Thursday 27 June 2019

पंढरपुर सायकलवारी वर्ष दुसरे

      या टुर दि वारी सायकल प्रवासाचे वर्णन बऱ्याच जणांनी केलेलेच आहे मी वेगळे काय ते सांगणार म्हणून मी हा विषय थोडा अध्यात्माकडे घेऊन जात आहे. पांडुरंग, विठ्ठल, पंढरी, हरीनाम, गीता, ज्ञानेश्वरी आणि सायकल म्हटल्यावर जोडीला अध्यात्मही हवेच नाही का? ज्ञानेश्वरी, भगवद्गीता आणि पांडुरंग यांच्यात तुम्हाला रूची असेल तरच पुढे वाचायला तुम्हाला आवडेल नाहीतर हा विषय तुमच्या मेंदुच्या दहा किमी वरून जाऊ शकतो. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे,
"आंधळीया हाती दिले जैसे मोती वाया जाय" 

आंधळ्याच्या हातात दगड, मोती, हिरे जरी दिले तरी त्याला त्यांचे मुल्य ओळखता येत नाही. त्याच्या लेखी सर्व एकसमान असतात.
     या मनुष्य जन्माचे मुल्य ज्याला कळले नाही तो आंधळाच होय. मनुष्य जन्माला येऊन जो पांडुरंगाचे नाम घेत नाही पंढरपुरास जात नाही तो शिंगे आणि शेपूट नसलेला पशूच होय.
    आयुष्य जसेजसे पुढे पुढे सरकत चालले आहे तसातसा त्याच्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बदलत चाललेला आहे. चाळीशी ओलांडुन आता पन्नाशीकडे धाव घेतलेले आयुष्य म्हणजे एखाद्या तीव्र उतारावर सोडलेली सायकलच जणु. एकवेळ उतारावरील सायकलला ब्रेक दाबुन थांबवता येईल पण वाढत चाललेले आयुष्य थांबवण्याचा ब्रेक आपल्या हातात नाही. पांडुरंगाने तो ब्रेक फक्त आणि फक्त धर्मराजाच्या हातात दिलेला आहे. ब्रम्हदेवाने श्वासाच्या रूपात दिलेले आयुष्य (वर्षामध्ये नाही), ते श्वास मोजण्याचे काम सुर्यपुत्र शनी करत असतो. ते श्वास संपले की शनिदेव त्या व्यक्तीच्या मृत्युला संमती देतात आणि त्याची अंमलबजावणी यमराजाद्वारे केली जाते. यात कसलीही चूक होत नाही. मृत्युसाठी शनिदेवाची परवानगी आवश्यक असते. पण एकदा का परवानगी मिळाली की यमराज आणि त्यांचे महाभयंकर यमदूत अशा यातना देतात की या पृथ्वीवर त्यांची तुलना करण्यासारखे काहीही नाही. (याची सविस्तर माहीती गरूड पुराणात दिलेली आहे). त्या यमयातना महाभयंकर आणि महाकठीण असतात. पांडुरंग माऊली श्रीहरी विठ्ठल कृपाळु झाला तो याचसाठी. त्या यमयातना त्यालाही पाहवल्या नाहीत आणि तो म्हणाला जो पंढरीत माझे दर्शन घ्यायला येईल त्याला यमयातनाच काय पण यमाचे दर्शनही होणार नाही. पांडुरंग, विठ्ठल, श्रीहरी, श्रीकृष्ण, श्रीराम, वासुदेव, नारायण इ. अशा त्याच्या फक्त नावानेही यम भीतीने चळाचळा कापतो. कारण त्याला सक्त ताकीद दिलेली आहे "माझे नाम घेणाऱ्याला तु स्पर्श जरी केलास तर याद राख" युरोप टुर केल्याने, अमेरीका फिरून आल्याने, एवरेस्टवर जाऊन आल्याने किंवा कशानेही या यमयातना कमी होत नाहीत. म्हणून या मनुष्यजन्मात पंढरपुर वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे पंढरपुरची वारी करणारे वारकरी साधेसुधे नव्हेत. त्यांची बरोबरी करणेही माझ्यासारख्या पामराला शक्य नाही. पायी वारी जमत नाही किंवा जमेल असेही वाटत नाही पण गेल्या दोन वर्षात IAS ग्रूपने सायकलवारी आयोजित करून पांडुरंगाची भेट घडवुन आणलेली आहे यासाठी त्यांचे किती आभार मानु तेच कळत नाहीये.
