Tuesday, 13 March 2018

माझे वजन...


माझे वजन...

            वजन कमी करायला सुरुवात केली तेव्हा मी काही फार लठ्ठ वगैरे नव्हतो किंवा डॉक्टरने बोलावुन मला निर्वाणीचा ईशाराही दिलेला नव्हता की आता वजन कमी करा नाहीतर तुमची खैर नाही वगैरे. मला शुगर वगैरेची सुद्धा समस्या नव्हती म्हणजे अजुनतरी आलेली नाही की ज्याच्यासाठी वजन कमी करण्याची गरज भासावी. माझे वजन ७७ ते ७८ किलोच्या आकड्यावर रूळलेले असायचे. १६८ सेंमी ऊंचीला ७८ किलो वजन चालते आणि वयानुसार थोडेफार ईकडे-तिकडे होणारच अशी मनाची समजुत काढुन आलेला दिवस पुढे ढकलणे हा एकमेव उपक्रम चालु होता. जाडजुड ढेरी सुटलेले मित्रही उंदराला मांजर साक्ष असल्याप्रमाणे या वयात वाढतेच रे वजन (ढेरी) असे म्हणुन एकमेकांच्या वाढत्या ढेरीवर आम्ही पांघरुन घालायचो. प्रत्येकाच्या कमरेवर चरबीची गोल चुंबळ तयार झालेली आहे या विषयावर सर्वांचे एकमत व्हायचे. आणि कोणालाही हा वाढत्या चरबीचा गोल कमी करता आलेला नसल्यामुळे एकमेकांचा मत्सर करण्यासारखे सुद्धा आमच्यात काही नव्हते. तो कमी करणे अशक्य असते अशी आम्ही ठाम समजुत करुन घेतलेली होती. आणि थोड्याफार फरकाने सर्वांची ढेरी सारखीच असल्यामुळे आम्ही सर्वजण समदु:खी होतो असे म्हटल्यास वावगे ठरु नये.

            काही वर्षांपुर्वी लोकांची असलेली विचारसरणी म्हणजे माणुस कसा अंगापिंडाने भरदार आणि धष्ट्पुष्ट शरीरयष्टीचा असावा, बलदंड शरीरयष्टी बघताच समोरच्या व्यक्तीने वाद घालण्याअगोदर दोनदा विचार केला पाहीजे. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये एकतरी पैलवान दिसायचाच. भाऊकीत वचक रहायला मदत व्हायची, कोणी भांडण करायला धजावणार नाही अशी एक विचारसरणी आणि एक असुरक्षिततेची भावना त्यामागे दडलेली असायची. त्यामुळे तब्येतीने जाडजुड असणार्यांचा रुबाब असायचा. आणि चांगल्या तब्येतीची मुले पाहीली की लोक त्यांना खात्यापित्या घरातील आहेत असे म्हणायचे आणि यासाठी त्यांच्या आईवडीलांचे पण कौतुक व्हायचे. मुलांना खायला प्यायला कमी पडु देत नाहीत असा त्याचा अर्थ घेतला जायचा. मी वाढलो ते या विचारसरणीत.

            हल्ली आधुनिकीकरणामुळे भरदार शरीरयष्टीवाल्यांचा रुबाब जवळजवळ संपुष्टात आलेला आहे. बलदंड शरीर असणे काही वाईट नाही पण आजकाल शरीरयष्टी धष्टपुष्ट करण्याच्या प्रयत्नात लोकांच्या ढेरीच जास्त धष्टपुष्ट होत चाललेल्या दिसुन येतात. आणि सध्या बळावत चाललेल्या खाद्यसंस्कृतीमुळे त्या ढेरींचा धष्टपुष्टपणा कमी होईल असे यत्किंचितही वाटत नाही. काहींच्या मते ढेरी कमी करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती कमी होत नाही. परंतु ढेरी कमी व्हावी अशी प्रबळ ईच्छा सर्वांनाच असते. परंतु या ईच्छेला प्रयत्नांची पराकाष्ठा जोडण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. वाढलेला पगार आणि वाढलेली ढेरी कधीही कमी होत नसते. एखादी जादुची कांडी फिरवुन कमरेवर लटकलेली चरबी क्षणात गायब करता आली तर काय मजा येईल ना? पण प्रत्यक्षात मात्र धष्टपुष्ट झालेली ढेरी कमी करणे हे काही खायचे काम नाही. हो अगदी बरोबर वाचले, ढेरी कमी करणे हे खायचे काम नाही.

