मी Randonneur झालो... हे वाचल्या वाचल्या तुम्हाला प्रश्न पडेल की ही Randonneur (रान्दोनिअर) काय भानगड आहे?ती भानगड Brevet Randonneurs Mondiaux (BRM) अशी आहे. आणि ही BRM ची भानगड AUDAX CLUB PARISIEN FRANCE देशाशी संबंधीत आहे. सायकलींग आणि फ्रान्स देश म्हटलं की आपल्या समोर येतं ते Tour de France. आपल्या ईथे जशी कुस्तीची परंपरा तशी तिथली सायकलिंगची. AUDAX INDIA RANDONNEURS (AIR) हा भारतातील क्लब CLUB OF PARISIEN बरोबर संलग्न आहे. भारतात आयोजित होणा-या सर्व BRM ची माहीती फ्रान्सपर्यंत पोचवली जाते. भारतातील प्रमुख शहरांमधील BRM आयोजित करणारे सर्व क्लब AIR मध्ये संलग्न आहेत. आणि या सर्व गोष्टी होण्यास कारणीभुत आहेत दिव्या ताटे. भारतातील BRM दिव्या ताटेंशिवाय होऊच शकत नाही. जे काही मी ऐकतोय आणि वाचतोय त्यानुसार दिव्या ताटे या BRM साठी भारतातील सर्वेसर्वा आहेत. पुण्यामधील सर्व BRM Pune Randonneurs आयोजित करतात. अर्थातच या क्लबची सर्व देखभाल दिव्या ताटे करत आहेत. वेळापत्रक बनवण्यापासुन ते मार्ग ठरवण्यापर्यंत सर्वकाही त्याच करत होत्या, हल्ली त्यांच्या मदतीला ईतर सायकलिस्ट धावुन यायला लागलेत. विशेष सांगायचं म्हणजे भारतातील सर्वात पहीली BRM ही पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. "BRM" जर तुम्ही गुगलवर सर्च केले तर याची सर्व माहीती मिळेल. तरीपण आपण थोडीफार माहीती घेऊ BRM म्हणजे काय??
सर्वात महत्वाचं, BRM म्हणजे सायकल शर्यत नव्हे. BRM म्हणजे लांब पल्ल्याचे, दम बघणारे, न थांबता केलेले सायकलींग. यामध्ये २००, ३००, ४००, ६०० आणि १००० कि.मी. अशी लांब पल्ल्याची अंतरे दिलेली असतात आणि त्यासाठी अनुक्रमे १३.५, २०, २७, ४० आणि ७५ तासांचा वेळ दिलेला असतो. या वेळेतच ते अंतर पार करावे लागते. खाणे, पिणे आणि झोपणे वगैरे सगळे त्यावेळेतच करावे लागते. यासाठी स्वतंत्र वेळ दिला जात नाही. कोणाचीही मदत न घेता सायकल चालवायची असते. मनुष्यशक्तीवर चालणारे कोणतेही वाहन तुम्ही वापरू शकता. BRM मध्ये सहभागी होणा-या सायकलपटुंना Randonneur म्हणतात. प्रत्येक रान्दोनिअर कडे Brevet card दिलेले असते. जिथे जिथे चेकपॉईंट असतील तिथे त्या कार्डवर शिक्का घ्यावा लागतो आणि शेवटी ते कार्ड दिव्या ताटेंपर्यंत पोचवावे लागते. २०० कि.मी. साठी ४५० रूपये प्रवेश फि असते आणि यशस्वीरीतीने BRM पुर्ण केली तर आपण मेडलसाठी पात्र होतो. मेडल हवे असेल तर त्याचे ५०० रूपये वेगळे द्यावे लागतात. प्रत्येक BRM चा मार्ग वेगवेगळा असतो आणि पुण्याचा विचार केला तर एखादा घाट नक्कीच त्यामध्ये गोवलेला असतो. BRM चे वर्षभराचे कॅलेंडर ठरलेले असते आणि शक्यतो शनिवारी आणि रविवारचे आयोजन असते. कॅलेंडर वर्ष संपल्यानंतर मेडल वितरण समारंभ आयोजित करून BRM पुर्ण केलेल्या Randonneurs ना त्यांचे मेडल्स दिले जातात. तर असे आहे हे BRM आणि Randonneurs.