    तुम्ही देवाला माना अथवा नका मानु वार्धक्य प्रत्येकाला येणारच आहे आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्याचा शेवट मृत्युनेच होणार आहे. चुकुन मृत्यु यायचा राहीलाय असा या जगात कोणीही नाही.
मृत्यो सर्व हरनम अहम
होऊन होऊन काय होईल एकतर यमराज असेल किंवा नसेल. नसेल तर प्रश्नच येणार नाही इतरत्र कुठेही बोंबलत फिरतो तसा सायकल चालवत पंढरपुरला जाऊन आलो असे म्हणता येईल. पण जर का चुकून यमराज असला तर भाऊ पंढरीला जाऊन आलेले केव्हाही चांगले पण तो यम नको. त्याच्याविषयी जे काही वाचलंय त्यावरून ते लई भयंकर प्रकरण वाटत आहे. त्याच्याशी पंगा न घेतलेला बरा. भगवंताने दिलेले नियम तोडणाऱ्यांना कठोर शासन देण्यासाठी यमाची नियुक्ती केलेली आहे. भगवंतांचा शब्द खोटा असणे कदापिही शक्य नाही. पाप आहे, पुण्य आहे तसा यमही आहेच. या यमाला दुर ठेवण्यासाठी पांडुरंगाच्या भक्तीचा उपयोग करणे म्हणजे मच्छर मारण्यासाठी एके-४७ (चाळीस सात) चा वापर करण्यासारखे आहे.
गुणानेतानतीत्य त्रीन्देही देहसमुद्भवान।
जन्ममृत्युजरादुःखैर्विमुक्तोमृतमश्नुते ।। १४.२०
     तर या मनुष्यजन्माचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल हे मनुष्यजन्माची रचना करणाऱ्या भगवंतानेच श्रीमद भगवदगीतेते सांगितलेले आहे. या पृथ्वीवरील निर्धनातील निर्धन व्यक्तीलाही तो कसा घेता येईल याची त्याने काळजी घेतलेली आहे. यामुळे मृत्युनंतर जेव्हा यमराजाचे सैनिक पार्श्वभागावर आसुडाचे फटके देऊन विचारतील "सांग, तु श्रीहरीला शरण का नाही गेलास?" तेव्हा तुमच्याकडे सांगण्यासाठी काहीही सबब नसणार एवढे मात्र नक्की.
      सायकलिंगच्या फंदात पडुन आता पुरती पाच (५) वर्षे झालेली आहेत आणि विठ्ठलाच्या नादाला लागुन आता अठ्ठावीस वर्षे होत आलेली आहेत. दहावीच्या सुट्टीत श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे युद्धासाठी सज्ज असलेले मुखपृष्ठ पाहुन आवडीने आणि उत्सुकतेने वाचायला घेतलेली गीता तिसऱ्या अध्यायानंतर बाजुला ठेवुन दिली होती कारण काहीच उमजले नव्हते. युद्ध, राजकन्या, अर्धे राज्य आणि राजकन्या बक्षिस मिळणाऱ्या गोष्टींसारखीच ती असेल असा मुखपृष्ठ पाहुन झालेला माझा भाबडा समज आणि शालांत परीक्षेत भरपुर गुण मिळवण्याची क्षमता असल्याने (वर्गातला हुषार विद्यार्थी वगैरे) संस्कृत येत नसतानाही केवळ मराठीत अर्थ दिलेला आहे म्हणुन मला ती सहज समजेल असेही वाटले होते. १०० श्लोक वाचल्यानंतरही मला त्यातुन काडीचाही बोध झाला नाही. मधाच्या बाटलीच्या काचेवर रूळणाऱ्या भ्रमराला ज्याप्रमाणे मधाचा स्वाद कळत नाही त्याप्रमाणे मलाही गीतेचा स्वाद काही कळला नाही. मधाचा आस्वाद घ्यायचा असेल तर झाकण उघडल्यावरच तो घेता येईल. मी सुद्धा त्याच अवस्थेत होतो. त्यानंतर हे प्रकरण आपल्या हाताबाहेरचे आहे असे समजुन गीतेला नमस्कार करून मी गीता बाजुला ठेवुन दिली होती.
