्या रेसमध्ये तग धरण्याचा आत्मविश्वास आलेला होता. आणि काहीही झाले तरी निर्धारीत वेळेत हि अल्ट्रा मॅरेथॉन पुर्ण करायचीच असे मी ठरवलेले होते. 

 पुण्यातल्या पुण्यात एवढी छान अल्ट्रा मॅरेथॉन आयोजित केली जाते आणि आपण तिच्यात सहभाग घेऊ नये यासारखे दुर्दैव नाही. कमीत कमी स्वत:ला छ्त्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवुन घेणार्यांनी तरी या रेसमध्ये भाग घ्यायलाच हवा. हि स्पर्धा तीन प्रकारामध्ये होते ११ किमी, २५ किमी आणि ५३ किमी. ११ किमी रेसमध्ये गोळेवाडी ते तानाजी मालुसरेंच्या समाधी पर्यंत जाऊन पुन्हा गोळेवाडीला यायचे असते (हे नेहमी सिंहगड चढणारे सुद्धा सहज करु शकतात), २५ किमी रेसमध्ये गोळेवाडी ते राजगड पायथ्यापर्यंत (गुंजवणी) जायचे असते आणि मुख्य मॅरेथॉन ५३ किमीची ज्यामध्ये तिन्ही किल्ले सर करायचे असतात. मी पुण्यातल्या पुण्यात होणार्या स्पर्धांना जास्त प्राधान्य देतो. नोकरी आणि नोकरीच्या वेळा सांभाळुन ईतर शहरांमध्ये ये-जा करणे मला शक्य होत नाही. दुसर्या शहरात रेससाठी जायचे म्हणजे प्रवास, हॉटेलचे भाडे, जेवण हे खर्च वाढतात म्हणजे चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला होतो. त्यात मी काही पोडीयमवाला नाही त्यामुळे मला मिळणार असतो बाबाजी का ठुल्लु. खिशाचा सल्लाही असा असतो कि गुपचुप पुण्यातल्या पुण्यात काय धावायचे ते धाव (अपवाद फक्त टाटा मुंबई मॅरेथॉनचा). खिशात माल असेल तर कुठेही जाता येते. पैशाचे सोंग आणता येत नाही. 😆 



SRT भाग - २
सिंहगड ते विंझर

        मी आणि विकी पहाटेच्या अंधारात सिंहगडाकडे निघालो. डिसेंबर महीना सुरू होऊन आठ दिवस झाले तरीही थंडीने म्हणावा असा जोर पकडलेला नव्हता, नाहीतर एवढ्या पहाटे दुचाकीवर जाण्याची हिम्मत झाली नसती. स्टार्ट पॉइंटला पोचल्यावर अनंत आणि श्यामल भेटले. सर्व ओळखीच्या मित्रांना हाय हॅल्लो करून झाल्यावर मी माझे लक्ष एसआरटीवर केंद्रीत केले. एसआरटी अल्ट्रा सारखी खडतर मॅरेथॉन यशस्वीरीत्या पुर्ण करता यावी म्हणुन मी माझ्या क्षमतेनुसार आणि माझ्या आकडेवारीचा अभ्यास करून एक योजना बनवली होती. काही ठिकाणी पळण्याचा/चालण्याचा वेग तर काही ठिकाणी हृदयाचे ठोके विचारात घेण्यात आले होते. स्टेडफास्ट न्यूट्रिशन सोबत घेतलेच होते. कार्बोरन्स (Carborance) आणि सेनर्जी (Snergy) दोन बाटल्यांमध्ये भरून घेतलेले होते आणि एकेक सॅचे हायड्रेशन बॅगमध्ये घेतलेला होता. सेंधा मीठ तसेच ड्राय फ्रुटचे लाडुही सोबत घेतलेले होते.

         बरोबर सहा वाजता रेसला सुरूवात झाली. एका अनामिक भितीने मनात काहूर माजवले होते. हे राकट रांगडे सह्याद्रीच्या कुशीत पहुडलेले तिन्ही गड कधी गुडघे टेकायला लावतील यांचा काही नेम नाही. त्यामुळे मी जरा बेतानेच घ्यायचे ठरवले होते. सिंहगड पायथ्यापर्यंतचे दोन ते तीन किमी अंतर रमतगमत पार केले. तिथपर्यंतचा रस्ता नावाला डांबरी असला तरी त्यावर खड्ड्याखुड्ड्यांचे साम्राज्यच जास्त होते.

