Tuesday 10 July 2012

माझा झंझावात...!


मी सिंहगड क्लबकडुन खेळायचो तेव्हाची गोष्ट आहे.. SSPMS च्या ग्राऊंडवर OLD MONK CLUB बरोबरची मॅच. ओल्ड मॉन्क म्हणजे.. अहं.. नावावर जाऊ नका.. मिलीटरीचा खंबा नव्हे.. वय झालेल्या क्रिकेटर्सचा क्लब आहे तो... किमान मैदानावर तरी.. मैदानाबाहेर मला माहीत नाही हं... मैदानाबाहेरचा काहीतरी संबंध असु शकतो... असोत... पण ते दर वेळेस ४-५ नविन रक्ताचे क्रिकेटर घेऊन येतात. आणि समोरच्या संघाला सरप्राईज देतात. PDCA (Pune District Cricket Association) चा सर्वोच्च वैयक्तीक धावांचा विक्रम OLD MONK च्या फ़लंदाजाच्या नावावर आहे. याच्यावरुन तुम्हाला अंदाज येईल. रोहीदास माताळे सिंहगड क्लबचा कॅप्टन होता. मी जेवढया कॅप्टन बरोबर खेळलो त्यातला माझा सर्वात आवडता कर्णधार म्हणजे रोहीदास. जिंकण्याची जिद्द काय असते? हे मी त्याच्याकडुन शिकलो. त्याच्याबरोबर खेळताना मी अकराव्या नंबरपासुन सुरुवात केली होती. माझा पदार्पणाचा सामना मला अजुन आठवतोय.. जिंकायला १५ धावा हव्या असताना मी गेलो होतो. आणि जिंकायला ४ धावा असताना short midwicket ला झेलबाद झालो. सामना हरलो पण तो माझ्यावर चिडला नाही. त्याने माझ्यातल्या फ़लंदाजाला ओळखले. त्याच्याकडे पारखी नजर होती. त्यानंतर सामन्यागणिक त्याने माझी बढती केली आणि मी एक प्रमुख फ़लंदाज म्हणुन सिंहगड क्लबमधे स्थिरावलो. ४ था क्रमांक मला मिळाला. मी पण त्याचा निर्णय कधीच चुकीचा ठरवला नाही. दोन सामन्यांमधे मी हमखास एक अर्धशतक करायचो. ख-या अर्थाने अष्टपैलु म्हणुन खेळायचो मी, गोलंदाजीची सुरुवात आणि ४थ्या क्रमांकावर फ़लंदाजी. सिंहगड क्लबसाठी केलेले शतक तर लाखमोलाचे...अविस्मरणीय. पण पुढे मला सिंहगड क्लब सोडावा लागला अपरिहार्य कारणासाठी. माझ्या सुट्टीचा वार असायचा गुरुवार आणि सिंहगड क्लबच्या मॅचेस असायच्या रविवारी. नाईलाजास्तव मी क्लब बदलला. तर OLD MONK CLUB बरोबर मॅच होती. आम्ही पहीले क्षेत्ररक्षण घेतले. गद्रे सर म्हणाले होते,"आमच्याकडे आज एक अफ़लातुन गोलंदाज आहे, तुमचे काही खरे नाही." च्यायला ! म्हणलं कशाला विषाची परीक्षा..? म्हणुन आम्ही आपली पहीली फ़िल्डींग घेतली. आमची शेवटची फ़ळी अनुनभवी होती. नविन चेंडुवर जर त्या गोलंदाजाने विकेट्स घेतल्या तर झाली का पंचाईत. टारगेट चेस करुयात म्हणुन रोहीदासने फ़िल्डींग घेतली. तेव्हा Summer League चे सामने ३० षटकांचे होत असत. पण सामना ऊशिरा सुरु झाल्यामुळे २० षटकांचा करण्यात आला होता. त्यांनी ९९ धावा केल्या. आणि आम्हाला १०० धावांचे टारगेट आले. आता त्यांचा अफ़लातुन गोलंदाज.. आमचे ओपनर्स जरा टेन्शन मधेच होते राव. ओपनर्स मैदानात जातानाच मी बॅटींग पॅड बांधुन तयार असायचो. आमचा १० स्कोअर व्हायच्या आत ओपनर्स परत पॅव्हीलियनमधे.. आता काही खरं नाही. मी त्याचा पहीला चेंडु खेळलो आणि जाणवलं की खरंच काही खरं नाही. च्यामारी.. आता काय करायचं?. बजरंग बली की जय.. "जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली" मनातल्या मनात पुटपुटलो. आता आर नाही तर पार.. होऊन जाउ देत.. दोन पाऊले क्रिजच्या पुढे थांबलो आणि जी तुडवायला सुरुवात केली, "दे माय धरणी ठाय" झाले त्याला. काही स्तुतीसुमनेही उधळली त्याने माझ्यावर. मग मला अजुनच स्फ़ुरण चढले.. त्याचा कोणताही आणि कसलाही चेंडु मी सहज भिरकावुन द्यायचो सीमारेषेकडे. षटकामागे १०-१५ धावा यायला लागल्या. long On, long off आणि Mid wicket चे फ़िल्डर्स नुसते चेंडु घेऊन यायचे बॉंड्रीबाहेरचा. ख-या अर्थाने "दे घुमा के" चालु होतं. सगळे शॉट एकदम चुम्मा टाईप. मी षटकार मारण्याच्या फ़ंदात पडत नाही, नाहीतर ते पण मारले असते त्यादिवशी. त्यानंतर त्यांनी वैतागुन स्पिनर आणला. माझ्या जोडीला राजेश मंगरुळे होता. राजेशला स्पिनरला पुढे सरसावुन मारायला खुपखुप आवडते. मी राजेशला खो दिला. आता तुझी पाळी.. त्यानेही काही कसर ठेवली नाही. ऑफ़स्पिनरने गोलंदाजी चालु केली. राजेशने ऑफ़स्पिनरला पुढे सरसावत त्याचा सर्वात आवडता फ़टका मारला.. तो चेंडु Long On च्या कैक अंतरावरुन बाभळींच्या झाडाकडेला असलेल्या झोपड्यांकडे जाऊन पडला. कमीत कमी ११० मीटर. त्याचा हा शॉट एवढा आवड्ता आहे की जगातल्या कुठल्याही बॉलरने जरी त्याच्या पट्ट्यात चेंडु दिला ना की तो फ़क्त मिडविकेट्च्या बाहेर बघायचा.. बस्स दुसरं काही नाही.. त्याची SunnyTonny ची बॅट नविनच होती तेव्हा. कसाबसा चेंडु परत आला. आणि पुढचा शॉट हा पहील्याची अ‍ॅक्शन रिप्ले.. पुन्हा कमीत कमी ११० मीटर. OLD MONK आगीतुन फ़ुफ़ाट्यात गेले. आम्ही 8.2 ओव्हर्समधे 100/2 धावा केल्या आणि आमचा झंझावात संपवला. माझे सर्वात जलद अर्धशतक ह्याच सामन्यात झाले. गद्रे सर म्हणाले आमच्या अफ़लातुनच्या पार चिंध्या केल्यात राव तुम्ही.. आणि तेही हसत हसत.. अर्थातच "Well Played वसवे" म्हणत.. मला त्यांचा खिलाडुपणा जाम आवडला.

No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...