कुंडलिका रिवर अल्ट्रा मॅरेथॉन
स्पर्धेचे अंतर - ५१ किमी (अल्ट्रा मॅरेथॉन)
स्थळ - स्टर्लिंग नेचर ट्रेल्स कुंडलिका, कोलाड
आयोजक - रनबडीज
स्पर्धेची वेळ - हि स्पर्धा ग्रामीण भागात आयोजित केली जाते. येथील रस्त्यावर विजेचे दिवे नसल्यामुळे सुर्योदय झाल्याशिवाय स्पर्धेला सुरुवात होत नाही. सकाळी ६:०० ते दुपारी १:०० यावेळेत ५१ किमी अंतर पळायचे असते. सुर्यनारायण तळपायला लागल्यावर पळणे असह्य होऊन जाते. सकाळी नऊ वाजता ३६ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती.
अंतराची विभागणी - ५१ किमी अंतर चार फे-यांमध्ये विभागलेले आहे. पहीली फेरी २१ किमी अंतराची नंतर १० किमीच्या तीन फे-या माराव्या लागतात. ५ किमी जायचे आणि ५ किमी यायचे असे दहा किमी. पाच किमीमध्ये १ किमीचा तीव्र उतार, १ किमी तीव्र चढ आणि बाकीचे अंतर कमी जास्त चढ उतारांनी भरलेले आहे जे नक्कीच सुसह्य वाटत नाहीत. या चढांवर नुसते चालणे सुद्धा अशक्यप्राय वाटत होते.
स्पर्धेचे हवामान - अतिशय दमट हवामान, असह्य उकाडा, तीव्र चढ आणि तीव्र उतार यापैकी कोणताही एक घटक तुम्हाला स्पर्धेतुन बाहेर घालवु शकतो. कधी कधी ढग सावली घेऊन येतात तेव्हा छान वाटते. पाऊस यावा असे वाटते पण तो काही येत नाही.
बक्षिसे - विजेत्यांना फक्त ट्रॉफी दिली जाते त्यामुळे व्यवसायिक धावपटु या स्पर्धेकडे फिरकत नाहीत (रोख बक्षिसे नसल्यामुळे). या स्पर्धेत रोख बक्षिसे ठेवली जात नाहीत. त्यामुळे हौशी धावपटूंना जिंकण्याची संधी असते.
परीसर - आजुबाजुचा परीसर अतिशय निसर्गरम्य आहे. रस्त्याच्या दुतर्फा हिरव्या गवतांची झालर, स्वच्छ पाण्याने ओसंडुन वाहणारे ओढे आणि छोटे तलाव धावताना फार सुंदर दिसतात. त्यांच्याकडे पाहील्यावर पळायचे सोडुन फोटोग्राफी करावीशी वाटते. तसेच गावातील गुरे त्या अरुंद रस्त्यावर फिरायला येतात. ती तुम्हाला घाबरवण्याचे काम करतात. त्यांच्या जवळुन पळत जाताना भिती वाटते.
आयोजन/व्यवस्था - पाणी, केळी, एनर्जेल, उकडलेले बटाटे आणि पाण्याच्या बाटल्या भरपुर प्रमाणात उपलब्ध असतात. प्रत्येक दिड ते पावणे-दोन किमी अंतरावर हायड्रेशन पॉइंट ठेवलेला होता. शर्यत सुरु होण्याअगोदर मस्त झुंबा नृत्य घेण्यात आले. रन संपल्यावर नाष्ट्याला इडली ठेवलेली होती.
राहण्याची व्यवस्था - हा भाग अतिशय ग्रामीण आहे. त्यामुळे येथे राहण्यासाठी स्टर्लिंग नेचर ट्रेल्स (थ्री-स्टार हॉटेल) हा एकच पर्याय उपलब्ध आहे. स्पर्धेची सुरुवात आणि शेवट या हॉटेलच्या आवारातच होतात. प्रति व्यक्तीस १७५० रुपये दर आकारुन या हॉटेलमध्येच राहण्याची व्यवस्था केली जाते आणि माझ्या मते यामध्ये नाष्टा, चहा कॉफी, ब्रंच यांचा समावेश असावा. हे नको असेल तर मग येथुन २० किमी अंतरावर असलेल्या रोहा याठिकाणी हॉटेल उपलब्ध आहेत. मुख्य रस्त्यापासुन स्पर्धेच्या ठिकाणाकडे म्हणजे हॉटेलकडे जाणारा रस्ता अतिशय अरुंद आहे. एकावेळी दोन कार या रस्त्यावरुन ये-जा करू शकत नाहीत. चार ते पाच किमी अंतराचा अरुंद रस्ता आहे.
