डेक्कन ट्रायथलॉन
पार्श्वभुमी:
परदेशात जाऊन आयर्नमॅन स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर सराव म्हणुन आपल्या देशातील ट्रायथलॉन स्पर्धांमध्ये भाग घेत राहणे अत्यंत आवश्यक आहे असे अंजली भालिंगे यांनी सांगितल्यानंतर की ज्या मला नेहमी मार्गदर्शन करत असतात मी क्षणाचाही विलंब न करता डेक्कन ट्रायथलॉनमध्ये नाव नोंदवले. गोवा, हैद्राबाद, चेन्नई आणि दिल्लीमध्ये सर्रास या स्पर्धांचे आयोजन केले जाते. पण माझे नशिब एवढे चांगले की मी ट्रायथलॉनमध्ये भाग घ्यायचे ठरवले आणि आपल्या कोल्हापुरातच हाफ आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धा भरवली गेली जिचे नावही एकदम भन्नाट होते "डेक्कन ट्रायथलॉन". माझ्या अष्टपैलु व्यक्तीमत्वामध्ये आता मी ट्रायथलॉनची भर टाकणार होतो. सायकलिंगचा भक्कम पाया आणि थोडीफार रनिंगची पार्श्वभुमी या दोन गोष्टींच्या बळावर मी ट्रायथलॉनमध्ये भाग घेण्याचे ठरवले. स्प्रिंट, ऑलिम्पिक, हाफ आणि फुल असे ट्रायथलॉनचे प्रकार असतात हे मला रजिस्ट्रेशन करताना कळले. याअगोदर मी कधीही ट्रायथलॉन प्रकार केलेला नव्हता किंवा तो कशाबरोबर खातात हेसुद्धा मला माहीत नव्हते. स्प्रिंट आणि ऑलिम्पिकचे अंतर मला म्हणावे एवढे आव्हानात्मक वाटले नाही म्हणुन मी हाफ आयर्नमॅन अंतराची ट्रायथलॉन निवडली. म्हणजे कसं की थोडीफार तरी वाट लागल्यासारखे वाटले पाहीजे त्याशिवाय मजा ती कसली?. हाफ आयर्नमॅन अंतराच्या ट्रायथलॉनमध्ये १.८ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.०९६ किमी धावणे (हाफ मॅरेथॉन) या तीन ऍक्टिव्हिटी सलग याच क्रमाने करावयाच्या असतात. ९० किमी सायकलिंगचा तु फडशा पाडशील या मित्रांच्या विधानाशी मीसुद्धा सहमत होतो याविषयी कोणाचेही दुमत नव्हते आणि हाफ मॅरेथॉन म्हणाल तर ती पण कशीबशी ओढत-ताणत पुर्ण करता येईल यातही काही शंका वाटत नव्हती पण १८००मी राजाराम तलावात पोहण्याच्या कल्पनेने माझ्या अंगावर काटा येत होता. मी फार फार तर कॅनॉल आरपार केलेला आहे ज्याची रुंदी साधारण २०मी असते, आता हे २०मी कुठे आणि १८००मी कुठे? मला पोहता येत नाही असे नाही पण माझे पोहण्याचे तंत्र ट्रायथलॉनमध्ये पोहण्यासाठी सुयोग्य नव्हते आणि मला एवढे मोठे अंतर सलग पोहत जाण्याचा सरावही नव्हता. नेहमीप्रमाणे माझ्या मार्गदर्शक अंजली भालिंगे माझ्या मदतीस पुन्हा धावुन आल्या आणि त्यांच्या सांगण्यावरुन टिळक तलावामध्ये मी रॉय सरांकडे पोहण्याचे धडे घ्यायला सुरुवात केली. अंजली मॅडम स्वतः येऊन रॉय सरांशी बोलल्या आणि मगच माझा क्लास चालू झाला. पोहण्यामध्ये पारंगत वगैरे होण्यापेक्षा राजाराम तलावातुन सहीसलामत बाहेर पडता यावे एवढी एकच माफक अपेक्षा होती. पारंगत वगैरे व्हायला आयुष्य पडलेले आहे.
