मुंबई मॅरेथॉन 2023 (भाग २)
रेल्वे प्रवास, खाणे आणि निवांत झोपणे फक्त एवढेच काम असल्यामुळे शरीरामध्ये दैनंदिन जीवनात जाणवणारा थकवा औषधालाही जाणवत नव्हता. शरीर एकदम ताजेतवाने होते. पहाटे तीनचा अलार्म असुनही मला अलार्मच्या अगोदर दोन मिनिटे जाग आली. एवढे माझे मन, बुद्धी आणि शरीर मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी आतुर झालेले होते. मन थोडे साशंक वाटत होते. यावेळेस सब-फोर होईल की नाही? हा यक्षप्रश्न माझ्यासमोर ऊभा होता. शंकांचे काहुर, अनिश्चिततेचे सावट आणि सब-फोरचा निर्धार सोबत घेऊन मी हॉटेल सोडले. हॉटेल शबाना गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी जवळ आणि रीगल सिनेमाला लागुनच होते. मी बाहेर रस्त्यावर आलो तेव्हा सगळीकडे रनर्सच रनर्स दृष्टीस पडत होते. मी पण मॅरेथॉन धावणार्यांच्या लोंढयात सामील झालो. थोडे मंदगतीने धावत हृदयाला गतीमान करण्याचा प्रयत्न केला. आझाद मैदानात "फेस स्कॅनरने" चेहर्याची ओळख पटल्यावरच आतमध्ये प्रवेश दिला जात होता. सर्व भारतातुन बरेचसे धावपटु ही मॅरेथॉन धावण्यासाठी येथे आलेले होते. काही निष्णात, काही नवखे, काही हौशी तर काही बक्षिस जिंकण्याच्या लालसेने आलेले होते.
धावपटुंची त्यांच्या पळण्याच्या गतीनुसार A, B, C, D, E, F, अशा विवीध गटांमध्ये विभागणी केलेली असते. माझ्यासारखे सब-फोर वाले A विभागात होते. A वाल्यांना शर्यत सुरू करण्यासाठी प्राधान्य देण्यात येते. कमी वेगाने धावणार्यांचा वेगात पळणार्यांना अडथळा होऊ नये म्हणुन ही तजवीज केलेली असते. दोन ते तीन मिनिटांच्या अंतराने सर्व विभागातील धावपटूंना आरंभ रेषेकडे सोडण्यात आले आणि प्रत्येकजण सुसाट निघाला. दहा ते पंधरा मिनिटांत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील रस्त्यावर 7205 मॅरेथॉनपटु (42.2 किमी धावणारे) धावु लागले. त्यामध्ये 668 महिलांचा समावेश होता. मुंबईतील लोकल ट्रेनच्या गर्दीला सुद्धा लाजवेल एवढी धावपटूंची गर्दी रस्त्यावर दिसु लागली. पहील्या पाच किमी मध्ये गर्दीच्या गतीने धावणे भाग पडत होते कारण गर्दीमुळे एखाद्याला ओलांडुन पुढे जाणे सुद्धा शक्य होत नव्हते. म्हणुन आपापल्या डिव्हीजनची आरंभ वेळ कदापिही चुकवु नये. पहील्या पाच किमी मध्ये तुम्ही जर तुमच्यापेक्षा हळु धावणार्यांच्या गर्दीत अडकला तर नदीच्या प्रवाहातील भोवर्यात अडकल्यासारखी तुमची अवस्था होईल एवढे मात्र नक्की. त्यातुन लवकर बाहेर पडणे शक्य होत नाही. मरीन ड्राईव्हच्या ऐसपैस रस्त्यावर आल्यावर मोकळा श्वास घ्यावयास मिळाला. आम्ही अजुनही अंधारातच धावत होतो. मरीन ड्राईव्हचा परिसर बघ्यांच्या गर्दीने फुलून गेलेला होता. समुद्राच्या कडेने ऐकु येणारे बॅंड, पंजाबी ढोल आणि मराठमोळा ढोल-ताशा धावपटूंचा ऊत्साह द्विगुणित करत होता. ढोल-ताशाचा आवाज ऐकल्यावर अंगात चैतन्याची लहर संचारली.
