Saturday, 20 April 2013

मानवीय कालगणना

"मानवीय कालगणना"
उपनिषदे आणि भगवद गीतेतील प्रमाणानुसार कालगणना अशी आहे;
सत्य, त्रेता, द्वापार आणि कलि ही चार युगे एकामागुन एक चालु असतात.
चार युगे पुर्ण झाली की त्याला एक चतुर्युग म्हणतात.
अशी हजार चतुर्युगे झाली की ब्रम्हदेवाचा सुर्यास्त होतो (१२ तास)
भगवदगीतेतील श्लोक:
अध्याय ८, श्लोक १७ :
सहस्त्रयुगपर्यंन्तमहर्यद्ब्रम्हणो विदु: l
रात्रिं युगसहस्त्रान्तां तेहोरात्रविदो जना: ll 
"मानवीय कालगणनेनुसार, एक सहस्त्र चतुर्युगे म्हणजे ब्रम्हदेवाचा एक दिवस होतो आणि अशाच एक सहस्त्र चतुर्युगांची ब्रम्हदेवाची एक रात्र असते."


हा झाला गीतेतील श्लोक, निश्चित आठवत नाही पण बहुतेक मुंडक उपनिषदामधे कालगणना दिलेली आहे...ती अशी आहे.
सत्ययुग कालावधी- १७ लाख २८ हजार वर्षे
त्रेता युग कालावधी- १२ लाख ९६ हजार वर्षे
द्वापारयुग कालावधी- ८ लाख ६४ हजार वर्षे
कलियुग कालावधी- ४ लाख ३२ हजार वर्षे.
एवढी सगळी वर्षे म्हणजे एक चतुर्युग.
अशी हजार चतुर्युगे म्हणजे ब्रम्हदेवाचे १२ तास..
ब्रम्हदेवाला १०० वर्षे आयुष्य आहे..

ब्रम्हदेवाच्या मृत्युनंतर दिर्घ आयुष्याचे वरदान असलेल्या लोमष ऋषींच्या अंगावरील एखादा केस गळुन पडतो...
असे दिर्घ आयुष्याचे वरदान असलेले लोमष ऋषी म्हणतात..
"आयुष्य क्षणभंगुर आहे"... :D ..

Friday, 5 April 2013

धबधबा... पावसाळ्यातला आणि मनातला !



वर्गमित्रांबरोबर ब-याचदा फ़ोनवर बोलणे व्हायचे.. आपण कधी भेटत नाही, कधी कुठे ट्रिपला एकत्र जात नाही याची कायम खंत ऎकायला मिळायची. कुठेतरी भेटु या रे !! तु बोलव ना सगळ्यांना, आपण भेटु यार!. खुप दिवस झाले. मला त्याचा नंबर देऊन ठेव, मी पण बोलतो त्याच्याशी. नक्की जाउ कुठेतरी. प्रत्येकाचा फ़िक्स हाच डायलॉग. बोलता बोलता उन्हाळा सरुन गेला. पावसाळा आला, पण पाऊस... तोही आमच्या ट्रिपसारखाच.. तो कुठे आला?
दैनंदिन जीवनचक्रातुन थोडासा विरंगुळा तर हवा होताच. खुप दिवस मित्रांचा झालेला विरह.. काय करायचं? काय करायचं? काहीच कळत नव्हतं. असं करता करता मीच शिवाजी व्हायचं ठरवलं. हर हर महादेव !