डेक्कन ट्रायथलॉनमध्ये नाव नोंदवल्यापासून कोल्हापुर स्पोर्ट्स क्लबने अतिशय सुरेख संपर्क ठेवलेला होता. त्यांच्या ई-मेल वारंवार येत असत. फक्त २५०० रुपयांमध्ये हाफ आयर्नमॅन अंतराची ट्रायथलॉन करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करुन दिली होती जी अतिशय कौतुकास्पद गोष्ट होती. मागच्या वर्षी पुण्यामध्ये या प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती पण माझ्या पोहण्याच्या भितीमुळे मी त्या स्पर्धेच्या वाटेला गेलेलो नव्हतो. आणि खरं सांगायचं तर त्या स्पर्धेत भाग न घेतल्याचे कसलेही दुःख जाणवले नाही. का ते सर्वांना माहीत आहेच.
पुर्वतयारी:
ट्रायथलॉनच्या पूर्वतयारीचा भाग म्हणुन फ्लो हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन ती सब-२ मध्ये पूर्ण करावी असे अंजली मॅडम यांनी सांगितले होते. पण मला ते जमले नाही. ती मॅरेथॉन मी २ तास २३ सेकंदात पूर्ण केली. या हाफ मॅरेथॉनच्या तयारीसाठी अंजली मॅडम यांनी खूप मदत केली होती त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. त्यांनी माझ्याकडुन दोन आठवडे वर्कआउट करून घेतला होता. लांब पल्ल्याचे अंतर पळण्याचा सराव मी पुणे विद्यापीठामध्ये आणि त्याच्या आजुबाजुला करायचो. इथे पळण्याचे दोन फायदे होतात एक म्हणजे अनेक उत्कृष्ट धावपटुंबरोबर पळण्याची तसेच त्यांचे धावणे प्रत्यक्ष पाहण्याची अशा दोन संधी मिळतात. फेसबुकवर त्यांच्या पोस्ट बघण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष पळताना पाहीलेले केव्हाही उत्तमच.
ट्रायथलॉनचा सराव करताना सायकलिंगपेक्षा पोहणे आणि रनिंगवर जास्त भर दिला होता. सकाळी पोहायला जाता यावे म्हणून सलग ३ आठवडे दुपारची शिफ़्ट घेतली होती. पहिल्या दिवशी पोहायला गेल्यावर कोचने मला टिळक तलावाची एक लॅप मारायला लावली. तलावाला एक फेरी मारल्यावर १००मी अंतर पोहून झाले. माझे पोहणे बघितले आणि माझे ब्रिदिंग करण्याचे टेक्निक किती मागासलेले आहे याची मला जाणीव करून दिली. माझे किकिंगसुद्धा सरांना फार काही आवडलेले नव्हते. मला लगेच किकिंग बोर्ड घ्यायला लावला आणि किक कसे करायचे ते सांगुन किकिंग करत बस म्हणाले. तासभर लाथा मारल्या तरी सर काही थांब म्हणण्याचे नाव घेत नव्हते शेवटी मीच धीर करून विचारले सर थांबु का आता?
