सायकलवरुन किल्ले पुरंदर....
दर दिवाळीच्या सुट्टीत काहीतरी वेगळं, मनाला भरपुर प्रसन्नता मिळेल असं काहीतरी केल्याशिवाय मला चैन पडत नाही. दिवाळी आहे म्हणुन नुसतं नटुन थटुन घरात बसणे मला झेपत नाही, फार फार तर लक्ष्मीपुजनच्या दिवशी सौ. च्या आग्रहाखातर कुठे बाहेर पडत नाही. दिवाळीच्या लांबलचक सुट्टीचा खासा उपयोग व्हावा असं दरवेळी वाटत असतं. ५ दिवसाची असली तरीपण आमच्यासाठी लांबलचकच. अगदी नवस करून वर्षभर वाट पहावी अशी हि दिवाळीची सुट्टी.
सर्व मित्र या सुट्ट्यांचा आनंद घेत असतात आणि अशा या सणासुदीला कोणी सायकलिंगला येईल की नाही? अशीही शंका मनामध्ये होती, म्हणुन पुरंदरचा बेत कोणालाच बोलुन दाखवला नाही. पुण्याजवळ सायकलच्या आवाक्यात असणारा पुरंदर हा दुसरा गड. अर्थात पहीला सिंहगड. सिंहगड खुप वेळा करून झालेला आहे. जाऊन येऊन ४५ कि.मी अवघे. पुरंदर जाऊन येऊन १०० कि.मी. आहे. बेत ठरला. या दिवाळीची पहाट पुरंदरच्या दिशेला जाणार होती.
सकाळी लवकरच सायकलला टांग मारली. दिवाळीतला पाडव्याचा दिवस. सकाळी सकाळी प्रवास करणारे भरपुर लोक दिसत होते. एरवी एवढे लोक दिसत नाहीत. लक्ष्मीपुजन उरकुन सर्वजण गावी निघाले असावेत बहुतेक. दुचाकी आणि कारची गर्दी खुप होती. बिघाड झालेल्या एक दोन कार्स रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. काही टु व्हिलरवाले मुत्रविसर्जन करण्यासाठी थांबलेले दिसत होते. संपुर्ण हायवेवर कुठेही मुत्रविसर्जन करण्याची सोय नाही. त्यामुळे सोईची जागा बघुन जो तो मोकळा व्हायला बघत होता. गाड्या पळवण्याची घाई लोकांना एवढी की प्रत्येकजण स्वतःला माईकल शुमाकरचा बापच समजत होता. या सर्वांपासुन लांब मी आणि माझी सायकल कडेकडेने कात्रज नविन बोगद्याकडे हळूहळू सरकत होतो. या पुरंदर सायकल मोहीमेला वेळेची मर्यादा नव्हती. एवढ्या वेळात व्हायला पाहीजे वगैरे असं काही नाही. वातावरण आणि हवामान सायकल चालवण्यासाठी पोषक आणि उत्साह वाढवणारे होते. बंगालच्या उपसागरात हुदहुद वादळ आल्यामुळे देशात सगळीकडे ढगांचे आच्छादन आलेले होते. त्यामुळे उन्हाची झळ कमी बसत होती. दुसर्या दिवशी पाऊस देखील पडला. एकंदरीत पँडल मारणार्यांची मज्जाच होती.
यावेळेस मी एकही एनर्जी ड्रिंक बरोबर घेतलेले नव्हते. कॅडबरी सुद्धा घेतलेली नव्हती. सायकल चालवताना कॅडबरी खाणे पौष्टीक असले तरी ती खायला लागलो की मला नकोशी वाटते. कारण म्हणजे माझ्या चिमुकलीला कॅडबरी फार फार आवडते, मी जर कॅडबरी खायला घेतली तर तिचा चेहरा माझ्या नजरेसमोर येतो आणि मग ती कॅडबरी काहीकेल्या माझ्या घशाखाली जात नाही. BRM300 ला नेलेल्या निम्म्या कॅडबरी तिच्यासाठी परत घेऊन आलो होतो. परत आलेल्या तेवढया कॅडबरीज बघुन स्वारी प्रचंड खुश झाली. आणि तो आनंदी चेहरा पाहुन मी तिच्या दुप्पट आनंदी. म्हणुन यावेळेस प्रायोगिक तत्वावर नुसते पाणी बरोबर घेऊन सायकल चालवायची असे ठरवलेले होते.
