Tuesday, 10 July 2012

माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेत माझी भुमीका..


माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेत माझी भुमीका... अर्थातच मीच सर्वकाही "खलनिग्रहणाय सद्र्क्षणाय". माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेचे नियोजन आणि अंमलबजावणी माझ्यावरच तर अवलंबुन आहे नाहीतरी ह्या धावपळीच्या जगात ईतरांकडुन अपेक्षा तरी कशी ठेवणार. कोणाला एवढा वेळ असतो.... सगळेच आपापल्या व्यापात अडकलेले आहेत. कुटुंबाची सुरक्षा म्हणजे कुटुंबाभोवती ’मिसाईल शिल्ड" वगैरे लावुन घेणे नव्हे, अमेरीकेने लावुन घेतलीय तशी.. ह्याची सुरुवात मुलांना नखं कापताना नेलकटर कसे पकडायचे? आणि बोटांना ईजा होऊ नये म्हणुन कोणती काळजी घ्यायची ह्याच्यापासुन होते. पण एवढे करुनही ईजा होणार नाही याची काही गॅरंटी नाही... मुलेच ती... त्यांना खासकरुन "असे करु नका" म्हणलं की ते त्यांनी केलंच म्हणुन समजा... म्हणुन मी त्यांना "FIRST AID" पण शिकवुन ठेवलंय. आपण कितीही प्रशिक्षण घेतले किंवा दिले तरीही शेवटी अपघात हे होतच असतात म्हणुन खबरदारीचे उपायसुद्धा माहीत असणे गरजेचे आहे. एकदा सौ. ला LPG बद्द्लच्या धोक्यांविषयी आणि पाळावयांच्या सुरक्षेततेविषयी सगळी माहीती दिली तर ती म्हणाली मला तर हे सर्व माहीत आहे तरीसुद्धा तुम्ही मला हे का सांगताय?? मी म्हणालो ती माझी जबाबदारी आहे. जसे मी घरी परत येईपर्यंत तुम्ही माझी काळजी करता तसेच मी घराबाहेर पडलो की मला ह्या LPG नावाच्या सैतानाची काळजी लागलेली असते, म्हणुन सारखं सारखं सागावंसं वाटतं.. आणि तिला हे पण सांगितले की टाटा मोटर्समध्ये LPG विषयी कमालीची जागरूकता आहे.. आम्हाला वेळोवेळी विवीध सुरक्षा कारणांसाठी प्रशिक्षण दिलं जातं. आणि तिला तसाही अभिमान आहेच टाटा मोटर्सचा पण तो आणखीच दुणावला. किचन ओटयावर आणि गॅस शेगडीच्या अवती भोवती झुरळांची दादागिरी चालते. कसलाही स्प्रे मारा, त्यांच्यावर असर म्हणुन होत नाही. मला तर ही झुरळं म्हणजे अश्वत्थाम्याचे वंशज वाटतात. अणुभट्टीमधे राहु शकतात हे प्राणी मग त्यांना गॅस शेगडीची काय तमा. मग त्यांना पळवुन लावण्यासाठी अनेक ऊपाययोजना ओघाने आल्याच. त्यातलाच एक उपाय म्हणजे स्प्रे पण जळत्या गॅससमोर स्प्रे वापरणे हे अत्यंत धोकादायक ज्याला आपण "HAZARDOUS" हा शब्द आपल्या कामामधे वापरतो.झुरळांचा स्प्रे हा जळत्या गॅससमोर वापरणे किती धोकादायक आहे हे माझ्या सौ. ला घड्लेल्या घटनांचा दाखला देत पटवुन दिलेले आहे. एक-दोन वर्षापुर्वीची गोष्ट आहे, मी नेहमी सौ. ला सांगायचो की सीट बेल्ट लावणं किती महत्त्वाचं आहे आणि कारमधे बसल्या-बसल्या सीट बेल्ट लावायलाच पाहीजे. पण सहजासहजी ऐकेल ती पत्नी कसली.. नेहमी वेगवेगळी कारणे मला बांधल्यासारखंच वाटतं गाडीमधे, कायतर माझ्याकडे बॅगा आहेत, मला नाही आवडत सीटबेल्ट वगैरे वगैरे... एकदा अनायासे डेक्कनला गेलो होतो आणि तिकडुन परतताना लकडी पुल लागणारच होता.. म्हणलं आज होऊन जाऊ दे .. मी पण लावलेला सीट बेल्ट काढला आणि लकडी पुलावरुन