वेळेची मर्यादा - ५१ किमी पळण्यासाठी ७ तासांची मर्यादा आहे.
फोटो - सर्व धावपटुंचे छान छान फोटो काढले जातात. फुल साइज फोटो हवे असतील तर शुल्क आकारले जाते.
माझा विजय - कुंडलिका अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याची माझी खुप दिवसांची ईच्छा होती. त्यामुळे मी फक्त सहभाग नोंदवण्यासाठी गेलेलो होतो. हि स्पर्धा मी जिंकेन असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. रोख रकमेचे बक्षिस नसल्यामुळे वेगाने धावणारे धावपटु यात सहभागी झालेले नसावेत आणि स्पर्धेचे ठिकाण आडबाजुला असल्यामुळे इतर स्पर्धकांचा सहभागही फार कमी होता. उपलब्ध झालेल्या संधीचा पुरेपुर फायदा घेत मी प्रथम क्रमांक पटकावला. परंतु रोख रकमेचे बक्षिस नसल्यामुळे थोडा निराशही झालो. "अपनी कश्ती वहा डुबी जहा पानी कम था". ५१किमी अंतर मी ५ तास ५९ मिनिटांमध्ये पुर्ण केले आणि या कुंडलिका रीवर अल्ट्रा मॅरेथॉनचा विजेता झालो. माझ्या आयुष्यातील हा पहीलाच विजय. माझ्यासाठी हा दिवस अविस्मरणीय आहे. फिनिश लाईनजवळ विजयी ट्रॉफी स्विकारताना झालेला आनंद मी शब्दात वर्णन करु शकत नाही. क्रिकेट खेळामध्ये अनेकानेक पारितोषिके मिळवलेली आहेत परंतु मॅरेथॉनमध्ये मिळवलेले हे माझे पहीले पारितोषिक आहे आणि तेही अल्ट्रा आणि कुंडलिका सारख्या खडतर मॅरेथॉनमध्ये. म्हणुन उर्वरीत आयुष्यामध्ये या पारीतोषिकाचे खुप कौतुक असणार आहे.
मॅरेथॉनचा मार्ग - सुरुवातीचे ४०० मीटर अंतर वाढत जाणारा चढ आणि रस्ता कच्चा आहे. त्यानंतर १किमी अंतराचा भयाण उतार आहे. नंतर कमी जास्त तीव्रतेचे चढ-उतार आणि पुन्हा १ किमीचा भयाण चढ. एवढा भयाण कि त्यावर चालताना सुद्धा दोनवेळा थांबावे लागते. या पहील्या तीन किलोमीटरमध्येच "हा घ्या भाला आणि ... ... ... " अशा तीव्र भावना मनात येतात. नंतर थोडेफार चढ आहेत जे पहील्या फेरीमध्ये विशेष जाणवत नाहीत. अशा भयाण मार्गावर ४ फे-या मारावयाच्या असतात. नंतर सुर्य जसाजसा वर चढत जातो तसेतसे या मार्गावर धावणे असह्य होऊन जाते. भयाण चढ आणि दमट हवामानामुळे आवश्यक गती राखणे शक्य होत नाही यामुळे तुम्ही स्पर्धेतुन बाद होण्याची दाट शक्यता असते. अवघ्या ७ तासांच्या आत हि अल्ट्रा मॅरेथॉन पुर्ण करावयाची असल्यामुळे हि अत्यंत कठीण आहे.
Nutrition - Duringrace I used Snergy mixed with Carborance, Peanut butter and Incredible Whey before race. Steadfast Nutrition is my Nutrition Partner.