Tuesday, 10 July 2012

"रामलाल" DY Patil स्टेडीयम, नेरळ.


IPL चं पहीलं वर्ष २००८. पुण्यामधे मॅच बघायची सोय नव्हती. म्हणुन काय गप्प बसतोय होय आम्ही?. मुंबईच्या मॅचेस बघायचा जुनुन सवार असायचा आमच्यावर. त्यातल्या त्यात नेरळला आमची पसंती असायची. एक्सप्रेस हायवेने गेले की अगदी जवळ पडायचे नेरळ. मॅच पहायची तर हौस पण तिकीटे कशी काढायची?? मोठा गहन प्रश्न असायचा. सगळी चक्रे फ़िरवल्यानंतर एक धागा जोडलाच आम्ही. नेरळचे स्टेडीयम DY Patil कॉलेजचे, पिंपरीत पण DY Patil कॉलेज आहे. भुमितीतले समीकरण वापरले. DY Patil कॉलेज= IPL मॅच. संदीप आहेर कडुन अभय कोटकरांचा नंबर घेतला. अभय कोटकर म्हणजे DY Patil कॉलेजचे क्रिकेट सर्वेसर्वा. त्यांनी तिकीटांची शाश्वती दिली पण म्हणाले की तुम्हाला तिकीटे स्टेडीयम वर मिळतील. आणि तिथल्या संदीपचा नंबर दिला. त्यानंतर आम्ही फ़क्त संदीपच्या संपर्कात राहीलो. पाच तिकीटे ठेवायला सांगितली त्याला.. सगळं सेटींग मोबाईलवर. प्रत्यक्ष भेट कोणाशीही नाही. "पाण्यात म्हैस वर हिशोब". पण आपण जायचेच असं आम्ही ठरवलेलं.

मॅचच्या दिवशी सकाळी एकदा नेरळच्या संदिपला फ़ोन लावला "आम्ही येतोय पुण्यावरुन मॅच पाहायला आमची पाच तिकीटे आहेत ना? नाहीतर एवढ्या लांब येऊन घोळ नको व्हायला." संदिप, "हो आहेत, या तुम्ही... स्टेडीयमवर आल्यावर फ़ोन करा.. मी तिकीट काऊंटरवर येऊन तुम्हाला तिकीटे देईन ". जीव भांडयात पडला.. मुंबई वि. राजस्थान ८ वाजताची मॅच होती. तिकीटे सांगितलेली पाच अन मॅच बघायला निघालो चारजण. मग एका तिकीटाचे काय करायचे ह्याची तजवीज आम्ही पुण्यातुन स्टार्टर मारल्यापासुन करत होतो.. लोणावळ्यातले वडापाव खात खात आम्ही आगेकुच चालु ठेवली. आणि मजल-दरमजल करत नेरळ स्टेडीयमवर पोहोचलो. माझी ८०० फ़्लायओव्हरखाली पार्क केली आणि संदीपला फ़ोन लावत लावत तिकीट काऊंटरकडे गेलो. तिकीट काऊंटरवर संदिप नव्हता.. आईच्या गावात... आता काय करायचं?.. त्याचा फ़ोनही लागेना... मगतर आमची तंतरलीच.... आपल्याला फ़सवण्यात आले आहे.. तिकीटे नाहीत...
त्याचा फ़ोनही लागत नव्हता... स्विच ऑफ़ केला त्याने... अरे देवा ! आता काय खरं नाही.. वाचव रे बाबा..!