       सिंहगडाच्या वाटेला लागल्यावर  मी गतीच्या वाटेला गेलो नाही. हृदयाची गती मात्र शंभरच्या आसपास ठेवली होती. ठोके वाढतायत असे वाटताच मी एका जागेवर स्तब्ध राहुन शोलेतल्या आगगाडीसारखी धडधड वाढायला लागलेल्या हृदयाला शांत करण्याचा प्रयत्न करायचो. आज बॅलिस्टीक मिसाईल होणे गरजेचे होते. बॅलिस्टीक मिसाईलचा वेग कमी असतो परंतु मोठ्या पल्ल्याचे अंतर पार करण्याची क्षमता त्यामध्ये जास्त असते. आज मी बॅलिस्टीक मिसाईल बनलो होतो.

      रविवारी सिंहगड चढणाऱ्यांची तसेच उतरणाऱ्यांची गर्दी एसआरटी स्पर्धकांच्या गतीला अवरोध करत होती. पुणे दरवाजावर डॉ. राकेश जैन आणि त्यांच्या मित्रांनी मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या आणि आम्ही त्यांचा स्विकार करून निरोप घेतला. पहील्या हायड्रेशन स्थळावर पोचल्यावर तेथील सर्व गोष्टींचा यथेच्छ समाचार घेऊन आम्ही कल्याण दरवाजाकडे कुच केली. ईथपर्यंत मी "बडे आराम से“ मुडमध्ये होतो. कल्याण दरवाजाच्या पायऱ्यांवरून जाणारा उतार पाहुन माझ्या पायांची नियत बिघडली. त्यांना भुरळ पडली त्यांच्यावरील माझे नियंत्रण सुटले आणि ते भिंगरीसारखे फिरू लागले. अचानक घेतलेल्या गतीमुळे मी क्षणार्धात कल्याण दरवाजा पार करून बराच पुढे गेलो.

       गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने उतारावर मिळणाऱ्या गतीवर मी स्वार झालो आणि वाऱ्याच्या गतीने विंझरकडे निघालो. "उतारावर अजिबात हयगय करायची नाही आणि चढावर बिलकुल जोर लावायचा नाही" एसआरटीसाठी मी हा मूलमंत्र किंवा घोषवाक्य बनवले होते. आता 25 किमीचे (एसआर) स्पर्धक आमच्या अवतीभोवती यायला लागले होते त्यामुळे अरूंद आणि जेमतेम एकावेळी एकच स्पर्धक जाऊ शकेल अशा वाटेवर गर्दी जाणवायला लागली. मी काहीजणांना येस्कयुज मी म्हणत ओवरटेक केली. परंतु सारखे छोटे छोटे चढ येत असल्याने मी वेग घेण्याचा मोह टाळला. नागफणी जवळ तर काही स्पर्धक रांगत रांगत चालले होते त्यांच्यामुळे सर्वांनाच थांबावे लागत होते कारण तिथुन कसाबसा एकच स्पर्धक जाईल एवढीच अरू़द वाट होती आणि एका बाजुला खोल दरी असल्याने सर्वजण शिस्तीत चालले होते. वाहनांच्या गर्दीत अडकल्यावर जसे हतबल होऊन वाट पाहत बसण्याखेरीज पर्याय नसतो तसा तिथेही पर्याय नव्हता.

       जसा विंझरचा उतार सुरू झाला तसा मी सुसाट सुटलो. वाटेवर बांधलेल्या दोराचा आणि हातातल्या काठीचा उतारावर मस्त ऊपयोग करून घेतला. मी सपासप अंतर कापले. हा रूट अगोदर पाहुन घेतलेला असल्यामुळे वाट न चुकता मी उतारावर जोरात पळु शकलो. नाहीतर गुरांनी केलेल्या वाटा आणि मुख्य वाट यामध्ये नेहमी गल्लत होते. वाट चुकु नये म्हणुन बऱ्याच ठिकाणी भगव्या रिबन्स लावलेल्या होत्या. जिकडे रिबन लावलेली दिसेल तिकडे मी बिनधास्त पळत सुटायचो.  डोंगर उताराची वाट संपल्यावर एसआरटीची वाट भाताच्या खाचरांतुन जाऊ लागली. भाताच्या खाचरातुन डांबरावर, डांबरावरून सिमेंटवर असे करता करता आम्ही सर्वजण विंझर गावात पोचलो. तीन तासांच्या आत बडे आराम से मी विंझर चेक पॉईंट गाठला होता आणि अंतर झाले होते पंधरा किमी.. 


