"प्रबळगड आणि कलावंतीन"
28 सप्टें ला एकदाचा कलावंतीनदुर्ग करण्याचा योग आला. याच दिवशी लाईफ सायकलची पांचगणी १०० कि. मी. ची सायकल शर्यतसुद्धा होती, पुणे व्हेंचर्सचा हरिश्चंद्रगड ट्रेकही याच दिवशी होता. कुठे जावं काही कळत नव्हतं. १०० कि. मी. ची सायकल शर्यत मला जिंकणे शक्य नव्हते त्यामुळे नुसते श्रम एव ही केवलम करण्यात काहीच अर्थ नव्हता. हरिश्चंद्रगडला आदल्या दिवशी मुक्कामी जावयाचे होते त्यापेक्षा FONA चा प्रबळगड ट्रेक सकाळी निघुन संध्याकाळी परत येण्याचा, मस्त वाटला. लगेच मनोज राणेंच्या अकाऊंटवर ५०० रूपये हस्तांतरित केले आणि विंडो सीट बुक करून ठेवली. :D
बसप्रवास निगडीपासुन सुरू होणार होता. धायरी ते निगडी कसे पोचावे? या विचारात असतानाच राणेंच्या एका ई-मेल ने एक भन्नाट कल्पना सुचवली होती. शिवाजीनगर ते तळेगांव स्टेशन लोकलने यायचे आणि तळेगांव स्टेशनला बस पकडायची. व्वा भारी एकदम, याला म्हणतात thinking out of box. मग यात माझं सायकलप्रेम ऊतु गेलं नाही तर नवलच. शिवाजीनगर पर्यंत मी सायकल घेऊन गेलो, स्टँडला सायकल लावली. स्टेशनच्या बाहेर एक चहा मारला आणि 06:35 च्या लोकलमध्ये बसलो. लोकल प्रवास माझ्यासाठी खुप दुर्मिळ त्यामुळे जेव्हा कधी बसतो तेव्हा एन्जॉय केल्या शिवाय सोडत नाही. ४५ मिनीटांचा प्रवास, १० मिनीटे सगळे अंदाज घेण्यात गेले. मग शेजारी बसलेल्या मित्राबरोबर गप्पा मारायला सुरूवात केली. लोकलविषयी, ट्रेकविषयी, घोरावडी टेकडी, लांबुन दिसणारी भव्य गणपतीची मुर्ती वगैरे वगैरे.
अपेक्षेपेक्षा मी खुप लवकर तळेगांव स्टेशनला पोहोचलो. बस तिथे येण्याअगोदर मी तिथे हजर होतो. कोणाचाही वेळ वाया घालवला नाही. बसमध्ये संतोष होलींशी भेट झाली (पुणे ते कन्याकुमारी सायकलवर करणारा). सायकलवर खुप चर्चा झाल्या एकमेकांचे अनुभव, सायकलचे वेड, पुढील महत्वाकांक्षा इ.
यात वेळ कसा गेला कळलेच नाही. जेमतेम मिनी बस मावेल एवढाच रस्ता होता. दुतर्फा रानझाडे, रानगवत एवढे माजलेले होते की त्याच्या गंधाने बस व्यापुन गेली. आजुबाजुचे वातावरण सांगत होते आम्ही ठाकुरवाडीत पोहोचलो.
