Sunday, 7 December 2014

हरिश्चंद्रगड ट्रेक

" हरीश्चंद्रगड पाचनेई मार्गे"

साधारण माहीती
विभाग- माळशेज घाट
जिल्हा- अहमदनगर
रांग-  हरीश्चंद्रगड
समुद्रसपाटीपासुन उंची- ४६७१ फुट
श्रेणी- सोपी/अवघड (तुम्ही कोणता मार्ग निवडता त्यावर अवलंबुन)
कालावधी- आदल्या रात्री मुक्कामी गेलेले उत्तम

          सह्याद्रीची श्रीमंती एवढी अफाट आहे की आम्हा भटक्यांना गरीबीची कधी जाणीवच होत नाही. युरोप सिंगापुरच्या कृत्रिम झगमटापेक्षा सह्याद्रीचं रांगडं रुप अनुभवण्यातच मला धन्यता वाटते. आणि सह्याद्री अनुभवायचा असेल तर ईथे पैशाची श्रीमंती कुचकामी ठरते. ईथे हवी शरीराची श्रीमंती. सह्याद्रीत जेवढी गुंतवणुक कराल तेवढी तो दामदुप्पटीने परत करतो.
          ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातलं सर्वोत्तम ठिकाण कोणते असेल तर ते म्हणजे हरीश्चंद्रगड. याला महाराष्ट्रात ट्रेकर्सची पंढरी म्हणतात. सह्याद्रीत बरेच ट्रेक केलेले असोत पण हरीश्चंद्रगड केलेला नसेल तर तुमच्या ट्रेकींगला काही अर्थ उरत नाही निदान आमच्या पुण्यात तरी तसं आहे. म्हणजे १०० कसोटी सामने खेळुनही  लॉर्डसवर एकही कसोटी सामना न खेळण्याचं दु:ख जसे एखाद्या क्रिकेटरला बोचत असते तसेच हरीश्चंद्रगड ट्रेक न करण्याचे दु:ख एका ट्रेकरला सतावत असते.
        नयनमनोहर दृश्य पहायला आवडत असतील तर त्याने हरीश्चंद्रगड नक्कीच करावा. नेत्रांना सुखद अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कठीण मार्ग निवडुन थरार अनुभवायचा असो किंवा अबालवृद्धांना घेऊन गडावर जायचे असो, हा किल्ला सर्व थरातील ट्रेकर्सना तेवढाच आनंद देतो. भव्यदिव्य कोकणकडा पाहुन तर डोळयांची पारणे फिटतात. महाराष्ट्रातील दुस-या क्रमाकांचे सर्वोच्च शिखर तारामती सर केल्याचा आनंद, आणि तेथुन दिसणारे सह्याद्रीचे सुंदर रांगडं रुप. नाणेघाट, आजोबा, सिद्दगड आणि कुलंग किल्ला. सर्वात सुंदर दिसते ते माळशेज घाटाचे रुप. सुरुवात, मध्य आणि अंत असा पुर्ण लांबीचा माळशेज घाट तारामती शिखरावरुन पहावयास मिळ्तो. ते घाटातील रस्त्याचे चकाकणारे डांबर पाहुन असे वाटते कि एखादा लांबलचक साप ऊन घेण्यासाठी सह्याद्रीच्या मांडीवर पहुडलाय...

        ईथे रॅपलिंग, रॉक क्लाईंबिंग तसेच व्हॅली क्रॉसींगसुद्धा करता येते. म्हणजे ट्रेकिंग आणि क्लाईंबिंग मधे जे जे करतात ते ते सर्व या गडावर अनुभवता येते. म्हणुनच या गडाला ट्रेकर्सचे नंदनवन म्हणतात. तसेच मुक्काम करण्यासाठीसुद्धा हा किल्ला सर्वोत्तम आहे. ईथे एकुण ९ गुहा आहेत त्यातल्या २ खुप मोठया असुन १०० ते १५० लोकांच्या राहण्याची व्यवस्था आरामात होऊ शकते. 

