"धायरी ते दापेसर सायकल मोहीम"
धायरी ते दापेसर सायकल मोहीमेची जय्यत तयारी आठवडाभर अगोदरपासुनच सुरु होती. परफेक्ट सायकल ग्रुपसाठी विशेष टिशर्ट डिजाईन करुन घेतले होते हा त्याचाच एक भाग. टि-शर्टच्या आकारापासुन ते त्याच्या रंगसंगतीपर्यंत सर्व काही पारखुन निरखुन ठरवलेले होते. आणि यासाठी राहुल कोंढाळकरांनी घेतलेला पुढाकार वाखाणण्याजोगा होता. आदल्या दिवशी संध्याकाळी नऊ वाजता सगळया सायकलपटुंना परफेक्ट जिमजवळ बोलावुन त्यांच्या त्यांच्या साईजचे टि-शर्ट आणि टोपी प्रत्येकाला देण्यात आली. सगळेजण आवर्जुन आले होते. सकाळी सहा वाजता चव्हाण बागेत जमायचे ठरवुन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. नविन टि-शर्ट पाहुन सगळे उत्साहीत झालेले दिसत होते. परफेक्टचे सायकलपटु आता एकाच रंगात दिसणार होते.
मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे वेळेच्या अगोदरच चव्हाण बागेत पोहोचलो. सकाळी ५ वाजुन ५० मिनिटे झालेली होती. ०५:५८ ला राहुलचा फोन आला, "आवरलं का?", "मी चव्हाण बागेत येऊन थांबलोय" हे माझे उत्तर ऐकुन त्याला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. चव्हाण बागेत ६ च्या अगोदर येणारा मी एकमेव होतो. माझ्यानंतर वाघमारे सर आले, त्यानंतर हळू-हळु एकेक जण जमा होऊ लागला. युवराजने जिप्सी बाहेर काढल्यावर सगळयांनी आपापल्या सॅक त्यात ठेवुन दिल्या. धनंजयने आणलेले Gatorade नावाचे स्पोर्टमिक्स मी पहील्यांदाच पाहीले. त्याने मला आवर्जुन एक सॅचेट दिले.
मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे वेळेच्या अगोदरच चव्हाण बागेत पोहोचलो. सकाळी ५ वाजुन ५० मिनिटे झालेली होती. ०५:५८ ला राहुलचा फोन आला, "आवरलं का?", "मी चव्हाण बागेत येऊन थांबलोय" हे माझे उत्तर ऐकुन त्याला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. चव्हाण बागेत ६ च्या अगोदर येणारा मी एकमेव होतो. माझ्यानंतर वाघमारे सर आले, त्यानंतर हळू-हळु एकेक जण जमा होऊ लागला. युवराजने जिप्सी बाहेर काढल्यावर सगळयांनी आपापल्या सॅक त्यात ठेवुन दिल्या. धनंजयने आणलेले Gatorade नावाचे स्पोर्टमिक्स मी पहील्यांदाच पाहीले. त्याने मला आवर्जुन एक सॅचेट दिले.
चव्हाण बाग स. ०६ :२३ ०१-०३-२०१४. |
सायकलपटुंच्या मदतीसाठी जिप्सी. |
धायरी ते दापेसर सायकल मोहीमेत सायकलसह सहभागी झालेले सायकलपटु;
राहुल कोंढाळकर, धनंजय कोंढाळकर, विजय वसवे, दत्तात्रेय पवार, मिलींद पोकळे, संतोष चाकणकर, सचिन बेनकर, महेश कडु, सचिन ठाकरे, सागर भोईटे, सुनिल धाडवे, राहुल रायकर, विनोद डफळ, संतोष लायगुडे, वाघमारे सर ई.
सायकलपटुंच्या मदतीसाठी चार-चाकी टिम;
युवराज चव्हाण, विवेकानंद शिंदे, विजय बाबर.
सायकलींगचे टप्पे;
चव्हाण बाग ते डोणजे फाटा १० कि.मी.
