प्रतिबिंब
नेत्रांना जे सुखावुन गेले मनाला जे भावले त्यांचे मनात उमटलेले प्रतिबिंब येथे शब्दात उतरवण्याचा प्रयत्न.
Tuesday, 25 March 2025
आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-२
आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-१
Saturday, 22 April 2023
कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत
शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा
आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लबमार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथाअंतर - 29 किमीतारीख - 16 एप्रिल, 2023रनिंगमध्ये मॅरेथॉनची वेळ सुधारण्याच्या नादात माझे सायकल चालवणे मागे पडले होते हे मला मान्य करावेच लागेल. गेली दोन वर्षे झाले पन्नास हजार किमी सायकलिंगचा टप्पा गाठण्यासाठी फक्त एक हजार पेक्षाही कमी अंतराची आवश्यकता असताना माझ्याकडुन तोही पार झालेला नाही. जुन महीन्यातील पुणे पंढरपुर सायकलवारी झाल्यानंतर सायकल स्वच्छ करुन मस्तपैकी टांगुन ठेवुन दिली होती. यावर्षीची टाटा अल्ट्रा मॅरेथॉन पुर्ण केल्यानंतर पायांना थोडी विश्रांती द्यावी असे मी ठरवले होते. याच दरम्यान अंजलीने मला "कुंभार्लीचा राजा" या सायकल शर्यतीविषयी माहीती दिली. सह्याद्रीच्या घाटात सायकल शर्यत आयोजित केली जात आहे हे ऐकुनच मला फार आनंद झाला आणि क्षणाचाही विलंब न लावता मी या शर्यतीसाठी नाव नोंदवले. कोकणातुन वर यायचे असेल तर सह्याद्रीत अनेक घाटरस्ते आहेत. त्यापैकी बरेच मी सायकलवर चढवलेले आहेत. मराठा रमतो तो सह्याद्रीतच. भोरघाट, ताम्हीणी घाट, वरंधा घाट, आंबेनळी (रडतोंडी) घाट आणि करूळ घाट (बावडा) हे सर्व माझे झालेले आहेत. आता त्या यादीत कुंभार्लीची भर पडणार होती. कुंभार्ली घाट सायकलवर चढवण्याची चालुन आलेली संधी मला सोडायची नव्हती म्हणुन काडीचाही सराव नसताना मी हे शिवधनुष्य पेलण्याचे ठरवले. कुंभार्लीच्या ओढीने मी पुन्हा सायकलकडे ओढला गेलो.शर्यतीच्या आदल्यादिवशी मी, अंजली आणि नितीन सोबत चिपळूणला पोचलो. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आयोजकांमार्फत चिपळूण येथील माधव सभागृह येथे करण्यात आलेली होती. तसेच हॉटेलमध्ये रहावयाचे असल्यास हॉटेल बुकींगमध्ये डिस्काउंट मिळण्याची व्यवस्था देखिल करण्यात आलेली होती. हॉटेल निवडण्यासाठी तीन ते चार पर्याय उपलब्ध होते. "कुंभार्लीचा राजा" या व्हाटसअप ग्रुपमध्ये क्रमाक्रमाने सर्व माहीती मिळत होती. स्पर्धकांना विवीध पर्याय उपलब्ध होते. माधव सभागृह हे या स्पर्धेचे प्रमुख केंद्र होते. बीआयबी घेण्याची वेळ संध्याकाळी 5 ते 8 आणि जेवणाची वेळ 8 ते 9 ठेवण्यात आलेली होती. सर्वांना बीआयबी सोबत जेवणाचे, नाष्टयाचे आणि चहाचे कूपन देण्यात आले होते. सायकलला लावण्याचा बीआयबी आधुनिक पद्धतीचा होता. तो पाहुन मला मलेशिया आयर्नमॅनमधील माझ्या सायकलच्या बीआयबीची आठवण झाली. अगदी तसाच होता. बीआयबी सोबत दोन इलेक्ट्रॉल आणि एक पीनट बटर चिक्की देण्यात आली होती. या दोन गोष्टी सायकल चालवणार्यांसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. यावरुन असे लक्षात येते की आयोजकांनी सखोल अभ्यास करुन छोटया छोटया गोष्टींचा देखिल खुप बारकाईने विचार केलेला होता. माधव सभागृहामध्ये माझी भेट डॉ. आदित्य पोंक्षे, डॉ. नेहा टिकम आणि तुषार भोईटे यांच्याशी झाली.