       हरीश्चंद्रगडावर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत; तुम्हाला थरार अनुभवण्याची हौस असेल तर नळीच्या वाटेने गडावर जाऊ शकता. ही वाट, वाट कसली ती तर कडयावरुन पावसाचे पाणी खाली घेऊन जाणारी नाळ आहे, त्या नाळेने वर आल्यास कोकणकडयाच्या उजव्या बाजुला आपण गडावर पोहचतो. क्लाईंबींगचा अनुभव असल्याशिवाय या मार्गाने जाऊ नये. 

        दुसरा मार्ग आहे तो म्हणजे टोलार खिंड. खुबी फाटयावर उतरुन खिरेश्वर धरणाच्या भिंतीवरुन चालत आपण खिरेश्वर गावात पोहोचतो. तेथुन टोलार खिंडीत जाण्यासाठी दोन ते अडीच तास लागु शकतात. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड टोलार खिंडीत उभा केलेला आहे. पुढे १०० फुटाचा रॉक पॅच आहे. रेलिंगच्या सहाय्याने आरामात पार करता येतो. रॉक पॅचवरुन ती वाट सरळ पुढे पश्चिमेला छोटया टेकडया आणि पाण्याचे प्रवाह पार करत हरीश्चंद्रेश्वराच्या मंदिरापर्यंत घेऊन जाते. या मार्गावर बऱ्याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या धोपटमार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो. येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. बहुतेक ट्रेकर्स गडावर जाण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करतात. .पुण्याकडून (शिवाजीनगर) खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसची सोय आहे. आजकाल चार चाकी सर्वांकडे असते त्यामुळे एस.टी. बसचे वेळापत्रक पाहण्याची गरज पडत नाही.

       ईतरही अनेक मार्ग आहेत परंतु सर्वात सोपा मार्ग म्हणजे पाचनेई कडुन येणारा. कोणत्याही वयाचे ट्रेकर्स या मार्गाने सहज कोकणकडयापर्यंत पोहोचु शकतात. नवख्या आणि कधीतरी गड चढायला जाणा-या हौशी ट्रेकर्सनी हाच मार्ग अवलंबवावा असं मी तरी म्हणेन. आम्ही नऊ जण याच मार्गाने गडावर गेलो. 

       आम्ही २९ नोव्हेंबर, शनिवारी रात्री ११:३० वा. पुण्यातुन निघालो. मजल दरमजल करत, विचारपुस करत करत कसे बसे पाचनेई पर्यंत सकाळी ०५:३० वाजता पोहोचलो. पहाटे ३ वाजता बोटा येथे गवती चहा टाकुन घेतलेला चहा आणि खुर्चीवर बसुन घेतलेला शेकोटीचा आनंद केवळ अविस्मरणीय. पुणे ते बोटा पर्यंत मी ड्राईव्हींग करत होतो. बोटाच्या पुढे महेंद्रकडे गाडी दिली कारण मला पेंग यायला सुरुवात झाली होती. जेव्हा मला जाग आली तेव्हा धेंडे गाडी चालवत होते. पहाटे ३ ते ५ मस्त झोप घेतली. संपुर्ण २६ तासांच्या ट्रेकमध्ये फक्त २ तास झोप. पण मजा आली.  लव्हाळी फाटा २ कि.मी. ही पाटी आणि मोठे वडाचे झाड कायम लक्षात राहील. तिथुन डावीकडे गेल्यामुळेच आम्ही पाचनेईपर्यंत न चुकता पोहोचलो नाहीतर भरकटण्याची शक्यता प्रचड होती. पहाटे साडे चार वाजता एक ईसम आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी कारमध्ये बसुन ३ कि.मी. आमच्याबरोबर आला आणि पायी परत गेला.  गावाकडची माणसंच लई माणुसकीबाज...

      अशा रीतीने आम्ही पाचनेईमध्ये आलेलो होतो. स्थानिक हॉटेलवाल्याला चहाची ऑर्डर दिली चहा घेऊन आम्ही लगेच गडाकडे कुच करणार होतो. चहा घेताना काढलेला फोटो, हा एकच फोटो असा आहे ज्यामध्ये आम्ही नऊही जण एकत्र आहोत. 
डावीकडुन शिंदे (वय ५६ वर्ष), धेंडे (वय ५० वर्ष), संतोष झेंडे, महेन्द्र दळवी, गणेश परदेशी, निलेश बारांगळे (Jackson), रमेश रावत, कल्पेश कोथमिरे आणि मी स्वत: विजय वसवे. 