फक्त प्रबळगड ठरलेला होता, पण मी दोन्ही करायचे ठरवले होते. एवढ्या जवळ येऊन कलावंतीन करायचा नाही म्हणल्यावर काय उपयोग? ट्रेकला सुरूवात झाल्यावर मी झपझप पावले टाकत निघालो. सगळ्यांना मागे टाकत ४० व्या मिनीटाला माचीवर पोहोचलो. तोपर्यंत घामाने चिंब भिजलो होतो. हवा (वारा) औषधालासुद्धा नव्हती. नुसता उकाडा. माचीवर पाण्याची बाटली भरून घेतली आणि पुढे निघालो. प्रबळगडाकडे जाणारा रस्ता माहीत नाही, गावात चौकशी करत फिरत होतो. कलावंतीनचा मार्ग दिसत होता पण मला लगेच तिकडे जायचे नव्हते. एक कातकरी भेटला, त्या येड्याने मला चुकीच्या रस्त्याने पाठवले. गावातुन पुढे गेल्यावर दोन वाटा दिसल्या एक उजवीकडे दुसरी डावीकडे जात होती त्या पठ्ठ्याने मला डावीकडे जायला सांगितले. म्हवाची पिलेला होता बहुतेक. एकतर रस्ता शोधण्यासाठी गावात ईकडे तिकडे खुप फिरलो होतो, यात अर्धा तास गेला होता. आणि त्यात याने चुकीच्या रस्त्याने पाठवले. त्या वाटेने गेल्यावर मी नेमका दारूच्या भट्टीवर जाऊन पोहोचलो. आजुबाजुला दाट झाडी आणि समोर दारूची भट्टी दिसत होती. कुठे जाऊ काहीच कळत नव्हते. असं वाटलं त्या ड्रममधील नाईंटी मारावी आणि तिथेच रविवार साजरा करावा, होऊ दे खर्च.
म्हवाच्या दारुची भट्टी |
पुन्हा पाठीमागे तेवढे अंतर चालत जाण्याची बिल्कुल ईच्छा नव्हती. ग्रुपमधील कोणी तरी जवळपास आलेले असावे अशा अंदाजाने मोठ्याने "फोना फोना" आवाज देऊ लागलो. ग्रूपचा काहीच प्रतिसाद आला नाही. त्या झाडीतुन वाट शोधण्याचे ठरवले. "तिथुन खाली ये" दाट झाडीने वेढलेल्या शेतातुन आवाज आला. उजवीकडे खाली जाणारी एक पुसटशी पायवाट खरंच तिथे होती. त्या वाटेने मी उंबराच्या झाडाजवळ पोहोचलो. माझ्या कातकरी मित्राला हस्तांदोलन करून खुप धन्यवाद दिले. आणि रस्ता चुकलो तर आवाज द्या खालुन म्हणालो. वाट कशी आहे याबद्दल त्याने सविस्तर माहीती दिली. मग त्या वाटेने दाट झाडीतुन मी एकटाच निघालो. एका छानशा सावलीत बसुन चपाती आणि बटाटा मटकावला. जेवढा घाम शरीरातुन जात होता ते पाहुन असे वाटत होते की संध्याकाळपर्यंत शरीर शुष्क लाकडासारखे होऊन जाईल की काय? राहुन राहुन वाटायला लागले की गॅटोरेड ड्रिंक बरोबर आणायलाच पाहीजे होते. घामावाटे शरीराबाहेर जाणारे घटक त्यामुळे भरून निघाले असते. एका ठिकाणी उजवीकडे वळायचे सोडुन मी सरळ वर चाललो होतो, खालुन लगेच गाईडचा आवाज आला खाली ये, उजवीकडे जा.
माझी लाल रंगाची पँट हिरव्या हिरव्या गवतामधुन उठुन दिसत होती. त्यामुळे माचीवरील गाईडला माझ्यावर लक्ष ठेवणे सोपे गेले. एका झाडाच्या खोडावर मोठा आडवा बाण कोरलेला आहे तिथुन उजवीकडे वळताना छातीएवढे गवत होते क्षणभर विचार करत उभा राहीलो, पण मनात आलेले सगळे विचार खोडुन काढले आणि घुसलो एकटाच. किल्ल्याचा माथा जवळ येऊ लागला तशी वाट स्पष्ट दिसु लागली. एक वळण घेतल्यानंतर गाईडला मी दिसेनासा झालो. गाईडचा आणि माझा संपर्क तुटला. आमच्या ग्रूपमधील कोणीही लांबलांब पर्यंत कुठेही दिसत नव्हते. कॅमेरासाठी ट्रायपॉड घेऊन आलो होतो. जिथे जिथे मनात येईल तिथे १० सेकंदाचा टायमर लावुन स्वतःचे फोटो काढत होतो. ट्रायपॉड नसता तर माझा एकही फोटो आला नसता कारण माझे फोटो काढणार कोण? आजुबाजुला कोणीच नव्हते.
