Tuesday, 10 July 2012

माझी अविस्मरणीय खेळी...


खरं तर माझ्यासारख्या सामान्य क्रिकेटरने अशा भानगडी करु नयेत. पण काय करणार एक खेळी मी अशी खेळलोय की आजही ती आठवली की क्रिकेट खेळल्याचं सार्थक वाटते. त्या खेळीची नशा काही औरच.. म्हणुन मी तिला ईथे कैद करायचं ठरवलंय. पुढे मागे वाचायला बरी पडेल.. आणि असेही फ़ेसबुक शतकानुशतके चालणार आहे.. मग होऊन जाऊ दे. मी अष्टपैलु म्हणुन खेळतो/खेळायचो. गोलंदाजी माझा मेन बिजनेस, नविन चेंडुवर माझी बोटे आणि मनगटाचा समन्वय जमला की मग कोणीही मी टाकलेला चेंडु बॅटच्या मधोमध खेळुन दाखवावा. आऊटस्वींग माझी खासियत, झोपेते जरी नविन लेदरचा चेंडु धरुन सोडला तरी आऊटस्वींगच होणार. ईतर गोलंदाजांना प्रयत्नाअंती मिळणारा आऊटस्वींग मला सहज जमतो. त्याचे कारण माझी साईड ऑन अ‍ॅक्शन. कै. सदु शिंदे साखळी स्पर्धेतील लॉ कॉलेज मैदानावरील सामना कॅनॉन क्लब विरुद्ध टेल्को रिक्रीएशन (TRC). नोव्हें २००८. लॉ कॉलेज मैदान मला तसं जवळ आहे पण आता पार पौड फ़ाट्याला वळसा घालुन SNDT मार्गे पोहोचावे लागते. त्यात ट्रॅफ़िकमधे अडकलो.. कॅप्टनचा फ़ोन.. "कुठे आहेस?? आम्ही पोहोचलोय लवकर ये.." आणि हे बोलताना तो हॅरीस पुलावर असणार हे नक्की.. त्याचं नेहमीचंच आहे ते.. मला त्याची सवय झाली होती. संदिप आहेर, आमचा कॅप्टन. मी ग्राऊंडवर पोहोचलो तर अर्थातच खेळाडुंनी भरलेली त्याची सुमो काही पोहोचलेली नव्हती. सामन्याच्या दिवशी ग्राऊंडवर पाय ठेवल्या ठेवल्या एक प्रकारचे फ़िलींग येते मनामधे कि आज मी काय करणार आहे किंवा एक चिकीत्सा होऊन जाते आपल्याच अंतर्मनाशी.. माझे अंतर्मन खदखदुन हसत होते.. मला काही कळाले नाही.. मी म्हणालो..च्यायला आपला गप्प खेळ करु जो होगा देखा जायेगा.. क्रिकेटचा पेहराव चढवुन एक राऊंड मारला आणि स्नायुंची ताणाताण करुन घेतली. हे मी नित्यनियमाने प्रत्येक सामन्याआधी करतोच. आवश्यकच आहे ते. संदिप टॉस हरला आणि आम्हाला फ़िल्डींग आली. शिंदे लीगमधे टॉस जिंकणारे कप्तान कधीही गोलंदाजी घेत नाहीत. का माहीत नाही? आता ४५ षटके फ़िल्डींग करायची होती..हु‘~श~श्श... नविन बॉलवरची माझी जादु काही चालली नाही. नविन बॉलवर मला एकही बळी मिळाला नाही :(. नंतर जुन्या-पान्या चेंडुवर एक बळी मिळाला. आजचा दिवस माझ्या गोलंदाजीचा नव्हताच, काहीच योगदान नाही. त्यात त्या वाघाबरोबर खरखर झाली. मी थ्रो घ्यायला स्टंपच्या मागेच थांबणार ना .. वाघ म्हणला, "माझ्या धावण्याच्या रेषेत येवु नको." आणि बरीच फ़णफ़ण केली त्याने.. माझी चुक नसताना मला ऊगाच डिवचलं त्याने. मी त्याच्या वयाचा विचार करून मुग गिळले. पण त्याने खरंच मला डिवचला होता. त्याला माझी बॅटच उत्तर देणार होती. आणि मी ही बॅटनेच उत्तर