SRT भाग - ३

     गोळेवाडी ते सिंहगड माथा हे पाच किमी अंतर पार करायला एक तास सतरा मिनिटे लागली. सिंहगड माथा ते विंझर हे दहा किमी अंतर पार करायला जवळजवळ पावणे दोन तास लागले आणि ते अंतर पार केल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला. ज्यांना असे वाटते की एकदा सिंहगड चढल्यावर वरच्यावर डोंगरा डोंगराने चालत आरामात विंझरला पोचता येते त्यांनी एकदा या वाटेने अवश्य जाऊन या. त्याशिवाय वरच्यावर म्हणजे काय असते ते तुम्हाला कळणार नाही. ते वरच्यावर नसुन बरेच वरखाली करावे लागते आणि तिथेही बरीच दमछाक होते. यापुढचे दहा किमी आता डांबरी रस्त्यावरून धावायचे होते. विंझर चेकपॉइंटवरील सर्व खाण्याच्या वस्तुंचा ओळीने आस्वाद घेतला. केळी, संत्री, खजुर, सैंधव मीठ, साखर, पाणी इ. चेकपॉइंटची सर्व व्यवस्था अप्रतिम होती आणि रनर्सला काय हवे काय नको याची आपुलकीने चौकशी केली जात होती. नावे ठेवण्यासाठी काहीच वाव मिळाला नाही. विंझर गावातुन पळत जाताना छोटी छोटी मुले ऊत्साहाने "बेस्ट लक" म्हणत होती आणि हे बेस्ट लक म्हणताना त्यांच्या चेहर्‍यावर एक निखळ आनंद ओसंडुन वाहत होता. रनर्सकडुन प्रतिक्रिया मिळाली तर तो आनंद अजुन द्विगुणित होत होता. ज्यांनी ज्यांनी मला बेस्ट लक दिले त्यांना मी आवर्जून इंग्लिशमध्येच "थँक्यू सो मच" म्हणालो आणि ते ऐकुन स्मितहास्यासहीत आनंदी झालेले चेहरे मी डोळेभरून पाहीले. हि आनंदाची देवाणघेवाण आणि ते स्मितहास्य केवळ अशा स्पर्धांमध्ये धावतानाच अनुभवायला मिळु शकते. गावातले लोक आम्हा पळणाऱ्यांकडे  कुतुहलाने पाहत होते किंवा कुठुन आली ही वेडी जत्रा? अशा भावानेही पाहत असतील, काय सांगावे?

      विंझर गावातुन बाहेर पडल्यावर वेल्हे ते नसरापुर मार्गावर डावीकडे वळालो आणि पायांना वेग वाढवण्याची आज्ञा दिली. आता रस्त्यावर कसलीही गर्दी नव्हती, ना वाहनांची...ना स्पर्धकांची. कितीही वेगाने पळालो तरी आडवे येणारे कोणीही नव्हते. सिंहगडाशी झुंज देऊन आलेल्या पायांनी वेग घेण्यास स्पष्ट नकार दिला. पायाचे स्नायू म्हणाले आम्ही आज संपावर आहोत. फक्त राजगड पर्यंत पळायचे असते तर वेगात पळणे समजु शकतो पण पुढे राजगड आणि तोरणा सर करायचा आहे या विचाराने मी पण वेगात पळण्याचा विचार सोडुन दिला. ताणल्यावर काय होते याचा अनुभव मी पुणे अल्ट्रामध्ये घेतलेला आहे. लांब पल्ल्याचे अंतर पार करायचे असल्यामुळे आज मी स्वतःला ईकॉनॉमी मोडवर ठेवले होते, म्हणजे जसे आपण प्रिंटरचे कार्टरेज भरलेले असताना देखील शाई वाचवण्यासाठी त्यातुन पुसट प्रिंट काढतो त्याप्रमाणे. एसआरटी रेसमध्ये सर्व शक्ती एकदम न वापरता ती पुरवून पुरवून वापरायची असे मी ठरवले होते. 

    मार्गासनी आल्यावर उजवीकडे आणि त्यापुढे साखर गावातुन वाजेघरकडे न जाता डावीकडे गुंजवणीकडे वळालो. सात ते साडेसात मिनिटे प्रति किमी गतीने धावाधाव चालु होती. रस्ता अगदी साधा होता तसेच रस्त्यात आणि गावातुन भेटणारी माणसेही साधीच होती. एका माणसाने रस्त्यालगत पाण्याचा हंडा भरून ठेवलेला होता आणि रस्त्यावरून धावणाऱ्या मला पाहताच पाणी घ्या असा हाताने इशाराही केला. साखर गावातील या गृहस्थाने स्वतः पुढाकार घेऊन केलेली हि व्यवस्था माझ्या थकलेल्या शरीराला आणि कोरडा पडत चाललेल्या घशाला खुप समाधान देऊन गेली. पाण्याचा एक छोटा तांब्या घशाखाली उतरवला आणि आभार व्यक्त करून मी पुढे धावत निघालो.