      पण तो सावळा हरी काही गप्प बसला नाही. तो म्हणतो, जेव्हा एखादा व्यक्ती माझ्या दिशेने एक पाऊल टाकतो तेव्हा मी त्याच्या दिशेने दहा पावले टाकलेली असतात. चार ते पाच वर्षांनंतर त्याने मला एका अशा व्यक्तीची भेट घालुन दिली ज्याचे गीतेतील सर्व श्लोक मुखोद्गत होते. त्या व्यक्तीबरोबर गीतेविषयी चर्चा करण्याचा योग आला. आमची चर्चा सुरू असताना गीतेतील एखाद्या श्लोकाचा संदर्भ आला तर तो श्लोक एका मधुर चालीमध्ये तो व्यक्ती म्हणुन दाखवत असे. जे ऐकुन मला खुप आश्चर्य वाटत असे. मी आपला प्रतिकार म्हणून न्युटनचे नियम, आर्किमिडीजचे तत्व, पास्कलचा नियम, पायथागोरस वगैरे जसेच्या तसे म्हणून दाखवले जे ऐकुन त्याच्या चेहऱ्यावरही एक स्मितहास्य उमटले होते. मी कसा हुषार आहे आणि माझेच म्हणणे कसे खरे आहे हे मी दाखवण्याचा खुप प्रयत्न केला पण व्यर्थ. तो म्हणाला न्युटनने ग्रॅव्हिटीचा शोध लावण्याअगोदर झाडावरून पडलेले सफरचंद अवकाशात जात होते का? याचे उत्तर अर्थातच नाही होते. श्रीहरीच्या ईच्छेपुढे माझे काहीही चालले नाही. जाता जाता त्या व्यक्तीने सांगितलेला हा श्लोक आजही मला चांगला आठवतोय..
बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।
वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः।। ७.१९
अनेक जन्म-जन्मान्तर के बाद जिसे सचमुच ज्ञान होता है, वह मुझको समस्त कारणोंका कारण जानकर मेरी शरण में आता है। ऐसा महात्मा अत्यंत दुर्लभ होता है।
      त्या श्रीहरीने तेव्हा केलेली जादु आजतागायत कायम आहे. त्यानंतर मी कधीही गीता विसरलो नाही. नित्यवाचन चालु आहे आणि दरवेळेस वाचलेला श्लोक पुन्हा वाचायला मिळाला की त्याच्या सखोल अर्थाच्या जवळजवळ चाललोय असा भास होतो.
    गीता स्वतःच्या बुद्धीने कितीही समजुन घेण्याचा प्रयत्न केला तरीही ती समजुन घेता येत नाही. खोटं वाटत असेल तर प्रयत्न करून पहा. मेंदु जड होऊन झोप आल्याशिवाय राहणार नाही. ज्याने वाचलेली आहे, ज्याला थोडीफार समजली आहे त्याच्याकडुन ऐका आणि ते वाचलेले श्लोक पुन्हा एकदा वाचा, त्यांचा अर्थ बदललेला असेल. हिच श्रीहरीच्या वाणीची जादु आहे.
