Monday 12 November 2018

पंढरपुर सायकलवारी (आयसीसी )

सायकलवारी भाग-१

            माझ्या आयुष्यात मी एकदाही पंढरपुरला गेलेलो नव्हतो. आहे की नाही कमाल? केवढा हा करंटेपणा! जे प्रत्यक्ष भुलोकीचे वैकुंठ, जिथे साक्षात परब्रम्ह, परमेश्वर, वासुदेव श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रुपात कमरेवर हात ठेवुन ऊभे आहेत त्यांच्या चरणावर माथा टेकवण्यासाठी मी अजुनही गेलेलो नव्हतो. याची खंत तर वाटणारच. खंत काय एखादे शल्य बोचत असल्यासारखे वाटायचे. मागच्या जन्मीची पापे याला कारणीभुत असावीत त्यामुळेच पांडुरंगाच्या भेटीला एवढा ऊशिर झाला. ज्या भुमी प्रदेशात जन्म होतो, तेथील राजा, तेथुन वाहणारी नदी आणि त्या प्रदेशाच्या सर्वात जवळ असणारे तिर्थक्षेत्र यांना मनुष्य जन्मामध्ये अनन्यसाधारण महत्व असते. सर्वात जवळचे तिर्थक्षेत्र पंढरपुर आणि कमरेवर हात ठेऊन ऊभा असलेला श्रीहरी पांडुरंग माझे दैवत आणि आपणा सर्वांची माऊली. हिच माऊली दक्षिणेत श्री बालाजी, पुर्वेस श्री जगन्नाथ, उत्तरेत स्वत: बांकेबिहारी श्रीकृष्ण आणि पश्चिमेस श्रीनाथजी बनुन युगानुयुगे ईतर भक्तांनाही दर्शन देत आहे. हजारो वर्षांपासुन त्या त्या प्रदेशातील लोक भगवंतांच्या विवीध रुपांचे दर्शन घेत आहेत. आपली वारी आणि पालखी त्याच परंपरेचा एक भाग. हल्ली दळणवळणाची साधने एवढी प्रगत झाली आहेत की आपण भगवंतांच्या सर्व प्रदेशातील या सर्व रुपांचे दर्शन  अल्प कालावधीत घेऊ शकतो. पुर्वीसारखा पायी प्रवास किंवा बैलगाडीत जाण्याची आवश्यकता राहीलेली नाही. परंतु आपल्या ईथे अजुनही संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पादुका बैलगाडीतुन पंढरपुरला नेण्याची परंपरा अखंडपणे जोपासलेली आहे नाहीतर आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु संत तुकारामांच्या पादुका हेलिकॉप्टरमधुन पंढरपुरला नेऊन दुपारपर्यंत पुन्हा त्यांच्या जागेवर आणुन ठेवता येतील. हो, हे शक्य आहे. म्हणजे दळणवळणाच्या साधनांचा फायदाच जर घ्यायचा असेल तर आपण असे करु शकतो पण असे करण्यात काहीही अर्थ नाही. मग पालखी, वारी, दिंडी याला काहीही अर्थ उरणार नाही. भक्तांना पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरला चालत जाताना ज्या दिव्य आनंदाची अनुभुती होते ती होणार नाही. वारीचा आत्माच हरवुन जाईल.
            अलिकडच्या काळात सायकलच्या तंत्रज्ञानातही बरीच प्रगती झालेली आहे. कमी वेळात लांब पल्ल्याचे अंतर कापणे शक्य झालेले आहे. कमी वेळात म्हणजे सकाळी पुण्यातुन निघाल्यावर संध्याकाळी पंढरपुरमध्ये पोचणे. सायकलवर पंढरपुरला जाणे म्हणजेच सायकलवारी. तर अशी हि आमची सायकलवारी विठुरायाच्या पंढरीचा महीमा अनुभवण्यासाठी ७ जुलैला रवाना होणार होती. पंढरपुरला गेल्याशिवाय या मनुष्यजन्माला अर्थही नाही आणि गतीही नाही.