"मोहीम वरंधा"... ठरलं तर. मी जुन्या सवंगडयांबरोबर सहलीची स्वप्नं पाहत होतो. खुप दिवस होऊन गेले एकत्र ट्रिपला गेलेलो. तसं अधुन मधुन पार्टया वगैरे करायचो पण त्याला ट्रिपची मजा थोडी ना येते. सर्वात अगोदर बेत कोणाला सांगायचा? कमीत कमी "येतो", "बघु या" असं तरी म्हणणारा असावा. पक्याला फ़ोन लावला "YES DONE!! तु म्हणशील तिकडं जाऊ, पुढच्या रविवारी फ़िक्स. ओके.." मोहीमेला सुरुवात चांगली झाली,एक चांगला मावळा मिळाला. सुभ्या पण ओघानेच मोहीमेत मिसळला. पक्याने आणि मी म्हटल्यावर त्याने सुद्धा मम म्हटले. सच्या ने सुद्धा म्हटले पण म्हणता म्हणता त्याने ट्रिपमधील सात (७) दिवसांचे अंतर कमी केले, म्हणाला, " भाई लोग, तुमको ऎसा नहीं लगता कि अगला रविवार बहुत लंबा है, ईसी रविवार चलते है ना यार!!.. अब कंट्रोल नहीं होता." पाचवा मेबर तात्या.. येतो म्हणाला आणि त्याला आम्हीही नेतो म्हणालो सशर्त अटींवर terms & conditions apply.

शनिवारी रात्री सगळ्यांचे फ़ोन झाले. वेळेवर या बरं का सगळ्यांनी एकमेकांना बजावले. मी ट्रिपला लागणारी रसद आणुन ठेवली. सहलीचा रविवार उजाडला. नऊ वाजता स्वारगेटला जमायचे होते. मी बरोबर नऊला स्टार्टर चढवला आणि नऊ वीसला स्वारगेट. साडॆनऊ प्रस्थानाची वेळ ठरली होती. सगळे राजा-महाराजा सारखे दहा वाजता उगवले.


फ़ोटोमधे दिसत असल्याप्रमाणे सव्वा-दहाला एकदाचे प्रस्थान झाले. माझ्या गाडीला सारथ्यांची कमी नव्हती त्यामुळे मी पद्धतशीरपणे मागची सीट पकडली. गाडीचं ढेरकुलं भरुन आम्ही जुन्या कात्रज घाटाने घॊंगावत शिवापुरच्या बागेत पहीला मुक्काम घेतला. गाडी थांबल्या थांबल्या आमच्याभोवती भिका-यांचा गराडा पडला. भारत देश ज्यासाठी परदेशी लोकांमधे प्रसिद्ध आहे ते भिकारी लोक. प्रत्येकाने भावनिक होऊन खिशातली चिल्लर मोकळी केली. भिकारी पण पक्के व्यवसायिक होते बरं.. पैसे देताहेत म्हणलं की त्यांची रिग वाढायला लागली. तोल नाक्याला पैसे दयायला का-कु करणारे आपण या भिका-यांना किती सहजपणे पैसे देतो. मी सहजपणे बोलुन गेलो, मग काय, त्यांना कोणीही दमडा पण दिला नाही. पण खात्रीलायक सांगतो ते भिकारी बांग्लादेशी वाटत होते.

कैलास भेळचे पाच भेळीचे पुडे घेतले(चकण्याला). डब्यामधे लपथपीत चिकन घेतलेले होते. जिरा फ़्राईड आणि चपात्या (रोटया मिळाल्या नाहीत म्हणुन) गणिती हिशोब करुन घेतल्या. आपापल्या पसंतीचे ईतर महत्वाचे साहीत्य सुद्धा घेतले. पावसाची रीपरीप सुरु व्हायला लागली होती. एकंदरीत पावसात भिजायला मिळणार म्हणुन सुखावलो आणि मार्गस्थ झालो.