शिवापुरच्या तोलनाक्यावर पैसे देण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली होती, एवढी गर्दी की दुतर्फा तुडुंब गाड्या उभ्या होत्या. पैसे घेण्यासही लोक विलंब करतात याचंच आश्चर्य वाटत होतं. गर्दीमुळे गाडीत बसुन ताटकळलेल्या लोकांकडे बघत सायकलवर सुसाट निघुन जाण्याची मजा काही औरच. हाऊसफुल्लची पाटी असतानाही सिनेमाची तिकीटे मिळाल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद झाला. पण कारवाले हा आनंद चिरकाल टिकुन देत नाहीत. टोल भरून झाला की सुसाट निघुन जातात. तोलनाका ओलांडताना गरम वडे तळताना पाहील्यावर माझ्यावरचा माझाच ताबा सुटला. पुढे गेलेलो मागे वळुन आलो आणि दोन वडापाव घशाखाली घातले. मस्त गरम गरम बटाटेवडे खाऊन तृप्ती मिळाली. आणि चहाबरोबर क्रिम रोल खाण्याचा मोहही आवरता आला नाही. चहावाल्याने सायकलची एक चक्कर मागितली, त्याला म्हणालो ही अतिशय महागडी सायकल आहे, तु जर हीची चक्कर घेतलीस तर बिलाचे पैसे वजा होऊन तुला ५० रूपये मला द्यावे लागतील. टणकन उडालाच तो... हाहाहा. नको नको राहु द्या मग म्हणाला. गियरची सायकल चालवण्याचा अनुभव नसलेल्या व्यक्तीला सायकल चालवायला देण्याची भिती वाटते. ताकदीने एखादे गियरचे बटण चुकीच्या पद्धतीने दाब देऊन तोडुन ठेवले तर पुढच्या प्रवासाचे वांदे होण्याची शक्यता असते. म्हणुन पुढिल प्रवासात विघ्न येऊ नये म्हणुन त्याला कटवण्यासाठी सुक्का ढोस दिला. पोटात भर पडल्यावर सायकल चालवायला नविन जोम मिळाला. पुन्हा सायकलींगला सुरूवात केली...
कात्रज नविन बोगदा ते कापुरहोळ अंतर २५ मिनीटांत पार करता येते. त्या दिशेला सायकल चालवताना थोडासा उतार मिळतो, त्यावर सायकल भन्नाट वेग पकडते आणि सायकल जर अत्याधुनिक रोडबाईक असेल तर सोने पे सुहागा. पण आज मला वेळेशी स्पर्धा करायचीच नव्हती अंतर कापणे महत्वाचे होते. वेळेशी स्पर्धा करण्यात शक्ती वाया घालवली तर पुढे पुरंदरवर चढाई करताना शरणागती पत्करावी लागेल. त्यामुळे अतिशय स्थिर वेगाने सायकल चालवत कापुरहोळ पर्यंत पोहोचलो. सायकलकडे बरेच जण वळुन वळुन बघतात. "सायकलकडे वळणा-या नजरा" खरंतर हा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. नजरा कशाकशा असतात? हे प्रत्यक्ष अनुभवलेलं केव्हाही चांगलं. मी सांगुन त्यातली मजा तुम्हाला येणार नाही. सायकल चालवणारे दुर्मिळ होत चालले आहेत. त्यामुळे हल्लीच्या काळात हायवेवरून जाणारा सायकलस्वार नजरेस पडला की लोक त्याच्याकडे असे बघतात जसे काही नामशेष झालेल्या प्रजातीतील अचानक एखादा प्राणी त्यांच्या समोर आला आहे. आणि असा प्राणी पाहील्यानंतर जे कुतुहल आणि आश्चर्य चेह-यावर असायला हवे अगदी तेवढ्याच आश्चर्याने बघत असतात. त्यातल्या त्यात जे अतिउत्साही असतात ते विचारतात, "कुठे चाललाय?"