द्यायचे ठरवले. अविनाश शिदोरेने ५ बळी मिळवले. सुरेख गोलंदाजी केली त्याने. त्यांच्यातल्या प्रसाद आणि राकेशने अर्धशतके ठोकली. आम्ही त्यांना १९८/९ मधे रोखले. आम्ही मैदान सोडताना सर्व अविनाशच्या मागाहुन गेलो. उत्तम गोलंदाजीसाठीचा बहुमान. तसं पाहीलं तर लॉ कॉलेज मैदानावर १९९ धावांचा पाठलाग अगदी सोपा आहे. पहीली फ़लंदाजी करणारे हमखास २५० धावा लावतात. तिथं चेंडुला नुसता पंच दिला तरीही सीमापार जातो. अर्थात क्षेत्ररक्षकाला चुकवले तर. फ़र्ग्युसन सारखा माती प्रदेश लॉ वर नाही. लॉ कॉलेजचे पॅव्हीलीयन सुद्धा दिलखुलास आहे. माझ्या मते PDCA साठी उपलब्ध असलेल्या पॅव्हीलीयनपैकी सर्वात उत्तम. आम्ही सगळ्यांनी गोल सर्कल करुन भोजनाचा आनंद घेतला. माझी भाजी होती ओला घेवडा लपथपीत. माझ्याकडे पेटंट आहे ह्या भाजीचे.. हाहाहा.. मॅच म्हणलं की ओला घेवडा लपथपीत होऊन आलाच म्हणुन समजा. :P . त्याने फ़ॅटस वाढत नाहीत. लंचनंतर सगळे टंगळमंगळ करीत होते.. १९९ म्हणजे काय... असे करुन टाकु.. अशा अविर्भावात. तसं पाहीलं तर ते चुक पण नव्हतं कारण आमची फ़लंदाजी मजबुत होती. जशी जशी सामना पुन्हा चालु होण्याची वेळ जवळ येवु लागली तसतसे माझे अंतर्मन मला आवाज देऊ लागले की आज तु फ़लंदाजीसाठी जा.. आजचा दिवस तुझा आहे.. मलाही काय करावे सुचत नव्हतं. मग मी संदिपला म्हणालो," आज माझा सेंन्च्युरी करायचा मुड आहे, कधी जाऊ फ़लंदाजीला?". त्याला वाटलं १९९ मधे हा काय सेन्च्युरी करणार. पण तरीही त्याने मला निराश नाही केले, म्हणाला ५ नंबरला जा. आणि सेन्च्युरीचं बंगाल ऐकुन काहीजण मस्तपकी हसले सुद्धा. मी त्यांना जरा गप्प केले. सामना चालु झाला. आणि पॅडीने त्याची जादु चालवायला सुरुवात केली. पहीले दोन फ़लंदाज तर बघेपर्यंत पुन्हा तंबुत येऊन बसले होते. पॅडी म्हणजे पद्मनाभन. कमालीचा अनुभव असलेला स्विंग गोलंदाज. सळो की पळो करुन सोडले त्याने आमच्या फ़लंदाजांना. मी फ़लंदाजीस गेलो पण स्ट्राईक येईपर्यंत माझे ३ जोडीदार तंबुत परत गेले. होता होईस्तोवर ८ बाद ६३ धावा असताना दिनेश बोडके माझ्या जोडीला आला. आणि पॅव्हीलियनमधे फ़क्त स्नेहल पॅड बांधुन बसला होता. सगळा सामना आमच्या तिघांच्या जिवावर होता तेव्हा. आणि विरुद्ध टिम एकदम जिंकल्याच्या तो-यात. वाघ तर एकदम तो-यात होता आणि त्या सर्वांनी आपण सामना जिंकलोय असं जवळ जवळ गृहीत धरुन टाकलं होतं. फ़क्त आता सोपस्कार झाले की चला लवकर घरी जाऊ अशा अविर्भावात. पण मी वेगळ्याच मुड मधे गेलो होतो.. पावनखिंडीतले बाजीप्रभु, पुरंदरचा मुरारबाजी आणि सिंहगडावरचा तानाजी माझ्या डोळ्यासमोरुन जात होते. रक्ताने ऊसळी घेतली आणि मीही मुठी आवळल्या. आज होऊन जाऊ दे.. किसमें कितना है दम?. शेवटच्या चेंडुपर्यंत हार मानायची नाही .. काहीही होवो..