तर हे BRM माझ्यापर्यंत कसे पोहोचले? सायकलींगमध्ये मी हळूहळू पुढे सरकत असतानाच वर्तमानपत्रामध्ये सुनंदन लेलेंचा सायकलवरील एक लेख वाचण्यात आला. त्यात Randonneurs च्या मेडल वितरण समारंभाचे वर्णन केलेले होते आणि BRM ची जुजबी माहीती दिलेली होती त्याचबरोबर दिव्या ताटेंचे नाव आवर्जुन सांगितलेले होते. २०० कि.मी. सायकलींगसाठी पदक मिळत असेल तर काय हरकत आहे? त्यावेळी २०० कि. मी. माझ्यासाठी अशक्यप्राय आव्हान होते. तोपर्यंत मी ८० कि.मी. पेक्षा जास्त सायकलींग कधीच केलेले नव्हते. माझे सायकलींगमधले परम मित्र महेश निम्हण यांनी एकदा BRM मध्ये भाग घेतलेला होता. त्यामुळे त्यांच्याकडुन खुप उपयुक्त आणि नेमकी हवी असलेली माहीती मला मिळाली. मी लांब पल्ल्याची पहीली सायकल राईड खारावडे, लाईफ सायकलबरोबर केली. तेव्हा ते दर रविवारी १०० रूपये वर्गणी घेऊन चहा, नाष्टा आणि बॅकअप गाडीसह पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी राईड आयोजीत करत असत. बॅकअप गाडी म्हणजे एखाद्याला सायकल चालवणे झेपले नाही किंवा एखाद्याचे शरीर साथ देत नसेल तर त्याची सायकल आणि तो दोन्हीही गाडीमध्ये टाकुन राईड संपण्याच्या ठिकाणापर्यंत पोचवता येते. खारावडे राईड दुर्गाप्रसाद पवार उर्फ DP लिड करत होता. परम चव्हाण याच राईडमध्ये भेटला. तो टाटा मोटर्सचा FTA आणि मी टाटा मोटर्सचा कामगार यामुळे आमची मैत्री लगेच जमली. खारावडे वरून जाणारा रोड पुढे लव्हासाला जातो. लव्हासा बाणाने दाखवलेली पाटी मला खुणावत होती. तेव्हाच ठरवलं कि मी लव्हासा राईड करणार. आणि मी केलीसुद्धा. ती लव्हासा राईड माझ्या सायकलिंगला कलाटणी देणारी ठरली. हि राईड केवळ महेश निम्हण यांच्यामुळे शक्य झाली. ईथुनच लांब पल्ल्याच्या राईडसाठी मी तयार होत गेलो. त्यानंतर पुन्हा एकदा लव्हासाला जाण्याचा योग आला. योगेश कानडे, मानकर सर आणि मी तिघांनी मिळुन लव्हासा सायकल राईड केली. बहुली मुठा मार्गे जाऊन पानशेतमार्गे माघारी आलो. माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक रोडवर सायकल चालवण्याचा अनुभव लव्हासा ते पानशेत. या रोडवर कुणीही सायकल चालवण्याचा विचारही करू शकत नाही.
यादरम्यान मी रोज २० कि.मी सायकल चालवण्याचा सराव करत होतो. रोजच्या सरावामुळे हृदय आणि फुप्फुसे दमदार होत होती. डोणजेफाटापर्यंत जाऊन आलो कि २० कि.मी. व्हायचे. किंवा नांदेडसिटीमध्ये ४ राऊंड मारले कि २० कि.मी. व्हायचे. आणि प्रत्येक रविवारी सिंहगड किंवा पानशेत ठरलेला असायचा. जुन महीन्यात राज्याभिषेकाला रायगडपर्यंत सायकलवर जाऊन आलो. महेश निम्हणसारखे शिवभक्त आणि सायकलपटु जोडीला मिळाल्यावर विचारायलाच नको. या सायकलिंगपासुन स्ट्राव्हाचे ग्रँड फोंडो करायला सुरूवात केली. रायगडपर्यंत बरोबर १३० कि. मी. अंतर झाले. स्ट्राव्हा ग्रँड फोंडो म्हणजे एका दिवसात जास्तीत जास्त, न थांबता कापलेले अंतर कि जे कमीत कमी १३० कि.मी. असावे लागते. अशा प्रकारे जुनचा फोंडो राज्याभिषेकामध्ये होऊन गेला. जुलै ग्रँड फोंडोसाठी योगेश कानडे आणि मी खंबाटकी घाट करून आलो(१३० कि.मी.). ईथुन पुढे मला सायकलींगसाठी जोडीदार मिळणे अवघड होत गेले. मग मी एकटाच सायकलींगला जाऊ लागलो. जुलैअखेरीस आगमन झालेल्या पावसाने सायकलींगमध्ये बराच व्यत्यय आणला. तरीसुद्धा मी सरावात खंड पडु दिला नाही. एकदा कुत्रा आडवा आल्याने सायकलवरून जोरात पडलो. हाताच्या पंजाला लागले आणि उजवा गुडघा चांगलाच सोलुन निघाला होता. तरीसुद्धा माझे सायकलींग अखंड चालु होते. काही घाबरट मित्र अपघाताची भिती व्यक्त करायचे. पण मी कधीही डगमगलो नाही.
एकदम २०० कि.मी. कधीही शक्य नाही. ७५,१००,१५० आणि २०० कि.मी. अशा क्रमाने गेल्यास काहीही त्रास होत नाही. १४० चा सराव असेल तर एखाद्या दिवशी तुम्ही २०० कि. मी. अंतर पार करू शकता.
जसजसे अंतर वाढत जाईल तसतशी मरणाची भुक लागत जाते. समोर येईल त्याचा फडशाच. आवडती नावडती भाजी वगैरे संकल्पना त्यावेळेस खुजा वाटतात. हा याची देही अनुभव योगेश कानडे आणि मी घेतला जेव्हा आम्ही दोघेच खंबाटकी घाट करायला गेलो होतो. नुसते पाणी आणि दोन-चार कॅडबरी बरोबर घेऊन खंबाटकी कडे निघालो. शिरवळमध्ये दोन दोन वडापाव खाल्ले असतील तेवढेच. अंगात त्राण नावाची गोष्टच शिल्लक नव्हती. कसेबसे शिवापुर तोलनाक्यापर्यंत आलो. फणसाचे गरे विकणारा डाव्या कोपर्यात दिसला. कसे पावशेर न विचारताच पावशेर द्या म्हणालो. काट्यातुन गरे आमच्या हातात आणि गपागपा आमच्या पोटात गेले. मागे वळेपर्यंत फणसाचे गरे गायब. चकीत मुद्रेने गरे विकणा-याने विचारले,
"खाल्ले की बॅगेत ठेवले?"
पोटात गेले, पन्नासचे करा. आमची अवस्था बघुन त्याने ४ गरे जास्त दिले, म्हणाला खावा, दिवसभर सायकल चालवताय राव तुम्ही. पुढे शिवापुर येथे मस्त जयभवानी हॉटेलवर ताव मारला. पण ही झालेली उपासमार आयुष्यभराचा धडा शिकवुन गेली.
wow Alibag
ReplyDelete