डोणजे फाटा ते शांती वन ५.७ कि.मी.
शांती वन ते पानशेत १६ कि.मी.
पानशेत ते दापेसर २६ कि.मी.
अशा रितीने सर्व जय्यत तयारी करुन सायकलवाल्यांचा ताफा दापेसर कडे निघाला. पहीला टप्पा होता चव्हाणबाग ते डोणजेफाटा. सगळे ताज्या दमाचे सायकलपटु झपाझप सायकल मारत होते. किरकटवाडी, कोल्हेवाडी, खडकवासला, धरणचौपाटी, गो-हे बु. अशी मजल-दरमजल करत आम्ही डोणजेफाटा येथे पोहोचलो. सगळेजण एकमेकांशी चढाओढ करत सायकल चालवत होते. त्यामुळे आम्ही डोणजेफाटा येथे खुप कमी वेळेत पोहोचलो. तिथे चहा-नाष्टा, हसी-मजाक खुप झाला.
डोणजेफाटा येथे चहा-नाष्टा. |
तिथुन आम्ही निघालो, गो-हे ख. माताळेवाडी, खानापुर पार करत करत आम्ही शांती वनला पोहोचलो. शांती वनला विश्रांतीचा दुसरा टप्पा होता. ईथपर्यंत येईपर्यंत सायकलपटु थोडे थोडे थकत चालले होते. दमछाक आणि धाप जाणवायला लागली होती. त्यामुळे डोणजेफाटापर्यंत सर्वात मागे राहीलेलो मी शांतीवनपर्यंत पहील्या दहामध्ये आलो होतो. मी जाणुन बुजुन सायकल हळु चालवत होतो कारण अंतर खुप जास्त होते, दम राखुन ठेवणे केव्हाही उपयोगी पडणार होते.
शांतीवन खानापुर. |
शांतीवन खानापुर, मी विजय वसवे. |
पुढचा टप्पा खुप मोठा होता शांतीवन ते पानशेत. मालखेडची खिंड, मालखेड, वरदाडे, रूळे, निगडे, ओसाडे, जांभली अशी मला आठवतात तेवढी गावांची नावे ईथे देत आहे. सायकलपटुंनी कमालीचा जोश दाखवत अत्यंत उत्साहात पानशेत पर्यंत मजल मारली. निम्म्यापेक्षा जास्त अंतर पार झालेले होते. सर्वांना भुका लागलेल्या होत्या त्यामुळे नाष्टयाचे वडापाव आणि मिसळपाव सगळयांनी दाबुन दाबुन भरून घेतले. वडे एकदम गरमा-गरम होते. सगळयांनी हॉटेलमधल्या वेटरला जाम दमवला, ऑर्डर पुर्ण करताना पळुन पळुन दमला बिचारा. कुठे पाव संपायचे तर कुठे वडे कमी पडायचे तर मधेच कुणाला पाण्याची बाटली लागायची. सगळयांनी चहा-नाष्टा झाल्यावर भरपुर विश्रांती घेतली. पुढच्या टप्प्याला सुरुवात करण्याअगोदर आम्ही ग्रुप फोटो काढणार होतो. एवढी मेहनत केल्यावर फोटो तो बनता है ना... मग ग्रुप फोटो घेण्यासाठी आम्ही पानशेत शुन्य कि.मी. लिहलेला मैलाचा दगड निवडला.