शर्यतीच्या आदल्या दिवशी "कुंभार्लीचा राजा" या व्हाटसअप ग्रुपमध्ये जी काही इत्यंभुत माहीती दिली जात होती ती वाचुन आमची ऊत्सुकता शिगेला पोचलेली होती. शर्यतीच्या आदल्या दिवशी आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने रस्त्यावरील धोकादायक वाटणारे खड्डे त्वरीत बुजवण्यात आले होते. पुण्यात सायकल चालवणार्यांना विचाराल तर ते खड्डे नव्हतेच मुळी पण तरीही त्यांनी ते बुजवले. जिथे रस्त्याचे काम चालु होते तिथे पिवळ्या रंगाने रस्त्यावर सांकेतिक खाणाखुणा करण्यात आलेल्या होत्या. हायड्रेशन पॉइंट जवळ आला आहे हे कळावे म्हणुन काळ्या रस्त्यावर पिवळ्या रंगाने मोठ्या अक्षरात "H" काढलेला होता. अंतिम रेषा जवळ आली आहे हे कळावे म्हणुन 300मी वर अंतरावर मोठया अक्षरात 300meters असे लिहलेले होते. रस्त्यावरील सांकेतिक चिन्ह वाचत सायकल चालवली तर शर्यत पुर्ण करण्यास कसलीही अडचण येणे शक्य नव्हते. सर्वात आनंदाची बातमी शेवटी देण्यात आली ती म्हणजे शर्यती दरम्यान घाटामध्ये अवजड वाहने रोखुन धरण्यात येणार आहेत. यापेक्षा अजुन काय हवंय? माझी जी सर्वात मोठी धाकधुक होती तीच आयोजकांनी संपवली. त्यामुळे आता घाटातही बिनधास्तपणे सायकल चालवता येणार होती. एकंदरीत या शर्यतीत सायकलपटूंची बडदास्त ठेवली होती. माधव सभागृह येथे सर्वांना शुभरात्री आणि शर्यतीसाठी शुभेच्छांची देवाण-घेवाण केल्यानंतर आम्ही हॉटेलकडे निघालो. संध्याकाळच्या वेळी विवीध दुकानांनी सजलेले चिपळूण शहर अतिशय सुंदर दिसत होते. मुंबई गोवा महामार्गाचे काम चालु असल्यामुळे (कधीपासुन चालु आहे काय माहीत?) चिपळूण ते हॉटेल रिम्जपर्यंतचे तीन किमी अंतर पार करण्यासाठी पाच वेळा मुख्य रस्त्यावरुन खाली उतरावे लागले. हॉटेल रीम्जमध्येही सोईसुविधांची बडदास्त होती. कुंभार्ली घाटात सायकल चालवण्याच्या धास्तीमुळे त्या सुविधांचा उपभोग घेण्याचे टाळले. सकाळी वेळ वाया जाऊ नये म्हणुन शर्यतीची सर्व तयारी आदल्या रात्रीच करुन ठेवली. पहाटे साडेचारचा अलार्म लावुन बेडवर आडवा झालो.क्लिटस घालुन शर्यतीला आरंभ होण्याच्या ठिकाणी पोचण्यासाठी खूप सर्कस करावी लागली कारण रस्त्याचे काम चालू आहे. स्पर्धा चालु होण्याचे ठिकाण म्हणजे बहादुर शेख नाका सायकलपटूंच्या गर्दीने ओसंडुन वाहत होता. प्रेक्षकही ऊत्सुकतेने पाहत होते. मला ऊशिर झाल्यामुळे माझ्या फोनवर आयोजकांचा कॉल येऊन गेलेला होता. मी त्या नंबरवर कॉल करुन माझी उपस्थिती नोंदवली. स्पर्धेतील स्वयंसेवक एकदम तत्पर दिसत होते. प्रथम एलिट गटाला झेंडा दाखवण्यात आला. एलिट गटाची शर्यत सुरु झाल्यानंतर वय वर्ष चाळीशी पार केलेल्या तरुणांची शर्यत सुरु झाली. शर्यत सुरु झाल्या झाल्या नव्वद अंशात वळण घेऊन न धडपडता क्लिट्स पेडलमध्ये अडकवले आणि मग सायकलला गती दिली. सुरुवातीचे दोन ते तीन किमी सर्वजण सुसाट होते. अनेक क्लबमधील नावाजलेले सायकलपटू या शर्यतीत सहभागी झालेले होते. काही अंतरानंतर प्रत्येकाच्या गती आणि क्षमतेनुसार वेगवेगळे गट तयार झाले. नंतर काहीजण एकेकटेच सायकल चालवताना दिसत होते. नंबर काढणारे सायकलस्वार केव्हाच पुढे निघुन गेले होते. त्यांच्याशी आपल्याला पंगा घ्यायचाच नव्हता. वाऱ्यापासून वाचण्यासाठी एक दोन रायडर्सच्या चाकामागे सायकल चालवण्याचा प्रयत्न केला परंतु ते फारच हळू चालवत होते. मग मी पुन्हा एकटाच चालवायला लागलो. फोटोग्राफर दुचाकीवरुन फोटो काढत काढत येत होते. फोटोग्राफर दिसल्यावर मी त्याच्यासमोर ऐटीत सायकल चालवली, काही भन्नाट पोझही दिल्या. एवढ्या लांब येऊन कमीत कमी फोटो तरी चांगले यावेत ही माफक अपेक्षा. परंतु त्या फोटोंमध्ये अजुन मला माझा एकही फोटो दिसलेला नाही. एवढी सुंदर जर्सी, मस्त गॉगल घातलेल्या स्मार्ट सायकलस्वाराचा एकही फोटो न यावा यासारखे दु:ख नाही. होता है होता है...