कैलास भेळ चे पाणीपुरी दृश्य

खेड-शिवापुरच्या तोलनाक्याला ईमानाइतबारे १०५ रुपये देऊन रिटर्न पास घेतला. काही काळापुर्वी अप्पर-डिप्पर दाखवला की MH-12 पासिंगची गाडी सोडायचे पण त्या तोलनाक्यावर आमदाराला झोडपलेलं ऎकुन आम्ही पंगा घ्यायचा विचार सोडुन दिला. कशाला उगाच चांगल्या ट्रिपचा विचका? वाढत्या वयानुसार आलेलं शहाणपण ! कापरहोळच्या पुढे उजवा हाताला वळलो. आणि ग्रुप फ़ोटो घेण्यासाठी गाडी थांबवली. प्रत्येकानं आळीपाळीनं एक-एक फ़ोटो काढला पण पाचही जण एकावेळेस फ़ोटोमधे आले पाहीजेत असा प्रत्येकाचाच मनसुबा. आता कोण काढणार पाच जणांचा फ़ोटो? तेवढयात दोन सायकलस्वार विध्यार्थी आले साधारण सातवी-आठवीतले असावेत. त्यांच्या सायकलचा हॅंडल धरुन त्यांच्या सायकली थांबवण्यात आल्या. सुभ्या मार्केटिंगमधला, त्याच्या लकबीसमोर त्या विध्यार्थांचा काय निभाव लागणार? त्यांनी बरहुकुम आमच्या ग्रुपचे फ़ोटो काढुन दिले. आम्ही लगेच कॅमेरा घेऊन फ़ोटो कसे आलेत बघायच्या लगबगीत ते दोघे विध्यार्थी सायकलवर टांग मारुन पसार झाले. अरेरे ! आपण खरं तर यांना काहीतरी दयायला पाहीजे होतं किमान त्यांचा फ़ोटो तरी घ्यायला पाहीजे होता यार.
ग्रुप फ़ोटो

भोरमार्गे वरंध्याच्या रस्ता धरला. घाट सुरु व्हायच्या आधी खिंडीसारख्या ठिकाणी छॊटया झाडाखाली सगळी रसद बाहेर काढली आणि खरपुस आनंद घ्यायला सुरुवात केली. पण तेवढयात पावसाने हजेरी लावली. क्षणात त्याचा जोर वाढला आणि आमची त्रेधातिरपीट उडाली. आम्ही तसेच झाडाखाली सरकलो, छत्रीचा आधार घेऊन हातात चपाती आणि द्रोण मधे भाजी घेऊन जेवण्याचा आनंद काही वेगळाच हं. केवळ अवर्णनीयच... पॊटात भर पडली आणि पाऊसाने सुद्धा विश्रांती घेतली. तिथेच लगोलग तयार झालेल्या छॊटयाशा पाण्याच्या प्रवाहाकडे आमचे लक्ष गेले. अरे आपण आलो तेव्हा ईथे काहीच नव्हते, ह्या आता पडलेल्या पावसानेच हा तयार झाला. तसं पाहीलं तर ते गढुळ पाणी होते एरवी आम्ही कुणीही त्याच्याकडे ढुंकुनही पाहीले नसते.




















