Sunday, 17 February 2019

मांढरदेवी सायकल राईड


          माझ्या साप्ताहीक सुट्टीचा वार आहे फक्त रविवार त्यामुळे शनिवारच्या दिवशी ज्या काही पब्लिक राईड आयोजित केल्या जातात त्यात मला सहभागी होण्याची कितीही ईच्छा असली तरी सहभागी होता येत नाही आणि कामाला दांडी मारुन सायकल चालवायला जाण्याएवढी माझी हौस दांडगी नाही आहे. माझ्या माहीतीतले जेवढे सायकल ग्रुप आहेत ते आपापल्या सोईनुसार आणि सुट्टीनुसार पब्लिक राईड आयोजित करतात त्यात प्रामुख्याने दुसरा आणि चौथा शनिवार निवडलेला असतो. अशा राईडला जाणे मला जमत नाही. मग मी पण माझ्या सोईनुसार आणि वेळेनुसार राईडला जातो. माझे चंचल मन जिकडे चल म्हणेल तिकडे जातो. पांडुरंगाच्या कृपेने पुणे येथील कोणतीही राईड माझ्यासाठी असाध्य राहीलेली नाही. सिंहगड असो वा लवासा. भोरघाट असो की खंबाटकी कुठेही चला आणि पसरणीसुद्धा मी कित्येकदा सायकलवर पार केलेला आहे. राईड जेवढी अवघड, मजाही तेवढीच जास्त येते. अशीच एक माझी राहुन गेलेली मजेशीर राईड म्हणजे मांढरदेवी राईड. मांढरदेवीला गेलाय का कधी? विचारणाऱ्याचा रोख अर्थातच सायकलवर असायचा, नाहीतर कारने काय कोणीही जाऊन येते. या प्रश्नाला नाहीम्हणुन उत्तर देताना सायकलिंगच्या एखाद्या परीक्षेत नापास असल्यासारखी भावना मनात येत असे. आणि त्यात प्रश्न विचारणारा सायकलवर जाऊन आलेला असेल तर मग विचारुच नका. वेळा सुपर रॅंदोनियर करुनही मांढरदेवीला सायकलवर गेल्यामुळे माझे सायकलिंग कसे अर्थहीन आणि निरर्थक आहे याची जाणीव मला कशी होईल याची काळजी घेतली जात असे. मांढरदेवी राईड करण्याची ईच्छा प्रबळ होत गेली होती ती यामुळेच.

          सुपर रँदोनियर संतोष झेंडेनी फेब्रुवारी महीन्याच्या पहील्याच रविवारी मांढरदेवी राईड करण्याचा बेत आखला होता आणि मला येतो का? म्हणुन विचारले, मांढरदेवी राईड करण्याचा मौका मला हातातुन निसटु द्यायचा नव्हता म्हणुन मी लगेच होकार देऊन ठेवला. राईडच्या नियोजनानुसार 3 फेब्रुवारी, रविवारी भल्या पहाटे निघावे लागणार होते. हल्ली मी उजाडल्याशिवाय राईडला सुरुवात करत नाही. सुर्योदयापुर्वी झुंजुमुंजु कधी होणार हे माझ्या गार्मिनमध्ये दिसते, मी ते पाहुनच राईड सुरु करतो. नियोजित वेळेनुसार बरोबर वाजता कापुरहोळला हजर रहायचे होते. परंतु अंधारात राईड सुरु करायची नसल्यामुळे मी त्यांना म्हटले तुम्ही व्हा म्होरं.....” मी तुम्हाला गाठतो. माझ्याकडे रोडबाईक असल्यामुळे मी त्यांना गाठु शकेल असे मला वाटले होते. मी त्यांच्या वेळेपेक्षा दिड तास ऊशिरा निघालो परंतु त्यांच्यासोबतच्या रायडर्सनी एवढा उशीर केला की मी त्यांना नेकलेस पॉइंटलाच गाठले.  जाताना डॉ. विवेक ढावरे यांच्याबरोबर सायकल चालवण्याचा योग आला. कात्रज बोगद्यापर्यंत आम्ही एकत्र गप्पा मारत मारत सायकल चालवली. त्यांच्या ट्रेक रोडबाईकची ती पहीलीच राईड होती हे विशेष.

