Tuesday, 25 March 2025

आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-२


आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-२ 


पूढे चालू

टायमिंग चिप असलेला बिब सायकलच्या सीटखाली आणि साधा बिब जर्सीवर लावला. हेल्मेटला पुढे आणि मागे चिकटवण्यासाठी बिबचे स्टीकर दिलेले होते. फोटो मिळवण्यासाठी हे बिबचे स्टिकर महत्वाचे असल्यामुळे ते व्यवस्थित लावले. मग सायकल म्हणजे मेरीडा (मेरी डार्लिंग) रेससाठी सज्ज केली. सोबत आणलेल्या मोठया पंपाने चाकात ११० पीएसआय हवा भरली. गेटॉरस्कीन टायर सहाव्या वर्षात पदार्पण करूनही अजून दणदणीतपणे सायकलचा वेग आणि भार पंक्चर न होता सांभाळत आहेत. पंक्चर रुपी विघ्न सध्या तरी दोन हात लांब आहे. ब्रेक लागतोय का आणि ब्रेकचे रबर रीमला घासत नाहीयेत ना याची खात्री करुन घेतली. शर्यत सुरू होताना गर्दीमध्ये धडपडण्याची शक्यता असल्यामुळे सायकल कमी गियरवर सेट केली. सायकलला लावलेल्या सिपर बाटलीमध्ये स्टेडफास्ट न्युट्रीशनचे सेनर्जी आणि कार्बोरन्स भरुन घेतले आणि तशीच एक बाटली घशाखाली उतरवली. कार्बोरन्स घेतले की तहानभूकेची चिंता मिटते आणि रेसमध्ये आपली शारिरीक क्षमता पूर्ण ताकदीनिशी वापरता येते.

शर्यत बरोबर साडेपाच वाजता सुरु झाली. प्रारंभ रेषेपासुन मागे थांबलेलो असल्यामुळे हौशी सायकलस्वारांमधून रस्ता काढता काढता नाकी नऊ आले. गर्दीतून वेग घेणे अतिशय अवघड गेले. महामार्गाचा पूल येईपर्यंत मी आवश्यक असलेला वेग पकडला आणि सायकलस्वारांच्या गर्दीतून पटकन पुढे सटकलो. सरासरी ३० चा वेग यावा ही माफक अपेक्षा ठेवलेली होती. मला अल्पशा सरावावर ३० चा सरासरी वेग राखणे आव्हानात्मक वाटत होते. पण मी हे आव्हान स्विकारले. रोडबाईकवर ३० चा सरासरी वेग आला नाही तर ती वापरण्याला काहीएक अर्थ नाही. हेडटॉर्चच्या तुटपुंज्या उजेडामुळे मला रस्त्यावरच्या दिव्यांवर अवलंबून रहावे लागत होते. काही कार्बन फायबरवाले रायडर माझ्याशी स्पर्धा करु लागले. माझी साधीसुधी रोडबाईक असुनसुद्धा मी त्यांच्या वेगाशी बरोबरी करत होतो. धावण्याच्या शर्यतीत धावकांना ज्याप्रकारे पाण्याच्या बाटल्या देतात अगदी तशाच प्रकारे सायक्लोथॉनमध्ये सायकलस्वारांना देण्यात येत होत्या. पन्नास किमी साठी मला माझी एक सिपर बॉटल पुरेशी वाटत होती. 

औंधवरून रावेतकडे जाणारा बीआरटी मार्ग फक्त सायकलस्वारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला होता. त्या मार्गावर फक्त आणि फक्त सायकलस्वारच दिसत होते. शर्यत चालू असेपर्यंत ज्यांच्यासाठी बीआरटी मार्ग बनवला आहे त्या महानगरपालिकेच्या बसेसना सुद्धा त्यावर प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली होती. त्यामुळे इतर वाहनांची पर्वा न करता बिनधास्तपणे फक्त आणि फक्त सायकल पळवण्यावर लक्ष केंद्रित करता येत होते. ओबडधोबड गतिरोधकांवरुन सायकल गेल्यावर घोडयावर सवारी केल्याचा भास होत होता. सायकलस्वार अंधारात चाचपडू नयेत म्हणून आयोजकांनी काही ठिकाणी रस्त्यालगत मोठे दिवे लावून अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न केलेला होता. आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात आलेली होती. पाणी देणारे कार्यकर्ते मोठया जोमाने त्यांचे कार्य करत होते. 