"ज्याचा तोंडावर नाही ताबा त्याची ढेरी कशी कमी होईल बाबा?"

            "ऐसा कलियुग आयेगा..." प्रभु श्रीरामचंद्रांनी माता सीतेला कलियुगाची काही लक्षणे सांगितली त्यात सांगितलेले एक लक्षण म्हणजे, "कलियुगातील पुरुषाला नऊ महीने गरोदर असलेल्या स्त्रीएवढे पोट असेल". हे ऐकुन त्रेतायुगातील सर्व जनता खळखळुन हसली होती, की पुरुषाला एवढे मोठे पोट कसे काय असु शकेल यावर त्यांचा विश्वासच बसला नाही कारण त्याकाळी सर्व सपाट पोटवाले असायचे (आताच्या भाषेत सिक्स पॅकवाले). "रामचंद्र कह गये सिया से ऐसा कलियुग आयेगा..." (खरंतर या गाण्यात ही माहीती दिलेली नाही पण माहोल लक्षात येण्यासाठी हे गाणे) आजकालच्या पुरुषांची ढेरी पाहीली की त्रेतायुगात सांगितलेली भविष्यवाणी किती तंतोतंत खरी होती हे आपल्याला पटल्यावाचुन राहणार नाही. खोटे वाटत असेल तर आपली ढेरी आरशात एकदा बघा. शरीरात चरबी साठवण्याची मोजकीच ठिकाणे आहेत. बहुतेकदा सर्व चरबी कमरेच्या आजुबाजुला लटकलेली असते. ढेरीबरोबरच पाठ, कंबर, पार्श्वभाग आणि मांड्या याठीकाणी चरबी साठायला सुरुवात होते. तुमचे शरीर कोणत्या प्रकारचे आहे त्यानुसार चरबी साठवण्याची जागा निवडली जात असावी असे मला वाटते.

            तर सांगायचा मुद्दा हा की माझीसुद्धा ढेरी अशीच वाढीला लागलेली होती. सातव्यातुन आठव्या महीन्यात पदार्पन केल्यासारखे वाटायला लागले होते. वजन जवळजवळ ७८ किलो वर स्थिर झालेले होते. पण ढेरीचा आकार वाढतच होता. चरबीचा साठा हळुहळु मांड्यांकडे सरकायला लागला होता. वाढत्या ढेरीवर उपाय म्हणुन मी हळुहळु इनशर्ट करायचे बंद केले होते. सोशल मिडीयावर टाकण्यासाठी फोटो काढावयाचा असेल तर ढेरी आत ओढुन फोटो काढायचा आणि मगच अपलोड करायचा. त्यामुळे मला ढेरीच नाही असा आव आणता येत होता. पण यामुळे मी माझी स्वत:चीच फसवणुक करुन घेत होतो. सायकलिंगची जर्सी घालुन गेलो की ढेरी एकदम टमटमीत फुगलेली दिसायची कारण सायकलची जर्सी स्कीन टाईट असल्यामुळे ढेरी कितीही आत ओढली तरी काहीही उपयोग होत नसे. ते पाहुन काही मित्र म्हणायचे एवढी सायकल चालवतोस पण तुझी ढेरी काही कमी होत नाही. हे असे विचारणारे आपल्या आजुबाजुचे लोक म्हणजे परमेश्वराने आपल्यासाठी नेमलेले बिनपगारी निरीक्षक असतात. यांना आपल्याला पगार वगैरे द्यावा लागत नाही पण ते आपल्यासाठी काम करत असतात एवढे मात्र नक्की. माझ्या ढेरीमुळे सायकल आणि सायकलिंगची बदनामी व्हायला लागल्यामुळे माझ्या ढेरीचा मलाच राग यायला लागला होता. सायकलिंगची जर्सी फक्त फोटो काढायलाच उपयोगी पडत होती, ढेरीमुळे ती जर्सी घालुन फिरता येत नव्हते. कितीही सायकल चालवली तरी तोंडावर ताबा नसल्यामुळे, सायकलिंगचा वजन कमी होण्यावर काहीही परीणाम दिसुन येत नव्हता. दर रविवारी लांब पल्ल्याच्या राईडला जाऊन आल्यानंतर चिकन रस्सा आणि इंद्रायणी भातावर कोपरापर्यंत ओघळ येईपर्यंत आडवा हात मारायचो आणि त्याच्या जोडीला बियर किंवा व्हिस्की असेल तर विचारुच नका. मग दुपारी मस्त ताणुन द्यायचो. जेवढ्या कॅलरीज जाळायचो त्याच्या दुपटीने पोटात भरायचो आणि दुपारची झोप यामुळे वजन वाढण्यासाठी पोषक वातवरण तयार होत असे. आता या अशा प्रकारांमुळे वजन कमी होणे शक्य आहे का सांगा बरे?