लिंगाणा एक थरार


"लिंगाणा एक थरार"
"लिंगाणा"Climbing चे साहीत्य आणि Climbers ने खचाखच भरलेल्या दोन व्हिस्टा आणि एक मांझा सुसाट निघाल्या होत्या, शनिवार, २३ मार्च २०१३ (03:30 pm).
जागोजागी थांबलेले मावळे आणि त्यांची रसद गॊळा करत-करत NH-4 ने कायदेशीररीत्या तोल वगैरे भरुन (७० रुपये) भोर मार्गे वरंध्यात पोहोचलो (६:४० pm). सुर्यास्ताचे मनमोहक दृश जरी दहा मिनिटांसाठी गेले होते तरीसुद्धा सुर्याचे अंधुकसे पुर्णाकृती प्रतिबिंब पहायला मिळाले, हेही नसे थॊडके ! वरंधा घाटात भजी आणि वडापाव पोटात कोंबुन कोंबुन भरले कारण नंतर लिंगाण्याच्या गुहेत पोहोचेपर्यंत खाण्याचा योग नव्हता, त्यावर गरम गरम चहा ओतुन पुर्णविराम दिला आणि आमचा ताफा पुन्हा भरधाव निघाला.
वरंध्यातुन खाली उतरल्यावर उजवीकडे बिरवाडीकडे वळालो. रायगडाला पुर्वेकडुन वळसा घालणा-या रॊडने अड्राईच्या पुढे उजवीकडे पाणे गावात आल्यावर सर्वांनी ब्रेक लावले.(०९:३० pm). राम मंदिरासमोर गाडया लावुन सर्वांनी बॅगा भरायला सुरुवात केली. गाडीतुन उतरल्या उतरल्या प्रविण कुठेतरी गायब झाला होता. पर्यटक आलेले पाहुन गावक-यांनी पाण्याचा एक हांडा आणि पिण्यासाठी एक तांब्या देवळाच्या पाय-यांवर लगेच आणुन ठेवला.. केवढे हे आदरातिथ्य ! शहरी भागात असले आदरातिथ्य औषधालासुद्धा सापडत नाही. :( सर्व साहीत्य सम-समान प्रमाणात सर्व बॅगांमध्ये आम्ही भरत होतो. काही सॅक खुपच मोठया होत्या. मी संजयला म्हणालो,
"आपण ह्या मोठया सॅक नेण्यासाठी गावातली माणसं घेणार आहोत का?". तो काहीही बोलला नाही फक्त हसला...
माझ्या चौकस बुद्धीला खुराक म्हणुन ६-७ गावकरी आमच्या जवळच कोणाचीतरी वाट बघत उभे होते. आणि तसेही गावाकडची माणसं बोलाचालीला अजिबात कंजुषपणा करत नाहीत, आपण नुसता स्टार्टर दिला की ते शुन्य सेकंदात हायवे पकडतात. कुठुन आले?? वगैरे झाले.. नंतर क्लायंबर्सच्या वेगवेगळ्या कथा, माचीवर काय आहे?? ऊंची किती आहे?? चढण कशी आहे. गाववाल्यांकडुन अतिशय मौल्यवान माहीती मिळाली. आणि मी तेवढयात माझा Audio Recorder चालु केलेला होता..किसी को कुछ पता नहीं था... चलने दो...ते सांगत होते.
या किल्ल्यावर सर्वात पहीली चढाई करणारा म्हणजे संतोष गुजर. ते दोन मित्र होते. दोघांचं असं ठरलं होतं की एकाने रायगडवर जायचं आणि एकाने लिंगाण्यावर... आणि रात्री मशाल पेटवुन एकमेकांना मोहीम फत्ते झाल्याची ईशारत दयायची आणि नविन वर्षाचं स्वागत करायचं (30/12/1979). संतोष गुजर लिंगाण्यावर एकाकी चढाई करणार होता. ठरल्याप्रमाणे दोघांनीही आपापली चढाई चालु केली. त्या रात्री रायगडवाल्याने मशालीची ईशारत दिली पण लिंगाण्यावरची मशाल काही दिसली नाही. पुर्ण रात्र वाट पाहुनही मशालीची