  
   गीतावाचनाबरोबर सायकलिंगचेही वेड लागले होते आणि त्या पांडुरंगाने त्याच्या विशेष कृपेने माझे सायकलिंग सुद्धा अध्यात्म्याला जोडुन टाकले. "इकडे तिकडे भटकण्यापेक्षा माझ्याकडे ये" अशी त्यानेच इच्छा व्यक्त केली आणि त्याच्या ईच्छेपुढे कोणाचेही काही चालत नाही. जावे तर लागणारच होते. त्याचे मुखदर्शन आणि त्याचा चरणस्पर्श या भुलोकी वैकुंठाची अनुभुती देऊन जातो. पंढरीला जाण्यासाठी जीव वेडापीसा होतो तो यासाठीच. या सुखाची बरोबरी करणारे सुख या भुतलावरच काय या ब्रम्हांडीही नाही.
    मी मागच्या वर्षीपर्यंत कधीही पंढरपुरला गेलेलो नव्हतो. पंढरपुरला जाण्याचा योग आला तो या सायकलमुळेच आणि या सायकलवारीमुळेच. या सायकलवारी आयोजकांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
  ज्ञानेश्वरी म्हणजे श्रीमद भगवदगीताच. माऊलींनी मराठी भाषेमध्ये ओवींच्या स्वरूपात भगवद्गीतेतील श्लोकांवर रचलेले काव्य म्हणजे ज्ञानेश्वरी होय.
"वासांसि जिर्णानी यथा विहाय"
  गीता सांगते आपण आत्मा आहोत शरीर नाही. शरीराचा नाश होतो परंतु आत्म्याचा नाही. आत्मा अजन्मा आणि अविनाशी आहे. त्याचा जन्म मृत्यु असे काहीही होत नाही. जसे आपण जीर्ण झालेले वस्त्र फेकुन नवी वस्त्रे परीधान करतो त्याप्रमाणे आत्मा जीर्ण झालेल्या शरीराचा त्याग करून नविन शरीर धारण करतो.
परंतु बुद्धीमान मनुष्य तोच जो या आत्म्याचा जन्ममृत्यूच्या चक्रातुन मुक्त करतो. या चक्रातुन मुक्त कसे व्हायचे यासाठीच भगवंताने गीता सांगितली. भगवंताने बंगला, गाडी, नोकर चाकर, संपत्ती जमवायला मनुष्य जन्म दिलेला नाही. ते सर्व इथेच राहणार आहे. सोबत येते ते फक्त हरीनाम आणि हरीदर्शन आणि हे घेण्याला कसलीही मर्यादा नाही. भगवंतांनी अर्जुनाला आवर्जुन सांगितलेल्या काही गोष्टी "माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि जे काही करशील ते मला अर्पण करून कर" "नामजप" हे सर्वात श्रेष्ठ तप आहे", "या सर्व दुःखातुन आणि पापातुन केवळ मीच तुला मुक्त करू शकतो इतर कोणीही नाही"
भगवंत म्हणतात" मामेकं (माम एकम)
"मन्मना भव मदभक्तो मद्याजि माम नमस्कुरू"
"यत्तपस्यासि कौंतेय तत्कुरूषु मदर्पणम"
सर्वधर्मानपरीतेज्य मामेकं शरणं व्रज
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयामि मा शुच ।।
सर्व धर्मांचा त्याग करून तु केवळ मला शरण ये मी तुला सर्व पापांपासुन मुक्त करेन तु चिंता करू नकोस।
विषय मोठा आणि सखोल आहे. परंतु भगवद्गीतेचे सार म्हणजे भगवंताचे हे शेवटचे वाक्य..
मामेकं शरणं व्रज
तु फक्त मला शरण ये बाकी मी बघतो.. आपण दुसरे काही करायचे नाही.
जय जय रामकृष्ण हरी 

No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...