पाचनेई मध्ये सकाळी चहा घेताना. चहा घेऊन आम्ही लगेच गडाकडे निघालो. 

गडाची वाट सुरु होतानाच भौगोलिक परीमाण दर्शवलेले आहे.  समुद्रसपाटीपासुनची उंची ४६७९ फुट (तारामती शिखर)
अतिशय सोपी आणि सहज जाता चढता येणारी ही वाट आहे. एकदा या वाटेवर पाय ठेवला की चुकण्याची शक्यताच नाही. सगळ्यात पुढे आघाडी घेतली ती संतोष झेंडे यांनी. 

रूळलेली पायवाट
पायवाटेने जात असताना सहज मागे वळुन पाहीले तर हा सुंदर नजारा पाहावयास मिळाला.
या वाटेवर रेलिंग बसवुन थोडा जो थरार होता तोसुद्धा उरलेला नाहीये.
कल्पेश आणि मी
हा ट्रॅव्हर्स, ट्रेकींग आपल्याकडे ईंग्रजांकडुन आलेले असल्यामुळे त्यामध्ये सर्रास इंग्रजी शब्दच प्रचलित आहेत. आणि बरेचसे शिकलेले लोक तेच वापरण्यात अभिमान बाळगतात. मातृभाषेमध्ये याला काय म्हणावं हे शोधण्यासाठी कोणीही कष्ट घेतलेले नाहीत अपवाद आनंद पाळंदे यांचा.
पाठमोरे दृश्य
सुरेख नजारे

या ठिकाणावर लांबलचक फोटोसेशन घेण्यात आले. उभा, बसुन, झोपुन, आडवे पडुन, मांडी घालुन, ईकडे बघताना, तिकडे बघताना... काही विचारु नका. फोटोची हौसमौज करुन घेतली. जीवाची मुंबई करुन घेतली. म्हातारपणी भाव खायला हे फोटो खुप उपयोगी पडतील.. :D .  जापानी लोकांनी फोटोवरचा खर्च एकदम शून्य करुन टाकला आहे. १०-१२ वर्षापुर्वी एवढे फोटो काढण्याचा कोणी विचारही केला नसता. तेव्हा म्हणजे २०० रुपयाचा रोल विकत आणावा लागत असे. त्यामध्ये जेमतेम ३६ फोटो यायचे. नंतर तो एक रोल धुण्याचा खर्च २५० रुपये. रोल धुऊन आणल्यानंतर फोटो कसे आलेत बघण्यासाठी सगळे उडया घ्यायचे. तेव्हा कॅमेरा बॅटरी वगैरे सर्व खर्च पकडला तर ३६ फोटो काढण्यासाठी ५०० रुपये खर्च येत असे. या ट्रेकला आम्ही जवळजवळ सर्वांनी मिळुन २५०० फोटो काढले असतील. आता करा हिशोब. खर्च फक्त कॅमे-याची बॅटरी आणि मोबाईलची बॅटरी तीही रिचार्जेबल. जापान्यांना माझा सलाम. 
एवढया कमी त्रासामध्ये हे सुंदर नजारे पाहायला मिळतात.. पाचनेई वाट झिंदाबाद.
पुर्वेकडुन आलेली कोवळी सुर्याची किरणे मन प्रसन्न करुन गेली. फिरुन फिरुन एकच विचार मनात येत होता, पावसाळयात ईथले नजारे काटा किर्र करणारे असतील. असं म्हणतात कि आवडते ठिकाण सर्व ऋतुंमध्ये पाहावे. पावसाळयात पण जायचेच ईथे...
हरीश्चंद्रेश्वराचे मंदिर जवळ यायला लागले की थोडीशी झाडाझुडुपांनी वेढलेली वाट आहे.
हे छोटेसे मंदिर दिसले की समजावे आपण गडावर आलो.
खालील फोटोंमध्ये मंदिर आणि त्याभोवतीचा परिसर तसेच बारीकसारीक मुर्त्या टिपल्या आहेत. मंदिराचे नक्षीकाम आणि सध्याची स्थिती याचा अंदाज येऊ शकतो.