       माझ्या योजनेनुसार मी गुंजवणीमध्ये दहा वाजता म्हणजे चार तासाच्या कालावधीत पोचणे आवश्यक होते परंतु मला तिथे पोचायला चार तास नऊ मिनिटे लागली. बिब नंबर 520 आलेला आहे हे लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात ऐकायला मिळाले. तिथेही सर्व व्यवस्था नीटनेटकी आणि रनर्सना लागणार्‍या सर्व गोष्टींनी संपन्न होती. कुठेही कसलीही कमतरता जाणवली नाही. पंचवीस किमी धावणाऱ्यांची स्पर्धा ईथेच संपली होती आणि सुटले होते बिचारे. आम्हा त्रेपन्न किमी वाल्यांचा इथुनच खरा कस लागणार होता. फक्त पंचवीस किमी मध्ये भाग घेतला असता तर किती बरे झाले असते असा विचार माझ्या चंचल मनामध्ये तरंग उमटवुन गेला पण तो फक्त काही क्षणांपुरता. मी एसआरटी करण्यावरच ठाम होतो. चेकपॉइंटवरील सैंधव मीठ, साखर, पाणी तसेच स्टेडफास्टचे कार्बोरन्स, सेनर्जी घेऊन मी पुन्हा एकदा ताजातवाना झालो आणि पुढचे लक्ष्य गाठण्यासाठी म्हणजे राजगड चढण्यासाठी सज्ज झालो. 

   आता वरवर चढत चाललेल्या सुर्याबरोबर आम्हाला राजगड वर चढायचा होता. रविवार असल्यामुळे राजगड पहायला आलेल्या पर्यटकांची भरपुर गर्दी दिसत होती. पण हि गर्दी पाहुन आनंदच जास्त झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड पहायला येणारी पर्यटकांची गर्दी कोणाला नकोशी वाटेल? कितीही येवोत सर्वांचे स्वागत आहे. मी सुद्धा त्या गर्दीचाच एक भाग बनुन राजगड चढत होतो.  वाटेत ती नेहमीची ताक विकणारी आज्जी भेटली. हो..तीच ती ड्रामा करणारी... तिला सुन छळते.. याँव ताँव सांगुन ती तिच्याकडचे ताक घ्यायला भाग पाडते. ताक घ्यायला काही नाही पण तो ड्रामा कोणी ऐकावा? मी त्या आज्जीकडे पुर्ण दुर्लक्ष केले आणि पुढे सटकलो.

  आता पुन्हा एकदा हृदयाच्या ठोक्यांच्या गतीला महत्व प्राप्त झाले होते. हृदयाची धडधड वाढु न देता मी धीम्या गतीने चढाई चालु ठेवली. ईथुन पुढे मला थकलेले रनर्स दिसायला सुरूवात झाली. मी एकेकाला मागे टाकत आरामात माझ्या गतीने पुढे जात होतो. तेवढ्यात अजित नंदनीकर सरांनी आवाज दिला, "आयर्नमॅन विजय.. बराच वेळ झाला तुझी वाट पाहतोय" त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मला ऊशिर झाला होता. पण माझ्या हिशोबाप्रमाणे मी फक्त नऊ मिनिटे ऊशिर केलेला होता. त्यांनी माझ्याबरोबर फोटो घेतला आणि माझा धावताना व्हिडिओ सुद्धा काढला. अजित सरांना भेटुन खुप छान वाटले. त्यांनी माझा ऊत्साह वाढवला आणि मी नव्या जोमात पुन्हा राजगड चढायला सुरूवात केली. राजगडाच्या वाटेत वोलिंटीयर्सनी सर्व रनर्सचे बरेच फोटो आणि व्हिडिओ काढलेले आहेत ते बघण्यासाठी आता जीव आतुर झालेला आहे.

   राजगड चढणाऱ्या हौशी पर्यटकांची चांगलीच दमछाक झालेली दिसत होती त्यांना साईड द्या म्हटले की ते लगेच बाजुला होत होते. रस्त्यावर अ‍ॅम्ब्युलन्स आल्यावर जशी इतर वाहने बाजुला होतात तसे एसआरटीचे रनर्स आले की हौशी पर्यटक बाजुला होऊन आम्हाला वाट देत होते. सेल्फी घेत असलेल्या पर्यटकांचा थोडासा अडथळा जाणवला. सकाळी सिंहगड पायथ्यापासुन सुरूवात केली हे ऐकले की त्यांच्या तोंडुन फक्त "बाब्बोव" हा एकच शब्द निघत असे.

