Friday 20 January 2023

मुंबई मॅरेथॉन 2023 (पूर्वतयारी)

मुंबई मॅरेथॉन 2023 (पूर्वतयारी) 


 ग्रंथांमध्ये जशी गीता, नद्यांमध्ये जशी गंगा, गडांमध्ये जसा दुर्गदुर्गेश्वर रायगड, देवांमध्ये जसा इंद्र, पक्ष्यांमध्ये जसा गरूड, पर्वतांमध्ये जसा मेरू पर्वत, मण्यांमध्ये जसा कौस्तुभ मणी, वैष्णवांमध्ये जसा शंभू आणि अप्सरांमध्ये जशी ऊर्वशी तशी सर्व मॅरेथॉनमध्ये मुंबई मॅरेथॉन. पळण्याचे वेड लावणारी मुंबई मॅरेथॉन. हर दिल मुंबई म्हणजे मुंबई मॅरेथॉन. रनिंगची पंढरी म्हणजे मुंबई मॅरेथॉन. अशा या मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतल्याशिवाय स्वत:ला रनर म्हणुन घेणार्या कोणत्याही व्यक्तीला सदगती प्राप्त होणे शक्य नाही. याचसाठी केला होता अट्टहास असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यावर्षी मुंबई मॅरेथॉन पुनरागमन करणार होती आणि मी मात्र रनिंगपासुन फार दुर गेलेलो होतो.


17 सप्टेंबरला आमचा बहुचर्चित दुधसागर ट्रेक संपन्न झाला आणि मी 2022 सालातील नियोजीत सहली आणि ईच्छेनुसार आखलेल्या सर्व ट्रेक्समधुन मोकळा झालो. याच कालावधीत बहुचर्चित मुंबई मॅरेथॉनची नावनोंदणी सुरु होणार अशी चर्चा ऐकायला मिळाली. यामुळे मुंबई मॅरेथॉनच्या चर्चेला उधाण आलेले होते. कोरोना महामारीमुळे 2021 आणि 2022 अशी दोन वर्षे मुंबई मॅरेथॉन होऊ शकली नव्हती. मी 2020 साली मुंबई मॅरेथॉनमध्ये पहील्यांदा भाग घेतला होता आणि तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो होतो. "लव अ‍ॅट फर्स्ट साईट" म्हणतात ना अगदी तसेच. प्रेम झाले खरे पण प्रेम म्हटले कि ओघाने विरह आलाच. मॅरेथॉनच्या प्रेमात विरह सहन करावा लागेल असा मी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. दोन वर्षांचा असह्य विरह सहन करावा लागला. 2023 साली मुंबई मॅरेथॉन पुन्हा भेटीला येण्यासाठी तयार होत होती. तिच्या भेटीसाठी मीही आतुर झालेलो होतो. आता प्रेयसीला भेटायचे म्हटल्यावर जय्यत तयारी करणे भाग होते. कॉलेजच्या दिवसांपासुन मी या कामामध्ये आवश्यक कौशल्य प्राप्त केलेले आहे. मुंबई मॅरेथॉन भेटीच्या तीव्र ईच्छेनेच मला रनिंग सुरु करण्यास प्रवृत्त केले. 


माझे रनिंग जवळजवळ एक वर्षापासुन बंद होते. काहीच सराव न केल्यामुळे पायांना गंज चढलेला होता. हा गंज उतरवणे अपरीहार्य होते. फुफ्पुस आणि हृदय तर म्हणत होते कि "पुन्हा त्या रनिंगच्या फंदात नको" पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत मी रनिंगचा फिटनेस पुन्हा मिळवण्याचा ठाम निर्धार केला. रनिंग हा असा व्यायाम आहे ज्यामध्ये घाई करून चालत नाही. कसलीही घाई न करता क्रमाक्रमाने धावण्याची क्षमता पुन्हा प्राप्त करणे क्रमप्राप्त होते. घाई केल्यास दुखापत होण्याची शक्यता असते. पुनरागमन करताना आपल्या मनामध्ये जी धावण्याची गती असते ती शरीराला झेपत नाही. त्यामुळे शरीराच्या कलाकलाने घेतलेले केव्हाही उत्तम भले आपले मन परीकथेतील घोड्यासारखे धावत असले तरीही.