भग्न अवस्थेतील मुर्त्या
खांबावरील आणि ईतर नक्षीकाम




मंदिराला जोडुन असलेली पाण्याची व्यवस्था, आत उतरण्यासाठी पाय-यासुद्धा आहेत.

महाविष्णुंचे मंदिर, "महाविष्णु" नावाचा वापर करणारे अत्यंत बुद्धिमान आणि भागवत ज्ञानामध्ये पारंगत असतात. म्हणुन या ठिकाणाच्या पवित्रतेविषयी मी कल्पना करु शकतो. 
हरीश्चंद्रेश्वर
हरिश्चंद्रेश्वराचे दर्शन घेतले आणि संपुर्ण मंदीर डोळयाखालुन काढले. सर्वकाही कॅमे-यामध्ये टिपल्यानंतर आम्ही सगळे पोटोबा करायला बसलो. 
गणेशचे आवडते काम त्याला सोपवण्यात आले. रिअल मिक्स फ्रुट. बाजुला फोटोमध्ये न येण्यासाठी धडपड करणारा मी.
आता ही पोज घेऊन कैक जण फोटो काढत असतील. या पोजवर कोणी कॉपीराईट लावेल असे मला तरी वाटत नाही.

गुहेतील शिवलिंग

त्रिशुळ 

या थंडगार पाण्यामधून पिंडीला प्रदक्षिणा मारता येते. पाण्याची खोली साधारण छातीपर्यंत येते.

      
      श्रीमद भागवतम एकुण बारा स्कंधांचे आहे. पहील्या स्कंधाच्या १६ व्या आणि १७ व्या अध्यायात पृथ्वी आणि धर्म यांची कलियुगातील स्थिती वर्णन केलेली आहे. पृथ्वी गाईच्या रूपात तर धर्म बैलाच्या रूपात अवतिर्ण झालेले आहेत. धर्मरूपी बैलाला एकच पाय असुन कलि (कलियुग) त्या पायावरही आसुडाने फटके मारत आहे. म्हणजे कलियुगात उरला सुरला धर्मही नाहिसा होणार यात तिळमात्र शंका नाही. जेव्हा संपुर्ण धर्म नाहीसा होईल तेव्हा भगवंत स्वतः कल्कि अवतार घेऊन सर्व नराधमांचा नाश करतील. सत्ययुगात धर्म चार पायांवर उभा असतो (१००%), त्रेतायुगात तीन पायांवर (७५%), द्वापारयुगात दोन पायांवर (५०%) तर कलियुगात धर्म एकाच पायावर उभा आहे (२५%). धर्माच्या पायावर आघात करणा-या कलिला सम्राट परीक्षित दंड देतात. या घटनेला आता पाच हजार वर्षे होऊन गेलेली आहेत. हे वाचलेलं आठवलं ते हरीश्चंद्रगडावरील शिवलींग पाहील्यानंतर. पुर्वी चार खांबाने वेढलेल्या शिवलींगाभोवती आता एकच खांब शिल्लक राहीलेला आहे. शिवलिंगाभोवतीचे हे खांब कलियुगातील धर्मस्थितीचे प्रतिक आहेत यात मला तिळमात्र शंका नाही. 
    पाठीमागचा उजवीकडचा पाय (झेंडयाच्या मागचा) सत्ययुगात नाहीसा झालेला आहे (कारण त्याचा लवलेषही दृष्टीस पडत नाहीये). सत्ययुग संपुन आता २१ लाख वर्षे झालेली आहेत (सांख्य योग, श्रीमद भगवदगीता). मागचा डावीकडचा पाय त्रेतायुगात नाहीसा झालेला आहे कारण त्रेतायुग संपुन आता साधारण ९ लाख वर्ष झालेली आहेत. सत्ययुगापेक्षा १२ लाख वर्ष उशिरा पडलेला खांब त्याच्या स्थितीवरुन जाणवत आहे. द्वापारयुग संपुन फक्त ५००० (पाच हजार वर्ष) झालेली आहेत. ५००० वर्षापुर्वी पडलेल्या खांबाचे वरच्या भागातील नक्षीकाम अजुनही उठावदार आहे. 
येथुन जवळच तारामती कडयातुन मळगंगा नदीचा उगम आहे. 








हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारातील पुष्करीणी

दारु मांस वर्ज्य ठेवा.

        हरीश्चंद्रेश्वराचे मंदिर पाहुन झाल्यानंतर आम्ही आमचा मोर्चा तारामती शिखराकडे वळवला. मंदिराच्या परीसरातुन दाट झाडीतुन वर जाणारी वाट तारामती शिखराकडे जाते. आम्हीसुद्धा विचारत विचारत गेलो. आम्ही तारामती शिखर करुन खाली उतरणार होतो आणि मग कोकणकडयाकडे जाणार होतो. पण माहीती अशी मिळाली की तारामतीच्या शिखराच्या सरळ धारेने पुढे गेल्यास कोकणकडयाकडे जायला वाट आहे आणि उतरण्यासाठी दोन शिडयाही आहेत. अरे व्वा व्वा .. शिडया म्हणल्यावर अंगात उत्साह संचारला. 
येथुन पिंपळजोगा धरण आणि माळशेज घाट अतिशय सुंदर दिसतात.

तारामती शिखराकडे जाताना उंचावरुन दिसणारे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आणि पुष्करीणी. 

खिरेश्वरमार्गे येणारी वाट फोटोमध्ये दिसत नाही पण तोच प्रदेश आहे.

महाराष्ट्राचे दुस-या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर "तारामती".. (पहील्या क्रमांकाचे कळसुबाई आहे)

तारामती शिखरावरील शिवलिंग

हरीश्चंद्र आणि तारामती सर केल्याचा आनंद

हा फोटो मी काढत असताना माझा फोटो कोणीतरी काढला.. याच्याच खाली तो फोटो देत आहे. 

वरचा फोटो काढत असताना मी.

तारामती शिखरावरुन कोकणकडयाकडे जाताना लागणारी पहीली शिडी. शिडीवर खुद्द रावतसाहेब.


दुस-या शिडीकडे वाटचाल करताना ...


तारामती शिखरावरुन कोकणकडयाकडे जाताना लागणारी दुसरी शिडी.

तारामती शिखरावरुन कोकणकडयाकडे जाताना लागणारी दुसरी शिडी.

कोकणकडयाची मुंहदिखाई. आजुबाजुला दाट हिरवाई आहे.





                     हरिश्चंद्रगडावरुन शिवनेरीहडसरचावंडनिमगिरीसिंदोळाजीवधनगोरखगडमच्छिंद्रगडसिद्धगडमाहुलीगडअलंगकुलंगमदनगडकलाडगडभैरवगड (मोरोशी) तसेच भैरवगड (शिरपुंजे),कुंजरगड असे किल्ले दिसतात.

कोकणकडयाचा अंतर्वक्र भाग येथुन स्पष्ट दिसत आहे.

कोकणकडयाला "Hats off"

कड माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रुप पहावे लागते.. झोपण्याचा पर्याय मला आवडला...डोक्याला तापच नको..

छान फोटो काढलाय आमच्यातल्या कोणीतरी.

फेसबुक व्हाटसअ‍ॅपसाठी प्रोफाईल पिक.. विजय वसवे 

"कोकणकडा" आमच्या ट्रेकचा सर्वोच्च पॉईंट 

या बाजुनेच येते नाळीची वाट

कोकणकडयाचा अंतर्वक्र भाग. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे.

"याद किया दिल ने कहां हो तुम???" या गाण्याच्या ओळॊ गुणगुणत होतो.





भव्य हिमालय तुमचा आमचा ...
केवळ माझा सह्यकडा !


गडावरीक एक फुल...

सुर्य मावळायच्या आत आम्ही पाचनेईमध्ये परत आलो. तिथे थोडा नाष्टा करुन परतीचा प्रवास सुरु केला.. येताना पाचनेईपासुन बोटापर्यंत ड्राईव्हींग केले. जाताना आणि येताना ड्राईव्हींग करण्याचा अतिरीक्त ताण शरीरावर पडला. पण ट्रेक पुर्ण झाल्याच्या आनंदापुढे सर्व वेदना कुठल्या कुठे विरुन गेल्या.. 
जय शिवराय !
(एकुण अंतर ४०० कि.मी. )








1 comment:

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...