मुकाई चौकापर्यंत अंधारात चाचपडत चाललोय असे वाटत होते कारण माझ्या टॉर्चचा उजेड माझ्या वेगाला साजेसा नव्हता. सायकलचा वेग आणि टॉर्चची प्रखरता हे सम प्रमाणात असण्याऐवजी व्यस्त प्रमाणात होते. प्रखर उजेड देणारा डीप्पर वापरण्याऐवजी मी मेणबत्ती घेऊन सायकल चालवत होतो. "कहीं दिप जले कहीं दिल.." गाण्यातील वहिदा रेहमानसारखा. त्यामुळे एक-दोन वेळा अंधारात न दिसलेल्या भागावरून सायकल टणकन उडाली आणि तशीच एक-दोन वेळा धाडकन आपटली सुद्धा पण हातांची पकड मजबुत असल्यामुळे सायकल आणि मी धडपडलो नाही. मुकाई चौक जवळ येऊ लागला तसे झुंजुमुंजू होऊ लागले. "तमसो मा ज्योतिर्गमय..." मी अंधारातुन प्रकाशाकडे जाऊ लागलो पण नेमका त्याचवेळी मुकाई चौक ते भक्ती-शक्ती कडे जाणारा चढाचा रस्ता सुरु झाला. भरपूर उजेड येऊनही त्या चढावर मला सायकल पळवता आली नाही. आतापर्यंत ३०च्या वर राखलेला सरासरी वेग हळुहळू ३०च्या खाली सरकू लागला. ते पाहुन माझ्या मनाची तगमग होऊ लागली. मी "हे प्रभू...हे हरिराम" म्हणू लागलो. आता सरासरी वेग ३०च्या वर नेण्यासाठी परतीच्या प्रवासातील प्राधिकरणाचा उतार हाच मला एकमेव आशेचा किरण दिसत होता. मी त्या उतारावर स्वार होत संधीचे सोने केले आणि सरासरी वेग पुन्हा ३०च्या वर आणण्यात यशस्वी झालो. सरासरी वेग पुन्हा ३०च्या वर आल्यावर मला खूप समाधान वाटले. संत तुकाराम पुलावरून (बास्केट ब्रीज) डावीकडे वळाल्यावर रावेत ते औंध या बीआरटी मार्गावर आरामात पाहीजे तेवढा वेग घेता येईल असा माझा समज होता. सायकल चालवताना या मार्गावर उड्डाणपुलांच्या चढ-उतारांमुळे मस्त वेग मिळतो परंतू बीआरटी मार्गावर उड्डाणपुल नाहीत हे मला त्यादिवशी माहीत झाले. चढ-उतार नसल्यामुळे वेग मिळवण्यासाठी पायांतुन जोर लावावा लागत होता जे अतिशय कठीण जात होते. ३०चा सरासरी वेग राखण्यासाठी परिस्थिती पुन्हा गंभीर झाली. शेवटच्या ६ किमीमध्ये मी खूप जोरात सायकल चालवल्यामुळे ३०चा सरासरी वेग राखण्यात यश आले. सुरूवातीला भेटलेले दोन कार्बन-फायबर रोडबाईकवाले शेवट्च्या २ किमी पर्यंत माझ्याशी शर्यत लावण्यात व्यस्त होते. शेवटी मी म्हटले, "ईनको नहीं हराया तो फिर रेस करने का मजा ही क्या है?" त्यांना मागे टाकून मी झपकन पुढे गेलो आणि अंतिम रेषा पार करताना मस्त दोन्ही हात सोडून एसआरकेची पोझ देत कॅमेऱ्यासमोर सायकल चालवत गेलो. फोटोग्राफरने माझे खुप भारी फोटो काढले. अशा रितीने मी आपलं पुणे सायक्लोथॉनमध्ये ५०.३ किमी अंतर ३०.१ च्या सरासरी वेगाने १ तास ४० मिनिटे ९ सेकंदात पूर्ण केले.  