   चोर दरवाजा जसजसा जवळ यायला लागला तसतशी राजगडाची चोरवाट आणखीनच निमुळती होत गेली. या वाटेवर रेलिंग लावलेले असल्याने घाबरण्याचे काहीही कारण नव्हते. रेलिंगला धरत धरत "साईड प्लीज" चा आवाज देत देत मी चोर दरवाजातुन आत शिरलो. चोर दरवाजाच्या पायऱ्या चढुन राजगडावरील पद्मावती माचीवर पाय ठेवताच वोलिंटीयर्सनी माझे स्वागत केले. ईथे फक्त पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती आणि तीही सर्वोत्तम. अंग भिजवण्यासाठी स्पंज सुद्धा ठेवण्यात आले होते. चढत्या ऊन्हात राजगड चढुन आल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी खालावलेली जाणवत होती. मी थोडावेळ आराम करत हृदयाची धडधड शांत केली. उंटासारखे भरपुर पाणी प्यायलो आणि वोलिंटीयर्सला धन्यवाद देत मी सुवेळा माचीकडे कुच केली.


SRT भाग ४


 राजांचा गड आणि गडांचा राजा..."राजगड". कानंदी आणि गुंजवणी खोर्‍यातील या गडाचे भारदस्त, पुरुषी आणि रांगडे रुप डोळ्यात सामावुन घ्यावे असेच आहे. संजीवनी, सुवेळा आणि पद्मावती या तीन माच्या आणि बेलाग, अभेद्य बालेकिल्ला यामुळे राजगडाचे रुप कायम चिरतरुण आणि लोभस भासते. अशा या राजगडाचे शत्रुने केलेले वर्णन, 
“राजगड हा अतिशय ऊंच आहे. त्याची उंची पाहता तो सर्व किल्ल्यांत श्रेष्ठ आहे. त्याचा घेर बारा कोसांचा आहे. त्याच्या मजबुतीची आणि उंचीची कल्पनाही करवत नाही. या डोंगरदऱ्यातुन आणि घनघोर अरण्यातुन वार्‍याशिवाय दुसरे कोणीही फिरकु शकत नाही..”

 इसवी सन १६४८ ते १६७२ तब्बल पंचवीस वर्षे महाराजांनी इथे वास्तव्य केले. महाराणी सईबाईंचा मृत्यु, छ्त्रपती राजारामांचा जन्म, अफजलखानाच्या वधासाठी महाराज याच गडावरुन गेले होते, शायिस्तेखानाची फजिती, पुरंधरचा तह, कोंढाण्यावर स्वारी, आग्र्याहुन सुटल्यावर महाराज आले ते थेट राजगडावर, उंबर खिंड आणि त्यासारख्या अनेक लढायांचे नियोजन आणि आखणी याच गडावर झाली.  

अशा या राजगडावर पाय ठेवताच माझ्या थकलेल्या शरीरातही रोमांच ऊभे राहीले. "येथे कर माझे जुळती..." महाराणी सईबाई यांच्या समाधीजवळुन जाताना माझे हात आपसुकच जोडले गेले.. मी नतमस्तक झालो आणि मगच पुढे गेलो. सदरेवर गेल्यावर दोन वोलिंटीयर्स सुवेळा माचीकडे जाण्याचा रस्ता दाखवत होते. यावेळेस सर्व वोलिंटीयर्सनी ऊठुन दिसणारा हिरवा टी-शर्ट घातलेला होता त्यामुळे त्यांना ओळखणे सोपे जात होते. सुवेळा माचीकडे जाणारी वाट काही ठिकाणी अरुंद म्हणजे एकावेळी एकच रनर जाऊ शकेल एवढीच तर काही ठिकाणी ऐसपैस रस्त्याएवढी होती. सुवेळा माचीच्या पहील्या बुरुजाजवळ जाऊन शिक्का मारून घ्यायचा होता आणि परत फिरायचे होते. मी बिब आणि हातात बांधलेल्या टायमिंग चिपच्या स्टीकरवर शिक्का मारून घेतला. हा शिक्का ज्याच्याकडे नसेल तो अपात्र होणार हे निश्चित होते. सुवेळा माची मी पटकन उरकली. आता पायांमधील त्राण कमी कमी व्हायला लागले होते. नशिब चांगले की क्रॅम्प वगैरे काहीही जाणवत नव्हते. सदरेवरुन संजीवनी माचीकडे जाताना लागणारा छोटासा चढसुद्धा एवरेस्ट सारखा भासत होता. ईथे चिमुकले वोलिंटीयर्स रनर्सला मदत करण्यासाठी धावपळ करत होते ते पाहुन खुप कौतुक वाटले. 