सर्वकाही अपेक्षेनुसार होत होते. हृदयावर कोणाताही ताण न घेता विनासायास मिळणार्या गतीने माझी धावाधाव सुरु होती. अधुन मधुन स्टेडफास्टच्या पिनट बटरचा एकेक घास घशाखाली उतरवणे चालु होते. एकदम सर्व सॅचेट खाल्ले जात नाही म्हणुन मी एक घास खाऊन ते सॅचेट पुन्हा खिशामध्ये ठेवत होतो. ठराविक वेळाने मीठाच्या गोळ्या आणि पॉवर जेल घेणे सुरू होते. त्यामुळे संपुर्ण मॅरेथॉनमध्ये कुठेही रसद कमी पडल्याचे जाणवले नाही. पेडरचा चढ आल्यावर मी गपगुमानपणे चालत चालत अंतर कापले. चढावर कमी झालेल्या गतीची सरासरी उतारावर भरून काढली. वाटेत मिळणार्या पाण्याच्या बाटल्या आवर्जुन घेतल्या. जे काही प्यायला मिळत होते ते सर्व घशाखाली उतरवत होतो. आजुबाजुला काही ओळखीचे रनर्स दिसु लागले होते. त्यांना पाहुन धावण्याचा हुरूप वाढला. मुंबई मॅरेथॉनचे मुख्य आकर्षण म्हणजे वरळी सिलिंक पुल. या पुलावर धावण्यास मिळणार ही कल्पनाच खुप आनंद देणारी असते. परंतु माझे दुर्भाग्य असे की मी अंधारात वरळी सीलिंकवर प्रवेश केला. सब-फोर साठी कुत्रे मागे लागल्यासारखे धावत होतो. सब-फोर करावयाची असेल तर सिलिंक विसरावा लागतो. "कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है"
मुंबई मॅरेथॉनची खरी मजा 23 ते 24 किमी नंतर यायला सुरूवात झाली. रस्त्यावरील प्रेक्षक आता फक्त प्रेक्षक न राहता टाळ्या वाजवुन, आवाज देऊन प्रसंगी सोबत पळुन धावपटूंचा ऊत्साह वाढवु लागले होते. काहींनी स्वखर्चाने केळी, संत्री, बिस्कीटे, लेमनच्या गोळ्या, स्प्राईट, थम्सअप तसेच पाण्याच्या बाटल्यांचे स्टॉल लावलेले होते. मुंबईचे स्पिरीट म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेत होतो. युरोपमधील काही स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आलेले लोक तिकडच्या प्रेक्षकांचे गोडवे गाताना मी ऐकलेले आहे. नशिब मला हा अनुभव घेण्यासाठी युरोपला जावे लागले नाही. मी तो अनुभव महाराष्ट्राच्या मातीत आमच्या मुंबईतच घेतला. मुंबई मॅरेथॉनमध्ये पळणार्यांची आज खुप काळजी घेतली जात होती. सासरवाडीला आलेल्या जावईबापुंसारखा आमचा जागोजागी पाहुणचार होत होता. सर्वत्र एकच जल्लोष दिसत होता तो म्हणजे, "हर दिल मुंबई". प्रेक्षक आपापल्या परीने मॅरेथॉनचा आनंद घेत होते. परंतु सहभागी स्पर्धकांसाठी मॅरेथॉनमध्ये धावणे ही आनंदाची गोष्ट मूळीच नसते. प्रत्यक्ष धावणारे हे वेगळ्याच विश्वात गेलेले असतात. छातीच्या धडधडीचा वेग हा आगगाडीच्या धडधडीच्या वेगापेक्षाही जास्त झालेला असतो. त्या शोलेतील आगगाडीची धडधड आठवा आणि त्यात कोळसा टाकणारा वीरू म्हणजे धर्मेंद्र. अगदी तशीच अवस्था शरीराची झालेली असते. एकदाची अंतिम रेषा येवोत आणि या धावण्याच्या कटकटीतुन मुक्त व्हावे असे मनापासुन वाटायला लागले होते. अरे ही मॅरेथॉन संपत का नाही आहे? हा प्रश्न "ये दिवार टुटती क्युं नहीं?" या जाहीरातीतील सुरासारखा केविलवाण्या स्वरात विचारावासा वाटत होता. मी फिनिश लाईनला सहीसलामत पोचेल ना आज? माझी सब-फोर होईल की नाही? मला क्रॅंप तर येणार नाही ना? असे नाना प्रश्न मला भेडसावत होते. कितीही त्रास होत असला तरी पायांची गती मंदावलेली नव्हती.