          शिवापुर तोलनाक्यावर नेहमीप्रमाणे वाहतुकीचा प्रचंड गुंता झालेला होता. तोलनाक्यावर जलद पैसे घेण्याची जलद नसल्यामुळे किंवा अपेक्षेपेक्षा जास्त वाहने आल्यामुळे (कंत्राटदाराची मज्जा) वाहतुकीची कोंडी झालेली होती. काही बिचारे कारवाले आणि काही महागडया अलिशान कारवालेही तिथे अडकुन पडलेले होते. ते कसेबसे तोलनाक्याच्या कोंडीतुन बाहेर पडले की लगेच पुढे जखमेवर मीठ चोळण्यासाठी वाहतुक पोलिस थांबलेले असतात. हल्ली या महामार्गाच्या प्रत्येक तोलनाक्यावर पोलिस दबा धरुन बसलेले असतात. नागरीकांनी नियम पाळावेत म्हणुन पोलिसांनी तसदी घेतलेली मी तरी पाहीलेली नाही. जनजागृती हा त्यांचा उद्देश कधीच नसतो. नागरीकांनी नियम मोडावेत आणि भरपुर दंडवसुली व्हावी हे त्यांचे मुख्य उद्दीष्ट असते. सीटबेल्ट लावणारे महाभाग आयतेच त्यांच्या जाळ्यात सापडतात. दंडवसुलीचे टारगेट तोलनाक्यावर थांबल्या थांबल्याच पुर्ण होत असल्यामुळे पोलिसांचा हायवेवर गस्त घालण्याचा त्रासही कमी झालेला आहे. तोलनाक्यावर पोस्टींग मिळावे म्हणुन ईतर पोलिस धडपड करत असतील का? (सहज मनात आलेला प्रश्न). तुम्ही जर या बाजुला कधी कार घेऊन आलात तर शिवापुर तोलनाका पार करताना वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करा अन्यथा दंड भरायला तयार रहा. पोलिस नुसत्या नजरेने तुम्हाला हेरतात. पोलिसांना गुंगारा द्यायचा असेल तर तोलनाक्याच्या उजव्या बाजुने बाहेर पडा कारण तोलनाक्याच्या उजवीकडुन जाणाऱ्या वाहनांना पोलिस अडवत नाहीत. तिथे काही वेळ थांबुन मी हे सर्व निरीक्षण केले आहे. आता या सर्व सुचना कारने येणाऱ्यांसाठी होत्या कारण चालवणारे सुद्धा आपलेच मित्र असतात. सायकलवाल्यांसाठी कसलेही नियम नाहीत. तोल नाही, तोलनाक्यावरचे ट्रॅफिक नाही आणि पोलिसही अडवत नाहीत. तोलनाक्यावरील गंमत बघत असताना संतोषचा फोन येऊन गेला. मी कापुरहोळला थांबुन नाष्टा करणार होतो. नाष्टा करण्यासाठी कापुरहोळ येथील हॉटेल आनंद किंवा हॉटेल जय महाराष्ट्र हि दोन अतिशय उत्तम ठिकाणे आहेत. जर तुम्हाला फास्ट फुड चालत असेल तरच. वजन कमी करण्याच्या भानगडीत पडलेल्या लोकांनी दिक्षितांच्या (आहरतज्ञ) भाषेत सांगायचे तर असा कचरा-कुचरा खाऊ नये. भजी, वडा, समोसा, पॅटीस वगैरे हे सर्व कचरा आहे हा कचरा आपण पोटात भरुन आपल्या पोटामध्ये मोठा कचरा डेपो तयार केलेला आहे. (ईति आहारतज्ञ दिक्षित).

          8 वाजुन 40 मिनिटांनी मी कापुरहोळला पोचलो. कापुरहोळ ते भोर, भोर ते मांढरदेवी बेस आणि मांढरदेवी घाट अशा तीन टप्प्यांमध्ये सायकलिंग करावयाचे होते. कापुरहोळ ते भोरपर्यंतचा रस्ता फक्त दिसायला काळा आहे. सायकल चालवण्यासाठी गुळगुळीत नाही आणि म्हणावा तेवढा रुंदही नाही. एकेक खड्डा नेम धरुन बुजवलेला असल्यामुळे त्या रस्त्यावर रम्बलर नसतानाही रम्बलरवरुन सायकल चालवत गेल्यासारखे वाटते. सर्व रस्ताच रम्बलरसारखा वाटतो. सायकलला जाणवणारी धडधड एवढी तीव्र होती की एकदा सायकलला लावलेली पाण्याची बाटली निसटुन रस्त्यावर घरंगळत गेली. भोर येथील पलंगे बिर्याणी हाऊसने माझे लक्ष वेधुन घेतले पण सकाळची वेळ असल्यामुळे तिथे काहीही तयारी नव्हती. परत येताना मी ईथे थांबायचे ठरवले होते. भोर चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मनवेधक पुतळा आहे. जेव्हा जेव्हा या मार्गाने जातो तेव्हा तेव्हा या पुतळ्याजवळ मन अडखळते आणि तिथे दोन क्षण थांबल्याशिवाय पुढे जावेसे वाटत नाही. राजे दिसावेत आणि मी आदराने झुकलो नाही असे होणे शक्यच नाही. राजास्नी मुजरा करुनच मी पुढे निघालो.