"कुठुन आला?"
"कशासाठी सायकल चालवताय?"
"रेस आहे का?"
"एकटेच दिसताय?"
"काय बक्षिस आहे?"
"ही सायकल केवढ्याची आहे?"
"टायर खुपच बारीक आहेत?"
आणि टायरकडे बघुन सर्रास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे "ट्युबलेस आहेत का?"
माझा मुड चांगला असेल तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे आवडीने देतो. पण जर सायकल चालवुन मी मेटाकुटीला आलेलो असेल तर एकही शब्द बोलत नाही फक्त 'हो' किंवा 'नाही' मान डोलवुन उत्तर देतो. बोलण्याची खुप ईच्छा असते पण नाईलाज असतो.
कापुरहोळ पर्यंतचा एक टप्पा पार झालेला होता. दुसरा टप्पा कापुरहोळ ते नारायणपुर आणि तिसरा आणि शेवटचा टप्पा नारायणपुर ते पुरंदरवरील मुरारबाजींचा पुतळा.
हायवेवरून डावीकडे वळलो. नारायणपुरकडे जाणार्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. सायकलसाठी तो रस्ता नाहीच. या रस्त्यावर साध्या चाकांच्या सायकलचा निभाव लागणे कठीणच. माझ्या सायकलचे टायर वैशिष्ट्यपुर्ण असल्यामुळे निभावुन गेले. Vittoria zaffero ईंम्पोर्टेड टायर्स 700x23c, आणि त्यात 140 PSI चे प्रेशर. यामुळे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे सायकल पंक्चर होण्याची शक्यता खुप कमी होती. केतकावळेच्या बालाजीपर्यंतचा रोड अतिशय खराब झालेला होता. हायवे सोडल्यापासुन क्लाईंब (चढ) वाढत चालला होता आणि त्यात खराब रोडची भर. आणि कहर म्हणजे एका समोरून येणार्या कारने ओव्हरटेक करताना मला रोडवरून खाली उतरायला भाग पाडले. इतर चालकांची मानसिकता बदलणे खुप गरजेचे आहे. शारीरीक कष्ट घेऊन सायकल चालवणार्यांच्या मार्गात स्वयंचलित वाहनांनी अडथळा निर्माण करू नये एवढीच माफक अपेक्षा आहे, मार्ग मोकळा करून द्यावा वगैरे हि खुप लांबची किंवा अशक्यप्राय अपेक्षा म्हणता येईल.
अजुन एक गंमत सांगतो. मराठी माणुस अशा प्रकारे सायकल चालवु शकतो हे आपल्याच मराठी माणसांच्या पचनी पडत नाही. कारण अगदी ग्रामीण भागातील लोकसुद्धा माझ्याशी संभाषणाची सुरुवात करायची असेल तर हिंदीने करतात.
"कहांसे आये हो?"
या वाक्याने शोलेमधल्या गब्बरचा डायलॉग मारल्याचं समाधान मिळत असावं बहुतेक. हाच प्रश्न त्यादिवशी नारायणपुरकडे दुचाकीवर चाललेल्या दोघांपैकी एकाने विचारलेला.
"शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीतुन... " मराठीत बोल असं सांगण्यापेक्षा हे उत्तर ऐकुन तरी त्याला कळेल की मी मराठी आहे आणि तो माझ्याशी मराठीत बोलेल अशी अपेक्षा होती.
"कहां जा रहे हो?"
त्याचा पुढचा प्रश्न. पुन्हा हिंदीत विचारलेला प्रश्न मला आवडला नाही. आणि न आवडलेल्या प्रश्नाचे उत्तर मी देत नसतो. त्याच्यामागे बसलेल्याने माझी नाराजी ओळखली. तोच त्याला म्हणाला "अरे, ते मराठीत बोलताहेत, मराठी आहेत ते". त्याने जय महाराष्ट्र दिला, मग मी पण दिला "जय महाराष्ट्र".