            2016 च्या उन्हाळ्यानंतर माझे वजन 80 किलो कडे सरकायला लागले होते. मला वाटले की ऊन्हाळ्यात आंबे वगैरे खाल्ल्यामुळे वाढले असेल. आंबे खाल्ल्याने वजन वाढते. एक-दोन महीन्यात कमी होईल म्हणुन मी दुर्लक्ष केले. पण ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नव्हती. वजनाचा काटा ८१ कडे कधी गेला कळलेसुद्धा नाही.

            वाढत्या वजनामुळे चढावर सायकल चालवायला खुप त्रास होत असे. अंगातील चरबीमुळे खुप दमायला व्हायचे आणि सतत भुक लागल्यासारखे वाटायचे. मला सायकलचा वेग वाढवण्याची खुप हौस होती. सायकल चालवण्याचा सरासरी वेगामध्ये वाढ व्हावी असे मला मनापासुन वाटत असे. मी बर्याच जणांकडे याविषयी विचारणा करत असे की यासाठी काय करता येईल पण मला समाधानकारक मार्ग सापडत नव्हता. जो तो आपापल्या परीने उपाय सुचवत असे. त्यातले काही माझ्या मेंदुला पटत नसत. पुण्यातील सर्वात वेगवान महीला सायकलपटु अंजली भालिंगे ज्यांनी अनेक राष्ट्रीय सायकल स्पर्धांचे विजेतेपद मिळवलेले आहे यांच्याशी चर्चा करण्याचा एकदा योग आला. खरंतर माझ्यासारख्या सामान्य सायकल चालवणार्यासाठी त्यांनी वेळ दिला हे माझे नशिब आणि त्यांचे मोठेपण. त्यांच्याबरोबर साधेपणात झालेली चर्चा मला खुप काही शिकवुन गेली. माझ्या ज्या काही जिज्ञासा, उत्सुकता आणि शंका होत्या त्या सर्व त्यांना विचारुन घेतल्या आणि त्यांनी त्या दुरही केल्या. त्यांच्याबरोबर राईड केल्यानंतर बर्याच गोष्टी माहीत झाल्या. त्यांच्याशी झालेल्या सहजसुलभ चर्चेतुन मला जे हवे तेच मिळाले. आता या सर्वांची अंमलबजावणी करण्याचे मी ठरवले. सर्वप्रथम सर्व गोष्टींची यादी बनवली आणि कामाला लागलो. त्यांनी सायकलमध्ये सुचवलेले बदल मी लगेच अंमलात आणले. सायकलचा वेग वाढवण्यासाठी लागणार्या काही गोष्टी विकत घ्याव्या लागणार होत्या पण त्यात एक गोष्ट अशी होती की ती पैशाने विकत घेता येण्यासारखी नव्हती ती म्हणजे माझे आवशयकतेपेक्षा जास्त असलेले वजन.