          भोरपासुन सुरुवातीचे 2-3 किमी अंतर सोडले तर घाटाचा चढ सुरु होईपर्यंतचा रस्ता उत्तम आहे. पण हेडविंड (उलटा वारा), छोटे छोटे चढ आणि जीआरएल टायर यांनी माझे सायकल चालवणे मुश्कील केले होते. रविवार आणि त्यात मांढरदेवी जत्रेचा शेवटचा दिवस असल्यामुळे मांढरदेवीला जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड होती. त्यामध्ये प्रामुख्याने कार जास्त होत्या. कारमधुन जाणाऱ्यांना सायकलवाला दिसला की हॉर्न वाजवण्याची हुक्की येते की काय कोणास ठाऊक. त्यादिवशी मी सर्व प्रकारचे हॉर्न ऐकले आणि त्या कर्कश आवाजामुळे माझे डोके दुखायला लागले होते. माझी ही अवस्था तर सायकल चालवणाऱ्या महीला दिसल्यावर हे लोक किती हॉर्न वाजवत असतील? याची कल्पना केलेलीच बरी. एक अतिऊत्साही हॉर्न वाजवणारा, त्याला तर मी हॉर्न ऐकल्यावर ट्रकवाले जसे हाताने पुढे जाण्याचा इशारा देतात तसा हाताने ओव्हरटेक करुन पुढे जा म्हणालो तर लागला दात काढायला. त्यादिवशी रस्त्यावरुन जाणाऱ्या कारची संख्या एवढी प्रचंड होती की त्या ग्रामीण भागातही मला रस्ता ओलांडण्याची पंचाईत झाली होती. हॉटेल अन्नपुर्णा येथे चहा घेण्यासाठी थांबलो तेव्हा मला रस्ता ओलांडावा लागला होता. स्लो रायडर्स पाठीमागुन येईपर्यंत मस्त विश्रांती मिळाली. वेळेचे बंधन नसेलेल्या राईडमध्ये मोठा घाट सुरु होण्याअगोदर अवश्य विश्रांती घ्यावी. सर्व सायकलपटु आल्यावर आम्ही घाट चढायला सुरुवात केली.

          हा रस्ता माझ्यासाठीच नाही तर ग्रुपमधील सर्वांसाठी नविन होता. आमच्यापैकी कोणीही या अगोदर ईकडे सायकलवर आलेले नसल्यामुळे आम्हाला चढाचा काहीच आणि कसलाही अंदाज नव्हता. घाट सुरु होताना मांढरदेवी 13 किमी लिहलेला मैलाचा दगड आहे. किमीमध्ये अंतर लिहलेल्या दगडाला अजुनही मैलाचा दगडच म्हणतात. ब्रिटीश संस्कृती अन दुसरे काय? सुरुवातीची ऊभी चढण आणि असे 13 किमी अंतर सायकल चढवायची या विचारानेच अंगावर काटा आला होता. सुरुवातीच्या त्या उभ्या चढाईवर एका लाल डब्याने शरणागती पत्करली होती. त्या एसटीला तो चढ झेपला नाही म्हणुन पुन्हा चढाई करण्यासाठी ती मागे-मागे येत होती. लाल डब्याची ही अवस्था तर सायकलवाल्यांचे काय होईल? ट्रेलर असा आहे तर सिनेमा कसा असेल? चूकीच्या ठिकाणी तर पंगा घेतला नाही ना विज्या तु? असे मी स्वत:शीच पुटपुटलो. अशा चढामुळे उतरता घाट पार करण्याचा संकल्पाबद्दल शंकेची पाल मनात चुकचुकली. पण माघार घेणे हा माझा स्वभाव नाही. “देख लेंगे..” म्हणत मी पॅडलवर पाय फिरवत राहीलो. त्या चढावर शंभर-शंभर मीटर अंतर पार झाले तरी खुप काही मिळवल्यासारखे वाटत होते. चढ मी म्हणत होता, वाहनांची गर्दी आणि कार चालवणारे मलाहो बाजुलाम्हणत होते. या कारवाल्यांना सायकलची काय अडचण होते कोणास ठाऊक? एक बहाद्दर तर हॉर्नवरचा हातच काढत नव्हता...तसाच हॉर्न वाजवत चालला होता आणि जाताना मला दाबुन गेला. एकतर त्या कर्कश हॉर्नचा त्रास आणि त्यात दाबुन गेल्यावर असे वाटले की सायकलला एखादे रॉकेट लाँचर असते तर बरे झाले असते. त्या क्षणाला जर माझ्याकडे रॉकेट लाँचर असते ना तर आईशप्पथ सांगतो...जागेवर उडवला असता मी त्याला. ठॉ करुन त्याचा कार्यक्रम उरकावा असे मनोमन वाटले होते. पण नंतर भगवंताचे स्मरण करायला लागल्यावर तो राग कुठल्या कुठे पळुन गेला. मन शांत झाले. श्रीमद भगवदगीतेते भगवंतांनी सांगितलेले अहिंसेचे महत्व आठवले.