     

सायकलवारी भाग-


        इंडो सायक्लिस्ट क्लबने पंढरपुरला जाणारी ही अनोखी सायकलवारी आयोजित केली होती. आयसीसी म्हणजे पर्यावरणाची काळजी घेण्याचा वसा घेतलेली माणसे. सायकलिंग आणि रनिंग या खेळांचा जास्तीत जास्त आनंद घेता यावा म्हणुन वर्षभर आयसीसी अनेक स्पर्धांचे आयोजन करत असते तेही पाश्चिमात्य विचारांचे घोंगडे पांघरता हे विशेष. इतर व्यवसायिक संस्थांप्रमाणे नफा कमावणे हा यांचा उद्देश अजिबात नसतो. समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींना एकत्र सामावुन घेत अतिशय सुंदर आयोजन करत असतात हा माझा अनुभ आहे. या आयसीसी परीवाराचा मी सुद्धा एक भाग आहे हे मी माझे भाग्य समजतो.
शनिवार जुलै रोजी सायकलने पंढरपुरला जायचे होते आणि या आठवडयाच्या सुरुवातीपासुनच पुण्यामध्ये पाऊस शिंतोडे उडवत होता, हो म्हणजे रस्ता ओला करणे वगैरे. अगदीच मुसळधार नाही पण सायकल चालवली तर पाठीवर नक्षी येण्याईतपत तर नक्कीच रीपरीप चालु होती आणि पुन्हा सायकल पाण्याने भिजणार तसेच चिखलाने माखणार ते वेगळेच. पाऊस नको पडु दे असे म्हणण्याचा दुष्टपणा मी पहील्यांदा माझ्या आयुष्यात केला असेल पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. माझ्या म्हणण्याला विचारतो कोण? रस्ता ओला होता, आभाळाकडे नजर टाकल्यावर पावसाची दाट शक्यता जाणवत होती म्हणुन मी रोडबाईक घरीच ठेवुन हायब्रीडने पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला. एकच उद्देश की रोडबाईकला पावसाच्या पाण्याचा एक थेंबही लागता कामा नये. हायब्रीड म्हणजे माझी ट्रेक जिच्या सोबत मी अनेक मोठमोठ्या राईडस केल्या, जिच्यावर स्वार होऊन मी अटकेपार झेंडे फडकवले ती माझी लाडकी ट्रेक. ती सध्या काय करते? विकायची आहे का? असे प्रश्न बरेचजण विचारतात. जीवापाड प्रेम करतो मी तिच्यावर आणि आजपर्यंत तिने माझी साथ कधीही सोडली नाही. तिला विकणे शक्य नाही. आणि सध्या ती होम ट्रेनरवर असते. ट्रेनरवरुन खाली घेतानाच ती कुरकुरायला लागली होती, "आता कशी माझी गरज लागली हं? त्या चिकनीला काय झाले? एवढीशी रीपरीप सोसत नाही का तिला?" रोडबाईकवरची सर्व भडास तिने दोन-तीन वाक्यात बाहेर काढली. कशीबशी तिची समजुत काढु लागलो आणि शेवटी लब्यु म्हटल्यावरच यायला तयार झाली. तरीपण जीआरएलचे टायर नकोच म्हणत होती, मला वेगात पळता येणार नाही असे तिचे म्हणणे होते. पण माझ्याकडे टायर बदलायला वेळच नव्हता.
सौ. ने नेहमीप्रमाणे भल्या पहाटे ऊठुन सर्व तयारी करुन दिली आणि आंघोळ करता जातात का पांडुरंगाच्या दर्शनाला? असे धमकावत भल्या पहाटे आंघोळही करायला लावली. या धमकावण्यात पण एक गोडवा असतो. पहाटे साडेचारला मी घर सोडले आणि पाच वाजुन पाच मिनिटांनी हडपसरला फ्लॅग ऑफच्या ठिकाणावर पोचलो. माझ्याअगोदर तिथे बरेच सायकलवारी हजर झालेले होते. सर्वांना भेटलो गप्पाटप्पा झाल्या. निगडीवरून आलेल्यांच्या सायकलला भगवा झेंडा पाहील्यावर कधी एकदा माझ्या सायकलला भगवा लावतोय असे झाले होते. भगवा दिसला की एक वेगळाच ऊत्साह अंगात संचारतो. ऊत्साह तर सर्वांच्याच अंगात संचारलेला होता. पाठीवरची सॅक ट्रकमध्ये फेकली (सॅकला माझे नाव असलेली पाटी लावली) आणि पॅडलवर पाय ठेवुन आमच्या ग्रूपच्या फ्लॅग ऑफची वाट पाहु लागलो. मी एच ग्रूपमध्ये होतो आणि गिरीश कुलकर्णी आमचे लिडर होते. H-284 माझा बिब नंबर. फ्लॅग ऑफ झाल्या झाल्या मी सुसाट निघालो. वाऱ्याच्या तालावर जो वेग मिळत होता ना.. अहाहा.. काय सांगु... मी तरंगतच लोणी काळभोरला पोचलो.