सहप्रवासी:
"स्विम ट्रायल" (डेक्कन ट्रायथॅलन)
दोन सायकल्स एका कारमध्ये बसवणे खरंच महाकठीण काम आहे पण माझा मेंदु टेक्नीकल असल्यामुळे अशी आव्हाने पेलायला मला खुप आवडते. तर दोन सायकल्स आणि आम्ही दोघे भावी अर्धपोलादी पुरूष (विजय वसवे आणि किरण पाटील) डेक्कन ट्रायथॅलनसाठी पुण्याहून कोल्हापुरला शुक्रवारी संध्याकाळी रवाना झालो. जो एनएच4 मी सायकलवर अक्षरशः पिंजुन काढलाय त्या हायवेवर वातानुकूलित कारमध्ये बसुन प्रवास करताना खरंच फार रूक्ष वाटत होते. आणि सायकल चालवणारा कारमध्ये बसुन प्रवास करायला लागला की हमखास झोपणार म्हणजे झोपणार आणि मला केव्हा झोप लागली ते कळलेही नाही. सातारा सोडल्यावर मला जाग आली आणि मग किरणला आराम देण्यासाठी मी ड्रायव्हींग सीटवर बसलो. हायवेवरून हॉटेल साई इंटरनॅशनल दिसल्यावर मी आपोआपच गाडी तिकडे वळवली. ईथे न थांबता पुढे गेलो तर माझ्यातला सायक्लिस्ट मला कदापि माफ करणार नाही कारण माझे सायकलिंग आणि हॉटेल साई इंटरनॅशनल यांच्यामध्ये खोलवर रूजलेलं एक नातं आहे. त्या नात्यावर हळुवार एक फुंकर घालावी म्हणून मी चहा घेण्यासाठी तिथे थांबण्याचा आग्रह केला. थोडे ताजेतवानेसुद्धा व्हायचे होते. इथे वॉशरूम आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चोख असते.
चहाच्या ताजगीचा एहसास घेतल्यावर गुगलच्या नकाशात कोल्हापुरातील राजाराम तलावाला हुक लावले आणि गुगल सांगेल त्या आज्ञा पाळत काळ्याकुट्ट अंधारात रात्री ११ वाजुन ४० मिनिटांनी राजाराम तलावाजवळ पोचलो. तिथे ट्रायथॅलनची जोरदार तयारी चालु होती. एक मोठा ट्रक भरून मंडपाचे साहीत्य येऊन पडलेले होते. भुई सपाट करण्यासाठी केलेले प्रयत्न डोळ्यांना दिसत होते. एका कोपर्यात मोठा दिवा (विद्युत) लावलेला होता. कंपाऊंडला शोभा आणण्यासाठी जांभळ्या रंगाचे कापड सर्वदूर लावलेले होते. आणि या सर्व साहीत्याच्या सुरक्षेसाठी तिथे दोन रखवालदारसुद्धा नेमलेले होते. त्या दोघांना पाहुन खुप बरे वाटले कारण काळ्याकुट्ट अंधारात आणि या आडरानात तंबु ठोकुन आम्ही दोघेच झोपणार होतो पण आता आम्हाला सोबत मिळाली होती. आमची विचारपूस केल्यावर त्यांनाही बरे वाटले. आयर्नमॅन मध्ये भाग घ्यायला आलोय म्हटल्यावर आम्हाला कंपाऊंडच्या आतमध्ये तंबु लावायला परवानगी मिळाली आणि गाडीसुद्धा आत लावा म्हणाले. वेळ न दवडता आम्ही दोघांनी तंबु ऊभे केले आणि झोपण्याच्या पिशवीत घुसलो (स्लिपींग बॅग). तंबु आणि झोपण्याचे साहीत्य पाहुन रखवालदार चक्रावुन गेले. त्यांनी अजुन तंबु, स्लिपींग बॅग वगैरे या गोष्टी कधीही पाहीलेल्या नव्हत्या. त्यांच्या बोलण्यातुन आपुलकी आणि जिव्हाळा ओसंडुन वाहत होता.
तंबुचे फोटो काढुन सोशल मिडीयावर झळकवले. त्यावरून असे वाटले की लोकांना तंबु खुप अप्रूप आहे. किरणला पहाटे पाचचा अलार्म लावायला सांगुन आम्ही दोघेही झोपी गेलो. कडक थंडी आणि तंबूमध्ये स्लिपींग बॅग यांच्या संयोगाने तयार झालेली ऊब फारच सुखकारक वाटत होती. या सुखदायक अनुभवामुळे केव्हा डोळा लागला ते कळलेही नाही. पहाटे मोरांचे आवाज यायला सुरूवात झाली. आजुबाजुला असलेले मोर सुर्याची चाहुल लागल्यापासुन एक सुरात ओरडत होते. यानिमित्ताने मोराच्या आवाजाने जाग येण्याचे सौभाग्य पदरी पडले. बोटाच्या ठशाने मोबाईलचे कुलुप उघडले आणि बघतोय तर काय साडेसहा वाजलेले होते. पाचचा अलार्म कुठे गेला मग? अलार्म बंद करून किरण महाशय पुन्हा झोपी गेले होते.