          पायाच्या वेदना जशा जशा मेंदुकडे जायला लागल्या तसे तसे मला भगवंतांचे अधिकच स्मरण व्हायला लागले.हरी नारायण हरी चा जप सतत चालु ठेवला होता. मेंदुत पोचणाऱ्या वेदनांमुळे मला या बाह्यजगाचा पुर्णपणे विसर पडत चाललेला होता. माझा देह आणि आत्मा एका वेगळ्याच जगात जाऊन पोचले होते. लव पेन (Love the pain)” म्हणतात ते उगाच नाही. या वेदनाच मला कणखर बनवणार आहेत म्हणुन मी त्या वेदनांवर प्रेम करायला शिकलो आहे. ज्याक्षणी पॅडलवर फिरणारे पाय थांबतील त्याक्षणी त्या वेदना माझ्यापासुन दुर होतील..पण मला हे प्रेमप्रकरण ईथेच संपवायचं नव्हतं.

          या वेदनांच्या काळात मनामध्ये काय-काय विचार सुरु होतील याचा काही नेम नाही. एखादा व्हाटसअपवर आलेला जोक आठवुन माझे मलाच हसु येईल, मित्राकडुन येणे असलेले पैसे मला अशा वेळेस हमखास आठवतात (हे मी विसरण्याचा खुप प्रयत्न करतो), मला पडणारी स्वप्ने खरी होतील का? आज बायको माझ्या अवडीची भाजी करेल का? या महीन्याच्या शेवटच्या रविवारी सुट्टी देतील की कामाला बोलवतील? सचिन तेंडुलकरला मागे टाकायला विराट कोहलीला अजुन किती वर्षे लागतील? पुढच्या वर्षी इन्कम टॅक्स किती जाईल? डोंगरवाडीवर जाळे लावुन बसलेल्या पारध्याच्या जाळ्यात एखादा तरी ससा सापडला असेल का? हेल्मेट घालुन गेलो नाही तर पोलिस दंड घेतील का? असे कसल्याही विचारांचे चक्र डोक्यामध्ये सुरु होते आणि मेकॅनिकल सुंदरी बनुन मध्येच फ़ुल मेकअप केलेली एमी जॅक्सन माझ्या डोळ्यांसमोर नृत्य करु लागते. भगवंताचे स्मरण तर पार विस्मरणात जाते. जेव्हा चढाची तीव्रता वाढते तेव्हाच मला भगवंत पुन्हा आठवतात. मग बाकीचे सटरफटर विचार बंद होतात आणि मी पुन्हा तल्लिन होतो.

          सुरुवातीचा तीव्र चढ संपल्यानंतर चढाची तीव्रता हळुहळु कमी होत गेली होती. त्यानंतर पसरणी घाटात सायकल चालवतोय असे वाटायला लागले होते. या घाटात अंगावर येणारा एक हेअर-पिनही आहे. तिथे एक प्रवासी बस बंद पडलेली होती. बस तर बाहेरुन चकाचक दिसत होती पण बसचे इंजिन आतुन खंगलेले होते. ती बस म्हणजेनये पॅकेटमें पुराना मालहोता. मंकी पॉइंटला माकडांचे दर्शन झाले. आता पठारावर आल्यामुळे चढ जवळजवळ नाहीसा झालेला होता. वाईकडुन आलेला रस्ता भोरकडुन आलेल्या रस्त्याला मिळाल्यावर पोलिसांची नाकाबंदी चालु झाली होती. प्रत्येक वाहन थांबवुन प्रति व्यक्ति दोन रुपये प्रवेश फि घेतली जात होती. दोन रुपये फारच कमी वाटले मला (ईतर बाजारु देवस्थानांच्या तुलनेत). सायकलवाल्याला प्रवेश फि घेण्यासाठी कोणीही अडवले नाही. सायकलवर येण्याचा हा फायदा आहे(बघा विचार करा). आणखी काही अंतर पुढे गेल्यावर एक चढ लागला. तो चढ पार केल्यानंतर माझी सायकल मांढरदेवी पठारावर सुस्साट निघाली. मुख्य घाटातील सर्व चढ संपले होते. देवीचे मंदिर दिसु लागले होते. पार्किंगची समस्या नव्हती परंतु प्रत्येक कारवाला बेशिस्तपणे व्हिआयपी वागणुकीची अपेक्षा करत होता. या प्रकारामुळे काही ठिकाणी माझ्या सायकलचा वेग मंदावला. गाभारा दर्शन जिथुन सुरु होते तिथे पोचल्यावरच सायकलवरुन उतरलो (एवढी गर्दी असताना देखील). परंतु त्या गर्दीमुळे वेग घेता आला नाही.