सायकलवारी भाग-


            हडपसरमधुन ऊशिरा सुरुवात केल्यामुळे बरेचसे शहामृग प्रकारातले सायक्लिस्ट फार पुढे गेलेले होते. त्यांना पकडता पकडता नाकी नऊ आले. टेलविंड मस्त वाहत होता.  म्हणजे पाठीमागुन वाहणारा वारा. त्याच्यामुळे सायकल जरा जास्तच जोरात पळत होती. आता मला शेपूट नसतानाही या पार्श्वभागाकडुन वाहणा-या वा-याला टेलविंड का म्हणायचं हा मला पडलेला प्रश्न. काहीही असो तो बेभान टेलविंड मला फार आवडला. त्याच्यामुळे जीपीएसमध्ये दिसणारा स्पीड सहजपणे ३५ च्या वर जात होता. जीआरएल टायर म्हणजे रोलिंग वगैरे त्याच्या गावातही नाही, ज्याचा स्वभावच दगडाचा आहे त्याच्याकडुन रोलिंगची अपेक्षा कशी ठेवायची? असे असुनही सोलापुर हायवेवर सायकलला मिळणारा वेग थक्क करणारा होता. या टेलविंडच्या कुबडया घेऊन सोलापुर रोडवर सायकल चालवण्याचा सराव केला तर मी फार वेगात सायकल चालवतो असा भ्रमाचा भोपळा तयार व्हायला वेळ लागणार नाही. कवडीपाट, लोणी, थेऊरफाटा, कुंजीरवाडी ही सर्व मित्रांची गावे. कॉलेजात असताना या मित्रांकडे ब-याचदा येणे-जाणे असायचे तसेच मुक्कामही असायचा. सध्या आम्ही सगळे सोशल मिडीयावर एका ग्रुपमध्ये बंदिस्त आहोत. भेट नाही, संवाद नाही फक्त व्हाटसअपवरचा कचरा ईकडचा तिकडे करत असतो. मी सोलापुर रोडने चाललोय याची कोणाला खबर लागु दिलेली नव्हती. नाहीतर यांनी विजयभाऊंचे स्वागत करण्यासाठी तोलनाक्यावरच राडा केला असता. एनर्जी ड्रिंक म्हणुन व्हिस्की घेऊन आले असते आणि जाता जाता एक नायंटी तरी घेऊन जा अशी गळ घातली असती. आषाढी एकादशी यांच्यासाठी तोंड दाबुन बुक्क्यांचा मार असतो कारण सर्वांचा उपवास आणि सगळीकडेच फराळाचे पदार्थ केलेले असतात म्हणुन. आणि मी वर्षातील सर्व एकादशी करणारा, महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये १४१व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने सम्राट युधिष्ठीराला एकादशीच्या व्रताचे जे नियम सांगितले आहेत ते सर्व जसेच्या तसे पाळणारा. आता मित्रच आपले असे आहेत तर काय करणार. जाऊ द्या सध्या हा विषय नको. पार्टीच्या वेळी पार्टी, सायकलिंगच्या वेळी सायकलिंग आणि भक्तीमार्गाच्या वेळी फक्त भक्तीमार्ग. एकावेळी एकच नशा करावी आणि सायकलिंग ही माझ्यासाठी एक नशाच आहे. किंबहुना त्याहुनही जास्तच. यातसुद्धा ९०किमी, १८०किमी हे आकडे असतात. पण आकडे जरी तेच असले तरी यातुन मिळणारी नशा मात्र वेगळी.