आम्ही प्लॅन बी कडे वळलो.. मिळतील तिथुन तिकीटे घ्यायचीच आणि काहीही झाले तरी मॅच पाहायचीच असं जाम ठरवलं आम्ही.. एक माणुस दिसलाच आम्हाला.. हातात तिकीटे नाचवत.. १००० रुपयांवाली पाच तिकीटे होती त्याच्याकडे. "चार पाहीजेत" म्हणुन आम्ही चार हजार एकत्र करुन त्याच्याकडे गेलो. तो म्हणाला "जरा साईडमें आओ"
त्याने तिकीटे वर काढली,.. मोजली.. आणि आम्ही देवाण-घेवाण करणार एवढयात एका महीला पोलासाने त्याचा हात तिकीटांसकट पकडला आणि तिकीटे जप्त केली.. "ब्लॅक करतो भडव्या.. xxx xxx xx" बराच उद्धार केला त्याचा त्यांनी.. आमचे पैसे वाचले योगेश पंडीतांच्या चतुराईमुळे.. त्याने पैसे लवकर बाहेर काढले नाहीत आणि देऊनही दिले नाहीत. नाहीतर तिकीटांबरोबर पैसेही घेतले असते (जप्त केले असते) त्या पोलिसांनी.. कसेबसे निसटलो.. आणि पैसेही जप्त झाले नाहीत.. सुटकेचा निश्वास टाकला...
आम्ही पुन्हा संदिपला फ़ोन लावु लागलो.. कसाबसा फ़ोन लागला.. फ़ोन उचलला एका मुलीने. आता ह्या नंबरवर मुलगी कुठुन आली? आम्हाला आणखीनच बनवल्यासारखं वाटलं. बुडत्याचा पाय खोलात कसा जातो ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो आम्ही. तिच्या सांगण्यावरुन आम्ही थोडयावेळाने पुन्हा फ़ोन केला. मग एकदाचा संदिप फ़ोनवर बोलला. त्याचा आवाज ऐकुन परमेश्वर प्राप्तीचा अनुभव झाला आम्हाला. तो म्हणाला तुमची तिकीटे रामलाल कडे आहेत आणि तो स्टॆडीयमवर आहे. रामलालचा नंबरपण दिला आम्हाला.

आता हा रामलाल कोण?? आणि त्याला शोधायचा कुठे? सगळंच अधांतरी. माझी तर पक्की खात्रीच झालेली, आपल्याला फ़सवलेलं आहे. आता मिळतील तिथुन तिकीटे घ्या आणि मॅच बघा. रामलालला फ़ोन चालुच होते. रामलाल स्टेडीयमच्याबाहेर थांबलेला होता. "मैं खडा हुं ईधर, आप आईये और तिकीट ले जाईये". ईधर खडा हुं.. स्टेडीयम म्हणजे काय बस स्टॉप आहे का?? कुठे शोधणार त्याला?? संभाषणावरुन जरा व्यक्ती परीचय करुन घेण्याचा प्रयत्न केला. त्याला त्याचा ठिकाणा सांगता येत नव्हता. फ़ोनमधुन बोलताना गाडयांचे आवाज यायचे, ह्याच्यावरुन तो कुठेतरी रोडवरच थांबलेला होता. मग त्याला विचारले "तुझ्या आजुबाजुला काय काय आहे सांग?" एवढ्यात सुद्धा मी एका सरदारजी कडे तिकीट घ्यायला गेलोच पण त्याच्याकडे नेमकी तीनच तिकीटे होती. असेही हे पैसे जप्तच होणार होते मग जाउ दे. पण नशीबातच नव्हते.