असे मनाशी पक्क ठरवलं. षटकामधील वेळात दिनेशला माझी रणनीती सांगितली. फ़क्त एकेरी धावा घ्यायच्या.. काहीही होवो.. आपण बाद व्हायचे नाही. त्यानीही माझ्या "हो" मधे "हो" मिसळला.एकमेकांच्या हातावर पंच देत आम्ही क्रिजमधे गेलो. आणि पाहतो तर काय ३ स्लीप, २ पॉईंट, कव्हर, मिडऑफ़ आणि लेग साईडला अवघा एकच फ़िल्डर तोही शॉर्ट लेग. माझी चेष्टाच केली त्यांच्या कॅप्टनने. माझ्यासारख्या फ़लंदाजाला हे क्षेत्ररक्षण, अन तेही लॉच्या मैदानावर. मला अकराव्या क्रमांकावर आल्यासारखं क्षणभर वाटलं. मी जिभल्या चाटु लागलो.. माझ्यासाठी ते तुपरॊटी होतं. म्हणलं आता कोण मॅक्ग्राथ आहे बघावं तर समोर गोलंदाज होता आनंद काळे. हो तोच आनंद काळे ज्याने एकेकाळी मला बाद करुन खूप जल्लोष केला होता ईंटरडिव्हीजनमधे. क्रिकेटमधे कोणाचं उसणं ठेवु नये. तेव्हा परतफ़ेड करायची माझी वेळ होती. त्यांचा यष्टीरक्षक होता राजेश, माझा सिंहगड क्लबमधील जिवाभावाचा मित्र. त्याला ब-यापैकी माझा खेळ माहीत होता. त्याच्याकडे बघुन मी एक अर्थपूर्ण स्मितहास्य दिले आणि माझ्या मोहीमेला लागलो. त्यालाही जाणीव झाली की हे क्षेत्ररक्षण विजयसाठी योग्य नाहीये. तो बोललाही त्यांच्या कॅप्टनला पण काही उपयोग झाला नाही कारण त्याच्या कॅप्टनच्या मते त्यांनी सामना जिंकलेला होता. हे सर्व क्षणार्धात.. दिनेशच्या हातावर पंच देऊन गार्ड घेईपर्यंत. काळे कॉलेजच्या बाजुने गोलंदाजीस आला. काळेचा पहीलाच चेंडु बॅकफ़ुटवर जाऊन मिडविकेटच्या बाजुला फ़क्त पंच केला, नुसत्या पंचने चेंडु सिमापार गेला तोही जमिनीला बिलगुन, बॅटमधुन निघाल्यापासुन मुक्कामावर पोहोचेपर्यंत. आणि एक नयनमनोहर चौकार सर्वांना पहावयास मिळाला. पॅव्हीलियनमधुन झालेला टाळ्यांचा कडकडात आजही आठवतोय मला. खरंच छान स्ट्रोक होता तो, त्याने मला आत्मविश्वास दिला. मग त्याला सलग चार चौकार ठोकले आणि माझ्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली. तसल्या क्षेत्ररक्षकांसमोर मी मॅक्ग्राथलाही झोडला असता, काळेची काय कथा?. चार चौकारांचा फ़ायदा असा झाला की दिनेशला सुद्धा ते पाहुन आत्मविश्वास मिळाला. त्याला मी पुन्हा बजावले की तु काहीही कर पण आऊट होऊ नकोस मी धावा करीन हवंतर. तोही पेटला मग. आम्ही मग मागे वळुन पाहीलेच नाही. एकेरी धावांवर भर देत आणि अधुन मधुन चौकारांची मदत घेत आम्ही १५० पर्यंत मजल मारली. त्यांची गोलंदाजी स्वैर होती, प्रत्येक षटकामागे एक तरी अवांतर धाव हमखास मिळत होती. आणि २-३ एकेरी धावा घेतल्या की RRR चं ओझं कमी होत होतं. टायमिंग छान होत होते आणि मी मारलेला प्रत्येक शॉट मी जसा योजुन मारायचो अगदी तसाच जाय़चा. क्रिकेटमधे प्रत्येकाचा दिवस