            वा-यावर स्वार होऊन चाललेलो असताना मला संतोष झेंडे भेटला (सासवडचा पीटर सॅगन). आम्ही एकत्रच कामाला आहोत. संतोष आणि डॉ. अक्षय गप्पा मारत चालले होते. त्यालाही मी वा-यावर स्वार व्हायला लावले आणि आम्ही दोघे हवेशी गप्पा मारत चौफुल्याला पोचलो. येथे सर्वांसाठी नाष्ट्याची सोय करण्यात आलेली होती. सदगुरु वडापाव सेंटरवर गरम गरम वडापावचा आस्वाद घेतला. जम्बो बटाटावडा काय असतो हे मला तो वडा पाहील्यावर समजले. एका वडयाबरोबर दोन पाव खाल्ले तरीही वडा शिल्लक राहीला होता. जर तुम्ही सोलापुर रोडने जाणार असाल तर वडापाव खाण्यासाठी ईथे अवश्य थांबावे असे हे हॉटेल आहे. ज्याला वडापाव आवडतो तो ईथे थांबणारच. चौफुल्याला तोरणा मिसळच्या अगदी जवळ आहे. आयसीसीच्या प्रत्येक राईडमध्ये स्वयंसेवकाची भुमिका बजावणारी रुतुजा यावेळेसही स्वयंसेवक म्हणुन हजर होती. तिने मला दोन चिक्क्यांची पाकीटे दिली ती मी जर्सीच्या मागच्या खिशात ठेवली. आयसीसीकडुन या पंढरपुर सायकलवारीसाठी जी जर्सी देण्यात आली होती तिला पाठीमागच्या बाजुस भलेमोठे ३ खिसे होते जे मला खुप आवडले. यावरुन ओळखायचे की ही जर्सी सायकल चालवणा-यानेच बनवलेली आहे आणि आयसीसीमध्ये सायकल चालवत नाही असा एकही सापडणार नाही.

            नाष्टा झाल्यावर सासवडच्या पीटर सॅगनने मला गुल्ल्या दिला म्हणजे कुठे गायब झाला काय माहीत. अद्वैत खटावकर मोठया जाड टायरची एमटीबी घेऊन आला होता. एवढा मोठा ट्रक का घेऊन आलास? असे मी त्याला विचारले सुद्धा. आतापर्यंत ६५ किमी अंतर पार झालेले होते. आता पुढचा थांबा हॉटेल माऊलीप्रसाद, अकलुजफाटा. ते अंतर जवळजवळ ८० किमी होते. आज वा-याशी युती झालेली असल्यामुळे मी कोणत्याही अंतराला घाबरत नव्हतो. पण हाच वारा उद्या जेव्हा विरोधी पक्षात ऊभा राहील तेव्हा आमची चांगलीच दाणादाण उडवणार हेही मला चांगलेच ठाऊक होते कारण मी एकदा याच्या विरोधी पक्षात जाण्याने काय वाट लागते याचा अनुभव घेतलेला आहे. चौफुल्यापासुन मी जे सुसाट सुटलो ते थेट पळसदेवाचे अर्धवट पाण्यात बुडालेले मंदिर दिसल्यावरच थांबलो. थोडा दम घेतला, पाणी प्यायलो आणि फोटो तसेच व्हिडीओ काढुन सोशल मिडीयावर अपलोड केले. सायकलचे फोटो सोशल मिडीयावर टाकल्याशिवाय मला चैन पडत नाही. सायकल म्हणजे मेरे दिल का चैन आहे, "ओ मेरे....दिल के चैन...." अशी गाणीही गुणगुणतो मी तिच्यासाठी. "सायकलसे प्यार करो, दिल टुटेगा नहीं..ये गॅरंटी होती है" एकवेळ बायको सुद्धा काहीतरी कुरबुर काढुन भांडण करेल पण सायकल असे काहीही करत नाही म्हणुन सायकलवर प्रेम करा. मी तर माझ्या सायकलवर जीवापाड प्रेम करतो.