एकाने तर कहरच केला. मी पुरंदरवर चढाई करत होतो मला ओव्हरटेक करुन जाता जाता "जो बोले सोनिहाल....." च्या मोठमोठ्याने आरोळ्या ठोकत गेले. मला काहीच उमगले नाही. दिसताहेत तर मराठी आणि पंजाबच्या घोषणा देत गेले. आर्मी गेट थोड्याच अंतरावर राहीले होते, तिथे ते भेटणारच होते आणि भेटलेही. कारण हेल्मेट नसल्यामुळे सैनिकांनी त्या सर्वांना अडवुन धरले होते. टिपीकल मराठी पेहरावातील मुले होती. काहींनी तर शिवबंधन घेतलेले होते. मला राहवले नाही, मी त्यांना विचारलेच,
"पंजाबवरून आले का?"
एकजण जरा तावात बोलला, "नाही, पण पंजाबवरुन आले असं का विचारले?"
"अरे, तुम्ही येताना जो बोले सोनिहाल... मोठ्याने घोषणा देत आले ना?" म्हणुन मला तसं वाटलं.
तर तो म्हणतो तुमच्या हेल्मेटमधुन बाहेर आलेला स्कार्फ बघुन आम्हाला वाटलं तुम्ही पगडी बांधलेली आहे, तुम्ही पंजाबी वाटले आम्हाला. म्हणुन तशा घोषणा दिल्या. पंजाबी लोक हेल्मेट वापरत नाहीत हे सुद्धा यांना माहीत नाही, यांच्याकडुन अपेक्षा तरी काय करणार?
केतकावळेचा बालाजी सोडल्यानंतर रस्त्याची गुणवत्ता सुधारली. रस्त्यात खुप फरक जाणवला. एवढा फरक की जेवणाच्या ताटातली मसुराच्या आमटीची वाटी बाजुला जाऊन मधेच बासुंदीची वाटी पुढे यावी. रस्ता सुधारला पण चढ वाढत चालला होता. विरूद्ध दिशेने वाराही वाढत चालला होता. त्यामुळे सायकल पळवण्याच्या भानगडीत पडलो नाही. यथाशक्ती पॅडलवर जोर देऊन मार्गक्रमण चालु ठेवले. चिव्हेवाडीचा छोटासा घाट मस्त वाटला. सायकलींग करताना मस्त वाटलेला हा पहीलाच घाट. अन्यथा सायकलवर जाताना घाट म्हटलं कि अंगावर काटा येतो. चिव्हेवाडी घाट ओलांडुन थेट नारायणपुरमध्ये उतरलो. तिथे भाविकांची गर्दी दिसली. ईथुन रस्ता पुन्हा खडबडीत होऊ लागला. पुरंदरवर जाईपर्यंत तो तसाच खडबडीत आहे. पुरंदरकडे वळल्यानंतर एका घरामधुन पाणी प्यायला मागितले आणि जवळच्या दोन्ही बाटल्याही भरून घेतल्या. ग्रामीण भागात पाणी देण्याचे पुण्य अजुनही मिळवले जाते. मी म्हटलेलं थँक्यु त्यांच्या लेखी महत्वाचं असेल कि नाही कोणास ठाऊक? पण तहानलेल्यांची तहान भागवण्याचे त्यांचे पुण्यकर्म वाखाणण्याजोगे होते.
पट्टीने सरळ रेष मारावी तसा पुरंदरकडे जाणारा सुरुवातीचा रोड सरळ आहे. नारायणपुर ते सासवड रस्त्यावरुन उजवीकडे वळले की घाट चालु होईपर्यंतचा रस्ता खुप सरळ आहे. अगदी किल्ल्यावरून पाहील्यावरही त्याचा सरळपणा डोळ्यात भरतो. त्यावरचे पहीले वळण काटकोनात घेतल्यानंतर घाटाची चढण सुरु व्हायला लागते. जसजशी घाटाची तीव्रता वाढत गेली तसतशी रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या वाढु लागली. संपुर्ण घाटामध्ये जीवघेणी चढण कुठेच नाही पण खराब रस्त्यामुळे सायकल चालवण्याचा मुड नाहीसा होतो. किल्ल्यावर भलेमोठे आरसीसी बांधकाम चालु आहे त्यामुळे बांधकामाचे साहीत्य घेऊन जाणारे अवजड ट्रक त्या रस्त्यावरून ये जा करत असतात. रस्त्याची वाट लागायला हेच ट्रक कारणीभुत आहेत. नाहीतर दोन वर्षापुर्वी हा रस्ता अतिशय सुरेख होता. पुढे पुढे तर फक्त खडे आणि मातीमधुन कशीबशी वाट शोधत शोधत सायकल चालवली.
