Strawberry Fields 300 BRM
Audax India Event -
300 BRM on 27-Nov-2016 at 06:00
Pune Randonneurs | Pune, Maharashtra
थोडक्यात माहीती:
अंतर = ३०० किमी
वेळेची मर्यादा = २० तास
मार्ग = पुणे विद्यापीठ - चांदणी चौक - कात्रज दरीपुल - खंबाटकी घाट - वाई - पसरनी घाट - पाचगणी - महाबळेश्वर - केळघर घाट - मेढा - सातारा - औंध पुणे (स्टारबक).
अटी = ईतर कोणाचीही मदत न घेता सायकल चालवत स्वत:च्या कर्तृत्वावर ३०० किमी अंतर पुर्ण करणे.
वेळेची मर्यादा = २० तास
मार्ग = पुणे विद्यापीठ - चांदणी चौक - कात्रज दरीपुल - खंबाटकी घाट - वाई - पसरनी घाट - पाचगणी - महाबळेश्वर - केळघर घाट - मेढा - सातारा - औंध पुणे (स्टारबक).
अटी = ईतर कोणाचीही मदत न घेता सायकल चालवत स्वत:च्या कर्तृत्वावर ३०० किमी अंतर पुर्ण करणे.
पहाटे घरातुन बाहेर पडल्या पडल्या लगेच स्ट्रावाला रेकॉर्डींगच्या कामाला लावले आणि मोबाईल सायलंट करुन खिशात ठेवुन दिला. स्टार्ट पॉइंटला पोचल्यावर माझ्या पंक्चरचाच विषय पुढे आला आणि त्यावरील चर्चाही रंगली. पण सर्व मित्रांनी पंक्चर होऊ नये म्हणून खुप शुभेच्छा दिल्या आणि काहींनी पंक्चरचे विघ्न येऊ नये म्हणून देवाला प्रार्थनाही केल्या. एवढे जीव लावणारे मित्र या सायकलिंगमुळे भेटले. अजुन काय हवंय आपल्याला? आता पंक्चर झाली असती तरीही मी दुःखी झालो नसतो. या ब्रेवेटमधला बराचसा मार्ग हा जवळजवळ डेक्कन क्लिफहँगरचाच असल्यामुळे मी डिसीची जर्सी घालायचे ठरवले. सेल्फी कॉन्टेस्टमध्ये जिंकलेली ती डिसी जर्सी. खुप वर्षांनी आज माझ्या एकुलत्या एक बेल्कीन जर्सीला आराम मिळणार होता.
सर्व तयारी झाल्यावर आम्ही फ्लॅग ऑफची वाट पाहत थांबलो. दिव्याने फ़्लॅग ऑफ केल्यावर मी मागे वळुन पाहीलेच नाही. सपासप अंतर कापत चांदणी चौक केव्हा पार झाला कळलेच नाही. वडगांव फाट्याजवळ एका रायडरने मला अघाशासारखी ओवरटेक केली पण मी त्याची ओवरटेक जास्त वेळ टिकू दिली नाही. नवले ब्रीजच्या चढावरच त्याला मी कापला. कात्रज घाट चढताना अद्वैत खटावकरने चांगला वेग घेत आघाडी घेतली. ग्रेट गोइंग म्हणत थम्सअप दाखवुन तो माझ्या पुढे गेला. नाहीतर तो मघाचा रायडर. आयसीसी सायकल ग्रुपचे काही सायकलपटु कात्रज घाटात सायकलवर आले होते, या ब्रेवेटमधील रँदोनियर्सना शुभेच्छा देण्यासाठी ते बोगद्याजवळ थांबलेले होते. त्यांच्या शुभेच्छा घेऊन मी बोगद्यातुन पुढे निघालो. बोगद्यातुन बाहेर पडताना मागच्या वेळेसच्या पंक्चरच्या थरारक आठवणी डोळ्यांसमोर तरळल्या. त्या ठिकाणाजवळून जाताना माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. पण चाकाला काहीही कुरबुर झाली नाही. पुढे शिवापुर जवळच्या सर्व्हीस रोडचे काम झालेले पाहुन मला खुप आश्चर्य वाटले, मागच्या वेळेस हाच रोड खुप उखडलेला होता, अगदी दगडाच्या खाणीसारखा. माझा वेग खुप जास्त नव्हता पण मी कुठेही वेळ वाया न घालवता सतत पॅडलवर पाय फिरवत होतो. नसरापुर, निरा नदी, शिरवळ हे अंतर मी एवढ्या कमी वेळात कधीही पार केलेले नव्हते. खंबाटकी घाट कधी सुरू झाला ते कळलेही नाही. खंबाटकी घाटात आशिश जोशी माझ्या मागुन आला मग आम्ही गप्पा मारत मारत तो घाट लीलया पार केला. नंतर त्यापुढे उतारच होता त्या उतारावरून सुसाट सायकल सोडली आणि वाईफाट्यावर पोचलो. वाईफाटा म्हणजे सुरुर.