 संजीवनी माचीकडे जाताना बरेच वोलिंटीयर्स रस्ता दाखवण्यासाठी जागोजागी बसलेले होते. हि वाट माझ्या पायाखालची असल्यामुळे मी निर्धास्त होतो. राजगड ते तोरणा मी तीन-चार वेळा केलेला आहे त्यामुळे वाट चुकण्याचा प्रश्नच नव्हता. संजीवनी माचीला वळसा घालुन आल्यानंतर तीव्र उतारावरुन जाणारी वाट थोडी अवघड जाईल असे वाटले होते. परंतु त्या ठिकाणी दोर बांधलेला असल्यामुळे तो तीव्र उतार पार करणे एकदम सोपे गेले. उतारावर काहीही जोर न लावता सहज वेग मिळतो, यावर नियंत्रण ठेवता येणे आवश्यक असते. सिंहगड पळत पळत उतरण्याचा सराव केलेला असल्यामुळे पायांना उतारावरील वेगाची सवय झालेली होती. उतारावर सहज गती मिळत होती तरीसुद्धा पाय मात्र थकत चालले होते. थकलेल्या पायांना मी एसआरटी अल्ट्रा पुर्ण करण्याचे स्वप्न दाखवत चालते करत होतो. एवढ्यात थकलास का रे विज्या? मीच मला उद्देशून बोललो. विचार कर राजांचे मावळे त्याकाळात ढाल, तलवार आणि भाले घेऊन या डोंगर-दऱ्यांतुन कसे चालत गेले असतील? तेव्हा त्यांच्याकडे तुझ्यासारखे वैशिष्टयपुर्ण आणि ट्रेल रनिंगसाठी बनवलेले विशेष शुजसुद्धा नसतील. यातुन मला खरंच प्रेरणा मिळत गेली. 

  संजीवनी माची उतरून जंगलातुन जाणाऱ्या तोरण्याच्या वाटेला लागलो. ती जंगलातुन जाणारी वाट सुखद गारवा देत होती. ऑक्सीजनने भरगच्च अशा एखाद्या वातानुकूलीत सदनिकेतुन जातोय असा भास होत होता. भुतोंडे खिंडीत आयोजकांनी खाण्यापिण्याची व्ववस्था केलेली होती आणि त्याचबरोबर सर्व स्पर्धकांच्या मानेवर एक टांगती तलवार सुद्धा लावलेली होती. दोन वाजण्याच्या अगोदर जे रनर्स ईथपर्यंत येतील तेच पुढे जाण्यासाठी पात्र ठरणार होते आणि बाकीचे अपात्र. त्यांना बसमध्ये बसवुन थेट कोंढाणा गेस्ट हाऊसला पाठवण्यात येणार होते. ईथपर्यंतचे पस्तीस किमी अंतर आठ तासात पार करायचे होते. हिच ती टांगती तलवार. मी दुपारी साडेबारा वाजता म्हणजे साडेसहा तासात भुतोंडे खिंडीत पोचलो. आता अपात्र होण्याची भीती राहीलेली नव्हती आणि उरलेल्या साडेपाच तासात अठरा किमी अंतर पार करायचे होते म्हणजे तासाला साडेतीन ते चार किमी अंतर पार केले तरीही मोहीम फत्ते होणार होती. यापुढे आता अतिशय महत्वाचा आणि अंत पाहणारा भुतोंडे खिंड ते तोरण्याचा कोकण दरवाजा हा टप्पा पार करावयाचा होता. समोर रडतोंडी बुरूज आम्हाला रडवण्यासाठी सज्ज झालेला दिसत होता. या स्पर्धेत ग्रीसमधील अल्ट्रा करून आलेला एक रनर भेटला. तो म्हणाला, एवढी अवघड वाट जगातल्या कुठल्याच स्पर्धेमध्ये नाही. राजांचे गड म्हणजे सोप्पं काम नव्हे.

  मी चेकपॉइंटवरील सर्व वस्तुंचा आस्वाद घेत वोलिंटीयर्स सोबत गप्पा मारल्या. सर्व वोलिंटीयर्स हे मराठी मावळे होते. त्यांनी खुपच छान सहकार्य केले. मला थोडेसे ताजेतवाने वाटल्यावर मी तोरण्याकडे जाणाऱ्या जंगल वाटेवर निघालो.



भाग शेवट

भर दुपारची वेळ झालेली होती. सुर्यनारायण चांगलेच तापले होते. तोरण्याच्या वाटेवरील कारवीचे जंगल तापलेल्या सुर्याचे अस्तित्व जाणवु देत नव्हते. हिरव्यागार कारवीने सर्व ऊष्णता शोषुन घेतली होती. त्यामुळे त्या वाटेवर कमालीचा थंडपणा जाणवत होता. तो थंडावा अनुभवल्यावर मला मलेशियामध्ये आयर्नमॅन करताना अनुभवलेला वातानुकुलित हॉल आठवला. पण त्यापेक्षा कारवीच्या जंगलाचा नैसर्गीक थंडावा मला जास्त भावला. काही ठिकाणी गवताळ मैदानातुन चालावे लागे तेव्हा ऊन अंगावर झेलावे लागत होते. असा ऊन-सावलीचा खेळ बराच वेळ चालला होता. महादु कचरे यांनी त्यांच्या घराजवळ पाण्य़ाची व्यवस्था केलेली होती. त्यांच्याशी दोन गोष्टी बोलुन पुढे निघालो. ईथुन पुढे थोडा थोडा चढ जाणवायला लागला होता. कारवीचे जंगलही मागे पडले होते. डावीकडे खोल दरी, अरुंद वाट आणि थकलेले पाय अशा तिहेरी संगमातुन तयार झालेला थरार अनुभवयास मिळत होता. मी माझ्या चालण्यामध्ये सातत्य ठेवले होते. न थांबता ज्या गतीने शक्य होईल त्या गतीने सतत चालत होतो. 