😄
कारमध्ये सर्व पसारा व्यवस्थित कोंबला आणि पोहण्याचे साहीत्य चढवुनच आम्ही तलावाकडे गेलो. सर्व आवराआवरी करून आम्ही पोहण्याच्या ठिकाणावर पोचलो तेव्हा सात वाजुन गेलेले होते. बरेचसे ट्रायथॅलिस्ट आमच्या अगोदर तिथे पोचलेले होते आणि पाण्याचा अंदाज घेण्यासाठी ऊत्सुक दिसत होते. स्पर्धेच्या अगोदर ईथे पोहायला मिळावे म्हणुन तर आम्ही दोन दिवस अगोदर इथे आलो होतो. राजाराम तलावाजवळील सूर्योदयानंतरचे दृश्य अगदी एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यातुन रेखाटल्यासारखे दिसत होते. चित्रकारांनी ग्रामीण विषयांवर रेखाटलेली बरीच चित्रे माझ्या नजरेखालुन गेलेली आहेत. त्यातलेच एखादे चित्र डोळ्यांसमोर तरंगतंय की काय असे मला वाटत होते. आमच्या मातीतील ही आमची माणसं. राजाराम तलाव म्हणजे स्थानिक लोकांचे सकाळचे स्नान करण्याचे हक्काचे ठिकाण आहे हे समोरील दृश्य पाहुन मला जाणवत होते आणि म्हशींसाठी म्हणाल तर त्यांना इथे पोहण्यासाठी आयुष्यभराचे सभासदत्व दिलेले आहे. तो त्यांचा हक्काचा पोहण्याचा तलावच होता. त्यांना कसलीही प्रवेश फी वगैरे द्यावी लागत नव्हती. म्हशींना कोण बरे पोहायला शिकवत असेल? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. फक्त मनुष्य प्राणीच एक असा आहे की ज्याला उपजत काहीच येत नसते पण त्याला असेही वरदान आहे की त्याने जर ठरवले तर तो कोणत्याही क्षेत्रात अत्युच्च पदावर पोचु शकतो. म्हैस पाण्यात पोहु शकते पण तिला जर सांगितले की १५ मिनिटात १ किमी पोहुन दाखव तर ते म्हशीला जमणार नाही. पण हेच मनुष्य प्राणी लिलया करू शकतो.
राजाराम तलावाला सभासद मंडळ होते आणि त्यांचा नोटीस बोर्ड देखील होता. त्या बोर्डवर रोज आंघोळ करायला येणार्यांसाठी सुचना लिहिलेली होती, "उद्या सकाळी आपल्या इथे आयर्नमॅन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे तेव्हा कोणीही पोहण्यासाठी येऊ नये तसेच स्पर्धा होईपर्यंत म्हशी तलावाजवळ आणु नयेत" खाली अध्यक्षांची सही वगैरे सर्व होते.
या दृश्यातुन बाहेर पडायला थोडा वेळ लागला मग ज्याच्यासाठी आलोय ते करण्यासाठी पाण्यात उतरलो. स्विम ट्रायल घ्यावी म्हणुन मी १०० मीटर आतमध्ये पोहत गेलो आणि क्षणाचाही विलंब न लावता माघारी फिरलो. २०० मीटर पोहल्यावर लगेच बाहेरही आलो. लाईफगार्ड नसताना मला अनावश्यक धोका पत्करायचा नव्हता. एकतर या अशा तलावात पोहण्याची माझी पहीलीच वेळ आणि ही माझी आयुष्यातील पहीलीच ट्रायथॅलन त्यात मी पोहण्यात एकदम लिंबूटिंबू मग कशाला उगीच जीवाला आणि मनाला त्रास करून घ्यायचा? आता काय होईल ते उद्या सकाळीच बघु असे म्हणत मी ट्रॅकपँट आणि टिशर्ट चढवला आणि कोवळे ऊन अंगावर घेऊ लागलो.