          सायकलिंगचा सर्व पेहराव घातलेला असेल तर मराठी लोक कधीच मराठीत बोलत नाहीत. मी मराठी अन तोही मराठी. सायकल चालवणारे मराठी लोक नसतात किंवा मराठी माणुस काय सायकल चालवणार असे तर आपल्या लोकांना वाटत नसेल ना? कि मराठी माणसाची प्रवृत्तीच आहे हिंदीमध्ये संवाद सुरु करण्याची.. हा जास्त प्रमाणात बॉलीवुड सिनेमे बघण्याचा तर परीणाम नाही ना? मराठी माणसाने तरी संवादाची सुरुवात मराठीतुन करावी अशी अपेक्षा आहे.
एका ऊत्साही मराठी व्यक्तीबरोबर झालेला संवाद...

भैय्या, कहां से आये हो?”
From Pune”
मी पण इंग्रजीतुन सुरु झालो. पुणे हा शब्द त्याला कळला. आता पुढचा प्रश्न..
कब निकले थे?”
At the time of Sunrise ”

त्याच्या बत्त्या गुल झाल्या हे चेहऱ्याच्या हावभावावरुन जाणवले. हे काही त्याला झेपले नाही. दुसरी भाषा वापरण्याच्या हौसेला मी तिसऱ्या भाषेतुन उत्तर दिले. माझे इंग्रजी तसे मोडके तोडकेच आहे पण इंग्रजी ऐकुन दुसरे कोणी माझ्याशी बोलायला धजावले नाही. नाहीतर ट्युबलेस आहे का? गियरमुळे चढावर लई पळते का? केवढ्याची आहे? कुठुन घेतली? असल्या पकाऊ प्रश्नांना ऊत्तरे देत ऊभे रहावे लागले असते. माझ्यानंतर दहा ते बारा मिनिटांनी संतोष झेंडे आले. आम्ही दोघांनी कळसाचे दर्शन घेतले. स्मृतींचा ठेवा जपण्यासाठी भरपुर फोटो काढले. येथुन पुढे वाहने नेऊ नयेत अशी पाटी लावलेली असताना देखिल काही वाहने मंदिरापर्यंत गेलेली होती. पोलिसांना खुश केल्याशिवाय हे शक्य नाही. आम्हाला खुप भुक लागली होती परंतु नीटनेटके हॉटेल शोधण्यात बराच वेळ गेला. आम्ही हॉटेल सह्याद्रीमध्ये जेवण केले तरीही संतोषचे मित्र आले नव्हते. दोन वाजत आले होते मग मी एकटाच तिथुन परतीच्या प्रवासाला निघालो तेवढ्यात सर्व रायडर्स आले आणि मी सर्वांचा निरोप घेऊन परतीचा प्रवास सुरु केला.

          उतारावर ब्रेक दाबत दाबत रोडबाईक चालवणे खुप कष्टप्रद आहे हे मला परतीच्या प्रवासात जाणवले. घाट संपेपर्यंत दोन्ही हाताची मनगटे पार कामातुन गेली होती. ट्रॅफिकपेक्षा उताराचा त्रास जास्त जाणवला. आता याचे काय वेगळे तंत्र आहे त्याचा शोध घ्यावा लागेल. ठरल्याप्रमाणे पलंगे बिर्याणी हाऊस येथे थांबुन बिर्याणीचा आस्वाद घेतला. शिवापुर वेळू येथे प्रचंड ट्रॅफिकला सामोरे जावे लागले. जीआरएल टायर वापरल्यामुळे सायकल पंक्चर झाली नाही परंतु खुप शक्ती खर्च झाली. घर जवळ आल्यावर डिरेलरचे माऊंटींग तुटले, ते बदलायला 900 रुपये खर्च आला.    
ईति.









कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...