या सर्व धामधुमीत कुंभार्ली घाट सायकलवर पार करावयाचा आहे हे मी विसरलो नव्हतो. याचसाठी केला होता अट्टहास. आज सह्याद्रीतील अजुन एक घाट सायकलवर पार करायला मिळणार या विचाराने मी मनातल्या मनात आनंदी झालो होतो. यासाठी चिपळूण सायकल क्लबचे आभार आणि मैत्रिण अंजली भालिंगे हिचे सुद्धा आभार कारण तिच्यामुळेच मला "कुंभार्लीचा राजा" या शर्यतीबद्दल माहीती मिळाली. हा असा पहिलाच घाट जो शर्यत म्हणून मी सायकलवर चढणार होतो. माझे पेडलवर गरगर पाय फिरवणे चालुच होते. कुम्भार्लीकडे जाणारा रस्ता एकदम भन्नाट होता. माझा सरासरी वेग तीसच्या वर दिसत होता. आदल्या दिवशी व्हाटसअप ग्रुपमध्ये आलेल्या फोटोमध्ये पाहीलेला रस्ता आज मी प्रत्यक्ष पाहत होतो. रस्त्यावर सायकलस्वारांसाठी केलेल्या खुणा पाहुन एखादी व्हिडीओ गेम खेळत आहे असे वाटत होते. पस्तीसच्या वर गती नेणे शक्य वाटत होते परंतु खुप दिवस सायकलिंगचा सराव नसल्यामुळे मी हा धोका पत्करला नाही. क्रँप वगैरे आला किंवा आले तर चढावर सायकल चढवणे दुष्प्राप्य होण्यापेक्षा आरामात शर्यत पूर्ण केलेली केव्हाही उत्तम. घाट सुरु झाल्यानंतर काय वाढुन ठेवले असेल याची पुसटशी सुद्धा कल्पना नसल्यामुळे मी पायातील ऊर्जा वाचवत सायकल चालवत होतो. चढ कसा आहे? सिंहगडासारखा तीव्र असेल की पसरणीसारखा पसरलेला असेल? मध्ये उसंत घ्यायला सपाट रस्ता असेल का? वरंध्यासारखा भयानक तर नसेल ना? असे बरेच प्रश्न मनामध्ये थैमान घालत होते. कारण सह्याद्री कुठे रौद्र रूप धारण करेल सांगता येत नाही.कुंभार्ली एवढा सौम्य होता की तो सुरु झालेला कळलाच नाही. गारमिन घड्याळामध्ये सतरा किमी अंतर दिसल्यावर कळले की आपण घाटात आहोत. अवजड वाहने घाटमाथ्यावरच थांबवल्यामुळे नागमोडी वळणांच्या घाटात सायकल चालवणे सुसह्य झाले होते. सर्व सायकलपटू अगदी थाटात सायकल चालवत होते. या घाटात कुठेही मांड्यांमध्ये जाळ काढणारा तीव्र चढ नाही किंवा मला तसे जाणवले नसावे. अंतर वाढत जाईल तसतसा हलकेच वाढत जाणारा. हळूहळू चढणाऱ्या व्हिस्कीसारखा. कुम्भार्लीचा चढ कुठेही वसकन अंगावर येत नाही. पसरणीपेक्षा सोपा असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मरीआई आणि सिंहगड घाटासारखा चढ ईथे औषधालासुद्धा नाही. थोडक्यात सायकल चालवण्यासाठी कुंभार्ली घाट हा एकदम "गुडबॉय" आहे. ही झाली इतर घाटांशी तुलना पण शेवटी चढ तो चढच असतो. आणि चढावर सायकल चालवताना काय यातना होतात त्या सायकलस्वारांनाच माहीत. चढावर दोन ठिकाणी पाण्याच्या बाटल्या मिळाल्या. त्यामुळे घसा कोरडा पडला नाही. त्यापैकी एके ठिकाणी पाण्याची बाटली आणि केळ दोन्ही उपलब्ध होते. परंतू मला एका हाताने फक्त पाण्याची बाटलीच घेता आली. पुढच्या वेळी केळ आणि बाटली दोन्ही घेण्यात येईल.शर्यतीतले शेवटचे पाच किमी बाकी असताना अंजली भालिंगेने मला मागे टाकले. ती अतिशय वेगात माझ्या पुढे निघुन गेली. महिलांची रेस पाच मिनिटे ऊशिरा सुरु होऊन सुद्धा तिने हे अंतर जलदगतीने पार केले होते. दुसऱ्या दिवशी महीलांनी पुरूषांना मागे टाकले अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये झळकली ती काही उगाच नाही. मी माझ्या गतीने सायकल चालवता राहिलो. घाटात मी दोन स्पर्धकांना मागे टाकले आणि दोघांनी मला मागे टाकले त्यामुळे क्रमवारीत कसलाही फरक पडला नाही. पीटर सगान स्टाईलने स्प्रिंट मारत मी अंतिम रेषा पार केली. सगानची फक्त स्टाईल गती नव्हे. अंतिम रेषा पार केल्यानंतरही मी ताजातवाना होतो. अंतिम रेषेपासून घाटाचा थोडा चढ शिल्लक होता. मी घाट जिथे संपतो तिथपर्यंत सायकल हातात धरुन चालत गेलो आणि मगच गारमिन बंद केले. सकाळी शर्यत सुरु होण्याच्या अगोदर तीस सेकंद गारमिन चालु करुन ठेवले होते आणि तिथे पोचल्यावर ऊशिरा बंद केले. त्यामुळे एक तास बत्तीस मिनिटे अशी जरी माझी वेळ दिसत असली तरी ती दिड तासाच्या आत आहे. शर्यतीसाठी लागलेली वेळ आयोजकांकडुन कळेल असे मला वाटले होते त्यामुळे मी गारमिनच्या वेळेला जास्त महत्व दिले नाही. परंतु आयोजकांनी फक्त विजेत्या स्पर्धकांच्या वेळा नोंदवल्या. माझ्या पाठोपाठ डॉ. नेहा टिकमने अंतिम रेषा पार केली. महीलांच्या खुल्या गटात अंजली भालिंगेने प्रथम तर नेहा टिकमने चतुर्थ क्रमांक पटकावला. पुण्यातील या दोन सायकल क्वीन्स सोबत फोटो काढण्याची संधी मी दवडली