            वाढलेले वजन कमी करण्यासाठी मी गुगलकडे धाव घेतली. वजन कमी करण्यावर जे काही मिळेल ते वाचत सुटलो आणि त्यात अंमलबजावणी करण्यासारखे काही असेल तर ते सुद्धा लगेच करु लागलो. सोशल मिडीयावर आहारतज्ञ आणि वजन कमी करणारे मित्र-मैत्रिण जोडले. ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सायक्लिस्ट, ट्रायथॅलिट आणि आहारतज्ञ मैत्रिणींचा फॉलोअर तसेच मित्रही झालो. वजन कमी करण्याची प्रोसेस रटाळ वाटायला नको म्हणुन हा खटाटोप. वजन कमी करण्याची सुरुवात "नो शुगर फॉर 21 डे" पासुन झाली (२१ दिवस साखर किंवा साखरेपासुन बनवलेले पदार्थ खायचे नाहीत). साखरेनंतर कायकाय खायचे नाही याची सर्व माहीती घ्यायला सुरुवात केली अर्थातच गुगलवरुन. त्यात नो फास्ट फुड, नो बेकरी, नो बिस्कीटस, नो आईस्क्रीम, नो चॉकलेट, नो ब्रेड, नो राईस, नो दारु . गोष्टींसाठी नो नो दिलेले होते. माझ्या जमेची गोष्ट म्हणजे अंडी, चिकन आणि मासे यासाठी कुठेही "नो" दिलेला नव्हता. म्हटले एवढे तरी बरे झाले नाहीतर या वजन कमी करण्याच्या प्रोसेसचे काही खरे नव्हते. नो शुगर चे अनुसरण करताना कामाच्या ठिकाणी मिळणारा फुकट चहा तोही गोड हा सर्वात मोठा अडसर होता. आयुष्यात पहील्यांदा फुकट मिळणार्या गोष्टीवर मी पाणी सोडण्याचा विचार करत होतो. "मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन" किंवा "खाण्यासाठी जन्म आपुला" या विचारसरणीतुन बाहेर येताना पृथ्वीवरुन चंद्रावर जाणार्या यानाला जेवढा त्रास होतो तेवढा त्रास मला झाला. मन निगरगट्ट करुन मी कामाच्या ठिकाणी चहा पिणे बंद केले. खुप त्रास झाला. चहाची वेळ झाली की जीभेवर ती गोड चव रेंगाळायची आणि माझी जीभ मला चहाकडे धाव घ्यायला लावायची. परंतु मनाने दृढनिश्चय केलेला असल्यामुळे जीभेचे चोचले पुरवणे आपोआप बंद झाले आणि त्यामुळेच चहापासुन लांब राहता आले.

            कोणाच्या घरी जाणाचा योग आला तर चहा घेतल्याशिवाय सुटका व्हायची नाही कारण आपल्या चालीरीतीनुसार पाहुण्यांना चहा दिल्याशिवाय आपला पाहुणचार पुर्ण होत नाही. पण काहींना समंजसपणे सांगितले तर चहाऐवजी सरबत मिळत असे. नो शुगरचे २१ दिवस पुर्ण झाल्यानंतर आता काय संपले चॅलेंज म्हणुन अधुनमधुन हा चहा प्यायला सुरुवात केली परंतु साखर बंद केल्यामुळे झालेले फायदे बघता मी हा साखरेचा चहा पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. घरात असताना सौ. कडुन विनासाखरेची काळी कॉफी मिळायची किंवा अगदीच मला गोड खाण्याची हुक्की आली तर गुळाचा चहा बनवायला सांगायचो. विनासाखरेचे कोकम सरबतसुद्धा छान वाटायचे. कोमट पाणी प्यायल्यास वजन कमी व्हायला मदत होते अशी माहीती मिळाल्यानंतर कोमट काय गरम पाणीसुद्धा प्यायला सुरुवात केली. जगामध्ये स्थुलपणा वाढीस लागण्यास साखर जबाबदार आहे असा एक लेख वाचण्यात आला. त्यामुळे साखर बंद करुन कुठले तरी सत्कर्म केल्यासारखे वाटायला लागले. हे झाले साखरेचे. आता खाण्यापिण्याविषयी.

