Friday, 5 April 2013

धबधबा... पावसाळ्यातला आणि मनातला !



वर्गमित्रांबरोबर ब-याचदा फ़ोनवर बोलणे व्हायचे.. आपण कधी भेटत नाही, कधी कुठे ट्रिपला एकत्र जात नाही याची कायम खंत ऎकायला मिळायची. कुठेतरी भेटु या रे !! तु बोलव ना सगळ्यांना, आपण भेटु यार!. खुप दिवस झाले. मला त्याचा नंबर देऊन ठेव, मी पण बोलतो त्याच्याशी. नक्की जाउ कुठेतरी. प्रत्येकाचा फ़िक्स हाच डायलॉग. बोलता बोलता उन्हाळा सरुन गेला. पावसाळा आला, पण पाऊस... तोही आमच्या ट्रिपसारखाच.. तो कुठे आला?
दैनंदिन जीवनचक्रातुन थोडासा विरंगुळा तर हवा होताच. खुप दिवस मित्रांचा झालेला विरह.. काय करायचं? काय करायचं? काहीच कळत नव्हतं. असं करता करता मीच शिवाजी व्हायचं ठरवलं. हर हर महादेव !

"मोहीम वरंधा"... ठरलं तर. मी जुन्या सवंगडयांबरोबर सहलीची स्वप्नं पाहत होतो. खुप दिवस होऊन गेले एकत्र ट्रिपला गेलेलो. तसं अधुन मधुन पार्टया वगैरे करायचो पण त्याला ट्रिपची मजा थोडी ना येते. सर्वात अगोदर बेत कोणाला सांगायचा? कमीत कमी "येतो", "बघु या" असं तरी म्हणणारा असावा. पक्याला फ़ोन लावला "YES DONE!! तु म्हणशील तिकडं जाऊ, पुढच्या रविवारी फ़िक्स. ओके.." मोहीमेला सुरुवात चांगली झाली,एक चांगला मावळा मिळाला. सुभ्या पण ओघानेच मोहीमेत मिसळला. पक्याने आणि मी म्हटल्यावर त्याने सुद्धा मम म्हटले. सच्या ने सुद्धा म्हटले पण म्हणता म्हणता त्याने ट्रिपमधील सात (७) दिवसांचे अंतर कमी केले, म्हणाला, " भाई लोग, तुमको ऎसा नहीं लगता कि अगला रविवार बहुत लंबा है, ईसी रविवार चलते है ना यार!!.. अब कंट्रोल नहीं होता." पाचवा मेबर तात्या.. येतो म्हणाला आणि त्याला आम्हीही नेतो म्हणालो सशर्त अटींवर terms & conditions apply.

शनिवारी रात्री सगळ्यांचे फ़ोन झाले. वेळेवर या बरं का सगळ्यांनी एकमेकांना बजावले. मी ट्रिपला लागणारी रसद आणुन ठेवली. सहलीचा रविवार उजाडला. नऊ वाजता स्वारगेटला जमायचे होते. मी बरोबर नऊला स्टार्टर चढवला आणि नऊ वीसला स्वारगेट. साडॆनऊ प्रस्थानाची वेळ ठरली होती. सगळे राजा-महाराजा सारखे दहा वाजता उगवले.


फ़ोटोमधे दिसत असल्याप्रमाणे सव्वा-दहाला एकदाचे प्रस्थान झाले. माझ्या गाडीला सारथ्यांची कमी नव्हती त्यामुळे मी पद्धतशीरपणे मागची सीट पकडली. गाडीचं ढेरकुलं भरुन आम्ही जुन्या कात्रज घाटाने घॊंगावत शिवापुरच्या बागेत पहीला मुक्काम घेतला. गाडी थांबल्या थांबल्या आमच्याभोवती भिका-यांचा गराडा पडला. भारत देश ज्यासाठी परदेशी लोकांमधे प्रसिद्ध आहे ते भिकारी लोक. प्रत्येकाने भावनिक होऊन खिशातली चिल्लर मोकळी केली. भिकारी पण पक्के व्यवसायिक होते बरं.. पैसे देताहेत म्हणलं की त्यांची रिग वाढायला लागली. तोल नाक्याला पैसे दयायला का-कु करणारे आपण या भिका-यांना किती सहजपणे पैसे देतो. मी सहजपणे बोलुन गेलो, मग काय, त्यांना कोणीही दमडा पण दिला नाही. पण खात्रीलायक सांगतो ते भिकारी बांग्लादेशी वाटत होते.