नाही. तसेच डॉ. आदित्य पोंक्षे यांची सुद्धा भेट झाली. त्यांनी उत्तम कामगिरी करत सातवा क्रमांक पटकावला. तिथे सर्वांसोबत चहा घेतला आणि मी पुन्हा चिपळूणकडे प्रस्थान केले. शर्यत संपल्यामुळे थांबवून ठेवलेले ट्रक आता रस्त्यावरून धावू लागले होते. त्यामुळे घाट चढताना जेवढे सुसह्य झाले तेवढे तो उतरताना असह्य झाले. अवाढव्य आणि अवजड वाहनांसोबत घाट उतरताना खूप खबरदारी घ्यावी लागली. घाट उतरल्यावर मी सायकलवर न केलेल्या घाटांची नावे आठवु लागलो. ते म्हणजे आंबा, फोंडा आणि आंबोली हे तीन घाट आहेत. आता यांच्यावर स्वारी करण्यासाठी योग्य मुहूर्त शोधावा लागणार आहे. बहादूर शेख नाक्याला मी सरासरी तीसच्या गतीने पोचलो.बक्षिस समारंभ माधव सभागृह येथे होणार होता. त्यामुळे शर्यत संपल्यावर पुन्हा माधव सभागृह येथे यावे लागले. मुंबई, पुणे सोडुन चिपळूण सारख्या छोटया शहरात अशी भव्य सायकल स्पर्धा होणे ही काही साधी गोष्ट नाही. याचे सर्व श्रेय आयोजकांना आणि प्रायोजकांना द्यावे लागेल. आयोजकांमधील ऊत्साह वाखाणण्याजोगा होता. विजेत्यांसाठी भव्य चषक आणि रोख रकमेच्या बक्षिसांची अक्षरश: खैरात करण्यात आलेली होती. परंतु महिला आणि पुरुषांच्या बक्षिस रकमेमध्ये प्रचंड तफावत होती. यामध्ये साम्य असायला हवे होते असे मला वाटते. आजकाल भारतीय क्रिकेट मंडळ सुद्धा महीला आणि पुरुष खेळाडुंमध्ये भेदभाव करत नाही. विराट कोहली आणि स्मृती मनधाना या दोघांना एक सामना खेळण्यासाठी सामान पगार दिला जातो. आपल्या क्रिकेटवेडया देशातील लोकांनी ही गोष्ट चटकन शिकायला हवी. कारण महीला आणि पुरुष सर्वजण सारखेच कष्ट घेतात. असोत...अवघ्या तीन वर्षापुर्वी स्थापन झालेल्या चिपळूण सायकल क्लबने या शर्यतीचे आयोजन करुन कमाल करुन दाखवलेली आहे. या शर्यतीचे हे दुसरे वर्ष होते हे विशेष. कोकणभूमीला साजेशी सायकल शर्यत त्यांनी आयोजित केली. परदेशी बीआरएम तर आता सर्रास सर्वच ठिकाणी आयोजित केल्या जातात. सायकल शर्यतीसाठी आपली भौगोलिक परीस्थिती उपयोगात आणण्याचे महत्वाचे काम चिपळूण सायकल क्लबने केलेले आहे. स्थानिक नेतृत्वाचा या शर्यतीला असलेला पाठींबा फार फार कौतुकास्पद आहे. सर्वांचा सहभाग असल्याशिवाय मोठे यश मिळत नाही. "केवळ अप्रतिम" एवढा एकच अभिप्राय या शर्यतीला देऊ शकतो. भविष्यात सर्वांनी या शर्यतीत सहभागी व्हावे.येवा कोकण आपलाच असा!-विजय सुरेश वसवे.(आयर्नमॅन)9850904526
with Queens of cycling
with Winner Anjali Bhalinge
with Dr. Neha Tikam
with Dr. Aditya Ponkshe
Tuesday, 24 January 2023
मुंबई मॅरेथॉन 2023 (भाग २)
मुंबई मॅरेथॉन 2023 (भाग २)
रेल्वे प्रवास, खाणे आणि निवांत झोपणे फक्त एवढेच काम असल्यामुळे शरीरामध्ये दैनंदिन जीवनात जाणवणारा थकवा औषधालाही जाणवत नव्हता. शरीर एकदम ताजेतवाने होते. पहाटे तीनचा अलार्म असुनही मला अलार्मच्या अगोदर दोन मिनिटे जाग आली. एवढे माझे मन, बुद्धी आणि शरीर मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी आतुर झालेले होते. मन थोडे साशंक वाटत होते. यावेळेस सब-फोर होईल की नाही? हा यक्षप्रश्न माझ्यासमोर ऊभा होता. शंकांचे काहुर, अनिश्चिततेचे सावट आणि सब-फोरचा निर्धार सोबत घेऊन मी हॉटेल सोडले. हॉटेल शबाना गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी जवळ आणि रीगल सिनेमाला लागुनच होते. मी बाहेर रस्त्यावर आलो तेव्हा सगळीकडे रनर्सच रनर्स दृष्टीस पडत होते. मी पण मॅरेथॉन धावणार्यांच्या लोंढयात सामील झालो. थोडे मंदगतीने धावत हृदयाला गतीमान करण्याचा प्रयत्न केला. आझाद मैदानात "फेस स्कॅनरने" चेहर्याची ओळख पटल्यावरच आतमध्ये प्रवेश दिला जात होता. सर्व भारतातुन बरेचसे धावपटु ही मॅरेथॉन धावण्यासाठी येथे आलेले होते. काही निष्णात, काही नवखे, काही हौशी तर काही बक्षिस जिंकण्याच्या लालसेने आलेले होते.