काही ठिकाणी ओबडधोबड रस्ता, अनपेक्षित खड्डे आणि आपल्याकडील उच्च दर्जाच्या डिझाईनचे गतिरोधक असल्यामुळे काही सायकलस्वारांचे भरपूर नुकसान झाले. एका रायडरची सायकल खड्डयात जोरात आपटल्यामुळे महागडी कार्बनची चाकेच निकामी झाली. काहींच्या पाण्याच्या बाटल्या उडून रस्त्यावर पडल्या, काहींचे टॉर्च पडले आणि काहींचे सायकलला लावलेले जीपीएस सुद्धा उडून पडले. काहींनी दुसऱ्याच्या बिबवर शर्यत पूर्ण केली. काहीजण रस्ता चूकल्यामुळे शर्यतीच्या मार्गावरून भरकटले. काही ट्रायथलॉन करणाऱ्यांनी मस्त एरोबार लावुन सायकल चालवली. १००किमी शर्यतीचे अंतर प्रत्यक्षात फक्त ९५ किमीच होते त्यामुळे स्पर्धकांमध्ये निराशेचे वातावरण होते. त्यामुळे बऱ्याच जणांनी तीन तासांच्या आत वेळ नोंदवलेली असली तरी त्याला सब-थ्री म्हणता येणार नाही. शर्यत संपल्यावर खायला प्यायला भरपूर प्रमाणात उपलब्ध होते. विमानतळावर जशी खाण्यापिण्यासाठी विशेष लाँज असते तशी आपलं पुणे सायक्लोथॉनमध्ये विशेष व्यक्तींसाठी मोठ्या आकाराची एक लाँज बनवलेली होती. क्रेडिट कार्ड घरी राहिल्यामुळे मला तिकडे जाता आले नाही. खरं सांगायचं तर मला चहा पिण्याची खूप ईच्छा झाली होती पण शर्यतीनंतर चहाची व्यवस्था केलेली नव्हती. या सायक्लोथॉनमध्ये पेसर नसतात, फक्त रेस अँबेसिडर असतात. बक्षिस समारंभ आटोपल्यानंतर मी परतीच्या प्रवासाला लागलो. 

अवश्य सहभागी व्हावे अशी ही आपलं पुणे सायक्लोथॉन स्पर्धा आहे. 

-आयर्नमॅन वि. सु. वसवे.  
२५/०३/२०२५

आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-१


स्पर्धेचे नाव - पुणे सायक्लोथॉन
ठिकाण - शिवछत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी
आयोजक - चॅंप एन्ड्युरन्स
तारीख - 16 मार्च, 2025
अंतर - 50 किमी
वयोगट - 35च्या पुढील पुरूष 
बंदुकीतून गोळीबार - पहाटे 05:30 वाजता (गनटाईम)

यावर्षीच्या सायक्लोथॉनमध्ये बऱ्याच जणांनी पनास टक्के सवलतीचा फायदा घेऊन नावनोंदणी करुन ठेवलेली होती पण मी मात्र नाव नोंदवलेले नव्हते. मी ठरवले होते की जेव्हा सहभाग घेण्याचे नक्की होईल तेव्हाच नावनोंदणी करु, भले सवलत मिळो अथवा न मिळो. कारण त्या तारखेला अचानक काही वेगळे करावेसे वाटले तर नावनोंदणीचे पैसे वाया जायला नकोत म्हणून हा खटाटोप. तसेही आता पगार वाढलेला असल्यामुळे प्रवेश फी भरताना सवलत वगैरे मिळाली नाही तरी फारसा फरक पडत नाही. आता प्रवेश फी भरताना पहिल्यासारखी चणचण जाणवत नाही. ते जुने दिवसच खुप भारी होते, ओढाताण आणि चणचण यांच्याशी छान गट्टी जमली होती. तेव्हा रोडबाईक घेण्याची दांडगी ईच्छा असूनही चणचणीमुळे घेऊ शकत नव्हतो आणि आता लगेच याक्षणी म्हटले तरी नविन रोडबाईक घेऊ शकतो पण रोडबाईक चालवण्याची ती दांडगी ईच्छा माझ्यात शिल्लक राहीलेली नाही. दिवस कसे बदलतील सांगता येत नाही. पण कधी कधी माझे ते सायकलवरचे जुने प्रेम पुन्हा उफाळून येते. सायकलिंग म्हणजे माझ्या फिटनेसच्या प्रवासातील माझे पहिले प्रेम. पहिले प्रेम काही केल्या विसरता येत नाही असे म्हणतात. हे माझे पहिले प्रेम जिवंत ठेवण्यासाठी मी अधूनमधुन सायकल चालवायला जातो. 