"ट्रायथॅलनमधील सायकलबाजी"
राजाराम तलावातुन सहीसलामत बाहेर पडल्यावर मी आनंदाने उड्या मारायला लागलो होतो आणि आनंदाच्या भरातच मी माझ्या सायकलकडे पळत सुटलो. या तलावात एवढे अंतर पोहताना माझे काय होईल याची मलाच शाश्वती नव्हती त्यामुळे पोहणे पुर्ण केल्यावर जो काही आनंद मी व्यक्त केला तो यथायोग्यच होता. पोहण्यामध्ये मी अजुन लिंबूटिंबू आहे, कोणे एके काळी मी सायकलिंगमध्येही लिंबूटिंबू होतो पण गेले ते दिवस आणि राहील्या त्या आठवणी.
सायकल लावलेल्या ठिकाणी आल्यावर मी पाहीले की माझी सायकलही माझी आतुरतेने वाट पाहत थांबलेली होती. मला सहीसलामत परत आलेले पाहुन तिलाही हायसे वाटले असेल. आवरा लवकर चला... मालकाला घेऊन कधी एकदा तवंदी घाट गाठते असे तिला झाले होते कदाचित. माझी पहीलीच ट्रायथॅलन असल्यामुळे पोहणे संपवुन सायकलिंग सुरू करेपर्यंत जो काही वेंधळेपणा करतात तो सर्व मी केला. हा सर्व वेंधळेपणा माझी सायकल शांतपणे पाहत होती आणि मला ती वादळापुर्वीची शांतता आहे हे चांगलेच ठाऊक होते. सायकलिंग सुरू करायला ११ मिनिटे लागली. म्हणजे पोहणे ५० मिनिटे आणि ११ मिनिटे कपडे बदलायला घालवल्यानंतर एकुण वेळेच्या ६१ व्या मिनिटाला मी पेडलवर पाय फिरवायला सुरूवात केली आणि एनएच४ कडे सुसाट निघालो. तिन्ही प्रकारांमध्ये माझे सायकलिंग समाधानकारक असल्यामुळे ९० किमी अंतर लवकरात लवकर कसे पुर्ण करता येईल याचा विचार मी करूनच ठेवलेला होता. काहीही करून हे अंतर ३ तासात संपवायचेच असे मी ठरवलेले होते आणि त्यासाठी जो वेग राखणे आवश्यक आहे तो मी राखणार होतो आणि यासाठी हँडलबारला लावलेले जीपीएस माझी मदत करणार होते. आवश्यक गती राखताना मी कोणाच्या पुढे जातोय की दुसरा कोणी माझ्या पुढे जातोय याचा मी कधीही विचार करत नाही. ३० चा सरासरी वेग ठेवल्यामुळे बरेचसे रोडबाईकवाले मागे जात होते. काहीजण मला पुन्हा ओवरटेक करण्याचा प्रयत्न करत पण त्यांना माझ्यापेक्षा सरस गती राखणे शक्य होत नसल्यामुळे मी एकालाही माझ्या पुढे जाऊ दिले नाही. मला ओवरटेक करणाऱ्याला मी लगेच ओवरटेक करून मागे टाकत असे. हायब्रीड सायकलवाल्याने आपल्याला ओवरटेक केली हे महागडी रोडबाईक वापरणाऱ्याच्या पचनी पडायला थोडे जड जाते. दोष सायकलचा नसतो तीच सायकल एखाद्या कसलेल्या सायकलपटुने चालवली तर ४० चा सरासरी वेग नक्कीच देईल आणि त्या वेगापुढे माझा निभाव लागेल असे मला तरी वाटत नाही. मी माझ्या वेगात चाललो होतो जो दृष्टीपथात आला त्याला मी मागे टाकला.
