Saturday, 5 May 2018

बोगद्यातील छमछम

"बोगद्यातील छमछम"

कात्रजचा बोगदा माझ्यासाठी काय आहे कसे सांगु? घाम काढणारा कात्रज घाटाचा चढ, तो दरीपुल आणि पुणे-बेंगालुरु हायवे हे माझे सायकलिंगच्या आयुष्यातले खरेखुरे सोबती आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जोडीला कोणी असो वा नसो हे मात्र कायम माझ्या स्वागतास हजर असतात. चार वर्षापुर्वी नविन सायकल घेतली तेव्हा मी सायकल घेतल्या घेतल्या तो दरीपुल गाठला होता. तेव्हापासुन या मार्गावर सुरु झालेला सायकलप्रवास आजतागायत अविरतपणे चालु आहे.

या कात्रजच्या बोगद्याचे मी खुप सारे फोटोसुद्धा काढलेले आहेत. वेगवेगळ्या ऋतुंमधले, वेगवेगळ्या छटांमधले, पावसाळ्यात छोट्या छोट्या धबधब्यांनी खळखळुन वाहणारा बोगदा, हिरवाईने नटलेला बोगदा, सप्टेंबरमधील रंगीत फुलांनी बहरलेला बोगदा, ग्रीष्माचे चटके झेलणारा बोगदा तर कधी धुक्यात बुडालेला बोगदा. भौगोलिक रचनेमुळे बोगद्यापासुन सुर्योदय आणि सुर्यास्त अनुभवता येत नाहीत, नाहीतर तीसुद्धा एक पर्वणीच ठरली असती. सांजसमयी त्याच्या दिव्यांचा झगमगाट एवढा प्रखर असतो की ते पाहुन मला दिवाळीची आठवण होते. माझ्या कामाच्या वेळांनुसार मी सकाळी किंवा संध्याकाळी जसा वेळ मिळेल तसा येथे राईडला जात असतो. बोगद्याजवळ पोचल्यावर सायकल स्टँडला लावुन मी माझे आवडीचे उद्योग करतो. जसे की योगा, कधी प्लँक करतो, कधी स्ट्रेचिंग, कधी मिरवणुकीत लावतात ती गाणी लावुन डान्स करतो किंवा काहीच सुचले नाही तर मोबाईलमध्ये डोके खुपसुन बसतो. एक मात्र आहे ईथे आल्यावर वेळ कसा भुर्रकन ऊडुन जातो ते कळत नाही. माझ्या जोडीला असंख्य सोबती असतात, ते पण सर्व अनोळखी, भरधाव वाहनात बसुन वेगात प्रवास करणारे जे माझ्याकडे कुतुहलाने पाहत असतात आणि निव्वळ कपडे चांगले आहेत म्हणुन मला ते वेडा समजत नाहीत एवढे नक्की. 

तर हा बोगदा म्हणजे माझ्या सायकलप्रवासातील एक मैलाचा दगड किंवा अविभाज्य घटक आहे. या बोगद्याच्या आजुबाजुचा परीसर मी अक्षरश: पिंजुन काढलेला आहे. ईकडे काय आहे? तिकडे काय आहे? वर काय आहे? आत काय आहे? शेजारील डोंगरावर काय आहे? मनात येणार्या या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मी यथाशक्ती प्रयत्न केलेला आहे. त्या परीसरात दोन अतिशय सुंदर धबधबे आहेत जे फक्त पावसाळ्यात अनुभवण्यास मिळु शकतात. बोगद्याजवळील वातावरण आणि त्या परीसरात आढळणार्‍या वस्तु फार गुढ आणि संभ्रमात पाडणाऱ्या असतात. बोगद्याच्या डाव्या बाजुला लिंबांचा ढिग लागलेला असतो, दारुच्या बाटल्या, नारळ, गुलाल, कच्ची अंडी, पैशांची चिल्लर (नाणी), वापरुन झालेले कंडोम, चिलिम वगैरे वगैरे... तिथे पडलेले एखादे लिंबु जर मला ताजे आणि रसरसीत वाटले तर मी ते पाण्याच्या बाटलीत पिळुन त्याचा छानपैकी आस्वाद घेतो. अर्थातच पांडुरंगाचे स्मरण करुन. पांडुरंग, वासुदेव, श्रीहरी त्या श्रीकृष्णाचे स्मरण केल्याने मी त्या लिंबाच्या कर्मबंधनात अडकत नाही. आणि अडकणार नाही याची मला खात्री असते. माझ्यासाठी एवढ्या छान लिंबाची व्यवस्था केल्याबद्दल मी त्याचे आभार मानायलाही विसरत नाही. एखादा नारळ चांगला असेल तर त्यातले पाणी तर मी घेतोच घेतो. छान असतात काही नारळ आणि त्यांचे पाणी. भुतांसाठी मिनरल वॉटर (बिस्लेरी वगैरे) का ठेवत नाहीत किंवा भुते मिनरल वॉटर का मागत नाहीत? भुतांनो जरा पाण्याच्या बाटल्याही मागत चला ऊन्हाळ्याचे दिवस आहेत तुम्हाला तहान वगैरे लागत नाही का? मला पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर गुगलकडे सुद्धा नाहीये. चढ पार करुन बोगद्याजवळ गेल्या गेल्या थंड पाण्याची बाटली दिसली तर अहाहा..!! काय बहार येईल ना? भुतासाठी टाकलेले लिंबु आणि नारळ मी घेतले तर ते भुत माझ्या मागे लागेल असेही मला वाटते कधी कधी, पण माझा गण देव असल्यामुळे मला भुताची भिती वाटत नाही. जर माझा मनुष्य गण असता तर माझे काही खरे नव्हते. मनुष्यगण आणि राक्षसगण असणार्‍या व्यक्तींनाच फक्त भुते दिसतात असे म्हणतात, त्यातल्या त्यात मनुष्य गण असणार्‍या व्यक्तींना भुतांकडुन प्रचंड मागणी असते.