सुरूवात करण्यासाठी नवरात्री वॉक चॅलेंजच्या निमित्ताने एक चांगली संधी चालुन आली. नऊ वेगवेगळ्या रंगांचे टि-शर्ट आणि सलग नऊ दिवस मित्र-मैत्रिणींसोबत हत्ती डोंगरावर चालायला जात होतो. खुप मज्जा येत असे. हत्ती डोंगरावर चालण्याचा व्यायाम केल्यामुळे हृदय आणि पायाच्या स्नायुंना थोडी बळकटी मिळाली. तरीही पूर्वीच्या गतीने धावता येईल कि नाही याबद्दल शंका वाटत होती. मी दसर्याला शस्त्रपूजनासोबत नाईकी शूजचे पुजन केले आणि 8 ऑक्टोबरपासुन पळायला सुरूवात केली. मी रनिंगच्या प्रोसेसवर विश्वास ठेवुन स्वत:च स्वत:साठी वर्कआउट तयार करत गेलो आणि स्वत:च त्याचे मुल्यमापन करून स्वत:लाच सुचना देऊ लागलो होतो. न थांबता पाच किमी अंतर पळण्यापासुन मी सुरूवात केली. खुप दिवसांनी पाच किमी पळाल्यामुळे खुप दम लागला. न थांबता पाच किमी पळणे किती अवघड असु शकते याची मी प्रचिती घेतली. या पाच किमी मध्ये छातीचा भाता चांगलाच फुलला होता. अल्कोहोल आणि धूर सोबतच बाहेर पडत होते. अंतर पाच किमी, लागलेला वेळ 31 मिनिटे 32 सेकंद. एवढा त्रास झाला कि ती मुंबई मॅरेथॉनची झंझट नको असे वाटले होते. मॅरेथॉन पळणे माझ्या आवाक्याबाहेर गेलेले आहे हे मला स्पष्ट जाणवत होते. मित्र-मैत्रिणींसोबत पार्ट्या करून जीवनाचा आनंद घ्यायचा कि पळायला जाऊन स्वत:ला त्रास करून घ्यायचा असे दोन पर्याय माझ्यासमोर होते. मी दुसरा पर्याय निवडला. "Love the pain" हे माझे आवडते ब्रीदवाक्य मला आठवले.


दर आठवडयाच्या शेवटी म्हणजे रविवारी 10 किमी, त्याच्या पुढच्या रविवारी 15 किमी, त्याच्या पुढच्या रविवारी 20 किमी तर त्याच्या पुढच्या रविवारी 25 किमी अंतर पळण्याचा वर्कआऊट मी तयार केला. या पद्धतीने गेल्यास धावण्याचे सामर्थ्य पुन्हा प्राप्त होईल यात मला काहीही शंका वाटत नव्हती. रनिंगला जाताना मी एकटाच असायचो, ना कोणाची सोबत ना कुठला ग्रुप. असे करत करत नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी न थांबता 30 किमी अंतर 6 पेक्षा कमी गतीने धावलो. ईथेच मला जाणवले कि माझे पुनरागमन यशस्वी झालेले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महीन्यात 200+ किमी अंतर धावाधाव केली. नोव्हेंबर महीना खुप खडतर गेला. डिसेंबर महीन्यात सातत्य ठेवणे गरजेचे होते. जे मिळवलंय ते जोपासण्याची गरज होती. मी विनासायास सब-टू हाफ मॅरेथॉन करू लागलो. या सर्व कालावधीत स्टेडफास्ट नुट्रीशन माझ्या सोबतीला होते. प्रोटीनमुळे रिकवरी खुप छान होत असे त्यामुळे मला कसलीही चिंता नव्हती. अशा रीतीने दोन-अडीच महीने स्वत:च्याच तालमीत तावुन सुलाकुन निघाल्यानंतर मी नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालो. 


जानेवारी उजाडल्यानंतर फक्त मुंबई मॅरेथॉनची आस लागलेली होती. "भेटीलागी जीवा" या तुकोबांच्या अभंगासारखी. आदल्या दिवशी आम्ही ट्रेनने मुंबईला निघालो. पुणे-मुंबई ट्रेनचा प्रवास नेहमीप्रमाणे ऊत्साहवर्धक होता. ट्रेनमधील पन्नास टक्के प्रवासी मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावयास निघालेले होते. बीआयबी घ्यायला जाणे हे फार कटकटीचे काम असते. दादर ते कुर्ला हा लोकल ट्रेनचा प्रवास फार जीवावर येतो म्हणुन आम्ही यावेळेस ठाण्याला उतरून लोकलने कुर्ल्याला पोचलो. आपला बीआयबी दुसर्याला आणावयास सांगणे यासारखे सुख नाही. दुसर्याला बीआयबी आणायला सांगणारे लोक खरेच खुप हुषार म्हणायला हवेत. पुन्हा रूबाबात म्हणायला मोकळे की तुझे आणायला जाणारच होतास ना मग माझे आणले म्हणुन काय झाले? असोत. बीआयबी घेण्याच्या नादात जेवणाची वेळ निघुन गेली. पाठीवर वजनदार बॅग घेऊन मुंबई दर्शन केल्यामुळे थकवा सुद्धा आला. पुढच्या वर्षी हे टाळणे गरजेचे आहे असे मला जाणवले. त्यामुळे आता असे ठरवले आहे कि पुण्याहुन निघालो कि सर्वप्रथम हॉटेलवर जायचे, पाठीवरची सॅक हॉटेल रूमवर ठेवायची, मस्त जेवण करून घ्यायचे आणि मग निवांत एक्स्पोमधील गर्दी कमी झाल्यावर बीआयबी घ्यायला जायचे. अनावश्यकपणे उपासमार आणि दमछाक ओढवुन घेण्यात काहीही अर्थ नाही. ही माझ्या सुपीक डोक्यातुन आलेली कल्पना आहे. बीआयबी घेऊन हॉटेल शबानावर पोचलो आणि मॅरेथॉन पळण्याच्या तयारीला लागलो. आता उद्या मुंबई मॅरेथॉन पळणार या कल्पनेनेच अंगावर रोमांच उभे राहत होते.

क्रमश:

 


No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...