Wednesday 21 August 2019

माझे स्विमिंग

माझे स्विमिंग

मी कामगार कल्याण भवन, सहकारनगर येथे पोहण्यास जातो कारण महाराष्ट्र शासनाने अखिल कामगारांच्या कल्याणासाठी हा स्विमिंग पूल बांधलेला आहे आणि मी एक कामगार असल्यामुळे येथे जाण्यास पात्र आहे. कामगारांसाठी वार्षिक सभासदत्व (कोणत्याही आरक्षणाशिवाय) सवलतीच्या दरात उपलब्ध आहे अशी माहीती माझा मित्र प्रसाद निरगुडे याने मला दिली होती. त्याच्याकडे अशा प्रकारची सवलत वगैरे कुठे मिळते याची इत्यंभुत माहीती उपलब्ध असते. हि सवलत कामगारांचे कुटुंबीय सुद्धा घेऊ शकतात. उभ्या आयुष्यात फक्त हिच शासनाची सवलत मला उपभोगण्यास मिळाली आहे. हेही नसे थोडके. जे कामगार नाहीत ते सुद्धा या पुलचे सभासद होऊ शकतात परंतु त्यांना कोणतीही सवलत मिळत नाही.

शासनाकडे हा स्विमिंग पुल चालवण्याची पुरेसी यंत्रणा नसल्यामुळे त्यांनी हा पुल चालवण्याचे कंत्राट मीरा फॅब्रिकेटर्सला दिलेले आहे (असे प्रथमदर्शनी भासत आहे). मीरा फॅब्रिकेटर्स त्यांचे काम चोख बजावत आहे. पुलमध्ये पोहण्याची शिस्त सोडली तर इतर सर्व शिस्तीचे काटेकोरपणे पालन केले जाते. सकाळी नऊ वाजता फक्त महीलांची बॅच असते त्यावेळेस सर्व पुरूषांना तलावाच्या आवारातुन बाहेर काढले जाते.

तर सांगायचा मुद्दा हा की महीलांसाठी येथे पोहण्याची स्वतंत्र वेळ तसेच उत्तम व्यवस्था आहे. ज्या महीलांना सार्वजनिक ठिकाणी पोहायला संकोच वाटतो त्यांनी या ठिकाणी पोहायला काहीच हरकत नाही. पुरूषांचे पोहणे विचाराल तर पुणे ट्रॅफिकपेक्षाही वाईट अवस्था या पुलमध्ये पोहणाऱ्यांची आहे. एवढा सुंदर आणि ऐसपैस पुल असुनही निव्वळ बेशिस्त लोकांमुळे इथे पोहणे म्हणजे एक दिव्य पार करण्यासारखे आहे. 😆

तुम्हाला वाटत असेल विजुभाऊ मस्त निळ्या निळ्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत असतील, पोहताना मस्त दिल है पानी पानी हे गाणे म्हणत म्हणत सहज दोन-तीन किमी अंतर पार करत असतील. 😆