आलो. नेमका सिग्नलला हवालदाराच्या समोरच येऊन थांबलो.. मग काय?? नेहमीचं तुम्हाला माहीतच आहे.. "घ्या साईडला" साईडला जाऊन कायदेशीररीत्या १०० रूपये दंड भरला. पण सौ. ला सांगितले ५०० रूपये भरले. तेव्हापासुन गाडीत बसल्या बसल्या सीट बेल्ट लावला जातो ट्रॅफ़ीकचा नियम म्हणुन नव्हे तर नव-याचे ५०० रूपये जाऊ नयेत म्हणुन. शेवटी १०० रूपये घालवुन सीट बेल्ट लावायला शिकुन घेतले. जे आपल्या हातात आहे किंवा ज्या गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवु शकतो त्या गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात. नाहीतर तुम्ही विचाराल मग त्सुनामीसाठी काय उपाययोजना केली आहे? असे विचारणारे बहाद्दरपण असतात बरं का. पण त्सुनामीवर आपले नियंत्रण नाही आणि ठेवुही शकत नाही. पण असे काही धोके आहेत जे आपल्या नियंत्रणामधे राहु शकतात किंवा आपण त्यांच्यावर नियोजनबद्ध नियंत्रण मिळवु शकतो. जसे की आगीचा धोका. आग कशी लागते हे तर आपणा सर्वांना माहीत आहेच.. आहे ना माहीती?? आग लागण्यासाठी प्रामुख्याने तीन घटक लागतात हवेतील ऑक्सीजन, ऊष्णता आणि कोणताही ज्वलनशील पदार्थ. मग आग लागु नये म्हणुन काय करायला पाहीजे... सांगा बरं... सोपं आहे... वरील तिन्ही घटक एकत्र येणार नाहीत याची काळजी घेणे. आणि एवढं करुनही जर आग लागलीच तर आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करायला पाहीजे. आग विझवणे म्हणजेच आगीसाठी लागणारे तिन्ही घटक एकमेकांपासुन वेगळे करणे. पण कधी-कधी आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आणि आगीमुळे होणारे नुकसानही जबरदस्त आर्थिक फ़टका देणारे असते. म्हणुन सर्वात खबरदारीचा ऊपाय म्हणजे आग लागु न देणे. आणि आग न लागण्यासाठी काय करायला पाहीजे ह्याचे सर्वांना प्रशिक्षण देणे. ईंश्युरंस वगैरे असतो पण मनाला होणा-या वेदना शमवण्याचा ईंश्युरंस अजुन निघायचाय. काहींना वाटेल की ईंश्युरंस कंपनी माझ्या कुटुंबाची काळजी घेईल आणि त्यांना सुरक्षा देईल पण तसं काही नसतं कित्येकदा ईंश्युरन्सच्या पैशांवरुन झालेली हाणामारी आपण वृत्तपत्रांमधुन वाचतो. पण ईंश्युरन्स हा आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मदत देऊ शकतो सुरक्षेची भुमिका बजावु शकत नाही. आपल्या कुटुंबाची सुरक्षा तसेच आपण ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेच्या सुरक्षेचे शिल्पकार आपणच आहोत. "त्वमेव केवलम" फ़क्त आपणच आपल्या कुटुंबाची आणि आपल्या संस्थेची सुरक्षा योग्यपणे हाताळु शकतो. "दुस-यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला." याचबरोबर आपल्या स्वत:च्या सुरक्षेवर देखील काळजीपुर्वक लक्ष द्या. आणि नेहमी लक्षात ठेवा न विसरता "घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे". तुम्हां सर्वांना सेफ़्टी विकच्या हार्दीक शुभेच्छा. (ईंडस्ट्रीजमधे काम करणा-या माझ्या सर्व मित्रांसाठी) 4 ते 10 मार्चच्या सेफ़्टी विकच्या निमित्ताने... © Copyright Vijay Vasve

No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...