धावपटुंची त्यांच्या पळण्याच्या गतीनुसार A, B, C, D, E, F, अशा विवीध गटांमध्ये विभागणी केलेली असते. माझ्यासारखे सब-फोर वाले A विभागात होते. A वाल्यांना शर्यत सुरू करण्यासाठी प्राधान्य देण्यात येते. कमी वेगाने धावणार्यांचा वेगात पळणार्यांना अडथळा होऊ नये म्हणुन ही तजवीज केलेली असते. दोन ते तीन मिनिटांच्या अंतराने सर्व विभागातील धावपटूंना आरंभ रेषेकडे सोडण्यात आले आणि प्रत्येकजण सुसाट निघाला. दहा ते पंधरा मिनिटांत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील रस्त्यावर 7205 मॅरेथॉनपटु (42.2 किमी धावणारे) धावु लागले. त्यामध्ये 668 महिलांचा समावेश होता. मुंबईतील लोकल ट्रेनच्या गर्दीला सुद्धा लाजवेल एवढी धावपटूंची गर्दी रस्त्यावर दिसु लागली. पहील्या पाच किमी मध्ये गर्दीच्या गतीने धावणे भाग पडत होते कारण गर्दीमुळे एखाद्याला ओलांडुन पुढे जाणे सुद्धा शक्य होत नव्हते. म्हणुन आपापल्या डिव्हीजनची आरंभ वेळ कदापिही चुकवु नये. पहील्या पाच किमी मध्ये तुम्ही जर तुमच्यापेक्षा हळु धावणार्यांच्या गर्दीत अडकला तर नदीच्या प्रवाहातील भोवर्यात अडकल्यासारखी तुमची अवस्था होईल एवढे मात्र नक्की. त्यातुन लवकर बाहेर पडणे शक्य होत नाही. मरीन ड्राईव्हच्या ऐसपैस रस्त्यावर आल्यावर मोकळा श्वास घ्यावयास मिळाला. आम्ही अजुनही अंधारातच धावत होतो. मरीन ड्राईव्हचा परिसर बघ्यांच्या गर्दीने फुलून गेलेला होता. समुद्राच्या कडेने ऐकु येणारे बॅंड, पंजाबी ढोल आणि मराठमोळा ढोल-ताशा धावपटूंचा ऊत्साह द्विगुणित करत होता. ढोल-ताशाचा आवाज ऐकल्यावर अंगात चैतन्याची लहर संचारली.
सर्वकाही अपेक्षेनुसार होत होते. हृदयावर कोणाताही ताण न घेता विनासायास मिळणार्या गतीने माझी धावाधाव सुरु होती. अधुन मधुन स्टेडफास्टच्या पिनट बटरचा एकेक घास घशाखाली उतरवणे चालु होते. एकदम सर्व सॅचेट खाल्ले जात नाही म्हणुन मी एक घास खाऊन ते सॅचेट पुन्हा खिशामध्ये ठेवत होतो. ठराविक वेळाने मीठाच्या गोळ्या आणि पॉवर जेल घेणे सुरू होते. त्यामुळे संपुर्ण मॅरेथॉनमध्ये कुठेही रसद कमी पडल्याचे जाणवले नाही. पेडरचा चढ आल्यावर मी गपगुमानपणे चालत चालत अंतर कापले. चढावर कमी झालेल्या गतीची सरासरी उतारावर भरून काढली. वाटेत मिळणार्या पाण्याच्या बाटल्या आवर्जुन घेतल्या. जे काही प्यायला मिळत होते ते सर्व घशाखाली उतरवत होतो. आजुबाजुला काही ओळखीचे रनर्स दिसु लागले होते. त्यांना पाहुन धावण्याचा हुरूप वाढला. मुंबई मॅरेथॉनचे मुख्य आकर्षण म्हणजे वरळी सिलिंक पुल. या पुलावर धावण्यास मिळणार ही कल्पनाच खुप आनंद देणारी असते. परंतु माझे दुर्भाग्य असे की मी अंधारात वरळी सीलिंकवर प्रवेश केला. सब-फोर साठी कुत्रे मागे लागल्यासारखे धावत होतो. सब-फोर करावयाची असेल तर सिलिंक विसरावा लागतो. "कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है"
मुंबई मॅरेथॉनची खरी मजा 23 ते 24 किमी नंतर यायला सुरूवात झाली. रस्त्यावरील प्रेक्षक आता फक्त प्रेक्षक न राहता टाळ्या वाजवुन, आवाज देऊन प्रसंगी सोबत पळुन धावपटूंचा ऊत्साह वाढवु लागले होते. काहींनी स्वखर्चाने केळी, संत्री, बिस्कीटे, लेमनच्या गोळ्या, स्प्राईट, थम्सअप तसेच पाण्याच्या बाटल्यांचे स्टॉल लावलेले होते. मुंबईचे स्पिरीट म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेत होतो. युरोपमधील काही स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आलेले लोक तिकडच्या प्रेक्षकांचे गोडवे गाताना मी ऐकलेले आहे. नशिब मला हा अनुभव घेण्यासाठी युरोपला जावे लागले नाही. मी तो अनुभव महाराष्ट्राच्या मातीत आमच्या मुंबईतच घेतला. मुंबई मॅरेथॉनमध्ये पळणार्यांची आज खुप काळजी घेतली जात होती. सासरवाडीला आलेल्या जावईबापुंसारखा आमचा जागोजागी पाहुणचार होत होता. सर्वत्र एकच जल्लोष दिसत होता तो म्हणजे, "हर दिल मुंबई". प्रेक्षक आपापल्या परीने मॅरेथॉनचा आनंद घेत होते. परंतु सहभागी स्पर्धकांसाठी मॅरेथॉनमध्ये धावणे ही आनंदाची गोष्ट मूळीच नसते. प्रत्यक्ष धावणारे हे वेगळ्याच विश्वात गेलेले असतात. छातीच्या धडधडीचा वेग हा आगगाडीच्या धडधडीच्या वेगापेक्षाही जास्त झालेला असतो. त्या शोलेतील आगगाडीची धडधड आठवा आणि त्यात कोळसा टाकणारा वीरू म्हणजे धर्मेंद्र. अगदी तशीच अवस्था शरीराची झालेली असते. एकदाची अंतिम रेषा येवोत आणि या धावण्याच्या कटकटीतुन मुक्त व्हावे असे मनापासुन वाटायला लागले होते. अरे ही मॅरेथॉन संपत का नाही आहे? हा प्रश्न "ये दिवार टुटती क्युं नहीं?" या जाहीरातीतील सुरासारखा केविलवाण्या स्वरात विचारावासा वाटत होता. मी फिनिश लाईनला सहीसलामत पोचेल ना आज? माझी सब-फोर होईल की नाही? मला क्रॅंप तर येणार नाही ना? असे नाना प्रश्न मला भेडसावत होते. कितीही त्रास होत असला तरी पायांची गती मंदावलेली नव्हती.
