Tuesday, 25 March 2025

आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-१


स्पर्धेचे नाव - पुणे सायक्लोथॉन
ठिकाण - शिवछत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी
आयोजक - चॅंप एन्ड्युरन्स
तारीख - 16 मार्च, 2025
अंतर - 50 किमी
वयोगट - 35च्या पुढील पुरूष 
बंदुकीतून गोळीबार - पहाटे 05:30 वाजता (गनटाईम)

यावर्षीच्या सायक्लोथॉनमध्ये बऱ्याच जणांनी पनास टक्के सवलतीचा फायदा घेऊन नावनोंदणी करुन ठेवलेली होती पण मी मात्र नाव नोंदवलेले नव्हते. मी ठरवले होते की जेव्हा सहभाग घेण्याचे नक्की होईल तेव्हाच नावनोंदणी करु, भले सवलत मिळो अथवा न मिळो. कारण त्या तारखेला अचानक काही वेगळे करावेसे वाटले तर नावनोंदणीचे पैसे वाया जायला नकोत म्हणून हा खटाटोप. तसेही आता पगार वाढलेला असल्यामुळे प्रवेश फी भरताना सवलत वगैरे मिळाली नाही तरी फारसा फरक पडत नाही. आता प्रवेश फी भरताना पहिल्यासारखी चणचण जाणवत नाही. ते जुने दिवसच खुप भारी होते, ओढाताण आणि चणचण यांच्याशी छान गट्टी जमली होती. तेव्हा रोडबाईक घेण्याची दांडगी ईच्छा असूनही चणचणीमुळे घेऊ शकत नव्हतो आणि आता लगेच याक्षणी म्हटले तरी नविन रोडबाईक घेऊ शकतो पण रोडबाईक चालवण्याची ती दांडगी ईच्छा माझ्यात शिल्लक राहीलेली नाही. दिवस कसे बदलतील सांगता येत नाही. पण कधी कधी माझे ते सायकलवरचे जुने प्रेम पुन्हा उफाळून येते. सायकलिंग म्हणजे माझ्या फिटनेसच्या प्रवासातील माझे पहिले प्रेम. पहिले प्रेम काही केल्या विसरता येत नाही असे म्हणतात. हे माझे पहिले प्रेम जिवंत ठेवण्यासाठी मी अधूनमधुन सायकल चालवायला जातो. 

पुणे सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्याची ही माझी पहिलीच वेळ. सायकल चालवताना झालेल्या माझ्या अपघातांचा मी एवढा धसका घेतलेला आहे की भर रस्त्यावर किंवा वाहनांच्या गर्दीत सायकल चालवायचे म्हटले की मला धडकीच भरते. अनेक भीषण अपघातातून पांडुरंगाने मला सहीसलामत वाचवलेले आहे. आता माझा शेवटचा अपघात होऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि मला त्याचा विसर पडलेला आहे. जखम बरी झाल्यावर तिला कुरवाळताना एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती होते आणि ती बरी झालेली जखम आपण स्वत: होऊनच कौतुकाने इतरांना दाखवतो तसे मीही आता कौतुकाने माझ्या सायकलवर झालेल्या अपघातांची चर्चा करत असतो. तसेच खूप दिवस सायकल चालवली नाही तर मला सायकलचा विरह सुद्धा सहन होत नाही, शेवटी पहिले प्रेम. सायकल चालवण्यासाठी 16 मार्च हा दिवस सुयोग्य वाटत होता कारण तोपर्यंत मी सहभाग नोंदवलेल्या सर्व मॅरेथॉन संपणार होत्या. ऊशिरा नाव नोंदवूनही मला 25 टक्के सवलत मिळाली.

नाव नोंदवणे आणि प्रत्यक्ष सहभागी होणे यापेक्षा मला बिब आणायला जाणे महाकठीण वाटते. दैवयोगाने सायक्लोथॉनचे बिब घेताना कोणतीही समस्या आली नाही. मला एकतर शनिवारी सुट्टी नसते आणि सर्व स्पर्धांचे प्रदर्शन आणि बिब घेणे हे शनिवारीच ठेवलेले असते. बरेचजण माझ्याकडुन सल्ला किंवा संबंधीत माहीती वगैरे विचारत असतात एकदा अशाच एका सल्ला घेणाऱ्या व्यक्तीला माझे बिब घे म्हणालो तर म्हणतो, "आपले बिब आपली जबाबदारी". तो तिथे जाणार असूनसुद्धा माझे बिब घेतले नाही. मला वाटले की सल्ला वगैरे विचारतो तर घेईल माझे बिब पण नाही, एवढे कृतघ्न लोक या समाजात आहेत. कोणाला मदत करावी की नाही असा प्रश्न पडतो. मी पण म्हटले, "हा बाजीराव असेल तर त्याच्या घरी" आपल्याला त्याचे काय कौतुक? मी त्याला सर्व ठिकाणी डिलिट करून टाकले. पण काही मदत घेणारे खरंच चांगले असतात, अशापैकी काहींनी माझे बिब कैकवेळा घरपोच आणुन दिलेले आहे. "प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया" श्री भगवंतांनी गीतेत सांगितले आहे की कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर अगोदर दंडवत करुन सेवा करावी आणि मगच प्रश्न विचारावा. पण आजकाल सेवा करण्याची मनोवृत्ती नाहीशी होत चाललेली आहे. असोत... माझ्यासारखे बिब घेण्याची समस्या असणारे बरेचजण असतात. "गरज ही शोधाची जननी आहे" असे म्हणतात. यावरुन एखादा व्यक्ती नाममात्र शुल्क आकारुन बिब घेण्याचा व्यवसाय सुद्धा सुरू करु शकतो. बघा कसं जमतंय.
क्रमश:


No comments:

Post a Comment

आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-२

आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-२  पूढे चालू टायमिंग चिप असलेला बिब सायकलच्या सीटखाली आणि साधा बिब जर्सीवर लावला. हेल्मेटला पुढ...