कैलास भेळचे पाच भेळीचे पुडे घेतले(चकण्याला). डब्यामधे लपथपीत चिकन घेतलेले होते. जिरा फ़्राईड आणि चपात्या (रोटया मिळाल्या नाहीत म्हणुन) गणिती हिशोब करुन घेतल्या. आपापल्या पसंतीचे ईतर महत्वाचे साहीत्य सुद्धा घेतले. पावसाची रीपरीप सुरु व्हायला लागली होती. एकंदरीत पावसात भिजायला मिळणार म्हणुन सुखावलो आणि मार्गस्थ झालो.

कैलास भेळ चे पाणीपुरी दृश्य

खेड-शिवापुरच्या तोलनाक्याला ईमानाइतबारे १०५ रुपये देऊन रिटर्न पास घेतला. काही काळापुर्वी अप्पर-डिप्पर दाखवला की MH-12 पासिंगची गाडी सोडायचे पण त्या तोलनाक्यावर आमदाराला झोडपलेलं ऎकुन आम्ही पंगा घ्यायचा विचार सोडुन दिला. कशाला उगाच चांगल्या ट्रिपचा विचका? वाढत्या वयानुसार आलेलं शहाणपण ! कापरहोळच्या पुढे उजवा हाताला वळलो. आणि ग्रुप फ़ोटो घेण्यासाठी गाडी थांबवली. प्रत्येकानं आळीपाळीनं एक-एक फ़ोटो काढला पण पाचही जण एकावेळेस फ़ोटोमधे आले पाहीजेत असा प्रत्येकाचाच मनसुबा. आता कोण काढणार पाच जणांचा फ़ोटो? तेवढयात दोन सायकलस्वार विध्यार्थी आले साधारण सातवी-आठवीतले असावेत. त्यांच्या सायकलचा हॅंडल धरुन त्यांच्या सायकली थांबवण्यात आल्या. सुभ्या मार्केटिंगमधला, त्याच्या लकबीसमोर त्या विध्यार्थांचा काय निभाव लागणार? त्यांनी बरहुकुम आमच्या ग्रुपचे फ़ोटो काढुन दिले. आम्ही लगेच कॅमेरा घेऊन फ़ोटो कसे आलेत बघायच्या लगबगीत ते दोघे विध्यार्थी सायकलवर टांग मारुन पसार झाले. अरेरे ! आपण खरं तर यांना काहीतरी दयायला पाहीजे होतं किमान त्यांचा फ़ोटो तरी घ्यायला पाहीजे होता यार.
ग्रुप फ़ोटो

भोरमार्गे वरंध्याच्या रस्ता धरला. घाट सुरु व्हायच्या आधी खिंडीसारख्या ठिकाणी छॊटया झाडाखाली सगळी रसद बाहेर काढली आणि खरपुस आनंद घ्यायला सुरुवात केली. पण तेवढयात पावसाने हजेरी लावली. क्षणात त्याचा जोर वाढला आणि आमची त्रेधातिरपीट उडाली. आम्ही तसेच झाडाखाली सरकलो, छत्रीचा आधार घेऊन हातात चपाती आणि द्रोण मधे भाजी घेऊन जेवण्याचा आनंद काही वेगळाच हं. केवळ अवर्णनीयच... पॊटात भर पडली आणि पाऊसाने सुद्धा विश्रांती घेतली. तिथेच लगोलग तयार झालेल्या छॊटयाशा पाण्याच्या प्रवाहाकडे आमचे लक्ष गेले. अरे आपण आलो तेव्हा ईथे काहीच नव्हते, ह्या आता पडलेल्या पावसानेच हा तयार झाला. तसं पाहीलं तर ते गढुळ पाणी होते एरवी आम्ही कुणीही त्याच्याकडे ढुंकुनही पाहीले नसते.




















No comments:

Post a Comment

आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-२

आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-२  पूढे चालू टायमिंग चिप असलेला बिब सायकलच्या सीटखाली आणि साधा बिब जर्सीवर लावला. हेल्मेटला पुढ...