            नो शुगरचा नियम पाळायला सुरुवात केल्यापासुन वजन 81 वरुन 76 वर कधी आले ते मला कळलेच नाही. वजन 76 वर आल्यावर माझा हुरुप वाढला आणि मी दिवसातुन तीन वेळा वजनकाट्यावर ऊभा रहायला लागलो. झोपेतुन ऊठल्यावर किती? दुपारी जेवल्यावर किती? रात्री झोपताना किती? दिवसातुन वेगवेगळे आकडे मिळायचे. दिवसभरात माझे वजन किलो वरखाली व्हायचे. मी गव्हाची चपाती (पुणेरी भाषेत पोळी) पुर्णपणे बंद केली. त्याऐवजी ज्वारीची भाकरी चालु केली. गरमागरम ज्वारीच्या भाकरीला तुप लावुन खाण्यात जी मजा आहे ना ती गव्हाच्या चपातीत कधीच येऊ शकत नाही. ज्वारीची भाकरी चालते म्हणुन कितीही खाऊन चालणार नव्हते. मोजुन एकच भाकरी खायचो. मी एकच भाकरी खातोय म्हणुन सौ. ने भली मोठी भाकरी करायला सुरुवात केली म्हणजे नेहमीच्या आकारापेक्षा मोठी. माझ्या ते लक्षात आल्यावर मी सौ. ला म्हणालो, "आपला तवा प्रसरण पावला की काय? भाकरी अचानक मोठी कशी काय व्हायला लागली?" असे म्हटल्यावर सौ. ला खुप हसायला आले. नेहमीच्या आकाराची भाकरी करत जा असे बजावल्यावर नेहमीच्या आकाराची भाकरी मिळायला लागली. जेवणात तीन रंग असावेत. म्हणजे कमीतकमी दोन प्रकारच्या भाज्या असाव्यात. फळभाज्या, पालेभाज्या ज्या आपल्या स्थानिक ठिकाणी पिकतात त्या खाण्यावर भर द्यावा. दुबईला पिकणारी भाजी आपल्या ईथे खाऊन काही उपयोग नाही. आपल्या शरीराला ती मानवेल की नाही याचा काही नेम नाही. जे आपल्या ईथे पिकतं ते खायचे हा साधा नियम पाळायचा. सकाळी एक वेळ नाष्टा (भरपुर), दुपारी एक वेळ जेवण (मध्यम) आणि संध्याकाळी फक्त दुध आणि फळे हा माझा दिनक्रम बनवला आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहीलो. कमीत कमी कर्बोहायड्रेटस असणारे पदार्थ खाण्यावर जास्त भर दिला.

            अंधार पडल्यावर खायचे नाही हे एक महत्वाचे तत्व पाळायला सुरुवात केली. अंगातील चरबी कमी व्हायला लागली तशी भुकही आपोआप कमी होत गेली. वजन कमी करणे हे अतिशय कमी खर्चाचे काम असल्यामुळे पृथ्वीतलावरील कोणत्याही व्यक्तीला ते सहज शक्य आहे. वजन कमी करावयाचे असल्यास तोंडाला लावलेले कुलुप हे अतिशय उत्तम. चरबी म्हणजे वजन कमी व्हायला लागल्यानंतर चढावर सायकल चालवताना दम लागणे जवळजवळ बंद झाले तसेच सायकल चालवताना, रनिंग करताना भुक लागणे सुद्धा कमी झाले.

            एवढे सगळे उपदव्याप करुनही वजनाचा काटा ७० च्या खाली काही केल्या जात नव्हता. ७० किलोच्या खाली वजन कमी करणे खुप अवघड आहे असे मला वाटायला लागले होते. १००-१०० ग्रॅम करण्यासाठी सुद्धा खुप मेहनत घ्यावी लागत होती. साधी चूकसुद्धा सार्या मेहनतीवर पाणी सोडते आणि मी तर चूकाच चुका करत चाललो होतो.
क्रमश:

                       

2 comments:

  1. सर, ह्या नंतरच्या भागाची link आहे का?

    ReplyDelete

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...