पानशेत ग्रुप फोटो. |
पानशेत शून्य कि.मी. |
आमच्या ग्रुप फोटोचा क्लायमॅक्स भन्नाट जमला होता. सगळेजण सायकल घेऊन एका रांगेत थांबले होते, त्यामुळे संपुर्ण रस्ता अडवला गेला होता. रस्ता अडवुन फोटो काढण्याची सुविधा पानशेतमध्येच मिळु शकते. शहरी भागामध्ये असा विचारसुद्धा मनात आणु नका. सगळयांकडे एकाच प्रकारचा टि-शर्ट, महागडया सायकल्स, ओसंडुन वाहणारा उत्साह आणि त्याहुन हौशी फोटोग्राफर, म्हणजे मी. रस्त्याच्या बरोबर मधोमध ट्रायपॉड ठेवुन सगळया ग्रुपचा फोटो काढला, नंतर १० सेकंदांचा स्वयंचलित फोटो क्लिक सेट करुन मीसुद्धा ग्रुपबरोबर फोटोमध्ये आलो. आमचा फोटो सेशन उरकलेला होता आम्ही निघणारच होतो तेवढयात तिथे अजुन एक ग्रुप आला.
उत्साही तारूण्य. |
त्या तरूण मुला-मुलींच्या ग्रुपला आमच्या ग्रुपबरोबर फोटो घेण्याची हुक्की आली. एक धाडसी तरूणी चटकन पुढे आली आणि तिने तुमच्या सायकल ग्रुपबरोबर आमच्या ग्रुपला फोटो घ्यायचे आहेत, चालेल का? अशी विचारणा केली. कोण नाय म्हणंल? नाही म्हणायला येड लागलंय का राव... त्यांनी त्यांच्या कॅमे-यात आणि आमच्या कॅमे-यात दोन्ही ग्रुपचे एकत्र फोटो काढले. त्यांचं अॅथलिटसकडे आकर्षित होणं आवडलं मला, पण ते आकर्षण फक्त फोटो काढण्यापुरतंच नसावं. सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात शरीरस्वास्थ्य टिकवण्यासाठी व्यायाम हा केलाच पाहीजे. आमच्या ग्रुपच्या माध्यमातुन प्रेरीत होऊन त्यातल्या कुणी एकाने किंवा एकीने जरी सायकल चालवण्याचा व्यायाम सुरु केला तरी आम्हा सायकलवाल्यांना धन्यता वाटेल.
चव्हाण बागेपासुन ते पानशेत शून्य कि.मी. लिहलेल्या दगडापर्यंत जवळजवळ ३२ कि.मी. अंतर सायकलवर पार झालेले होते. आणि खरी कसोटी शेवटच्या टप्प्यात लागणार होती "पानशेत ते दापेसर २६ कि.मी." हाच तो टप्पा. पानशेत धरणाकडे डावीकडे वळल्या वळल्याच या टप्प्याने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. भरपेट नाष्टा केलेला आणि त्यात तो जीवघेणा चढ. पाठीमागुन आलेल्या शिंदेंच्या जीपला धरून चढ पार करण्याचा केविलवाणा प्रयत्नसुद्धा करुन पाहीला, पण चढ काही ऐकत नव्हता. एका हाताने जीपला धरून आणि दुस-या हाताने सायकलचा हॅंडल धरताना त्रेधातिरपीट उडायला लागली. जीपचा नाद सोडुन दिला आणि पॅडल मारायला सुरुवात केली. शक्य तेवढया कमी रोटेशनवर सेट करून सुद्धा चढ पार होईल असं वाटेना. शेवटी धरणाची भिंत जवळ आल्यावर सायकलवरून उतरलोच. गंमत म्हणजे चढावरून सायकल ढकलत नेताना सायकल चालवण्यापेक्षा जास्त त्रास होतोय असं जाणवलं. शॉर्ट कटने डायरेक्ट दापेसर रोडवर पोहोचलो. विशेष म्हणजे या मोहीमेत माझ्याकडे अत्याधुनिक सायकल नव्हतीच त्यामुळे मोठे चढ आले की मला उतरावंच लागणार होतं. धरणापासुन दापेसर रोडने थोडीच सायकल चालवली असेल तोच दुसरा चढ फणा काढुन उभा राहीला. त्याच्या फण्याला दंडवत घालुन आम्ही त्याच्या सावलीत अलगद गुडुप झालो. त्या चढावर सायकल चालवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे तर सोडाच, पण तो चढ सुरु होण्याअगोदरच आम्ही शरणागती पत्करली आणि आपापल्या सायकल ढकलत ढकलत चढ संपण्याची वाट पाहु लागलो. अपवाद फक्त धनंजय कोंढाळकर, राहुल कोंढाळकर, दत्ता पवार आणि वाघमारे सर.