दाट गवतातुन जाणारी वाट. |
संपुर्ण ऊभी चढण, वर चढण्याची वाट म्हणजे पावसाळ्यात कड्यावरून खाली वाहणा-या पाण्याच्या मार्गातील दगडधोंड्यातुन कसाबसा पाय ठेवता येण्यासारखी जागा शोधायची आणि पुढे पुढे जात रहायचे. वाटेत Woodland, Reebok वगैरे ब्रँडच्या बुटांचे खराब होऊन निसटुन पडलेले सोल पहायला मिळाले. माझा आपला एक्शन कॅनव्हास. माझ्यासारखाच दमदार. सांगायचा मुद्दा हा की सह्याद्रीवर त्या ब्रँडची लायकी निघते. तिथे टिकतो फक्त कॅनव्हास.
सह्याद्रीचा शुर शिपाई कॅनव्हास. |
ऊन्हाचा जोर चांगलाच वाढला होता. एक कणसुद्धा हवा येत नव्हती. अंगातुन नुसत्या घामाच्या धारा वाहत होत्या. चेहरासुद्धा घामाने डबडबलेला होता. माथ्याजवळ चढताना गर्द झाडी असल्यामुळे ऊन जाणवले नाही. माथ्यावर पोहोचलो आणि थेट डावीकडे वळलो. बघतो तर काय समोरच्या सावलीत ७-८ तरूण आडवे होऊन पडले होते. एकजण शुद्धीत दिसला त्याला विचारले, काय गडबड? हे सगळे असे का पडलेत? सगळे व्यवस्थित आहे ना? तो म्हणाला हे सगळे खुप दमलेत म्हणुन विश्रांती घेत आहेत, खुप जीव निघलाय गड चढताना. मग ठिक आहे अजुन अर्ध्या तासाने यांच्या जीवात जीव येईल मी निघतो. मग पठारावरून तसाच निघालो कलावंतीनच्या बाजुला. पठारावरचे जंगल मस्त आहे. घनदाट, शांतता असेल तर पक्ष्यांचे छान छान आवाज ऐकायला येतात. मी एकटाच असल्यामुळे शांतपणे आवाज न करता चालत होतो. पहील्यांदाच या गडावर आलोय, तोही एकटा लिड करत. पश्चिमेकडे जाणारी वाट कलावंतीन दिसतो तिथे घेऊन जाईल या अंदाजावर मी चालत होतो.
पठारावर आलो तरी हवेचा काहीच मागमुस नव्हता. उकडलेल्या बटाट्यासारखा झालो होतो. प्रबळगडाच्या पश्चिमेला पोहोचलो. हिरवाईने नटलेले छोटंसं मोकळं मैदान आणि त्याला पिवळ्या फुलांची किनार कड्याच्या बाजुने. नयनमनोहर दृश्य. सगळा थकवा कुठल्या कुठे पळुन गेला. कड्याच्या जवळ जवळ जाऊ लागलो तसे कलावंतीनचे मनमोहक दर्शन होऊ लागले. संपुर्ण हिरव्या रंगात भिजलेला कलावंतीनदुर्ग पिवळ्या उन्हात खुप छान दिसत होता. कातळ काळ्या कड्यावर कोरलेल्या पाय-या त्या वातावरणात खुप उठुन दिसत होत्या. त्या उठावदार पाय-यांवरून नजर हटत नव्हती. थरारक पाय-यांचे सौंदर्य ईथे मनाला भुरळ पाडत होते. याअगोदर केवळ फोटोत पाहीलेला कलावंतीनदुर्ग प्रत्यक्षात माझ्या समोर होता. कित्येक दिवस उराशी बाळगलेलं स्वप्न पुर्ण झालेले होते. तेथील सौंदर्य डोळ्यात साठवल्यानंतर कॅमेरा काढला. मनसोक्त फोटो काढले. हव्या त्या पोज, हव्या तेवढ्या वेळा. मी, कॅमेरा आणि माझा ट्रायपॉड (जब हम तीन यार मिलते है तो फोटों की धुम मचती है). मला ईथुन निघुन कलावंतीनकडे जायचे होते. त्यामुळे जास्त वेळ वाया घालवणे परवडणार नव्हते.