राष्ट्रीय महामार्गावरुन वाईकडे वळलो. वाई रोडला दुष्काळात शेताला तडे पडतात तसे तडे गेलेले दिसत होते. माझ्याजवळ एक्स्ट्रा टायर आणि दोन ट्युब्ज असल्यामुळे आज मी पंक्चरची पर्वा करत नव्हतो. मी बिनधास्त खड्ड्याखुड्ड्यांतुन सायकल चालवत होतो. होऊ दे पंक्चर...! पण आज पंक्चरही घाबरला होता कदाचित. एकही पंक्चर झाली नाही. माझ्या नियोजनानुसार पसरणीच्या सुरुवातीला विश्रांती घ्यायचे ठरवलेले होते. त्यानुसार सुरुवातीला म्हणजे २-३ किमी चढ चढुन झाल्यावर मी विश्रांतीसाठी थांबलो. ९ वाजुन ५५ मिनिटे झालेली होती. मी फक्त १० मिनिटे थांबणार होतो. अल्ट्राजॅकेट आणि रिफ्लेक्टीव बेल्ट काढुन सॅकमध्ये ठेवला. बिस्कीटे आणि ड्रायफ्रुटचे लाडु पोटात भरले. पाण्याचे घोट घशाखाली गेल्यावर मला पुन्हा तरतरीत झाल्यासारखे वाटायला लागले. १० मिनिटांच्या विश्रांतीने हृदयाची धडधड कमी झालेली होती आणि ८० किमी सायकल प्रवासाचा क्षीणही कमी झाला होता. आता मी पसरणीबरोबर दोन पाय करणार होतो. पसरणीची ऐसी की तैसी करायला वेळ लागला नसता पण त्यानंतर आणखी २०० किमी सायकल चालवायला शरीरामध्ये त्राण शिल्लक ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे थंडपणा घेतला. जेव्हा जेव्हा शरीरावर ताण येतोय असे वाटले तेव्हा तेव्हा मी सायकलवरुन उतरुन चालत जायचो. साधारण ३०-४० मीटर अंतर. यामुळे पायाचे स्नायु मोकळे होत होते आणि थोडेसे अंतरही पार व्हायचे. सायकल घेऊन चाललो पण कुठेही थांबलो नाही. सातत्य ठेवले. बीआरएममध्ये चढावर वेग घेण्यासाठी अजुन मेहनत घ्यावी लागणार आहे. याचा अर्थ सुधारणेला अजुनही वाव आहे. पुण्याहुन जवळपास ८० किमी सायकल चालवल्यानंतर पसरनी घाट नेहमीच जीव खातो.