तवंदी घाटाच्या अलीकडे वारा वाहत होता आणि त्यात सिमेंटचा रोड यामुळे सायकलच्या गतीवर थोडा परीणाम झाला. एका ठराविक वेगात तवंदी घाट चढुन गेलो. युटर्नला माझ्यासमोर खजुराचा ट्रे धरला गेला (सीडलेस होते बरं का), एवढ्या पाहुणचाराची सवय नसल्यामुळे मी पुरता भारावुन गेलो. एका हाताने शक्य होतील तेवढ्या उचलल्या तसेच सालीसहीत कापलेले केळाचे दोन तुकडे मागच्या खिशात कोंबले आणि तौंदी घाटाच्या उतारावर भरधाव सायकल सोडुन दिली. माझा परतीचा प्रवास सुरू झाला होता. पोडीयमवाले सायक्लिस्ट अजुन आवाक्याबाहेर आहेत त्यांच्या गतीशी अजुन स्पर्धा करता येत नाही. पीटर सगानचे व्हिडिओ पाहुन अजुन खुप प्रॅक्टीस करण्याची आवश्यकता आहे.
परतीच्या प्रवासात सुद्धा तीच परीस्थिती कायम होती. आवश्यक सरासरी वेग राखण्याच्या प्रयत्नात इतर रोडबाईकवाले मागे मागे जात होते. काहीजण उतारावर मला मागे टाकायचे मग मी त्यांना चढावर ओवरटेक करायचो आणि चढावर ओवरटेक केली की ते परत मला ओवरटेक करण्याता प्रयत्न करत नसत.
एका रोडबाईकवाल्याच्या फारच जिव्हारी लागलं. मी ओवरटेक केल्यावर त्याने मला उतारावर ओवरटेक केली कारण उतारावर मला रोडबाईक एवढा स्पीड घेता येत नाही. उतार संपल्यावर चढ लागला आणि मग मी पण जोर लावुन पुन्हा त्याला ओवरटेक केली. त्याने मला ओवरटेक केली मग मी पण त्याला ओवरटेक केली. असा प्रकार ५ वेळा झाला. मी काही त्याला आवरत नव्हतो. शेवटी त्याचा भाता फुलला आणि त्याने माझा नाद सोडुन दिला. आणि जाता जाता तो मला म्हणाला "तुम चिटींग कर के आया है". मला हे असले रडके लोक आवडत नाहीत, हारायला लागले की लगेच यांचे ताळतंत्र बिघडते.
त्यानंतर माझ्या पाठीमागुन स्वप्निल भोसले आला आणि मला ओवरटेक करून झपकन पुढे निघुन गेला. मी पण गती वाढवुन त्याच्या पुढे गेलो पण त्याने पुन्हा मला ओवरटेक केली. मी परत ओवरटेक केली मग त्याने जास्त गती वाढवुन आमच्यातील अंतर वाढवले. मग मला कळुन चुकले की आज हा खरा रोडबाईक चालवणारा आपल्याला भेटला आहे याच्याशी टक्कर घ्यायची तर आपल्याकडे पण रोडबाईकच असायला हवी "मुकाबला बराबरी का होना चाहीये". तरीही मी माझी आवश्यक गती ठेवलेली होतीच. शेवटच्या ४ किमी मध्ये मी स्वप्निलला ओवरटेक केली आणि सुसाट गेलो पण २०० मीटर शिल्लक असताना तो पुन्हा माझ्या पुढे गेला. मला कळुन चुकले की प्रकरण आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. पहील्यांदाच असे घडले की ओवरटेक करण्याचा मनापासुन प्रयत्न करूनही मला एखाद्या सायकल चालवणाऱ्याला ओवरटेक करता आली नाही.
😄
ट्रान्झिशनमध्ये चिटींग केली म्हणणारा आला. मी त्याला सोडणार नव्हतोच. त्याला गाठुन मी विचारलेच की तु असे का म्हणाला तर म्हणतो कसा, "आज मेरे लाईफमें पहली बार मैने ३० का स्पीड लिया और तुम मुझे बडे आराम से ओवरटेक कर के जा रहा था, तो मुझे लगा तुमने घाट किया ही नहीं, बीचमेंसे आया है"
हे भगवान! कैसे कैसे लोग भरे है इस दुनियामें?
No comments:
Post a Comment