तिसाव्या किमी पर्यंत माझी गती 05:20 मिनिटे प्रती किमी होती. सर्वकाही सुरळीत चाललेले होते. पण मेजवानीच्या जेवणात जसा मीठाचा खडा यावा तसा सुरळीत चाललेल्या माझ्या मॅरेथॉनमध्ये पेड्डर रोड आडवा आला. त्यावेळेस पेड्डर रोडशी दोनहात करण्याएवढे त्राण माझ्या अंगात शिल्लक राहीलेले नव्हते. परीस्थिती बिकट असेल तर दोन पावले मागे आलेले केव्हाही उत्तम. मी पेड्डरच्या चढावर चालत चालत जाण्याचा निर्णय घेतला. चढावरील अंतर चालत चालत पार करत असताना माझे जिवलग मित्र मला भेटले. पेड्डर रोडच्या हायड्रेशन पॉईंटवर ते अधिकृत वोलिंटियर्स म्हणुन काम पाहत होते. "भाऊ रन..." असा जोरात आवाज देऊन त्यांनी माझ्यात नवचैतन्य भरण्याचा प्रयत्न केला. डाव्या मांडीच्या स्नायुने कुरबुर करायला सुरूवात केली होती त्यामुळे चढावर कमी झालेल्या गतीची कसर उतारावर भरून काढता आली नाही. डाव्या मांडीचा स्नायु गतीला प्रतिसाद देईनासा झाला होता. गती वाढवायला गेलो की वेदनेची कळही वाढत असे. मोडकळुन पडण्यापेक्षा जी गती मिळेल त्या गतीने धावण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय योग्य ठरला. ईथुन पुढे प्रत्येक किमीला आवश्यक असणारी गती राखणे मला कठीण जाऊ लागले होते.
आता चारच किमी राहीले आहे, आता तीनच, आता दोनच असे करत करत मरीन ड्राईववरून डावीकडे वळालो. तेव्हा अवघे चारशे मीटर शिल्लक होते. हाफ मॅरेथॉन पळुन झालेले स्पर्धक अम्बॅसॅडर हॉटेलजवळ ऊभे राहुन थकलेल्यांचा ऊत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत होते. पंक्चर झालेले चाक हवा भरून कसेबसे पंक्चरच्या दुकानापर्यंत पोचवतात तसे हे आमच्या सारख्या हवा गेलेल्या रनर्सना अंतिम रेषेपर्यंत पोचवण्यासाठी आमच्यामध्ये हवा भरत होते. त्यात बरेचसे पुण्यातील असल्यामुळे जरा धीर आला. पुणेवाल्यांनी ऊत्साह वाढवल्यावर मुंबई मॅरेथॉनच्या पताका लावलेल्या रस्त्यावर आलो. तेथुन अंतिम रेषा नजरेच्या टप्प्यात आली. आता थांबायचे नाही असे म्हणत जेवढी हवा शिल्लक होती तेवढी वापरून मी पळत राहीलो. शेवटी मी दिमाखात अंतिम रेषा पार केली आणि मॅरेथॉन पळण्याच्या त्रासातुन मुक्त झालो. मी 3 तास 54 मिनिटे 11 सेकंद वेळ नोंदवली. ही माझी दुसरी मुंबई मॅरेथॉन. दोन्हीही सब-फोर आहेत आणि आजचा हा माझा वैयक्तिक विक्रम. अंतिम रेषेजवळ दोन मिनिटे शवासन केल्यानंतर आता मेडल घेण्यासाठी निघालो. तिथुन मेडल घेण्यासाठी एक-दिड किमी पायपीट करावी लागली. मेडल मिळाले त्यानंतर मस्त हिरवळीवर ऊन खात पडुन राहीलो. खुप हौस ना मॅरेथॉन पळण्याची, पळशील का आता मॅरेथॉन? तर त्यावेळेस माझे उत्तर "नाही" असे होते.