तिसाव्या किमी पर्यंत माझी गती 05:20 मिनिटे प्रती किमी होती. सर्वकाही सुरळीत चाललेले होते. पण मेजवानीच्या जेवणात जसा मीठाचा खडा यावा तसा सुरळीत चाललेल्या माझ्या मॅरेथॉनमध्ये पेड्डर रोड आडवा आला. त्यावेळेस पेड्डर रोडशी दोनहात करण्याएवढे त्राण माझ्या अंगात शिल्लक राहीलेले नव्हते. परीस्थिती बिकट असेल तर दोन पावले मागे आलेले केव्हाही उत्तम. मी पेड्डरच्या चढावर चालत चालत जाण्याचा निर्णय घेतला. चढावरील अंतर चालत चालत पार करत असताना माझे जिवलग मित्र मला भेटले. पेड्डर रोडच्या हायड्रेशन पॉईंटवर ते अधिकृत वोलिंटियर्स म्हणुन काम पाहत होते. "भाऊ रन..." असा जोरात आवाज देऊन त्यांनी माझ्यात नवचैतन्य भरण्याचा प्रयत्न केला. डाव्या मांडीच्या स्नायुने कुरबुर करायला सुरूवात केली होती त्यामुळे चढावर कमी झालेल्या गतीची कसर उतारावर भरून काढता आली नाही. डाव्या मांडीचा स्नायु गतीला प्रतिसाद देईनासा झाला होता. गती वाढवायला गेलो की वेदनेची कळही वाढत असे. मोडकळुन पडण्यापेक्षा जी गती मिळेल त्या गतीने धावण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय योग्य ठरला. ईथुन पुढे प्रत्येक किमीला आवश्यक असणारी गती राखणे मला कठीण जाऊ लागले होते.
आता चारच किमी राहीले आहे, आता तीनच, आता दोनच असे करत करत मरीन ड्राईववरून डावीकडे वळालो. तेव्हा अवघे चारशे मीटर शिल्लक होते. हाफ मॅरेथॉन पळुन झालेले स्पर्धक अम्बॅसॅडर हॉटेलजवळ ऊभे राहुन थकलेल्यांचा ऊत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत होते. पंक्चर झालेले चाक हवा भरून कसेबसे पंक्चरच्या दुकानापर्यंत पोचवतात तसे हे आमच्या सारख्या हवा गेलेल्या रनर्सना अंतिम रेषेपर्यंत पोचवण्यासाठी आमच्यामध्ये हवा भरत होते. त्यात बरेचसे पुण्यातील असल्यामुळे जरा धीर आला. पुणेवाल्यांनी ऊत्साह वाढवल्यावर मुंबई मॅरेथॉनच्या पताका लावलेल्या रस्त्यावर आलो. तेथुन अंतिम रेषा नजरेच्या टप्प्यात आली. आता थांबायचे नाही असे म्हणत जेवढी हवा शिल्लक होती तेवढी वापरून मी पळत राहीलो. शेवटी मी दिमाखात अंतिम रेषा पार केली आणि मॅरेथॉन पळण्याच्या त्रासातुन मुक्त झालो. मी 3 तास 54 मिनिटे 11 सेकंद वेळ नोंदवली. ही माझी दुसरी मुंबई मॅरेथॉन. दोन्हीही सब-फोर आहेत आणि आजचा हा माझा वैयक्तिक विक्रम. अंतिम रेषेजवळ दोन मिनिटे शवासन केल्यानंतर आता मेडल घेण्यासाठी निघालो. तिथुन मेडल घेण्यासाठी एक-दिड किमी पायपीट करावी लागली. मेडल मिळाले त्यानंतर मस्त हिरवळीवर ऊन खात पडुन राहीलो. खुप हौस ना मॅरेथॉन पळण्याची, पळशील का आता मॅरेथॉन? तर त्यावेळेस माझे उत्तर "नाही" असे होते.