ज्योत न दिसल्यामुळे दुस-या दिवशी त्याचा मित्र धावतच पाणे गावात आला. कुशल गावक-यांना बरोबर घेऊन त्याने संतोषचा शोध सुरु केला. लिंगाणा माचीवर चौकशी केली पण ते म्हणाले,"किल्ल्याकडे एक माणुस गेलेला आम्ही पाहीला पण ईथुन परत कुणी गेलं नाही". शेवटी एकाला त्याच्या गॉगलचे तुकडे सापडले आणि त्याच दिशेने दरीमधे शोधले असता संतोष गुजरला देवाज्ञा झाल्याचं सिद्ध झालं. नंतर ईंटरनेटवर शोधले असता संतोष गुजर हा एक धाडसी आणि निष्णात गिर्यारोहक होता अशी माहीती मिळाली. आणि मनामध्ये थोडा हळहळलोसुद्धा.
गावक-यांबरोबर चर्चा पुढे चालु राहीली.. आता चर्चेमध्ये बबन कडु आलेला.. गावकरी त्याचे तोंडभरुन कौतुक करत होते. बबन कडुला ते "आमचा माणुस" असे अभिमानानं म्हणत होते. आमचा माणुस दोर न लावता किल्ल्याच्या माथ्यावर जातो.. ह मंग.. तो तुम्हाला घेऊन जाईल किल्ल्यावर तुम्ही काईबी काळजी करु नका. तुमच्या सारखी माणसं आली की पहीली त्यालाच शोधतात. चर्चा चालुच होती.. तेवढयात आमच्या ग्रुपकडे बघत एकाने "Attention" असा जोरात आवाज दिला. कमरेला कोयता अडकवलेला अन हातात काठी असलेला माणुस आमच्या दिशेने येऊ लागला, आम्हाला क्षणभर वाटलं पोलिस पाटील वगैरे आहे की काय..पण गावकरी बोलले "बबन कडु पाटील आला..."
प्रविण गाडीतुन उतरुन सरळ बबनला शोधायला गेला होता. त्याच्या मागोमाग तो पण आला आणि फटाफट आवराआवरी करुन तयार पण झाला. बबन पाटील ईंटरेस्टींग था भाई... बबनला भाई केल्यावर मी पण बबनचा भाई झालो. बबन "देशी" झालेला होता. पण माफीनाम्याच्या स्वरात बोलला,
"दिवसभर राब-राब राबल्यावर रात्री पुन्हा किल्ला चढायचा म्हणल्यावर थोडीशी घेवाक लागती.."
"पण काय लफडं-बिफडं व्हणार न्हाय ना भाई."-मी.
काहीबी काळजी करायची न्हाय..
"तुम्ही आमच्या गावात आलाव, तव्हा तुमची सगली जबाबदारी मांझ्याकडं लागली."
त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास जाणवला. सगळे बॅगा लावुन तयार झाले. प्रविणने जोरात "हर हर महादेव" ची गर्जना दिली, सगळ्यांनी जोरात "हर हर महादेव" केलं आणि आम्ही १०:३० मिनिटांनी किल्ल्याकडे प्रस्थान केलं..
चांदण्याच्या प्रकाशात वावरा-खासरातुन माचीकडे जाणा-या पायवाटेवरुन निघालो. बबन पुढे आणि आम्ही मागे.एकदा काऊंटींग दिला.. १ ते १७ भरले.. १७ आहेत.. मग नो प्रोब्लेम. सुरुवातीला मी बबनच्या मागोमाग होतो, माझी जड बॅग बघुन म्हणतो,
"भाई, तुमची बॅग घेऊ काय?"
"नको रे भाई.. घेऊ का म्हणलास हेच खुप झालं."