प्रबळगडावरून लगेच परतीचा प्रवास सुरू केला. परतीच्या प्रवासात FONA चे सहकारी भेटले. गडाच्या शेवटच्या टप्प्यात आलेले होते. जिद्दी ट्रेकर्स. प्रतिकुल हवामान असुनसुद्धा गड चढण्याचा उत्साह जरासुद्धा कमी झालेला नव्हता. मंदार म्हणतो,
"येताना वाट कशी काय सापडली?"
"माचीवरून गाईड (कातकरी) मार्गदर्शन करत होता मला, एक-दोनदा वाट चुकलो पण त्याच्यामुळेच मला पुन्हा वाट सापडली."
माझा कलावंतीनचा बेत त्यांना सांगितला, साडेपाच पर्यंत मी बसजवळ येतो (हे सांगताना २ वाजुन १५ मिनीटे झालेले होते). मग त्यांचा निरोप घेऊन मी गडावरून उतरू लागलो. आता ऊन्हाचा जोर चांगलाच वाढलेला होता. गडावर चढायच्या अगोदरच माचीवरून पाण्याच्या बाटल्या भरून घेतलेल्या होत्या. जिथे संधी मिळेल तिथे पहीले पाणी भरून घ्यावे, ट्रेकिंग व सायकलिंगमध्ये दुसरा चान्स मिळत नाही. असेल पुढे पाणी, भरू नंतर असे म्हणुन चालत नाही. शक्यतो ज्या ठिकाणी आपण पहील्यांदा चाललेलो असतो त्या ठिकाणी असा हलगर्जीपणा करू नये. दाट जंगल असल्यामुळे थोडी थोडी सावली पायवाटेवर पडत होती. एका दाट सावलीत बसुन बटाटा-चपातीचा आस्वाद घेतला. थोडी विश्रांती घेऊन मार्गस्थ झालो.
"माचीवरून गाईड (कातकरी) मार्गदर्शन करत होता मला, एक-दोनदा वाट चुकलो पण त्याच्यामुळेच मला पुन्हा वाट सापडली."
माझा कलावंतीनचा बेत त्यांना सांगितला, साडेपाच पर्यंत मी बसजवळ येतो (हे सांगताना २ वाजुन १५ मिनीटे झालेले होते). मग त्यांचा निरोप घेऊन मी गडावरून उतरू लागलो. आता ऊन्हाचा जोर चांगलाच वाढलेला होता. गडावर चढायच्या अगोदरच माचीवरून पाण्याच्या बाटल्या भरून घेतलेल्या होत्या. जिथे संधी मिळेल तिथे पहीले पाणी भरून घ्यावे, ट्रेकिंग व सायकलिंगमध्ये दुसरा चान्स मिळत नाही. असेल पुढे पाणी, भरू नंतर असे म्हणुन चालत नाही. शक्यतो ज्या ठिकाणी आपण पहील्यांदा चाललेलो असतो त्या ठिकाणी असा हलगर्जीपणा करू नये. दाट जंगल असल्यामुळे थोडी थोडी सावली पायवाटेवर पडत होती. एका दाट सावलीत बसुन बटाटा-चपातीचा आस्वाद घेतला. थोडी विश्रांती घेऊन मार्गस्थ झालो.