पाचगणीला पोचल्यावर मी पुन्हा वेग घेतला. डाव्या बाजुला स्ट्राबेरीची रोपे दिसत होती. मागच्या वेळी ज्याठिकाणी स्ट्रॉबेरीचे स्टॉल पाहीले होते तिथे आता रस्ता रुंदीकरण चालु होते. स्ट्रॉबेरी स्टॉलची जागा रस्ता रुंदीकरणात विलीन झाली होती. रविवार असल्यामुळे दुतर्फा वाहनांची गर्दी होती. मोबाईल सायलंट मोडवर ठेवलेला होता. अधुन मधुन फक्त स्ट्रावा चालु आहे की नाही ते पहायचो. सौ चे कॉलसुद्धा उचलले नाहीत. कॉल उचलला नाही म्हणजे सर्वकाही आलबेल आहे असा संकेत ठरलेला होता. पाचगणी महाबळेश्वरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान चालु होते त्यामुळे सुद्धा वाहनांची गर्दी वाढलेली होती. वेन्ना लेकजवळील नाक्यावर पैसे न भरता महाबळेश्वरमध्ये प्रवेश करण्याची मजा काही औरच. चारचाकी वाहनांकडुन लूट गोळा करावी तसे ते लोक पैसे गोळा करत होते. त्यांच्यात सायकलवाल्याला अडवण्याची हिंमत नव्हती. वेन्ना लेक जवळचा चढ पार केल्यानंतर महाबळेश्वर चेकपॉईंट येणार होता. चढ कसला ती तर छोटी खिंडच वाटत होती. घडयाळाचा काटा हळुहळू १२ कडे सरकत चालला होता. मला काहीही करुन १२ च्या अगोदर महाबळेश्वर चेकपॉइंटला पोचायचे होते तसे ठरवलेलेच होते. त्यामुळे मी चढावर वेग घेतला. ब्रेवेटमध्ये चढाचा रस्ता संपता संपत नाही आणि महाबळेश्वरला सायकलवर जाताना एकच लक्षात ठेवायचं, "चढ इथला संपत नाही..." तरीही मी तो संपवण्याचा प्रयत्न करत होतो. कसाबसा तो चढ मी पार केला. चेकपॉइंटवर कारमध्ये बसलेल्या अमितने लांबुनच मला पाहीले. मला पाहील्या पाहील्या तो कारमधुन बाहेर आला आणि माझे अभिनंदन केले. ११ वाजुन ५७ मिनिटे झालेली होती. महाबळेश्वर चेकपॉइंट फत्ते झाला होता. ईथे मीच पहीला पोचलोय हे अमितचे शब्द ऐकुन तर खुपच समाधान वाटले. आता अमितचे काम सुरु झाले होते. त्याने माझे कार्ड घेऊन सही केली आणि शिक्का उमटवला. सही शिक्का झालेले ब्रेवेट कार्ड मी व्यवस्थित ठेवले. त्यानंतर अमितने मला स्ट्राबेरी खायला दिल्या. यावेळेस मी ENO प्यायचे ठरवले होते. त्यासाठी सॅकमध्ये प्लॅस्टीकचा ग्लास आणि चमचा आणला होता. ENO मुळे पोटात जाम झालेले ट्रॅफिक सुरळीत झाले. बरोबर आणलेला थोडा भात फस्त केला. चेकपॉइंटवरील केळी, ईलेक्ट्रॉलने टाकी फुल केली आणि १२:३० वाजता निघालो. जवळजवळ ३० मिनिटांची विश्रांती आणि पोटात पडलेली भर यामुळे मी पुन्हा ताजातवाना झालो.
डॉ. अविनाश, भरत (नाशिक) आणि आशिश माझ्यानंतर चेकपॉइंटला येऊन माझ्याअगोदर तिथुन निघुन गेले होते. पुढच्या प्रवासात पॅडल मारायला ऊर्जा मिळावी म्हणून खाण्यासाठी वेळ देणे सुद्धा तेवढेच महत्वाचे असते. अमितचा निरोप घेताना त्याने आवर्जुन सांगितले की ईथे पहीले आलात तर आता ब्रेवेटपण पहीली फिनीश करा. मी त्याला म्हटलो आता रायडर नं ८७ डायरेक्ट चांदणी चौकात थांबत असतो, आता कुठेही थांबणार नाही आणि मी तिथुन निघालो. मतदानाचा दिवस असल्यामुळे रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त दिसत होता आणि काही ठिकाणी ट्रॅफिकही जाम झाले होते.