कितीही त्रास झाला तरी सायकलवर गड सर केल्याचा आनंद काही औरच. पहा-यावर असणा-या सैनिकांनीसुद्धा (Indian Army Soldiers) कौतुक केले. मग तर विचारुच नका. आणखी चढण असती तर तीसुद्धा सायकलवर कापली असती एवढा उत्साह वाढला. पुढे वीर मुरारबाजींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यावर पुरंदरवर आल्याचं समाधान लाभलं. दिवाळीची सुट्टी सत्कारणी लागली होती. असंख्य आठवणी बरोबर घेऊन पुरंदरचा निरोप घेतला. परतीचा प्रवास सुरु करताना स्ट्राव्हा वर ५० कि.मी. अंतर पुर्ण झाल्याचे दाखवत होते (http://www.strava.com/activities/211010261 ).
परतीच्या प्रवासात नारायणपुरमध्ये आल्यावर प्रचंड भुख लागली. मग तेथील भजीपाव वर यथेच्छ ताव मारला. पोटात भर पडली की सायकल चालवण्याची चिंता राहत नाही. भरलेलं पोट कितीही अंतर सायकल चालवायला मदत करू शकते. कापुरहोळपर्यंत येताना सर्व उतारच होता.
संपुर्ण सायकल प्रवास ६ तास ३३ मिनीटांचा झाला. अंतर १००.९ कि.मी, सरासरी वेग १७.७ कि.मी/तास, जास्तीत जास्त वेग ६०.५ कि.मी/तास. प्रवासाची उंची १९२४ मी. समुद्रसपाटीपासुन.
केतकावळे ते नारायणपुर मार्गावर मस्त बुरुजांचा छोटासा गडकोट बांधलेला आहे. |
हा वेगळाच प्राणी सायकला आडवा गेला. गोमसारखा दिसत होता, पण अशी दोन्ही रंग असणारी गोम मी पहील्यांदाच पाहीली. ड्रॅगन वगैरे बघतोय की काय असा भास होत होता. |
पुरंदरवर जसा जसा वर चढुन जात होतो तस तसे आजुबाजुचे नजारे बदलत होते. खराब होत चाललेला रस्ता येत होता. |
पुरंदरवर प्रवेश करायचा असेल तर एखादे ओळखपत्र बरोबर असणे बंधनकारक आहे. आणि या गेटच्या आत दुचाकी घेऊन जायचे असेल तर डोक्यावर शिरस्त्राण असणेसुद्धा बंधनकारक आहे. आर्मीच्या रजिस्टरमध्ये नोंद करुनच प्रवेश मिळ्तो. |
या ठिकाणी पोहोचल्यावर सर्व श्रम कुठल्या कुठे विरुन गेले. पुरंदर सायकलवर सर केल्याचा आनंद गगनात मावत नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी पुरंदरवर सायकलवर जाण्याचा संकल्प पुर्णत्वास गेला. |
थोर पराक्रमी मुरारबाजींपुढे मी पालापाचोळा.... |
सध्या सेल्फीचं वारं आहे, एक घ्यावीच. मोह आवरला नाही. |
येथेच मुरारबाजीने अनेक दिवस प्रतिकार करत अखेरच्या श्वासापर्यंत पुरंदर लढविला... |
वज्रगड |
पाठमोरा पुरंदर |
नारायणपुरमध्ये परतुन येईपर्यंत पोटात भुकेचा ढोंब उसळलेला होता, मिक्स भजी पाव (दोन) जागेवर फस्त केले. पालक भजी आणि कांदा भजी अप्रतिम होते. |
No comments:
Post a Comment