Friday, 20 January 2023
मुंबई मॅरेथॉन 2023 (पूर्वतयारी)
मुंबई मॅरेथॉन 2023 (पूर्वतयारी)
ग्रंथांमध्ये जशी गीता, नद्यांमध्ये जशी गंगा, गडांमध्ये जसा दुर्गदुर्गेश्वर रायगड, देवांमध्ये जसा इंद्र, पक्ष्यांमध्ये जसा गरूड, पर्वतांमध्ये जसा मेरू पर्वत, मण्यांमध्ये जसा कौस्तुभ मणी, वैष्णवांमध्ये जसा शंभू आणि अप्सरांमध्ये जशी ऊर्वशी तशी सर्व मॅरेथॉनमध्ये मुंबई मॅरेथॉन. पळण्याचे वेड लावणारी मुंबई मॅरेथॉन. हर दिल मुंबई म्हणजे मुंबई मॅरेथॉन. रनिंगची पंढरी म्हणजे मुंबई मॅरेथॉन. अशा या मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतल्याशिवाय स्वत:ला रनर म्हणुन घेणार्या कोणत्याही व्यक्तीला सदगती प्राप्त होणे शक्य नाही. याचसाठी केला होता अट्टहास असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यावर्षी मुंबई मॅरेथॉन पुनरागमन करणार होती आणि मी मात्र रनिंगपासुन फार दुर गेलेलो होतो.
17 सप्टेंबरला आमचा बहुचर्चित दुधसागर ट्रेक संपन्न झाला आणि मी 2022 सालातील नियोजीत सहली आणि ईच्छेनुसार आखलेल्या सर्व ट्रेक्समधुन मोकळा झालो. याच कालावधीत बहुचर्चित मुंबई मॅरेथॉनची नावनोंदणी सुरु होणार अशी चर्चा ऐकायला मिळाली. यामुळे मुंबई मॅरेथॉनच्या चर्चेला उधाण आलेले होते. कोरोना महामारीमुळे 2021 आणि 2022 अशी दोन वर्षे मुंबई मॅरेथॉन होऊ शकली नव्हती. मी 2020 साली मुंबई मॅरेथॉनमध्ये पहील्यांदा भाग घेतला होता आणि तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो होतो. "लव अॅट फर्स्ट साईट" म्हणतात ना अगदी तसेच. प्रेम झाले खरे पण प्रेम म्हटले कि ओघाने विरह आलाच. मॅरेथॉनच्या प्रेमात विरह सहन करावा लागेल असा मी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. दोन वर्षांचा असह्य विरह सहन करावा लागला. 2023 साली मुंबई मॅरेथॉन पुन्हा भेटीला येण्यासाठी तयार होत होती. तिच्या भेटीसाठी मीही आतुर झालेलो होतो. आता प्रेयसीला भेटायचे म्हटल्यावर जय्यत तयारी करणे भाग होते. कॉलेजच्या दिवसांपासुन मी या कामामध्ये आवश्यक कौशल्य प्राप्त केलेले आहे. मुंबई मॅरेथॉन भेटीच्या तीव्र ईच्छेनेच मला रनिंग सुरु करण्यास प्रवृत्त केले.
माझे रनिंग जवळजवळ एक वर्षापासुन बंद होते. काहीच सराव न केल्यामुळे पायांना गंज चढलेला होता. हा गंज उतरवणे अपरीहार्य होते. फुफ्पुस आणि हृदय तर म्हणत होते कि "पुन्हा त्या रनिंगच्या फंदात नको" पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत मी रनिंगचा फिटनेस पुन्हा मिळवण्याचा ठाम निर्धार केला. रनिंग हा असा व्यायाम आहे ज्यामध्ये घाई करून चालत नाही. कसलीही घाई न करता क्रमाक्रमाने धावण्याची क्षमता पुन्हा प्राप्त करणे क्रमप्राप्त होते. घाई केल्यास दुखापत होण्याची शक्यता असते. पुनरागमन करताना आपल्या मनामध्ये जी धावण्याची गती असते ती शरीराला झेपत नाही. त्यामुळे शरीराच्या कलाकलाने घेतलेले केव्हाही उत्तम भले आपले मन परीकथेतील घोड्यासारखे धावत असले तरीही.
सुरूवात करण्यासाठी नवरात्री वॉक चॅलेंजच्या निमित्ताने एक चांगली संधी चालुन आली. नऊ वेगवेगळ्या रंगांचे टि-शर्ट आणि सलग नऊ दिवस मित्र-मैत्रिणींसोबत हत्ती डोंगरावर चालायला जात होतो. खुप मज्जा येत असे. हत्ती डोंगरावर चालण्याचा व्यायाम केल्यामुळे हृदय आणि पायाच्या स्नायुंना थोडी बळकटी मिळाली. तरीही पूर्वीच्या गतीने धावता येईल कि नाही याबद्दल शंका वाटत होती. मी दसर्याला शस्त्रपूजनासोबत नाईकी शूजचे पुजन केले आणि 8 ऑक्टोबरपासुन पळायला सुरूवात केली. मी रनिंगच्या प्रोसेसवर विश्वास ठेवुन स्वत:च स्वत:साठी वर्कआउट तयार करत गेलो आणि स्वत:च त्याचे मुल्यमापन करून स्वत:लाच सुचना देऊ लागलो होतो. न थांबता पाच किमी अंतर पळण्यापासुन मी सुरूवात केली. खुप दिवसांनी पाच किमी पळाल्यामुळे खुप दम लागला. न थांबता पाच किमी पळणे किती अवघड असु शकते याची मी प्रचिती घेतली. या पाच किमी मध्ये छातीचा भाता चांगलाच फुलला होता. अल्कोहोल आणि धूर सोबतच बाहेर पडत होते. अंतर पाच किमी, लागलेला वेळ 31 मिनिटे 32 सेकंद. एवढा त्रास झाला कि ती मुंबई मॅरेथॉनची झंझट नको असे वाटले होते. मॅरेथॉन पळणे माझ्या आवाक्याबाहेर गेलेले आहे हे मला स्पष्ट जाणवत होते. मित्र-मैत्रिणींसोबत पार्ट्या करून जीवनाचा आनंद घ्यायचा कि पळायला जाऊन स्वत:ला त्रास करून घ्यायचा असे दोन पर्याय माझ्यासमोर होते. मी दुसरा पर्याय निवडला. "Love the pain" हे माझे आवडते ब्रीदवाक्य मला आठवले.