रामलालने सांगितले की त्याच्या बाजुला बॅंक ऑफ़ बडोद्याचे ATM आहे आणि तो तिथे झाडाखाली उभा आहे. मग आम्ही ससाण्यासारखे निघालो स्टेडीयमच्या भोवतीने... बॅंक ऑफ़ बडोद्याचे ATM शोधत... त्यातही पोलिसांचा ससेमिरा. ईकडुन जाऊ नका.. तिकडुन जाऊ नका... बॅंक ऑफ़ बडोद्याचे ATM दिसले एकदाचे आणि IPL चा टि-शर्ट घातलेला रामलाल त्या झाडाखाली.. एवढे वर्णन माहीत झाल्यावर त्याला ओळखणे एवढे का अवघड होते.. त्यात तो आमच्यासाठी पंचप्राण घेउन आलेल्या हनुमानासारखा.. १५ मीटरवरुनच आवाज दिला "ऒ रामलाल" त्या हाकेमधे एक आगतिकता होती... वाळवंटात प्यायला पाणी सापडल्यानंतरची तृप्तता होती. "ऒ रामलाल" करत आम्ही त्याच्याजवळ गेलो.. तर रामलाल एकदम भावनात्मक झालेला. त्याच्या चेह-यावर एक आकस्मिक चमक दिसत होती.
रामलाल आश्चर्यचकीत होऊन म्हणाला "ये बताओ, मुझे कैसे पहचाना?"
"अरे आपको कौन नहीं पहचानता रामलाल, आप को तो देखतेही पहचान गये हम"
हे ऐकुन एक मस्त स्मितरेषा त्याच्या चेह-यावर झळकुन गेली. एक समाधान त्याच्या चेह-यावर उमटले. केवढा खुष दिसत होता तो. त्या एका हाकेने...
"मुझे कैसे पहचाना?" हे जवळ-जवळ चार ते पाच वेळा विचारले त्याने.
"वो बात हुई थी पांच टिकट की, हम पुनेसे आये है "
"हां मैने संभालके रखे है, आपके पांच टिकट, ले लो"
"रामलाल, देखो ऐसा है अब हमें सिर्फ़ चार टिकट चाहीए"
"ये नहीं हो सकता, आपको पांच टिकट लेने पढेंगे"
गंम्मत म्हणजे त्याला तिकीटे मागणारी चार-पाच माणसं त्याच्या भोवती फ़िरत होती. पण तो त्यातल्या एकालाही तिकीट देत नव्हता. केवढे सोपे होते ते.... आमचे एक्स्ट्रा तिकीट त्यातल्या एकाला विकुन मोकळे व्हायचे.
असे केले तर मग तो रामलाल कसला??
आम्ही आपले चारवरच समाधानी झालो होतो.
पुन्हा तोच संवाद...
"देखो ऐसा है, अब हमें सिर्फ़ चार टिकट चाहीए"
"आपको पांच टिकट लेने ही पढेंगे"
रामलाल काही केल्या ऐकेना. भाबडा होता बिचारा. अतिशय प्रामाणिकही वाटला.
आता पुणेरी तडका दिल्याशिवाय काही गत्यंतर दिसत नव्हते. त्याच्याकडुन पाच तिकीटे घेतली. आणि एक तिकीट तिथेच उभ्या असलेल्या माणसाला विकले १०० रुपये जास्त घेऊन. आणि ते पैसे रामलालला देऊ केले तर ते पण तो घेईना.. आता कमाल झाली.. आयुष्यात खुप व्यक्ती पाहील्या पण हा अनुभव जरा विलक्षणच होता. आता आम्हाला सरप्राईज पॅकेज भेटले होते. ज्या तिकीटांसाठी आम्ही जीवाचे रान करत होतो, ती तर आम्हाला सहज मिळाली. दु:खाचा डोंगर पार करुन आम्ही सुखाच्या हिरवळीवर आलो होतो.
रामलालचा प्रतिसाद आम्हाला थक्क करणारा होता. दोन शक्यता मी मनामधे घोळु लागलो. एकतर त्याला एवढ्या प्रेमाने कुणी हाक मारत नसावे अथवा त्याचा सिक्रेट ठिकाणा आम्ही शोधल्याचा त्याला आनंद झाला असावा. काहीही असो एक ठसा उमटवुन गेला तो.. कायमचा.....

आम्हालाही मॅच पाहायला उशिर होत होता. आम्ही त्याचे आभार मानुन निघालो..
असा हा रामलाल ! मी कधीही विसरु शकत नाही. केवळ अविस्मरणीय...!

3 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. छान अनुभव आहे IPL चा... माझ्या मित्रमंडळींपैकी पण बरेच जण असे आहेत की जे जीवाचे रान करून IPL पाहायला जातात. आता गहुंज्याला स्टेडीयम झाल्याने काम जरा सोपे झाले आहे. आणि रामलाल मात्र अविस्मरणीय...

    ReplyDelete
  3. तेव्हा फ़ार उत्सुकता असायची रे.. आता तेव्हासारखी मजा येत नाही.
    आता गहुंजेला स्टेडीयम आहे, पण केवढी गर्दी होते मॅच संपल्यावर गाड्यांची.. पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित झाल्यावरच खरी मजा येईल..

    ReplyDelete

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...