चांदण्याच्या उजेडात टॉर्चची गरज भासत नव्हती. ज्यांनी कुणी टॉर्च लावल्या होत्या त्यांना बंद करायला सांगण्यात आलं. चांदण्यात चालण्याचा आनंद काही औरच होता.पाटीलच्या देशीचा रंग ओसंडुन वाहत होता. एखादा ईंग्रजी शब्द मध्येच मोठयाने बोलण्याची बबनला हुक्की यायची. वेगवेगळया आणि असंख्य ग्रुपबरोबर जाऊन-जाऊन त्यांच्या बोलण्यातले ईंग्रजी शब्द बबनने आत्मसात केलेले होते.Hello, Thank u, Attention, Look, Move fast, Hold now, Stop, Go, Wait वगैरे वगैरे..म्हणतो कसा,
"आपल्याला स्पेशल वॉकी-टॉकी असते भाई, मंग.."
खरं आहे.. अशा माणसाला असायलाच पाहीजे वॉकी-टॉकी. चांदण्याच्या प्रकाशात हळु-हळु आम्ही लिंगाणा माची कडे सरकत होतो. चढण जशी-जशी वाढत होती तसे तसे हृदयाचे ठोके वाढत होते. पाठीवर वजन असुनदेखील आम्ही झपाझप चालत होतो. घशाला पाण्याची ओढ लागलेली होती. जवळ-जवळ आर्मीसारखे संचलन करत आम्ही माचीवर पोहोचलो. माचीवर पोहोचल्या पोहोचल्या मी सॅकसहीत आडवा झालो. वरती एकादशीचा चंद्र स्मितहास्य करत होता परंतु कवी-कल्पना राबवण्याची आणि सुचण्याची ती वेळ नव्हतीच मुळी. माचीवर एक घर होतं. बबनच्या सांगण्यावरुन आम्ही तिथे विश्रांती घेतली आणि घशाची कोरड ओली केली. तिथेही आमच्यासाठी पाण्याचा हांडा भरुन दिला गेला..खरंच सदगदीत झालो या माणसांच्या माणुसकीवर...
माची पर्यंतचा एक टप्पा आम्ही पार केला होता. अजुन तीन टप्पे शिल्लक होते. दुसरा टप्पा माचीपासुन मुक्कामाच्या गुहेपर्यंत, तिसरा टप्पा मुक्कामाच्या गुहेपासुन क्लाईंबींग बेसपर्यंत, चौथा टप्पा क्लाईंबींग बेसपासुन शिखरापर्यंत. त्या रात्री फक्त दोन टप्पे करावयाचे होते.
करवंदीच्या जाळया कोयत्याने बाजुला करत बबन पाटील वाट मोकळी करुन देत होता. झाडांमुळे आणि विशेषत: करवंदींच्या जाळयांमुळे चंद्राचा प्रकाश नाहीसा झाला होता.आम्ही पुन्हा टॉर्चकडे वळलो होतो. १७ बॅटरीचे दिवे पायवाटेनं एकामागोमाग चालल्याचं दृश्य गावातुन खरंच सुंदर दिसलं असेल. अधुन-मधुन आम्ही काऊंटींग घेत होतो. सगळे आर्मीतल्या जवानांसारखे चालत होते, फक्त मातीतल्या वाटेकडे बघत चालत राहायचे. पाठीवरील ओझ्याकडे दुर्लक्ष करत चालत राहायचं, पाय काय म्हणत आहेत, किती दम लागला आहे?, पाणी द्या रे मला, कितीही जीव नकोसा होऊ लागला तरीही .. एकेक पाउल पुढे टाकत राहायचं... मग त्या प्रवाहात आपण आपोआप पुढे सरकत राहतो..थांबला तो संपला.. अशा क्लृप्त्यांचा उपयोग करुन आम्ही लिंगाण्याची उभी चढण पाठीवरील ओझ्यासहीत लिलया पार केली होती. लिंगाण्यावर आम्ही चढत होतो... ना .. ना.. लिंगाणा आमच्यावर चढत होता.