            बरोबर ११ वाजुन ८ मिनिटांनी अकलुज फाटयावरील माऊलीप्रसाद हॉटेलवर पोचलो. हायवेवर मुख्य चौकात मोठा भगवा झेंडा लावलेला होता तिथुनच उजवीकडे वळाल्यावर माऊलीप्रसाद हॉटेल होते. सायकल चालवणारे एवढ्या लवकर ईथे पोचतील अशी त्यांनी अपेक्षाच केलेली नव्हती. त्यांची काहीच तयारी नव्हती. तोपर्यंत रुतुजाने माझे छान फोटोशुट करुन दिले. थोड्यावेळाने जेवणाची तयारी झाल्यावर डाळ-भातावर आडवा हात मारला आणि मित्रांची वाट पाहत थांबलो.



सायकलवारी भाग-४


            सर्व सायकलवारक-यांची वाट पाहत मी तिथेच थांबलो. जे माझ्याकडुन प्रेरणा घेतात आणि मला जे प्रेरणा देतात अशा सर्वांची भेट घेतल्यानंतरच पुढे जायचे असे मी ठरवले होते. सायकलमुळे माझ्या आयुष्यात आलेली ही माणसे अतिशय अनमोल आहेत. सोशल मिडीयावर लाईक आणि कॉमेंटस करतच असतात पण प्रत्यक्ष भेट ही प्रत्यक्ष भेटच असते. जवळजवळ तीन तास माऊलीप्रसाद हॉटेलवर घालवल्यानंतर मी पंढरपुरकडे जाण्यासाठी सज्ज झालो. काही सायकलवारकरी ईंदापुरमध्ये जाऊन टेंभुर्णीकडे वळाले तर माझ्यासारखे आळशी सायकलपटु ज्यांना गुगल मॅप बघण्याचा कंटाळा येतो ते बायपास रस्त्याने सरळ पुढे निघाले. मोबाईलमध्ये गुगल मॅप दिलाय तो फक्त फॅशन म्हणुन...! 
            अंदाजे ७० किमी अंतर शिल्लक राहीलेले होते. आता पुढचा हायड्रेशन पॉइंट होता टेंभुर्णी. तेथे पाणी आणि केळी मुबलक प्रमाणात उपलब्ध होती. आता येथुन विठुरायाची पंढरी अवघी ४५ किमी राहीली होती. आता आम्ही हायवेवरुन एका सामान्य रोडवर सायकल चालवत होतो. मला असे झाले होते की कधी एकदा पंढरपुर येतेय. कधी एकदा भीमा नदी पाहतोय. पांडुरंगाच्या मंदिराचा कळस बघण्यासाठी डोळे आतुरले होते. मला दर्शन मिळेल की नाही? की बाहेरुनच दंडवत घालावा लागेल? दर्शनाच्या रांगेत थांबलो तर किती वेळ लागेल? पायांना आराम मिळेल का? रांगेत थांबुन पाय थकतील, उद्या पुन्हा सायकल चालवायची आहे, कसे होईल? एवढया लांब सायकल चालवत येऊन विठ्ठलाचे दर्शन मिळाले नाही तर काय उपयोग? छे काहीच अर्थ नाही. काहीही होवो मी दर्शन घेणारच असे मी मनोमन ठरवले. पांडुरंगा, तुझ्या दर्शनासाठी काय पण... वाट्टेल ते करायचे पण दर्शन घ्यायचेच. पहाटे ३ वाजता दर्शनासाठी गेलो तर सकाळी ६ वाजेपर्यंत नक्की दर्शन मिळेल आणि सर्वांसोबत परतीची राईड सुरु करायला वेळेत परत येता येईल. अशी एक धाडसी योजना मनात आखुन ठेवली होती.             