केळघर घाटाच्या उताराला सुरुवात होताना ते निद्रीस्त कब्रस्तान दिसले. मागच्या राईडला या कब्रस्तानजवळ थांबुन येथे अनुभवलेली ती भयान शांतता आठवली. तेव्हा या कब्रस्तानचे फोटोशूटही केले होते. मला नव्यानेच माहीत झालेला बगदाद पॉइंट त्या बोर्डवर दिसला. भविष्यात कधीतरी या बगदाद पॉइंटची भेट नक्कीच होईल असे वाटतंय. त्या जंगलातील मुग्ध करणारी शांतता आणि हवेतील गारवा सायकल चालवण्याचा उत्साह वाढवत होता. उतारावर सायकल सोडल्यानंतर जसा सायकलने तुफान वेग पकडला तसा मी विमानाच्या कॉकपीटमधला वैमानिक आहे असे मला वाटायला लागले. कोणत्याही बाह्यबलाच्या क्रियेविना सायकल प्रचंड वेग घेऊ लागली. माझ्या हातातले ब्रेकच काय ते सायकलचा वेग रोखु शकत होते इतर कोणताही अवरोध सायकलचा वेग रोखण्यास समर्थ नव्हता. प्रचंड वेगात कधी डावीकडे तर कधी उजवीकडे वळणे घेत जाण्याचा थरार काही वेगळाच. समोरुन येणा-या एका भिकार वृत्तीच्या कारवाल्याने मला ब्रेक दाबायला भाग पाडुन माझ्या सायकलचा वेग शून्य करायला लावला. तो करता करविता अशा लोकांना महागडी कार घेण्याएवढे पैसे तर देतो पण ती कशी चालवावी याची अक्क्ल मात्र देत नाही. ही माझी तक्रार आहे देवा याच्यावर नक्की विचार कर. एवढ्या सहजपणे मिळालेला प्रचंड वेग एकदम शून्य करायला लागण्याचे दुख तर होणारच ना. सध्या त्या मार्गावर रस्त्याचे काम चालु आहे आणि छोटे-मोठे खड्डेखुड्डे बुजवलेले आहेत त्यामुळे मागच्या वेळेपेक्षा यावेळेस रस्ता खुप छान वाटला. आणि एवढ्या प्रचंड वेगामुळे घाटाचा उतार कधी संपला ते कळलेही नाही.
उतार संपल्यानंतर सायकलचा वेग वाढवता येईना. का कुणास ठाऊक. थोडा वारा होता पण तो एवढाही जोरात नव्हता की सायकलच्या वेगाला अवरोध करू शकेल. आजुबाजुचे गवत आणि झाडेझुडपे अगदी स्तब्ध होती. मी अतिरीक्त ताण न घेता पॅडलभोवती पाय फिरवत होतो आणि एकेक किमी कसे मागे जाईल याची काळजी घेत होतो. मैलाचे दगड कासवाच्या गतीने निवांत मागे सरकत होते. सातारा २५ किमी नंतर सातारा २४ किमी चा दगड खुप ऊशिराने येतोय असे वाटत होते. सकाळचा तो रायडर तर माझ्यापेक्षाही हळु चालला होता. त्याला ओव्हरटेक करायला मला फारसे कष्ट लागले नाहीत. डॉ. अविनाश यांना ग्रेट गोइंग म्हणून थम्सअप दाखवला आणि पुढे निघालो. कधी एकदा सातारा चेकपॉइंट येतोय असे मला झाले होते. ऊन्हाचा काहीही त्रास जाणवत नव्हता पण तरीही मला खुप पाणी प्यावेसे वाटत होते. मी शक्य होईल तेवढे पाणी घशाखाली उतरवत होतो. अधूनमधून बिस्कीटे आणि लाडु तोंडात घालणे चालुच होते. २ वाजुन २२ मिनिटांनी मी सातारा चेकपॉइंटला पोचलो. आशिष माझ्याअगोदर २ मिनिटे पोचलेला होता. सातारा चेकपॉइंटवर पाणी, केळी आणि बिस्कीटांचा पुन्हा एकदा आस्वाद घेतला. माझ्या मागोमाग डॉ. अविनाश आणि नाशिकचा रायडर लगेच आले. मोजुन १५ मिनिटे विश्रांती घेतल्यानंतर मी पुण्याच्या दिशेने निघालो. फिनिश पॉइंटला पोचण्याच्या प्लॅनविषयी आम्ही एकमेकांशी चर्चा केली. मी तर सांगुन टाकले की आता माझा थांबण्याचा विचार नाही. डॉ. अविनाश यांना साताऱ्यातुन बाहेर पडण्याचा रस्ता माहीत नव्हता त्यामुळे ते माझ्या मागोमाग आले.