हाच तो चढ जो संपता संपेना. |
चढ काही संपेना, सपाट रस्ता काही येईना. हातातली सायकल कुणीतरी घेऊन जावी आणि चढ संपल्यानंतर सपाटीला नेऊन ठेवावी, असा बालीश विचारसुद्धा मनात येऊन गेला. चढ संपलेला नव्हताच, पण एका फार्म हाऊसच्या गेटसमोर छान सावली पसरलेली होती. सावलीचा मोह सोडवता आला नाही कारण उन्हाचा दर वाढत चालला होता. सायकल्स स्टॅंडला लावुन सगळे आडवे झाले. कॅडबरी, ग्लुकॉन डी, पाण्याची बाटली जे समोर येईल ते फस्त होत होतं. युवराजची जिप्सीसुद्धा आमच्याबरोबरच येऊन थांबली. पानशेतपासुन फक्त दोन कि.मी. अंतर पार केल्यानंतर आमची ही अवस्था झाली होती. सायकल स्टॅंडला लावुन आराम करत बसलेल्या मंडळींमध्ये सायकल चालवण्याचा उत्साह संपलेला दिसत होता. त्यांच्या बोलण्यावरुन ते तिथुन पुढे सायकल चालवु शकतील असं बिल्कुल वाटत नव्हतं. तेवढ्यात ज्या फार्म हाऊसच्या गेटजवळ आम्ही बसलो होतो त्याचा सिक्युरीटी चौकशी करायला आला. यांनी उलट त्याचीच चौकशी केली, हे कोणाचे फार्म हाऊस आहे? त्याने एका वकीलाचे नाव सांगितले. गंमत म्हणजे तो वकील चांगलाच परीचयाचा निघाला, दमलेल्या सायकलपटुंनी क्षणाचाही विलंब न करता गेट उघडुन त्यांच्या सायकल्स आत नेऊन लावल्या आणि युवराजच्या जिप्सीत जाऊन बसले. अचानक लॉटरी लागल्यानंतर जसा चेहरा आनंदाने खुलतो, तसा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसु लागला. दमलेल्यांनी हा मार्ग स्विकारला ते एका दृष्टीने बरंच झालं कारण तिथुन पुढे याहीपेक्षा अवघड चढ होते.
आता फक्त मिलींद पोकळे, संतोष चाकणकर, सुनिल धाडवे, सचिन ठाकरे आणि मी (विजय वसवे) असे पाच जण उरलो. धनंजय कोंढाळकर सर्वात पुढे निघुन गेला होता, कोणत्याही चढाला न उतरता सपासप अंतर कापत त्याने दापेसर गाठलेले सुद्धा असु शकते. धनंजयच्या मागोमाग पुढे गेलेल्यांमध्ये दत्ता पवार, वाघमारे सर आणि राहुल कोंढाळकर होते. त्यांच्यात आणि आमच्यात कुठलाही संवाद नव्हता. ते कुठे पोचलेत? किंवा कुठे थांबलेत? कशाचाही थांगपत्ता नव्हता.
त्या वकीलांच्या फार्म हाऊसपासुन आम्ही पाच जण निघालो. पुढे गेल्यावर सचिन ठाकरे आम्हाला मागे टाकत पुढे निघुन गेले. माझ्या जोडीला सुनिल धाडवे होते. आणि आमच्या मागे संतोष चाकणकर आणि मिलींद पोकळे. काहीही झाले तरी ठरवलेला टप्पा सायकलवरून पार करायचाच असा दृढनिश्चय करुन आम्ही हळु-हळु अंतर कापत होतो.