पंढरपुर रस्त्यावर सायकल चालवायला लागल्यावर मी कुठे चाललोय हे सांगायची गरज लागली नाही. सायकलचा भगवा झेंडा सारं काही सांगुन जात होता आणि पंढरपुर जसेजसे जवळ यायला लागले तशी त्याची सोनेरी किनार आणखीनच चमकायला लागलेली होती. आपली मराठी भाषा वळवेल तशी वळते. मी कुठुन आलो? हा प्रश्न ब-याच जणांच्या मेंदुतील वळवळ वाढवत होता. जाऊ दे आपल्याला काय करायचंय म्हणुन पुढे निघुन जाणारे होते तसे हटकुन गाडी सायकलबरोबर घेऊन "कुठुन आला?" विचारणारे सुद्धा होते. पुणे ऐकल्यावर अविश्वासात्मक आश्चर्याने पुढचा प्रश्न विचारला जायचा, "कधी हलला होता?" हा प्रश्न मला कळायचाच नाही मी म्हणायचो,"हे काय अजुनही हलतोय, हलल्याशिवाय सायकल कशी चालेल?" प्रश्न विचारणारा अजुनच बुचकळ्यात पडत असे. त्यानी काय विचारले ते मला कळले नाही आणि मी काय सांगितले ते त्याला कळले नाही. पण नंतर मीच ओळखले कधी हलला म्हणजे तिकडुन सुरुवात कधी केली.             

रस्त्यावरच्या धडधडीने मागच्या चाकाचे मडगार्ड खिळखिळे झाले. तो खराब रस्ता पाहुन असे वाटले की अकलुजमार्गे गेलो असतो तर बरे झाले असते त्याबाजुने गेलो असतो तरीही अंतर तेवढेच होते. रस्ता खराब आणि काही ठिकाणी रस्त्याचे काम चालु होते. धडधडीला कंटाळुन एका ठिकाणी फोटो काढायला थांबलो. तहान सुद्धा लागलेली होती. पंढरपुर १५ किमीची पाटी होती. पाणी पिऊन बाटली ठेवेपर्यंत रस्त्याच्या पलीकडुन एक व्यक्ती माझ्याकडे चालत आला. कुठुन आला विचारले आणि म्हणाला चला चहा घेऊ. पांडुरंगाची ईच्छा समजुन मी सुद्धा त्याच्या सोबत गेलो. छोटेसे हॉटेल होते. चहावाल्याला त्याने माझ्यासाठी सर्वात भारी चहा द्यायला सांगितला. तोपर्यंत ७ ते ८ लोकांनी मला आणि माझ्या सायकलला गराडा घातला आणि जी प्रश्नांची सरबत्ती चालु केली ती विचारायची सोय नाही. हे काय, ते काय, केवढ्याची, कधी घेतली, किती वर्षे झाली, किती गियर, गियरमुळे चढावर पळते का, वजनाला एवढी हलकी कशी काय??..... असे अनेकानेक आणि काहीजण तर वाट्टेल ते प्रश्न विचारत होते. एका कपभर चहाच्या बदल्यात एवढे प्रश्न? माझ्या या वाक्याने पण खुप मोठा हशा झाला. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा यथामती प्रयत्न केला आणि जाता जाता मी त्यांना एकच प्रश्न विचारला, "पांडुरंगाचे दर्शन मिळेल का आज?" सर्वजण म्हणाले ...मिळणार तुम्हाला, एवढी सायकल चालवत आल्यावर का नाही मिळणार? "रामकृष्ण हरी" म्हणुन मी त्यांचा निरोप घेतला. पुढे रस्त्याचे काम चालु असल्यामुळे थोड्या हालअपेष्टा झाल्या. पंढरपुरात पोचल्यावर थोडी शोधाशोध केल्यानंतर गजानन महाराज मठ सापडला. राहण्याची उत्तम व्यवस्था होती. तसेच जेवणही अल्प दरात उपलब्ध होते. आंघोळ केल्यानंतर पहीले जेवण उरकुन घेतले. आधी पोटोबा आणि मग विठोबा म्हणतात ते काही खोटे नाही. पण माझ्या विठुराया !! समजुन घे रे, एवढया लांबुन सायकल चालवत आल्यावर भुक तर लागणारच ना... पंढरपुरात बऱ्याच जणांचा सत्कार करण्यात आला. मी या गोष्टींपासुन जेवढे लांब राहता येईल तेवढे लांब राहतो.             