स्ट्रावाचे रेकॉर्डींग चालु आहे की नाही पाहण्यासाठी मी मध्येच थांबलो आणि खिशातला फोन बाहेर काढला. या स्ट्रावाचा काही भरोसा नसतो, कधी टांगा पलटी होऊन याचे घोडे फरार होतील याचा काही नेम नाही. सकाळी पेडल मारायला सुरुवात केल्यानंतर आज पहील्यांदाच फोनला हात लावला. स्ट्रावाचे रेकॉर्डींग व्यवस्थित चालु असलेले पाहुन जीव भांड्यात पडला. केवढी ही स्ट्रावाची धास्ती! फोनमध्ये आलेले मेसेज आणि मिस्ड कॉल दिसले पण ते पाहण्याचा मोह मी टाळला. फोनची स्क्रीन ऑफ करुन त्याला खिशात ठेवला आणि गुपचुप पॅडलवर पायाने जोर द्यायला सुरुवात केली. साताऱ्यातील मार्केटच्या बाजुने सरळ पुढे गेलो त्यानंतर डावीकडे जाणा-या रस्त्याने मला सरळ राष्ट्रीय महामार्गावर आणुन सोडले. आता एकदम झकास रस्त्यावर सायकल चालवायला मिळणार होती. घडयाळाकडे पाहुन मी ०४:३० मिनिटांनी खंबाटकी बोगदा गाठु असे ठरवले. अडीच मिनिटाला एक किमी याप्रमाणे मी गणित मांडले होते. मागच्या वर्षी सातारा ते खंबाटकी या पट्ट्यातील चालू असलेली पुलांची सर्व कामे यावर्षी पुर्ण झालेली आहेत आणि रस्ताही चकाचक झालेला आहे. आता ती दुर्दशा निरा नदी ते कात्रज बोगद्यापर्यंतच्या रस्त्याला आलेली आहे. सगळीकडे कामे चालु आहेत आणि सर्व्हीस रोड गाड्यांनाच अपुरे पडत आहेत तर सायकलवाले कसे जात असतील याची कल्पना केलेलीच बरी. खंबाटकी बोगद्याजवळ मी ४ वाजुन ३५ मिनिटांनी पोचलो. मला ५ मिनिटे ऊशिर झाला होता. असे क्वचितच घडते की मी ठरवलेल्या वेळेत त्या ठिकाणी पोचत नाही. खंबाटकीजवळ थांबायचा विचार होता पण मी तो बाजुला सारला. कारण उतारावर सायकल चालवताना शरीरावर कोणताही जास्त ताण पडत नाही. खंबाटकी बोगद्यानंतर मिळालेला उतार खुप आल्हाददायक वाटला. पाठीचे अवघडलेले स्नायू मोकळे झाले. निरा नदी ओलांडल्यावरच थांबु असा विचार करून मी सुसाट निघालो.