१२ वाजुन १५ मिनिटांनी आम्ही वर पोहोचलो. मुक्कामाच्या गुहेजवळ पोहोचलो तेव्हा पुन्हा एकदा आडवा झालो. त्यावेळेस प्रहार सिनेमातल्या त्या दृश्याची आठवण झाली, "कोई ये मक्खी हटा दो यार". अगदी तशीच परीस्थिती आम्ही सगळे अनुभवत होतो. पण समोर दिसणा-या दृश्याने क्षीण हळुहळु कमी होऊ लागला. चांदण्यात भिजणारा रायगड समोर दिसत होता.. तो होळीचा माळ, जगदीश्वराचे मंदिर, टकमक टोक.आम्ही अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत होतो, आणि त्या विलक्षण दृश्याचा आनंद घेण्यात मग्न होतो. तेवढयात जेवण करुन घेण्याची सुचना आली. सगळ्यांनी आपापली न्याहरी बाहेर काढली. किती खात होतो तरीही पोट भरल्यासारखेच वाटत नव्हते. शेवटी हात वर-खाली करायचा कंटाळा आला म्हणुन थांबलो. जेवण झाल्यावर मोबाईल काढला, मॅट वर पडलो ..बिनकामाच्या नोटीफिकेशन्स उगाचच पाहील्या अन फोन Airplane Mode वर सोडुन दिला. रायगडाचे नयनमनोहर दृश्य डोळयांमधे साठवुन घेतले. आणि डोळे मिटले, झोप कधी लागली कळलेपण नाही.
चिकनी चमेली छुपकेसे माझ्या डोळयासमोर आली होती. तिला हजारचे सुट्टे पाहीजे होते, आणि धुंद होऊन ती नाचत होती. संगीताचा आवाज हळु-हळु तीव्रपणे वाढत गेला आणि तो बाब्याच्या मोबाईलचा आहे हे एव्हाना मला कळुन चुकलं होतं. मोबाईलवर गाणे लावुन हळु-हळु प्रत्येकाच्या कानाजवळुन फिरवला होता. गाढ झोपलेल्यांना उठवण्याची बाबाजीची कल्पना. चिकनी चमेलीच्या तालावर मी झोपेतुन ऊठलो होतो. डॊळे उघडल्या उघडल्या मी समोरचा रायगड बघण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा आकाशातला चंद्र नाहीसा झालेला होता त्यामुळे काहीच दिसले नाही. तिथुन आम्ही निघालो , प्रत्येकाने एकेकदा निरीक्षण करुन घेतले. प्लॅस्टीकचा कचरा आम्ही आमच्या बरोबर घेत होतो. सर्व तयारी करुन आम्ही तिस-या टप्पाच्या दिशेने आगेकुच केली. तिस-या टप्प्यात मुक्कामाच्या गुहेपासुन क्लाईंबींग बेस पर्यंत जायचे होते.
निघताना सर्वांनी स्लिंग बांधुन घेतल्या, आता कुठे क्लाईंबींगची नशा सुरु झाली होती. चालण्याची वाट म्हणजे उभ्या कडयावर दोन पायांवर कसे-बसे उभे राहता येत असेल अशी जागा. एका ठिकाणी तशी जागाही नव्हती..मग.. रोपमध्ये क्रॅब लटकवुन आम्ही पलीकडे गेलो. पुढे-पुढे हा रस्ता एवढा भयंकर वाटत होता की मी अक्षरश: सरपटत आणि रांगत पुढे गेलो. कडा सुंदर वाटत होता की जीवघेणा काही विचारु नका.. दोन फुटाची वाट ती पण तिरकी.. त्यावर माती आणि बारीक खडे..शुज घसरण्यासाठी अगदी पोषक वातावरण होते.. एक चुक आणि "आमुचा राम राम घ्यावा" बस्स्स !. तेवढयात आम्हाला सुर्याचे पहीले किरण दिसु लागले. सुर्योदय झाला...सुर्योदयाला आम्ही क्लाईंबींग बेसवर हजर होतो. बघतो तर काय आमच्या अगोदर एका पलटणने क्लाईंबींग चालु केलेले होते. पुण्यातलेच होते ते पण.
क्लाईंबींग बेसवर येईपर्यंत बरेचसे मावळे थकलेले आणि थरकपलेले होते. क्लाईंबींग बेसपासुन दिसणारा तो भयावह कडा कुणाचाही आत्मविश्वास डचमळवु शकेल. काटकोनी कातळ कडा.. मृत्युचे दुसरे रुप जणु. प्रत्येक जण एकमेकांचा अंदाज घेत होता, तु जाणार का वर?? तु जाणार??न जाणा-यांची मेजॉरीटी झाली म्हणजे त्यात आपसुक सामील व्हायचं. मला पण विचारलं गेलं,