दर आठवडयाच्या शेवटी म्हणजे रविवारी 10 किमी, त्याच्या पुढच्या रविवारी 15 किमी, त्याच्या पुढच्या रविवारी 20 किमी तर त्याच्या पुढच्या रविवारी 25 किमी अंतर पळण्याचा वर्कआऊट मी तयार केला. या पद्धतीने गेल्यास धावण्याचे सामर्थ्य पुन्हा प्राप्त होईल यात मला काहीही शंका वाटत नव्हती. रनिंगला जाताना मी एकटाच असायचो, ना कोणाची सोबत ना कुठला ग्रुप. असे करत करत नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी न थांबता 30 किमी अंतर 6 पेक्षा कमी गतीने धावलो. ईथेच मला जाणवले कि माझे पुनरागमन यशस्वी झालेले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महीन्यात 200+ किमी अंतर धावाधाव केली. नोव्हेंबर महीना खुप खडतर गेला. डिसेंबर महीन्यात सातत्य ठेवणे गरजेचे होते. जे मिळवलंय ते जोपासण्याची गरज होती. मी विनासायास सब-टू हाफ मॅरेथॉन करू लागलो. या सर्व कालावधीत स्टेडफास्ट नुट्रीशन माझ्या सोबतीला होते. प्रोटीनमुळे रिकवरी खुप छान होत असे त्यामुळे मला कसलीही चिंता नव्हती. अशा रीतीने दोन-अडीच महीने स्वत:च्याच तालमीत तावुन सुलाकुन निघाल्यानंतर मी नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालो.
जानेवारी उजाडल्यानंतर फक्त मुंबई मॅरेथॉनची आस लागलेली होती. "भेटीलागी जीवा" या तुकोबांच्या अभंगासारखी. आदल्या दिवशी आम्ही ट्रेनने मुंबईला निघालो. पुणे-मुंबई ट्रेनचा प्रवास नेहमीप्रमाणे ऊत्साहवर्धक होता. ट्रेनमधील पन्नास टक्के प्रवासी मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावयास निघालेले होते. बीआयबी घ्यायला जाणे हे फार कटकटीचे काम असते. दादर ते कुर्ला हा लोकल ट्रेनचा प्रवास फार जीवावर येतो म्हणुन आम्ही यावेळेस ठाण्याला उतरून लोकलने कुर्ल्याला पोचलो. आपला बीआयबी दुसर्याला आणावयास सांगणे यासारखे सुख नाही. दुसर्याला बीआयबी आणायला सांगणारे लोक खरेच खुप हुषार म्हणायला हवेत. पुन्हा रूबाबात म्हणायला मोकळे की तुझे आणायला जाणारच होतास ना मग माझे आणले म्हणुन काय झाले? असोत. बीआयबी घेण्याच्या नादात जेवणाची वेळ निघुन गेली. पाठीवर वजनदार बॅग घेऊन मुंबई दर्शन केल्यामुळे थकवा सुद्धा आला. पुढच्या वर्षी हे टाळणे गरजेचे आहे असे मला जाणवले. त्यामुळे आता असे ठरवले आहे कि पुण्याहुन निघालो कि सर्वप्रथम हॉटेलवर जायचे, पाठीवरची सॅक हॉटेल रूमवर ठेवायची, मस्त जेवण करून घ्यायचे आणि मग निवांत एक्स्पोमधील गर्दी कमी झाल्यावर बीआयबी घ्यायला जायचे. अनावश्यकपणे उपासमार आणि दमछाक ओढवुन घेण्यात काहीही अर्थ नाही. ही माझ्या सुपीक डोक्यातुन आलेली कल्पना आहे. बीआयबी घेऊन हॉटेल शबानावर पोचलो आणि मॅरेथॉन पळण्याच्या तयारीला लागलो. आता उद्या मुंबई मॅरेथॉन पळणार या कल्पनेनेच अंगावर रोमांच उभे राहत होते.
क्रमश:
Tuesday, 1 November 2022
वाजवा कि हॉर्न (मलेशिया)
Friday, 28 October 2022
केदारनाथ यात्रा
आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-२
आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-२ पूढे चालू टायमिंग चिप असलेला बिब सायकलच्या सीटखाली आणि साधा बिब जर्सीवर लावला. हेल्मेटला पुढ...
-
आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-२ पूढे चालू टायमिंग चिप असलेला बिब सायकलच्या सीटखाली आणि साधा बिब जर्सीवर लावला. हेल्मेटला पुढ...
-
बोराटयाची नाळ (Boratyachi Naal) लिंगाणा माझ्यासाठी नेहमीच एक आकर्षण आहे. विशेषत: जेव्हापासुन शिखर फाऊंडेशनबरोबर तो मी सर केलाय....
-
सिंहगड राजगड तोरणा अल्ट्रा मॅरेथॉन स्फूर्ति आणि प्रेरणा सिंहगड राजगड तोरणा (SRT Ultra marathon 53km) सिंहगड राजगड तोरणा...