   दुपारच्या ऊन्हात जास्त जोर लावण्यात काहीही अर्थ नव्हता. स्टेडफास्टचे कार्बोरन्स आणि सेनर्जी अधुन मधुन घेणे चालुच होते. रडतोंडी बुरुज समोर दिसत होता. त्याची ऊभी चढण घाम फोडणार हे निश्चित होते. मी कसलीही घाई न करता चढावर निवांतपणे चालत होतो. दुपारी १ ते ३ च्या ऊन्हात अजिबात जोर लावायचा नाही असे ठरवलेलेच होते आणि त्याप्रमाणेच माझे मार्गक्रमण चालु होते. दोन वेळा एकेक मिनिटांचा ब्रेक घेतला. त्यामुळे हृदयाची धडधड थोडी शांत होण्यास मदत झाली होती. यानंतर सुरु होणारा तोरण्याचा उभा चढ थेट कोकण दरवाजाजवळ संपणार होता. जसाजसा तोरणा जवळ येऊ लागला तसतशी चढाची तीव्रता आणखीनच तीव्र होत गेली. एवढा तीव्र चढ क्वचितच पहायला मिळतो. सिंहगड, राजगड असे मिळुन ४२ किमी अंतर पार करून आल्यानंतर असा चढ शत्रुलाही लागु नये. त्या दुर्गम ठिकाणी, भर दुपारच्या ऊन्हात आणि तीव्र चढांवरही वोलिंटीयर्स रनर्सची मदत करण्यासाठी सज्ज होते. एवढी जंगलाची वाट परंतु कुठेही एकटे वाटले नाही. शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे एसआरटीचे वोलिंटीयर्स ठिकठिकाणी विखुरलेले होते. तीव्र चढ संपल्यावर शिडी चढुन तोरण्यावर जाण्याचा थरारच वेगळा, तो एक रोमांचकारी अनुभव नक्कीच आहे परंतु त्यावेळेस मला काहीही रोमांचक आणि थरारक वाटत नव्हते. फक्त एकच लक्ष्य डोळ्यांसमोर दिसत होते ते म्हणजे कोकण दरवाजा. कोकण दरवाजा येता येता मी पार थकुन गेलो होतो. बुधला माचीजवळ दोन ते तीन वेळा थांबलो. तिथपर्यंत पोचणे हेसुद्धा सोपे काम नाही. दु:खाचा चढ ओलांडल्याशिवाय सुखाचा उतार येत नाही म्हणतात ते काही खोटे नाही. आणि तो येणार होता... 

मी कोकण दरवाजातुन गेलो आणि एसआरटी अल्ट्राचे सर्व चढ एकदाचे संपले. हा आनंद गगनात मावत नव्हता. मी आता गरुडाच्या घरटयात शिरलो होतो. इथुन पुढे राहीला होता फक्त उतार. गडदेवता मेंगाईदेवीला दुरुनच हात जोडले आणि मी बिनी दरवाजाकडे सुसाट सुटलो. आता मला ओढ लागली होती माझ्या जिवलग मित्रांची. गणेश आणि रमेश तोरणा पार्कींगजवळ एसआरटीचे हायड्रेशन सांभाळत दिवसभर माझी वाट पाहत होते. तोरण्याचा अवघड उतार मी लिलया पार केला आणि मित्रांच्या ओढीने हे अंतर कसे संपले मला कळलेसुद्धा नाही. तोरण्याच्या उतारावरुन पळताना प्रिती म्हस्के यांनी माझे फोटो काढले पण उतारावर मला ब्रेक लावता आला नाही. दुपारी तीन वाजता मी शेवटच्या हायड्रेशन पॉइंटला पोचलो, तोरणा पार्किंग. माझे जीव की प्राण असलेले मित्र पाहुन मला खुप आनंद झाला. एक अशक्यप्राय स्वप्न पुर्ण झाल्याचा आनंद आम्ही सर्वांनी साजरा केला. त्यांनी माझ्यासाठी चुल पेटवुन बटाटे भाजुन ठेवले होते. त्यातला मी एकच बटाटा खाऊ शकलो. फोटो काढले आणि मी शेवटचे आठ किमी पुर्ण करण्यासाठी गणेश, रमेश, दत्ता आणि कल्पेश यांचा निरोप घेतला.