पुणे सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्याची ही माझी पहिलीच वेळ. सायकल चालवताना झालेल्या माझ्या अपघातांचा मी एवढा धसका घेतलेला आहे की भर रस्त्यावर किंवा वाहनांच्या गर्दीत सायकल चालवायचे म्हटले की मला धडकीच भरते. अनेक भीषण अपघातातून पांडुरंगाने मला सहीसलामत वाचवलेले आहे. आता माझा शेवटचा अपघात होऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि मला त्याचा विसर पडलेला आहे. जखम बरी झाल्यावर तिला कुरवाळताना एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती होते आणि ती बरी झालेली जखम आपण स्वत: होऊनच कौतुकाने इतरांना दाखवतो तसे मीही आता कौतुकाने माझ्या सायकलवर झालेल्या अपघातांची चर्चा करत असतो. तसेच खूप दिवस सायकल चालवली नाही तर मला सायकलचा विरह सुद्धा सहन होत नाही, शेवटी पहिले प्रेम. सायकल चालवण्यासाठी 16 मार्च हा दिवस सुयोग्य वाटत होता कारण तोपर्यंत मी सहभाग नोंदवलेल्या सर्व मॅरेथॉन संपणार होत्या. ऊशिरा नाव नोंदवूनही मला 25 टक्के सवलत मिळाली.

नाव नोंदवणे आणि प्रत्यक्ष सहभागी होणे यापेक्षा मला बिब आणायला जाणे महाकठीण वाटते. दैवयोगाने सायक्लोथॉनचे बिब घेताना कोणतीही समस्या आली नाही. मला एकतर शनिवारी सुट्टी नसते आणि सर्व स्पर्धांचे प्रदर्शन आणि बिब घेणे हे शनिवारीच ठेवलेले असते. बरेचजण माझ्याकडुन सल्ला किंवा संबंधीत माहीती वगैरे विचारत असतात एकदा अशाच एका सल्ला घेणाऱ्या व्यक्तीला माझे बिब घे म्हणालो तर म्हणतो, "आपले बिब आपली जबाबदारी". तो तिथे जाणार असूनसुद्धा माझे बिब घेतले नाही. मला वाटले की सल्ला वगैरे विचारतो तर घेईल माझे बिब पण नाही, एवढे कृतघ्न लोक या समाजात आहेत. कोणाला मदत करावी की नाही असा प्रश्न पडतो. मी पण म्हटले, "हा बाजीराव असेल तर त्याच्या घरी" आपल्याला त्याचे काय कौतुक? मी त्याला सर्व ठिकाणी डिलिट करून टाकले. पण काही मदत घेणारे खरंच चांगले असतात, अशापैकी काहींनी माझे बिब कैकवेळा घरपोच आणुन दिलेले आहे. "प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया" श्री भगवंतांनी गीतेत सांगितले आहे की कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर अगोदर दंडवत करुन सेवा करावी आणि मगच प्रश्न विचारावा. पण आजकाल सेवा करण्याची मनोवृत्ती नाहीशी होत चाललेली आहे. असोत... माझ्यासारखे बिब घेण्याची समस्या असणारे बरेचजण असतात. "गरज ही शोधाची जननी आहे" असे म्हणतात. यावरुन एखादा व्यक्ती नाममात्र शुल्क आकारुन बिब घेण्याचा व्यवसाय सुद्धा सुरू करु शकतो. बघा कसं जमतंय.
क्रमश:


आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-२

आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-२  पूढे चालू टायमिंग चिप असलेला बिब सायकलच्या सीटखाली आणि साधा बिब जर्सीवर लावला. हेल्मेटला पुढ...