खंबाटकी बोगद्यानंतर शिरवळपर्यंत पोचायला खुप कमी कष्ट लागतात. तो आल्हाददायक ऊतार अलगदपणे शिरवळमध्ये आणुन सोडतो. ३०० च्या ब्रेवेटमध्ये दिवसाउजेडी निरा नदी ओलांडुन मी पुणे जिल्ह्यात प्रवेश केला याचेच मला आश्चर्य वाटत होते आणि तेही महबळेश्वरसारख्या अवघड मार्गावर. जर या ब्रेवेटला कराडचा मार्ग असला असता तर मी सुर्यास्त व्हायच्या आत घरीसुद्धा पोचलो असतो असे मला वाटायला लागले. असोत.. जास्त बढाया मारायला नकोत नाहीतर व्हायची पंक्चर. मग घ्या बाबाजी की ठुल्लु.
निरा नदी ओलांडल्यानंतर त्या पुलाचे काम चालु आहे तिथेच सायकल बाजुला लावली. सॅकमधील शिदोरी काढुन काही घास घशाखाली उतरवले आणि भरपुर पाणी प्यायलो. अधुन-मधुन लड्डुचा आस्वाद घेणे चालुच होते. अंधार पडणार होता म्हणुन रिफ्लेक्टीव बेल्ट पुन्हा चढवला आणि अंतिम टप्प्यासाठी सज्ज झालो. मोजुन १० मिनिटे विश्रांती झाल्यानंतर पॅडलवर जोर दिला. थोडे अंतर जात नाही तोच नाशिकच्या त्या रायडरने मला ओव्हरटेक केली. साधा अंगठाही वर केला नाही. मला मागे टाकले आणि जोरजोरात सायकल चालवु लागला. खरंतर ब्रेवेट म्हणजे शर्यत नव्हे पण त्याने माझ्याशी शर्यत लावली असे मला वाटले. "बचेंगे तो और भी लढेंगे"... म्हणत मीही त्याच्या चाकाच्या मागे माझे चाक लावले. जीवाचा आटापिटा करून तो वेग घेण्याचा प्रयत्न करत होता ते पाहुनच मी ओळखले की हा काही लंबी रेस का घोडा नाहीये. त्याच्याएवढा वेग मी नेहमीसारखी सायकल चालवुन ठेवु शकत होतो. पुण्यात येऊन याला पहीला येण्याची घाई झाली होती बहुतेक. मगर मुझे ये बात कुछ हजम नहीं हुई. त्याची रोडबाईक होती आणि माझी हायब्रिड. हायब्रिड विरूद्ध रोडबाईक. तसे पाहीले तर त्याचेच पारडे जड वाटत होते. त्याची पुढे राहण्याची केविलवाणी धडपड मी त्याच्या पाठीमागुन पाहत होतो. जास्त बिल वाढवायला नको म्हणुन मी कापुरहोळच्या पुलाजवळ जोरात स्प्रिंट मारून त्याला ओवरटेक केली आणि मागे वळून पाहीलेच नाही. कदाचित नसरापुरच्या नंतर माझी सायकलसुद्धा त्याला दिसली नसेल.