तर असे काहीही नाही.
वाचा ही तलावाची कहाणी...
फ्रिस्टाईलने पोहणाऱ्यांचा कोणालाही कसलाही त्रास होत नाही. मी फ्रि स्टाईलने पोहतो. पण ते बेडकासारख्या लांब तंगड्या करून पोहणारे फ्रिस्टाईलने पोहणाऱ्यांना पुलमध्ये सळो की पळो करून सोडतात. तंगड्या फाकवायला यांना ऐसपैस जागा लागते. बेडकासारख्या स्टाईलने पोहणाऱ्यांची संख्या खुप जास्त आहे. रोज यांच्या लाथा खाव्या लागतात. पाय बेडकासारखे आणि हात खेकड्याच्या नांगी सारखे फिरवत असल्यामुळे यांच्या जवळपास जायचीसुद्धा मला भिती वाटते. आणि एवढे असुन यांचा वेगही अतिशय मंद, मंद म्हणजे माझ्यापेक्षाही मंदगतीने पोहतात. यामुळेच या तलावात पोहायला यायला लागल्यापासुन मी खुप वेगात पोहतो असा माझा गौरसमज झालेला आहे.
(वासरात लंगडी गाय शहाणी)
😆
दुसरा प्रकार म्हणजे उलट पोहत येणारे. हे आकाशाकडे तोंड करून पुलमध्ये असे पोहत असतात जसे काही पुलमध्ये हे एकटेच आहेत आणि बाकी सर्व पोहणारे सुट्टीवर गेले आहेत. कारण यांना मागचे पुढचे काहीही दिसत नाही. हवामानखात्याने यांना आकाशातील ढगांवर नजर ठेवायचे काम दिलेले असते कि काय कोणास ठाऊक? कोण आलंय कोण चाललंय याचा यांना थांगपत्ता नसतो. मागच्या वेळी तर मी उलट दिशेने पोहत येणाऱ्या एका टकलुच्या डोक्यावरच आदळलो होतो 😆. त्यालाही लागले होते आणि मलाही पण रस्त्यावर गाडी धडकल्यावर जसे भांडत बसतात तसे आम्ही भांडत बसलो नाही. तो त्याच्या दिशेने गेला आणि मी माझ्या दिशेने पोहण्याचे काम चालु ठेवले. याला म्हणतात कामगारांचा सुसंस्कृतपणा!! 😍

तिसरा प्रकार म्हणजे तलावाच्या लांबीच्या दिशेने न पोहता रूंदीच्या दिशेने आडवे पोहणारे. हे तर मला कधीच दिसत नाहीत. गनिमी काव्यासारखे पोहता पोहता मध्येच प्रकट होतात. आता मला सांगा समोरून येणाऱ्यावर लक्ष ठेवायचे की या आडवे येणाऱ्यावर?
करायचे तरी काय? एकतर त्या स्विमिंगच्या गॉगलमधुन अंधुक दिसते आणि त्यावर थोडे धुके आले तर विचारुच नका, अशा परीस्थितीत माझीच आंधळी कोशिंबीर सुरू असते. समोरून येणारे धड व्यवस्थित दिसत नाहीत तर हे आडवे येणारे कुठुन दिसणार? त्यांना जोरदार धडक बसल्यावरच कळते की कोणीतरी आडवे पोहत आलेले आहे. एकवेळ सायकल चालवताना राँग साईडने येणारे परवडले ते दिसतात तरी पण हे आडवे पोहणारे कधी धडक देतील याचा नेम नाही.

चौथा प्रकार म्हणजे हल्ली पाण्यात चालण्याचा व्यायाम प्रकार वाढीस लागलेला आहे. चार फुट खोलीच्या बाजुला यांचा घोळका जमलेला असतो आणि घोळक्याने गप्पा मारत मारत यांचा पाण्यात चालण्याचा व्यायाम सुरू असतो. काश्मिर, पाकीस्तानपासुन ते तैमुर बालकापर्यंतचा कोणताही विषय ते सोडत नाहीत. मी जेव्हा लॅप पुर्ण करायला चार फुट खोलीच्या बाजुला येतो तेव्हा ती गर्दी पाहुन मला गणपतीच्या गर्दीची आठवण होते. त्या सर्वांना चुकवत कसाबसा यु-टर्न घेतो. काही सज्जन गृहस्थ स्वतःहुन वाट देतात पण काही रगील दोडक्यासारखे बाजुला व्हायचे नाव घेत नाहीत.

हल्ली मी पण मन घट्ट केले आहे. धडकलो तर धडकलो आपण आपले पोहत रहायचे. ज्याला धडकेल तो आपल्या मध्ये आला ज्याला नाही धडकलो तो सज्जन गृहस्थ.

पुल फार सुंदर आहे फक्त शिस्त लावायला हवी.

No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...