उंबराच्या झाडाजवळ येताच माझ्या गाईडला आवाज देऊन बोलावुन घेतले. आभार म्हणून काही पैसे देऊ केले. थोडा संकोचला पण गरीबीमुळे मी देऊ केलेले पैसे त्याने स्विकारले. ईथेच थांबा म्हणाला, तसाच शेतात गेला आणि दोन काकड्या घेऊन आला. पैशाचा हिशोब लगेच चुकता केला त्याने. अशा घाम निघणा-या वातावरणात या दोन काकड्यांचा कलावंतीन चढताना खुप उपयोग झाला.
माझा गाईड |
जास्त वेळ न दवडता मी लगेच तिथुन निघालो. कलावंतीनकडे जाणारी वाट सहज सापडणारी होती. असे असले तरीही घामाबरोबर शरीरामधील बरीचशी ऊर्जा वाहुन गेलेली होती. जे काही त्राण शिल्लक होते त्याचा वापर करून कलावंतीनदुर्ग गाठायचा होता. त्या खडकावर कोरलेल्या पाय-या ऊन्हामुळे प्रचंड तापलेल्या होत्या. पाय-यांना हात लावला तरी ती उष्णता जाणवत होती. कलावंतीन सर करायचाच या माझ्या दृढनिश्चयाला कोणतीच प्रतिकुल परीस्थिती आडवी येऊ शकत नव्हती. त्या कोरीव पाय-या खरंच छान आहेत. उभ्या कड्यात एवढे कोरीव काम करणारे कारागीर फक्त महाराष्ट्रातच असु शकतात. त्या पाय-यांचे फोटो प्रत्येक वळणावर आणि शक्य होईल त्या कोनातुन काढले. आणि तो फ्रि क्लाईंब करावयाचा रॉक पॅच आला. तोपर्यंत FONA चे सहकारी प्रबळगडाच्या कलावंतीन टोकावर येऊन चिअरींग करायला लागले होते. ग्रूप असेल तर तो पार करणे सहज शक्य आहे. मी एकटाच होतो, क्लाईंबींगचा थोडाफार अनुभव आणि FONA सहका-यांचे प्रोत्साहन यामुळे मी तिथुन पुढे जाण्यात यशस्वी झालो. तो शेवटचा रॉक पॅच अंगातील एनर्जी कमी झालेली असल्यामुळे थोडासा भाव खाऊन गेला. वर गेल्या गेल्या दोन्ही हातात भगवा घेऊन उंच फडकावला.
पाय-यांचे कोरीव काम |
उभ्या पाय-या |
शेवटचा रॉक पॅच, अनुभव नसणा-या व्यक्तीने एकटे चढु नये. |
गडावर पोहचल्यावर सगळा क्षीण कुठल्या कुठे पळुन जातो. कातक-याने दिलेल्या त्या दोन काकड्या कलावंतीन चढताना खुप उपयोगी ठरल्या होत्या. गडावरून दिसणारे आजुबाजुचे सौंदर्य डोळ्यात साठवु लागलो. कलावंतीनवरून प्रबळगडाचा कडा खुप भव्य आणि सुंदर दिसत होता. जे ठरवले ते मी केले याचे खुप खुप समाधान मिळाले. भरपुर फोटो काढुन घेतले. मनात भरपुर आठवणींचा साठा घेऊन कलावंतीनचा निरोप घेतला.