"विजु, तु जाणार का किल्ल्यावर??"
"तेवढयासाठी तर आलोय भाऊ.. मी जाणार म्हणजे जाणार..आणि परत अशी संधी येईल न येईल..क्या पता कल हो ना हो?"
किल्ला चढायचा तर आहे, थोडीच लढवायचा आहे. हर हर महादेव ! मी ब-यापैकी पेटवापेटवी केली होती. तसे १४ जण हार्नेस बांधुन तयार झाले. मला वाटतं एकावेळी एवढे लोक एकाच मोहीमेतुन लिंगाण्यावर जाण्याची ही पहीलीच वेळ असावी. क्लाईंबींगचे बेसिक नियम वापरले तर फिट असणारी कोणतीही व्यक्ती लिंगाण्यावर चढु शकते असा माझा कयास आहे. चढाईच्या मध्यभागी सलग अवघड चढाईवाले ४-५ पट्टे आले. एकदम कातळ होते.. चार पार केले.. पाचव्याला असे वाटले की .. नको ही जिंदगी बेन्चोद.. मनगट आणि खांदा दोन्ही भरुन आले होते.. हातांच्या बोटांना तीव्र वेदना होत होत्या.. मी थकलो होतो..
"मी आता कुठेही जाणार नाही.. मी ईथेच बसणार.. मला आता नाही सहन होत आहे.. मी चढु शकणार नाही..तुम्ही जाऊन या.. मी ईथेच तुमची वाट बघतो. माफ करा मित्रांनो ! मी नाही येऊ शकणार किल्ल्यावर.."
त्या ठिकाणी कुणीही कुणाला वर नेऊ शकत नाही.. प्रत्येकाने आपापल्या हिंमतीवर चढायचे असते.. कारण प्रत्येक जण स्वत:च्या ऒझ्यानेच गांजलेला असतो..मित्रांची ईच्छा असुनदेखील ते मला वर नेऊ शकत नव्हते. मी तात्पुरती शरणागती पत्करली होती.. सगळे पुढे निघुन गेले होते.
थोडया वेळाने सावंत माझ्या पाठीमागुन आले. सावंतांनी मला जरा धैर्य दिलं .. थोडा वेळ विश्रांती मिळाल्यामुळे मी ताजातवाना झालो होतो. महाराजांना स्मरुन बेंबीच्या देठापासुन जोर लावला "हर हर महादेव... " आणि गेलो एकदाचा वर...पुढे एवढी अवघड चढण नव्हती.. शिखरापर्यंत सगळे माझी वाट पहात होते. लिंगाणा सर झाला.. सुर्योदयाला चालु केलेल्या चढाईला ११ वाजुन ४० मिनिटांनी यश आले...
"जीतम... जीतम... जीतम..."
आकांक्षापुढे गगन ठेंगणे म्हणतात ते हेच. आनंद गगणात मावत नव्हता. समोर रायगड दिसत होता. पाठीमागे वळलो तसे तोरणा आणि राजगड दिसले. एकदा तरी जाऊन यावे अशा किल्ल्यावर... आयुष्यात. जीवनातील अविस्मरणीय क्षणांपैकी हा एक क्षण. भरपुर फोटो काढले..खुप आनंद घेतला त्या क्षणाचा आणि परतीचा प्रवास सुरु केला. परतीच्या प्रवासात एका ठिकाणी संजयची मदत घ्यावी लागली. बाकी सगळं आलबेल. उतरताना पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गाने लिंगाणा माचीवर आलो. कुणालाही कसलीही दुखापत झाली नाही हेच या मोहीमेचं वैशिष्टय. परतीच्या प्रवासात वरंध्यात पुन्हा एकदा भजी, वडा पाव आणि मिसळ...

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...