सर्व सायकलवारकरी एकत्र जमल्यावर एक अतिशय गोड घोषणा करण्यात आली, "सायकलवर आलेल्या सर्वांना थेट दर्शन मिळण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तरी सर्वांनी ९ वाजता तयार रहावे" अहाहा ... आनंद काय वर्णु मी.. ही घोषणा ऐकुन माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. बरोबर नऊ वाजता सर्व जमलो आणि विठ्ठल मंदिराच्या पश्चिम द्वाराजवळ पोचलो. सर्वसामान्य रांगेतील भक्तांना थांबवण्यात आले आणि आम्हाला एखाद्या व्हीआयपीसारखा रांगेच्या मधोमध प्रवेश मिळाला. थेट दर्शन म्हणतात याला. मला एकदम अपराध्यासारखं वाटायला लागले. त्या सर्वसामान्य रांगेत मी असतो आणि असा कोणी व्हीआयपी मधे घुसला असता  तर मी काय प्रतिक्रिया दिली असती हे माझे जीवश्च कंठश्च मित्र लगेच ओळखतील. 


पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अलिकडे एका स्तंभावर गरूडाची चांदीची प्रतिमा दिसली, त्या स्तंभाला दोन्ही हाताने घट्ट मिठी मारली आणि म्हणालो, "हे विनतापुत्र गरूड, जेव्हा मी हा देह सोडण्याची वेळ जवळ येईल तेव्हा कृपया आपल्या प्रभुंना तुझ्या पाठीवर घेऊन मला घ्यायला येण्याची कृपा कर, पंढरीत आलो आता मला यमाचे भय नाही परंतु तरीसुद्धा मला त्या यमाची फार भिती वाटते. कारण तो त्रैलोक्यातील असा गुंडा आहे जो स्वतःच्या बापालाही घाबरत नाही" गरूड प्रार्थना झाल्यावर मी हनुमानाचा शोध घेऊ लागलो. हे प्रभु, तुमचा लाडका हनुमान कुठाय? तुमच्या समोर, तुमच्या आजुबाजुला कुठेच दिसत नाहीये, हनुमान नाही असे कसे प्रभु? ज्या हनुमानाच्या हनुमतीय पद्धतीचा हे वारकरी अनुसरण करतात तो हनुमान पंढरपुरात नाही?"
पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर तर मला करमेना... हनुमान हनुमान करत मी मंदीराभोवती फिरत होतो आणि तेवढ्यात माझी नजर हनुमानावर गेली. जय श्रीराम म्हणत हनुमानाचा चरणस्पर्श केल्यावरच पांडुरंगाचे दर्शन घेतल्याचे समाधान मिळाले. माता रुख्मिणी, देवी सत्यभामा तसेच  राधारणीचे दर्शन घेतल्यावर पश्चिम द्वारातुनच बाहेर  आलो.

दर्शन करून बाहेर आल्यावर सर्वांनी एकमेकांचे कुशलक्षेम विचारले. जवळजवळ सर्वांनाच सायकलच्या सीटचा  भयंकर त्रास झालेला जाणवत होता. सॅडल सोअर म्हणजे सायकलच्या सीटचा आंबट शौकीनपणा काय असतो ते सर्वांकडे पाहील्यावर जाणवत होते. आम्ही एकमेकांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. झोपण्याअगोदर सर्वांनी आपापल्या चड्डीमध्ये तेल आणि व्हॅसलिन थापुन घेतले. आज तर सोप्पा पेपर होता पण खरी परीक्षा तर उद्याच होती. ज्यांनी फक्त एका बाजुची राईड निवडली ते सुटले होते. मलाही वाटलं की फक्त एका बाजुची राईड निवडली असती तर फार बरे झाले असते. कधीकधी नको तिथे शौर्य दाखवण्याची खुजली माझी वाट लावते, याचे काय करावे तेच कळत नाही मला. एवढा दमलो होतो तरीपण फेसबुक आणि व्हाटसअपवर बराच वेळ घालवला, या सोशल मिडीया दुखण्याचे एक काय करावे ते एक कळत नाही. मोबाईलची स्क्रीन बंद केल्यानंतर कधी डोळा लागला ते कळलेसुद्धा नाही. 
क्रमशः 
जय हरी विठ्ठल 🙏 
- विजय वसवे 




- लोकांना स्पष्टीकरण द्यावे लागत नाही कुठे सायकल चालवली, पंढरीला गेलो होतो सांगितले की विषय संपला.. :D  



















































































No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...