नसरापुरनंतर ट्रॅफीकचा ससेमिरा चालु झाला तो शिवापुरची बाग येईपर्यंत संपला नाही. "धावे त्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे" हे ट्रॅफिकमधुन रस्ता शोधण्यासाठीचे माझे ब्रीदवाक्य आणि तसेही पुणेकरांना ट्रॅफिकमधुन वाट शोधण्याची कला अवगत असतेच आणि सायकलवर वाट काढायची असेल तर ते अजुनही सोपे. बंपर टु बंपर ट्रॅफिक असुनही कुठेही माझ्या सायकलचा वेग शून्य होऊ दिला नाही. कात्रज बोगदा सोडल्यानंतर चांदणी चौकात पोचण्याचे वेध लागले. पण लगेच लक्षात आले की शेवटचे ठिकाण तर स्टारबक आहे. नेहमी चांदणी चौकात ब्रेवेट संपण्याची सवय असल्यामुळे औंधकडे जाण्याचा खुप कंटाळा आला होता. पण जावे तर लागणारच होते. औंधरोडच्या त्या गर्दीत मी स्टारबक शोधत होतो तेवढ्यात एका कारमधुन आवाज आला की पुढे आहे त्या तिथे. कोणीतरी रँदोनियरच असणार तो. मी सायकलवरुन ईकडे तिकडे नजर फिरवत असलेलो पाहुन त्याने मला वाट दाखवली होती. मला वाटलं तोच कार्ड घ्यायला आलाय की काय? पण तो निघुन गेला. स्टारबकजवळ कोणीही नव्हते. मी शोध घेत होतो कोणी आहे का? मग फोन काढला तर दिव्या मॅडमचा मेसेज आलेला होता की कात्रज बोगद्याजवळ आल्यावर मला मेसेज कर म्हणून. मग मी फोनच केला. दिव्या मॅडम चालत चालत येतच होत्या. माझी ब्रेवेट ७ वाजुन ५१ मिनिटांनी संपली. १३ तास ५१ मिनिटे. ही ब्रेवेट संपवणारा मी पहीला रायडर झालो. शेवटच्या टप्प्यात स्प्रिंट मारल्यामुळे मी थोडावेळ मांडी घालुन बसलो आणि पायांचा ताण कमी केला.
स्ट्रावा चालुच होते. आता औंधवरुन नऱ्हेला सायकलवर जाणे म्हणजे एक दिव्यच होते. १ तास विश्रांती घेऊन मी घराकडे निघालो. ८ वाजुन १८ मिनिटांनी नाशिकचा रायडर आला, माझ्यानंतर तब्बल २७ मिनिटांनी. आप कब आये? मला त्याने विचारले. माझे टायमिंग ऐकुन मला म्हटला की, मै पानी लेने के लिये रूका था.
या ब्रेवेटमध्ये गणेश देवकरचा दुर्दैवी अपघात झाला. त्याच्या सायकलला एक कुत्रा आडवा आला. अंधारात त्याला तो दिसला नाही. तेव्हा कॅप्टन महेश जोग यांनी रात्रीची वेळ असुनही गणेशला या अपघातात खुपच मोलाचे सहकार्य केले. प्रशांत जोग आणि त्यांचे बंधु महेश जोग यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. कठीण प्रसंगी ते नेहमीच सर्वांच्या मदतीला धावुन येतात.
या ब्रेवेटमध्ये मी एकही फोटो काढला नाही, ना व्हाटसअपचे मेसेज पाहीले ना फेसबुक पाहीले. फक्त आणि फक्त रोबोटसारखे पॅडलवर पाय गरागरा फिरवत होतो. हे लिहतानाही डोळ्यांसमोर फक्त रस्त्याचे काळे डांबर आणि बाजुची पांढरी पट्टी दिसत आहे. यमदुतांसारखे भासणारे मोठमोठे ट्रक अजुनही घोंघावत जवळुन गेल्याचा भास होत आहे.
मी रात्री १०:०० वाजता घरी पोचलो आणि स्ट्रावा बंद केले. स्ट्रावा बंद केले म्हणजे सायकलिंग संपले.
धन्यवाद!
(ब्रेवेटच्या व्हाटसअप ग्रुपवरुन घेतलेले फोटो येथे लोड करत आहे)
बाईक चेकअप |
ब्रेवेटचा फ्लॅग ऑफ होताना |
स्ट्रॉबेरी |
सातारा चेकपॉइंट |
सुंदर दृश्ये |
स्टारबकला पोचल्यावर ब्रेवेट कार्डचा फोटो घेताना |
Strava Activity |
टाईम रेकॉर्डेड ०७:५१ |
First Finisher of this brevet |
No comments:
Post a Comment