कलावंतीन शिखरावर |
कलावंतीनवरुन प्रबळगडाचे मनमोहक दृश्य |
पाय-या उतरून झाल्यावर मित्राने दिलेल्या माहीतीनुसार डावीकडे थोडा खाली गेलो. तिथे कड्यावरून झिरपणारे पाणी जमिनीवर थेंबाथेंबाने आणि मधोमध एक जाड धार करून जमिनीवर पडत होते. त्या मोठ्या धारेखाली दोन्ही बाटल्या भरून घेतल्या. आणि पहीले एक बाटली पाणी गटगट घशाखाली उतरवले. पाण्याची ओढ लागलेली असताना थंड पाणी घशाखाली उतरवण्याची तृप्तता काही औरच. त्यानंतर सॅक, मोबाईल आणि कॅमेरा बाजुला ठेवुन दिला आणि त्या खडकांतुन ओसंडणा-या धारांखाली उभा राहीलो. त्या स्वच्छ पाण्यात घामाचा चिकटपणा आणि खारटपणा सर्व धुऊन गेला. पाण्याचा स्पर्श मनुष्याला नुसते पवित्रच नाही तर ताजेतवाने सुद्धा करतो. शरीराची मरगळ आणि थकवा दुर झाल्या सारखे वाटायला लागले. या शॉवरनंतर एक फक्कड चहा मिळाला असता तर कामच तमाम झाले असते. पण तिथे तशी व्यवस्था होणे निव्वळ अशक्य होते. पण खरं सांगतो त्या खडकाच्या आडोशाला उतारावरून जंगलात जाणा-या वाटेवर एकट्याची तंतरली होती. शक्य तितक्या लवकर तिथुन निघालो.
सुर्यप्रकाश आता मंदावत चालला होता. पाण्यात भिजल्यामुळे उकाडाही जाणवत नव्हता. मी झपझप पावले उचलत प्रबळमाचीवर आलो. माझे सहकारी मला कुठेच दिसत नव्हते. ते पुढे उतरून गेले की अजुन मागे राहीलेत तेच कळायला मार्ग नव्हता. फोन करून विचारणे शक्य नव्हते कारण फोनला रेंज नव्हती. मी एकट्याने माझा प्रवास चालु ठेवला. बसजवळ ५:४५ ला पोहोचलो.
ड्रायव्हर वैतागलेला होता. कधी येणार हे लोक? अंधार पडायला लागलाय वगैरे वगैरे ड्रायव्हर लोकांची नेहमीची किरकिर. दिवसभरात फक्त २ काकड्या आणि २ चपात्या खाल्लेल्या होत्या. डब्यात ३ चपात्या आणि बटाटा तसाच शिल्लक होता. जवळपास कोणतेही दुकान किंवा हॉटेल नसल्यामुळे त्याला काहीच खायला मिळालेले नसणार हे तर नक्कीच होते. भुक लागल्यावरही माणसे चिडचिड करतात. मी डबा काढला आणि त्यालाही माझ्या बरोबर जेवायला घेतले. आम्ही दोघांनी मिळुन चपात्या आणि बटाटा फस्त केला. मग म्हणाला आता येऊ द्या कधीबी त्यास्नी. गप्पांच्या ओघात म्हणतो कसा, "कोणी तरी सायकलवर आलाय म्हणे?" असेल येडं कुणीतरी मी हसत हसत म्हणालो.
बाकीची मंडळी ७:४० पर्यंत सूर्यास्त वगैरे उरकुन बसजवळ पोहोचली. माझ्या प्लॅननुसार मी तळेगाव स्टेशनला उतरून लोकलने शिवाजीनगर गाठणार होतो. पण पाटील म्हणाले मी सोडतो तुला शिवाजीनगरला. त्यांनी बिजलीनगर मध्ये कार पार्क केली होती. त्यांनी अगदी मला शिवाजीनगरच्या सायकल स्टँडपर्यंत नेऊन सोडले. त्यांचे कौतुकाचे शब्द माझा उत्साह नक्कीच वाढवतील यात शंकाच नाही. सायकल जशीच्या तशी पाहुन जीव भांड्यात पडला. फक्त गियरशिफ्टींग हलवुन ठेवलेले होते. पावणेबारा पर्यंत घरी येतो सांगितलेले होते आणि बरोबर पावणेबारालाच घरी पोहोचलो.
No comments:
Post a Comment