      तोरणा उतरुन वेल्ह्यामध्ये आल्यावर असे वाटले की आता बास. हि रेस ईथेच संपावी. उरलेले सात किमी धावण्याची ईच्छाच नव्हती. ईथेच हि रेस संपली असती तर किती बरे झाले असते. पायांमध्ये बिलकुल त्राण शिल्लक राहीलेले नव्हते. तरीपण रेस पुर्ण करण्यासाठी गुंजवणी धरणाकडे जाऊन सात किमी फेरी मारुन येणे गरजेचे होते. शारीरीक आणि मानसिक दोन्ही प्रकारचा प्रचंड थकवा आलेला होता. शेवटचे सात किमी रडतखडत कसेबसे पुर्ण केले आणि करावेच लागणार होते. फिनिश लाईन पार केल्यानंतरचा आनंद अवर्णनीय होता. अशा रीतीने मी माझी पहीली एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन १० तास २९ मिनिटांमध्ये पुर्ण केली. छ्त्रपती शिवाजी महाराजांची छबी असलेले मेडल मिळाले. बस्स! अजुन काय हवंय आपल्याला. प्रिती म्हस्के यांनी केक आणल्याबद्दल त्यांचे मन:पुर्वक धन्यवाद. अनंत आणि श्यामल चे हार्दिक अभिनंदन !!

      या स्पर्धेचे आयोजन आणि नियोजन सर्व काही उत्कृष्ट होते, संपुर्ण वाटेत रनर्सना मदत करण्यासाठी जागोजागी वोलिंटीयर्स विखुरलेले होते, हायड्रेशन पॉइंटवर सर्व आवश्यक पदार्थ भरपुर प्रमाणात उपलब्ध होते त्यामुळेच हि रेस पुर्ण करणे मला सोपे गेले. यासाठी वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनचे मन:पुर्वक आभार. छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या गडांना जागतिक पातळीवर पोचवण्याचा हा स्त्युत्य उपक्रम आहे असे मला वाटते. 
छ्त्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!!























23 comments:

  1. खूप मस्त विजू👍👌👌

    ReplyDelete
  2. Great viju bhau
    Heartily Congratulations!!
    💐💐👍👌💐💐

    ReplyDelete
  3. नमस्कार सर. आपलं पुनश्च अभिनंदन!!! आपण खूप जबरदस्त रन केलात आणि तितकंच सुंदर लिहिलंतही. मीसुद्धा अल्ट्रा ५३ किमी करणार होतो. पण व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे रद्द करावं लागलं. आता अधिक तयारी करेन. आपल्याला स्ट्राव्हावर फॉलो करतोच. आपल्याकडून खूप मार्गदर्शन मिळत आहे. धन्यवाद!

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप धन्यवाद 😊

      Delete
  4. Gr8 vijay sir ur siimply GR8 .i m speechless....SRT ultra chaya diwashi me torna gadavar hoteee ..tumhi cross jhyalvar manat mhnatal woww GR8 runners ahet ...kay stamina ahhe...... pan seriously manatun shubhechha deun tumcha pudha tappa sundar ritenee paar havava ahi shubhecha dilya.....ani ur GR8 mahant anhi torna gad purna kleaa

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप धन्यवाद 🙏🏽.. खरंच मला खुप गरज होती शुभेच्छांची त्यादिवशी.. तोरणा किल्ला पण कस पाहणारा आहे..

      Delete
  5. sir, mast varnan kele aahe . Iron man pan sudhha damale shevatche 7 km .
    mhanje khupach damavnari SRT aahe .

    ReplyDelete
    Replies
    1. ख़ुप खुप खुप धन्यवाद 🙏🏽 😍
      हो.. खुप कठिण आहे

      Delete
  6. Replies
    1. खुप खुप धन्यवाद 🙏🏽 😍

      Delete
  7. Great bhau 👍👍💪💪🏃🏃👌

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप धन्यवाद 🙏🏽 😍

      Delete
  8. मस्त भेटू Marathon madhe

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप धन्यवाद 🙏🏽 😍

      Delete
  9. खतरनाक दाद्या, लै इन्स्पिरेशन लगा

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप धन्यवाद 🙏🏽 😍

      Delete
  10. खूप आव्हानात्मक, उर्जात्मक, आनंददायी आणि रोमांचक असे वर्णन केले आहे विजयराव..
    आपल्या या यशाबद्दल कौतुक👌💐

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप धन्यवाद 🙏🏽 😍

      Delete
  11. Excellent writeup Vijay...Congratulations...💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप धन्यवाद 🙏🏽 😍

      Delete

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...