बोगद्याच्या सुरुवातीला वाहनांची प्रचंड वर्दळ असते. वाहनांचा गोंगाट, बोगद्यात प्रवेश केल्यानंतर वाढणारा वाहनांचा आवाज, आयुष्यात पहील्यांदा बोगदा पाहील्यानंतर किंकाळणारे प्रवासी, चित्रविचित्र आवाज काढण्याची कला जोपासणारे काही हरहुन्नरी, बोगदा दिसताच जोरजोरात हॉर्न वाजवण्याची ईच्छा होणारे अतिउत्साही चालक तसेच ईतर नाना प्रकारचे वाहनांचे आवाज या सर्व आवाजांमुळे बोगदा गजबजुन गेलेला असतो. या सर्व आवाजांमधुन बोगद्याच्या आजुबाजुला काही आवाज आला तर चटकन ओळखु येत नाही. असाच एकदा निवांत बसलेलो असताना बोगद्याच्या डाव्या कोपर्‍यातुन घुंगरांचा आवाज आल्यासारखे वाटले. ऊसाच्या रसवंती गुऱ्हाळाजवळ येतो तसा. मी म्हटले आता येथे बोगद्यात कोणी गुऱ्हाळ चालु केले की काय? पण हा भास असावा किंवा एखाद्या वाहनामध्ये घुंगरु घेऊन चालले असतील त्याचा आवाज आला असेल असे मला वाटले. आवाज आला होता एवढे मात्र नक्की, तो कुठुन आला? कसा आला? हे काही कळ्ले नाही. एकदा संध्याकाळच्या राईडला गेलो असताना सायकल लावुन मोबाईल बघत बसलो होतो. पायात घुंगरे बांधलेली व्यक्ती छमछम करत चालत गेल्यासारखा आवाज आला. मी आजुबाजुला पाहीले पण कोणीही दिसले नाही. आवाज तर आला होता. या धास्तीने घशात कोरड पडायला लागल्यावर मी पाण्याची बाटली घेण्यासाठी सायकलकडे वळालो पण पाण्याची बाटली तर सायकलला नव्हतीच. ती माझ्या मांडीजवळ आलेली होती. पाण्याची बाटली सायकलवरुन माझ्या मांडीजवळ आलेली पाहुन तर मला खुपच आश्चर्य वाटले.

हा भुताटकीचा प्रकार असण्याचा मला दाट संशय यायला लागला. यावर रामबाण उपाय करणे अत्यंत आवश्यक होते. मी डोळे मिटले आणि महावीर हनुमानाचे नामस्मरण करायला सुरुवात केली. बजरंगबली हनुमानाचे नामस्मरण केल्यास कोणतेही भुत असो की पिशाच्च ते आपल्या जवळ फिरकु शकत नाही. जय हनुमान..!!! जय श्रीराम..!! प्रभु श्रीरामचंद्रांचेसुद्धा नामस्मरण केले. रामनामाचा महीमा एवढा आहे की त्या पिशाच्चाने किंवा त्या भुताने जर ते ऐकले तर त्याची या पिशाच्च योनीतुन मुक्तता देखिल होऊ शकते, त्याला उच्च गती प्राप्त होऊ शकते.

त्यानंतर मी बर्याच राईड केल्या पण पुन्हा मला तिथे कधीही घुंगरांचा छमछम आवाज आलेला नाही. त्यामुळे आता मलाच करमेनासे झाले आहे. आणि बाकीच्या सायकल चालवणार्यांनी घाबरण्याचे कारण नाही. मी एका नृत्यकलेत निपुन असणार्या भुताला पळवुन लावण्याचा करंटेपणा केला असे मला वाटायला लागले आहे.

पण मी काय म्हणतो दाखवले असते एखादे नृत्य तर मी काय नाही म्हणालो असतो का? असे लपुन छपुन घुंगरांचा छमछम आवाज करत चालत जाण्याची काय गरज होती?
- विजय वसवे, पुणे

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...