असतो असं म्हणतात. आणि तो दिवस माझा होता. माझे अर्धशतकही लागले पण अर्धशतकाची तेव्हा कोणाला तमा होती, माझे लक्ष्य होते १९९ धावा. संघाचा विजय मला हवा होता. वाघाला सडेतोड उत्तर द्यायचे होते आणि ते पण माझ्या बॅटने. पण तेव्हाच दिनेशची विकेट गेली. अरे देवा ! हे काय झाले? काळजातुन कट्यार आरपार व्हावी असंच काहीसं वाटलं मला. एकतर आम्ही ८ बाद ६३ वरुन किल्ला लढवत आणला होता आणि आम्ही दोघांनीच तो पार करायचा असं ठरवलं होतं आम्ही. पण नियतीला ते मान्य नव्हते. त्यालाही बाद झालेलं आवडलं नाही.. खूप निराश झाला तो. मित्राचे प्रॉमिस तोडल्याचं दु:ख त्याच्या चेह-यावर अनुभवलं मी. दिनेश जाताना "सॉरी विजु" म्हणुन गेला अगदी त्याच्या खोल हृदयातुन. मी त्याला "वेल प्लेड" म्हणुन अलविदा दिला. आणि सामना जिंकेन असा विश्वासही. दिनेशची २५ धावांची खेळी बहुमुल्य होती. दिनेश बाद झाल्यानंतर स्नेहल माने आला. त्यालाही मी समजावुन सांगितले पण संयमी फ़लंदाजी त्याचा पिंड नाही हे त्याने मला लगेच दाखवुन दिले. गुडघ्यावर बसुन त्याने मिडविकेटला सनसनीत चौकार खेचला. मस्तच एकदम.. त्याचा फ़लंदाजीतला विश्वास पाहुन मलाही हुरुप आला. ९ गडी बाद झाले होते आणि साधी चूकसुद्धा सामना गमावण्यासाठी पुरेशी ठरणार होती. स्नेहलपण नशीबाची साथ घेऊन आला होता त्याचे दोन मिडविकेट कडे भिरकावलेले स्लॉग स्वीप कत्ती लागुन शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरुन गेले अन धावाही मिळाल्या. जिंकण्यासाठी ३ धावा बाकी असताना स्ट्राईक घेतली. आता फ़क्त एक यशस्वी फ़टका सामन्याचा निकाल लावणार होता. आणि लेगस्पीनरसमोर स्नेहलला स्ट्राईक द्यायचा नव्हता. लेगस्पीनरने ऊंची दिलेला चेंडु पुढे सरसावत मिड ऑफ़ला फ़टकावला आणि फ़िल्डरने आड्वायच्या आत तो सीमारेषेपार झाला.. माझी मोहीम फ़त्ते.. सामना जिंकलो.. आणि तेव्हा माझी बॅट हवेत गेली.. दोन्ही हात ऊंचावुन माझ्या सवंगड्याना अभिवादन केले..जिंकलो रे...!! सगळे पॅव्हीलियन माझ्यासाठी क्रिजपर्यंत धावत आले आणि माझ्यावर कौतुकाचा वर्षाव करु लागले.. सगळ्यांनी तोंडभरुन कौतुक केले... आकाश ठेंगणे कसे होते याचा जिवंत अनुभव घेतला... एक अशक्यप्राय विजय मी साध्य केला होता... नाहीतर ८ बाद ६३ वरुन ९ बाद २०२ वर पोहोचणे स्वप्नातही शक्य नाही. म्हणुनच ही खेळी अविस्मरणीय. लॉ कॉलेजच्या कॅंटिनमधे छॊटीशी पार्टीही झाली... अर्थातच माझ्याकडुन.. ३ दिवसांनंतर न्युजपेपर मधे नाव पण येऊन गेले. टेल्को रिक्रीएशन क्लब: ९ बाद १९८ (प्रसाद साळवी ५४, राकेश वाल्मिकी ५४, अविनाश शिदोरे ५/३७) पराभुत विरुद्ध कॅनॉन क्लब: ९ बाद २०२ (विजय वसवे नाबाद ८०)

No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...