एक मस्त उतार आला, त्या उतारावरून सायकल चालवताना आनंदाला पारावार उरला नाही. सगळा प्रवास या अशाच उतारावरून झाला तर काय मज्जा येईल राव? असे म्हणुन होत नाही तोच तेवढाच मोठा चढ समोर उभा राहीला. उतारावरून सायकल चालवण्याचा आनंद कुठल्या कुठे गायब झाला होता. निम्मा चढ सायकलवर, आणि निम्मा चढ सायकल घेऊन चालत पार केला. चढ संपल्यावर थोडी सपाटी लागली. आणि पुन्हा तीव्र उतार आला, पण यावेळेस आनंदी व्हायची भिती वाटली. ती अगदी योग्यच होती कारण लगेच पुढे तेवढयाच तीव्रतेचा चढ आला.
कात्रज-सिंहगड ट्रेकला जसे उतार चढ आहेत त्याचप्रमाणे दापेसरला जाताना आहेत. तेवढेच तीव्र, तेवढीच दमछाक करणारे. आम्ही सह्याद्रीमध्ये सायकल चालवत होतो. उन्हाचा जोर वाढलेला होता.
तरीसुद्धा आम्ही मागे हटलो नव्हतो. शेवटचे दहा कि.मी. आमच्याकडचे पाणीसुद्धा संपले होते.
पानशेत पाणीसंचय |
शिंदेंचे विशेष कौतुक करावंसं वाटतंय कारण ते शेवटचे ५ कि.मी. पर्यंत जीप घेऊन आमच्यासाठी थांबले होते. जीपमधले पाणीसुद्धा संपले होते. ते जीप घेऊन राहुलच्या फार्म हाऊसवर गेले आणि आमच्यासाठी पाणी, लिबु सरबत आणि कॅडबरी जीपमध्ये पाठवुन दिली. पाण्याविना चक्कर येण्याच्या अवस्थेला मी पोहोचलो होतो. सावली बघुन अक्षरश: आडवा झालो. विश्रांती घेतल्यावर थोडासा ताजातवाना झालो. राहीलेले अंतर पार करण्याचा आत्मविश्वास आल्यावर निघायचे ठरवले, तोच शिंदेंची जीप रसद घेऊन आली. एक कॅडबरी अघाश्यासारखी फस्त केली आणि जवळजवळ ५०० मि,ली. लिंबु सरबत घशाखाली उतरवल्यावर अंगात शक्ती संचारली. अजुन दहा कि.मी. जाता येईल एवढी उर्जा आता माझ्या शरीरात आली होती. पण नशिबाने फक्त अर्धा कि.मी. राहीला होता. अर्ध्या कि.मी. चे अंतर मी शक्य तेवढया लवकर पार करत राहुलच्या फार्म हाऊसवर पोहोचलो.
टाळयांच्या गजरात झालेल्या स्वागताने थकवा कुठल्या कुठे पळुन गेला. शेवटचे १२ कि.मी. अंतर पार करताना शारीरीक क्षमतेची कसोटी लागली होती. भर ऊन्हात पाण्याविना चालवलेली सायकल बरंच काही शिकवुन गेली. असा हा चव्हाण बाग ते दापेसर दरम्यानचा ५८ कि.मी. चा सायकल प्रवास ज्यात सह्याद्रीचाही समावेश आहे, केवळ अविस्मरणीय.
डावीकडुन संतोष चाकणकर, मिलींद पोकळे, सुनिल धाडवे आणि मी. |
जाता जाता. |
गोंडेखल येथे |
धायरी ते दापेसर अंतर सायकलवर पार करणारे सायकलपटु;
धनंजय कोंढाळकर, वाघमारे, दत्तात्रेय पवार, राहुल कोंढाळकर, सचिन ठाकरे, विजय वसवे, मिलींद पोकळे, संतोष चाकणकर आणि सुनिल धाडवे.
लिखाणाची आणि वाचनाची लांबड टाळण्यासाठी परतीच्या प्रवासाची दुसरी पोस्ट लिहणार आहे..
No comments:
Post a Comment